Tuesday, August 14, 2012

अधिक महिना

Monday, August 13, 2012


अधिक महिना (पूर्वार्ध)

"या वर्षी दिवाळी नोव्हेंबर महिन्यात येते आहे, मागच्या वर्षी ती ऑक्टोबरमध्ये आली होती."


"ती अशीच आलटून पालटून कधी ऑक्टोबरमध्ये तर कधी नोव्हेंबरमध्ये येत असते." मी.

"ते तरी ठीक आहे, पण रमजानचा महिना तर काही वर्षांपूर्वी नवरात्रात आला होता, नंतर तो गणेशोत्सवाच्या वेळेला आला आणि या वर्षी आपल्या श्रावण महिन्याबरोबर आला आहे."

"आणि पुढच्या वर्षी तो आषाढात येणार आहे." मी.

"अलीकडे पावसाचा सुध्दा काहीच नेम राहिला नाही. यंदा सगळा आषाढ महिना कोरडा गेला आणि आता श्रावणात तो धो धो कोसळतोय्."

"यंदा पावसाला थोडा उशीर झाला आहे, पण आपला श्रावण महिनाही बराच आधी आला आहे. पुढच्या वर्षी बघा आषाढातच पाऊस येईल, कदाचित ज्येष्ठातही सुरू होईल." मी.

"तुम्ही असे कशावरून म्हणता?"

"कारण या वर्षातला पुढचा महिना अधिक महिना आहे, त्यामुळे पुढल्या वर्षी आषाढ महिना उशीरा येणार आहे." मी.

"हा अधिक मास सुध्दा वाटेल तेंव्हा येत असतो. हा कधी अचानक उपटेल त्याचा काही नेमच नाही."

"असं नाही बरं. तो केंव्हा आणि कशासाठी येतो याचे अत्यंत काटेकोर असे गणित आहे" मी.


अशा प्रकारचे संवाद होत असतात. वर आलेल्या तीन्ही विसंगतींचे कारण एकच आहे, ते म्हणजे आठवडाभरात येऊ घातलेला अधिक महिना. हा अधिक महिना का आणि कधी येतो हे समजून घेण्यासाठी महिना म्हणजे काय हे आधी पहायला लागेल. श्रावण, रमजान आणि ऑगस्ट हे महिने त्यांच्या आपापल्या कालगणनांच्या पध्दतींनुसार ठराविक वेळीच येत असतात, पण या पध्दती निरनिराळ्या असल्यामुळे त्यांच्यात फरक येतो.

आज आपल्या घरातल्या भिंतीवर, टेबलावर, डायरीमध्ये किंवा पाकिटात एकादे कॅलेंडर असते आणि आपण नेहमी त्यात महिना आणि तारीख पहात असतो. पण जेंव्हा छापखानेच नव्हते आणि लोकांच्याकडे अशी छापील कॅलेंडरे नसायची त्या काळातले लोक काय करत असतील? त्या काळातले लोक नोकरीसाठी रोज ऑफीसात किंवा कारखान्यात जात नव्हते, त्यांना महिन्याच्या एक तारखेला पगार मिळत नसे, त्यांना ठराविक तारखेच्या आत विजेचे बिल, टेलीफोनचे बिल, विम्याचे हप्ते भरावे लागत नव्हते, ते रेल्वेचे रिझर्व्हेशन करत नव्हते, सिनेमाची तिकीटे काढत नव्हते वगैरे वगैरे पाहता त्यांच्या रोजच्या जीवनात कॅलेंडरवाचून त्यांचे काहीच अडत नव्हते. पण माणसाला त्याच्या आयुष्यात पूर्वी होऊन गेलेल्या घटनांच्या आठवणी असतात, त्याही आधी काय घडून गेले हे जाणून घेण्याची इच्छा असते, पुढे येणा-या काळासाठी त्यांच्या मनात काही योजना असतात, पुढे काय होणार आहे याबद्दल उत्सुकता असते. या गोष्टी क्रमानुसार कळण्यासाठी वेळेचा संदर्भ आवश्यक असतो. असा संदर्भ सर्वांना सहजपणे कळावा या उद्देशाने निसर्गातील घटनांच्या आधारे तो ठरवण्याच्या निरनिराळ्या पध्दती प्रचलित झाल्या.


सूर्यनारायण रोज सकाळी पूर्वेला उगवतो आणि संध्याकाळी पश्चिमेला मावळतो असे ढोबळपणे म्हंटले जाते. पण सकाळी ज्या डोंगरामधून तो वर येतांना दिसतो तिथली त्याच्या उगवण्याची विवक्षित जागा आणि संध्याकाळी ज्या ठिकाणी तो क्षितीजाला टेकतो ती त्याची मावळण्याची जागा या दोन्ही नेमक्या जागा रोज किंचित बदलत असतात. वर्षातले सहा महिने त्या हळूहळू उत्तरेकडे सरकत जातात आणि सहा महिने दक्षिणेकडे सरकत असतात. यामुळे बरोबर एका वर्षानंतर त्या नेमक्या मूळ ठिकाणी परत येतात. याशिवाय पहाटे सूर्योदयाच्या आधी आणि रात्री सूर्य मावळल्यानंतर जे तारकासमूह आकाशात दिसतात त्यातसुध्दा रोज थोडा पण निश्चित स्वरूपाचा बदल होत असतो. या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून पूर्वीच्या काळातल्या पाश्चात्य विद्वानांनी प्रत्येकी सुमारे ३०-३१ दिवसांचे बारा महिने असलेले कॅलेडर तयार केले आणि त्यात लीप इय़रचे नियम वगैरे सुधारणा करून ते अचूक बनवले. युरोपियन लोकांनी जगभर साम्राज्ये स्थापन करतांना हे कॅलेंडर आपल्यासोबत नेले आणि जगभरातील लोक त्याचा वापर करू लागले. आपणही रोजच्या जीवनात याचाच उपयोग करतो. हे कॅलेंडर सौर पध्दतीचे म्हणजेच पूर्णपणे सूर्याच्या निरीक्षणावर आधारलेले असते. या कॅलेंडरमधील वर्षाच्या किंवा त्यातील कोणत्याही महिन्याच्या पहिल्या तारखेला आकाशात काहीच विशेष लक्षणीय असे घडत नाही. त्यामुळे हे थोडेसे अवैज्ञानिक वाटण्याची शक्यता आहे. पण सूर्याच्या उन्हातून पृथ्वीला जी ऊर्जा मिळते त्यानुसारच उन्हाळा, हिंवाळा वगैरे ऋतू ठरतात. त्यामुळे या कॅलेंडरनुसार पृथ्वीवरील ऋतूचक्र अचूकपणे चालत असते. वर्षामधील सर्वात मोठा दिवस, सर्वात मोठी रात्र आणि बारा बारा तासांचे दोन समान दिवसरात्र या कॅलेंडरनुसार ठराविक तारखेलाच येतात. शिवाय वापरासाठी ते सोपे असल्यामुळे सर्वमान्य झाले आहे

सौर काल गणनेनुसार पृथ्वीवरील ऋतूचक्र चालतांना दिसते, पण सूर्याच्या बाबतीत दररोज होत असलेले दृष्य बदल फार सूक्ष्म असल्यामुळे सामान्य माणसाला ते समजणार नाहीत. त्या मानाने चंद्राचे उगवणे रोजच आदल्या दिवसाच्या मानाने दोन घटकांनी उशीरा होत असते, त्यामुळे त्याच्या आजूबाजूला दिसणाऱ्या चांदण्यांचे समूह (नक्षत्रे) रोज बदलत असतात, तसेच चंद्राचा आकार रोज कलेकलेने बदलत असतो. चंद्राची उगवण्याची वेळ, त्याच्या सोबत दिसणारे नक्षत्र आणि चंद्राच्या कला यांचा विचार करून आणि त्यात रोज घडत असलेला फरक पाहून महिन्यामधील प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य निश्चित करता येते. दर महिन्यात अमावास्येच्या रात्री चंद्र उगवतच नाही आणि दिवसाही तो दिसत नाही. त्यानंतर रोज कलेकलेने वाढत पंधरा दिवसांनी तो पौर्णिमेला पूर्ण वर्तुळाकार दिसतो आणि त्यानंतर कलेकलेने लहान होत अमावास्येला पूर्णपणे अदृष्य होतो. अशा रीतीने एक महिना पूर्ण होतो आणि पुढील प्रत्येक महिन्यातसुध्दा चंद्राच्या कला याच क्रमाने वाढत किंवा घटत राहतात. अशा सुमारे तीस दिवसांचा एक महिना होतो. एका सौर वर्षात बारा चांद्र महिने येतात. अरबस्थानात अशा प्रकारचे (चांद्र) ल्यूनर कॅलेंडर अवलंबले गेले आणि प्रचलित झाले. या कालगणनेसाठी किचकट गणिते मांडून ती सोडवायची गरज नसते. काळ्याकुट्ट अमावास्येनंतर ज्या संध्याकाळी चंद्र दिसेल त्या दिवसापासून नवा महिना सुरू होतो आणि पुन्हा असेच नवचंद्रदर्शन घडेपर्यंत तो महिना चालत राहतो. असे बारा महिने होऊन गेले की नवे वर्ष सुरू होते. मुस्लिम धर्मीय आजतागायत या हिजरी कॅलेंडरचा उपयोग करतात.
प्राचीन काळातील भारतीय विद्वानांनी आकाशात घडत असलेल्या सर्वच घटनांचे खूपच बारकाईने निरीक्षण करून सौर आणि चांद्र अशा दोन कालगणना विकसित केल्या. पृथ्वीवरील आपल्या जागेवरूनच आकाशातले चंद्र आणि सूर्य कोणत्या वेळी कसे आणि कुठे दिसतात यांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्या माहितीचा उपयोग या दोन प्रकारच्या कालगणनेसाठी केला गेला. आकाशस्थ ग्रहताऱ्यांचे निरीक्षण आणि त्याचा कालगणनेशी जोडलेला संबंध हे काम त्यात निष्णात असलेल्या तज्ज्ञांकडे गेल्यानंतर त्यांनी ते अचूक बनवण्याच्या दृष्टीने त्यात प्रचंड गुंतागुंत निर्माण केली. वर्तुळाकार आकाशाचे त्यांनी बारा समान भागात (राशीत) विभाजन केले तसेच त्याचीच सत्तावीस भागात वेगळ्या प्रकारे वाटणी करून प्रत्येक भाग म्हणजे एक नक्षत्र असे त्या भागांचे नामांकन केले. आकाशाच्या त्या भागात दिसणाऱ्या ताऱ्यांच्या समूहांच्या आकारावरून त्यांना मेष, वृषभ आदि बारा राशी आणि अश्विनी, भरणी वगैरे सत्तावीस नक्षत्रांची नावे दिली. रात्रीच्या वेळी ही नक्षत्रे आणि राशी दिसतात आणि ओळखता येतात, तसेच चंद्राच्या आजूबाजूला दिसणाऱ्या ताऱ्यांवरून त्या क्षणी तो कोणत्या नक्षत्रात किंवा राशीत आहे ते समजते. त्यांनी प्रत्येक राशीत तीस अंश, प्रत्येक अंशाचे साठ भाग (कला), त्यातील प्रत्येक भागाचे पुन्हा साठ भाग(विकला) करून त्यानुसार अतीशय सूक्ष्म निरीक्षणे आणि त्याची आकडेमोड केली आणि आपल्याला दिसणारे चंद्राचे आकाशातील भ्रमण त्यांनी अचूकपणे समजून घेतले. त्या माहितीच्या आधाराने महिन्यामधील तिथी निश्चित केल्या, तसेच कोणत्या क्षणी चंद्र एका नक्षत्रामधून बाहेर पडून दुसऱ्या नक्षत्रात किंवा एका राशीमधून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो याचे गणित मांडले. ही सर्व माहिती पंचांगात दिलेली असते.

पाश्चिमात्य कालगणनेच्या पध्दतीत मध्यरात्री बारा वाजता तारीख बदलते, आपल्याला ही वेळ घड्याळ पाहूनच समजते कारण त्या क्षणी आभाळात काहीच घडत नाही. पण भारतीय पद्धत थोडी गुंतागुंतीची आहे. आपला दिवस कोणालाही सहजपणे दिसणाऱ्या सूर्योदयापासून सुरू होतो आणि त्या क्षणी जी तिथी चाललेली असते ती त्या दिवसाची तिथी मानली जाते. अर्थातच तिथीची व्याख्या वेगळ्या प्रकारे केली जाते. ती सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीची तुलना करून ठरते. आकाशात दिसणारे सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे हे सारेच पूर्वेला उगवतात आणि पश्चिमेला मावळतात असे असले तरी पूर्वेच्या क्षितिजाकडून पश्चिमेच्या क्षितिजापर्यंतचा त्यांचा प्रवास एकमेकांच्या सोबतीने समान गतीने होत नाही. तारकामंडळाच्या तुलनेत सूर्य किंचित धीम्या गतीने जात दररोज सुमारे एका अंशाने मागे पडत जातो तर चंद्रमा सूर्यापेक्षाही थोडा संथ गतीने जात दिवसाकाठी सुमारे तेरा अंशाने मागे राहतो. आपल्याला आभाळातले तारकामंडळ पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते असे दिसते, पण ते जागच्या जागी स्थिर आहे असे गृहीत धरले (तसे ते आहेच), तर त्याच्या तुलनेत सूर्य आणि चंद्र हे दोघेही हळूहळू पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करत असतात. ज्या वेळी चंद्र बारा अंशाने सूर्याच्या पुढे जातो तेंव्हा तिथि बदलते. ही गोष्ट दिवसा किंवा रात्री आणि चंद्र व सूर्य आकाशात असतांना किंवा नसतांना कोणत्याही वेळी घडू शकते.

नभोमंडळाची बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्रांमध्ये विभागणी केलेली असल्यामुळे सूर्य, चंद्र (आणि इतर ग्रह) या राशी व नक्षत्रांमधून प्रवास करतांना आपल्याला दिसतात. या प्रवासात चंद्राचा वेग सूर्याच्या जवळ जवळ तेरा पट इतका जास्त असतो. त्यामुळे एक वर्ष इतक्या कालावधीत सूर्य जेंव्हा एक फेरी पूर्ण करतो तेवढ्यात चंद्राने तेरापेक्षा जास्त घिरट्या घातलेल्या असतात. एकाद्या लहानशा वर्तुळाकार मैदानाच्या कडेकडेने एक माणूस पायी फेऱ्या घालत असेल आणि त्याच रस्त्याने दुसरा माणूस सायकलवर बसून फेऱ्या मारत असेल, तर तो माणूस पायी चालत जाणाऱ्या माणसाला वारंवार ओव्हरटेक करत राहील. त्याचप्रमाणे दर महिन्यात अमावास्येला सूर्याला ओव्हरटेक करून चंद्र पुढे जात असतो. अशा दोन ओव्हरटेकिंगच्या मधला काळ हा भारतीय पंचांगानुसार एक चांद्र महिना असतो.

प्राचीन भारतीयांनी वेगळी सौर कालगणनासुध्दा तयार केली होती. सूर्याने मेष राशीत प्रवेश केल्याने वर्षाचा पहिला महिना, वृषभ राशीत जाताच दुसरा असे करीत मीन रास पार केल्यानंतर बारावा महिना आणि ते वर्ष संपते. अशा प्रकारचे पंचांग भारताच्या काही भागात आजसुध्दा वापरात आहे. केरळीय लोकांचे सौर वर्ष ओणमला सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश केल्याने सुरू होते आणि बारा महिन्यानंतर बदलते. भारताच्या बहुतांश भागात उपयोगात येत असलेल्या पंचांगात चांद्र आणि सौर पध्दतींचा समन्वय करून दोन्हींमधील फायद्यांचा लाभ उठवला आहे. हे साधण्यासाठी अधिकमास जोडला जातो. याबद्दल सविस्तर माहिती उत्तरार्धात अवश्य वाचावी.   



. . . . . . . ............................... (क्रमशः)


अधिक महिना (उत्तरार्ध)


पृथ्वीच्या सूर्याभोवती होत असलेल्या भ्रमणामुळे वर्षभराचे ऋतूचक्र निर्माण होते, चंद्राच्या पृथ्वीप्रदक्षिणेमुळे महिन्यामधील अमावास्या, पौर्णिमा वगैरे होतात आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होतात हे आता आपल्याला चांगले माहीत झाले आहे, पण पृथ्वी आणि चंद्र यांचे हे अवकाशामधले फिरणे आपल्याला प्रत्यक्ष दिसू शकत नाही. चंद्र, सूर्य आणि ग्रह, तारे पृथ्वीवरून जसे दिसतात त्याचेच निरीक्षण करणे शक्य असते आणि त्यांच्या अभ्यासामधून आणि त्याच्या विश्लेषणातूनच शास्त्रज्ञांनी वरील निष्कर्ष काढले. प्राचीन काळात जेंव्हा कालगणनांचा विकास होत होता तेंव्हा या गोष्टी सर्वश्रुत झालेल्या नव्हत्या. पण त्या काळातील विद्वानांनी तयार केलेल्या पंचांगाचे आकलन होण्यात आपल्याला अलीकडील वैज्ञानिकांच्या संशोधनाचा उपयोग होतो.

पृथ्वीचे स्वतःभोवती फिरकी घेणे सतत एकाच गतीने होत असते आणि त्यासाठी लागणारा वेळ म्हणजे एक दिवस धरून त्या वेळेचे तास, मिनिटे, सेकंद किंवा प्रहर, घटिका, पळे, विपळे वगैरेंमध्ये विभाजन केले आहे. पृथ्वीला सूर्यप्रदक्षिणा करण्यासाठी लागणारा वेळ सुमारे ३६५ दिवस आणि ६ तास इतका आहे. अमावास्येच्या दिवशी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळरेषेत येतात. त्या दिवसापासून सुरू झालेली चंद्राची पृथ्वीप्रदक्षिणा सुमारे सव्वासत्तावीस दिवसात पूर्ण होत असते. पण तेवढ्या काळात सूर्याभोवती फिरतांना पृथ्वी पुढे सरकली असल्यामुळे सूर्य आणि पृथ्वी यांच्या सरळरेषेत येण्यासाठी चंद्राला आणखी दोन दिवस लागतात. त्यामुळे अमावास्या ते अमावास्या होणारा चांद्र महिना सुमारे साडेएकोणतीस दिवस एवढा असतो. (प्रत्यक्ष कालावधींमध्ये यात काही सूक्ष्म फरक आहेत, पण ते या लेखासाठी महत्वाचे नाहीत.) एक महिन्याचा कालावधी दिवसांच्या पटीत नसतो आणि एक वर्षाचा कालावधी महिन्यांच्या कालावधीच्या पटीत नसतो. साडेएकोणतीस दिवसांचा चांद्रमास कधी तीस दिवसांचा आणि कधी एकोणतीस दिवसांचा धरावा लागतो आणि अशा बारा महिन्यांचा कालावधी फक्त ३५४ दिवस एवढाच होतो. एवढ्या काळात बारा महिन्यांच्या बारा अमावास्या येऊन जातात, पण सौर वर्ष संपायला अजून सव्वाअकरा दिवस शिल्लक असतात. तेवढ्या काळात पुढील चांद्रवर्ष सुरू होऊन जाते. ते संपेपर्यंत हा फरक साडेबावीस दिवसांचा होतो, तीन वर्षांच्या काळात तो एक महिन्यापेक्षा जास्त होतो आणि सात आठ वर्षांमध्ये महिना आणि ऋतू यांच्यातला संबंध संपून जातो. या कारणामुळे रमझानचा महिना कधी उन्हाळ्यात, कधी पावसाळ्यात, तर कधी थंडीच्या दिवसात येऊ शकतो.

आपला श्रावण महिना मात्र नेहमी पावसाळ्यातच येतो, कारण चांद्र आणि सौर पध्दतींमधला हा फरक एक महिना एवढा झाला की लगेच एक अधिकमास घेऊन शून्यावर आणला जातो. हे कसे करायचे, अधिक महिना केंव्हा पाळायचा, हे ठरवण्याची सुव्यवस्थित पध्दत पुढीलप्रमाणे आहे. पाश्चात्य पध्दतीत रोज मध्यरात्री बारा वाजता तारीख बदलते, पण भारतीय पध्दतीत सूर्याच्या तुलनेत चंद्र १२ अंशाने पुढे जातो तेंव्हा तिथी बदलते. हा क्रिया दिवसा, रात्री, सकाळी, संध्याकाळी वगैरे केंव्हाही होऊ शकते, त्यामुळे पंचांगामधली तिथी त्यानुसार केंव्हाही लागते किंवा संपते. असा पंधरा तिथींचा शुक्लपक्ष आणि पंधरा तिथींचा कृष्णपक्ष हे दोन्ही मिळून एक महिना होतो. तो सुमारे साडेएकोणतीस दिवसांचा असतो. पृथ्वी आणि चंद्र या दोघांच्याही कक्षा लंबवर्तुळाकार (एलिप्टिकल) आहेत आणि त्यांच्या भ्रमणाची गती किंचित कमीअधिक होत असते, त्यामुळे चंद्राला सूर्याच्या पुढे १२ अंश जाण्यासाठी लागणारा वेळ समान नसतो. पाश्चिमात्य पध्दतीतला प्रत्येक दिवस हा बरोबर चोवीस तासांचाच असतो तर भारतीय पध्दतीमधील तिथीचा काळ कमी जास्त (बहुतेक वेळा २४ तासांपेक्षा कमीच) होत असतो.
खरे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, पण आपण पृथ्वीवर रहात असल्यामुळे आपल्याला सूर्यच राशीचक्रामधून फिरतो असे वाटते. एका वर्षात तो बारा राशींमधून फिरून येत असतो. प्रत्येक राशीमधील त्याचा भ्रमणकाल एक महिना (३०-३१ दिवस) एवढा असतो. पण चांद्रमहिन्याचा काळ साडेएकोणतीस दिवस एवढाच असतो. त्यामुळे सूर्याने एका राशीत शुध्द प्रतीपदेला प्रवेश केला असेल तर तो महिना संपून गेला आणि पुढील महिना सुरू होऊन गेला तरी सूर्य त्याच राशीत असतो. शुक्ल प्रतीपदेला सूर्य कोणत्या राशीत आहे यावरून त्या महिन्याचे नाव ठरत असते. पण चंद्राचा महिना बदलला तरी सूर्याची रास तीच असेल तर त्या महिन्याला पुढील महिन्याचे नाव देतांना 'अधिक' असे विशेषण लावले जाते. येत्या १८ ऑगस्टला सुरू होणारा महिना 'अधिक भाद्रपद' मानला जाईल. तो महिना सुरू असतांना सूर्याने पुढील राशीत प्रवेश केला असेल आणि पुढल्या महिन्याच्या शुक्ल प्रतीपदेला तो त्या राशीत असल्यामुळे त्याप्रमाणे १६ सप्टेंबरला सुरू होणारा महिना भाद्रपद असेल. त्याला 'निज भाद्रपद' असे म्हणतील.
अधिक महिन्यामध्ये कोणतेही नेहमीचे सणवार साजरे केले जात नाहीत. भाद्रपद महिन्यातले हरतालिका आणि गणेशचतुर्थी यासारखे सण व उत्सव 'निज' भाद्रपदात सप्टेंबरमध्ये पाळले जाणार आहेत. अधिक महिन्यात लग्नाचे मुहूर्तही नसतात. पूर्वी चातुर्मासातसुध्दा ते नसत. या वेळचा अधिक महिना चातुर्मासात आल्यामुळे या वेळचा चातुर्मासाचा व्रतकाळ पाच महिने चालणार आहे. सुमुहर्त पाहून शुभमंगल करणा-या लोकांना त्यासाठी पाच महिने वाट पहावी लागणार आहे. शेषशायी विष्णूभगवान या वर्षी पाच महिने सुखनिद्गा घेणार आहेत. 'अधिक' महिन्यामध्ये काही लोक वेगळे नेमधर्म धरतात आणि 'अधिकस्य अधिकम् फलम्' म्हणून त्यातून जास्त फलप्राप्ती व्हावी असा त्यांचा विश्वास असतो. अधिक महिन्याबद्दल अशी कथा आहे की पुराणकाळात अधिक महिना विष्णूभगवानांच्याकडे गेला आणि आपल्याला नेहमी इतर कोणा महिन्याच्या नावाने ओळखले जाते याबद्दल त्याने रोष व्यक्त केला. त्याची समजूत घालण्यासाठी "माझेच पुरुषोत्तम हे नाव मी तुला देतो." असा वर विष्णूने त्याला दिला. तेंव्हापासून अधिक महिन्याला 'पुरुषोत्तममास' असेही म्हणू लागले.

बहुतेक सर्व पंचांगांप्रमाणे १८ ऑगस्टला अधिक महिना येत असला तरी काही पंचांगात तो येणार नाही किंवा कदाचित आधीच येऊन गेला असेल. त्यानुसार चालणा-या लोकांचे सणवार वेगळ्या दिवशी साजरे होतात. त्या दिवशी त्यांना सुटी मिळत नाही आणि जेंव्हा सुटी असते तेंव्हा त्यांचेकडे उत्सव नसतात. यामुळे आजकाल अशा पंचांगांचे अनुकरण करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. हा फरक का येतो यालाही शास्त्रीय कारण आहे. राशी, नक्षत्रे वगैरेंच्या सीमारेखा आकाशात आखून ठेवलेल्या नाहीत आणि चंद्र किंवा सूर्याने या राशीतून त्या राशीत प्रवेश केलेला आपण तपासून पाहू शकत नाही. या सीमा काल्पनिक आहेत आणि वेगवेगळ्या विद्वानांनी त्यांच्या गणितानुसार त्या ठरवल्या असल्यामुळे त्यात किंचित फरक असतो. माझ्या लहानपणी टिळक पंचांगाप्रमाणे मकर संक्रांत १० जानेवारीला येत असे आणि दाते पंचांगानुसार ती १४ जानेवारीला येत असे (हल्ली १५ जानेवारीला येते), म्हणजे या संक्रमणात चार दिवसांचा फरक होता. अर्थातच अधिक महिना कोणता हे ठरवतांना यामुळे निश्चितपणे फरक येणारच.
दिवसातून ठराविक वेळ चालणारी ऑफिसे पूर्वीच्या काळी नव्हती, तसेच दर महिन्याला पगार देण्याची पध्दतही नव्हती. राजाच्या पदरी असलेल्या लोकांना वर्षासने मिळत आणि खेड्यातील बारा बलुतेदारांना दिवाळी किंवा होळीसारख्या सणाला धान्यधून्य मिळत असे. पीकपाण्याच्या आणेवारीनुसार दुष्काळाच्या वर्षी त्यात कपातही होत असे. वर्षातून एक दोन वेळा जे मिळेल त्यावरच पुढील बारा महिने गुजराण करावी लागत असे. अशा काळात ज्या वर्षात तेरावा महिना येई तेंव्हा ओढाताण होणे साहजीक आहे. त्यातून जर त्या वर्षी दुष्काळ पडला असेल आणि त्यामुळे चणचण झाली असेल तर दुहेरी आपत्ती ओढवत असे. यावरूनच 'दुष्काळात तेरावा महिना' ही म्हण पडली आहे आणि अधिक महिन्याला रागाने 'धोंडा महिना' असेही नाव मिळाले आहे.





1 comment:

Anonymous said...

उत्तम, अभ्यासपूर्ण धन्यवाद