Wednesday, August 15, 2012

स्मृती ठेवुनी जाती - विलासराव देशमुख

राजकारण आणि राजकारणी यांच्यापासून मी नेहमी कोसभर दूर रहात आलो आहे. आजवर मी कधीच मंत्रालयात प्रवेशही केला नाही किंवा माझ्या ओळखीतले कोणी तिथे जात नाही. लातूर शहराचे नाव मी फक्त वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर वाचले किंवा ऐकले आहे. त्यामुळे विलासरावजींचा माझा कधीच परिचय झाला नव्हता, योगायोगानेसुध्दा मी कधीच त्यांच्या संपर्कात आलो नव्हतो. तरीसुध्दा त्यांना अत्यवस्थ अवस्थेत चेन्नाईच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे हे ऐकून मला चिंता वाटू लागली आणि काल त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून वाईट वाटले, आपण काही तरी गमावले आहे असे वाटले. काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्या लिहून काढाव्या असे वाटले. विलासरावांच्या राजकीय कारकिर्दीबद्दलच्या लेखांनी आजची सर्व वर्तमानपत्रे भरून गेली आहेत, त्यात भर टाकण्यासारखे माझ्याकडे काही नाही आणि त्यांच्या व्यक्तीगत जीवनाबद्दल मला कधीच कसली माहिती नव्हती. माझ्या स्वतःच्याच स्मृतीमधील विलासरावांबद्दल मी लिहू शकेन.
तीस बत्तीस वर्षांपूर्वी वेल्डिंग या विषयावरील एका सेमिनारला मी हाजीअलीजवळच्या एका सभागृहात गेलो होतो. त्याच्या उद्घाटनाला एक मंत्री येणार आहेत असे ऐकले. ते महाशय वेळेवर येणार नाहीत, सावकाशपणे ते आल्यानंतर त्यांचे स्वागत, त्यांची हाँजीहाँजी, त्यांचा सत्कार, त्यांचे कंटाळवाणे भाषण वगैरेमध्ये बराचसा वेळ निघून जाईल आणि सेमिनारचे वेळापत्रक कोलमडून पडेल अशी भीती मला वाटत होती आणि आजूबाजूची अनुभवी मंडळी तसेच बोलत होती. पण त्या दिवशीचे प्रमुख पाहुणे असलेले विलासराव देशमुख (त्या वेळी ते बहुधा बांधकामखाते सांभाळत असावेत) तेवढ्यात येऊन पोचले. सत्कारासारख्या नॉनटेक्निकल बाबीवर वेळ घालवायचा नाही असे बहुधा त्यांनीच बजावले असावे. कसलीही फापटपसारा न लावता तो समारंभ अगदी थोडक्यात आटोपला. त्या दिवशी विलासरावाच्या घशाला जबरदस्त इन्फेक्शन झाले असल्यामुळे ते स्वतः बोलू शकत नव्हते, पण त्यांचे छोटेसे भाषण वाचून दाखवले गेले, ते मुद्याला धरून आणि सेमिनारच्या विषयाशी सुसंगत होते. कधी कधी अशी भाषणे लिहिणारे घोस्ट राइटर्स असतात ही गोष्ट मला त्यावेळी माहीत नव्हती, त्यामुळे ते विलासरावांनीच लिहिले असणार असे समजून मी खूप इम्प्रेस्ड झालो होतो. त्यांचे हसरे आणि उमदे व्यक्तीमत्व, देहबोलीमधून व्यक्त होणारे भाव वगैरेंमुळे माझ्यावर त्यांचा चांगला प्रभाव पडला आणि ते फर्स्ट इम्प्रेशन टिकून राहिले.
एकदा योजना प्रतिष्ठानच्या एका सांगीतिक कार्यक्रमाला मी दादरच्या शिवाजी मंदिरात गेलो होतो. त्याच इमारतीतील दुस-या एका सभागृहातल्या कार्यक्रमाला किंवा बैठकीला विलासराव आले होते. हे समजताच प्रतिष्ठानच्या संयोजकांनी त्यांना या कार्यक्रमालाही भेट देण्याची विनंती केली आणि ती स्वीकारून विलासराव तिथे आले, थोडा वेळ बसले आणि सत्कारसमारंभात दोन शब्द बोलले. नेत्याने लोकाभिमुख कसे असायला हवे याचे एक उदाहरण पहायला मिळाले. त्या वेळी ते बहुधा मुख्यमंत्रीपदावर नव्हते, पण व्हीआयपी नक्कीच होते. त्यानंतर एकदा एक मोठे परदेशी पाहुणे बीएआरसीला भेट देण्यासाठी आले असतांना त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख प्रोटोकॉलनुसार त्यांच्यासोबत आले होते आणि औपचारिक चार शब्द बोलले होते. या सर्व कार्यक्रमाला मी एक सर्वसामान्य प्रेक्षक होतो आणि विलासराव रंगमंचावर दिमाखात वावरत होते. त्यांचे बोलणे, चालणे, हसणे या सगळ्यात ऐट दिसायची पण अहंमन्यता किंवा मिजास दिसली नाही. त्यात एक प्रकारचा सुसंस्कृतपणा होता.

राजकीय क्षेत्रात उच्चपदावर गेल्यानंतर त्यांचे टेलिव्हिजनवर वेळोवेळी दिसणे अपरिहार्य होते. त्यांची भाषणे, मुलाखती वगैरेमधून त्यांचे वाक्चातुर्य, हजरजबाबीपणा वगैरे गुण दिसून येत होते. त्यांना उत्तम विनोदबुध्दी होतीच, राजकारणी लोकांचा उपहास करणे हा मराठी रंगमंचावरला आवडता विषय आहे. पण अशा वेळीसुध्दा समोरच्या रांगेत बसलेले विलासराव संतापत नसत किंवा नाराजी व्यक्त करत नसत, उलट असा विनोदांनासुध्दा हसून दाद देत असत. चर्चांमध्ये आलेले काही संवेदनशील विषय ते गंमतीत टोलवून लावत असत. एका राजकीय नेत्यासाठी आवश्यक असलेले नेतृत्वगुण व संघटनकौशल्य आणि मंत्रीपदाची धुरा यशस्वीपणे वाहण्यासाठी लागणारे प्रशासनकौशल्य हे गुण त्यांना सढळ हाताने मिळाले असणार. त्यामुळेच इतकी वर्षे त्यांनी आपले स्थान सांभाळले होते. या गुणांची झलकसुध्दा त्यांच्या वागण्याबोलण्यातून दिसून यायची.

त्यांचा मुलगा रितेश सिनेक्षेत्रात आला आणि त्यासंबंधित अॅवॉर्ड्स फंक्शन्सचे संचालन करू लागला तेंव्हा काही वेळा विलासरावसुध्दा काही क्षणांसाठी तिथे आलेले दिसायचे. राज्याचा मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्रीमंडळाचे वरिष्ठ सदस्य असतांना अशा कार्यक्रमाला हजर राहण्यात त्यांना कमीपणा वाटत नव्हता आणि मंचावर चालत असलेले चाळे पहातांना एंबरॅसमेंट होत नव्हती, याचेच आमहाला थोडे नवल वाटायचे. पण हा सुध्दा त्याच्या मनाच्या मोठेपणाचाच एक भाग होता.
एकंदरीतच पाहता विलासरावांनी असंख्य लोकांच्या मनात स्वतःची जागा बनवली होती, त्यामुळेच त्यांच्या अकाली निधनाने त्यांना धक्का बसला. विलासराव देशमुख ही व्यक्ती आता पंचत्वार विलीन झालेली असली तरी त्यांच्या स्मृती शिल्लक राहणार आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.

No comments: