Thursday, May 23, 2013

संस्मरणीय समारंभ (पूर्वार्ध)



मध्यप्रदेशातल्या एका लहानशा गावावर निसर्गाची कृपा आहे. सुपीक जमीन, पुरेसा पाणीपुरवठा आणि शेतीला अनुकूल असे हवामान तिथे वर्षभर असते. तिथे राहणा-या कष्टाळू आणि उद्योगशील लोकांनी त्यांच्या अथक प्रयत्नाने तो भाग समृध्द बनवला आहे. गेल्या काही दशकातल्या कृषीक्रांतीने त्या भागात बरीच सुबत्ता आणली आहे. तिथल्या एका प्रतिष्ठित परिवारामधल्या एका मुलाच्या व्रतबंधाच्या सोहळ्याला मी सतरा अठरा वर्षांपूर्वी गेलो होतो. आपल्याकडे विवाहसमारंभांचा जोरदार धूमधडाका वाढत चाललेला आहे आणि त्याचा व्याप आभाळाला जाऊन भिडला आहे हे आपण पहातोच. पण आजच्या काळात मौंजीबंधनाला फारसा धार्मिक अर्थ उरलेला नसल्यामुळे ते कालबाह्य होत चालले आहे असे मला वाटत होते. या पार्श्वभूमीवर पाहता मी त्या वेळी पाहिलेला समारंभ निव्वळ अपूर्व होता. अशा प्रकारे इतक्या थाटामाटाने केलेला मुंजीचा सोहळा मी तरी त्यापूर्वी कधी पाहिला नव्हता. त्यानंतर दहा बारा वर्षांनी म्हणजे पाच वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातल्याच दुस-या भागातल्या एका लहान गावातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांच्या उपनयनाचा कार्यक्रम पाहिला. त्यांच्या परिस्थितीच्या मानाने पाहता त्यांनीसुध्दा चांगलाच थाट केला होता. या सोहळ्याचा वृत्तांत मी मौंजीबंधन या मथळ्याखाली पाच भागांमध्ये या ब्लॉगवर  दिला होता.

असा दिमाखदार सोहळा महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात किंवा गावात पहाण्याचा मात्र एकही योग गेल्या पन्नास वर्षात माझ्या नशीबात आला नाही. पण ही प्रथा आता बहुधा नाहीशी होणार असेच वाटत असतांना गेल्या दहा वर्षात मला अनेक व्रतबंध समारंभ पहायला मिळाले. यातल्या बहुतेक मुलांचे आईवडील इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत, काही जण परदेशात जाऊन तिकडे राहून आले आहेत, त्यातल्या काही जणांनी आंतरजातीय प्रेमविवाह केले आहेत, काही माता एरवी नेहमी जीन पँटमध्ये वावरत असतात. या लोकांनी आपल्या मुलांच्या साग्रसंगीत मुंजी लावाव्यात हे मला अपेक्षित नव्हते, पण प्रत्यक्षात ते समारंभ साजरे केले गेले. त्यांचे स्वरूप मात्र बरेच वेगळे होते. मुंबई, पुणे आणि नागपूर यासारख्या महानगरांमधल्या एकाद्या चांगल्या हॉटेलातला लहानसा कॉन्फरन्स हॉल अर्ध्या दिवसासाठी भाड्याने घेऊन तिथे हे समारंभ साजरे झाले. उपस्थित असलेले काही आप्तेष्टही अर्ध्या दिवसाची रजा घेऊन आले होते. सगळा कार्यक्रम 'औटसोर्स' केलेला असल्यामुळे घरातली मंडळीसुध्दा वेळेवर पाहुण्यांसारखी आली आणि कार्यक्रम उरकून परत गेली. एक कौटुंबिक आणि मित्रमैत्रिणींचा मेळावा किंवा 'फॅमिली अँड फ्रेन्ड्स गेट टुगेदर' असेच याचे स्वरूप दिसले आणि बहुधा तेवढाच मर्यादित उद्देश त्याच्या आयोजनाच्या मागे असावा. याबद्दलसुध्दा मी व्रतबंध या विषयावर दोन लेख पूर्वी या स्थळावर लिहिले आहेत.

या सगळ्यांची आता आठवण होत आहे कारण या महिन्यात पुन्हा एकदा मध्यप्रदेशातल्या समृध्द गावी असाच एक महोत्सव पहायला मिळाला. आजकाल मे महिन्यामध्ये रेल्वेची तिकीटे आयत्या वेळी मिळणे अशक्य झाले आहे याचा विचार करून या समारंभाचा मुहूर्त चार महिन्यांपूर्वीच ठरवून आमंत्रणे केली गेली होती. तरीसुध्दा पुण्याहून येणा-या काही मंडळींना सोयिस्कर गाडीचे रिझर्वेशन मिळालेच नाही. इतर काही लोकांनासुध्दा मिळेल त्या गाडीचे आणि मिळेल त्या वर्गाचे तिकीट काढून ठेवावे लागले. असे असले तरी बोलावलेल्यांपैकी जवळ जवळ ऐंशी ते नव्वद टक्के आप्तेष्टांनी हजेरी लावली.

मध्य भारतामधला मे महिन्याचा कडक उन्हाळा अपेक्षित होताच. रेल्वेगाडीच्या एअरकंडीशन्ड स्लीपर डब्यातून बाहेर पडून रेल्वे स्टेशनवर पाय ठेवताच त्याची तीव्र धग जाणवू लागली. कार्यस्थळ मात्र अत्यंत सुखावह होते. तिथल्या ऐतिहासिक वाड्याच्या मातीच्या जाड भिंतींमधून ऊष्णतेचा तितकासा शिरकाव आतपर्यंत होत नाही, शिवाय प्रत्येक खोलीगणिक कूलर बसवून आतली हवा थंड ठेवली होती. समोरच्या पटांगणात मोठा मांडव घालून जवळ जवळ सगळी मोकळी जागा आच्छादित केली होतीच, त्यातही जागोजागी कूलर ठेवून थंड हवेचे झोत सोडले होते. आजूबाजूला बरीच मोठमोठी झाडे असल्यामुळे हवेत थोडा नैसर्गिक थंडावाही आला होता. या सगळ्यांमुळे मांडवातले वातावरण थंडगार नसले तरी सुसह्य झाले होते.

मुंजीच्या कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीपासूनच पटांगणात मांडव घातला होता, तसेच जवळच्या शहरातला एक मोठा केटरर त्याच्या वीस पंचवीस सहाय्यकांना सोबत घेऊन दाखल झाला होता. आम्ही जाऊन पोचलो तेंव्हा मांडवाच्या एका भागात टेबलांची लांबचलांब रांग लावून ठेवलेली दिसली. सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळची भोजने आणि दोन वेळा चहा कॉफी वगैरे सगळे काही केटररने पुरवायचे होते. जेवणाखाण्याच्या वेळी सगळे पदार्थ टेबलांवर मांडून ठेवले जात होते. ते गरम राहण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या शेगड्या आणि खास बनावटीची अन्नपात्रे आणलेली होती. वाढण्यासाठी विशिष्ट गणवेशधारी वाढपी (वेटर) उभे असायचे. इतक्या ऊष्ण हवेत टाय परिधान करून ते लोक कसे काम करत असतील याचे मला नवलही वाटत होते आणि त्यांची दयाही येत होती. हे लोक सोडल्यास संपूर्ण गावात एकही टायधारी माणूस दिसला नसता.   

मुंजीसारख्या धार्मिक विधीचे ज्ञान असणारे भटजीसुध्दा आता दुर्मिळच झाले असणार. या कार्यासाठी एका वेदशास्त्रसंपन्न पुरोहितांना बाहेरून बोलावले होते. मध्यप्रदेशाकडच्या आषेत सगळ्या भटजींना सगळेच लोक 'गुरू' म्हणतात. त्या भागात 'गुरू' ही एक उपाधी असते. पुण्याहून आलेले हे 'एकनाथगुरू' बहुधा अजून विशीतलेच असतील, पण सर्व धार्मिक विधी शिकलेले होते. मूळ कर्नाटकामधून धार्मिक मंत्रांचे शिक्षण घेऊन ते पुण्याला आले आणि विविध प्रकारची धार्मिक कृत्ये करण्यासाठी त्यांचे भारतभर भ्रमण चालले असते. असेच एक तेलुगूभाषिक स्वामी की मूर्ती मला इग्लंडमध्ये भेटले होते. मला हे दोघेही गृहस्थ म्हणजे 'एंटरप्राइजिंग' माणसे कशी असतात याची उदाहरणे वाटली. नम्रता, वाक्चातुर्य, व्यवहारकुशलता, लवचीकपणा यासारखे त्यांच्यातले काही गुण अगदी थोड्या वेळाच्या सहवासातसुध्दा मला जाणवले.

खांद्यावर नॅपकीन टाकून एक गृहस्थ मांडवात सगळीकडे फिरतांना दिसत होता. केंव्हाही कुणालाही कशाचीही गरज पडली तर ते काम त्याला सांगितले जात होते आणि ते काम तो लगेच करवून घेत होता. मग ते काम म्हणजे विटा रचून हवनासाठी कुंड तयार करायचे असो किंवा मंगलाष्टकाच्या फोटोकॉपी काढून आणायच्या असोत. इलेक्ट्रशियन, प्लंबर वगैरे सर्व्हिसेससाठी तो सिंगल पॉइंट काँटॅक्ट दिसत होता. पुलंच्या नारायणाचा हा आधुनिक अवतार असावा असा विचार माझ्या मनात येऊन गेला. पण त्याचा रुबाब पाहता त्याला 'इव्हेंट मॅनेजर' म्हणावे असे मला वाटले. त्याच्या हाताखाली प्रत्यक्ष काम करणा-या सेवकांची फौज होती. त्या सर्वांवर तो लक्ष ठेवत होता. या कामासाठी त्याला मुद्दाम नेमला होता की कंत्राट दिले होते की तो मैत्रीचे कर्तव्य पार पाडत होता हे मला समजले नाही. या मंगल कार्याला आलेल्या बहुतेक सगळ्या नातेवाईक मंडळींना मी ओळखत तरी होतो किंवा माझ्याशी त्यांची ओळख करून दिली गेली. पण हे गृहस्थ मात्र सारखे समोर येत असले तरी कोणीही त्यांची माझ्याशी ओळख करून दिली नाही. त्यामुळे मला तो नातेवाईक वाटला नाही.

 . . . . .  . . . . . . . . .  (क्रमशः)

No comments: