Friday, April 26, 2013

एप्रिल फुल्ल

नोकरीत असतांना जसजशी वरची पदे मिळत जातात, तसतसा कामाचा व्याप आणि जबाबदा-या वाढत जातात, दिवसातला सगळा वेळ त्यात निघून जातो. सेवानिवृत्तीच्या वेळी आपण आपल्याला मिळालेल्या सर्वात मोठ्या पदावर असल्यामुळे कामांचा बोजाही सर्वात जास्त असतो. "त्यानंतर ही जबाबदारीची कामे एकदम शून्यावर आल्यामुळे जीवनात एक प्रचंड पोकळी निर्माण होते, दिवसातला एक एक क्षण जाता जात नाही." वगैरे वर्णने मीसुध्दा अनेक वेळा वाचली होती, पण मला त्या अवस्थेची कधीच भीती मात्र वाटली नाही. वेळेअभावी केल्या न गेलेल्या कित्येक कामांचा ढीग मनाच्या एका कोप-यात जमा झाला होताच. रिटायरमेंटनंतर एक एक करून ती हाती घ्यायची आणि सावकाशपणे पूर्ण करायची असे ठरवले असल्यामुळे आता मिळणारा रिकामा वेळ ही माझ्या दृष्टीने 'बॅकलॉग' भरून काढण्याची संधी होती.

सेवानिवृत्त झाल्यानंतर मी त्या संधीचा फायदा घ्यायचे ठरवलेलेच होते. जीवनासाठी किंवा कुटुंबासाठी अत्यावश्यक असलेली कामे मी अर्थातच जेंव्हा जेंव्हा त्यांची गरज पडली तेंव्हा काही करून वेळच्या वेळी पूर्ण केलेली होती. ही उरलेली बहुतेक कामे केवळ स्वतःच्या आनंदासाठी करायची असल्यामुळे त्यांना यापूर्वी पुरेशी प्राथमिकता (प्रायॉरिटी) मिळालेली नव्हती. ती न केल्यामुळे माझे किंवा कुणाचेच काही अडलेले नव्हते आणि पुढेही अडणार नव्हते. त्यामुळे आता घाई गडबड न करता त्यात मन रमवून त्याची मजा घेत घेत ती करायची होती. यात अनेक प्रकारची कामे होती. काही सिनेमे, नाटके, संगीताचे कार्यक्रम वगैरे पहायची हौस उरली होती, तर काही सुरम्य किंवा सुप्रसिध्द ठिकाणे पहायची तीव्र इच्छा राहून गेली होती, मनाने जवळच्या पण दूर राहणा-या काही आप्तेष्टांना जाऊन भेटायचे होते, काही गाजलेली पुस्तके वाचायची होती, काही हस्तकौशल्याच्या वस्तू तयार करायच्या होत्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनेक गोष्टी शिकायच्या राहून गेल्या होत्या. या सगळ्यांना 'कामे' म्हणावे की नाही याबद्ल मतभेद होऊ शकतो, पण मला हे सगळे करायचे होते असे म्हणता येईल.

वयोमानाप्रमाणे हात, पाय, कान, डोळे वगैरे इंद्रिये पूर्वीसारखी सक्षम राहिली नव्हती आणि आता त्यांच्यात सुधारणा होण्याची फारशी शक्यता नव्हती. त्यांच्याकडून होईल तेवढे काम करवून घेणे एवढेच माझ्या हातात होते. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून दृष्टी सुधारून घेतली असे काही उपाय करून त्यांचा थोडा उपयोग झाला, पण त्यानंतर वेगळ्या प्रकारचे निर्बंधही पडले. यापुढे आपली शारीरिक क्षमता पाहून शरीराला सांभाळून जेवढे होईल तेवढे करणे आवश्यक होते. थोडक्यात म्हणजे आता फारशी धावपळ न करता, उन्हापावसात बाहेर न हिंडता, अवजड वस्तू न उचलता वगैरे पथ्ये सांभाळून काय करणे शक्य आहे ते पाहून हातात घेणे भाग होते.

अशासुध्दा अनंत गोष्टी करण्यासारख्या होत्या. त्यातल्या संगणकावर मी आपले लक्ष केंद्रित केले. नोकरीवर असतांना तिथे चालणारे काँप्यूटरवरील काम मी चांगले आत्मसात केले होते, पण प्रत्यक्ष काम करण्यासाठी माझ्या हाताखाली सहाय्यकांची फौज होती. आता मात्र कोणाच्याही सहाय्याशिवाय स्वतःच शिकायचे, प्रयोग करून पहायचे आणि पुढे जायचे होते. या क्षेत्रात इतक्या वेगाने बदल होत असतात की हे शिकणे सतत चालत राहते. नवनवे सॉफ्टवेअर येत असते हे ठीक आहे, पण त्याबरोबर जुने अदृष्य होत असते हे त्रासदायक वाटते, शिवाय नव्या सॉफ्टवेअरसाठी जितकी मेमरी आणि स्पीड लागते त्यासाठी आपला जुना काँप्यूटर कमी पडतो, त्याला अपग्रेड करत रहावे लागते. या सगळ्यामध्ये खूप वेळ जातो. इंटरनेटवर झालेल्या क्रांतीमुळे एक संपूर्ण वेगळे जग आपल्यासमोर उभे राहिले आणि मुख्य म्हणजे आपणसुध्दा त्यात नवी भर घालू शकतो ही जाणीव झाल्यावर तर दिवसाचा बराच वेळ त्यात मजेत जाऊ लागला. यातूनच एक ब्लॉग सुरू केला, तो वाचणारे मिळाले आणि हुरुप आला, त्यानंतर एक एक करून आणखी दोन ब्लॉग मराठीत सुरू केले आणि या वर्षी इंग्रजी भाषेत माझा पहिला ब्लॉग सुरू केला. या सगळ्यांना चालवत राहणे हे सुध्दा एक 'काम' होऊन बसले. 

वयोमानाप्रमाणे स्मरणशक्ती थोडीशी मंदावते आणि विशेषतः विशिष्ट वार, तारखा वगैरे लक्षात रहात नाहीत. एकादी गोष्ट विसरली जाऊ नये यासाठी जेंव्हा ती लक्षात असते तेंव्हाच मी कॅलेंडरवर त्या तारखेला लिहून ठेवायला सुरुवात केली. दिवसातून एकाद्या वेळी तरी काही कारणाने कॅलेंडर पाहिले जाते आणि तेंव्हा ती खूण दिसल्यामुळे ती गोष्ट जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहते. बहुतेक महिन्यांमध्ये अशा चार पाच खुणा असायच्या, पण आज मी कॅलेंडर पाहिले तर त्यात जिकडे तिकडे खुणाच खुणा भरलेल्या होत्या. या महिन्याची सुरुवातच आधार कार्डाने झाली. हे कार्ड मिळायला सुरुवात झाल्यापासून मला हुलकावण्या देत आले होते. याची नोंदणी कुठे करायची याचा मला पत्ता लागंस्तोवर त्या केंद्रावर प्रचंड गर्दी होत असे आणि गर्दी थोडी कमी झाल्यावर जाऊ म्हंटले तर ते केंद्रच बंद झालेले असे गेली दोन वर्षे चालले होते. या वर्षी मात्र मी नेटाने पाठपुरावा केला, त्यासाठी निदान दहा चकरा मारल्या आणि एका केंद्रावर ३ एप्रिलची तारीख मिळवून घेतली. त्या दिवशी सहकुटुंब तिथे जाऊन हाताचे ठसे, डोळ्यांचे रंग वगैरेंची नोंद करून झाली. त्याच्या आधी सगळी कागदपत्रे गोळा करणे, त्यांच्या झेरॉक्स प्रती काढणे वगैरे कामे करून घेण्यात वेळ गेला, पण सगळी तयारी व्यवस्थितपणे केलेली असल्यामुळे आमचे काम एकाच खेपेत आटोपले. त्या दिवशी तिथे आलेल्या काही लोकांना अमका तमका कागद घेऊन येण्यासाठी धावपळ करतांना पाहिले आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली.   

एप्रिलच्या दुस-या आठवड्यात माझ्या वडील भावाच्या वर्षश्राध्दासाठी बार्शीला जाऊन पुणेमार्गे परत आलो. या प्रवासासाठी तिकीटांचे आरक्षण करणे, त्यात आयत्या वेळी झालेल्या बदलांमुळे परतीचे तिकीट रद्द करणे वगैरेंमध्ये दोन दिवस गेले आणि चार पाच दिवसांचा प्रवास करून परत येईपर्यंत गुढी पाडवा आला, त्याची तयारी करणे, त्यानिमित्याने हॅप्पी न्यूयीअर विश करणा-या मित्र आणि आप्तेष्टांशी बोलणे, त्यांच्या संदेशांना उत्तरे देणे वगैरे होत राहिले. आमच्या ऑफिसमधून निवृत्त झालेल्या सहका-यांचा आम्ही एक गूगल ग्रुप बनवला आहे. त्यावर रोजच संदेशांची देवाण घेवाण होत असते. अधून मधून प्रत्यक्ष भेटावे या उद्देशाने आम्ही या महिन्यात एक स्नेहसंमेलन भरवले. मी त्यातही पुढाकार घेतल्यामुळे मित्रांना ई मेल पाठवून तसेच टेलीफोनवर बोलून आग्रह करणे, किती जण जमत आहेत याची मोजदाद ठेवणे आणि त्यानुसार त्यासाठी हॉटेल ठरवणे, तिथले रिशर्वेशन करणे, तिथे पोचण्याचे नकाशासह सचित्र मार्गदर्शक पत्रक तयार करणे, वगैरे कामे आठ दहा दिवस पुरली आणि पुढले तीन चार दिवस त्याचे वृत्तांत, छायाचित्रे आणि अनेक मित्रांचे त्यावरील साद प्रतिसाद पाहण्यात आणि वाचण्यात गेले..

या नव्या वर्षात मी 'आगे बढो इंडिया' अशा विचित्र नावाच्या एका संस्थेचा सभासद झालो आणि त्यांच्या सहाय्याने घरबसल्या मराठी नाटकांची तिकीटे मिळण्याची सोय झाली. रिटायरमेंटनंतर माझे नाट्यप्रेम वाढले असले तरी आधी वर्तमानपत्रामध्ये नाटकांच्या जाहिराती बघून त्यातले कोणते नाटक पहायचे हे ठरवणे, नाट्यगृहाच्या वेळेमध्ये तिथे जाऊन तिकीटांचे अॅडव्हान्स बुकिंग करणे वगैरे जास्तीची कामे जमत नसल्यामुळे आमच्याकडून दोन तीन महिन्यांमध्ये एकादे नाटक पाहिले जात असे. या मराठी नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात 'आगे बढो इंडिया'च्या सौजन्यामुळे एकदम तीन नाटके पाहून घेतली.

माझ्या वयाच्या बहुतेक लोकांच्या मुलांची लग्ने होऊन गेली आहेत आणि नातवंडे खूप लहान आहेत, यामुळे लग्नसमारंभांच्या आमंत्रणांचा आकडा आता अगदी कमी झाला होता. पण या वर्षी या महिन्यात कसला योग आहे कुणास ठाऊक, पण एक उत्तर भारतीय, एक मराठी आणि एक शीख अशी तीन लग्ने आली. ते तीघेही जवळचे मित्र असल्यामुळे त्या लग्नांना जायचे हे तर नक्कीच. नोकरीत असेपर्यंत कामामुळे वेळ नाही किंवा मुलांच्या शाळाकॉलेजांना सुटी नाही, त्यांची परीक्षा आहे अशी काही कारणे किंवा सबबी असायच्या. आता तशी कारणे उरली नाहीत आणि उगाच कशाला द्यायची? या निमित्याने अनेक लोक भेटतात, जुन्या आठवणी निघतात, नव्या ओळखी होतात, यामुळे आम्ही अशा संधी सोडत नाही. त्या कार्यक्रमांसाठी क२लेंडरवर तीन दिवसांचे बुकिंग करून टाकले.

याशिवाय निरनिराळे स्पेशॅलिस्ट आणि जनरल डॉक्टर, पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीज वगैरेंच्या अॅपॉंइंटमेंट्स तीन चार दिवशी होत्या, त्यासाठी वाशीपासून पेडर रोडपर्यंत मुंबईच्या निरनिराळ्या भागांमध्ये जाऊन येण्यात एक संपूर्ण दिवस निघून जात असे. या महिन्यातच सौ.चा वाढदिवस आला, त्यानिमित्य बाहेर खाणेपिणे झाले. तीन चार पाहुणे येऊन, भेटून आणि एकादा दिवस राहून गेले. त्यांची थोडीशी सरबराई केली. हे सगळे करता करता एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे या वेळचा एप्रिल महिना अगदी 'फुल्ल' गेला. अजून दोन तीन दिवस शिल्लक असले तरी त्या दिवसांचे कार्यक्रम कॅलेंडरवर लिहिलेले आहेत. त्यामधून वेळ काढून हा लेख लिहिण्याइतका वेळ तरी मिळेल की नाही याची शेका असल्याने तो आजच लिहून टाकला. १ एप्रिलच्या दिवशी 'एप्रिल फूल' म्हणणे आता जुने झाले. मागे एकदा मी 'एप्रिल फुले' यावर लिहिले होते, आता या वर्षी 'एप्रिल फुल्ल' !

No comments: