Monday, December 29, 2014

जुने वर्ष आणि नवे वर्ष

"नदीच्या त्याच पाण्यात तुम्ही दोन वेळा हात बुडवू शकत नाही." अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. याचे कारण नदीचे पाणी सतत वहात असते. आपला हात पाण्यातून बाहेर काढून पुन्हा पाण्यात घालेपर्यंत त्या ठिकाणी आधी असलेले पाणी वाहून प्रवाहासोबत पुढे गेलेले असते आणि त्या जागी नवीन पाणी आलेले असते. कालौघाचा प्रवाहसुद्धा सारखा पुढेच जात असतो. गेलेला क्षण कधीही परत आणता येत नाहीच, काळाबरोबर सगळे जगही सतत बदलत असते. कालचे आपले घरसुद्धा आज अगदी जसेच्या तसे राहिलेले नसते. काही वस्तू इकडच्या तिकडे झालेल्या असतात, काही नाहीशा झालेल्या असतात, तर काही नव्या वस्तू घरात आलेल्या असतात. वर्षभराने पाहिले तर घरातल्या खूप वस्तू बदललेल्या असतातच, शिवाय ते घर एक वर्षाने जुने झालेले असते. भिंतींचा रंग थोडा उडालेला असतो, तिच्यावर काही ठिकाणी डाग तर काही जागी भेगा पडलेल्या असतात. कदाचित घराची डागडुजी आणि रंगरंगोटी करून त्याला नवे रूप दिलेले असते. 

निर्जीव वस्तूंमध्येसुद्धा बदल होत असतात, तर माणसांमध्ये ते जास्तच होत असतात. कालच्या दिवसभरात आपल्याला जितकी माणसे दिसली, भेटली, आपल्याशी बोलली ती सगळी आज दिसत नाहीत, त्यातली काही माणसेच आज पुन्हा भेटतात, काही लोक अनेक दिवसांनी, महिन्यांनी किंवा वर्षांनी भेटतात, काही लोक आयुष्यात पुन्हा कधी भेटतही नाहीत. पुन्हा भेटलेली माणसेसुद्धा थोडी किंवा खूप बदललेली असतात. मध्यंतरीच्या काळात इतरांच्या तसेच आपल्याही जीनवात अनेक घटना घडलेल्या असतात, सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अनुभव आलेले असतात. वयोमानानुसार फरक पडलेले असतातच, शिवाय पूर्वी दणकट वाटणारी काही माणसे व्याधीग्रस्त झालेली असतात, तर आजारी असतांना पाहिलेले लोक ठणठणीत बरे झालेले असतात, अनेक अडचणींमुळे चिंताक्रांत असलेले, निराश झालेले कोणी खूप आनंदी आणि उत्साही झालेले दिसतात, तर कोणाच्या बाबतीत याच्या नेमके उलट झालेले असते. माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही असे म्हंटले जात असले तरी आलेल्या अनुभवांमुळे काही लोक शहाणे झालेले असतात, कोणी सावध झालेला असतात तर काही लोकांना माज चढलेला असतो किंवा ते वैतागलेले असतात. काही नाही तरी निदान त्यांचा किंवा आपला मूड वेगळा असतो, त्यामुळे आपला दृष्टीकोन वेगळा झालेला असतो. या सगळ्यांमधून आपले जीवन पुढे चालत असते.

नदीच्या प्रवाहात बंधारे घालून निर्माण केलेल्या जलाशयांमधले पाणी स्थिर झाल्यासारखे दिसते, पण तेही हळूहळू बदलत असते. तळातले थोडे पाणी जमीनीमधून झिरपून जात असते तर पृष्ठभागावरच्या पाण्याची वाफ होऊन ती हवेत उडून जात असते. पावसाने आणि नदीच्या प्रवाहामधून आलेल्या पाण्याने त्यात भर पडत जाते, त्यातले जास्तीचे पाणी बंधा-यावरून पुढे वाहून जाते. आठवणींचेसुद्धा असेच असते. त्या साचत जातात, त्यात भर पडत जाते तशाच त्या विस्मरणात जाऊन नष्ट होतात किंवा सुप्तावस्थेत जातात, त्यातल्या काहींना पुन्हा उजाळा मिळतो. भूतकाळातल्या क्षणाच्या काही आठवणी जाग्या झाल्याने पुनःप्रत्ययाचा आभास निर्माण होत असला तरी प्रत्यक्ष आणि आभास यात फरक असतोच, जेंव्हा आपण कोणाच्या फोटोला नमस्कार करतो तेंव्हा एका कागदाला नमन करत असतो आणि एकाद्या बाळाच्या तसबिरीचे चुंबन घेतले तर कागदाला ओठ चिकटवत असतो. तरीसुद्धा त्यात आपल्याला थोडे समाधान मिळते. याच प्रमाणे एकादा क्षण जगणे आणि तो आठवणे यात फरक असला तरी त्यातही मजा असते.

बालपण, यौवन, मध्यमवय, उतारवय यासारखे जीवनाचे ठळक टप्पे असतात आणि आपल्या आठवणी त्यातल्या निरनिराळ्या कप्प्यांध्ये साठवलेल्या असतात. याशिवाय आपण वर्षावर्षांचे कप्पे करून जुन्या आठवणींना त्यात ठेवत असतो. वैयक्तिक जीवनात वयाला खूप महत्व असते. वयाच्या अमक्या वर्षी शाळेत किंवा कॉलेजात प्रवेश घेतला किंवा नोकरीला लागलो, इतके वय असतांना लग्न झाले, एकादा अपघात झाला किंवा मोठे आजारपण आले असे तपशील आपल्या लक्षात राहतात. यासाठी आपले वर्ष जन्मतारखेला सुरू होते. सरकारी आणि उद्योगव्यवसायांचे आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होते आणि ३१ मार्चला संपते. भारतातल्या शाळाकॉलेजांच्या वर्षाची सुरुवात मे जूनच्या सुमाराला होते. जगभरात वापरले जात असलेले ग्रेगोरियन कॅलेंडर या सर्वांचा आधार असते. इतर बहुतेक सगळ्या सर्वसाधारण घटनांसाठी आपण कॅलेंडरवरील वर्षाचाच उपयोग करतो. इसवी सन २०१४ हे त्यातले वर्ष आता संपत आले आहे आणि २०१५ लवकरच सुरू होणार आहे.

कुठलेही वर्ष संपत आले असतांना त्या वर्षाचा एक संक्षिप्त आढावा घेतला जात असतो. विद्यार्थ्यांनी शिकलेल्या विषयामधले किती आत्मसात केले हे समजण्यासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाते, त्याचे निकाल प्रगतीपुस्तकात नोंदवले जातात, संपलेल्या वर्षात उद्योगव्यवसायांमध्ये किती उलाढाल झाली, किती प्राप्ती आणि खर्च झाला, किती नफा मिळाला की तोटा झाला, त्यात किती वाढ किंवा घट झाली वगैरेंचे हिशोब केले जातात. व्यक्तीगत आयुष्यात किती प्रगती झाली, काय काय कमावले किंवा गमावले, कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या, त्यांना आपण कसे सामोरे गेलो, आपले किती अंदाज किंवा निर्णय बरोबर ठरले, कोणते चुकले, किती माणसे जवळ आली किंवा नव्याने जोडली गेली आणि किती लोक दुरावले गेले अशा अनेक गोष्टी मनात येऊन जातात. त्यातल्या काही आपल्याला सुखावतात, धीर किंवा हुरूप देतात, तसेच काहीमधून बोध मिळतो. हे सगळे गाठीला बांधून आपल्याला पुढे जायचे असते. इतर बाबतीतही असेच होत असते. सन २०१४ मध्ये आपल्या सभोवतालच्या जगात कोणकोणत्या महत्वाच्या घटना घडल्या यांची उजळणी वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स करायला लागलेले आहेतच. ती पाहतांना त्यातल्या कोणत्या आपल्याला जास्त जवळच्या किंवा महत्वाच्या वाटतात याचा विचार मनात येतच असतो.

नव्या वर्षाचे स्वागत करण्यानिमित्य आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना शुभेच्छा पाठवल्या जातात. कुठल्याही वर्षात फक्त चांगल्याच घटना घडल्या असे आजवर कधी घडलेले नाही आणि पुढल्या वर्षी तरी ते कसे घडणार आहे? पण असे घडावे अशा शुभेच्छा द्यायला किंवा असा विचार करायला काय हरकत आहे? मिर्झा गालिबच्या शब्दात सांगायचे झाल्यास "दिल बहलानेके लिये खयाल अच्छा है।" शुभेच्छा, आशीर्वाद वगैरेंचा अगदी किंचितही लाभ मिळत असेल, "दुवाओंका असर" होत असेल तर त्या देण्यात कंजूसी कशाला करायची? मुख्य म्हणजे या निमित्याने आपण इतक्या लोकांच्या संपर्कात येतो, त्यांच्याशी औपचारिक का होईना पण एक संवाद साधला जातो, आपलेही इतके हितचिंतक आपल्या पाठीशी आहेत हे समजते याचेच खूप समाधान मिळते, आधार वाटतो आणि मन उल्हसित होते. काही काही संदेश तर फारच सुरेख असतात. ते वाचूनच छान वाटायला लागते. माझ्या एका मित्राने पाठवलेला हाच संदेश पहा. मला जमेल तेवढा त्याचा अनुवाद मी केला आहे.

नव्या वर्षाच्या शुभेच्छा!
सर्व ऋतूंसाठी, ऊनपाऊस, वादळवारे या सर्वांसाठी शुभेच्छा!
तुम्ही सागरकिना-यावर फिरत असतांना शुभेच्छा!
तुम्ही आपल्या खुर्चीवर बसून कामात गढलेले असतांना शुभेच्छा!
तुमच्या आसपासचे वातावरण कुंद झाले असतांनाही शुभेच्छा!
तुमचा आनंद अनेकपटीने वाढत जावो, तुमचे सगळे कष्ट नष्ट होवोत, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीचे रूपांतर संधींमध्ये करून घ्याल, तुम्हाला सुदैवाची साथ मिळेल, तुम्ही यशस्वी व्हाल अशी प्रार्थना.
हे वर्ष आणि हे आयुष्यच तुमच्यासाठी महान ठरो. (Have a great year, a great life)

Sunday, December 07, 2014

सोनार, शिंपी आणि परीट - भाग १ ते ३

या लेखाचे तीन भाग एकत्र केले. दि.३०-०७-२०२३

"सोनार, शिंपी, कुलकर्णी अप्पा । यांचा विश्वास नको रे बाप्पा ।।" अशी एक प्राचीन काळातली म्हण आहे. हे सांगून मला कोणाचीही बदनामी करायची नाही. हे माझे स्वतःचे मत नाही. यातल्या कोणावरही एवढा अविश्वास दाखवावा असे वाईट अनुभव मला आलेले नाहीत, खरे तर असे सरसकट मत बनवण्याइतका या लोकांशी माझा संपर्कच आलेला नाही. ही म्हण खूप पूर्वीच्या काळात पडली होती आणि माझ्या लहानपणी मी ऐकली होती. दुसऱ्या लोकांचे सोने, कापड किंवा मालमत्ता यांचा व्यवहार या लोकांकडे असायचा. त्यांच्या निष्काळजीपणाचा किंवा हातचलाखीचा भुर्दंड त्या संपत्तीच्या मालकांना पडायचा आणि असा दुसऱ्याच्या चुकांचा भार कोणालाही सहन होणार नाही. यामुळेच त्यांच्यापासून जरा सांभाळून राहण्याचा इशारा या म्हणीतून दिला जात असावा. त्यांच्याकडे थोडे अविश्वासाने पाहिले जात असावे. असा अविश्वास बाळगणे हा संशयखोर माणूसजातीचा स्वभावधर्मही म्हणता येईल. "जो दुज्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग नासला." ही म्हणसुद्धा हेच दर्शवते. कदाचित काही लोकांच्या बिलंदरपणाचे प्रच्छन्न कौतुक या म्हणीमधून केले जात असेल.

"सोनार लोक सोन्याचे दागिने घडवतात" आणि "शिंपी लोक कपडे शिवतात" एवढे सामान्यज्ञान कोणीही सांगेल. पण मला या दोन्ही आडनावांचे इंजिनियर भेटले आहेत, या नावाचे लोक रेल्वे, पोलिसदल, शेअरबाजार किंवा आयटी इंडस्ट्रीमध्येही सापडतील. हा लेख या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या लोकांविषयी नाही, हे व्यवसाय करणाऱ्यांवर आहे. 'सोन्याचांदीचे अलंकार बनवणारे ते सगळे सोनार' आणि 'कपडे शिवणारे ते सारे शिंपी' अशी व्याख्या या लेखापुरती करून घ्यावी, मग त्याचे आडनाव पेठे, पाटील, प्रधान असे काहीही असो, चित्तमपल्लीवार, चिप्पलकट्टीकर किंवा इस्माईल, फर्नांडिस असेही असू शकेल.

सोनार आणि शिंपी लोक काय करतात हे जसे लगेच समजते तसे कुलकर्णी लोक काय करतात, त्यांची व्याख्या कशी करता येईल? हे मात्र सहसा कोणालाच सांगता येणार नाही. इतिहासकाळात म्हणजे इंग्रजांचे राज्य यायच्या आधी मराठेशाही, बहामनी साम्राज्य, विजयनगरचे साम्राज्य वगैरेंच्या काळात गांवागांवामधून शेतसारा किंवा महसूल गोळा करणे. त्याचा हिशोब ठेवणे आणि राजा, महाराजा, जहागिरदार, वतनदार वगैरे जो कोणी स्थानिक शासक असेल त्याला तो पोचवणे वगैरे 'रेकॉर्ड कीपिंग' आणि 'बुक कीपिंग'ची कामे करणाऱ्या लोकांना 'कुलकर्णी' हा खिताब असायचा असे समजले जाते. इंग्रजांनी त्यांचा जम बसवल्यानंतर सगळ्या देशाचा सर्व्हे करून जमीनीच्या मालकीचे लेखी दस्तऐवज तयार करून घेतले आणि निरनिराळ्या पातळ्यांवर त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी लँड रेव्हेन्यू डिपार्टमेंटची यंत्रणा उभी केली. त्या कामासाठी लहान गावांमध्ये आणि खेड्यांमध्ये तलाठी नेमले. त्यानंतर 'कुलकर्णी' हा पेशा किंवा हुद्दा राहिलेला नाही, या कारणाने त्यांचा समावेश या लेखात केला नाही. शिंप्यांनी शिवलेल्या कपड्यांची वेळोवेळी धुलाई करून, त्यांना इस्त्री करून चांगले रूप देण्याचे काम परीट करत असत. शिंपी हा कपड्यांचा निर्माता ब्रह्मदेव असला तर परीट हा त्यांचा विष्णू (आणि कधीकधी विनाश करणारा शिव) आहे असे म्हणता येईल. या नात्याने त्यांचाही परामर्श या लेखात घेतला आहे.

                                                                            भारतीय सोनार

सुवर्णाचे अलंकार परिधान करण्याची प्रथा पुरातन काळापासून जगभरात चालत आली आहे. पौराणिक कथांमध्ये आणि देवदेवतांच्या स्तोत्रांमध्ये त्याचे उल्लेख येतात, पुरातन काळातल्या शिल्पांमधल्या आणि मूर्तींमधल्या व्यक्तींनी किंवा देवतांनी नेहमीच अलंकार घातलेले आढळतात. ग्रीस देशातल्या एका सोनाराने तिथल्या राजाचा मुकुट तयार करतांना त्यात लबाडी केली असावी अशी शंका त्या राजाला आली, त्या मामल्याचा तपास करतांना आर्किमि़डीजला पाण्याच्या उद्धरणशक्तीचा शोध कसा लागला याची सुरस कहाणी सर्वांना माहीत असेलच. मध्ययुगात होऊन गेलेल्या संत नरहरी सोनाराचे नावही सर्वांनी ऐकले असेल. महाराष्ट्रात सोनार. उत्तर भारतात सोनी, युरोपात गोल्डस्मिथ किंवा गोल्डश्मिट ही नावे प्रचलित आहेत. कदाचित त्या लोकांनी परंपरागत उद्योग सोडून आता नवे व्यवसाय सुरू केले असतील. पुरातन काळापासून ते आजपर्यंत सोनारांचे अस्तित्व आहेच हे या उदाहरणांवरून दिसते. सोनारांच्या कामाच्या स्वरूपावरून "सोनाराने कान टोचले ते बरे झाले.", "नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे.", "सौ सुनारकी, एक लुहारकी।" यासारखे वाक्प्रचार आणि म्हणीही प़डल्या आहेत.

माझी आई, काकू, आत्या वगैरे आधीच्या पिढीतल्या स्त्रियांच्या हातात, बोटात, गळ्यात आणि कानात नेहमी रोजच्या वापरातले सोन्याचे दागिने घातलेले असायचे. शिवाय त्यांचे जास्तीचे आणि खास दागिने कड्याकुलुपांमध्ये सांभाळून ठेवलेले असायचे. त्यातले बरेचसे दागिने त्यांची आई, आजी, सासू, आजेसासू अशा कुणीतरी त्यांच्या अंगावर घातलेले असायचे. ज्या काळात त्यांनी स्वतःसाठी काही नवे दागिने घडवून घेतले होते त्या भूतकाळात सोन्याचा भाव तोळ्याला पंधरा किंवा वीस रुपये एवढाच होता म्हणे. माझ्या बालपणापर्यंत तो गगनाला भिडला होता म्हणजे शंभर रुपयावर गेला होता. त्या काळात आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जरा ढासळलेली असल्यामुळे नव्या दागिन्यांची खरेदी करणे अशक्य झाले होते. वंशपरंपरागत चालत आलेल्या जुन्या दागिन्यांना प्रचंड भावनिक मूल्य असायचे, ते वितळवून त्यातून नवे दागिने करायचा विचारही कोणाच्या मनात येऊ दिला जात नसे. शिवाय हे काम करतांना आपल्या शंभर नंबरी बावनकशी सोन्याचे रूपांतर कशात होईल याची धाकधूक मनात वाटत असे. अशा कारणांमुळे माझ्या शालेय शिक्षणाच्या काळात अगदी क्वचितच सोन्याच्या नव्या दागिन्यांची खरेदी झाली असेल. त्या निमित्याने कोणा मोठ्या माणसांच्या सोबतीने, त्यांचा काही निरोप सांगायसाठी, किंवा विचारणा करायसाठी एकाद्या सोनाराकडे माझे जाणे कधी झालेच नाही.

सुतार, लोहार, कुंभार यासारख्या इतर कारागीरांचे काम नेहमी उघड्यावरच चाललेले असायचे आणि गावातल्या रस्त्यांनी जात येत असतांना ते आपणहून नजरेला पडत असे, पण सोनारांचे काम मात्र कोणाला सहजपणे दिसू नये अशा 'हाय सिक्यूरिटी झोन'मध्ये चालत असावे. प्रखर आच देणारी खास प्रकारची शेगडी, त्यावर ठेवलेली लहानशी मूस, त्यातला वितळलेल्या सोन्याचा चमचमणारा नेत्रदीपक द्रव, सोन्याच्या गोळ्यापासून पत्रा किंवा तार बनवण्याची आणि अलंकारांना निरनिराळे आकार देण्याची नाजुक अवजारे, अत्यंत नाजुक असे दागिने तयार करण्याचे आणि त्यावर सुंदर वेलबुट्ट्या, फुले, पाने वगैरे कोरण्याचे कौशल्य हे सगळे जवळून पाहण्याची मला खूप उत्सुकता असायची, पण तिची पूर्तता होण्याचा योग आजपावेतो आला नाही. त्यासंबंधी सिनेमा आणि डॉक्युमेंटरींमध्ये जेवढे पाहून समजले असेल तेवढेच.

"ऑल दॅट ग्लिटर्स ईज नॉट गोल़्ड" म्हणजे "चमकणारे सगळेच काही सोने नसते." अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. याचाच अर्थ असा होतो की सोन्याशिवाय इतर काही पदार्थदेखील चमकू शकतात, उदाहरणार्थ चांदी. पूर्वीच्या काळातसुद्धा गरीबांना सोने परवडत नसल्यामुळे वेगळ्या प्रकारची चमक असलेल्या चांदीचे दागिने वापरले जात असतच, आजही ते सर्रास वापरले जातात. छुमछुम असा मंजुळ आवाज करणारे काही दागिने तर खास चांदीचेच असावे लागतात. चांदीचे दागिनेसुद्धा सोनारच बनवत आले आहेत. 'चंदार' किंवा 'चांदेर' असा वेगळा व्यावसायिकवर्ग कधीच नव्हता. पितळेचा रंग सोन्याप्रमाणे पिवळा असला तरी त्याला चमक नसते. चार चौघांमध्ये आपले पितळ उघडे पडू नये असेच प्रतिष्ठित लोकांना वाटत असणार. यामुळे पितळेचे दागिने करून घालायला ते धजत नसत. चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा दिला तर ते मात्र हुबेहूब सोन्यासारखे दिसतात. पण ते जपूनच वापरायला हवेत. सोन्याचा पातळसा थर जरासा झिजला की आतली चांदी दिसू लागते. वाढत्या भावामुळे सोने परवडेनासे झाल्याने त्याच्या पर्यायांचा विचार जास्त गांभिर्याने केला जाऊ लागला. सोन्यासारखे चमकणारे आणि ती चमक अधिक काळ टिकवून धरणारे नवनवे मिश्रधातू तयार केले गेले, चमक आणणाऱ्या नवनव्या प्रक्रियांचे शोध लागले आणि त्यांच्यापासून तयार केलेली आर्टिफिशियल ज्युवेलरी मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागली.

गेल्या काही वर्षांमध्ये माणसांच्या जीवनशैलीतही बदल होत गेले. मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय यानिमित्याने महिला वर्ग मोठ्या प्रमाणात किंवा एकएकटीने घराबाहेर पडायला लागला. सोन्याच्या किंमतीमुळे काही प्रमाणात त्याच्या चौर्याचे भय पूर्वीपासून होतेच. मृच्छकटिक या संस्कृत नाटकातही घरफोडी करणारे शर्विलक नावाचे पात्र आहे. पण अलीकडच्या काळात भुरट्या साखळीचोरांची संख्या अतोनात वाढल्यामुळे सोन्याचे दागिने अंगावर लेवून घराबाहेर पडणे धोक्याचे झाले. महिलांना अलंकारांची हौस तर असतेच, यामुळे ती पुरवून घेण्यासाटी आर्टिफिशियल ज्युवेलरीचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. हे कृत्रिम दागिने यंत्रांनी तयार केले जातात. त्यांचे डिझाईन करण्याचा भाग वगळल्यास त्यांच्या निर्मितीत सोनारांचा सहभाग नसतो.

दागिन्यांच्या बाबतीतल्या वाढत्या प्रतिस्पर्ध्यांमुळे सोन्याचे बाजारभाव मात्र कमी झाले नाहीत. सोन्याचे भाव हा अर्थशास्त्राशी संबंधित असलेला वेगळाच विषय आहे. सोनारांच्या व्यवसायावर मात्र याचा विपरीत परिणाम झाला असणार. यांत्रिकीकरणामुळे सर्वच हस्तव्यवसायांवर गदा आली. सुवर्णकार तरी त्यातून कसे वगळले जाणार? एकासारख्या एक अशा अनेक वस्तू तयार करणाऱ्या यंत्रांनी कोणतेही काम चुटकीसरशी होते. त्यांना चालवण्यासाठी लागणाऱ्या कामगारांची संख्या कमी असते आणि हे काम करण्साठी त्या कामगारांकडे हस्तकौशल्य असावे लागत नाही. यंत्रे चालवणे हे वेगळे तंत्र त्यांना शिकून घ्यावे लागते. पारंपरिक पद्धतीने प्रत्येक दागिन्याची घडण हाताने करतांना त्यातले बारीक डिझाईन गुंफणे किंवा कोरून काढणे हे कौशल्याचे आणि चिकाटीचे काम असते, त्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो, त्या प्रमाणात उत्पादन कमी होते आणि खर्च वाढतो. पण या बाबतीत यंत्रांचा वापर करून उत्पादन वाढवता येते. आज तरी जेवढे मला माहीत आहे ते पाहता, शहरातले बहुतेक ग्राहक विश्वासार्ह अशा दागिन्यांच्या दुकानात जातात आणि तिथे ठेवलेले दागिने पाहून त्यातले त्यांना आवडणारे आणि परवडणारे दागिने विकत घेतात. ते हस्तकलेने तयार केलेले असतात की यंत्रांमधून निघालेले असतात याचा विचार किंवा चौकशी करण्याचे काहीच कारण नसते. कोणत्या सोनाराने ते बनवले आहेत याचा त्यांना कधीच पत्ता लागत नाही, ग्राहक आणि सुवर्णकार यांचा थेट संबंध आजकाल येत नाही. सोनार हा कौशल्यपूर्ण व्यवसाय भविष्यकाळात शिल्लक राहिला तरी दुर्मिळ होणार आहे असे मला वाटते. 

.  . . . . .  . . . .

सोनार, शिंपी आणि परीट - भाग २

जनावरांची कातडी माणसांनी पांघरून त्यापासून ऊब आणण्याचे प्रयोग इतिहासपूर्व म्हणजे आदिमानवाच्या काळातच सुरू झाले होते असे म्हणतात. त्या काळातल्या काही लोकांनी त्या कातड्यांच्या तुकड्यांना एकमेकांना जोडून त्यातून वस्त्रेही तयार केली असावील. ते काम करणा-या लोकांना 'शिंपी' म्हणण्यापेक्षा 'चर्मकार' म्हणणे कदाचित जास्त योग्य होईल. प्राचीन काळातल्या भारतातली जी शिल्पे, भित्तीचित्रे वगैरे सापडली आहेत त्यावरून असे दिसते की त्या काळातले भारतीय लोक पितांबर, शेले यासारखी अंगाला गुंडाळण्यासारखी किंवा पांघरण्यासारखी चौकोनी वस्त्रे धारण करत असावीत. त्या वस्त्रांच्या निर्मितीसाठी विणकरांची आवश्यकता असली तरी शिंप्यांची गरज नसणार. काही कथांमध्ये कंचुकीचे उल्लेख येतात, पण ती शिवणकाम करून तयार केली जात असे की तशा आकारात विणली जात असे कोणास ठाऊक. ती शिवली जात असली तरी ते काम बहुधा स्त्रीवर्गच करत असावा असा माझा अंदाज आहे. वेगवेगळ्या आकारांचे कापडाचे तुकडे कापून आणि त्यांना एकमेकांना जोडून त्यांचे निरनिराळ्या आकारांचे कपडे शिवण्याची कल्पना बहुधा परदेशातून येणारे व्यापारी, पर्यटक किंवा आक्रमक यांच्याकडून इतिहासकाळात इकडे आली असेल आणि लोकांना ती आवडल्यामुळे इथे स्थिरावली असणार.

हे अवघड आणि किचकट काम करण्याचे कौशल्य काही लोकांनी आत्मसात केल्यानंतर शिंपी हा त्यांचा एक नवा व्यवसाय निर्माण झाला असावा. त्या काळातल्या सुया कशा प्रकारच्या असतील, कोणते लोहार त्या तयार करत असतील वगैरे विषयांची मला फारशी माहिती नाही. इंग्लंडमधल्या लीड्स या शहरातल्या एका पुराणवस्तूसंग्रहात मला प्राचीन काळातल्या सुया, कात्र्या वगैरे शिवणकामाची अवजारे पहायला मिळाली होती. त्यातल्या सगळ्या पुरातनकालिन सुया दाभणासारख्या दणकट दिसत होत्या. काही सुयांना दोरा ओवण्याचे भोकही नव्हते, तर काही सुयांच्या खालच्या टोकावा दोरा अडकवण्यासाठी हूक होते. इंग्लंडमधल्या अत्यंत शीत वातावरणामुळे तिथल्या वस्त्रोद्योगाचा उगम चामड्यापासून झाला असावा आणि तरट, गोणपाट, लोकर यासारख्या जाड्याभरड्या कपड्यांचे टप्पे पार करून अनेक शतकानंतर ते लोक सुती कापडापर्यंत आले असावेत. यंत्रयुगात सुरू झालेल्या इंग्लंडमधल्या कापडगिरण्यांना होणारा कापसाचा पुरवठा मुख्यतः भारत, इजिप्त किंवा अमेरिकेमधून होत असे. या सगळ्या देशांच्या इतिहासावर कापूस आणि कापडाच्या व्यापाराचा महत्वपूर्ण परिणाम झाला होता असे दिसेल. गिरण्यांमधून मोठ्या प्रमाणावर कापडाची निर्मिती होऊ लागल्याने जगभरातल्या वस्त्रोद्योगाला चालना मिळाली आणि शिंपीकामाच्या व्यवसायातही मोठी वाढ झाली.

कपडे शिवण्याची कला आणि कौशल्य यांचा प्रसार इतिहासकाळात भारतात झाला आणि त्यातून शिंपी हा एक वेगळा वर्ग निर्माण झाला. त्या भूतकाळात सगळी शिलाई हातानेच केली जात असणार. एक एक टाका घालून संपूर्ण पोशाख शिवायला किती वेळ लागत असेल याची कल्पना करता येईल. यामुळे त्या काळातले शिंपी सगळ्या आम जनतेचे सगळे कपडे शिवत असतील हे मला कठीण वाटते. त्यांच्या सेवेचा लाभ बहुधा सरदार, इनामदार, सावकार आदि धनिक वर्गांनाच मिळत असणार आणि त्याचा चांगला मोबदला शिंप्यांना मिळत असावा. या वर्गाच्या उंची वस्त्रांसाठी उत्तम दर्जाचे कापड आणून पुरवण्याचे कामसुद्धा शिंपीच करत असले तर त्या व्यवहारातूनही त्यांना धनलाभ होत असेल. यामुळे आर्थिक दृष्ट्या त्यांची परिस्थिती चांगली असावी.  तेराव्या शतकात होऊन गेलेले संतश्रेष्ठ नामदेव महाराज शिंपी कुटुंबात जन्माला आले होते. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट असे होते. संत नामदेवांबद्दल ज्या आख्यायिका सांगितल्या जातात त्यावरून असे दिसते की ते तुपाशिवाय भाकरी खात नसत आणि देवाला खिरीचा नैवेद्य दाखवत असत. त्यांच्या घरी घरकामासाठी दास दासी होत्या. यावरून त्यांच्या घरात सुबत्ता नांदत होती असे दिसते. संत सांवता माळ्याच्या अभंगात "कांदा मुळा भाजी" चा उल्लेख येतो, तर  "आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक" असे संत सेना न्हावी म्हणत. पण संत नामदेवांनी लिहिलेल्या अभंगांमध्ये शिवणकामातल्या दाखल्यांचा उल्लेख आला असला मला तरी तो माहीत नाही. यामुळे त्यांनी स्वतः इतर लोकांचे कपडे शिवण्याचे काम केले होते की नाही हे सांगता येणार नाही. बहुधा ते पूर्णवेळ विठ्ठलभक्तीमध्ये लीन झाले होते असेच वाटते.

माझ्या लहानपणच्या काळापर्यंत भारतातल्या लहान लहान गांवांमध्येसुद्धा शिवणयंत्रे येऊन पोचली होती. अगदी घरोघरी नसली तरी शिंप्यांच्या दुकानांमध्ये दोन तीन सिंगर सुइंग मशीन्स असायचीच. दोन तीन सहाय्यक कामगार ऑर्गन वाजवण्याच्या स्टाइलमध्ये त्यांवर खडखडाटाची जुगलबंदी खेळत असत. आणखी दोन तीन मुले जमीनीवर बसून इतर कामे करतांना दिसत. कपडे बेतण्याचे सर्वात महत्वाचे काम दुकानाचा प्रमुख टेलर मास्टर स्वतः करीत असे. त्याच्या वहीत लिहिलेल्या आपल्याला अगम्य वाटणा-या आकड्यांच्या आधाराने तो कापडावर काही खुणा करायचा आणि त्यांना जोडून सरळ किंवा वक्ररेषा मारायचा. यासाठी चपट्या आकाराच्या एका विशिष्ट चॉकचा वापर केला जात असे. शिंप्याचे दुकान सोडल्यास मी अशा प्रकारचा तेलकट खडू कुठेही आणि कधीही पाहिला नाही. दुकानातला इतर कोणीतरी माणूस किंवा मुलगा कापडावरल्या त्या रेषांवरून कात्री फिरवून त्या कापडाचे तुकडे पाडत असे. यात कोणी खिसे कापायचे आणि कोणी गळे कापायचे याचासुद्धा एकादा प्रोटोकॉल ठरला असावा. क्रिएटिव्हिटी हा शब्द मी त्या काळात ऐकला नसला तरी मला शिंप्यांच्या कामात ती भरपूर प्रमाणात दिसायची. ग्राहकाने दिलेल्या कपड्यामधून त्याच्या पोशाखाला लागतील तेवढे तुकडे कापून घेतल्यानंतर उरलेले कापड शक्य तेवढे एकसंध निघावे अशा त-हेने ते तुकडे कापले जातच, उरलेल्या तुकड्यांमधून कोणती वेगळी कलाकृती तयार करून विकता येईल याचेही नियोजन केले जात असे.

त्या काळातल्या बहुतेक सगळ्याच शिंपीलोकांचे एक वैशिष्ट्य होते. आताप्रमाणे डिलीव्हरी डेट वगैरे देण्याची पद्धत तर तेंव्हा नव्हतीच, शिवायला टाकलेल्या कापडांची साधी रिसीटसुद्धा मिळत नसे. सगळा व्यवहार विश्वासावरच चालत असे. "हे कपडे कधीपर्यंत शिवून मिळतील?" असे विचारले की ते हमखास सांगायचे, "आत्ताचं हातातलं काम संपलं की तुमचंच घेणार बघ." त्याच्या दुकानात नव्या कापडांचे दहा बारा गठ्ठे दिसत असले तरी प्रत्येक नव्या ग्राहकाला असेच सांगितले जायचे. "म्हणजे कधी?" हा प्रश्न शिताफीने उडवला जाई. "कशाला उगाच टेन्शन घेतोस? तुमची कापडं घेऊन मी कुठे पळून जाणार आहे का?" अशा प्रकारचे उत्तर येई. आठवडाभराने चौकशी करायला गेलो तर आपल्या कापडांचा गठ्ठा अजून तसाच कपाटात पडलेला दिसे. त्यासाठी अनेक कारणे तयार असतच, "कोणता कामगार आजारी पडला", "कोणता गावाला गेला", "मध्येच जोराचा पाऊस आला", असे काहीही. मात्र त्यानंतर लगेच आमचेच काम हातात घेण्याचे आश्वासन मिळत असे. आणखी आठवडाभराने विचारले तर, "तुमचे कपडे ना? तय्यार व्हायला आलेत, आता नुसती काजंबटनं लावायची राहिलीय्त." असे उत्तर. निदान आता गठ्टा तरी जागेवरून हललेला दिसायचा. याचा अर्थ त्याचे तुकडे कापून झाले असावेत. "आता की नै, फक्त इस्त्री मारायची राहिली आहे." अशी प्रगती पुढच्या खेपेला सांगितली जायची. अशा सात आठ चकरा मारून झाल्यानंतर एकदाचे ते कपडे हातात पडत. तोपर्यंत आपला उत्साह इतका मावळलेला असायचा की ते नवे कपडे घालून बघायची इच्छा शिल्लक राहिलेली नसायची. अंगात घालून पाहिल्यावर ते कपडे नको तिथे तंग आणि नको तिथे डगळ वाटले तरी शिंपी ते कधीच कबूल करत नसे. "अरे आत्ता मुंबईपुण्याकडे हीच लेटेस्ट फॅशन चाललीय्. तुम्ही आहात कुठे?" अशी मखलाशी केली जायची. त्यातून काही बदल करायचा आग्रह धरलाच, तर ते आल्टरेशन करून होईपर्यंत तुमची मापेच बदलली असल्याची दाट शक्यता असायची. आम्ही गावातले दोन तीन शिंपी बदलून पाहिले, पण या अनुभवात फारसा फरक पडला नाही.

खरे सांगायचे झाल्यास त्या काळातले लहान गावातले लोक याबद्दल विशेष चोखंदळ नसायचेच. कपडे हे अंगाला झाकून लाज राखण्यासाठी आणि थंडीवा-यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी असतात असे समजले जात असे. तेवढी उद्दिष्टे पुरी झाली तर इतर बाबींकडे जास्त लक्ष द्यायचे कारण नव्हते. माझ्या वडिलांच्या पिढीतले सगळे पुरुष धोतर नेसत असत. त्यामुळे शिंप्याची गरज अर्धी होत असे. कधीकाळी एकादा कोट शिवला तर तो जवळच्या शहरामधून शिवून आणला जात असे. सदरा, बंडी वगैरेंची गरज ऋतूमानानुसार कमी जास्त पडत असे. त्यांच्या शिलाईसाठी शिंप्याकडे जाणे होत असे. आम्ही लहान मुलेच शिंप्यांचे मुख्य ग्राहक असू. आमचे कपडे झिजणे, फाटणे, आखूड होणे वगैरेंचे प्रमाण मोठे असल्याने नवे कपडे शिवणे अपरिहार्य असायचे. ते वाढत्या अंगाच्या हिशोबाने शिवले जात असल्यामुळे नवे असतांना सगळ्याच बाजूंनी चांगले ढगळ असायचे. धुतल्यानंतर ते कपडे कोणत्या बाजूने किती आटत आणि मुलांच्या शरीराची वाढ होतांना ती उंची वाढण्यात किंवा रुंदी वाढण्यात किती प्रमाणात होई यांचे गणित सहसा जुळत नसे. त्यामुळे शरीराला सर्व बाजूने बरोबर फिट बसणारे कपडे क्वचितच नशीबात येत असत आणि हा योग जुळून आला तरी त्याचेही कोणालाही काही कौतुक वाटत नसे.

शालेय जीवन संपवून पुढील शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर मात्र हे सगळे बदलले, इतर मुलांचे झकपक पोशाख पाहून आपण किती अजागळासारखे गबाळग्रंथी रहात होतो याची पदोपदी जाणीव होऊ लागली. आपले कपडे हे फक्त शरीराला झाकण्यासाठी नसून आपल्या व्यक्तीमत्वाला उठाव देण्यासाठी वापरायचे असतात याचा नवा साक्षात्कार झाला. "एक नूर आदमी और दस नूर कपडा"  असे का म्हणतात हे समजले आणि माझे वडील शहरांमधल्या संस्कृतीला "पोशाखी संस्कृती" असे का म्हणत याचा अर्थ तिथे रहायला गेल्यानंतर समजायला लागला. आता मीसुद्धा त्या संस्कृतीचा भाग झाल्यामुळे मला ती स्वीकारणे आवश्यकच होते. माझ्या जीवनातले कपड्यांचे महत्व वाढले तसा माझ्या मनात शिंपीवर्गाविषयीचा आदर वाढत गेला.

त्या काळात मुंबई शहरातल्या शिंप्यांची दुकानेच खूप आकर्षक असायची. फोर्टसारख्या भागात मापाप्रमाणे (टेलरमेड) कपडे शिवून देणारी पॉश दुकाने होती. तिथले इंटिरियर डेकोरेशन, लाइटिंग वगैरे झकास असायचे. गळ्यात बो बांधून त्यावर टेप टांगलेला टेलर मास्टर रुबाबदार वाटायचा. शर्ट किंवा पँटच्या डिझाइन्सचे आल्बम समोर ठेवून त्यातली कोणती स्टाईल पाहिजे असे इंग्रजीत विचारायचा, तुम्हाला कुठली स्टाईल चांगली दिसेल याचा सल्लाही द्यायचा. त्यांचे चार्जेस आपल्या आवाक्याबाहेर असणार आणि आपण आणलेली स्वस्तातली कापडे तो हातात तरी घेईल की नाही याची शंका वाटत असल्यामुळे त्या दुकानांची पायरी चढण्याचे धाडस मला त्या काळात झाले नाही. 'पॉप्यूलर' किंवा 'फेमस' असे नाव धारण करणा-या उपनगरातल्या एकाद्या टेलरकडे जाणे सेफ वाटत असे. या लोकांचे कामसुद्धा व्यवस्थित असायचे. सर्वांगाची मापे घेऊन झाल्यावर ती त्यांच्या वहीतल्या एका नव्या पानावर लिहीत, त्या पानावर माझे नाव, पत्ता वगैरे लिहिले जात असे, आपण दिलेल्या कापडांचे कोपरे कापून ते त्या वहीतल्या पानाला आणि आपल्या रिसीटला स्टेपल केले जात असे. ट्रायलची तारीख आणि डिलिव्हरीची तारीख लिहून ते पावती देत. मुख्य म्हणजे त्या दिवशी आपले कपडे शिवून तयार असत. ट्रायल घेऊन झाल्यानंतर आवश्यक वाटल्यास थोडे फेरफार करून त्यावर आणखी एक पक्की शिलाई मारून एक दोन दिवसांनंतर ते कपडे हातात मिळत. आताचे शिंपी कपड्यांच्या ट्रायलला बोलावत नाहीत. एकदम तयार कपडेच देतात. एवढाच बदल गेल्या चाळीस वर्षांमध्ये झाला आहे.

कृत्रिम धाग्यांपासून तयार केलेल्या कापडांनी वस्त्रव्यवसायावर आक्रमण केल्यानंतर त्यात खूप मोठे बदल होत गेले. सुरुवातीच्या काळात या कापडांची आयात मुख्यतः तस्करीमधूनच होत असावी. ती कापडे मनीश मार्केट किंवा फोर्टमधल्या रस्त्यांवरच मिळत असत किंवा दारावर येणारे फिरस्ते व्यापारी क्वचित आणत असत. कोणत्याही चांगल्या कापडांच्या दुकानात ती अधिकृतपणे मिळत नसत. काही लोक मद्रास (आताचे चेन्नै) किंवा कलकत्ता (कोलकाता) इथल्या अशाच 'ग्रे मार्केट्स'मधून पाच दहा पीसेस घेऊन येत आणि ते मित्रपरिवारामध्येच हातोहात विकले जात. अत्यंत मुलायम, न चुरगळणारी, धुवायला सोपी आणि जबरदस्त टिकाऊ अशी ही सुळसुळित कापडे पाहताच मनात भरत असत. ती कापडे विकायला कदाचित परवानगी नसली तरी त्यांचे कपडे शिवून ते वापरायला कसलीच आडकाठी नव्हती. मुंबईतले सगळेच लोक असे कपडे घालून राजरोसपणे ऐटीत वावरत असत. शिंपी लोक त्या कापडाचे कपडे शिवण्यासाठी वेगळा चार्ज घेत असत. पुढे अशी कापडे भारतात तयार व्हायला लागली. शहरांमधल्या प्रमुख रस्त्यांवर ग्वालियर, (ओन्ली) विमल, रेमंड वगैरे कंपन्यांची मोठमोठी शोरूम्स उघडली गेली. तिथे एकादा शिंपी किंवा त्याचा प्रतिनिधी बसलेला असायचा, तो फक्त मापे घ्यायचा आणि विकत घेतलेल्या कापडांपासून शिवलेले शर्ट, पँट्स वगैरे कपडे काही दिवसांनी त्या दुकानातच मिळत. प्रत्यक्षात शिवणकाम करणारा शिंपी आणि ग्राहक यांच्यामधला संपर्क राहिला नाही.

मी मुंबईत रहायला आलो तेंव्हा तयार कपडे मिळणे सुरू झाले होते, तरीही आपल्या आवडीचे कापड विकत घेऊन आपल्या मापाचे कपडे शिंप्याकडून शिवून घेणेच पसंत केले जात असे. कपडेच नव्हे तर कोणतीही वस्तू,  यंत्रसामुग्रीसुद्धा आपल्याला हवी तशी मुद्दाम तयार करवून घेतली तर तिला 'टेलर मेड' असे म्हंटले जात असे. ही परिस्थिती हळू हळू बदलत गेली. कापडांमध्ये आली तशीच तयार कपड्यांमध्येही खूप विविधता येत गेली, सर्व प्रसारमाध्यमांमध्ये, विशेषतः टेलिव्हिजनवर त्यांचे जबरदस्त मार्केटिंग होऊ लागले. काही प्रसिद्ध जागतिक कंपन्यांचे कपडे घालणे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले. याच्या उलट रस्त्यारस्त्यांवर मिळणारे रेडिमेड कपडे खूप स्वस्तात मिळायला लागले. त्यात घासाघीस करून ते विकत घेण्यात बरेच लोकांना मजा वाटू लागली.

ड्रेस डिझाइनिंग या नावाने एक नवे क्षेत्र निर्माण झाले, ते कौशल्य शिकवणा-या मोठमोठ्या संस्था उभ्या राहिल्या आणि समाजाच्या सगळ्या वर्गांमधली मंडळी त्यात सामील झाली. यातले काही लोक तयार कपडे करण्याच्या उद्योगधंद्यात शिरले तर काही लोकांनी धनाढ्य उच्च वर्गासाठी बुटिक्स वगैरे उघडली. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाली, पती आणि पत्नी या दोघांनीही नोकरी व्यवसाय करायला सुरू केल्यानंतर ते आणखी वाढले आणि त्यांना मिळणारा रिकामा वेळ व्यस्त प्रमाणात कमी होत गेला. त्यांचा कल तयार कपडे विकत घेण्याकडे झुकत गेला. हे कपडेसुद्धा कोणी तरी शिवत असणारच. पण ते फॅक्टरींमधून मास प्रॉडक्शनने तयार होत असल्यामुळे त्यातली निरनिराळी कामे निरनिराळ्या लोकांकडून होत असतात. ती ठराविक कामे यंत्रवत करणारे 'कामगार' असतात, त्यांना 'शिंपी' म्हणता येणार नाही.

या सगळ्यांचा परिणाम शिंप्यांच्या व्यवसायावर होत गेला. पूर्वी शहरातल्या हमरस्त्यावरच्या मोक्याच्या जागी शिंप्यांची दुकाने दिसत असत. काही शिंपी आपल्या दुकानात निवडक कापडेही विक्रीसाठी ठेवत असत. आजकाल ती दुकाने दिसेनाशी झाली आहेत. तयार कपड्यांच्या किंवा इतर कसल्याशा दुकानाच्या बाहेर एक सुइंग मशीन ठेऊन किरकोळ कामे करणारे काही कारागीर दिसतात, ते बहुधा आल्टरेशन्स करून देतात. पण नवे कपडे बरोबर बेतून ते व्यवस्थित शिवून देण्यासाठी लागणारे कौशल्य आणि अनुभव त्यांच्याकडे असेल असे वाटत नाही. त्यामुळे महागड्या नव्या कापडाची नासाडी होण्याचा धोका कोणी पत्करत नाही. वाशीसारख्या जागीसुद्धा विश्वसनीय शिंप्याचे चांगले दुकान शोधण्यासाठी गल्लीबोळातून फिरावे लागते. शिंपी या व्यावसायिक संकल्पनेचाच हळूहळू -हास होत चालला आहे असे वाटते. कपडे ही मूलभूत गरज असल्यामुळे शिंप्यांची गरज नेहमीच भासत राहील, पण फक्त तेच काम करणारा समाजातला वेगळा वर्ग बहुधा शिल्लक राहणार नाही आणि राहिला तरी त्याचा पूर्वीसारखा दिमाख असणार नाही असे मला तरी वाटते.

.  . . . . . . . . .  . . . . . . . . . 

सोनार, शिंपी आणि परीट - भाग ३

पुराणकाळातल्या कथांमध्ये शिंप्याचा उल्लेख कदाचित नसेल, पण रामायणामध्ये एका रजकाची महत्वाची भूमिका आहे. त्या संशयी स्वभावाच्या माणसाने सीतामाईच्या पावित्र्याबद्दल शंका घेतली आणि तिला राज्ञीपदी बसवल्याबद्दल प्रभू श्रीरामांना दोष दिला. आपल्या प्रजेमधील कोणाच्याही मनात राजाविषयी किंतु असू नये या आदर्श भूमिकेमधून श्रीरामांनी सीतामाईला वनात पाठवून दिले अशी कथा आहे. ही कथा कदाचित दुस-या कोणीतरी नंतरच्या काळात रामायणाला जोडली असावी असेही काही विद्वान म्हणतात, पण हा मुद्दा इथे महत्वाचा नाही. रामायणाच्या कुठल्याशा आवृत्त्यांमध्ये ही कथा आहे याचा अर्थ इतर लोकांचे कपडे धुण्याचा व्यवसाय करणारे परीट लोक आपल्या देशात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत.

सुमारे शंभर दीडशे वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळात घरोघरी पाण्याचे नळ नव्हते की विहिरींवर पंप लावले गेले नव्हते. पिण्यासाठी आणि स्वैपाकासाठी लागणारे पाणी घागरी भरून घरात आणले जात असे, पण स्नान आणि कपडे धुण्याचे बहुतेक सगळे काम मात्र पाणवठ्यावर जाऊन तिकडेच केले जात असे. इतर लोकांचे कपडे धुण्याचे काम करणारे रजत लोक नेमके कोणते कपडे स्वच्छ करत असत कोण जाणे, पण बहुधा ते लोक फक्त बलाढ्य किंवा धनाढ्य लोकांचे काम करत असावेत. त्यातही रोजच्या वापरातले कपडे घरातले नोकर चाकर स्वच्छ करत असतील आणि जास्तच घाण झालेले किंवा बोजड कपडे धोब्यांकडे देत असतील असा आपला माझा एक अंदाज आहे.

श्रीदत्तगुरुंच्या मध्ययुगात होऊन गेलेल्या अवतारांच्या कथा असलेल्या गुरुचरित्रातसुद्धा त्यांचा एक परमभक्त रजक असल्याचा उल्लेख आहे. एकदा नदीतीरावर कपडे धूत असतांना त्या रजकाने एका बादशहाला आपल्या बेगमांसोबत जलक्रीडा करतांना पाहिले आणि त्याला त्या बादशहाचा मनातून हेवा वाटला. त्या भक्ताची मनोकामना पूर्ण करण्यासाठी गुरुकृपेने त्याला पुढचा जन्म एका बादशहाचा मिळाला अशी ती गोष्ट आहे. म्हणजे पूर्वापारपासून उत्तरेप्रमाणे दक्षिणेतसुद्धा परीटांचा व्यवसाय चालत असे.

जुन्या काळातल्या गोष्टींमधली जी वर्णने मी ऐकली आहेत त्यानुसार हे धोबी लोक गाढवे पाळत असत. ग्राहकांकडून आणून जमा केलेल्या कपड्यांचे गठ्ठे ते गाढवाच्या पाठीवर ठेऊन नदीच्या धोबीघाटावर नेत, तिथे सगळे कपडे धुवून किना-यावरच पसरवून त्यांना वाळवत आणि स्वच्छ कपड्यांचे गठ्ठे पुन्हा गाढवाच्या पाठीवरून गावात परत आणून त्यांच्या धन्यांना नेऊन देत असत. हे काम करवून घेण्यासाठी त्यांना उमदा घोडा किंवा बलिष्ठ बैल यांच्यापेक्षा कामसू आणि गरीब बापुडे गर्दभच जास्त उपयुक्त वाटत असेल. धोब्यांची कुत्रीसुद्धा काही वेळा धन्यासोबत घाटावर जात असत पण तिकडे गेल्य़ावर त्यांच्या खाण्याकडे कोण लक्ष देणार? ती बिचारी उपाशीच रहात. यावरूनच "धोबीका कुत्ता न घरका न घाटका।" अशी कहावत पडली असावी. "दोन घरचा पाहुणा उपाशी" असा काहीसा या म्हणीचा अर्थ होतो.

काश्मीर ते केरळ आणि कच्छपासून मणीपूरपर्यंत पसरलेल्या आपल्या देशात पारंपरिक पोशाखांची जितकी विविधता आहे तितकी आणखी कुठल्याही देशात दिसणार नाही. निरनिराळ्या भागातले बहुतेक सगळेच लोक स्थानिक परंपरांनुसार विशिष्ट प्रकारचा पेहराव धारण करत असत. यावरून "देश तसा वेष" अशी म्हणच पडलेली आहे. पण त्या समान वेषांमध्येही लहान सहान फरक आणि भिन्न रंग असल्यांमुळे या चित्रविचित्र पोशाखांना 'गणवेष' असे म्हणत नाहीत. 'गणवेष' किंवा 'युनिफॉर्म' हा शब्द इंग्रजांनी आपल्यासोबत इकडे आणला. त्यांनी भारतात उभारलेल्या कवायती सैन्यांमधल्या शिपायांना ठराविक गणवेश घालायला लावलाच, त्यांचे राज्य स्थापन झाल्यानंतर वकील, न्यायाधीश, डॉक्टर, नर्स, ड्रायव्हर, पट्टेवाला प्यून यासारख्या सर्वांसाठी युनिफॉर्म ठरवून दिले आणि अंमलात आणले. त्यांनी काढलेल्या शाळांमधल्या मुलांना गणवेशात येण्याची सक्ती केली आणि इतर शाळांनीही त्याचा कित्ता गिरवला.

प्रत्येकाने फक्त आपापले गणवेश अंगावर चढवणे एवढ्याने भागत नाही. त्यांचे ते ड्रेस स्वच्छ असावेत, फाटलेले, उसवलेले किंवा चुरगळलेले नसावेत याकडे मुद्दाम लक्ष देऊन पाहिले जाते आणि तसे दिसले तर त्यासाठी दंड केला जातो. यामुळे गणवेशाचे कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून घालणे भाग पडले आणि परीटांच्या कामात भर पडत गेली. इंग्रज लोक युनिफॉर्मचे मोठे भोक्ते होते, ड्यूटीवर असतांना, क्लबात पार्टीसाठी जातांना किंवा क्रिकेट खेळतांना ते वेगवेगळे विशिष्ट 'ड्रेसकोड' सांभाळीत असत. यामधून एक 'पोशाखी संस्कृती' तयार झाली. नीटनेटक्या पोशाखात माणूस कसा रुबाबदार दिसतो हे पाहून इथल्या लोकांनी तिचे अनुकरण केले. जसजसे अधिकाधिक लोक स्वच्छ धुतलेले आणि कडक इस्त्री केलेले कपडे परिधान करू लागले, तसतशी परीटांची मागणी वाढत गेली. त्यांच्या व्यवसायाला बरकत येत गेली.

माझ्या शालेय जीवनातल्या काळात आमच्या कुठल्याच (सरकारी) शाळेतल्या मुलामुलींसाठी गणवेश नव्हता. घरात घातलेल्या कपड्यातच मी शाळेला, बाजारात, फिरायला किंवा खेळायचा जात होतो. घरात पाण्याचे नळ होते आणि दिवसातून तास दोन तास त्यातून पाणी येत असे. धुणीभांडी करणारी बाई येऊन आमचे कपडे धूत असे. त्यांना इस्त्री करण्याची गरज नसायची, पण घरात एक कोळशाची इस्त्री होती. गरज पडली किंवा कोणाला लहर आली तर ती गरम करून कपड्यांवरून फिरवलीही जात असे. यामुळे माझ्या लहानपणातल्या कुठल्याच कपड्यावर कधी 'धोबीमार्क' पडला नाही. पण मोठ्या लोकांचे कपडे किंवा चादरी वगैरेंना पडलेला एकादा डाग काढण्यासाठी किंवा ते नव्यासारखे दिसण्यासाठी परीटाकडे 'भट्टी'ला दिले जात असत.

आमच्या गावात परीटांची तीन चार दुकाने असतील. मात्र त्यातल्या कुठल्याही दुकानासमोर एकही गाढव बांधून ठेवलेले नसायचे, असलीच तर एकादी सायकल उभी केलेली असायची. गावातली गाढवे उकिरड्यातले काहीबाही वेचून खात किंवा तिथेच लोळत पडलेली असायची. गोष्टींमध्ये ऐकलेला गाढवांना पाळणारा परीट मला प्रत्यक्षात कधीच पहायला मिळाला नाही. लाँड्रीवाले त्यांचे गठ्ठे सायकलच्या कॅरीयरवर बांधून नेत आणि आणत. आमच्या गावाला कोणत्या नदीचा किनाराही नव्हता आणि तिथला धोबीघाटही नव्हता. गावातले परीट धुवायचे कपडे नेमके कुठे नेऊन धूत असत कोण जाणे. ते सगळ्या कपड्यांना 'भट्टी'त घालतात असे ऐकले होते पण मला त्यांच्याकडची भट्टीही कधी पहायला मिळाली नाही. उसाच्या गु-हाळात वापरतात तसल्या अवाढव्य चुलखंडावर ठेवलेल्या एका मोठ्या काहिलीत खूप वॉशिंग सोडा आणि पाणी घालून हे कपडे त्यात रटारटा शिजवत असावेत असे एक चित्र मी मनात रंगवले होते. 'परीटघडी' हा शब्द त्या काळात इतका रुळला होता की 'सगळे काही अत्यंत व्यवस्थित' अशा अर्थाने त्याचा उपयोग वाक्प्रचारासारखा होत असे. ही घडी अधिक ताठर होण्यासाठी सुती कपड्यांना खळ (स्टार्च) फासली जात असे. आजही काही खादीधारी मंडळी असे परीटघडी घातलेले कडक इस्त्रीचे कपडे घालतांना दिसतात, माझ्या लहानपणी त्याचे थोडे अप्रूप वाटत असे.




मी मुंबईला रहायला आलो तो बहुधा मुंबईतल्या परीटांच्या व्यवसायाचा सुवर्णकाळ असावा. ऑफिसला जाणारे बहुतेक सगळेच लोक आपले कपडे परीटांकडे धुवायला किंवा निदान इस्त्री करायला देऊ लागले होते. शहरातल्या नाक्यानाक्यावर लहानसहान लाँड्र्या तर होत्याच, गार्मेंट आणि बँडबॉक्स यासारख्या काही मोठ्या कंपन्यांच्या दिमाखदार शाखा अनेक ठिकाणी दिसायच्या. मुंबईत अनेक ठिकाणी खास धोबीघाट बांधलेले होते. शेकडो परीट त्या जागी येऊन तिथल्या ओळीने मांडलेल्या दगडांवर कपडे आपटून धूत असत. कपडा जोराने डोक्यावरून फिरवून दाणकन खाली आपटायच्या परीटांच्या स्टाइलवरून धोबीपछाड या कुस्तीतल्या एका डावाचे नाव पडले होते.  महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळचा धोबीघाट ट्रेनने जातायेतांना दिसायचाच, अनेक हिंदी सिनेमांमध्ये तो दाखवला गेला आहे. सुती कपड्यांची धुलाई आणि साधी इस्त्री किंवा त्यांना स्टार्चमध्ये बुडवून केलेली कडक इस्त्री हे प्रकार होतेच. रेशमाची नाजुक वस्त्रे आणि लोकरीचे कपडे भट्टीत घालून किंवा धोपटून धूता येणार नाहीत म्हणून त्यांचे ड्राय क्लीनिंग करावे लागत असे. त्या काळात पेट्रोलचे दर आतासारखे भडकलेले नव्हते. ड्राय क्लीनिंगमध्ये कपड्यांचा मळ काढण्यासाठी सॉल्व्हंट म्हणून पेट्रोलचा उपयोग केला जात असे. साध्या धुलाईच्या मानाने ड्राय क्लीनिंग काही पटीने महागच होते, पण त्या उंची वस्त्रांच्या किंमतीच्या मानाने स्वस्त होते. अशा सगळ्या प्रकारच्या कपड्यांची धुलाई परीटांकडून केली जात असे.

हे परीट इतर लोकांचे कपडे स्वच्छ धूत असले, त्यावर पडलेले तेलाचे किंवा रंगांचे डाग काढत असले तरी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक शर्टाच्या क़ॉलरखाली आणि पँटच्या पट्ट्याच्या आतल्या बाजूला स्वतःचा असा कधीही धुतला न जाणारा 'धोबीमार्क' करत असत. अनेक ग्राहकांकडून आलेले कपडे धुवून आणि वाळवून झाल्यानंतर ते ओळखून ज्याचे त्याला परत देण्यासाठी हे गरजेचे होतेच. आपल्याला मात्र ती खूण पाहून त्यातून काही बोध होत नसे आणि परीटांना ते कसे समजत असे याचेच कौतुक वाटत असे. त्या काळात येऊन गेलेल्या कित्येक रहस्यकथांमधल्या मृत किंवा बेशुद्ध पडलेल्या व्हिक्ट्म्सची ओळख या धोबीमार्कांवरून पटत असे. काही गोष्टींमध्ये त्यातून खुन्याचा शोधसुद्धा लागत असे.

खरे सांगायचे झाल्यास मी कुणालाच त्याची जात किंवा आडनावही विचारत नाही आणि मला त्याची गरज किंवा महत्व वाटत नाही. तरीही सोनार आणि शिंपी हे आडनाव असलेली किंवा जात सांगणारी काही माणसे मला वेगवेगळ्या क्षेत्रात किंवा निमित्याने भेटली आहेत, पण आडनावाचा किंवा जातीवंत परीट मात्र मला कधीच भेटला नाही. हा कदाचित योगायोग असेल. पण यामुळे 'परीट समाज' असा विचारच कधी माझ्या मनात आला नाही. महाराष्ट्रात तसा वेगळा समाज अस्तित्वात तरी आहे की नाही हे ही मला माहीत नाही. विदर्भातले संत गाडगे महाराज यांचे वडील परीट होते एवढे मी ऐकले आहे. तेवढा एक अपवाद वगळता आणि नामू परीट हे पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीमधले पात्र सोडल्यास मला तिसरे एकादे प्रसिद्ध नावही आठवत नाही. पण परीटांच्या व्यवसायाचा मात्र माझ्या डोळ्यादेखत -हास होत गेलेला मला जाणवला.

कृत्रिम धाग्यांपासून विणले गेलेले न चुरगळणारे, धुवायला सोपे, न पिळताही लवकर वाळणारे असे कपडे मोठ्या संख्येने बाजारात आले. ते घरच्या घरी धुतले जाऊ लागले. घरोघरी वॉशिंग मशीन्स आली. आधी साधी, मग सेमिऑटोमॅटिक आणि त्यानंतर फुल्ली ऑटोमॅटिक मशीन्स आल्यावर घरी कपडे धुणे जास्तच सोपे होत गेले. रेशमी किंवा लोकरीच्या कपड्यांचेसुद्धा कृत्रिम पर्याय निघाले. ते कपडे धूण्यासाठी 'ईजी' पॉवडरी मिळायला लागल्या. या सर्व कारणांमुळे परीटाकडे कपडे धुवायला देण्याचे प्रमाण कमी होत होत नगण्य इतके झाले. गार्मेंट आणि बँडबॉक्स यासारख्या मोठ्या कंपन्या तर बंद पडल्याच, लहान सहान लाँड्र्यांचा व्यवसाय मुख्यतः इस्त्री करण्यापुरता शिल्लक उरला. हे काम करण्यासाठी परीट नसलेले अनेक कामगार तयार झाले आणि मोठ्या बिल्डिंग्जच्या जिन्याखाली किंवा गॅरेजमध्ये एक टेबल मांडून कपड्यांना 'प्रेस' करायला लागले. अर्थातच परीटांच्या पुढच्या पिढीमधल्या मुलांना दुसरा उद्योग व्यवसाय किंवा नोकरी शोधणे भाग पडत गेले. गेल्या सुमारे शंभर वर्षांच्या अवधीतच या व्यवसायाचा उत्कर्ष झाला, भरभराट झाली आणि तो आता अस्तंगत होण्याच्या दिशेने चालला आहे असे वाटू लागले आहे.

वस्त्र आणि अलंकार यांची आवड किंवा हौस मानवाला प्राचीनकालापासून होती. सोनार, शिंपी आणि परीट मंडळी हे पुरवण्याचे काम करत आली आहेत. माणसाच्या जीवनाचा स्तर जसा उंचावत गेला त्याप्रमाणे वस्त्रालंकाराला अधिक मागणी होऊ लागली. त्यातून गेल्या सुमारे शंभर वर्षांच्या काळाच्या पहिल्या भागात हे व्यवसाय वृद्धिंगत होत गेले. पण यंत्रांच्या उपयोगाने माणसाचे कष्ट कमी होत गेले त्याप्रमाणे कष्टांचे मोलही कमी होत गेले. मुख्यतः कष्ट आणि हस्तकौशल्य यावर आधारलेले सगळेच उद्योग व्यवसाय मागे पडत गेले. परंपरागत पद्धतीने काम करणा-या सोनार, शिंपी आणि परीट यांनाही त्याचा फटका बसला. हे गेल्या पाच सहा दशकांमधले माझे निरीक्षण आहे. सोनार, शिंपी आणि परीट हे शब्द आणखी पन्नास वर्षांनंतर कदाचित आजवरच्या रूढ अर्थांनी ओळखीचे राहणार नाहीत.

. . . . . . . . . . . . . . . . .  .  (समाप्त) 

Saturday, December 06, 2014

श्री दत्तगुरूंची गाणी

श्री दत्तगुरूंच्या जयंतीच्या सर्वाँना शुभेच्छा!



१, संत तुकारामांनी लिहिलेला अभंग

तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत ।।
काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ।।
माथा शोभे जटाभार । अंगी विभूती सुंदरा ।।
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ।।
----------------

जुन्या काळातल्या भक्तीगीतांच्या गायकांमध्ये श्री.आर एन पराडकर हे प्रमुख नाव होते. त्यांनची तीन भजने खाली दिली आहेत.

२. माझ्या लहानपणापासून प्रसिद्ध असलेले श्री.आर एन पराडकर यांचे कवी सुधांशु यांनी लिहिलेले भक्तीगीत

दत्तदिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे ।।
अनुसूयेचे सत्व आगळे
तीन्ही देवही झाली बाळे
त्रैमूर्ती अवतार मनोहर,
दीनोद्धारक त्रिभुवनि गाजे ।।
    तीन शिरे, कर सहा शोभती
    हास्य मधुर शुभ वदनावरती
    जटाजूट शिरि, पायि खडावा,
    भस्मविलेपीत कांती साजे ।।
पाहुनि प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती,
हळुहळु सरते मीपण माझे
-----------------------

३. माझ्या लहानपणापासून मी ऐकलेले आणि गायिलेले श्री.आर एन पराडकर यांचेच पारंपारिक भजन

धन्य हो प्रदक्षिणा सदगुरूरायाची ।
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥
गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी।
अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य. ॥ १ ॥
पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी ।
सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य.॥ २ ॥
मृदंगटाळघोषी भक्त भावार्थे गाती ॥
नामसंकीर्तने नित्यानंद नाचती ॥ धन्य. ॥ ३ ॥
कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।
लोटांगण घालितां मोक्ष लागे पायांता ॥ धन्य ॥ ४ ॥
प्रदक्षिणा करुनी देहभाव हरवीला ।
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला । धन्य हे प्रदक्षिणा ॥ धन्य ॥ ५ ॥
-------------------------------

४. श्री.आर एन पराडकर यांचेच आणखी एक पारंपारिक भजन

दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो ।।
दत्ता दिगंबरा या हो, सावळ्या मला भेट द्या हो ।।
दत्ता दिगंबरा या हो, दयाळा मला भेट द्या हो ।।

तापलो गड्या त्रिविध तापे
बहुविध आचरलो पापे
मनाच्या संकल्प-विकल्पे
काळीज थरथरथर कापे
कितीतरी घेऊ जन्म फेरे
सावळ्या मला भेट द्या हो ।।

तुम्हाला कामकाज बहुत
वाट पाहू कुठवर पर्यंत
प्राण आला कंठागत
कितीतरी पाहशील बा अंत
दीनाची करुणा येऊ द्या हो
नाथा मला भेट द्या हो ।।

संसाराचा हा वणवा
कितीतरी आम्ही सोसावा
वेड लागले या जिवा
कोठे न मिळे विसावा
आपुल्या गावा तरी न्या हो
दयाळा मला भेट द्या हो ।।

स्वामी मला भेट द्या हो
दयाळा मला भेट द्या हो
सावळ्या मला भेट द्या हो
दत्ता दिगंबरा या हो
स्वामी मला भेट द्या हो ।।
----------------------------------------------------------

५. श्री अजित कडकडे यांचे प्रसिद्ध पालखीगीत - कवी प्रवीण दवणे

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा

निघालो घेऊन दत्ताची पालखी ।।
आम्ही भाग्यवान आनंद निधान
झुलते हळूच दत्ताची पालखी ।।

रत्‍नांची आरास साज मखमली
त्यावर सुगंधी फुले गोड ओली
झुळुक कोवळी चंदनासारखी ।।

सातजन्मांची ही लाभली पुण्याई
म्हणून जाहलो पालखीचे भोई
शांत माया-मूर्ति पहाटेसारखी ।।

वाट वळणाची जिवाला या ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी
डोळियांत गंगा जाहली बोलकी ।।
----------------------------------


६. माझी आई दत्ताची परमभक्त होती. तिच्या स्मरणार्थ तिने रचलेला एक अभंग आज खाली देत आहे.

कल्पवृक्षातळी अत्रीचा नंदनु, सवे कामधेनू शोभतसे ।।
शिरी जटाभार रुद्राक्षांचा हार, चंद्र शिरावर शोभतसे ।।
कटीसी शोभले भगवे वसन, चारी वेद श्वानरूपे आले ।।
शंख चक्र गदा पद्म नी त्रिशूल, शोभतसे माळ हांतामध्ये ।।
सुहास्यवदने पाहे कृपादृष्टी, अमृताची वृष्टी भक्तांवरी ।।
ऐशा या स्वरूपी मन रमवावे, शिर नमवावे पायी त्याच्या ।।
लक्ष्मी ऐशा मनी ध्याउनी स्वरूपा, रमे चित्ती सदा ऐक्यभावे ।।
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, December 03, 2014

मांजरपाट आणि मसराई

आजच्या तरुण किंवा मध्यमवयीन पिढीमधल्या लोकांनी मांजरपाट आणि मसराई ही नावे बहुधा ऐकलीही नसतील. गेल्या पन्नास वर्षात मीदेखील माझ्या बोलण्यात या शब्दांचा कधीच उल्लेख केला नसेल, पण त्यापूर्वीच्या काळात मात्र ही नावे चांगली रूढ होती. रेयॉन, नायलॉन, डेक्रॉन वगैरे कृत्रिम धाग्यांचा शोध कधी लागला आणि त्यांच्यापासून तयार केलेली कापडे कधी बाजारात आली हे काही मला माहीत नाही पण मी लहान असतांना म्हणजे १९५०च्या दशकात ती आमच्या गावापर्यंत तरी येऊन पोचली नव्हती एवढे नक्की. आम्हाला कापडांचे फक्त तीनच प्रकार ठाऊक होते, वनस्पतीजन्य कापसापासून बनवलेले आणि आमच्या नेहमीच्या वापरातले साधेसुधे सुती कापड, कीटकजन्य रेशमाचे मुलायम नाजुक वस्त्र आणि प्राणीजन्य लोकरीचे उबदार कपडे. 

त्या काळातसुद्धा रेशमी कापड भयंकर महाग असायचे, सामान्य माणसांकडे रोकड उत्पन्नाची साधनेही कमी असल्यामुळे रेशमी वस्त्रे विकत घेणे त्यांच्या ऐपतीच्या पलीकडले असायचे. माझ्या जन्माच्याआधी कधीतरी घेऊन ठेवलेले एक दोन रेशमी कद आणि उपरणी आमच्या घरी होती. त्यांचा उपयोग फक्त देवपूजेच्या वेळी अत्यंत काळजीपूर्वकरीत्या केला जात असे. माझ्या भावंडांमध्ये मी सर्वात लहान असल्यामुळे ते नेसण्याची वेळ माझ्यावर फारशी येत नसे किंवा मला ती संधी सहसा मिळत नसे. अर्धा वीत रुंद आणि हातभर लांब अशी एक रेशमी लंगोटी माझ्या मुंजीच्या वेळी मला घातली होती आणि तो विधी आटोपेपर्यंत दोन चार तास मी ती कशीबशी सांभाळली होती. माझ्यासाठी म्हणून आणलेले हे पहिले रेशमी वस्त्र आणि हेच शेवटचेही. माझ्या मिळकतीमधून माझ्या स्वतःसाठी असे कोणतेही रेशमी कापड मी कधीच विकत घेतले नाही.

माझ्या लहानपणी लोकरीचे कपडेसुद्धा महागच असले तरी ते गरजेचे होते. लोकरीच्या गुंड्याचा एक चेंडू आणि दोन लांबलचक सुया घेऊन त्या धाग्यांना एकमेकांमध्ये गुंतवत राहणे हा त्या काळातल्या महिलावर्गाचा आवडता छंद होता. नात्यातल्या किंवा ओळखीतल्या कुणाच्या घरी नव्या बाळाचा जन्म झाल्याचे कळले की लगेच त्या बाळासाठी अंगडे, टोपडे, हातमोजे, पायमोजे वगैरे विणायची सुरुवात होत असे. मी तान्हे बाळ असतांना मीसुद्धा असले अनेक लोकरीचे कपडे भिजवले असतीलच, पण ते आता आठवत नाही. मला समजायला लागल्यापासून आणि माझ्या आठवणीतल्या दिवसांमध्ये मी लोकरीचे अनेक स्वेटर मात्र घातले होते. अगदी छोट्या बाळापासून ते मिसरूड फुटलेल्या मुलांपर्यंत निरनिराळ्या वयातल्या मुलांसाठी निरनिराळ्या काळात विणलेले अनेक स्वेटर एका गाठोड्यात बांधून ते ट्रंकेत ठेवलेले असायचे. थंडी पडायला सुरुवात झाली की ते गाठोडे बाहेर काढून त्यातले स्वेटर त्यांना लागलेला डांबराच्या गोळ्यांचा उग्र वास घालवण्यासाठी उन्हात पसरून ठेवले जात. मला फिट बसेल असा त्यातला एकादा स्वेटर निवडून माझ्या कपाटात ठेवला जाई. त्या वेळी कोणीतरी, निदान तो स्वेटरविणणारी व्यक्ती त्या स्वेटरच्या जन्मकथेची आठवण हमखास काढत असे. आमच्या भागात फार कडाक्याची थंडी पडत नसल्यामुळे दिवसभरात स्वेटरची गरज पडत नसे आणि रात्री जेंव्हा तो घातला जात असे तेंव्हा अंधारात घराबाहेर पडायची वेळ येत नसे. यामुळे उबदारपणा हा स्वेटरचा एकमेव गुण समजला जायचा. त्यासाठी घरात अनेक स्वेटर उपलब्ध असल्याने माझ्यासाठी वेगळा नवा स्वेटर विणायची बुद्धी घरातल्या कुणालाच झाली नाही आणि "मला नवा कोराच स्वेटर हवा" असा हट्ट धरायची बुद्धी मलाही झाली नाही. पुढल्या आयुष्यात मात्र गरज नसतांनासुद्धा शोबाजीसाठी काही स्वेटर आणि जॅकेट्स घेतले गेले.

आमचे रोजच्या वापरातले कपडे १०० टक्के सुतीच असायचे. लहानपणचा पोशाख म्हणजे सदरा आणि चड्डी एवढाच असायचा. चड्डीची लांबी कंबरेपासून गुढग्याच्या दोन चार बोटे वर इतकी असायची आणि सद-याची लांबी खांद्यापासून चड्डीच्या मध्यापर्यंत असे, चड्डीत खोचलेला सदरा आपोआप बाहेर निघून येऊ नये आणि नाही खोचला तर त्याने चड्डीला पूर्ण झाकू नये इतपत. मुलांच्या कपड्यांच्या बाबतीत 'घरी घालायचे' आणि 'बाहेर जातांना घालायचे' असा भेदभाव नव्हता. यामुळे अंगात घातलेल्या कपड्यानिशी मित्रांसोबत खेळायला केंव्हाही पळणे सोपे होते. खेळून घरी आल्यावर चिखलमातीने मळलेले कपडे काढून धुतलेले कपडे अंगात घालायचे. तसेच बाहेर जातांना काही कारणाने नवे कोरे कपडे अंगावर चढवले असले तर घरी परत आल्यानंतर ते काढून ठेऊन पुन्हा नेहमीच्या वापरातला जोड अंगावर चढवायचा एवढेच नियम होते. मुलांचे वय आणि उंची थोडी वाढल्यानंतर बाहेर जातांना घालायला विजारी आणि घरात घालायला लेंगे शिवले जात. आजची मुलेसुद्धा साधारणपणे अशाच प्रकारचे कपडे घालतात, फक्त सदरा, चड्डी. विजार, लेंगा या शब्दांऐवजी शर्ट, हाफपँट. फुलपँट, जीन्स, पायजमा असे वेगळे शब्द वापरतात. गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये 'टीशर्ट' हा एकच नवा प्रकार आला आहे. माझ्या लहानपणीसुद्धा क्वचित एकादा मुलगा कधी कधी 'नेहरू शर्ट' घालायचा, त्याला आता 'झब्बा' किंवा 'कुर्ता' म्हणतात आणि त्याच्या वापराचे प्रमाण थोडे वाढले आहे.

''वस्त्र ही माणसाची मूलभूत आवश्यकता आहे.'' असे त्या काळात सर्वसाधारणपणे समजले जात होते, कापडे ही तेंव्हा छानछोकीची किंवा चैनीची बाब नव्हती. त्यांची खरेदी गरजेपुरतीच केली जात होती. सहज रस्त्यातून जातांना एका दुकानात एक छान शर्ट दिसला म्हणून लगेच कोणी तो विकत घेतला असे होत नसे. बहुधा याच कारणामुळे आमच्या गावात रेडीमेड कपड्यांचे दुकानच नव्हते. शिंप्यांची दुकाने मात्र गल्लोगल्ली होतीच, काही लोक (बव्हंशी महिला) घरबसल्या शिवणकाम करून देत असत. प्रत्येक वर्षी दिवाळीला आणि वाढदिवसाला सर्व मुलांसाठी नवीन कपडे घेतलेच पाहिजेत असा दंडक त्या काळात नव्हता. कोणी तसे ठरवले तरी शिंपीमहाराज ते कपडे वेळेवर शिवून देतीलच अशी खात्रीही नसायची. कपड्यांची गरज आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून सोयीनुसार कपडे शिवले जायचे आणि मुलांचे कपडे शिवायला टाकतांना 'वाढत्या अंगाचे' म्हणून ते जरा डगळच करायला सांगायचे. शिवून आलेले नवे कपडे व्यवस्थितपणे ट्रंकेत ठेवायचे आणि दसरा, दिवाळी, वाढदिवस, एकादा समारंभ अशा वेळी काढून ते परिधान केले जायचे. ते अंगाला फिट व्हायला लागले किंवा वापरात असलेले कपडे फाटले किंवा तोकडे पडायला लागले की नवे कपडे रोज वापरायला काढले जात अशी पद्धत होती.

आमच्या गावात कापडाची दोन मुख्य दुकाने होती. 'के.टी.लाहोटी अँड सन्स' या नावाचे दुकान एका मारवाडी व्यापा-याने खूप आधीपासून काढले होते आणि बहुधा त्याच्या सन्सनी त्याचा व्याप भरपूर वाढवला होता. विविध प्रकारच्या कापडांनी ते भरलेले असे. त्या दुकानात काम करत असलेल्या शामराव साबडे यांचा स्वाभिमान एकदा दुखावला गेला आणि त्यांनी तिरीमिरीत नोकरीला लाथ मारून स्वतःचे वेगळे दुकान काढले. त्याचा जनसंपर्क चांगला असल्याने त्यांनी लाहोटींचे बरेचसे ग्राहक आपल्या दुकानाकडे वळवले. त्यातच आमचीही गणना होती. कापडखरेदी करायची ती साबड्यांच्याच दुकानात असे ठरून गेले होते. यात त्यांचीही चार पैशांची कमाई व्हायची आणि त्यातल्या एकाद्या पैशाची सूट आम्हाला मिळायची अशी 'विन विन सिच्युएशन' असायची. मुलांसाठी कपडे शिवायचे ठरले की नेहमीच्या शिंप्याला बोलावायचे. तो घरी येऊन सगळ्या मुलांची मापे घ्यायचा आणि त्यासाठी किती कापड लागेल यांचे वारेमाप अंदाज सांगायचा. गि-हाइकांनी दिलेल्या कापडांमधून तो लहान मुलांची झबली, चड्ड्या, दुपटी वगैरे करून विकतो अशी चर्चा होत असे.
"इतकं कापड कशाला? मागच्या वेळी तर तेवढ्यातच भागले होते ना?"
"अहो आता मुलं मोठी झाली आहेत."
"म्हणून काय इतकं जास्त?"
अशा प्रकारची घासाघीस व्हायची आणि अखेरीस "एका कापडाचे तीन लेंगे शिवले तर इतक्या कापडात होतील आणि चार सदरे शिवले तर तितक्यात बसवता येतील." अशा प्रकारची तडजोड होत असे. मग आमचा मोर्चा साबड्यांच्या दुकानाकडे वळत असे. सदरे आणि लेंगे यांच्यासाठी मांजरपाट हेच स्वस्त आणि उपयुक्त कापड असायचे. लोकमान्य टिळकांच्या काळात परदेशी कापडांच्या होळ्या पेटवल्या जात तेंव्हा अशा प्रकारचे कापड मँचेस्टरहून येत असावे. 'मँचेस्टरक्लॉथ' या शब्दाचा 'मांजरपाट' असा अपभ्रंश झाला आणि नंतरच्या काळात ते कापड मुंबईतल्या गिरण्यांमध्ये विणले जाऊ लागले. कोणते कापड कोणत्या गिरणीतले आहे आणि त्याचे कोणते गुण आहेत यावर दुकानदार काही माहिती देत असे. ती ऐकून आणि कापडाचा पोत, रंग, किंमत वगैरे पाहून त्यातून निवड केली जात असे. 'ह-याक' किंवा अशाच विचित्र नावाचे एक कापड जरा जाड आणि टिकाऊ असायचे, पण त्याची किंमतही जास्त असायची. "एवीतेवी हे कपडे चार आठ महिन्यांत लांडेच होणार आहेत, मग ते जास्त टिकून तरी त्याचा काय फायदा?" असा सूज्ञ विचार काही लोक करत, तर "या मुलाला लहान झाले तर तो वापरेल आणि त्यानंतर तिसरा आहेच." अशा प्रकारचा दूरदर्शी विचार मुलाबाळांचे गोकुळ असलेल्या घरात केला जात असे. 'धुवट मांजरपाट' नावाचा एक ब्लीच केलेला प्रकार असायचा. हे पांढरे कापड नवे असतांना जास्त शुभ्र दिसायचे. एक दोन आठवडे वापरून आणि सात आठ वेळा धुवून झाल्यानंतर तो फरक जाणवायचा नाही. एकादा सदरा आणि विशेषतः लेंगा शिवण्यासाठी ते कापड घेतले जात असे. 'मसराई' नावाचे एक उच्चवर्णीय कापड असायचे. 'मर्सराइज्ड' नावाच्या प्रक्रिये (प्रोसेस)मुळे त्या कापडाला काही खास गुणधर्म प्राप्त झालेले असायचे. ते जरा चमकदार दिसायचे आणि धुतल्यानंतर कमी आटत असे. मोठ्या लोकांसाठी, विशेषतः धोतरजोडीसाठी ते घेतले जात असे. 'पॉपलीन' हा कापडाचा प्रकार दिसायला सर्वात छान आणि अर्थातच सर्वात महागडा असायचा. पॉपलीनचे कापड घेणे म्हणजे सुखवस्तूपणाची किंवा उधळपट्टीची हद्द समजायचे. चड्ड्या किंवा विजारीसाठी एकाच प्रकारचे खूप जाड कापड असायचे, त्याचे नाव सांगायची गरज नसे. "मिलिटरीतल्या लोकांचे ड्रेस याचेच शिवतात बघा." असे बेधडक ठोकून दिले जात असे. ती कापडे खरेच दणकट असायची, पण नको त्या वेळी नको त्या ठिकाणी उसवणे किंवा फाटणेसुद्धा चड्डीच्या बाबतीतच जास्त होत असे. हालचाली करतांना त्या वस्त्रावर जास्त ताण पडत असावा आणि खेळतांना होणा-या धडपडीमध्ये त्याचीच जास्त झीज होत असणार. आमच्या घरातल्या मुलांचे लेंगे नेहमी फक्त पांढ-या रंगाचेच असायचे. मुंबईपुण्याकडून आलेले काही पाहुणे चट्ट्यापट्ट्याच्या कापडाचे लेंगे वापरत. यावर "गादीच्या झोळाच्या कापडाचे कसले कपडे शिवायचे?" अशी टीका होत असे. सद-याची कापडे पांढरी किंवा फिकट रंगांची आणि चड्ड्यांची कापडे काळा, निळा, करडा अशा गडद रंगाची मळखाऊ असायची हे ठरलेले होते.

कृत्रिम धाग्यांची कापडे बाजारात आल्यानंतर सगळे चित्र बदलून गेले. अनेक प्रकारचे धागे आणि त्यांची निरनिराळ्या प्रमाणांमधली मिश्रणे यांच्यामुळे कापडांच्या असंख्य व्हराइटीज तयार झाल्या. त्यांची नावे समजून घेऊन ती लक्षात ठेवणे कठीण होत गेले. रेडीमेड गार्मेंट्सच्या प्रसारानंतर तर हे चित्र पार पालटले. कपड्यांच्या खरेदीसाठी आता दुकानात जाणारे ग्राहक कपड्यांचे रंग, त्यांचे आणि त्यावरले डिझाइन, कापडाचा पोत, त्याचा हाताला होणारा स्पर्श आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लेबल पाहतात, त्याचा ब्रँड पाहतात पण कापडाच्या जातकुळीची चौकशी करत नाहीत. यामुळे मांजरपाट किंवा मसराई अशी नावे तर त्यांच्या कानावर पडत नाहीतच, पण ही कशाची नावे आहेत? त्यावरून काय अर्थ निघत असेल? कोणती माहिती मिळत असेल हे सुद्धा पुढल्या पिढीतल्या लोकांना कदाचित समजणार नाही.

Friday, November 28, 2014

सतारीचे बोल . केशवसुत

शालेय जीवनात मराठी भाषा हा माझा आवडता विषय होता. वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याची सुटी लागताच पुढल्या इयत्तेच्या पुस्तकांची जमवाजमव सुरू होत असे. त्यातले मराठी भाषेचे पाठ्यपुस्तक मी सर्वात आधी वाचायला घेत असे आणि त्यातले सगळे गद्यपद्य धडे वाचून टाकत असे. पुढल्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होईपर्यंत हे पुस्तक माझ्या ओळखीचे झालेले असे. आमच्या वर्गातल्या काही मुलांना कदाचित कवितांचा आशय समजत नसल्यामुळे त्या शिकायला कठीण वाटत असत किंवा आवडत नसत. मला मात्र काही कवितांमध्ये शब्दांच्याही पलीकडले, ओळींमधले (बिट्वीन द लाइन्स) बरेच काही असते असे जाणवायचे आणि ते समजून घ्यावे असे ही वाटायचे. लहानपणी नीट न समजलेली अशीच एक शंभर वर्षांपूर्वीची कविता पाच दशकानंतर अलीकडे पुन्हा माझ्या वाचनात आली. १८६६ ते १९०५ या कालखंडात होऊन गेलेल्या कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत यांची सतारीचे बोल ही कविता आमच्या एका पाठ्यपुस्तकात होती. त्यात बहुधा मूळ कवितेतली ३-४ कडवीच घेतलेली असावीत, कारण इतकी लांबलचक कविता कधीही शिकल्याचे मला आठवत नाही. त्या काळात ती मलाही फारशी समजली नव्हती. सर्वसाधारण मुलांनी या कवितेचा घेतलेला शब्दशः अर्थ आधी पाहू.

काळोखाची रजनी होती ..... यात काय विशेष आहे? नेहमीच रात्री काळोख असतो. त्या काळात आमच्या गावात विजेचा झगझगाटही नसायचा. रात्र पडली की सगळीकडे अंधारगुडुप आणि चिडीचूप होऊन जात असे. "आपली रजनी तर प्रकाशला आवडते ना?" मागच्या बाकावरून एक कॉमेंट. बिचारी रजनी लाजून चूर.
हदयी भरल्या होत्या खंती  ..... त्या कवीच्या मनात खंत वाटण्यासारख्या काही गोष्टी असतील. सगळ्यांनाच कसली ना कसली दुःखे असतात. याला बहुधा जास्त असतील.
अंधारातचि गढले सारे  ....... मनातली खंत उजेडात तरी कशी दिसणार? अंधारात काही दिसत नाही हे सांगायला कशाला पाहिजे? अंधारात काय घडलं सर?  एक वात्रट प्रश्न
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे   ....... नाही तरी रोज रोज त्याच त्याच चांदण्या कोण पहातो?
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत,  ..... कशाला? ठेचकाळून पडशील ना.
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले.... दिड दा, दिड दा, दिड दा .....१ 
आमच्या गावात कोणीच सतार हे वाद्य वाजवत नसल्याने कोणी ते पाहिलेही नव्हते, पण ते एक तंतुवाद्य आहे असे ऐकले होते. त्यामुळे त्यातून ट्याँव ट्याँव, ट्वंग ट्वंग असे आवाज निघत असावेत असे वाटत होते. दिड दा, दिड दा, दिड दा काही समजत नव्हते.
आपल्या कवितेची अशी चिरफाड झालेली पाहून  "अरसिकेषु कवित्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख।" असे कोणाही कवीला त्रिवार म्हणावेसे वाटल्यास काही नवल नाही.

आता या कवितेकडे जरा गंभीरपणे पाहू. 
काळोखाची रजनी होती
हदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत,
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले.... दिड दा, दिड दा, दिड दा .....१
कवितेची ही फक्त सुरुवात आहे. यात कवीने वातावरणनिर्मिती केली आहे. कोणताही विचार मांडलेला नाही. काही कारणाने त्याच्या हृदयात काठोकाठ खंत भरली आहे, सगळीकडे अंधःकार दाटलेला दिसत आहे. बाहेरच्या जगात जमीनीवर अंधार असला तरी आभाळात तारे चमकत आहेत, याच्या मनात तेवढा अंधुक प्रकाशही नाही. तिथे फक्त विषण्णता आहे. अस्वस्थपणा त्याला एका जागी बसू देत नसल्यामुळे तो उगाचच येरझारा घालतो आहे. अचानक या उदास वातावरणाच्या विपरीत असे काही घडते, एका खिडकीमधून येणारे सतारीचे सुरेल बोल त्याच्या कानावर पडतात. दिड दा. दिड दा, दिड दा यात एक सुंदर अशी लय आहे, एक ठेका आहे.

आपले हृदय जर सुन्न झाले असेल तर सगळे जगच स्तब्ध झाल्यासारखे वाटते. पण हे जड जग तर खोटे आहे, "ब्रह्म सत्यम् जगन्मिथ्या" हे तत्वज्ञान कवीने दुस-या कडव्यात सांगितले आहे. (शाळकरी वयात ते काय समजणार होते?) अत्यंत निराशेमुळे आता आपला जीव द्यावा असे कवीला वाटत होते आणि साहजीकच अशा मनस्थितीत असतांना त्याला सुरेल सतारवादन ऐकावे असे वाटणार नाही.
जड हृदयी जग जड हे याचा,
प्रत्यय होता प्रगटत साचा
जड ते खोटे हे मात्र कसें
ते न कळे, मज जडलेच पिसे
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनि ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....२

तिस-या कडव्यात याचाच अधिक विस्तार केला आहे. मनात भावनांचे इतके मोठे थैमान चाललेले असतांना बाहेर सोसाट्याचे वादळ झाले तरी या अवस्थेत कवीला ते सुसह्य वाटले असते. मनात उठणा-या भयानक चीत्कारांपुढे भुतांचा आरडाओरडासुद्धा त्याला सौम्य वाटला असता. अशा विषण्ण अवस्थेत भैरवी रागातले सतारीचे मंजुळ आणि प्रेमळ स्वर ऐकावेसे त्याला वाटले नाहीच, उलट त्यांचा तिटकारा आला.
सोसाट्याचे वादळ येते
तरि ते तेव्हा मज मानवते
भुते भोवती जरी आरडती
तरि ती खचितचि मज आवडती
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीती,
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....३

रागाने जळफळत तो त्या खिडकीकडे गेला, त्याने तिच्या दिशेने हवेतच एक ठोसा लगावला, आतल्या माणसाला दोन चार शिव्या हासडल्या.  "अवेळी पिर पिर करणारी तुझी सतार फोडून टाक." असेही तो पुटपुटला. आपण दुःखात बुडालेलो असतांना दुस-या कुणी मजेत रहावे हे कवीला सहन होत नव्हते. असे त्याने चौथ्या कडव्यात लिहिले आहे.
ऐकुनी तो मज जो त्वेष चढे
त्यासरशी त्या गवाक्षाकडे
मूठ वळुनि मी हात हिसकिला
पुटपुटलोही अपशब्दांला
म्हटले आटप आटप मूर्खा
सतार फोडुनि टाकिसी न का
पिरपिर कसली खुशालचंदा
करिसी .... दिड दा, दिड दा, दिड दा .....४

कवी त्या खिडकीकडे रागारागात जात असतांना एक चमत्कार झाला. कां कोणास ठाऊक? पण तो थबकला. त्या मधुर ध्वनीने काय जादू केली कोण जाणे? आपल्या मनातली अस्वस्थता विसरून ते सूर ऐकत बसावे असे त्याला वाटायला लागले. येरझारा थांबवून तो एका ओट्यावर बसून सतारीचे बोल ऐकत राहिला.
सरलो पुढता चार पावले
तो मज न कळे काय जाहले
रुष्ट जरी मी सतारीवरी
गति मम वळली तरि माघारी
ध्वनिजाली त्या जणू गुंतलो
असा स्ववशता विसरुन बसलो..
एका ओट्यावरी स्थिर तदा
ऐकत .... दिड दा, दिड दा, दिड दा .....५

मांडीवर कोपरे ठेवून त्याने आपले डोके दोन्ही तळहातात धरले. कानावर पडत असलेले सतारीचे करुण सूर त्याच्या हृदयाला जाऊन भिडले. ते ऐकतांना त्याच्या डोळ्यामधून घळघळा पाणी वाहू लागले.
तेथ कोपरे अंकी टेकुनि
करांजलीला मस्तक देउनि
बसलो, इतक्यामाजी करुणा...
रसपूर्ण गती माझ्या श्रवणा
आकर्षुनि घे, हदय निघाले
तन्मय झाले द्रवले, आले
लोचनातुनी तोय कितिकदा
ऐकत असता .... दिड दा, दिड दा .....६

कोणी तरी आपल्या खांद्यावर हात ठेऊन आपल्याला धीर देत आहे असा भास कवीला झाला. "असा त्रागा करून काय उपयोग आहे? थोडे धीराने घे. हे दिवस जातील, चांगले दिवस येतील." असेच ते सतारीचे बोल आपल्याला सांगत आहेत असे त्याला वाटले.
स्कंधी माझ्या हात ठेवुनी
आश्वासी मज गमले कोणी,
म्हणे.. खेद का इतुका करिसी
जिवास का बा असा त्राससी
धीर धरी रे धीरा पोटी
असती मोठी फळे गोमटी
ऐक मनीच्या हरितील गदा
ध्वनि हे ....दिड दा, दिड दा, दिड दा .....७

मनात आशेचे किरण दिसू लागताच त्याची नजर वर आकाशाकडे गेली. आता त्याला "एक अंधेरा, लाख सितारे" याचा अनुभव आला. सतारीच्या बोलांमधून हे सत्य बाहेर पडत आहे असे त्याला वाटले.
आशाप्रेरक निघू लागले
सूर तधी मी डोळे पुशिले
वरती मग मी नजर फिरवली
नक्षत्रे तो अगणित दिसली
अस्तित्वाची त्यांच्या नव्हती
हा वेळवरी दादच मज ती
तम अल्प..द्युति बहु या शब्दा
वदती रव ते दिड दा, दिड दा .....८

सतार वादक तन्मयतेने सतार वाजवतच होता. ते सूर ऐकणा-या कवीच्या मनात त्याचे निरनिराळे प्रतिसाद उमटत होते. आधी भीषण वाटून नको झालेले सूर हवे हवेसे आणि आश्वासक वाटायला लागलेले होतेच, आता त्याला उदात्ततेची झालर लाभली. या विश्वात आपण एकटे नाही, अनादि काळापासून अनंत काळापर्यंत यात सगळीकडे भरून राहिलेल्या ब्रह्मतत्वाचाच आपण एक भाग आहोत हे त्याला उमगले. त्याच्या मनातला आपपरभाव गळून पडला. 
वाद्यातुनि त्या निघती नंतर
उदात्ततेचे पोषक सुस्वर
तो मज गमले विभूति माझी
स्फुरत पसरली विश्वामाजी,
दिक्कालांसह अतित झालो,
उगमी विलयी अनंत उरलो
विसरुनि गेलो अखिला भेदां
ऐकता असता .... दिड दा, दिड दा .....९

"चिदानंदरूपः शिवोहम् शिवोहम्" याची जाणीव झाल्यानंतर कवीला आता सगळीकडे प्रेम आणि आनंद दिसू लागला. मनातला अंधार दूर होताच बाह्य जगातले सौंदर्य त्याला दिसायला लागले. ही सगळी किमया सतारीच्या त्या दिव्य स्वरांनी केली.
प्रेमरसाचे गोड बोल ते
वाद्य लागता बोलायाते
भुललो देखुनि सकलहि सुंदर
सुरांगना तो नाचति भूवर
स्वर्ग धरेला चुंबायाला
खाली लवला... मजला गमला
अशा वितरिती अत्यानंदा
ध्वनि ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....१०

वाजत असलेली ती सतारही अखेर शांत झाली. पण आता कवीच्य़ा मनातली वादळे शमली होती, ते शांत झाले होते. त्याचे हृदय शांत होताच धरती, तारे, वारे सगळे काही शांत झाले होते. तो शांतपणे घरी जाऊन झोपी गेला पण त्याच्या अंतर्मनात सतारीचे बोल घुमत राहिले.
शांत वाजली गती शेवटी,
शांत धरित्री शांत निशा ती
शांतच वारे, शांतच तारे
शांतच हृदयी झाले सारे
असा सुखे मी सदना आलो
शांतीत अहा झोपी गेलो
बोल बोललो परी कितिकदा
स्वप्नी .... दिड दा, दिड दा, दिड दा .....११

संपूर्ण नकारात्मकतेपासून सुरू झालेला मनाचा हा अलगद झालेला प्रवास केशवसुतांनी किती नाजुकपणे रंगवला आहे? सतारीचे बोल हे सकारात्मक ऊर्जेचे एक प्रतीक आहे. डोळ्यापुढे अंधार झाला तरी कानाचे दरवाजे उघडे असतात, त्यातून सकारात्मक जाणीवा होऊ शकतात. वैफल्य येऊ देऊ नये, काही तरी चांगले सापडेल याचा विचार करावा, त्याकडे संपूर्ण लक्ष द्यावे, मनातली जळमटे आपोआप दूर होतील असा संदेश कवी केशवसुतांच्या या कवितेमधून मिळतो.

Sunday, November 23, 2014

आकाशातला वक्र प्रवास - विमान ते मंगळयान



दोन बिंदूंना जोडणा-या असंख्य वक्ररेषा असू शकतात पण तशी फक्त एकच सरळरेषा काढता येते, या सरळ रेषेची लांबी सर्वात कमी असते, वगैरे सिद्धांत आपण प्राथमिक भूमितीमध्ये शिकलो होतो. यांचे प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे दोन गावांना जोडणारा सरळसोट रस्ता असला तर एका गावाहून दुस-या गावाला जाणारा तो सर्वात जवळचा मार्ग असतो. त्यावरून प्रवास केल्यास कमी वेळ लागतो आणि कमी श्रम पडतात. दादर ते परळ यासारख्या लहानशा आणि सपाट भूभागात तसा सरळ रस्ता बांधणे शक्य असते, पण मुंबईपासून पुण्यापर्यंत जाण्यासाठी असा रस्ता बांधणे शक्यच नसते. डोंगर- द-या, नदी- नाले यांच्यासारखे वाटेतले अनेक अडथळे ओलांडून पुढे जाण्यासाठी वळणावळणाने जाणारे रस्ते बांधावे लागतात.

आकाशात असले अडथळे नसतातच आणि रस्ताही बांधावा लागत नाही. कमीत कमी वेळ आणि खर्च यावा या दृष्टीने आकाशमार्गातले सगळे प्रवास अगदी सरळ मार्गाने केले जात असतील किंवा करता येत असतील ना? पण मूंबई ते न्यूयॉर्कचा विमानप्रवास असो किंवा चंद्रयान वा मंगलयान असोत, त्यांचे मार्ग वक्राकारच असतात. मुंबई आणि न्यूयॉर्क ही शहरे पृथ्वीच्या विरुद्ध बाजूंना वसलेली असल्यामुळे त्यांना जोडणारी सरळरेषा पृथ्वीच्या पोटातून जाते. विमानांचे उड्डाण आकाशातून, किंबहुना पृथ्वीच्या सभोवती पसरलेल्या हवेमधून होते. विमानात बसलेल्या माणसांना आपण अगदी नाकासमोर सरळ रेषेत पुढे जात आहोत असा भास होत असला तरी त्या मार्गाचा प्रत्यक्ष आकार एका प्रचंड आकाराच्या कमानीसारखा गोलाकार असतो. या दोन शहरांना जोडणा-या अशा अनेक कमानी काढता येतात. मी अमेरिकेला गेलो होतो तेंव्हा जातांना आमचे विमान मुंबईहून निघाल्यानंतर उत्तरेच्या दिशेने प्रवास करत कझाकस्तान, रशिया यासारख्या देशांवरून उडत उत्तर ध्रुवापाशी पोचले आणि तिकडून कॅनडा मार्गे अमेरिकेत (य़ूएसएमध्ये) दाखल झाले. परतीच्या प्रवासात मात्र आमच्या विमानाने पूर्व दिशा धरली आणि अॅटलांटिक महासागर ओलांडून ते युरोपमार्गे भारतात आले. दोन्ही मार्ग वक्रच, पण निराळे होते.  

मुंबई आणि न्यूयॉर्क यांच्या दरम्यान पृथ्वी असते, पण चंद्र तर आपल्याला आभाळात दिसतो तेंव्हा आपल्या दोघांमध्ये कसलाच अडथळा नसतो. चंद्राचा प्रकाश सरळ रेषेत आपल्याकडे येत असतो.  झाडाच्या फांदीवर लागलेल्या फळावर नेम धरून दगड मारला तर तो त्या फळाला लागतो त्याचप्रमाणे चंद्रावर नेम धरून बंदूक झाडली तर तिची गोळी सरळ रेषेत पुढे पुढे जाऊन चंद्राला लागायला हवी, पण तसे होत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ती गोळी पुन्हा जमीनीवरच येऊन पडते. एकादी वस्तू दर सेकंदाला सुमारे अकरा किलोमीटर इतक्या वेगाने आकाशात भिरकावली तर ती पुन्हा पृथ्वीवर परत येत नाही असे दोनतीनशे वर्षांपूर्वी सर आयझॅक न्यूटन यांनी प्रतिपादन केले होते. पण कोणत्याही वस्तूला एकदम इतका जास्त वेग कसा देता येऊ शकेल हे त्यालाही ठाऊक नव्हते आणि हे अजूनही शक्य झालेले नाही.

बंदुकीतून सुटणारी गोळी ही आपल्या माहितीतली सर्वात वेगवान वस्तू असते. ती प्रचंड वेगाने हवेमधून पुढे जात असतांना आपल्या डोळ्यांना दिसतसुद्धा नाही. डोक्याची कवटी किंवा छातीचा पिंजरा तोडून आत घुसण्याइतकी शक्ती (कायनेटिक एनर्जी) त्या गोळीत असते, पण असे असले तरीही तिचा वेग दर सेकंदाला सुमारे दीड किलोमीटर एवढाच असतो. यामुळे ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करू शकत नाही. शिवाय हवेबरोबर होत असलेल्या घर्षणामुळेही तिचा वेग कमी होत जातो आणि काही किलोमीटर अंतरावर जाऊन ती जमीनीवर येऊन पडते. तोफेच्या गोळ्याची अवस्थाही फारशी वेगळी नसते.

अंतराळात पाठवल्या जाणा-या अग्निबाणांच्या रचनेत त्यात अनेक कप्पे ठेवलेले असतात. या रॉकेटच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या स्टेजचा धमाका होऊन त्याला जेवढा वेग मिळेल तितक्या वेगाने ते आकाशात झेपावते. हा वेग एस्केप व्हेलॉसिटीइतका नसला तरी त्या रॉकेटला वातावरणाच्या पलीकडे नेतो. त्यानंतर काही सेकंदांतच दुस-या टप्प्याचा स्फोट होऊन त्याला अधिक वेग देतो, त्यानंतर आवश्यक असल्यास तिसरा, चौथा वगैरे टप्पे त्याचा वेग वाढवत नेतात. पण हे होत असतांना ते रॉकेट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त झालेले नसते, ते चंद्राच्या दिशेने न जाता पृथ्वीला प्रदक्षिणा करू लागते. या भ्रमणामध्ये कोणतेही इंधन खर्च करावे लागत नाही. अशा प्रदक्षिणा करत असतांना त्या यानावरले योग्य ते रॉकेट इंजिन नेमक्या क्षणी काही क्षणांसाठी चालवून त्याचा वेग वाढवला जातो. यामुळे त्याची कक्षा अधिकाधिक लंबगोलाकार (एलिप्टिकल) होत जाते. ज्या वेळी ते चंद्राच्या दिशेने पृथ्वीपासून दूर जाते आणि चंद्राच्या जवळपास जाते तेंव्हा चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाहून जास्त होते. त्या यानाला एका बाजूने पृथ्यी आणि दुस-या बाजूने चंद्र आपल्याकडे खेचत असतांना त्यात चंद्राचा जोर जास्त होताच ते यान चंद्राचा उपग्रह बनून त्याला प्रदक्षिणा घालायला लागते. त्या वेळी ते चंद्रावर पोचले असे म्हंटले जाते. एक लहानसे यान तिथून काळजीपूर्वक रीतीने चंद्रावर पाठवून उतरवले जाते. अशाच एका लहान यानात बसून नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला होता. थोडक्यात सांगायचे झाल्यास प़थ्वीवरून चंद्रापर्यंतचा प्रवास हा सरळ रेषेत होत नाही. त्या प्रवासात पृथ्वीभोवती आणि चंद्राभोवती घातलेल्या अनेक प्रदक्षिणांचा मुख्य समावेश असतो.

मंगळयानाच्या प्रवासाचा पहिला भाग चंद्रयानासारखाच होता. त्या यानानेसुद्धा जमीनीवरून उड्डाण केल्यानंतर अनेक दिवस पृथ्वीप्रदक्षिणा घातल्या. पण पुढच्या टप्प्यात मात्र त्याला लगेच मंगळ ग्रह गाठायचा नव्हता. खरे तर मंगळग्रह त्याच्या आसपास कुठेही नव्हता. स्वतःच्या सूर्यप्रदक्षिणेत तो पृथ्वीच्या खूप पुढे होता. मंगळयानाने पृथ्वीपासून दूर जाणारी अशी अधिक लंबगोलाकृती कक्षा निवडून ते सूर्याभोवती फिरू लागले. पुढल्या सुमारे एक वर्षाच्या कालावधीत पृथ्वी तिच्य़ा सूर्यभ्रमणात मंगळाच्या आणि त्या यानाच्या पुढे निघून गेली, यानाने हळूहळू पुढे जात अखेर मंगळाला गाठले आणि ते मंगळाच्या गुरुत्वाकर्षणक्षेत्रात येताच त्या ग्रहाभोवती फिरायला लागले. मंगळयानाच्या प्रवासात त्याने पृथ्वीभोवती आणि मंगळाभोवती घातलेल्या अनेक प्रदक्षिणांचा समावेश होत असला तरी त्याने सूर्याभोवती घातलेली अर्धप्रदक्षिणा हा या यात्रेचा मुख्य भाग असतो.

चंद्र हा उपग्रह पृथ्वीभोवती एका लंबगोलाकृती कक्षेत फिरत असल्यामुळे तो पृथ्वीपासून सुमारे ३८४,००० किलोमीटर अंतरावर असतो. या दोघांमधील जास्तीत जास्त आणि कमीतकमी अंतरात सुमारे ४२५०० किमी एवढाच  फरक असतो. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर सुमारे ४००,००० किलोमीटर्स असे धरले तरी यानाचा प्रत्यक्ष प्रवास याच्या कित्येक पटीने जास्त झाला आणि त्यासाठी त्याला तब्बल वीस दिवस लागले.

 मंगळ ग्रह स्वतःच एका निराळ्या कक्षेमधून निराळ्या गतीने सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असल्यामुळे पृथ्वी व मंगळ या दोन ग्रहांमधले अंतर रोज बदलत असते आणि दोघांमधले जास्तीत जास्त आणि कमीतकमी अंतरात फार मोठा फरक असतो. मंगळयानाच्या प्रवासात या दोन ग्रहांमधल्या अंतराला काहीच महत्व नसते. या यानाच्या उड्डाणाच्या वेळीही पृथ्वी मंगळापासून खूप दूर आणि मंगळाच्या मागे होती आणि ते यान मंगळावर पोचले तेंव्हाही ती खूप दूर पुढे निघून गेली होती. जेंव्हा हे दोन ग्रह एकमेकांपासून कमीतकमी अंतरावर आले होते त्या वेळी मंगळयान या दोघांपासून खूप दूरच होते.  या यानाने कोट्यवधी किलोमीटर्सचा प्रवास करून मंगळाला गाठले आणि त्यासाठी त्याला एक वर्षाचा काळ लागला. तो सारा प्रवास त्याने सूर्याभोवती फिरण्याचा होता.

Friday, November 14, 2014

स्मृती ठेवुनी जाती १२ - नाना बिवलकर

आम्ही अणुशक्तीनगरातल्या सरकारी वसाहतीत रहायला गेलो तेंव्हा आमच्या इमारतीतले साठपैकी साठ रहिवासी सायंटिस्ट किंवा इंजिनियर होते. इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या तीन चार बिल्डिंगमध्येसुद्धा तीच परिस्थिती होती. आमच्यासाठी हा नवा अनुभव होता. लहान गावातल्या संमिश्र वस्तीत सोनार, शिंपी, गवंडी, गवळी, डॉक्टर, वकील, पुजारी, भटजी वगैरे सगळ्या प्रकारचे लोक रहात असायचे आणि ते कुठे राहतात हे सगळ्या गावाला ठाऊक असायचे. ज्या माणसाकडे आपले काही काम असेल तो माणूस तिथे सहजपणे भेटत असे. पण इथे कोणाचाच पत्ता कोणालाही माहीत नव्हता. आमच्या नव्या घरासाठी सामान आणून आणि लावून झाल्यानंतर मुंबईतल्या नातेवाइकांना काही निमित्याने बोलावून आमचे घर दाखवायचे होते. त्यासाठी आणि नव्या घरात रहायची सुरुवात मंगलमय वातावरणात व्हावी म्हणून एक सत्यनारायणाची पूजा करावी असा विचार आमच्या मनात आला. पण त्यासाठी कोणकोणते सामान लागते, ते कुठे मिळते आणि ती पूजा कोण सांगणार वगैरे समजत नव्हते. आमच्या हिंदी भाषिक शेजा-यांनी एका देवळातल्या गुजराथी पूजा-याला बोलावून पूजा, होमहवन वगैरे करवून घेतले, पण ते काही आम्हाला पसंत पडले नाही. अशाच दुस-या एका देवळातल्या एका मराठी पूजा-याला बोलावून आम्ही पूजा करवून घेतली, पण आम्ही मुंबईत नवखे असल्यामुळे लुबाडायला चांगले गि-हाईक आहोत असे त्याला वाटले असावे आणि देवाधर्माच्या कामात घासाघीस करणे आम्हाला प्रशस्त वाटले नाही. पण तो अनुभव काही मनाला फारसा भावला नाही. नंतरच्या काळात ओळखी पाळखीमधून आणखी कोणाकोणाला बोलावून पूजा करायचे प्रयत्न आम्ही केले, पण आम्हाला सोयिस्कर अशा दिवशी त्यांना वेळ नसायचा आणि ते येऊ शकत असतील त्या दिवशी आम्हाला काही अडचण असायची असे दोन चार वेळा झाले. त्या काळात आमच्याकडेही फोन नव्हता आणि सेलफोनचा शोधही लागला नव्हता. त्यामुळे त्या पुरोहितांशी संपर्क साधणेही बरेच कठीण असायचे.

अशा प्रकारची आमची शोधाशोध चालली असतांनाच "एकदा आपल्या नाना बिवलकरांना विचारून पहा ना." असे कुणीतरी सांगितले. मी लगेच त्यांचा पत्ता मिळवला आणि वहीत लिहून ठेवला. त्यानंतर जेंव्हा आम्हाला पूजा करायची होती त्या वेळी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो. मी स्वतःची ओळख करून दिली, "मी घारे, आम्ही नंदादेवीमध्ये राहतो. मी पीपीईडीत नोकरीला आहे."
"हां, तुम्हाला कॉलनीत पाहिल्यासारखे वाटते आहे. मी काकोडकरांबरोबर काम करतो." नाना.
ते ऐकून मी चपापलोच. त्या काळातही श्री.अनिल काकोडकर बीएआरसीमध्ये मोठ्या पदावर होते. त्यांच्याबरोबर काम करणारे कोणी सामान्य असणार नाहीत. बिवलकर रहात होते त्या बिल्डिंगमध्येही माझ्या ओळखीतले काही इंजिनियर रहात असत, म्हणजे हे सुद्धा बहुधा ऑफीसर असणार, वयाने माझ्याहून दहा बारा वर्षे मोठे होते, म्हणजे ते चांगल्या पोस्टवर असले तर आमच्या घरी पूजा सांगायला कशाला येतील? पुढे बोलण्याला कुठून सुरुवात करावी ते मला सुचत नव्हते. नाना बिवलकरांनीच विचारले, "तुमचं माझ्याकडे काही काम होतं कां?"
"त्याचं असं आहे की आम्हाला एकदा सत्यनारायणाची पूजा करायची आहे." मी चाचपडत म्हंटले
"छान, या रविवारीच करा ना, चांगला दिवस आहे."  नानांना यातले समजत होते आणि इंटरेस्ट होता हे तर समजले.
"पूजा सांगायला येणारे कोणी तुमच्या ओळखीत आहेत का?" मी हळूच विचारणा केली.
"मी ही रविवारी मोकळाच असतो, मीच येऊ शकेन." नानांनी सांगताच माझी काळजी मिटली.
"सत्यनारायणाच्या पूजेला काय काय लागतं ते तुम्हाला माहीत आहे ना?" नानांनी विचारले.
"साधारण कल्पना आहे. तबक, कलश, ताम्हन, विड्याची पानं, सुपा-या, झालंच तर प्रसादासाठी रवा, साजुक तूप, साखर .... "  आवश्यक पदार्थांची मला आठवतील तेवढी नावे मी सांगितली.
"तुमच्याकडे चौरंग असेलच, त्याला बांधायला केळीचे खुंट, आंब्याची पानं ....बुक्का, अष्टगंध ..." नानांनी आणखी काही नावे सांगितली आणि "पूजेचं सगळं सामान चेंबुरच्या पाटलांच्या दुकानात मिळतं." ही माहितीही दिली.
"हो, आम्ही दर वर्षी त्यांच्याकडूनच गणपतीही आणतो आणि त्या उत्सवाला लागणा-या वस्तूही." मी त्यांना दुजोरा दिल्यावर ते बोलले. "जमेल तेवढं सामान तुम्ही आणालच, त्यातून एकादी गोष्ट राहिली तरी देव काही लगेच रागावत नाही."  थोडक्यात सांगायचे तर "या गोष्टींचे टेन्शन घेऊ नका." असे त्यांनी सांगितले.
ते एवढे प्रॅक्टिकल दिसत आहेत हे पाहून मला थोडा धीटपणा आला. मी त्यांना विचारले, "यातलं कोणकोणतं सामान तुम्ही आणता आणि साधारणपणे दक्षिणा वगैरे ....."
"छे छे, अहो भिक्षुकी हा काही माझा व्यवसाय नाहीय्, या निमित्यानं माझ्याकडून पुण्यकार्य घडतं, देवाची नावं जिभेवर येतात आणि आपल्या लोकांचं काम होतं म्हणून मी एकाद दुसरी पूजा घेतो." त्यांनी पहिल्या भेटीतच मला "आपलेसे" केले होते.  "दक्षिणेचं म्हणाल तर तुमची इच्छा असेल तेवढी हवी तर द्या." 
त्यानंतर पुढील वीस पंचवीस वर्षे दर वर्षी नानाच आमच्या घरी येऊन सत्यनारायणाची पूजा सांगत होते. "एवढेच कां?" असे त्यांनी कधीही बोलण्यातून किंवा देहबोलीमधून दाखवले नाही आणि "इतके कशाला?" असेही नाही. वाढती महागाई आणि माझा वाढता पगार यांचा विचार करून मी आपणहून त्यांना जेवढी दक्षिणा देत होतो तिचा ते हंसून स्वीकार करत होते आणि तोंडभर आशीर्वाद देत होते.

आमच्या घरी पुढच्या रविवारी पूजा करायची हे ठरवताच नानांनी लगेच भिंतीवरल्या कॅलेंडरमध्ये त्याची नोंद करून टाकली. त्यांचे काम किती व्यवस्थित असायचे हे त्यातून दिसत होते, पण त्या वेळी ती गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. सकाळी आठ वाजता पूजा सुरू करायची असे मोघम बोलणे झाले होते. पण तो काही मुहूर्त नव्हता. त्यामुळे आठ म्हणजे साडेआठ नऊ होणार अशी माझी कल्पना होती. पण रविवारी सकाळी आठ वाजायलाही अजून पंधरा वीस मिनिटे शिल्लक असतांनाच नाना आमच्या घरी येऊन हजर झाले.
"पूजेची तयारी कुठपर्यंत आली?" त्यांनी हंसत हंसत विचारले. आमची तयारी सुरूही झालेली नव्हती हे दिसतच होते. पण त्यांनी तसे दाखवून दिले नाही.
"पूजा कुठे मांडायची ठरवली आहे?" नानांनी पुढला प्रश्न केला. आम्ही हॉलमधला एक भाग रिकामा करून ठेवला होता. तो त्यांना दाखवून त्यांनाच विचारले, "इथे केली तर ठीक राहील ना?"
त्यांनी पूर्व पश्चिम दिशा पाहून घेतल्या आणि देवाचे तोंड कोणत्या दिशेला होईल? त्याच्या समोर आम्ही बसणार आणि बाजूला बसतांना त्यांचे तोंड कोणत्या दिशेला होईल? वगैरे विचार करून सगळ्यांच्या जागा ठरवल्या आणि सांगितले, "सगळे सामान इथे आणून ठेवा आणि तुम्ही दोघे तयार होऊन या."

आम्ही बाजारातून आणलेल्या सगळ्या सामानाच्या पिशव्या तिथेच ठेवलेल्या होत्या, घरातली भांडीही आणून त्यांना दिली. त्यांनी चौरंगाला भिंतीशी समांतर ठेवले, त्याच्या चारी खांबांना केळीचे खुंट बांधले, लाल कापडाची व्यवस्थित चौकोनी घडी करून ती चौरंगावर पसरवून चौरंगाला झाकले. त्या कापडावर मूठभर तांदूळ ठेऊन ते वर्तुळाकारात पसरवले. त्याच्या मधोमध कलशाला ठेऊन त्यावर एक ताम्हन ठेवले आणि त्यात तांदूळ भरले. बाळकृष्णाला ठेवण्यासाठी मधोमध थोडी मोकळी जागा सोडून आठ दिशांना अष्टवसू आणि नवग्रह यांच्या नावाने सुपा-या मांडून ठेवल्या. चौरंगावर ओळीने विड्याची पाने मांडून त्यावर नारळ, सुपारी, बदाम, खारीक, गूळखोबरे वगैरे पदार्थ अनुक्रमाने ठेवले. एका बाजूला समई उभी केली.  फुले, दुर्वा, तुळशीची पाने वगैरे एका तबकात आणि गंध, अक्षता, हळद, कुंकू, नाना परिमलद्रव्ये, कापूर, ऊदबत्त्या, निरांजने वगैरे दुस-या तबकात व्यवस्थितपणे मांडून ठेवली. आम्ही तयार होऊन येईपर्यंत नानांनी सगळी जय्यत तयारी करून ठेवली होती.

पूजेची सगळी तयारी करून देऊन ते आतल्या खोलीत गेले आणि शर्ट पँट उतरवून मुकटा नेसून बाहेर आले आणि आम्ही पूजेला बसलो. सुरुवातीपासूनच यातल्या निरनिराल्या विधीमधली एक एक क्रिया करतांना नाना त्या क्रियेचे महत्व आम्हाला थोडक्यात सांगत होते. देवाची पूजा सुरू करायच्या आधी समईची पूजा करून तिच्या वाती पेटवून उजेड करायचा, भूमीला वंदन करायचे, कलशाची पूजा करून त्यात पाणी भरायचे, शंख, घंटा वगैरेंची पूजा करायची वगैरे वगैरे करण्यामागे हा हेतू असतो की या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्या सुस्थितीत आहेत हे निश्चित करून घेतले जाते. एकादा प्रयोग सुरू करायच्या आधी त्यासाठी लागणारी सर्व सामुग्री आणि उपकरणे उपलब्ध आहेत हे पाहून ती तपासून घेतली जातात तसेच हे असते हे माझ्या लक्षात आले. पूजेच्या सुरुवातीला एक संकल्प सोडायचा असतो. त्यावेळी या पूजेचे प्रयोजन काय आहे हे सांगायचे असते. प्रयोगासाठीसुद्धा ऑब्जेक्टिव्ह असावे लागतेच. पूजा करणा-या व्यक्तीचे नाव, त्याच्या वडिलांचे आणि कुळाचे नाव आणि गोत्र सांगून हा कार्यक्रम अमूक वारी आणि तिथीला, तमूक नक्षत्रात चंद्र असतांना, अमक्या तमक्या राशींमध्ये सूर्य, मंगळ, गुरू वगैरे इतर ग्रह असतांना आणि भारतातल्या अमक्या स्थळी केला जात आहे याचा उच्चार केला जातो. हे म्हणजे एकादे लीगल अॅग्रीमेंट करतांना सुरुवातीलाच ते करणा-या पार्टींची नावे, हुद्दे, अॅग्रीमेंटची तारीख, ते करण्याचे ठिकाण वगैरे लिहितात तसे असते. यापूर्वी मी कधी याबद्दल विचार केला नव्हता किंवा मला त्यासंबंधीच्या मंत्रांमधले शब्दच समजले नसल्यामुळे गुरूजींनी सांगितले की "मम" म्हणायचे एवढेच माहीत होते. नाना बिवलकर मात्र सर्व मंत्रामधल्या प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करून ते सावकाशपणे म्हणत असल्यामुळे ऐकू येत होते आणि अधून मधून त्यातला सारांश सांगतही मला असल्यामुळे ते समजत होते आणि त्यात मजा येत होती.

त्यानंतर आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा करायची असली तर नानांना आधी विचारून ती ठरवत होतो आणि पूजा सांगायला नाना नेहमी येतच होते. त्याशिवायही इतर कारणांनीही आमच्या भेटी होत होत्या, माझे एक हरहुन्नरी मित्र आल्हाद आपटे यांच्या पुढाकारातून एक लहानसा संगीतप्रेमी ग्रुप जमला होता. बहुतेक वेळी आपट्यांच्या घरी किंवा काही वेळा आणखी कोणाच्या घरी जमून आम्ही गाण्याचे कार्यक्रम करत होतो. नानांचा मुलगा विवेक सर्वांना तबल्यावर साथ करायचा. बहुतेक वेळा नानाही गाणी ऐकायला येऊन बसत असत. ते आमच्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते, पण सर्वांमध्ये सहजपणे मिसळत असत. अभंग, भजन वगैरें गाण्यांवर झांजा वाजवून ताल धरत असत. एकदा आम्ही त्यांनाही गायचा आग्रह केला. त्यांनी इतके छान गाणे म्हंटले की मग सगळ्याच बैठकांमध्ये तेही भाग घ्यायला लागले. त्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला होता का ते माहीत नाही, पण "घनघनमाला कधी दाटल्या" यासारखे रागदारीवर आधारलेले गाणे ते दणक्यात गायचे, "पाउले चालती पंढरीची वाट" आणि त्याच चालीवरचे "कानाने बहिरा मुका परी नाही" अशी अनेक गाणी त्यांनी व्यवस्थित सादर केली. हळूहळू आमचे आपसातले संबंध वाढत गेले, एकमेकांच्या घरी जाणेयेणे सुरू झाले.

बीएआरसीच्या नोकरीत असतांना ते अॅडमिनमध्ये होते. एलडीसी, यूडीसी, एसजीसी, पीए वगैरे टप्प्यांमधून ते हळूहळू वर सरकत होते. ऑफिसमधला त्यांचा नेमका हुद्दा मी त्यांना कधी विचारलाही नाही आणि त्यांनीहून तो सांगितलाही नाही. माझ्या ऑफीसच्या कामामध्येही मला कधी त्यांना भेटायला जावे लागले नाही किंवा ते माझ्याकडे आले नाहीत. आमचे संबंध पूर्णपणे पर्सनलच राहिले. पण घरी किंवा कॉलनीमध्ये त्यांना भेटणारे सगळे लोक त्यांना चांगला मान देत होते हे मी पहात होतो. तो त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सर्वांशी करत असलेल्या चांगल्या वागणुकीतून त्यांच्या व्यक्तीमत्वाला मिळत असावा.

नाना रिटायर व्हायच्या आधीच विवेक बीएआरसीत नोकरीला लागला होता. त्यालाही कॉलनीमध्ये जागा मिळाली आणि नानांचे कुटुंब कॉलनीतच राहिले. त्यांनी तळेगावला एक घर घेऊन ठेवले होते, पण ते तिथे जास्त दिवस रहात नसत, अधून मधून तिकडे रहायला गेले तरी काही ना काही कारणाकारणाने ते अणुशक्तीनगरला येत असत आणि बरेच दिवस रहात असत. यामुळे आम्हाला ते भेटतच राहिले आणि पूजेलाही येत राहिले. पुढे माझ्या सेवानिवृत्तीनंतर मीच कॉलनी सोडली. त्यानंतरसुद्धा एक दोन वेळा ते पूजा सांगायला वाशीलासुद्धा आले होते, पण सत्तरी उलटून गेल्यानंतर त्यांना इतक्या दूर यायला सांगणे बरे वाटत नव्हते. वयोमानानुसार अंगातली शक्ती कमी झाल्याने त्यांना ते जमलेही नसते. एक दोन वेळा आम्ही अणुशक्तीनगरला गेलो असतांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आलो. पुढे आम्हालाही अधिक फिरणे जमेनासे झाले. त्यामुळे आमच्यातला संपर्क संपुष्टात आला.

दोन महिन्यांपूर्वी माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेली होती. मला तिथे कोचावर बसलेले पाहून विवेक माझ्याजवळ आला. त्याच्याशी बोलतांना कळले की नाना खूप आजारी आहेत आणि त्यांना पुरुषांच्या वॉर्डात ठेवले आहे. व्हिजिटर्सची वेळ पाहून मी त्यांना पहायला त्या वॉर्डमध्ये गेलो. त्या वेळी मात्र नानांकडे पहावले जात नव्हते. त्यांना स्वतःहून उठता बसताही येत नव्हते, दोन माणसे त्यांना धरून त्यांची कुशी वळवत होते. अर्धवट मिटलेल्या त्यांच्या डोळ्यांत कसलीच चमक दिसत नव्हती. मी तिथे आलेलो त्यांना दिसले तरी की नाही, दिसले असले तरी त्यांनी मला ओळखले की नाही हेच समजत नव्हते. ते एक अक्षरही बोलत नव्हते की त्यांच्या चेहे-यावर कोणते भाव उमटत होते. ते कितपत शुद्धीवर होते याबद्दल शंका वाटत होती. माझ्या आठवणीतला त्यांचा ओळखीचा हसरा उत्साही चेहेरा डोळ्यासमोर आला आणि सगळेच अंधुक होत गेले. त्यानंतरही मला दोन तीन दिवस त्या हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते पण नानांना पहायला पुन्हा त्यांच्या वॉर्डात जायचा मला धीर झाला नाही. काही दिवसांनी कळले की ते आता राहिले नाहीत. मी ज्यांना अनेक वेळा वाकून नमस्कार केला होता आणि ज्यांनी मला आशीर्वाद दिले होते अशा माणसांमध्ये नानांची गणती होत होती. आता राहिल्या आहेत त्या त्यांच्या अनेक स्मृती.

Monday, November 10, 2014

स्व.बाबूजी, स्व.गदिमा आणि संदीप व सलिल

                                         (ही छायाचित्रे आंतर्जालावरून साभार घेतली आहेत.)

मी लहान होतो त्या काळात म्हणजे एकोणीसशे पन्नाशीच्या दशकात टेप रेकॉर्डर, सीडी प्लेयर, इंटरनेट, यू ट्यूब असले काही नव्हते. क्वचित कोणाकडे स्प्रिंगचा फोनोग्रॅम असला तरी त्याचे हँडल फिरवून चावी भरणे, सुई बदलत राहणे, रेकॉर्ड्सचे झिजणे, त्यावर चरे पडून ती बाद होणे वगैरे कटकटींमुळे तो फोनो फक्त खास प्रसंगीच आणि जरा जपून वाजवला जात असे. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्याला हवे ते गाणे ऐकण्याची सोय त्या काळात नव्हती. व्हॉल्ह्व्जवर चालणारा आणि एकाद्या खोक्यासारखा बोजड दिसणारा रेडिओ काही लोकांच्या घरी असायचा, विजेची कृपा असली आणि वातावरण अनुकूल असले तर कधी कधी त्यातून काही गाणी ऐकायला मिळत असत. काही शौकीन लोक त्यांची आवडती चित्रपटगीते ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा थेटरात जाऊन ते सिनेमे पहात आणि त्यातली गाणी पाठ करून स्वतःशी गुणगुणत असत. काही उत्साही आणि कलाकार मंडळी स्वतः ती गाणी ऐकून आणि शिकून इतर मुलामुलींना शिकवत असत आणि त्यांच्याक़डून ती घरगुती व शाळेतल्या कार्यक्रमांमध्ये इतर लोकांना ऐकवली जात. त्या टीव्हीपूर्व जमान्यात असे मनोरंजक कार्यक्रम वरचेवर होत असत. अशा काही प्रकारांनी त्या काळातले सुगमसंगीत लोकांपर्यंत पोचत असे. पुढे सेमिकंडक्टर्सवर आधारित ट्रान्जिस्टर रेडिओ आणि कॅसेट टेपरेकॉर्डर आल्यावर घरबसल्या हवी ती गाणी ऐकण्याची सोय झाली आणि हळूहळू हे चित्र बदलत गेले. त्या जुन्या कालखंडात मी पहिल्यांदा ऐकलेली गोड गाणी थोडे प्रयत्न करून ऐकली होती. कदाचित त्यामुळे ती अंतर्मनात जरा जास्तच रुतून बसली होती आणि मला त्या गाण्यांचे गीतकार, संगीतकार व गायक गायिका यांच्याबद्दल वाटणारा आदर ऐकीव गोष्टींमधून किंवा वाचनातून न येता त्या काळात जगतांना आलेल्या प्रत्यक्ष अनुभूतीमधून निर्माण झाला होता.

त्या काळात ओव्या, अभंग, आरत्या, हदग्याची गाणी वगैरे भक्ती किंवा लोकसंगीत आपोआप आमच्या कानावर पडत असे. लहान गावातल्या लोकांना शास्त्रीय संगीत ऐकण्याची संधीच मिळत नसल्यामुळे त्या बाबतीत आम्ही पूर्णपणे अनभिज्ञ होतो. पुणे, मुंबई किंवा मिरज, धारवाड यासारख्या शहरांमध्ये काही दिवस राहून आलेले काही लोक थोडे फार शास्त्रीय संगीत ऐकून आलेले असत. "केवळ रागदारीतले आ..ऊ... म्हणजेच खरे संगीत, इतर सगळे टाकाऊ" असले काही तरी ठामपणे सांगून लतादीदी आशाताई यासारख्या आमच्या आवडत्या गायिकांबद्दल अनुदार उद्गार काढणारे हे लोकच आम्हाला शिष्ट किंवा चक्रम वाटायचे. यामुळे त्यांच्यापासून आणि शास्त्रीय संगीतापासून मी बरीच वर्षे चार हात दूर राहिलो होतो. मराठी भावगीते, चित्रपटगीते आणि हिंदी सिनेमांमधली गाणीच मी आवडीने ऐकत होतो. त्यासाठी थोडी हालचाल करावी लागली तर ती करत होतो.

एकोणीसशे पन्नाशी, साठीच्या काळात मराठी सुगम संगीताला चांगले दिवस आले होते. त्या काळातले अनेक गुणी आणि प्रतिभासंपन्न गीतकार, संगीतकार आणि गायक गायिका ही मंडळी त्यांच्या नवनव्या रचना रसिकांपुढे आणत होती. रेडिओवर लागलेल्या प्रत्येक गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायक वा गायिका यांची नावे दर वेळी स्पष्टपणे सांगितली जात असत. संगीतकार किंवा गायक म्हणून स्व. सुधीर फडके म्हणजे बाबूजी आणि गीतकार म्हणून स्व.ग.दि.माडगूळकर (गदिमा) यांची नावे त्यातून नेहमी कानावर पडत असत. या दोघांनी एकत्र येऊन तयार केलेली चित्रपटगीते तेंव्हा खूप लोकप्रिय झाली होती, स्व.राजा परांजपे यांच्या चित्रपटांमधली गाणी तर विशेष गाजली होती. बहुधा या त्रयींचे काही अजब रसायन त्या कालात जमले होते. स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांनी आकाशवाणीसाठी तयार केलेले गीतरामायण हा तर संगीताच्या क्षेत्रातला एक चमत्कार म्हणता येईल. त्या काळातल्या लोकप्रिय गीतकारांमध्ये पी.सावळाराम, राजा बढे, शांताबाई शेळके, वंदना विटणकर, जगदीश खेबुडकर आदि अनेक आदरणीय नावे होती. कवीवर्य कुसुमाग्रज, वसंत बापट, इंदिरा संत आदीं प्रसिद्ध कवींच्या काही निवडक काव्यांना संगीतबद्ध करून त्यांचे प्रसारण केले गेले होते, या बाबतीत मंगेश पाडगावकरांचे नाव सर्वात पुढे होते. संतवाङ्मयातले अभंग आणि बहिणाबाई चौधरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, भा.रा.तांबे यांच्यासारख्या श्रेष्ठ कवींच्या काही उत्कृष्ट कविता नव्या आकर्षक चालींमधून सादर केल्या गेल्या होत्या. बाबूजींच्या काळातच वसंत प्रभू, दत्ता डावजेकर, पु.ल.देशपांडे, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर इत्यादि संगीतकारांनीसुद्धा एकाहून एक सरस गाणी दिली होती. अशा प्रकारे मराठी सुगमसंगीताचे विश्व समृद्ध होत असले तरी त्याच काळातल्या हिंदी सिनेमांमधल्या गाण्यांची मनाला जास्त भुरळ पडत होती. नौशाद, शंकर जयकिशन, सचिनदेव बर्मन, सलिल चौधरी, कल्याणजी आनंदजी, मदनमोहन, ओ पी. नय्यर वगैरे संगीत दिग्दर्शकांनी मराठी भाषिक लोकांच्या मनाचासुद्धा जास्तच ताबा घेतला होता.

ज्याप्रमाणे वस्तूंची लांबी, रुंदी, उंची, खोली, वजन यासारख्या रुक्ष आकडेवारीने मोजमापे काढून त्यांची तुलना करता येते, तसे कलेच्या क्षेत्रात करता येत नाही. ऐकलेले कोणते गाणे कानाला जास्त गोड वाटेल, मनाला अधिक स्पर्श करेल, दीर्घ काळ आठवणीत राहील या गोष्टी व्यक्तीसापेक्ष असतात. ज्या ज्या गीतकारांची आणि संगीतकारांची गाणी लोकांना खूप आवडली आणि दीर्घकाळ लक्षात राहिली, ज्यांना सर्वांनी मनापासून दाद दिली गेली, ती सगळीच मंडळी माझ्या दृष्टीने महान आणि आदरणीय राहिली. त्यात स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांची नावे ठळकपणे येतात. या लेखाच्या शीर्षकात फक्त तीच घेतली आहेत याला एक तात्कालिक कारण झाले. ते म्हणजे "संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांची सध्याची लोकप्रिय जोडी ही स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांच्या जोडीसारखी आहे." असे विधान अलीकडे कुणीतरी कुठे तरी केले आणि त्यावर एक लहानसे वादळ उठले. आजकाल दोन सख्ख्या भावांना कुणी "रामलक्ष्मणाची जोडी" म्हंटले, किंवा अनुरूप पतीपत्नींना "लक्ष्मीनारायणाचा जोडा" म्हंटले तरीसुद्धा काही लोकांच्या नाजुक भावना दुखवल्या जाण्याची शक्यता आहे.

समकालीन कलाकारांचीसुद्धा तुलना करता येत नाही हे मी वर लिहिले आहेच. निरनिराळ्या कालखंडातल्या लोकांची तुलना करणे तर माझ्या मते अप्रस्तुत आहे. गेल्या चार पाच दशकांहून जास्त काळात सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. सामाजिक परिस्थिती, कुटुंब व्यवस्था, राहणीमान यामधील बदलांचे परिणाम माणसामाणसांमधल्या नात्यांवर झाले आहेत. इतर भाषांमधले साहित्यप्रवाह आता अधिक ओळखीचे झाले आहेत. यामुळे पूर्वीचे ज्वलंत विषय मागे पडले आहेत, नव्या समस्यांमधून नवे विषय समोर उभे ठाकले आहेत. या सर्वांचा प्रभाव साहित्यावर आणि काव्यरचनांवर होणारच. या दरम्यानच्या काळात संगीताच्या क्षेत्रामध्येसुद्धा नवनवे प्रयोग केले गेले, अनेक प्रकारचे नवे वारे इतर भाषांमधल्या किंवा परदेशातल्या संगीतातून इकडे आले. पूर्वीची वाद्ये मागे पडून नवी वाद्ये आली, आधुनिक तंत्रज्ञानातून कृत्रिम ध्वनि निर्माण करणे शक्य झाले. ध्वनिमुद्रणाच्या तंत्रात अचाट प्रगती झाली. नव्या संगीतकारांनी यांचा उपयोग करून घेतला पाहिजेच. ते लोक तसा घेतही आहेत. माझ्या लहानपणी सर्वसामान्य लोकांना गाणे ऐकण्याच्या संधी किती कमी होत्या हे मी सुरुवातीलाच लिहिले आहे. त्यामुळे त्या काळातल्या श्रोत्यांनी सुद्धा फक्त तेंव्हा प्रचलित असलेली गाणीच ऐकलेली असायची. आजकाल आपण सव्वाशे वर्षांपूर्वीच्या "पंचतुंड नररुंडमाळधर" पासून ते अलीकडच्या "टिकटिक वाजते डोक्यात" पर्यंत सगळ्या प्रकारची गाणी सहजपणे ऐकू शकतो. यामुळे श्रोत्यांची बहुश्रुतता वाढली आहे. त्यांच्या अपेक्षाही त्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यांच्या आवडी बदलल्या आहेत.

याचा विचार केला तर संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांच्या आजकालच्या गाण्यांची तुलना जुन्या काळातल्या प्रसिद्ध गाण्यांशी करण्यात काही अर्थ नाही हे लक्षात येईल. शिवाय आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. स्व.गदिमा आणि स्व.बाबूजींनी प्रत्येकी हजारावर गाणी रचली असतील, दोघांनी मिळूनही शेकड्यांमध्ये गाणी केली असतील. त्यातली सर्वोत्तम अशी काही मोजकी गाणीच आपल्याला आज ऐकायला मिळतात, पूर्वीच्या काळात सुद्धा फारशी न चाललेली त्यांची बाकीची सगळी गाणी काळाच्या उदरात लुप्त झाली आहेत. याच्या उलट नव्या गीत आणि संगीतकारांची सरसकट सगळी गाणी आपल्यासमोर येत असतात, त्यात बरी वाईट, उत्तम, मध्यम, सुमार वगैरे सगळी असतात. यातली किती गाणी पुढच्या पिढीपर्यंत म्हणजे निदान वीस पंचवीस वर्षांनंतर शिल्लक राहतील हे काळच ठरवेल.

जुन्या आणि नव्या गीतसंगीतकारांच्या रचनांची तुलना करता येणार नाही, पण त्या रचना लोकांपर्यंत पोचवण्यात त्यांना किती यश आले आणि त्यांना श्रोत्यांचा किती प्रतिसाद मिळाला किंवा मिळत आहे हे कदाचित पाहता येईल. यातसुद्धा काळानुसार फरक पडला आहेच. आज प्रचार आणि प्रसाराची साधने वाढली आहेत, दळणवळण सोपे झाले आहे, लोकांची आर्थिक स्थिती सुधारली आहे, या सगळ्यामुळे जास्त लोकांना संगीताचे कार्यक्रम पाहणे शक्य झाले आहे. याच्या उलट टेलिव्हिजन आणि इंटरनेटसारखी घरबसल्या मनोरंजन करून घेण्याची सुलभ साधने उपलब्ध झाल्यामुळे मुद्दाम उठून कार्यक्रमासाठी बाहेर जाण्याची गरजही आता वाटेनाशी झाली आहे. तसेच रोजचे जीवन जास्तच धकाधकीचे झाल्यामुळे कार्यक्रम पहायला वेळ मिळणे कठीण झाले आहे. यामुळे थेटरे रिकामी पडायला लागली आहेत. तरीसुद्धा संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी ही माझ्या माहितीतली तरी सध्याची एकमेव जोडी आपले कविता वाचन आणि गायनाचे कार्यक्रम मोठ्या सभागृहांमध्ये करण्यात यशस्वी होत आहे.

स्व.ग.दि.माडगूळकर गीतरचनांबरोबर कथा, पटकथा, संवादही लिहीत होते आणि चित्रपटांमध्ये भूमिकाही करत असत आणि स्व.सुधीर फडकेही त्यांच्या कामामध्ये खूप गढलेले असायचे. त्या दोघांनी जोडीने गावोगावच्या सभागृहांमध्ये जाऊन कविता वाचन आणि गायनाचे कार्यक्रम सादर केल्याचे कधी माझ्या ऐकण्यात आलेले मला तरी आठवत नाही. अशा प्रकारचा कार्यक्रम मी कधीही पाहिला नव्हता. या दोघा दिगिगजांनी एकत्र येऊन जितकी गाणी दिली असतील त्याहून किती तरी जास्त गाणी निरनिराळ्या गीतकारांबरोबर किंवा संगीतकारांबरोबर दिली असतील. त्यांना मुख्यतः प्रसारमाध्यमांमधून लोकप्रियता मिळाली होती. आजच्या टेलिव्हिजन या मुख्य प्रसारमाध्यमामध्ये संगीतालाच गौण स्थान दिले जाते. यामुळे निरनिराळ्या काळातल्या या दोन जोड्यांची कसलीच तुलना करता येणार नाही. शिवाय स्व.बाबूजी आणि स्व.गदिमा यांची जोडी कालांतराने फुटली, संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी अजून एकत्र आहेत हे ही महत्वाचे आहे.

संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी ही जोडी जे कार्यक्रम सादर करते त्यातली "दूरदेशी गेला बाबा" यासारखी गाणी ऐकतांना बहुसंख्य श्रोत्यांच्या पापण्या पाणावतात आणि "अग्गोबाई ढग्गोबाई" यासारख्या गाण्यांच्या तालावर सगळी बच्चे कंपनी उत्स्फूर्तपणे नाचू लागतात. श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करणे, त्यांच्या डोळ्यात पाणी किंवा ओठावर एकादी तरी स्मितरेषा आणणे हे सोपे नसते. पण या नव्या गीतकार आणि संगीतकारांना ते जमले आहे. त्यांच्याबद्दल काही तज्ज्ञ लोकांनी तुच्छ मते व्यक्त केली आहेत. पण सभागृहांमध्ये जाऊन त्यांचे कार्यक्रम पाहणारे (आणि ऐकणारे), त्यांच्या ध्वनिमुद्रित सीडी, डीव्हीडी वगैरे विकत घेऊन ऐकणारे किंवा यू ट्यूबवर पाहणारे सर्वसामान्य लोक वेगळा विचार करतात आणि त्यांची संख्या मोठी आहे. ही जोडी आणखी प्रगती करू दे, उत्तमोत्तम गाणी रचून रसिकांना ऐकवू दे अशी आशा बाळगायला काय हरकत आहे?
    

Saturday, October 18, 2014

निवडणुका - भाग १ ते ६

निवडणुका भाग १ 

स्वतंत्र भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५१-५२ साली झाली तेंव्हा मी फारच लहान होतो, मला त्याबद्दल काहीच आठवत नाही. त्यानंतर १९५७ साली झालेली दुसरी निवडणूक मला अंधुकशी आठवते. त्या काळात फ्लेक्सचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे गावात जागोजागी आतासारखी मोठमोठी रंगीबेरंगी पोस्टर्स लावली जात नव्हती. स्थानिक पेंटरने रंगवलेले लहान लहान फलक गावातल्या काही मोक्याच्या जागी लावले होते. बैलजोडीचे चित्र काढलेले पोस्टर एका त्रिकोणी ए फ्रेम्सच्या दोन्ही बाजूंना लावून त्यांना खाली एका लहानशा हातगाडीसारखी दोन चाके बसवली होती. अशा काही गाड्या वाजतगाजत गावामध्ये फिरवल्या जात होत्या. त्या काळात सिनेमाच्या जाहिरातीही अशाच गाड्यांवरून केल्या जात असत. दहा बारा बैलजोड्यांना सजवून एका रांगेत चालवत त्यांची एक मोठी मिरवणूक रस्त्यावरून जात असतांना मी एकदा पाहिली होती. त्यांच्यासोबत अनेक खादीधारी कार्यकर्ते बेंबीच्या देठापासून जोर लावून घोषणा देत चालत होते. त्यांच्या मागे एका सजवलेल्या बैलगाडीत उभे राहिलेले स्व.बसप्पा दानप्पा जत्ती म्हणजे आमचे जत्तीमंत्री रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सर्व लोकांना विनम्र अभिवादन करत होते.

या सद्गृहस्थाला लहानपणी जवळून पाहतांना मला ते जसे दिसले होते, त्यांचे जे इम्प्रेशन माझ्या बालमनावर उमटलेले होते ते अखेरपर्यंत जवळजवळ तसेच राहिले. त्या काळात ते तेंव्हाच्या मुंबई राज्यात स्व.मोरारजी देसाई यांच्या हाताखाली कसलेसे उपमंत्री होते. यामुळे गावातले लोक त्यांना जत्तीमंत्री याच नावाने ओळखत असत. पुढे राज्यपुनर्रचना झाली आणि आमचा भाग मैसूर राज्यात (आजच्या कर्नाटकात) गेला. तिथे निजलिंगप्पा आणि हनुमंतय्या नावाचे दोन हुम्म गडी सुंदउपसुंदांसारखे एकमेकांशी झुंजत होते. त्यावर तोडगा म्हणून आमच्या अजातशत्रू, मृदूभाषी आणि सौम्य सोज्ज्वळ वृत्तीच्या जत्तींच्या गळ्यात एकदम मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्यात आली. पुढे निजलिंगप्पांची सरशी झाल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि जत्तींनी त्यांच्या मंत्रीमंडळात वेगवेगळी खाती सांभाळली. तिथून उचलून त्यांना एकदम भारताचे उपराष्ट्रपती बनवले गेले आणि राष्ट्रपतींचे अचानक निधन झाल्यानंतर काही काळ ते हंगामी राष्ट्रपतीही झाले. या काळात मी त्यांना अनेक वेळा दूरदर्शनवर पाहिले. त्यात दर वेळी मला त्यांच्या चेहे-यावर तसेच भाव दिसले आणि बोलण्याचालण्यातून तसेच देहबोलीमधून माझ्या ओळखीचे तेच व्यक्तीमत्व प्रगट झाले.

पंडित नेहरूजींच्या काळात काँग्रेस हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष होता. आपल्या देशात समाजवादी, प्रजासमाजवादी, साम्यवादी, जनसंघ, स्वतंत्र वगैरे आणखीही काही पक्ष आहेत आणि मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता यासारख्या शहरांमध्ये त्यांचा थोडाफार जोर आहे असे मोठ्या लोकांच्या बोलण्यामधून कानावर पडत होते. त्या काळात घरोघरी वर्तमानपत्रे घेतली जात नसत. गावातल्या सार्वजनिक वाचनालयातल्या मोठमोठ्या लाकडी स्टँड्सवर निरनिराळी वर्तमानपत्रे स्क्रूने अडकवून ठेवलेली असायची. माझी उंची तिथपर्यंत वाढल्यानंतर निव्ळ कुतूहल म्हणून मीही अधून मधून त्यात डोके खुपसून पाहून येत असे. त्यामुळे कॉ.डांगे, काँ.गणदिवे, ना.ग.गोरे, मधू लिमये, राजगोपालाचारी, अटलबिहारी वाजपेयी अशी काही नावे अधून मधून नजरेखालून जात होती. पण आमच्या गावात मात्र दुस-या कोणत्याही पक्षाचे अगदी नाममात्र अस्तित्वही नव्हते. निवडणुकीतल्या उमेदवाराचे नाव किंवा चेहरासुद्धा ओळखीचा नसला तरी सगळ्यांचे शिक्के बैलजोडीच्या चिन्हावर मारले जात असत. त्या काळात एकाद्या बुजगावण्याला गांधी टोपी घालून उभे केले असते तरी तोसुद्धा सहज निवडून आला असता अशीच परिस्थिती होती. आमचे जत्तीमंत्री तर चांगले सुशिक्षित, सुसंस्कृत आणि हुषार दिसायचे, ते निवडून न येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या विरोधात कुठला कोण माणूस उभा होता त्याच्याबद्दल एक अक्षरसुद्धा कधी माझ्या कानावर पडलेले आठवत नाही. त्या काळात लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जायच्या. आमचा भाग लोकसभेच्या कोणत्या मतदारसंघात येतो आणि तिथे बैलजोडीच्या चिन्हावर कोणता पाटील की गौडा उभा होता हे ही आता आठवत नाही. तो गृहस्थ आमच्या गावातला नक्कीच नव्हता आणि त्याच्याबद्दल माहिती समजून घेण्यात कोणालाही मुळीसुद्धा रसही नव्हता. यामुळे त्या निवडणुकीच्या निकालाबद्दल गावातल्या कोणालाही कसलीच उत्सुकता नव्हती. आमचे जत्तीमंत्री ठरल्याप्रमाणे निवडून आले आणि मुंबईला जाऊन पुन्हा मंत्रीपदावर विराजमान झाले. खरे सांगायचे तर त्या काळात ते मुंबईमध्येच वास्तव्याला होते, प्रचाराच्या निमित्याने एक दोनदा गावाकडे येऊन गेले असतील. 

........... (क्रमशः)

--------------------------------------------------------


निवडणुका - भाग २


मी कॉलेजच्या हॉस्टेलवर रहायला गेल्यानंतर रोज तिथल्या मेसमध्ये सगळी वर्तमानपत्रे वाचायला मिळायची. ठळक मथळे, बातम्या, लेख, अग्रलेख वगैरे वाचता वाचता माझा देशाच्या राजकारणातला इंटरेस्ट वाढत गेला. त्या काळात अनेक घटनाही घडून आल्या. १९६२ सालच्या निवडणुका झाल्या त्या काळात मी मुंबईत होतो. त्यामुळे सगळ्या पक्षांमधल्या मोठ्या पुढा-यांची भाषणे वाचायला आणि काहीजणांची भाषणे ऐकायला मिळाली. त्या निवडणुकीतली ईशान्य मुंबईमधली लढत खूप गाजली होती. काँग्रेसचे उमेदवार तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही.के.कृष्णमेनन आणि विरोधी पक्षांनी एकजूट करून प्रजासमाजवादी पक्षातर्फे रणांगणात उतरवलेले वयोवृद्ध ज्येष्ठ नेते आचार्य जे.बी.कृपलानी यांच्यात अटीतटीचा सामना झाला. तसे पाहता हे दोघेही बाहेरून आलेले उमेदवार होते, यातला कोणीच स्थानिक नव्हता. पण इथले सर्वसामान्य लोकसुद्धा या किंवा त्या उमेदवाराची बाजू घेऊन एकमेकांशी वादविवाद करतांना दिसत होते. प्रत्यक्ष मतदानात मात्र मेनन यांना घवघवीत यश मिळाले. आधी होऊन गेलेल्या तीन निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही पं.नेहरूंच्या अधिपत्याखाली काँग्रेसने चांगला दणदणित विजय मिळवला आणि ते पंतप्रधानपदी विराजमान झाले.

पण त्या वर्षाअखेरीला चीनने केलेल्या आक्रमणाने पं.नेहरूंना तोंडघशी पाडले. त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. काँग्रेसची प्रतिमा सुधारण्याच्या उद्देशाने पंडितजींनी कामराज योजनेच्या नावाने अनेक वयोवृद्ध नेत्यांना मंत्रीपदावरून हटवले. पण ते स्वतःच पुढे जास्त काळ राहिले नाहीत. त्यांच्या निधनानंतर लालबहादुर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांनी अल्पावधीतच आपली चांगली छाप पाडली, पण दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्या काळच्या सर्व ज्येष्ठ पुढा-यांना वगळून श्रीमती इंदिरा गांधींना पंतप्रधान करण्यात आले. या दोन्ही घटनांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कामराज यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. इंदिरा गांधींनी नव्या दमाचा आपला खास गट स्थापन केला आणि जुन्या नेत्यांना न जुमानता सत्तेची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यांना गूँगी गुडिया समजणारे जुने पुढारी यामुळे नाराज झाले. या पार्श्वभूमीवर झालेली १९६७ ची निवडणूक थोडी चुरशीची झाली आणि इंदिराजींनी ती जेमतेम जिंकली. त्यानंतर त्यांनी जी अनेक पावले उचलली त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धानंतर ती शिगेला पोचली. त्यानंतर १९७२ मध्ये झालेल्या निवडणुका त्यांनी सहजपणे जिंकल्या. माझ्यासकट सगळ्या तरुण वर्गाला या कालावधीत इंदिराजींबद्दल खूप आदर वाटत होता.

पण विरोधी पक्षांची ताकतही वाढली होती. भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी एक आंदोलन सुरू केले गेले. निर्विवाद निष्कलंक चारित्र्य असलेले ज्येष्ठ समाजवादी नेते बाबू जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली चाललेले हे जन आंदोलन हाताबाहेर जात आहे असे दिसताच पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी पुकारली आणि एक दमनयंत्र सुरू झाले. सर्व प्रमुख विरोधी नेत्यांची धरपकड झालीच, लहानसहान कार्यकर्त्यांनाही तुरुंगांमध्ये डांबून ठेवण्यात आले. काँग्रेसअंतर्गत विरोधी सूरसुद्धा दाबून टाकले गेले. काही लोकांचा तर त्यांचा राजकारणाशी कसलाच संबंध नसतांना निव्वळ संशय, व्यक्तीगत आकस किंवा गैरसमजुतीमुळे पकडले गेले असे म्हणतात. नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी आणि त्यांचे शेजारी, मित्र किंवा नातेवाईक वगैरे वाढत जाणा-या वर्तुळांमधल्या कुणाला तरी पकडून नेल्याची बातमी अधून मधून कानावर यायची. त्या व्यक्तीशी आपला काही संबंध आहे हे कुणाला कळू नये म्हणून ती बातमी दबक्या आवाजात पण तिखटमीठ लावून सांगितली जायची. सगळी प्रसारमाध्यमे दहशतीखाली असल्यामुळे खरे खोटे समजायला कोणताच मार्ग नव्हता. आपल्या आसपास वावरणारे कोण लोक गुप्तहेरगिरी करत असतील हे सांगता येत नसल्यामुळे मनावर सतत एक दडपण असायचे. यामुळे वरून शांत दिसली तरी बहुतेक जनता मनातून खदखदत होती.

१९७७ साली घेतलेल्या लिवडणुका अशा वातावरणात झाल्या. आणीबाणीच्या काळात सरसकट सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांना अटकेत डांबून ठेवले गेले असल्यामुळे तुरुंगांमध्येच त्यांचे थोडेफार सख्य जमले होते. सुटून बाहेर आल्यानंतर काँग्रेस पक्षाविरुद्ध लढा देण्यासाठी आपापसातले तात्विक मतभेद बाजूला ठेऊन ते सगळे एकत्र आले. काँग्रेस पक्षाला सत्तेवरून खाली खेचणे एवढा एकच कार्यक्रम घेऊन जनता पक्ष नावाचा एक नवा पक्ष घाईघाईत तयार केला गेला. आणीबाणी उठवली गेली असली तरी लोकांच्या मनात भीती होतीच. निदान संशय तरी होता. त्यामुळे उघडपणे बोलायला ते अजूनही बिचकत होते, पण ज्या लोकांना आणीबाणीची प्रत्यक्ष झळ आधीच लागून गेली होती ते मात्र करो या मरो या भावनेने कामाला लागले. त्या काळात दूरदर्शनवरले प्रसारण सुरू झालेले असले तरी ते मुख्यतः सरकारीच असायचे. त्यावर जाहिराती दिल्या जात नव्हत्या. कुठल्याही कार्यक्रमात एकाद्या पक्षाचा प्रचार नाहीच, साधा उल्लेखसुद्धा येऊ दिला जात नव्हता. खाजगी वाहिन्या तर नव्हत्याच. त्या निवडणुकीतला प्रचार मुख्यतः दारोदारी फिरून मतदारांना भेटून केला गेला. आणीबाणीच्या काळात केल्या गेलेल्या दडपशाहीचा लोकांनाच इतका तिटकारा आला होता की तेही जनता पक्षाच्या प्रचाराला उत्स्फूर्त दाद देत होते.

त्या काळात एकदा आमच्या कॉलनीतल्या कोप-या कोप-यावर जाऊन, तिथे एका जीपच्या टपावर उभे राहून तिथे रस्त्यात जमलेल्या लोकांसमोर पोटतिडिकीने भाषण करतांना मी प्रमोद महाजनांना पाहिले होते. हा चळवळ्या तरुण पुढे जाऊन मोठा नेता होणार आहे असे तेंव्हा मला माहीत नव्हते. पु.ल.देशपांडे, दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि लोकांच्या मनात आदरभाव असलेल्या साहित्यिकांनीसुद्धा लेख लिहून आणि भाषणे करून जनजागृती करण्याची मोहीम हातात घेतली. ती निवडणूक त्यापूर्वी झालेल्या कुठल्याही निवडणुकीपेक्षा खूप वेगळी होती. इतके चैतन्य मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. अर्थातच मतमोजणी सुरू झाली तेंव्हा काय निकाल लागेल याबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रचंड उत्कंठा होती. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी दिवसभर रेडिओसमोर बसून निकालाच्या बातम्या एकत आणि टाळ्या वाजवून दाद देत राहिलो. आम्ही रहात असलेल्या भागातून जयवंतीबेन मेहता निवडून आल्याचे कळताच झालेला जल्लोष अपूर्व होता. देशभरात, मुख्यतः उत्तर भारतात काँग्रेसचा साफ धुव्वा उडाला होता आणि खरोखरीच लोकशाहीचा विजय झाला होता.
.  . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः) 
--------------------------------------------------

निवडणुका भाग ३


मृगाः मृगैः संगमनुव्रजन्ति गोभिश्च गावः तुरगास्तुरंगैः ।

मूर्खाश्च मूर्खैः सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यम् ।।

असे एक संस्कृत सुभाषित आहे. यात सांगितल्याप्रमाणे हरिणांचे हरिणांबरोबर किंवा गायींचे गायींसोबत सख्य होते त्याचप्रमाणे मूर्खांचे मूर्खांशी आणि सज्जनांचे सज्जनांशी चांगले जुळते. अर्थातच परस्परविरोधी स्वभावाच्या प्राण्यांचे किंवा माणसांचे सख्य होत नाही, झाले तरी ते फार काळ टिकत नाही. १९७७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये ज्या महाभागांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली होती ते असेच एकमेकांहून फारच भिन्न प्रकृतीचे होते. मोरारजीभाई देसाई आणि जॉर्ज फर्नांडिस, लालकृष्ण अडवानी आणि राजनारायण अशासारख्या नेत्यांमधून पूर्वी कधी विस्तव जात नव्हता. काहीही करून काँग्रेस पक्षाला सत्तेवरून खाली खेचायचेच अशा सिंगल पॉइंट प्रोग्रॅमसाठी ते एकत्र आले होते. ते उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर त्यांच्या आपापसातल्या कुरबुरी सुरू झाल्याच, मोरारजीभाईंना दिलेली पंतप्रधानपदाची खुर्ची आपल्यालाच मिळावी यासाठी इतर वयोवृद्ध नेते आसुसलेले होते. त्यातल्या संधीसाधू चरणसिंग यांनी इतर काही खासदारांना आपल्या बाजूला करून घेतले आणि इंदिरा गांधींचा छुपा पाठिंबा घेऊन जनता पक्षातून बंडखोरी केली, सरकारला अल्पमतात आणले, मोरारजीभाईंना राजीनामा द्यावा लागला आणि चरणसिंग.पंतप्रधानपदी विराजमान झाले. जेमतेम सहा महिने गेल्यानंतर इंदिरा गांधींनी त्यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि सरकारला मध्यावधी निवडणुका करायला भाग पाडले.

१९८० साली झालेली सहाव्या लोकसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर झाली. तोपर्यंतच्या काळात जनता पार्टीचा प्रयोग सपशेल अयशस्वी झाला होता. पूर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी भारतीय जनता पार्टी या नावाचा नवा पक्ष स्थापन केला होता. समाजवादी, साम्यवादी वगैरें डाव्या विचातसरणीच्या लोकानी पुन्हा त्याला जोरदार विरोध सुरू केला होता. विरोधी पक्षांचे नेते पुन्हा पूर्वीसारखेच आपापसात हाणामारी करत असल्यामुळे त्यांचा प्रभाव त्यांच्या काही बालेकिल्ल्यांमध्येच शिल्लक राहिला होता. सामान्य जनतेला त्यांचा विश्वास वाटत नव्हता. आणीबाणीच्या काळातल्या घटनांबद्दल लोकांचा दृष्टीकोणही थोडा बदलला होता. त्यापूर्वीच्या काळातल्या १९७७ च्या निवडणुकांमध्येही महाराष्ट्र आणि दक्षिण भारताने काँग्रेसला साथ दिलेली होतीच. १९८० च्या निवडणुकीत त्यात वाढ झाली आणि उत्तर भारतात काही ठिकाणी कांग्रेस पक्षाने पुन्हा आपले बस्तान बसवले. तीनच वर्षांपूर्वी पराभूत होऊन पायउतार झालेल्या इंदिरा गांधी १९८० च्या निवडणुकींमध्ये पुन्हा बहुमताने विजयी झाल्या आणि सत्तेवर आल्या. या काळात त्यांनी आपला चांगला जम बसवला आहे असे वाटत असतांनाच त्यांचा खून करण्यात आला. देशाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी जी पावले उचलली होती त्यामुळे नाराज झालेल्या लोकांनी हे कृत्य केले असल्यामुळे इंदिराजींना एक प्रकारचे हौतात्म्य प्राप्त झाले. त्याच्या निधनानंतर पंतप्रधानपदावर आलेले  त्यांचे सुपुत्र राजीव गांधी यांना याचा फायदा झाला.

इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असतांनासुद्धा राजीव गांधी राजकारणात न येता वैमानिकाची नोकरी करत होते, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून सतत दूर राहिले होते. त्यांच्या वर्तनामधून त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली होती. आणीबाणीच्या काळातल्या हडेलहप्पी घटनांचे खापर संजय गांधींवर फोडून झाले होते, जनतेकडून त्यावर झालेल्या संतप्त प्रतिक्रियांचा फटका राजीव यांना बसला नव्हता. ते या देशाचे सर्वात तरुण आणि उमदे पंतप्रधान होते आणि प्रगतीची भाषा बोलत होते, शिवाय इंदिरा गांधींच्या हौतात्म्यामुळे मिळालेली सहानुभूती होतीच. त्यां घटनेनंतर लगेचच झालेल्या १९८४च्या निवडणुकीवर या सर्वांचा मोठा परिणाम झाल्याने राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाला ४०० च्यावर जागा मिळून अभूतपूर्व असा विजय मिळाला. या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातसुद्धा सर्वांना याचा अंदाज आला होता त्यामुळे ती चुरशीची झालीच नाही.

राजीव गांधी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ तसा सुस्थितीत गेला. पण विरोधी पक्षांनीही आपापली मोर्चाबंदी वाढवली होती. त्यानंतर १९८९ साली झालेल्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधले विश्वनाथ प्रतापसिंह यांनी बंडाचा झेंडा उभारला आणि ते काँग्रेसमधून बाहेर पडले. संरक्षणखात्यासाठी परदेशातून केल्या गेलेल्या मोठ्या किंमतीच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला गेला असल्याचा खूप बोभाटा झाला. त्या काळात गाजलेल्या एका व्यंगचित्रात असे दाखवले होते की विश्वनाथ प्रतापसिंह यांच्याकडे पाहून राजीव गांधी म्हणत आहेत, "इसकी कमीज मेरे कमीजसे ज्यादा सफेद क्यूँ?"  या निवडणुकीत पुन्हा अटीतटीच्या लढती झाल्या आणि पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष अल्पमतात आला. विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या नेतृत्वाखाली एक लोकशाही आघाडी स्थापन करण्यात आली आणि त्या मोर्च्याने सत्ता काबीज केली. पण १९७७ साली जशी जनतापक्षाची खिचडी तयार केली गेली होती, तसेच या आघाडीच्या बाबतीत झाले. यातले पक्ष तर स्वतंत्रच राहून निरनिराळ्या सुरांमध्ये बोलत राहिले होते. यामुळे पूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. जेमतेम वर्षभरामध्ये त्यात बंडाळी झाली आणि या वेळी चंद्रशेखर यांनी फुटून बाहेर पडून काँग्रेसच्या मदतीने पंतप्रधानपद मिळवले. पण तेही काही महिनेच टिकले आणि १९९१मध्ये पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुका करणे प्राप्त झाले.

१९९१च्या निवडणुकी वेगळ्याच कारणाने ऐतिहासिक ठरल्या, त्या वेळी अत्यंत प्रबळ असा कोणताच राष्ट्रीय पक्ष भारतात शिल्लक राहिला नव्हता. निरनिराळ्या राज्यांमध्ये अनेक स्थानिक पक्ष प्रबळ झाले होते. दक्षिणेतल्या तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळहम, आंध्रात तेलगू देसम्, महाराष्ट्रात शिवसेना, उत्तर भारतात कुठे बहुजन समाज, कुठे लोकदल, कुठे समाजवादी, कुठे झारखंड मुक्ती मोर्चा, कुठे अकाली दल यासारखे विकल्प तयार झाले होते. कम्युनिस्टांनी बंगाल आणि केरळ काबीज केला होता. भारतीय जनता पक्षाने दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे प्रदेशात चांगला जम बसवला होता. यातल्या निरनिराळ्या पक्षांनी राज्य पातळीवर निवडून येऊन आपापली सत्ता प्रस्थापित केली होती. या सगळ्या गोंधळात निवडणुकीनंतर काय होणार हे एक प्रश्नचिन्हच होते. इंदिरा गांधींनी १९८० साली जशी देशभर सहानुभूती किंवा मान्यता मिळवली होती तशी हवा राजीव गांधी यांना निर्माण करता आली नव्हती. या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा यश मिळेल असे अजीबात वाटत नव्हते. त्या निवडणुकीचे काही ठिकाणचे मतदान होऊन गेल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारासाठी तामीळनाडूमध्ये गेलेले असतांना त्यांच्यावर अतिरेक्यांनी घाला घातला. याने सर्व देश हळहळला. काँग्रेसच्या कारभारावर लोक नाराज झालेले असले तरी व्यक्तीशः राजीव गांधी लोकप्रियच होते. त्यांच्या अशा प्रकारे झालेल्या निधनाची प्रतिक्रिया त्यानंतर झालेल्या उरलेल्या जागांच्या निवडणुकींवर झाली. पुन्हा एक सहानुभूतीची लाट आली, यामुळे पारडे फिरले आणि काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या. तरीसुद्धा त्याला पूर्ण बहुमत मिळाले नाहीच. काँग्रेस खासदारांच्या प्रमुखपदी नरसिंहराव या मुरब्बी नेत्याची निवड करण्यात आली. त्यांनी घोडेबाजारातून काही फुटकळ पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा मिळवला आणि ते पंतप्रधान झाले.

. .  . . . . . . . . . .  (क्रमशः)

----------------------------------------------------

निवडणुका भाग ४


सुमारे सव्वाशे वर्षापूर्वीच्या हिंदुस्तानातल्या काही उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित लोकांनी १८८५ साली 'इंडियन नॅशनल काँग्रेस' या संघटनेची स्थापना केली. त्या काळातल्या इंग्रज सरकारच्या नोकरीतले एक वरिष्ठ अधिकारी अॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांनीच यात पुढाकार घेतला होता. त्या काळातल्या 'एतद्देशीय मनुष्यांची' मते 'कनवाळू' इंग्रज सरकारला कळावीत आणि सरकारला त्यानुसार त्यांचे कल्याण करता यावे असा 'उदात्त उद्देश' त्यामागे होता. यातल्या सदस्यांनी आपापसात चर्चा करावी, काही उपाय किंवा उपक्रम सुचवावेत आणि त्यासाठी मायबाप सरकारकडे अर्ज विनंत्या कराव्यात अशा स्वरूपाचे काम ती संघटना सुरुवातीला करायची. वीस पंचवीस वर्षानंतरच्या काळात त्या संघटनेच्या कामाचे स्वरूप बदलत गेले. 'लाल, बाल, पाल' या नावाने ओळखल्या गेलेल्या लाला लाजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या झुंजार नेत्यांनी त्या संघटनेत प्रवेश केला आणि तिला नवीन दिशा दिली. त्यानंतर काँग्रेसने सरकारला विनंत्या करून न थांबता मागण्या करायला सुरुवात केली आणि अंतर्गत स्वायत्ततेपर्यंत (होमरूल) त्या वाढवत नेल्या. शिवाय या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेत मिसळून तिचे संघटन करून त्यांच्या मागण्यांसाठी जनतेचा पाठिंबा मिळवायची सुरुवात केली. त्यांच्यानंतर आलेल्या महात्मा गांधी आणि सरदार पटेल, पं.नेहरू, नेताजी सुभाष आदि त्यांच्या अनुयायांनी सत्याग्रह, चळवळी, आंदोलने वगैरेमधून आपल्या कार्याचा विस्तार भारतभराच्या कानाकोप-यात नेऊन पसरवला, त्या वेळच्या काँग्रेसने देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून तिचा पाठपुरावा केलाच, १९४२ साली इंग्रजांना 'चले जाव' असे सांगितले. तोपर्यंत या संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर झाले होते आणि तिचे लक्षावधी कार्यकर्ते खेडोपाड्यांमध्ये विखुरलेले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस काँग्रेस हाच राष्ट्रीय स्तरावर विकसित झालेला एकमेव पक्ष होता.

रशीयामध्ये झालेल्या रक्तरंजित क्रांतीनंतर त्या देशात कम्युनिस्टांची राजवट सुरू झाली आणि जगभरातल्या सर्व शोषित वर्गांनी एक होऊन उठाव करावा आणि सरंजामशाही आणि भांडवलशाहीचे या जगातून पुरते उच्चाटन करावे असे जाहीर आवाहन त्यांनी वेळोवेळी केले. त्या क्रांतिकारी विचारप्रवाहाचे वारे भारतापर्यंत येऊन पोचले आणि कम्युनिस्ट पक्षाचे लहानसे रोपटे इथेही उगवले. गिरणीकामगारांच्या युनियनमध्ये आणि तेलंगणासारख्या काही भागांमध्ये त्याला काही अंकुरही फुटले. जहाल समाजवादी विचारसरणी असलेल्या काँग्रेसमधल्या काही गटांनी बाहेर पडून समाजवादी, प्रजासमाजवादी यासारखे नवे पक्ष स्थापन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीमधून वर आलेल्या हिंदुत्ववादी लोकांनी त्यांच्या विचारावर आधारलेला भारतीय जनसंघ स्थापन केला. १९५१ साली भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेंव्हा अशा प्रकारे काही इतर पक्ष निर्माण झाले होते, पण त्यांचा प्रभाव फारच मर्यादित प्रदेशांमध्ये होता. भारतात विलीन झालेल्या बहुतेक संस्थानांमधल्या प्रजेची भूतपूर्व संस्थानिकांवर निष्ठा होती. त्याचा फायदा घेऊन ते ही एकाद्या पक्षातर्फे किंवा स्वतंत्रपणे निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले. तरीही या सर्वांना मिळून फक्त १२५ जागा जिंकता आल्या आणि ३६४ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला.

यापूर्वीच्या भागांमध्ये लिहिल्याप्रमाणे पं.नेहरूंच्या जीवनकाळात झालेल्या १९५७ आणि १९६२ साली झालेल्या पुढील दोन निवडणुकांमध्ये याचीच जवळजवळ पुनरावृत्ती झाली. इंदिरा गांधी पंतप्रधानपदी आल्यानंतर अनेक जुन्या नेत्यांनी पक्ष सोडला किंवा इंदिराजींना पक्षाबाहेर काढले किंबहुना काँग्रेस पक्षाची विभाजने होत गेली. तोपर्यंत देशातल्या परिस्थितीमध्ये बराच फरक पडला होता. स्वातंत्र्याच्या लढाईतले बहुतेक सगळे पुढारी दिवंगत झाले होते किंवा जर्जरावस्थेत पोचले होते. पारतंत्र्याचे दिवस न पाहिलेल्या मतदारांची बहुसंख्या झाली होती. यामुळे स्वातंत्र्ययुद्धातला सहभाग हा महत्वाचा मुद्दा राहिला नव्हता. काँग्रेसमधल्या जुन्या खोडांना वगळले गेले तरी बहुतेक सगळे सक्रिय कार्यकर्ते इंदिराजींच्याच बाजूला राहिले. तरीही या फाटाफुटीचा परिणान होऊन १९६७ सालच्या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसच्या खासदारांची संख्या ३००च्या आत आली, पण ती बहुमतासाठी पुरेशी होती. १९७१ सालच्या युद्धानंतर इंदिरा गांधींना मिळालेल्या अफाट लोकप्रियतेमुळे काँग्रेसच्या खासदारांची संख्या पुन्हा पूर्वीसारखी साडेतीनशेवर गेली. आणीबाणीनंतर झालेल्या १९७७च्या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष अल्पमतात आला खरा, पण तीनच वर्षांनंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकीत त्याने पुन्हा उसळी मारून ३५० चा आकडा पार केला. १९८४ साली इंदिरा गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रथमच ४०० चा आकडा ओलांडून लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आणि इतर सगळ्या राष्ट्रीय पक्षांचा पुता धुव्वा उडवला.

त्यानंतर मात्र भारताच्या राजकारणात एक नवे पर्व सुरू झाले. १९८९ ते २००९ च्या दरम्यानच्या वीस वर्षांमध्ये पाचच्या ऐवजी सात सार्वत्रिक निवडणुका झाल्या, पण त्यातल्या एकाही निवणुकीत कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेच नाही. दर वेळी इतर पक्षांचे सहाय्य घेऊन मंत्रीमंडळ बनवले गेले आणि त्यातली काही थोडे दिवसच चालली. या काळात सात पंतप्रधान झाले, त्यातल्या नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग या तीघांनी पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केला, पण अटलजींचेसुद्धा पहिले मंत्रीमंडळ १३ दिवसातच गडगडले होते. विश्वनाथप्रतापसिंह, चंद्रशेखर, देवेगौडा आणि आय. के. गुजराल या इतर चौघाचा कारभार एक वर्षसुद्धा टिकला नाही. ज्यांनी पाच वर्षे पूर्ण केली त्यांची सरकारेदेखील इतर पक्षांच्या सहाय्यानेच चालली असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असायचीच. वरील चौघे आणि त्यापूर्वी पंतप्रधान झालेले मोरारजीभाई देसाई व चरणसिंह हे सगळे काँग्रेसमधूनच पुटून बाहेर पडलेले होते. याचा अर्थ असा की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत अटलबिहारी वाजपेयी वगळता इतर सगळे पंतप्रधान आजी किंवा माजी काँग्रेसमनच होते.

गेली पंचवीस वर्षे कोणत्याही एका पक्षाला लोकसभेत बहुमत मिळालेले नव्हते. यामुळे बहुपक्षी राज्यकारभार चालला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए (युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स) या नावाची आघाडी निर्माण केली गेली, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही आघाडी तयार झाली. यातल्या काही घटकपक्षांची संख्या आणि नावे बदलत गेली. पण त्याने लक्षणीय फरक पडला नाही. याशिवाय सगळ्या डाव्या पक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी करण्याचे प्रयत्नही अनेक वेळा केले गेले, त्यांना फारसे यश कधीच मिळाले नाही.

.  . . . ..  . .. .  . . . . . (क्रमशः)

---------------------------------------------

निवडणुका ५

१९८९ आणि १९९१ साली झालेल्या निवडणुकांच्या आठवणी मी आधी दिल्या आहेत. १९९१ साली बहुमत मिळाले नसतांनाही पंतप्रधानपदावर आलेल्या नरसिंहराव यांना अनेक अडचणी आल्या. त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर वादळे उठली, त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले, त्यांचे काही वरिष्ठ साथी पक्ष सोडून गेले तर काही मित्रपक्षांनी पाठिंबा काढून घेतला. तरीही नरसिंहराव यांनी या सर्वांना तोंड देत आपली गादी पाच वर्षे कशीबशी सांभाळली. तोपर्यंत स्वातंत्र्यप्राप्तीला चार दशके उलटून गेली असल्यामुळे स्वातंत्र्यलढ्यातला सहभागी झालेले बहुतेक नेते आणि तो लढा पाहिलेले बहुतेक मतदार काळाच्या पडद्याआड गेले होते. या तथाकथित स्वातंत्र्यसैनिकांनी सत्तेवर आल्यानंतर केलेला ऐषोआरामच नव्या पिढीतल्या लोकांनी पाहिला असल्यामुळे त्यांचे मत विरोधातच गेलेले होते. शिवाय पूर्वीच्या काँग्रेसमधले कित्येक लोक विरोधी पक्षांमध्ये गेले होते. यामुळे एके काळी स्वातंत्र्ययुद्धासाठी केलेला त्याग, भोगलेला तुरुंगवास आणि निवडलेले कष्टमय जीवन हा काँग्रेसच्या बाजूचा मुद्दाच राहिला नव्हता. या काळात काँग्रेस पक्षाची पीछेहाट होत राहिली.

याच्या उलट या काळात भारतीय जनता पार्टीचे बळ वाढत गेले. या पक्षाला १९९१च्या निवडणुकीत १२० जागा मिळाल्या होत्या. १९७७ चा अपवाद वगळता यापूर्वी कोणत्याही विरोधी पक्षाला इतके यश मिळाले नव्हते. आपली वाढत असलेली ताकत पाहून भाजपमध्ये जास्त चैतन्य आले आणि आपली लोकप्रियता वाढवण्याच्या दिशेने त्यांचे जोराचे प्रयत्न सुरू झाले. रामजन्मभूमीवर राममंदिर बांधण्यासाठी आंदोलन सुरू झाले, मोठा गाजावाज करून रथयात्रा काढण्यात आली आणि तिला जनतेकडून भरघोस प्रतिसादही मिळाला. त्या आंदोलनाची परिणती अयोध्या येथील बाबरी मशीदीचा ढाँचा उध्वस्त करण्यात झाली. या घटनेच्या प्रतिक्रिया देशभर होत राहिल्या. यामुळे वातावरण तापत राहिले. या सर्वांचा परिणाम १९९६ च्या निवडणुकांवर किती होणार आहे हे प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनात होतेच. या वेळच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल काहीच खात्रीपूर्वक सांगता येत नव्हते. सर्वांच्या मनात त्याबाबत खूप उत्सुकता होती. निकालजाहीर झाले तेंव्हा या वेळी भाजपला १६१ जागा मिळाल्या, त्या काँग्रेसला मिळालेल्या १४० हून जास्त असल्याने भाजपला पहिल्यांदाच लोकसभेत सर्वाधिक जागा मिळाल्या. त्या पक्षाला सरकार बनवण्याची संधी दिली गेली आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. लोकसभेतले आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत दिली गेली, पण त्या मुदतीत त्यांना बहुसंख्या जमवता न आल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही मुख्य पक्षांना वगळून संयुक्त आघाडीच्या (युनायटेड फ्रंटच्या) देवेगौडा यांना आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधान बनवले गेले. पण पूर्वीच्या अशा प्रकारच्या खिचडी सरकारांचा अनुभव पाहता हा प्रयोग यशस्वी होण्यासारखा नव्हताच. त्या दोघांनाही पुरते एक एक वर्षसुद्धा आपले पद सांभाळता आले नाही. यामुळे १९९८ साली मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या.

या निवडणुकीत उतरण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने काही प्रादेशिक मित्रपक्षांची जुळवाजुळव करून एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही आघाडी तयार केली. या निवडणुकीत भाजपाच्या जागांची संख्या वाढून १८२ वर गेली आणि एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) आघाडीला बहुमत मिळून अटलबिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले. पण दीड वर्षांनंतर अण्णा द्रमुकने आपला पाठिंबा मागे घेतल्यामुळे ते सरकार अल्पमतात आले. त्यांच्या मंत्रिमंडळावर अविश्वास दाखवणारा ठराव लोकसभेच्या अधिवेशनात अवघ्या एका मताने मंजूर झाला. त्यांनी १९९९ साली पुन्हा मध्यावधी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला.

१९९९ सालची निवडणूकसुद्धा खूप अटीतटीची झाली. या निवडणुकीच्या आधी होऊन गेलेल्या कारगिलच्या युद्धाने भाजप सरकारची प्रतिमा थोडी उजळली होती. १९९९ च्या निवडणुकांच्या वेळी एनडीएने २० पक्षांना एकत्र आणून भक्कम आघाडी तयार केली. या उलट शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस काढली होती. यामुळे काँग्रेसला तोपर्यंत झालेल्या कुठल्याही निवडणुकीतल्याहून कमी म्हणजे फक्त ११४च जागा मिळाल्या. भाजपच्या जागांचा आकडा पूर्वी एवढा १८२ वरच राहिला असला तरी त्यांच्या आघाडीला चांगले बहुमत मिळाले, पण समता, ममता आणि जयललिता यांच्या मर्ज्या सांभाळून काम करणे ही थोडी तारेवरची कसरतच होती. तरीही अटलजींच्या सरकारने पूर्ण पाच वर्षे राज्यकारभार केला. या काळात त्यांनी चांगली म्हणण्यासारखी कामगिरी केली. पण ती कदाचित अपेक्षेइतकी चांगली झाली नसावी.

२००४ च्या निवडणुकीला एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) जरा जास्तच आत्मविश्वासाने सामोरी गेली. समाजाच्या मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय स्तरावरील लोक या सरकारवर खूष असल्यामुळे एक फील गुड फॅक्टर तयार झाला होता, तो या सरकारला सहजपणे तारून नेईल अशी त्याच्या नेत्यांची कल्पना होती. कदाचित या कारणाने त्यांनी आवश्यक तेवढा दमदार प्रचार केला नसावा. एनडीए सरकारचे धोरण साधारणपणे उजवीकडे झुकणारे असल्यामुळे ते देशातल्या गरीब जनतेला तितकेसे पसंत पडले नसावे, स्थानिक प्रश्नांमुळे प्रादेशिक मित्रपक्षांची कामगिरी अपेक्षेइतकी चांगली झाली नसावी. या सगळ्या कारणांमुळे  २००४ च्यानिवडणुकीचे परिणाम मात्र धक्कादायक निघाले. भाजपच्या खासदारांची संख्या १८२ वरून १३८ वर खाली आली आणि काँग्रेसची ११४ वरून १४१ पर्यंत वाढली. दोन्ही आघाड्या बहुमतापर्यंत पोचल्या नव्हत्याच आणि पुन्हा एकदा अस्थिरता आली होती. पण डाव्या पक्षांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून आपले वजन यूपीए (युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स)च्या पारड्यात टाकले. राजकारणात फारसे सक्रिय नसलेल्या अर्थशास्त्री मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदी निवडण्यात आले. त्यांनी देशाचे आर्थिक धोरण मागून पुढे चालू ठेवले आणि काही प्रमाणात प्रगती घडवून आणली.

त्यानंतर २००९ साली झालेल्या निवडणुकीमध्येही अटीतटीच्या लढती झाल्या. तरीही कदाचित त्या सरकारविरुद्ध लोकांना जास्त रोष वाटत नसल्यामुळे त्यांनी जास्त उत्साह दाखवला नाही. या निवडणुकीत अॅटाइन्कम्बन्सी फॅक्टर दिसला नाही. काँग्रेस पार्टी आपली संख्या १४१ वरून २०६ पर्यंत वाढवण्यात यशस्वी झाली. भाजपचे संख्याबल कमी होऊन ११६ वर आले. या वेळीही कोणताच पक्ष बहुमतात आला नाही, हंग पार्लमेंटच निवडून आले होते, पण यूपीए (युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स) च्या जागा वाढल्यामुळे त्यांचे इतर फुटकळ पक्षांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले. हे सरकार पाच वर्षे टिकले पण या काळात ते लोकांना अधिकाधिक अप्रिय होत गेले.
 . . .  . . . . . .  . . . . . . . . . .  .  (क्रमशः)

---------------------------------------------

निवडणुका भाग ६

२००८ साली अमेरिकेत झालेली निवडणूक ऐतिहासिक ठरली. त्या निवडणुकीत पहिल्यांदाच बरॅक ओबामा हा सावळ्या वर्णाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून निवडून आला. त्या काळात मी अमेरिकेत होतो. त्या काळातली परिस्थिती मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. ती अर्थातच भारतातल्या त्यापूर्वी पाहिलेल्या कोणत्याही निवडणुकीपेक्षा वेगळी होती.

अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीची चक्रे वर्षभर आधी फिरू लागतात. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक या दोन्ही मुख्य पक्षातर्फे ही निवडणूक कुणी लढवायची हे ठरवण्यासाठी प्राथमिक फे-या (प्रायमरीज) सुरू होतात. डेमॉक्रॅटिक पक्षामधल्या काही लोकांची नावे आधी समोर आली, त्यातली बरीचशी वगळून अखेर बरॅक ओबामा आणि हिलरी क्लिंटन ही दोन नावे शिल्लक राहिल्यानंतर त्यातून एक निवडण्यासाठी प्रत्येक राज्यात पक्षांतर्गत डेलेगेट्समधून निवडणूकी घेण्यात आल्या. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे एकाच दिवशी होत नाहीत. एकेका राज्याचे निकाल जसे जाहीर होत होते तशी परिस्थिती बदलत होती. आज हिलरी क्लिंटन पुढे आहेत तर दुसरे दिवशी लागलेल्या निकालांनुसार बरॅक ओबामा पुढे गेले आहेत असा सस्पेन्स काही दिवस चालल्यानंतर हिलरी क्लिंटन यांनी त्याचा रागरंग पाहिला आणि माघार घेऊन ओबामांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्या ओबामांच्या पाठीशी भक्कमपमे उभ्याही राहिल्या. रिपब्लिकन पक्षातर्फे जॉन मॅकेन यांची उमेदवारी जाहीर झाली.

मी अमेरिकेत पोचलो तोपर्यंत निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. पण मोठमोठी छायाचित्रे असलेले अवाढव्य फलक मला कुठल्याच गावातल्या रस्त्यात लावलेले कोठेही दिसले नाहीत की ध्वनीवर्धकांचा कर्कश गोंगाटही कुठे ऐकू आला नाही. अल्फारेटाच्या मी रहात असलेल्या भागात तरी कधीच कोणाची मिरवणूक निघाली नाही की जाहीर सभा झाली नाही. न्यूयॉर्क आणि शिकागोसारख्या महानगरांमध्ये काही ठिकाणी सभा होत असत आणि त्याचे वृत्तांत टी.व्ही.वर दाखवत होते. त्याखेरीज टी.व्हीवरील कांही चॅनेल्सवर निवडणुकीनिमित्य सतत कांही ना कार्यक्रम चाललेले असायचे. प्रचाराचा सर्वाधिक भर बहुधा टी.व्ही.वरच होता. ओबामा आणि सिनेटर मॅकेन यांच्या वेगवेगळ्या तसेच अमोरासमोर बसून घेतलेल्या मुलाखतीसुध्दा झाल्या. २००८ साली फेसबुक किंवा ट्विटर अजून अवतरले नव्हते.

प्रेसिडेंट बुश यांच्या कारकीर्दीत अमेरिका आर्थिक संकटात सापडली असा सर्वसामान्य जनतेचा समज झाला होता. पण त्याचे मोठे भांडवल करण्याचा मोह ओबामा टाळायचे. "प्राप्त परिस्थितीतून बाहेर येऊन पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करण्याची अमेरिकन जनतेला गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ते काम करायचे आहे." असे सकारात्मक प्रतिपादन ते करायचे. मॅकेन यांनी मात्र ओबामांच्या भाषणावर आसूड ओढण्याचेच काम मुख्यतः केले. त्यांच्या भाषणातही सारखे ओबामा यांचेच उल्लेख यायचे. ओबामा हे मिश्र वंशाचे आहेत याचा जेवढा गवगवा प्रसारमाध्यमांनी केला तेवढाच त्याचा अनुल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. "मी सर्व अमेरिकन जनतेचा प्रतिनिधी आहे." असेच ते नेहमी सांगत आले. त्यांनी विचारपूर्वक घेतलेल्या या धोरणाचा त्यांना चांगला फायदा झाला असणार. एकजात सर्व गौरेतरांचा भरघोस पाठिंबा त्यांना मिळालाच, पण सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे असंतुष्ट असलेले बहुसंख्य गौरवर्णीयही मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूला आल्यामुळे ते प्रचंड बहुमताने निवडून आले.

अमेरिकेतल्या या निवडणुकीत आणि २०१४ साली झालेल्या भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीत बरेच साम्य दिसल्यामुळे मला त्या आठवल्या. अमेरिकेत जसा ओबामा यांना आधी त्यांच्या पक्षामधूनच तीव्र विरोध होत होता तसाच भारतात नरेन्द्र मोदी यांनासुद्धा झाला. ओबामांनी अत्यंत शांतपणे आणि मुत्सद्देगिरीने त्या विरोधावर मात केली आणि इतर प्रतिस्पर्ध्यांना बाजूला सारले तसेच मोदींनी केले. भारताच्या भावी पंतप्रधानाचे नाव निवडणुकीच्या आधीपासून जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नसतांनासुद्धा या वेळेस भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकली तर नरेन्द्र मोदीच पंतप्रधान होतील असे त्यांनी सर्वांकडून वदवून घेतले. बुशच्या राजवटावर बहुतेक अमेरिकन जनता असंतुष्ट होती, काही प्रमाणात ती चिडलेली होती, त्याचप्रमाणे भारतातली बरीचशी जनता मनमोहनसिंगांच्या सरकारच्या कारभारामुळे वैतागली होती. अमेरिकेत थेट राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत असल्यामुळे ती नेहमीच व्यक्तीकेंद्रित होत असते, भारतातल्या निवडणुकांमध्ये एका पक्षाला निवडून द्यायचे असे ठरलेले असले तरी पं.नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळात त्या व्यक्तीकेंद्रित झाल्या होत्या. त्यानंतर २०१४ साली भारतीय जनता पक्षाने केलेल्या प्रचारात त्या पक्षाऐवजी नरेंद्र मोदी यांच्या नावावरच अधिक भर दिला गेला. "अबकी बार मोदी सरकार" हा त्यातला मुख्य नारा होता. ओबामा यांच्याप्रमाणेच  नरेन्द्र मोदीसुद्धा फर्डे वक्ते आणि अत्यंत संभाषणचतुर आहेत. ओबामांच्या मानाने मॅकेन फिके पडत होते, मोदींच्या विरोधात काँग्रेसचा चेहेरा म्हणून उभे केले गेलेले राहुल गांधी या बाबतीत फारच कमी पडत होते. ओबामांनी झंझावाती दौरे करून जास्तीत जास्त अमेरिकन मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर मोहनास्त्र टाकून त्यांना आपल्या बाजूला ओढून घेतले. नरेंद्र मोदींनी तर या अस्त्राचा यशस्वी वापर ओबामांपेक्षाही जास्त प्रभावीपणे केला.

पोस्टर्स, मिरवणुकी, सभा, घरोघरी जाऊन प्रचार वगैरे सर्व प्रकारचा प्रचार २०१४ मधल्या भारतातल्या निवडणुकीमध्ये झालाच, विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे त्यात अधिक सुधारणा होऊन जास्त वाढ झाली. पक्षाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, राज्यातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले प्रमुख, गावातले आणि गल्लीतले म्होरके या सगळ्यांच्या चेहे-यांच्या भाऊगर्दीत कुठे तरी उमेदवाराचा सुहास्य मुखडा दाखवणारे अगडबंब फ्लेक्स सगळ्याच पक्षांतर्फे कोप-याकोप-यांवर लावले गेले होते. त्यांच्यात काही फरक आहे असे निरखून पाहिल्याशिवाय जाणवत नव्हते. त्या उमेदवाराच्या जिंकण्याची खात्री असो, आशा असो किंवा डिपॉझिटसुद्धा राखण्याची शक्यता नसो, त्याचा मुखडा फलकांवरून मतदारांना आवाहन करत असतांना दिसायचा. मिरवणुका काढण्यासाठी आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी चार लोकांचे जमणे आवश्यक असल्यामुळे हे काम मोठे पक्षच करू शकत होते. सहा वर्षांपूर्वी अमेरिकेत पाहिलेल्या टीव्ही वरच्या प्रचाराइतकाच किंवा त्याहून कांकणभर जास्तच प्रचार भारतात होत होता, पण त्याची क्वालिटी मात्र जेमतेमच होती. एकादे आकर्षक घोषवाक्य घेऊन ते सतत कानावर आदळत राहण्याचा इतका अतिरेक झाला होता की त्यावरील विडंबनांचे पेव फुटले होते. यावेळी मोठ्या पक्षांनीही त्यांच्या प्रचारासाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला होता. फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सअॅपवरील संवादांना दुसरा कुठला विषयच नसावा असे वाटत होते. त्यावर कोणीही काहीही लिहू शकतो असा समज असल्यामुळे बेछूट विधाने आणि त्यांवर त्याहून भयानक वादविवावाद यांना ऊत आला होता. सेलफोनवर अनाहूत टेक्स्ट मेसेजेसचा वर्षाव होत होता. अर्थातच या सगळ्यांचा थोडा फार तरी परिणाम निवडणुकांवर झाला असणारच..


दोन्ही वेळेस झालेल्या निवडणुकांचे निकाल पहाण्याची जबरदस्त उत्सुकता सर्वांच्या मनात होती. आम्ही अमेरिका या परदेशाचे नागरिक नव्हतो आणि तिकडे कोणीही निव़डून आले तरी आम्हाला त्याचे कसले सोयरसुतक असण्याचे काही कारण नव्हते. तरीसुद्धा निवडणूक संपल्यानंतर तिच्या निकालांची वेळ होताच आम्ही टेलिव्हिजनच्या समोर ठाण मांडून बसलो होतो आणि डोळ्याची पापणी लवू न देता त्याच्याकडे पहात आणि कान टवकारून निवेदने ऐकत बसलो होतो. २०१४ सालच्या भारतातल्या निवडणुका तर आमचाच भाग्यविधाता ठरवणार होत्या. सर्वांना त्याबद्दल वाटणारी उत्सुकता अनावर होती. पण इथल्या निवडणुका झाल्यानंतर मतमोजणीसाठी मध्ये कित्येक दिवस वाट पहावी लागली होती या गोष्टीचा राग येत होता. निकालाचा दिवस उजाडल्यावर सगळी कामे कशीबशी आटोपून किंवा न आटोपताच आम्ही टेलिव्हिजनकडे धाव घेतली आणि निरनिराळ्या वाहिन्यांवरून दाखवण्यात येत असलेली तीच तीच दृष्ये दिवसभर पहात आणि तेच तेच बोलणे ऐकत राहिलो. अमेरिकेतल्या निवडणुकींमध्ये ओबामा निवडून येतील असे भविष्य बहुतेक सगळ्या पंडितांनी वर्तवलेले असल्यामुळे त्याची अपेक्षा होतीच, पण त्यांना इतके मोठे मताधिक्य मिळेल असे वाटत नव्हते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही आघाडी सर्वाधिक जागा मिळवेल इतका अंदाज होता, पण सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाची पार वाताहात होईल असे वाटले नव्हते. या निवडणुकीमध्ये एनडीएला भरघोस यश मिळालेच, पण त्याचा घटक असलेल्या भाजपला स्वतःला बहुमत मिळाले हे त्यांचे यश अपेक्षेच्या पलीकडले होते.

पंचवीस वर्षांचा अनिश्चिततेचा काळ उलटल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या देशाला स्थिर सरकार मिळणार आहे यातही एक समाधान होते.

.  . . . . . . . . . . . . (समाप्त)