Saturday, May 26, 2012

लेखन आणि प्रसिध्दी

एकाद्या माणसाला (इतर प्राणी लिहू शकतात असे ऐकले नाही) काही लिहिण्याची इच्छा झाली, त्याला लिहिता येत असले, लेखनाची सामुग्री उपलब्ध असली आणि थोडा वेळ मिळाला तर तो काही तरी लिहितो असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. शिक्षण आणि नोकरी, व्यवसाय वगैरेंमध्ये काही ना काही लिहिण्याची गरज अनेक वेळा असते आणि त्यावेळी इच्छा नसली तरी आणि मुद्दाम वेळात वेळ काढून आवश्यक लेखन करावेच लागते. मला मात्र लिहिण्या वाचण्याची अगम्य अशी आवड असल्यामुळे शाळेत असतांना किंवा नोकरीत असतांना कामानिमित्य आवश्यक तेलिहितांनासुध्दा त्यात मजा वाटत असे. पण अवांतर काही लिहिण्याची इच्छा असली तरी ते न करण्यासाटी काही ना कारणांमुळे त्यात अडकाठी येत असल्यामुळे फारसे लिहून झाले नाही. याची कसर थोडी फार भरून काढायची असे सेवानिवृत्तीनंतर ठरवले आणि या ब्लॉगच्या रूपाने एक संधी मिळवून घेतली.

आपल्या काही लिहिण्यामागे असंख्य प्रकारचे उद्देश असू शकतात. सामानाची यादी किंवा कोणाकोणाचे फोन नंबर यापासून ते जमाखर्च किंवा रोजनिशीपर्यंत अनेक गोष्टी आपण स्वतःसाठीच लिहितो, तर आपले विचार, भावना वगैरे पत्रांमधून व्यक्त करतो तेंव्हा दुस-या कोणी तरी त्या वाचाव्यात अशी आपली इच्छा असते. तसेच उपयुक्त अशी माहिती किंवा सूचना आपण लिखित संदेशांमधून दुस-यांना देत असतो. शाळा कॉलेजमधील अभ्यासासाठी आणि नोकरी व व्यवसायामधील कामात केलेल्या नोंदी, पत्रव्यवहार वगैरेंसाठी मी काळ्या किंवा निळ्या केलेल्या पांढ-या कागदांची संख्या कित्येक हजारांवर असेल. पण याला 'लेखन' म्हंटले जात नाही. पुस्तकरूपाने किंवा नियतकालिकांमध्ये छापून आलेल्या मजकूराचीच गणना 'लेखन' या सदरात केली जाते.

माझ्या लहानपणातल्या विश्वात पुस्तकांना खूप महत्वाचे स्थान असल्यामुळे आपणसुध्दा मोठेपणी लेखक व्हावे असे वाटत असे, पण त्या काळातले सारे लेखक उदरभरणासाठी काही ना काही इतर काम करायचे, त्यामुळे मलाही आधी पोटापाण्याची व्यवस्था करणे भाग होते. ती झाल्यानंतर त्यासाठी कराव्या लागणा-या धावपळीतून कधी रिकामा वेळ मिळाला तर काही तरी अवांतर लिहिण्याची उबळ कधी कधी यायची, पण माझे लिखाण कोण छापणार आहे? आणि ते छापलेच गेले नाही तर आणखी कोणी ते वाचायचा प्रश्नच उद्भवत नाही अशा विचाराने ती जिरून जायची. सेवानिवृत्तीनंतर वेळ मिळण्याचा प्रश्न मिटला आणि इंटरनेटचा प्रसार झाल्यामुळे आपले लिखाण छापील अक्षरात इतरांपर्यंत पोचवण्यासाठी ते कोणी छापण्याची गरज उरली नाही. त्यामुळे मीलिहायला सुरुवात केली.
पुस्तक छापण्यामागे खूप मोठा प्रपंच करावा लागतो हे ठाऊक असल्यामुळे तो विचारही मनात आणण्याचा प्रश्नच नव्हता. वर्तमानपत्रांमध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारात आपले म्हणणे छापून आणणे त्या मानाने सोपे असते म्हणून त्याचा प्रयत्न केला आणि दोन तीन पत्रे छापून आलीसुध्दा. माझ्या परिचयाच्या दोन चार लोकांनी ती वाचली आणि माझे अभिनंदन केले तेंव्हा आपले कष्ट सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले. माझ्या कार्यक्षेत्रातील कामानिमित्याने वृत्तपत्रे, रेडिओ आणि दूरदर्शन या तीन्ही माध्यमांमध्ये झळकण्याचे योग येऊन गेलेले असल्यामुळे त्याबाबत मला फार कौतुक राहिलेले नव्हतेच. त्यानंतर एक दोन पत्रे छापून न आल्यानंतर मला त्यात फारसा रस उरला नाही. माझ्या ब्लॉगवर मी लिहित असलेल्या लिखाणाचा दर्जा बरा असतो असे काही वाचकांनी सांगितल्यामुळे मी ते वर्तमानपत्रांकडे प्रसिध्दीसाठी पाठवून दिले, पण कोणीही त्याची साधी पोचसुध्दा दिली नाही. ज्या लोकांचे लेख छापून येत असतात अशा दोन तीन व्यक्ती योगायोगाने भेटल्या. त्यांचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करून पाहिला पण त्याचाही उपयोग झाला नाही. यापलीकडे प्रयत्न करावेत असे मला काही वाटले नाही. त्यामुळे माझे तथाकथित लेखन प्रसिध्दीपासून दूरच राहिले.


विमानाचे उड्डाण या तांत्रिकदृष्ट्या थोड्या कठीण अशा विषयावर मी एक सविस्तर लेखमाला लिहून माझ्या ब्लॉगवर टाकली होती. ती वाचून त्यावर काही चांगले शेरेसुध्दा काही वाचकांनी मला दिले होते. एका लोकप्रिय दैनिकामध्ये स्तंभलेखन करणा-या एका लेखिकेने मला पत्र लिहून माझ्या लेखांचा उपयोग तिला करता येईल का असे विचारले. कदाचित हा तिचा चांगुलपणा असावा किंवा हा व्यावसायिक औपचारिकतेचा भाग असू शकेल. मी केलेले लेखन हे मी केलेले मूलभूत संशोधन नव्हते आणि या लेखनाच्या प्रसिध्दीमधून मला काही मोबदला मिळण्याची अपेक्षा नव्हती. त्यात माझे आर्थिक संबंध गुंतलेले नव्हते. तिला माझ्या लेखांचा उपयोग करून घ्यायचा असेल तर त्याला हरकत घेण्याचे मला काही कारण नव्हते. या विषयी सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत माहिती देण्यासाठी मी केलेले प्रयत्न तिच्या लेखनामधून खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यापर्यंत पोचणार होते. यामुळे मी लगेच तिला माझा होकार देऊन टाकला. समजा मी नकार दिला असता तरी ती माहिती तिला मिळालेली होतीच आणि तिचा हवा तसा उपयोग करून घ्यायला ती स्वतंत्र होती.

या विषयावर ती लेखिका लिहीत असलेली मालिका सध्या 'कुतूहल' या सदरात प्रसिध्द होत आहे. मी लिहिलेल्या लेखांवर आधारलेला त्यातला भाग मला चटकन ओळखून येतो. लेखनाचा मुख्य उद्देश ते जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचावे असा असल्यास तो आज सफल होत आहे. या लेखमालिकेसोबत श्रेयनामावली देण्याची सोय नसल्यामुळे तिने जरी माझे नाव त्यात देण्याचे ठरवले तरी ते छापले जाणार नाही आणि इतरांना ते समजणार नाही हे मात्र खरे. ज्या मूठभर लोकांनी माझी लेखमाला वाचली असेल त्यांना कदाचित ती आठवेल.



No comments: