मी लहान असतांना मला काही म्हणजे काहीही, अगदी दिसेल ते सगळे काही वाचण्याचे विलक्षण वेड होते. जे पुस्तक माझ्या हातात पडेल त्यातले मला काहीही समजो वा न समजो, त्यावर घातलेल्या वर्तमानपत्राच्या कव्हरसकट त्यातले अक्षर न् अक्षर मी वाचून काढत असे. त्यात मुद्रक, प्रकाशक, संपादक वगैरेंची नावेसुध्दा वाचली जात. त्यातले 'नवीन किताबखाना' हे नाव मला जरा वेगळे वाटायचे. 'किताब' म्हणजे पुस्तक आणि 'खाना' म्हणजे जेवण एवढाच त्या शब्दांचा अर्थ शाळेत शिकलेल्या हिंदी भाषेच्या ज्ञानावरून कळला होता, उर्दूचा गंधही नव्हता. त्या वयात 'नवीन', 'पुस्तक' आणि 'जेवण' या तीन्ही गोष्टी मला अतीशय प्रिय असल्यामुळे त्या नावाचा एकत्र संदर्भ लागत नसला तरी ते नाव लक्षात राहिले होते. 'किताबखाना' या उर्दू शब्दातल्या 'खाना'चा खाण्याशी कसलाच संबंध नाही असे मला नंतर कळले, पण तोवर तो शब्द माझ्या स्मृतीमध्ये रुतून बसला होता.
मी कॉलेजात शिकत असतांना 'मार्मिक' हे व्यंगचित्रांना वाहिलेले बहुधा पहिलेच आणि कदाचित अखेरचे प्रसिद्ध मराठी साप्ताहिक सुरू झाले आणि अल्पावधीत ते तुफान लोकप्रिय झाले. मराठी युवकांना तर पुढच्या आठवड्याचा अंक केंव्हा बाहेर पडतो आणि आपण तो वाचतो असे होत असे. विनोदी तसेच जळजळीत व्यंगचित्रे आणि खुसखुशीत तसेच खरमरीत लेखांनी भरलेल्या त्या साप्ताहिकाच्या शेवटच्या पृष्ठावर 'पिटातल्या शिट्ट्या' या सदराखाली तत्कालिन चित्रपट आणि नाटकांचे खुमासदार रसग्रहण केलेले असे. अंकामधील इतर मजकुराप्रमाणे या स्तंभातसुध्दा नर्मविनोद आणि परखड टीका यांचे बेमालूम मिश्रण असायचे. सिनेमा किंवा नाटक यांचा पार पंचनामा न करता किंवा त्यातला कथाविषय सांगून न टाकता त्याबद्दल कुतूहल कायम राखून हे मनोरंजक लेख लिहिलेले असत. माझी वैयक्तिक मते त्या स्तंभलेखकाच्या मताशी जुळत होती की त्याचे शेरे ताशेरे वाचून त्यानुसार माझी मते त्या वयात घडत होती ते मला आता नक्की सांगता येणार नाही, पण मला हे सदर खूप आवडत असे. मी आधीच पाहिलेल्या नाटक सिनेमाबद्दल झालेली माझी मते हे सदर वाचतांना अधोरेखित होत असत आणि हे सदर वाचल्यानंतर ते खेळ पाहतांना त्यातले बारकावे जास्त चांगले कळत असत. थोडक्यात सांगायचे झाल्यास एकादा कार्यक्रम बरा किंवा चांगला वाटला तर तो कशामुळे आणि तो टुकार वाटला तर कशामुळे हे मला थोडे समजायला लागले. 'शुध्दनिषाद' या टोपणनावाने हा स्तंभ लिहिणा-या समीक्षकाचे नाव सुधीर दामले असे होते असे समजले.
किताबखाना आणि सुधीर दामले यांच्यात परस्परांमध्ये काही संबंध असेल असा विचार माझ्या मनात येण्याचे कारण नव्हते आणि माझ्या व्यक्तीगत जीवनाशी त्या दोघांचा दूरान्वयानेही काही संबंध नव्हता. पण माझे लग्न झाल्यानंतर तो आला. पती आणि पत्नी यांचे सर्व नातलग लग्नानंतर एकमेकांचे इन-लॉज होतात, त्यामुळे माझ्या विवाहानंतर आमच्या नातेवाईकांची संख्याही एकदम दुप्पट झाली. माझ्या नव्याने झालेल्या नातेवाईकांमध्ये जयश्रीताई दामले यांचे नाव ठळक होते. पहिल्या भेटीतच चांगली छाप पाडण्यासारखे त्यांचे ठसठशीत व्यक्तीमत्व आहेच, शिवाय मनमिळाऊ स्वभावाने त्या इतरांना आपलेसे करतात. त्यांचे पती सुधीरराव दामले यांनाही सगळ्या आप्तेष्टांमध्ये मोठे मानाचे स्थान होते. हे जोडपे मुंबईमध्ये रहात होते हे आमच्या दृष्टीने खूपच महत्वाचे होते. नव्याने संसार थाटतांना अनेक अडचणी आणि शंका यांचे डोंगर समोर असतात. जुन्या पिढीमधल्या लोकांचे आणि आपले आचारविचार यात जनरेशन रॅप असते. यावेळी आपल्याच पिढीमधल्या आणि सुस्थितीमध्ये स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मोलाचे असते. त्यासाठी सुरुवातीच्या काळात आमचे पाय आपोआप त्यांच्या घराकडे वळत असत.
त्या काळात सर्वांकडे टेलीफोन नसायचे. मोबाईल फोनचा शोधच लागलेला नव्हता आणि मुंबईमध्ये घरी पोस्ट खात्याचा टेलीफोन मिळण्यासाठी दहा बारा वर्षे वाट पहावी लागायची. मी तर त्यासाठी अजून अर्जसुध्दा केला नव्हता. दामल्यांच्या घरी फोन असला तरी शेजारपाजारी कुणाकडे जाऊन त्यांना फोन करण्याची सोय आमच्याकडे नव्हती किंवा कोणाकडे भेटायला जाण्यापूर्वी त्यांना अगोदर सूचना देण्याची सवयही अजून लागली नव्हती. आपण आपले सरळ जाऊन धडकायचे, भेटले तर उत्तमच, नाही भेटले तर चौपाटीवर फिरून यायचे अशा विचाराने एक दिवस आम्ही गिरगावातल्या त्यांच्या घरी गेलो. मी त्यापूर्वी गिरगावातल्या जितक्या लोकांकडे गेलो होतो ते सगळे सुप्रसिध्द 'बटाट्याच्या चाळी'ची आठवण करून देणा-या जुनाट चाळींमध्ये रहात असत. त्यामुळे अख्खे गिरगाव म्हणजे 'चाळ नावाच्या वाचाळ वस्तीं'चा मोठा समूह असावा असा माझा ग्रह झाला होता. दामल्यांच्या घरापर्यंत पोचण्याआधी त्यांच्या इमारतीमधल्या काळोखात दडलेल्या जिन्याच्या पाय-या चढतांना माझा तो ग्रह जास्त दृढ झाला,
त्यांच्या घराच्या दरवाजातून आत प्रवेश करताच मात्र मी थोडासा भांबावलो. त्या काळात आम्ही रहात असलेल्या वन रूम किचनच्या मानाने तो प्रशस्त असा सेल्फ कंटेन्ड फ्लॅट होता. 'इंटिरियर डेकोरेशन' हा शब्द अजून माझ्या ओळखीचा झालेला नव्हता, पण त्यांच्या दिवाणखान्यातले फर्नीचर, त्याची मांडणी, जमीनीवर अंथरलेला गालिचा, खिडक्यांचे पडदे वगैरे सगळे मला कलापूर्ण आणि आकर्षक दिसत होते. जयश्रीताईंनी सुहास्यवदनाने आणि मनःपूर्वक आपुलकीने आमचे स्वागत केले. आम्हाला आमच्या अगांतुकपणाची जाणीव करून दिली नाही. त्या वेळी सुधीरही घरात होते. त्यांनीही आमचे औपचारिक स्वागत केले.
'पिटातल्या शिट्ट्या' वाचून सुधीर दामले यांची जी प्रतिमा माझ्या मनात तयार झाली होती त्यात ते खूप खेळकर, मिश्किल स्वभावाचे आणि बोलघेवडे असतील असे मला वाटत होते. शिवाय त्यांच्याकडे मनोरंजनाच्या विश्वातल्या बातम्या आणि घडामोडी वगैरेंचा खजीना होता. त्यांच्याशी गप्पा मारतांना आपल्याला खूप मजा येईल, काही 'अंदरकी बातें' कळतील अशी आशा मला वाटत होती. त्यांच्या स्वतःच्या वर्तुळात ते बरेचसे माझ्या कल्पनेतल्यासारखेच असतात असे मला नंतर कळले. पण बहुधा त्यांच्या 'इनर सर्कल'मध्ये कुणाही सोम्यागोम्याला सहजासहजी प्रवेश मिळत नसावा. आम्ही त्यांच्या घरी गेलो तेंव्हा परस्परांना नमस्कार वगैरे उपचार झाल्यानंतर जयश्रीताई अलकाला घरात बोलावून घेऊन गेल्या. तिकडे गेल्यावर माहेरच्या मंडळींबद्दल आणि पूर्वीच्या आठवणीवर त्यांच्या गप्पा रंगल्या. मी त्यातल्या कोणालाच ओळखतही नव्हतो त्यामुळे मला त्यात रस नव्हताच. मी हॉलमधल्या सोफ्यावर बसून राहिलो.
सुधीर थोडा वेळ कसलीशी कागदपत्रे वाचत बसले होते आणि कोणाकोणाशी टेलीफोनवर बोलत होते. त्यानंतर ते उठून बाहेर चालले गेले, कदाचित त्यांच्या दुकानावर किंवा आणखी कोठे गेले असतील. समोर बसलेल्या माझ्या अस्तित्वाची त्यांनी फारशी गंभीर दखल घेतली नाही असे मला जाणवले. मीसुध्दा त्या काळात वडीलधारी माणसांशी बोलायला थोडा बिचकत होतो, त्यामुळे मी ही आपले तोंड उघडले नाही. समोर पडलेल्या वर्तमानपत्रांची पारायणे करीत आणि खिडकीतून दिसणारी गिरगावरोडवरली रहदारी पहात राहिलो. त्यानंतर सुरुवातीला काही ना काही कारणाने किंवा निमित्याने आम्ही वरचेवर त्यांच्या घरी जात होतो. दर वेळी जयश्रीताई आमचा चांगला पाहुणचार करायच्या. सुधीर मात्र कधी घरी भेटत, कधी त्यांची भेटही होत नसे. ते जिथे रहात होते त्याच बिल्डिंगच्या तळमजल्यावर त्यांचे ऑफीस कम दुकान होते, कदाचित आतल्या बाजूला छपाईची यंत्रसामुग्रीसुध्दा असेल. 'नवीन किताबखाना'चा व्यवहार तेथून चालत असे. हेच त्यांचे मुख्य ऑफीस होते की ती एक ब्रँच होती हे मला समजले नाही. त्या गाळ्यावर 'एन के प्रिंटर्स' असा बोर्ड होता. कधीकधी सुधीरांचे मँनेजर आतल्या बाजूला बसलेले दिसत. त्यांच्या घरी जातांना किंवा परत जातांना मी बाहेरूनच हात हलवून त्यांना अभिवादन करत असे. पुढे माझे काम आणि प्रपंच यात मी गुंतून गेलो आणि हळूहळू अलकाला मुंबईतले रस्ते आणि बसेस, टॅक्सी वगैरेंची चांगली माहिती झाली. अलका एकटीच किंवा मुलांना घेऊन जयश्रीताईंना भेटून येऊ लागली. त्यानंतर तिच्याबरोबर माझे दामल्यांच्या घरी जाणे कमी कमी होत बंद झाले. सुधीर आमच्या घरी कधी आलेच तरी त्या भागात त्यांची इतर कामे असत आणि ती करतांना ते आमच्याकडे उभ्याउभ्याने भेटून जात असत. आमच्या दोघांच्या एकत्र बसून दिलखुलास अशा गप्पा कधी झाल्याच नाहीत.
असे असले तरी त्यांचे नाव मात्र आमच्या घरातल्या बोलण्यामध्ये नेहमी निघायचे. त्यांनी मार्मिकमध्ये लिहिणे थांबवले की मी मार्मिक वाचणे बंद केले ते आता आठवत नाही, पण माझे 'पिटातल्या शिट्ट्या' वाचणे कधीच थांबले होते. तरीही इतर वर्तमानपत्रे, मासिके वगैरेंमध्ये त्यांचे लेख, फोटो किंवा उल्लेख अधून मधून नजरेला पडत असत. कधी ते कोणाची मुलाखत घेतांना किंवा कोणाला मुलाखत देतांना किंवा एकाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे दूरदर्शनवर अचानक दर्शन घडत असे. 'नाट्यदर्पण' या नावाचे नावाप्रमाणेच मराठी नाट्यसृष्टीला वाहून घेतलेले एक सुरेख मासिक त्यांनी सुरू केले आणि काही काळ चालवले. त्याचा दिवाळी विशेषांक तर फारच वाचनीय असे. मुंबईतल्या दादर आणि गिरगाव या भागातच त्या काळी मराठी नाटकांचे प्रयोग होत असत. आम्ही तिथून खूप दूर रहात असल्यामुळे आम्हाला नाटक पहायला तिकडे जाणे कठीण होते आणि ते संपल्यानंतर मध्यरात्री परत घरी जाणे त्याहूनही कठीण होते. तरीही आम्ही नाट्यदर्पणचे अंक आवर्जून वाचत असू आणि सुटीच्या दिवशी जमतील तेवढी नाटके पहात असू.
त्या काळात फिल्मफेअर हे मॅगेझिन अतीशय लोकप्रिय होते आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड्स म्हणजे ऑस्कर अॅवॉर्ड्सच्या तुल्यबळ अशी भारतातली बक्षिसे होती. त्यांचा वितरण समारंभसुध्दा मोठ्या झोकात साजरा केला जात असे. आजकाल दर वर्षी अशा प्रकारची पंधरावीस अॅवॉर्ड्स दिली जातात आणि त्यांचे संयोजन कुठल्या ना कुठल्या परदेशातल्या ठिकाणी अतीभव्य प्रमाणात केले जाते. दर शनिवारी किंवा रविवारी त्यातला निदान एकादा तरी समारंभ टेलीव्हिजनवर दाखवला जातो. त्यामुळे आता त्याचे खास महत्व वाटत नाही. पण तीस पस्तीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवरील कलाकारांचे कौतुक करण्याची कसली योजनाच नव्हती. त्या काळात सुधीर दामले यांनी नाट्यदर्पण मासिकातर्फे असे अॅवॉर्ड्स समारंभ साजरे करणे सुरू केले आणि त्यासाठी दरवर्षी एका नाट्यदर्पण रजनीचे संयोजन केले.
ही नाट्यदर्पण रजनी मात्र आम्ही न चुकवता पहात होतो. तिची तारीख समजली की कॅलेंडरवर ठळक खूण करून तो दिवस आणि रात्र फक्त या कार्यक्रमासाठी आधीपासून राखून ठेवत असू. हा कार्यक्रमसुध्दा अत्यंत प्रेक्षणीय आणि सुश्राव्य असायचा. रंगमंचावर तसेच तिच्या पार्श्वभूमीवर चोख काम विविध करणा-या रंगकर्मींना पारितोषिके देऊन त्यांचा यथोचित सन्मान त्यात केला जात असेच, शिवाय विविध प्रकारचे आणि नाविन्याने भरलेले अत्यंत अभिरुचीसंपन्न आणि मनोरंजक असे लहान लहान कार्यक्रमांचे तुकडे त्या पारितोषिक वितरण समारंभाच्या मागे पुढे सादर केले जात असत. स्व.पु.ल.देशपांडे किंवा हेमा मालिनी यासारखी त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च स्तरावरली एकादी सुप्रसिध्द व्यक्ती दर वर्षी मुख्य अतिथी असायची. नाट्यक्षेत्रामधले सारे प्रमुख कलाकार या सोहळ्याला हजर रहायचे आणि त्यातल्या लहानशा मनोरंजक आयटममधले छोटेसे काम समरस होऊन करायचे. त्या रात्री पुण्यामुंबईतल्या कुठल्याही सभागृहात नाटकाचा कार्यक्रम होत नसे असे मी ऐकले होते. नाट्यदर्पणच्या कार्यक्रमाची व्याप्ती, त्यातले वैविध्य आणि रंजकता दर वर्षी वाढतच गेली. इतका वैशिष्ट्यपूर्ण असा कुठल्याही भाषेमधला दुसरा कोणताही कार्यक्रम पहाण्याची संधी मला पुढेसुद्धा कधीच मिळाली नाही असे मी ठामपणे सांगू शकेन.
इतके सुरेख आयटम्स फक्त एका प्रयोगासाठी बसवणे आणि त्यांची रंगीत तालीम घेणे वगैरे कामे सुधीर कशी करवून घेत असतील हे तेच जाणोत. यात प्रसिध्दीच्या शिखरावर असलेले मुरब्बी कलाकार असायचे आणि उदयोन्मुख किंवा अगदी नवे कलाकारही असायचे. या सर्वांना एकत्र आणणे किती कठीण काम असेल? अर्थातच यासाठी मोठे टीमवर्क असणार यात शंका नाही, पण ते सुरळीतपणे जुळवून आणण्यासाठी असणारे केंद्रीय नियोजन दामले कुटुंबीयच करत असत. या महत्कार्याचे मंचावरील संचालन या क्षेत्रामधील सुप्रसिध्द अशा इतर व्यक्ती करत असल्या तरी त्यांच्याही मागले खरे मुख्य सूत्रधार सुधीर दामले हेच असायचे हे समजून येत असे. पण रंगमंचावरील त्यांचा प्रत्यक्ष वावर मात्र अगदी मोजून मापून असायचा. त्यांच्या भाषणात कधीही आत्मप्रौढी नसायची, किंवा ते इतरांनाही त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळू देत नसत. नाट्यसृष्टी आणि त्यातले कलाकार यांच्यासंबंधी त्यांच्या मनात असलेले प्रेम, आत्मीयता तसेच तळमळ ते व्यक्त करून दाखवत असत. नाट्यविश्वाकडून त्यांना मिळणारा प्रतिसादसुध्दा अचंभित करणारा होता. त्यातले झाडून सारे प्रथितयश रंगकर्मी व्यावसायिक रंगभूमीवरचे काम (आणि त्याबरोबर त्यातून होणारी प्राप्ती) सोडून एक रात्र त्या सोहळ्याला उपस्थित रहात हे कौतुक किंवा आश्चर्य करण्यासारखे असे. पहायला गेल्यास सुधीर दामले हे नट, निर्माता, दिग्दर्शक वगैरे कोणी नव्हते किंवा त्यांच्या मालकीची नाट्यगृहे नव्हती, तरीही त्यांच्या हातात एवढे सामर्थ्य कशामुळे असायचे हे कोडे मला अनेक वेळा पडत असे.
नाट्यदर्पण रजनी या वार्षिक सोहळ्याखेरीज ते इतर काही नाट्यमहोत्सवांचे आयोजन करीत असत. एकाच सभागृहात एकाद्या वीक एंडच्या दोन अडीच दिवसात एका पाठोपाठ एक अशी आठ दहा संपूर्ण नाटके पहाण्याची संधी त्यात रसिकांना मिळत असे. नाटकांची निवड करतांना काही सामाजिक, काही रहस्यमय, तर काही जुनी पौराणिक कथेवरील संगीत नाटके अशी व्हरायटी त्यात मिळत असे. आमच्यासारख्या भुकेल्या प्रेक्षकांना ही पर्वणी वाटत असे. नाट्यदर्पण रजनी आणि हे नाट्योत्सव या दोन्ही कार्यक्रमात त्यातील कलाकारांना अगदी जवळून पहाण्याची संधी आम्हाला मिळत असे. कधी बॅकस्टेजवर जाऊन त्यांना भेटायला किंवा त्यांच्या संगतीत चहापाणी, भोजन वगैरे करायलासुध्दा मिळाले. "अमक्या प्रसिद्ध नटीने आमच्या डब्यातल्या तिखटमिठाच्या पु-या मिटक्या मारत खाल्या किंवा तमक्या वयस्क नटाला मी एकदा हाताशी धरून थोडे अंतर चालवत नेले." असल्या बढाया मारायची सवय मला नसली तरी कधी कधी तसे घडत होते आणि त्या आठवणी आपसूकच मनात जपून ठेवल्या गेल्या.
सुधीर दामले अनेक वर्षे मुंबईला रहात असले तरी पुण्याला त्यांचा वडिलोपार्जित वाडा होता. मुंबई सोडून कायमचे तिकडे जाऊन रहायचा निर्णय त्यांनी घेतला. त्या वाड्याची पुनर्रचना करून तिथे मोठी इमारत बांधली. त्यातला तळमजला बँका आणि इतर व्यावसायिकांना देऊन वरील दोन मजल्यांवर मोठे हॉल आणि राहण्यासाठी फ्लॅट बांधले. सुदर्शन या नावाने प्रसिध्द झालेला हा रंगमंच पुण्यामधील हौशी कलाकारांसाठी एक अत्यंत महत्वाचे ठिकाण झाले. त्याना फक्त एक मंच मिळाला असे म्हणण्यापेक्षा त्यातून प्रायोगिक नाटकांची एक सांस्कृतिक चळवळ (मूव्हमेंट) उभी राहिली असे म्हंटल्यास वावगे होणार नाही. सुधीररावांचे बंधू रवी आणि वहिनी शुभांगीताई यांच्या पुढाकारामधून हे घडत असले तरी त्यामागची प्रेरणा, मार्गदर्शन आणि पाठिंबा सुधीरांचाच असणार.
सुधीर दामले यांचा शष्ट्यब्दपूर्तीचा उत्सव त्यांनी पुण्यातल्या एका चांगल्या हॉटेलात साजरा केला होता. त्या कार्यक्रमाला आम्ही मुंबईहून तिथे गेलो होतो. त्यांना अभीष्टचिंतन करण्यासाठी नाट्यक्षेत्रामधले कित्येक दिग्गज या कार्यक्रमाला आले होते. त्या अविस्मरणीय अशा संध्याकाळी जमलेल्या पाहुण्यांसाठी सुग्रास भोजनाखेरीज संगीताचीही मेजवानी होती. त्यात शास्त्रीय संगीतही होते आणि चक्क बैठकीची लावणी ठेवली होती. (कदाचित अप्रत्यक्षपणे सुधीररावांना उद्देशून गायिलेल्या) "पिकल्या पानाचा देठ बाई हिरवा" या लावणीनंतर जो टाळ्यांचा कडकडाट झाला त्याने सभागृह दुमदुमून गेले. अशा प्रकारचा वेगळेपणा आणि रसिकता फक्त तेच दाखवू शकतील. अशा पध्दतीची आणि इतकी रंगलेली साठी शांत मी तरी कधी आणि कुठे पाहिली नाही. अशा कार्यक्रमासाठी लागणारा दिव्य स्पर्श फक्त सुधीरांच्याचकडे आहे.
मागील आठवड्यात सुधीर आणि जयश्री यांच्या विवाहाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला. हा घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम त्यांच्याच सुदर्शन हॉलमध्ये ठेवला होता. अगदी जवळचे असेसुध्दा शंभरावर आप्तस्वकीय त्याला उपस्थित होते. त्यातले बहुतेक लोक ज्येष्ठ नागरिक असणार हे अपेक्षितच होते. वयोमानानुसार सुधीरांची हालचाल मंद झाली होती. पण सर्वांना उद्देशून केलेल्या छोट्याशा भाषणात त्यांनी आपले मनोगत म्हणजे मुख्यतः आभार प्रदर्शन मोजक्या शब्दात खणखणीत आवाजात व्यक्त केले. "या निमित्याने जमलेल्या आप्तेष्टांना एकमेकांना भेटण्याची आणि गप्पागोष्टी करण्याची संधी देण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून हा औपचारिक भाग आम्हाला शक्य तितक्या लवकर आटोपायचा आहे." असे सांगून त्यांनी त्यांची स्तुती करण्याची भाषणे करण्याची संधी कोणालाही दिली नाही. एवढे होईपर्यंत पाहुण्यांना सूप देणे सुरू झालेले होते आणि वरील मजल्यावर स्नेहभोजन तयार असल्याची वर्दी दिली गेली. आलेल्या प्रत्येक पाहुण्याने आल्याआल्या त्यांची भेट घेऊन अभीष्टचिंतन केलेले होतेच. हळूहळू सारे लोक भोजनकक्षात गेले आणि ओळखीतल्या इतर पाहुण्यांबरोबर गुजगोष्टी करत रेंगाळत राहिले. या कार्यक्रमाला येतांना कोणीही भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ आणू नये असे आमंत्रणपत्रिकेत लिहिलेले होते आणि त्याचे पालन झाले होते. आयोजकांनी मात्र आलेल्या पाहुण्यांना परत जातांना आभारपत्र आणि नव्या वर्षाचे कॅलेंडर दिले.
सुधीररावांच्याबद्दल मनांत खूप आदरभावना होतीच, त्यात आणखी एक तुरा खोवला गेला.
--------------------------------------------------------------------------------------------------
Facebook status on 18/8/2016
तीस चाळीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवरील कलाकारांचे कौतुक करण्याची कसली योजनाच नव्हती. त्या काळात सुधीर दामले यांनी नाट्यदर्पण मासिकातर्फे असे अॅवॉर्ड्स समारंभ साजरे करणे सुरू केले आणि त्यासाठी दरवर्षी एका भव्य नाट्यदर्पण रजनीचे संयोजन केले. ... इतका वैशिष्ट्यपूर्ण असा कुठल्याही भाषेमधला दुसरा कोणताही कार्यक्रम पहाण्याची संधी मला पुढेसुद्धा कधीच मिळाली नाही असे मी ठामपणे सांगू शकेन. ..... नाट्यदर्पण रजनी आणि हे नाट्योत्सव या दोन्ही कार्यक्रमात त्यातील कलाकारांना अगदी जवळून पहाण्याची संधी आम्हाला मिळाली ती फक्त श्री.सुधीर दामले यांच्यामुळेच.
निवडक आनंदघन Wordpress link