Sunday, December 07, 2014

सोनार, शिंपी आणि परीट - भाग १

"सोनार, शिंपी, कुलकर्णी अप्पा । यांचा विश्वास नको रे बाप्पा ।।" अशी एक प्राचीन काळातली म्हण आहे. हे सांगून मला कोणाचीही बदनामी करायची नाही. हे माझे स्वतःचे मत नाही. यातल्या कोणावरही एवढा अविश्वास दाखवावा असे वाईट अनुभव मला आलेले नाहीत, खरे तर असे सरसकट मत बनवण्याइतका या लोकांशी माझा संपर्कच आलेला नाही. ही म्हण खूप पूर्वीच्या काळात पडली होती आणि माझ्या लहानपणी मी ऐकली होती. दुस-या लोकांचे सोने, कापड किंवा मालमत्ता यांचा व्यवहार या लोकांकडे असायचा. त्यांच्या निष्काळजीपणाचा किंवा हातचलाखीचा भुर्दंड त्या संपत्तीच्या मालकांना पडायचा आणि असा दुस-याच्या चुकांचा भार कोणालाही सहन होणार नाही. यामुळेच त्यांच्यापासून जरा सांभाळून राहण्याचा इशारा या म्हणीतून दिला जात असावा. त्यांच्याकडे थोडे अविश्वासाने पाहिले जात असावे. असा अविश्वास बाळगणे हा संशयखोर माणूसजातीचा स्वभावधर्मही म्हणता येईल. "जो दुज्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग नासला." ही म्हणसुद्धा हेच दर्शवते. कदाचित काही लोकांच्या बिलंदरपणाचे प्रच्छन्न कौतुक या म्हणीमधून केले जात असेल

"सोनार लोक सोन्याचे दागिने घडवतात" आणि "शिंपी लोक कपडे शिवतात" एवढे सामान्यज्ञान कोणीही सांगेल. पण मला या दोन्ही आडनावांचे इंजिनियर भेटले आहेत, या नावाचे लोक रेल्वे, पोलिसदल, शेअरबाजार किंवा आयटी इंडस्ट्रीमध्येही सापडतील. हा लेख या नावांनी ओळखल्या जाणा-या लोकांविषयी नाही, हे व्यवसाय करणा-यांवर आहे. 'सोन्याचांदीचे अलंकार बनवणारे ते सगळे सोनार' आणि 'कपडे शिवणारे ते सारे शिंपी' अशी व्याख्या या लेखापुरती करून घ्यावी, मग त्याचे आडनाव पेठे, पाटील, प्रधान असे काहीही असो, चित्तमपल्लीवार, चिप्पलकट्टीकर किंवा इस्माईल, फर्नांडिस असेही असू शकेल.

सोनार आणि शिंपी लोक काय करतात हे जसे लगेच समजते तसे कुलकर्णी लोक काय करतात, त्यांची व्याख्या कशी करता येईल? हे मात्र सहसा कोणालाच सांगता येणार नाही. इतिहासकाळात म्हणजे इंग्रजांचे राज्य यायच्या आधी मराठेशाही, बहामनी साम्राज्य, विजयनगरचे साम्राज्य वगैरेंच्या काळात गांवागांवामधून शेतसारा किंवा महसूल गोळा करणे. त्याचा हिशोब ठेवणे आणि राजा, महाराजा, जहागिरदार, वतनदार वगैरे जो कोणी स्थानिक शासक असेल त्याला तो पोचवणे वगैरे 'रेकॉर्ड कीपिंग' आणि 'बुक कीपिंग'ची कामे करणा-या लोकांना 'कुलकर्णी' हा खिताब असायचा असे समजले जाते. इंग्रजांनी त्यांचा जम बसवल्यानंतर सगळ्या देशाचा सर्व्हे करून जमीनीच्या मालकीचे लेखी दस्तऐवज तयार करून घेतले आणि निरनिराळ्या पातळ्यांवर त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी लँड रेव्हेन्यू डिपार्टमेंटची यंत्रणा उभी केली. त्या कामासाठी लहान गावांमध्ये आणि खेड्यांमध्ये तलाठी नेमले. त्यानंतर 'कुलकर्णी' हा पेशा किंवा हुद्दा राहिलेला नाही, या कारणाने त्यांचा समावेश या लेखात केला नाही. शिंप्यांनी शिवलेल्या कपड्यांची वेळोवेळी धुलाई करून, त्यांना इस्त्री करून चांगले रूप देण्याचे काम परीट करत असत. शिंपी हा कपड्यांचा निर्माता ब्रह्मदेव असला तर परीट हा त्यांचा विष्णू (आणि कधीकधी विनाश करणारा शिव) आहे असे म्हणता येईल. या नात्याने त्यांचाही परामर्श या लेखात घेतला आहे.

                                                                            भारतीय सोनार

सुवर्णाचे अलंकार परिधान करण्याची प्रथा पुरातन काळापासून जगभरात चालत आली आहे. पौराणिक कथांमध्ये आणि देवदेवतांच्या स्तोत्रांमध्ये त्याचे उल्लेख येतात, पुरातन काळातल्या शिल्पांमधल्या आणि मूर्तींमधल्या व्यक्तींनी किंवा देवतांनी नेहमीच अलंकार घातलेले आढळतात. ग्रीस देशातल्या एका सोनाराने तिथल्या राजाचा मुकुट तयार करतांना त्यात लबाडी केली असावी अशी शंका त्या राजाला आली, त्या मामल्याचा तपास करतांना आर्किमि़डीजला पाण्याच्या उद्धरणशक्तीचा शोध कसा लागला याची सुरस कहाणी सर्वांना माहीत असेलच. मध्ययुगात होऊन गेलेल्या संत नरहरी सोनाराचे नावही सर्वांनी ऐकले असेल. महाराष्ट्रात सोनार. उत्तर भारतात सोनी, युरोपात गोल्डस्मिथ किंवा गोल्डश्मिट ही नावे प्रचलित आहेत. कदाचित त्या लोकांनी परंपरागत उद्योग सोडून आता नवे व्यवसाय सुरू केले असतील. पुरातन काळापासून ते आजपर्यंत सोनारांचे अस्तित्व आहेच हे या उदाहरणांवरून दिसते. सोनारांच्या कामाच्या स्वरूपावरून "सोनाराने कान टोचले ते बरे झाले.", "नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे.", "सौ सुनारकी, एक लुहारकी।" यासारखे वाक्प्रचार आणि म्हणीही प़डल्या आहेत.

माझी आई, काकू, आत्या वगैरे आधीच्या पिढीतल्या स्त्रियांच्या हातात, बोटात, गळ्यात आणि कानात नेहमी रोजच्या वापरातले सोन्याचे दागिने घातलेले असायचे. शिवाय त्यांचे जास्तीचे आणि खास दागिने कड्याकुलुपांमध्ये सांभाळून ठेवलेले असायचे. त्यातले बरेचसे दागिने त्यांची आई, आजी, सासू, आजेसासू अशा कुणीतरी त्यांच्या अंगावर घातलेले असायचे. ज्या काळात त्यांनी स्वतःसाठी काही नवे दागिने घडवून घेतले होते त्या भूतकाळात सोन्याचा भाव तोळ्याला पंधरा किंवा वीस रुपये एवढाच होता म्हणे. माझ्या बालपणापर्यंत तो गगनाला भिडला होता म्हणजे शंभर रुपयावर गेला होता. त्या काळात आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जरा ढासळलेली असल्यामुळे नव्या दागिन्यांची खरेदी करणे अशक्य झाले होते. वंशपरंपरागत चालत आलेल्या जुन्या दागिन्यांना प्रचंड भावनिक मूल्य असायचे, ते वितळवून त्यातून नवे दागिने करायचा विचारही कोणाच्या मनात येऊ दिला जात नसे. शिवाय हे काम करतांना आपल्या शंभर नंबरी बावनकशी सोन्याचे रूपांतर कशात होईल याची धाकधूक मनात वाटत असे. अशा कारणांमुळे माझ्या शालेय शिक्षणाच्या काळात अगदी क्वचितच सोन्याच्या नव्या दागिन्यांची खरेदी झाली असेल. त्या निमित्याने कोणा मोठ्या माणसांच्या सोबतीने, त्यांचा काही निरोप सांगायसाठी, किंवा विचारणा करायसाठी एकाद्या सोनाराकडे माझे जाणे कधी झालेच नाही.

सुतार, लोहार, कुंभार यासारख्या इतर कारागीरांचे काम नेहमी उघड्यावरच चाललेले असायचे आणि गावातल्या रस्त्यांनी जात येत असतांना ते आपणहून नजरेला पडत असे, पण सोनारांचे काम मात्र कोणाला सहजपणे दिसू नये अशा 'हाय सिक्यूरिटी झोन'मध्ये चालत असावे. प्रखर आच देणारी खास प्रकारची शेगडी, त्यावर ठेवलेली लहानशी मूस, त्यातला वितळलेल्या सोन्याचा चमचमणारा नेत्रदीपक द्रव, सोन्याच्या गोळ्यापासून पत्रा किंवा तार बनवण्याची आणि अलंकारांना निरनिराळे आकार देण्याची नाजुक अवजारे, अत्यंत नाजुक असे दागिने तयार करण्याचे आणि त्यावर सुंदर वेलबुट्ट्या, फुले, पाने वगैरे कोरण्याचे कौशल्य हे सगळे जवळून पाहण्याची मला खूप उत्सुकता असायची, पण तिची पूर्तता होण्याचा योग आजपावेतो आला नाही. त्यासंबंधी सिनेमा आणि डॉक्युमेंटरींमध्ये जेवढे पाहून समजले असेल तेवढेच.

"ऑल दॅट ग्लिटर्स ईज नॉट गोल़्ड" म्हणजे "चमकणारे सगळेच काही सोने नसते." अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. याचाच अर्थ असा होतो की सोन्याशिवाय इतर काही पदार्थदेखील चमकू शकतात, उदाहरणार्थ चांदी. पूर्वीच्या काळातसुद्धा गरीबांना सोने परवडत नसल्यामुळे वेगळ्या प्रकारची चमक असलेल्या चांदीचे दागिने वापरले जात असतच, आजही ते सर्रास वापरले जातात. छुमछुम असा मंजुळ आवाज करणारे काही दागिने तर खास चांदीचेच असावे लागतात. चांदीचे दागिनेसुद्धा सोनारच बनवत आले आहेत. 'चंदार' किंवा 'चांदेर' असा वेगळा व्यावसायिकवर्ग कधीच नव्हता. पितळेचा रंग सोन्याप्रमाणे पिवळा असला तरी त्याला चमक नसते. चार चौघांमध्ये आपले पितळ उघडे पडू नये असेच प्रतिष्ठित लोकांना वाटत असणार. यामुळे पितळेचे दागिने करून घालायला ते धजत नसत. चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा दिला तर ते मात्र हुबेहूब सोन्यासारखे दिसतात. पण ते जपूनच वापरायला हवेत. सोन्याचा पातळसा थर जरासा झिजला की आतली चांदी दिसू लागते. वाढत्या भावामुळे सोने परवडेनासे झाल्याने त्याच्या पर्यायांचा विचार जास्त गांभिर्याने केला जाऊ लागला. सोन्यासारखे चमकणारे आणि ती चमक अधिक काळ टिकवून धरणारे नवनवे मिश्रधातू तयार केले गेले, चमक आणणा-या नवनव्या प्रक्रियांचे शोध लागले आणि त्यांच्यापासून तयार केलेली आर्टिफिशियल ज्युवेलरी मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागली.

गेल्या काही वर्षांमध्ये माणसांच्या जीवनशैलीतही बदल होत गेले. मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय यानिमित्याने महिला वर्ग मोठ्या प्रमाणात किंवा एकएकटीने घराबाहेर पडायला लागला. सोन्याच्या किंमतीमुळे काही प्रमाणात त्याच्या चौर्याचे भय पूर्वीपासून होतेच. मृच्छकटिक या संस्कृत नाटकातही घरफोडी करणारे शर्विलक नावाचे पात्र आहे. पण अलीकडच्या काळात भुरट्या साखळीचोरांची संख्या अतोनात वाढल्यामुळे सोन्याचे दागिने अंगावर लेवून घराबाहेर पडणे धोक्याचे झाले. महिलांना अलंकारांची हौस तर असतेच, यामुळे ती पुरवून घेण्यासाटी आर्टिफिशियल ज्युवेलरीचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. हे कृत्रिम दागिने यंत्रांनी तयार केले जातात. त्यांचे डिझाईन करण्याचा भाग वगळल्यास त्यांच्या निर्मितीत सोनारांचा सहभाग नसतो.

दागिन्यांच्या बाबतीतल्या वाढत्या प्रतिस्पर्ध्यांमुळे सोन्याचे बाजारभाव मात्र कमी झाले नाहीत. सोन्याचे भाव हा अर्थशास्त्राशी संबंधित असलेला वेगळाच विषय आहे. सोनारांच्या व्यवसायावर मात्र याचा विपरीत परिणाम झाला असणार. यांत्रिकीकरणामुळे सर्वच हस्तव्यवसायांवर गदा आली. सुवर्णकार तरी त्यातून कसे वगळले जाणार? एकासारख्या एक अशा अनेक वस्तू तयार करणा-या यंत्रांनी कोणतेही काम चुटकीसरशी होते. त्यांना चालवण्यासाठी लागणा-या कामगारांची संख्या कमी असते आणि हे काम करण्साठी त्या कामगारांकडे हस्तकौशल्य असावे लागत नाही. यंत्रे चालवणे हे वेगळे तंत्र त्यांना शिकून घ्यावे लागते. पारंपरिक पद्धतीने प्रत्येक दागिन्याची घडण हाताने करतांना त्यातले बारीक डिझाईन गुंफणे किंवा कोरून काढणे हे कौशल्याचे आणि चिकाटीचे काम असते, त्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो, त्या प्रमाणात उत्पादन कमी होते आणि खर्च वाढतो. पण या बाबतीत यंत्रांचा वापर करून उत्पादन वाढवता येते. आज तरी जेवढे मला माहीत आहे ते पाहता, शहरातले बहुतेक ग्राहक विश्वासार्ह अशा दागिन्यांच्या दुकानात जातात आणि तिथे ठेवलेले दागिने पाहून त्यातले त्यांना आवडणारे आणि परवडणारे दागिने विकत घेतात. ते हस्तकलेने तयार केलेले असतात की यंत्रांमधून निघालेले असतात याचा विचार किंवा चौकशी करण्याचे काहीच कारण नसते. कोणत्या सोनाराने ते बनवले आहेत याचा त्यांना कधीच पत्ता लागत नाही, ग्राहक आणि सुवर्णकार यांचा थेट संबंध आजकाल येत नाही. सोनार हा कौशल्यपूर्ण व्यवसाय भविष्यकाळात शिल्लक राहिला तरी दुर्मिळ होणार आहे असे मला वाटते. 

.  . . . . .  . . . . .  (क्रमशः)

3 comments:

Anonymous said...

आनंदजी ऐसी अक्षरे वर तुमचा account आहे काय ? तिथल्या चर्चेत भाग घ्यावा ही नम्र विनंती. aisiakshare.com

Anonymous said...

मी site चा ॲडमिन नाही. पण तिथल्या चर्चेत भाग घेतो बर्याचदा.

Anand Ghare said...

मी काही मराठी संस्थळांचा सदस्य आहे. जमेल तेंव्हा अधून मधून तिकडे डोकावून येतो. कुठेही पडीक रहात नाही.