Saturday, November 10, 2012

चंद्राची गाणी - भाग ४ - इतर गीते

निसर्गातून सगळ्या चांगल्या गोष्टी वेचून घेण्याच्या इच्छेने एक प्रेमिका चंद्रिकेकडे प्रीतीचे वरदान मागते. चंद्राला यावेळी चंद्रिका असे संबोधून ती तिला आपली मैत्रिण बनवते. यासाठी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र कामाचा नाही, द्वितीयेची नाजुक कौरच हवी.


दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी, रानहरिणी दे गडे भीती तुझी ।।
मोहगंधा पारिजाता रे सख्या, हांसशी कोमेजतां रीती तुझी ।।
रे कळंका छेदितां तुज जीवनी, सुस्वरे जन भारिते गीती तुझी ।।
सोशितोशी झीज कैसी चंदना, अपकारिता उपकार ही नीती तुझी ।।

या गाण्यामधील सर्व उदाहरणे ही त्यागाची आहेत. पारिजाताचे फूल, वेळूचे (बांबूचे) झाड, चंदनाचे खोड हे सर्व स्वतः नष्ट होऊन त्यातून दुस-यांना सुखी करतात. सुरेख दिसणारी चंद्राची कोर आणि भित्री हरिणी यांना त्यांच्या पंक्तीत का बसवले आहे ते कवीवर्य राजा बढेच जाणोत. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या दीदी लताताई यांनी जनसंमोहिनी रागामधील मधुर सुरावटीतून श्रोत्यांवर अजब मोहिनी घातली आहे.


पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राची उपमा सुंदर चेहे-याला नेहमी दिली जातेच तर द्वितीया आणि तृतीयेची चंद्रिका अत्यंत आकर्षक असते. अंगाने थोड्या भरलेल्या चवतीच्या चंद्रकोरीचा सुध्दा केवढा झोक?

कशी झोकांत चालली कोळ्याची पोर ?
जशी चवतीच्या चंद्राची कोर ।।

फेसाळ दर्याचं पाणी खारं ।
पिसाट पिऊनी तुफान वारं ।
उरात हिरव्या भरलं हो सारं ।
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर ।।१।।

टाकून टाकशील किती रं जाळी ?
मेघाची सावली कुणाला घावली ?
वा-यानं अजूनी पाठ नाही शिवली ।
वाटेला बांग दिली हिच्यासमोर ।।२।।

केसाची खूणगाठ चाचपून पाहिली ।
फुलांची वेणी नख-यानं माळली ।
कुणाला ठाव रं कुणावर भाळली ।
प्रीतीचा चोर तिला राजाहून थोर ।।३।।

चवतीच्या चंद्रासारखे देखणे रूप मिळालेल्या पोरीने ते अधिक खुलून दिसावे यासाठी थोडा साजश्रुंगार केला कारण राजापेक्षासुध्दा जास्त महत्वाचा असा तिच्या प्रीतीचा चोर तिला भेटणार असावा. कोळ्याच्या देखण्या मुलीचे वर्णन करतांना कविवर्य गदिमांनी ग्रामीण भागातील जीवनाचे सुंदर दर्शन या गीतात घडवले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील चित्रपटांना मधुर संगीत देऊन ज्यांनी अमर केले असा वसंत देसाई यांनी बांधलेल्या स्वररचनेला आपल्या गोड आवाजातल्या ठसक्याने आशा भोसले यांनी अधिकच बहार आणली आहे.


प्रेम, सौंदर्य वगैरे दर्शवणारी चन्द्राची इतकी रूपे पाहिली. आता थोडी वेगळी रूपे पाहू. यमुनेच्या पलीकडे रहाणा-या कुब्जेला पहाटेच्या वेळी श्रीकृष्ण भेटायला गेला त्या प्रसंगाचे वर्णन करतांना कवयित्री इंदिरा संत म्हणतात,

अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ ।
अशा अवेळी पैलतीरावर, आज घुमे का पांवा मंजुळ ।।

मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भंवती भणभण ।
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकुन अपुले तनमन ।।

विश्वचि अवघे ओठा लावुन, कुब्जा प्याली तो मुरलीरव ।
डोळ्यामधले थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ।।

अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे कां पांवा मंजुळ ।
अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ ।।

एरवी नुकताच उगवलेला 'चंद्र पुनवेचा' नेहमी कौतुकाचा असतो, पण मधुर गळ्याची गायिका सुमन कल्याणपूर आणि संगीतकार दशरथ पुजारी या द्वयीने दिलेल्या या भावगीतात मावळतीवर आलेल्या केशरी चंद्राच्या उल्लेखाने पहाटेची वेळ दाखवली आहे.
संत जनाबाई विठ्ठलाची इतकी लाडकी होती की तिला घरकामात मदत करण्यासाठी तो स्वतः तिच्या घरात येत असे. गीतकार शांताबाई जोशी यांनी लिहिलेल्या एका जुन्या गाण्याची चाल एका काळातले भावगीतांचे सम्राट गजानन वाटवे यांनी बांधली होती आणि माणिक वर्मा यांनी ते गयिले होते. जनाबाईची श्रध्दा पाहून तिचा कामाचा भार हलका करण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग तिला दळण दळायला मदत करतो तेंव्हा ती हर्षभरित होऊन म्हणते,

आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात ।
पंढरीचा रावा दळी जनीच्या घरात ।।
किती करी काम देवा, घेई रे विसावा ।

हेच ऐक एवढे रे, मान किती घ्यावा ।
घनश्याम विठ्ठला रे, पंढरीच्या राया ।
धावुनिया भक्तांपाठी, वृथा शिणवाया ।
जरा थांबू दे रे देवा, कोमल दे हात ।।

किती माझ्यासंगे, गाउनिया गाणी ।
भागलीस आता, तू रे चक्रपाणी ।
कटी पितांबर शोभे, तळा वैजयंतीमाळा ।
असा हरी गरीबांच्या, झोपडीत झोपी गेला ।
सावळीच गोजिरी ही, मूर्ती सदा नयनात ।।


सूर्य आणि चंद्र पृथ्वीवर प्रकाशकिरणांचा वर्षाव करतात. त्या उजेडात उजळून निघालेल्या पृथ्वीकडे आकाशातले देवच सूर्य व चंद्र या डोळ्यांनी पहात असतात अशी कल्पना आहे. मृत्यू पावलेले जीव स्वर्गात म्हणजे देवलोकात गेल्यानंतर ते सुध्दा असेच पहात असतील अशी कल्पना कवी पी. सावळा राम यांनी केली आहे. आपल्या लाडक्या कन्येचे आयुष्य सुखात जावे, तिला कशाची ददात पडू नये यासाठी तिला चांगले शिक्षण, कला कौशल्य वगैरेंमध्ये निपुण करून एका त-हेने तिच्यासाठी कल्पवृक्ष लावून गेलेल्या बाबांची आठवण काढून त्यांची यशस्विनी झालेली लाडकी लेक म्हणते,

सूर्य चंद्र तुमचे डोळे, दुरूनीच हो बघतात ।
कमी नाही आता कांही, कृपादृष्टीची बरसात ।
पांच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात ।
पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा ।।

या गाण्यातले भाव लता मंगेशकरांच्या व्यक्तीगत आयुष्यालासुध्दा लागू पडत असल्यामुळे त्यांनी अत्यंत समरसतेने गाऊन हे गीत अजरामर केले आहे. संगीतकार वसंत प्रभू यांनी या गीताला दिलेली चालही अप्रतिम अशी आहेच.

पी.सावळाराम, वसंत प्रभू आणि लतादीदी यांनी जी अप्रतिम गीते मराठी रसिकांना दिली आहेत त्यातलेच दुसरे एक गीत आहे.
श्रीरामा, घनश्यामा, बघशिल कधी तू रे, तुझी लवांकुश बाळे ।

वनवासाच्या घरात माझ्या, अरुण चंद्र हे सवे जन्मता ।
विरह प्रीतीचे दुःखही माझे, हंसते रघुनाथा ।
विश्वाची मी मंगल माता, तुझी लाडकी सीता ।
तुझ्याविना रे आनंदाला गालबोट लागले ।।

'चंदा है तू मेरा सूरज है तू' अशा शब्दात सगळ्या माता आपल्या मुलांचे कोतुक करत असतात. सूर्य आणि चंद्र ही तेज आणि सौंदर्य यांची प्रतीके आहेत. वाल्मिकी मुनींच्या आश्रमात आपल्या मुलांना वाढवत असतांना सीतामाई वर दिलेले गाणे म्हणते अशी कल्पना आहे.

पुण्यवान लोक मरणानंतर स्वर्गाला जातात. तेंव्हा चंद्र तारे यासारखे आकाशस्थ देव त्यांचे स्वागत करतात. देशकार्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मुलाचा पिता आपला शोक आवरून म्हणतो,

पोचशी तू दिव्यलोकी सूर्यमंडळ भेदुनी ।
चंद्र तारे धन्य तुजला आरती ओवाळुनी ।

गौरवाचा ग्रंथ लाभे जीवनी तव भारता ।।
झुंजता रणभूवरी तू, अमर होशी रे सुता ।
भाग्य माझे थोर म्हणुनी जाहलो तव मी पिता ।।


सूर्य हा सर्वात जास्त प्रकाशमान आहेच, चंद्र हा त्याच्या खालोखाल तेजस्वी दिसतो. पण हे दोघेही साध्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश देऊन अंधःकार दूर करतात. सद्गुरूच्या कृपेने मन उजळून निघते. ज्ञानाचा हा प्रकाश इतका प्रखर असतो की तो सूर्यचंद्रांनासुध्दा लाजवतो. ओंकारस्वरूप समर्थ सद्गुरूंना नमन करतांना संत एकनाथ म्हणतात,

गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, त्यापुढे उदास चंद्र रवि ।
रवि, शशि, अग्नि, नेणति ज्या रूपा, स्वयंप्रकाशरूपा नेणे वेद ।।
ओंकारस्वरूपा सद्गुरूसमर्था, अनाथांच्या नाथा तुज नमो ।।


विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले संत गोरा कुंभार आळवणी करतात,

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ।
चंद्र व्हा हो पांडुरंगा, नम करा थोर ।।
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले ।
वृध्दपणी देवा आता, दिसे पैलतीर ।।

जन्म मरण नको आता, नको येरझार ।
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार ।।
चराचरापार न्याहो लागला उशीर ।
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर ।।

गीतकार अशोकजी परांजपे यांनी लिहिलेल्या या नाट्यगीताला संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांनी दिलेली चाल इतकी सुरेख आहे की गायनाच्या अनेक मैफलींची सांगता या भैरवीने केली जाते.



ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शेवटी पसायदान मागतांना संत ज्ञानदेव विनंति करतात,

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

जगातल्या सर्व लोकांचे प्रत्यक्ष सूर्य चंद्राबरोबर नाते जुळावे, ते सुध्दा काळिमा नसलेला चंद्र आणि दाहक नसलेला सूर्य यांच्याबरोबर, असे मागणे त्यांनी केले आहे. सर्व लोकांनी सज्जन आणि तेजस्वी व्हावे पण त्याबरोबर निष्कलंक रहावे आणि तापदायक होऊ नये असा संदेश या पसायदानांमध्ये दिलेला आहे.



 . . . . .  . . (समाप्त)

No comments: