Tuesday, November 06, 2012

चंद्राची गाणी - भाग ३ - विरहगीते

चंद्र आणि प्रेम यांच्यात किती जवळचा संबंध आहे हे मागील भागात दिलेल्या गीतांवरून पाहिलेच आहे. चंद्राच्या आभाळातल्या अस्तित्वानेच जशा समुद्रात लाटा उठतात तशाच प्रेमिकांच्या मनातही उठतात. ते एकमेकांच्या सहवासात असतील तर त्यांच्या मनातल्या भावनांचा आवेग जास्तच वाढतो. पण असे चांदण्या रात्रीच्या धुंदीमध्ये एकत्र येऊन न्हाऊन निघणे सर्वच प्रेमिकांच्या नशीबात नसते. त्यातले अनेक दुर्दैवी जीव विरहव्यथा भोगत असतात. त्यातलीच कुणी आर्जवे करते (किंवा करतो) की या पौर्णिमेच्या रात्री एकदा तरी येऊन मला भेटून जा, कधीपासून माझ्या मनात साठून राहिलेल्या मृदु भावना इतक्या प्रबळ आहेत की त्या वाळवंटातही फुलबाग फुलवतील, अंधालाही दिसतील आणि सुखवतील. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी रचलेल्या या गीतामधील भावना कवीमनाच्या संगीतकार यशवंत देव यांनी अचूक ओळखून सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजातून रसिक श्रोत्यांपर्यंत या गाण्यातून पोचवल्या आहेत. या गाण्यात विरहव्यथेपेक्षा आर्जव आणि आशा यांना जास्त महत्व आहे.



रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा ।
जाणिवा थकल्या जिवांच्या एकदा ऐकून जा ।।

निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी ।
मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानांतुनी ।
जागती नेत्रांतली ही पाखरे पाहून जा ।।१।।

पाखरे पाहून जा, जी वाढली पंखाविना ।
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना ।
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा ।।२।।

अर्थ तू ऐकून जा, फुलवील जो वैराणही ।
रंग तो पाहून जा, जो तोषवी अंधासही ।
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा ।।३।।


उंबरठा या चित्रपटात एका महिलासुधारगृहात रहात असलेली एक मदनिका तिथल्या नीरस वातावरणात अस्वस्थ होत असते. तेथे यायच्या आधी ती पुरुषांच्या सहवासाला चटावलेली असते. चांदण्या रात्री त्या कामिनीला हा मदनावेग अनावर झाला आहे. तिच्याच शब्दात सांगायचे तर,

चांद मातला मातला, त्याला कशी आवरू ?
अंगी वणवा चेतला, मला कशी सांवरू ?

अशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा,
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू ।।

आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा,
वेड्या लहरींचा पिंगा, बाई झाला की सुरू ।।

गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा,
लाख चुंबनांचा मारा, चांद लागला करू ।।

याची प्रेमपिशी दिठी, लावी चंदनाची उटी,
झाली अनावर मिठी, कुठे धीर मी धरू ?

चांद अंगणी गगनी, चांद नांदतो भुवनी,
चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू ।।

कवी वसंत बापट, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या सर्व सोज्ज्वळ स्वभावाच्या कलाकारांनी मिळून हे वेगळ्या प्रकारचे अप्रतिम गीत आपल्याला दिले आहे.
आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाये तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी हे हिंदी गाणे एके काळी खूप गाजले होते आणि अजून सर्वांच्या स्मरणात राहिले आहे. अशाच अर्थाचे एक मराठी गीत कवी मधुकर जोशी यांनी लिहिले आणि कवीमनाचे संगीतकार यशवंत देव यांनी कृष्णा कल्ले या गुणी गायिकेकडून गाऊन घेतले.

कुणा जोडप्याची भेट झाली आहे पण अर्धेमुर्धे बोलणे होईपर्यंत पुन्हा त्यांच्या विरहाचा क्षण आला आहे. त्यांची व्यथा ते सांगतात,

चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली,
भेट अर्धी, गीत अर्धे, प्रीत अर्धी राहिली ।।

मोकळे बोलू कसे मी, शब्द ओठी थांबले,
लाज-या डोळ्यात माझ्या चित्र अर्धे रेखिले,
ओठ अर्धे विलगले, अर्ध उकले पाकळी ।।

बिलगुनी रमल्या तरूंशी पेंगलेल्या साउल्या,
तो निळा एकांत तेथे भावना भारावल्या,
धुंद झाल्या दशदिशा, रात्रही ओलावली ।।

वाकले आकाश खाली दूरच्या क्षितिजावरी,
चांदणे चुंबीत वारा झोपला वेलीवरी,
भेट घ्याया सृष्टि ही अर्ध झुकली, वाकली ।।


कधी कधी असे होते की प्रियकर आपल्या प्रियेला भेटलेला आहे, पण तो बिचारा इतका थकलेला भागलेला असतो की ती जवळ असतांनासुध्दा तो चक्क झोपून जातो, चांदण्या रात्रीचा आनंद पूर्णपणे उपभोगण्याचं त्राणच त्याच्यात नसतं. या अवस्थेत वियोग नसतांनासुध्दा तिचे मन विरहावस्थेच्या जवळ असते. तेंव्हा अतृप्तावस्थेतील ती म्हणते,

तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास कां रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?

अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला ।
अजुन मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का रे?

सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे?

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा ।
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे?

उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा ।
तू किनार्‍यासारखा पण कोरडा उरलास का रे?

कवीवर्य स्व. सुरेश भट त्यांच्या कवितांमधून आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. त्यातली मध्यवर्ती कल्पनाच अफलातून असते आणि त्यातून हवे तेवढे निरनिराळे अर्थ काढता येतील अशी गूढ पण कुशल शब्दरचना असते. वर वर दिसणा-या अर्थाहून वेगळा आणि अधिक भेदक अर्थ त्यात दडलेला आहे असे कोणा विद्वानाने सांगितले होते. अकाली निधन पावलेल्या पतीच्या पत्नीचा आकांत त्याला त्यात दिसला. कोणाला यात पुरुष आणि प्रकृती किंवा जीव आणि आत्मा यांची अवेळी झालेली ताटातूट सापडली.

संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर सुरेश भटांचे चांगले मित्र होतेच आणि त्यांच्या कवितांचा अर्थ समजून घेऊन त्याला तितकीच अफलातून चाल लावत असत. या गाण्यातला भाव पाहता त्यांनी हे गाणे आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतले आणि या दोघांनी मिळून या गाण्यात किती आर्ततेचे भाव आणले आहेत याला तोड नाही.


मधुचंद्र चित्रपटातल्या बिचा-या नायक नायिकांचे नशीबच विचित्र असते. त्या दोघांना त्यांच्या लग्नानंतर मधुचंद्राची रात्रसुध्दा तुरुंगवासामध्ये वेगवेगळी घालवावी लागते. बिच्चारे म्हणतात,

मधू इथे अन चंद्र तिथे, झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात।
एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे?
हवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात, अजब ही मधुचंद्राची रात।।

माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले ।
ताटातुटीने सुरेख झाली, संसारा सुरवात ।
अजब ही मधुचंद्राची रात ।।

किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्‍तीत ।
अशी निघाली लग्‍नानंतर, वार्‍यावरची वरात ।
वार्‍यावरची वरात, अजब ही मधुचंद्राची रात ।।

अशा बिकट पण विनोदी प्रसंगाला साजेसे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले. संगीतकार एन्‌. दत्ता हे मुख्यतः हिंदी चित्रपटांना संगीत देत असत. त्यातले काही खूप गाजलेही होते. या मराठी चित्रपटासाठी हे द्वंद गीत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायिले.

वरील गाण्यातला चंद्र दोघांना उदासच बनवतो. तरुण आहे या गाण्यात त्याची जादू पुरेशी ठरत नाही, तशीच प्रेमाचा भर ओसरून गेला किंवा काही कारणाने त्यांच्यात कटुता आली तरी होते. काही जोडप्यांच्या बाबतीत असं होतं की प्रेमाचा पहिला बहर ओसरून गेल्यावर वास्तवाचे कांटेकुटे बोचू लागतात आणि व्यथित अंतःकरणाने तो म्हणतो,

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी,
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी ।।

नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे ।
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे ।
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी ।।

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे ?
मी ही तोच तीच तू ही, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी ।।

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा ।
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा ।
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी ।।

कवयित्री शान्‍ताबाई शेळके आणि संगीतकार व गायक सुधीर फडके यांचे हे गीत म्हणजे भावगीतांच्या क्षेत्रातला एक मैलाचा दगड ठरले किंवा ते त्यातले एक उत्तुंग असे शिखर आहे असेही म्हणता येईल.
प्रत्येकाचे प्रेम सफल होतेच असे नाही. त्यात अनेक अडचणी येतात. काही वेळा त्यातून मार्ग काढणे अशक्यच असते. अशा अपरिहार्य अशा प्राप्त परिस्थितीपुढे नमते घेऊन कुणाकुणाला प्रेम वगैरे विसरून जावेच लागते. अशी एक अभागिनी म्हणते,

चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा ।
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा ।।

आणिले धागे तुझे तू मीहि माझे आणिले ।
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरून जा ।।

मी दिली वचने तुला अन्‌ वाहिल्या शपथा खुळ्या ।
शब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरून जा ।।

प्रीतिचे हितगूज ते, कुजबुज ती, रुसवेहि ते ।
ते हसू अन्‌ आंसवे ती, आज तू विसरून जा ।।

चंद्र ज्याला साक्ष होता, जे फुलांनी पाहिले ।
रेखिले प्राणांत जे मी तेच तू विसरुन जा ।।

कवयित्री शान्‍ता शेळके यांच्याच या गाण्यातला चंद्र साक्षीला होता, पण तो कसली मदत करू शकणार ? वसंत पवार यांनी रचलेल्या चालीवर माणिक वर्मा यांनी ही काकुळतीची विनंती किती प्रभावीपणे केली आहे ?



चंद्र किंवा चांदणे यांचा ओझरता उल्लेख तर अनेक गीतांमध्ये येतो. कुणाच्या मनात पूर्वीच्या गोड आठवणी येतात. त्या आपल्या येतात आणि जातात आणि कधी कधी ते क्षण पुन्हा अनुभवायची आशाही त्यांना चंद्र दाखवतो.

चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला,
जरा लाजुनी, जाय उजळुनी, काळोखाच्या राती,
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती ।।

किंवा

अजून फिक्कट चंद्राखाली, माझी आशा तरळत आहे,
गीतामध्ये गरळ झोकुनी अजून वारा बरळत आहे ।।
अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ।
अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते ।।







(क्रमशः)

No comments: