Wednesday, May 08, 2013

दूरसंचार किंवा टेलिकम्यूनिकेशनआपण बोलतो तेंव्हा तोंडामधून निघणारा आवाज ध्वनिलहरींमधून आपल्या आजूबाजूला पसरत जातो. जवळच असलेल्या दुस-या माणसाच्या कानापर्यंत तो पोचतो आणि त्याला आपले बोलणे ऐकू येते. त्याचप्रमाणे आपल्यावर पडलेला प्रकाश परिवर्तित होऊन सगळीकडे पसरत जातो. जवळच असलेल्या दुस-या माणसाच्या डोळ्यांपर्यंत तो पोचतो आणि त्यामुळे त्याला आपण दिसतो. हा माणूस आपल्यापासून दूर जात असतांना त्याला ऐकू येणारा आपला आवाज क्षीण होत जातो आणि काही अंतर गेल्यावर तो पूर्णपणे थांबतो. त्याला आपले बोलणे ऐकू आले नाही तरीसुध्दा आपण दिसत असतो. पण त्याला दिसत असलेली आपली आकृती दूर जाता जाता लहान लहान आणि अस्पष्ट होत जाते आणि अखेर तीही दिसेनाशी होते. तांब्याच्या तारेमधून वाहणारा विजेचा प्रवाह मात्र फारसा क्षीण न होता याही पेक्षा जास्त अंतरावर जाऊन पोचतो. विजेच्या या गुणधर्माचा उपयोग टेलिफोनमध्ये केला जातो. त्याच्या एका बाजूच्या उपकरणामधील मायक्रोफोनमध्ये बोललेल्या आवाजाचे रूपांतर विद्युत लहरींमध्ये होते. त्या लहरी तारेमधून दुस-या बाजूच्या उपकरणापर्यंत (रिसीव्हरपर्यंत) वहात जातात. तिथे असलेल्या  स्पीकरमध्ये या विद्युत लहरींचे रूपांतर पुन्हा आवाजामध्ये होते आणि तिकडच्या माणसाला ते बोलणे जसेच्या तसे ऐकू जाते. अशा प्रकारे दूर असलेल्या व्यक्तीबरोबर यंत्रांद्वारे संपर्क करण्याला 'टेलिकम्यूनिकेशन' (दूरसंचार) किंवा 'टेलकॉम' म्हणतात.

आपल्या कानांना ऐकू न येणा-या किंवा डोळ्यांना न दिसणा-या 'रेडिओ वेव्हज' या प्रकारच्या लहरी आभाळामधून दूरवर पसरत जातात. रेडिओस्टेशनमधील उपकरणांमध्ये मूळ आवाजांचे रूपांतर विद्युत लहरींमध्ये होते आणि  तिथे तयार केलेल्या या विद्युत लहरींची सांगड रेडिओ वेव्हजशी घालून त्यांचे प्रसारण केले जाते. जगभरामधील असंख्य रेडिओ स्टेशनमधून निघालेल्या या लहरी आपल्या आसपास भिरभिरत असतात. आपल्याला हव्या असलेल्या स्टेशनमधून आलेल्या लहरी आपल्याकडील रेडिओमध्ये वेगळ्या काढल्या जातात, त्यांचे 'अँप्लिफिकेशन' करून म्हणजेच त्यांची तीव्रता वाढवून त्या स्पीकरला दिल्या जातात आणि स्पीकरमध्ये त्यांचे पुन्हा आवाजात रूपांतर होऊन आपल्याला तो कार्यक्रम ऐकू येतो. साधारणपणे अशाच प्रकारच्या क्रिया टेलिव्हिजन स्टेशनमध्ये दृष्यांच्याही बाबतीत घडतात आणि तिथून प्रसारित केलेली स्थिर किंवा चलचित्रे आपल्याला घरबसल्या दिसतात, त्यांच्याबरोबर ध्वनीसुध्दा ऐकायला मिळतात. प्रत्यक्ष जगातले आवाज निर्माण झाल्यानंतर क्षणार्धात विरून जातात पण ते रेकॉर्ड करून ठेवण्याची सोय झाल्यानंतर आधी तबकड्यांमध्ये आणि नंतर फितींमध्ये (टेपवर) ते साठवून ठेवता आले आणि त्यांना फोनोग्रॅम किंवा टेपरेकॉर्डरवर वाजवून ते ध्वनि पुन्हा पुन्हा ऐकता येणे शक्य झाले. पुढे जाऊन यात अधिक सुधारणा होत गेल्या. अलीकडल्या काँप्यूटर क्रांतीनंतर हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, काँपॅक्ट डिस्क (सीडी), डीव्हीडी, पेन ड्राइव्ह असे अनेक प्रकारचे स्मृतिकोष (मेमरी) तयार होत गेले आणि आपल्याला हवे ते ध्वनि किंवा चित्रे त्यात साठवून ठेवता आली.

टेलीफोन आणि रेडिओ या वस्तू लहानपणीच माझ्या ओळखीच्या झाल्या होत्या. लग्न करून आपले स्वतंत्र घर थाटेपर्यंत टेलिव्हिजन आणि टेपरेकॉर्डर यांची त्यात भर पडली. अर्थातच या गोष्टींनी घरातली बरीच जागा व्यापून टाकली. एकाच प्रकारचे काम करणारे पण निरनिराळे अँप्लिफायर आणि स्पीकर या उपकरणांमध्ये असतात. कालांतराने रेडिओ आणि टेपरेकॉर्डर यांना एकत्र आणून 'टू इन वन' उपकरण आले त्यामुळे थोडी जागा वाचली, पण रेकॉर्ड केलेली चलचित्रे दाखवणारे व्हीसीआर आले आणि त्यांनी अधिक जागा काबीज केली. नव्वदीच्या दशकात घरातले संगणक (पीसी) आले आणि त्यांच्या पाठोपाठ आलेल्या आंतर्जालाने (इंटरनेटने) टेलिकॉमच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यापूर्वी फक्त रेडिओ स्टेशन किंवा टेलिव्हिजन ट्रान्स्मिशनमधून येणारे कार्यक्रम आपण पाहू किंवा ऐकू शकत होतो. या क्रांतीनंतर दूर कुठेतरी कुणीतरी कसलाही ध्वनि, चित्रे किंवा मजकूर अपलोड करावा आणि आपण घरबसल्या आपल्या पीसीवर तो ऐकावा, पहावा किंवा वाचावा हे सगळे शक्य झाले. ध्वनि, चित्रे किंवा मजकूर यांचे आधी विजेच्या लहरींमध्ये रूपांतर करणे आणि त्यांचे प्रक्षेपण करणे ही कामे आता आपण आपल्या घरी बसून (कदाचित आपल्याही नकळत) करत असतो. तसेच इतरांनी केलेले प्रक्षेपण अतिसूक्ष्म लहरींमधून आपल्या आसपास भिरभिरत असते, त्यातले आपल्याला हवे तेवढे उचलून घेऊन त्यांचे ध्वनि किंवा आकृती यांमध्ये रूपांतर करण्याचे काम आपला संगणक करत असतो. हे काम करण्यासाठी त्यातसुध्दा मायक्रोफोन, अँप्लिफायर आणि स्पीकर असावे लागतात.

दूरसंचारासाठी लागणारे संदेश ('टेलिकम्यूनिकेशन'चे सिग्नल्स)) इकडून तिकडे पाठवण्याच्या पध्दतींमध्येही आमूलाग्र बदल होत गेले. तारायंत्र (टेलिग्रॅम) आणि दूरध्वनि (टेलिफोन) यांचे व्यवहार जगभर पसरलेल्या तारांच्या जाळ्यामधून होत असत. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे प्रसारण त्यासाठी खास उभारलेल्या उंच अशा टॉवरच्या माथ्यावर बसवलेल्या ट्रान्स्मिटरमधून होत असे. अशा टॉवर्सची गणना शहरामधील, देशामधील किंवा जगामधील सर्वात उंच स्ट्रक्चर्समध्ये होत असे. तिकडून आलेले सिग्नल ग्रहण करण्यासाठी घराघरांवर अँटेना लावलेले असत. काही काळानंतर अशा व्यक्तीगत अँटेनांच्या ऐवजी केबलमधून टीव्हीचे सिग्नल घेणे सुरू झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा व्यक्तीगत डिश अँटेनांचे युग आले आहे. टीव्ही प्रोग्रॅम्सचे सिग्नल्स आता थेट अवकाशामधील (स्पेसमधील) कृत्रिम उपग्रहांवरून आपल्या घरातल्या डिशवर येतात. टूजी, थ्रीजी वगैरे तंत्रज्ञानामुळे ते आता आपल्या मोबाइल फोनवर येऊ लागले आहेत. त्यासाठी शहरांमध्ये जागोजागी मायक्रोवेव्ह ट्रान्स्मिशन टॉवर्स उभे राहिले आहेत आणि त्यामधून होणा-या किरणोत्सर्गाबद्दल अलीकडे बरीच चर्चा सुरू आहे. इंटरनेटबद्दलही साधारणपणे अशाच सुधारणा होत गेल्या. सर्वात आधी टेलिफोन लाइन्स, त्यानंतर केबल आणि आता वायरलेस कम्युनिकेशन सुरू झाले आहे.    


आपल्या घरात असलेल्या आपल्या उपयोगाच्या सगळ्या उपकरणांमध्ये ध्वनीचे रूपांतर विजेत  आणि विजेचे रूपांतर ध्वनीमध्ये करणे या समान प्रकारच्या क्रिया होत असतात. मग त्यासाठी वेगवेगळी उपकरणे कशाला हवीत? एकाच यंत्रांद्वारा ही सगळी कामे करता येणार नाही का? असा प्रश्न माझ्या मनात नेहमी उठत असे. वीस पंचवीस वर्षांपूर्वीच माझ्या अल्पमतीने मी टेलिव्हिजन आणि टेपरेकॉर्डर यांना जोडून दिले होते, त्यामुळे टीव्हीवरील गाणी परस्पर टेप करून ठेवणे आणि टेपवरील गाणी टीव्हीच्या जास्त चांगल्या स्पीकरवरून वाजवणे असे उद्योग मी करू शकत होतो. हे काम यंत्राकडून नक्कीच जास्त सुबकपणे होऊ शकले असते. टीव्हीसाठी वेगळा आणि काँप्यूटरसाठी वेगळा मॉनिटर दुप्पट जागा अडवीत होते, ते काम एकच यंत्र का करू शकणार नाही? असे विचार माझ्या मनात येत असत, पण भारतातल्या बाजारात तरी अशा प्रकारचे संयुक्त यंत्र मिळत नव्हते.आणि जागतिक बाजारपेठांमध्ये सुध्दा बहुधा ते नसावे. दहा वर्षांपूर्वीच्या त्या काळातले माझ्या कल्पनेतले असले 'ऑल इन वन' यंत्र सामान्य शोकेसमध्ये ठेवता येण्याजोगे होते आणि टेलिव्हिजन, रेडिओ, टेप रेकॉर्डर, व्हीसीआर, काँप्यूटर आणि टेलिफोन या सर्वांचा समावेश त्या यंत्रात होऊ शकला असता.

असे यंत्र बाजारात न येण्यामागे दोन कारणे असावीत. पहिले म्हणजे सर्वच ग्राहकांना या सगळ्या सोयींची गरज वाटत नसावी, मग त्यांनी नको असलेल्या गोष्टी का विकत घ्याव्यात? दुसरे कारण असे आहे की घरातला एक सदस्य टेलिव्हिजन पहात असतांना दुस-याला इंटरनेटवर जाऊन ई-मेल करायची असती आणि तिस-याला टेलिफोन आला तर ते कसे जमवून घेतील? या पेक्षा या गोष्टी वेगळ्यै असणे एका दृष्टीने बरेच होते.

दहा वर्षांपूर्वी मोबाइल फोन आले होते, पण त्यांचा उपयोग बोलणे किंवा एसएमएस टेक्स्ट पाठवणे एवढाच होता. पुढे त्याला कॅमेरा जोडला गेला आणि घाउक प्रमाणात संगीत किंवा व्हिडिओज साठवणारी मेमरी जोडली गेली. त्यामुळे त्याचा आवाका वाढत गेला. आता सेलफोनवर इंटरनेट पाहण्याची व्यवस्था झाली आहे. त्यावरून सिनेमा किंवा क्रिकेटची मॅचसुध्दा पाहता येईल. म्हणजेच आपल्याला हवे ते आवाज, हवी ती चित्रे दूरदेशी असलेल्या आप्ताला किंवा मित्राला पाठवून देऊ शकतो, त्याने पाठवलेले संदेश, चित्रे आणि आवाज वाचू, पाहू किंवा ऐकू शकतो, तसेच रेडिओ स्टेशन आणि टीव्ही चॅनेल्सवरील कार्यक्रमसुध्दा ऐकू व पाहू शकतो आणि रेकॉर्डही करू शकतो. म्हणजे मला अभिप्रेत असलेले एकत्रीकरण आता प्रत्यक्षात उतरले आहे आणि ते सुध्दा खिशात ठेवता येईल इतक्या लहान आकाराच्या यंत्रात आणि आपल्याला परवडू शकेल इतक्या खर्चात. विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील ही घोडदौड विस्मित करणारी आहे.   

No comments: