Saturday, May 19, 2012

उन्हाळ्याची सुट्टी

"नेमेचि येतो बघ पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा।" ही कविता लहानपणी पाठ केली होती. पण ज्या दुष्काळी प्रदेशात माझे लहानपण गेले त्या भागात फारसा पाऊस पडतच नसे. त्यामुळे कौतुक वाटण्याइतका मुसळधार पाऊसही कधी पडायचा नाही आणि वर्षभरातून ज्या काही दोन चार जोरदार सरी पडायच्या त्यांचा तर अजीबात 'नेम' नसे! मग कौतुक तरी कशाचे वाटणार? पूर्वेकडून येणा-या आदिलशहाच्या फौजांना अडवून धरण्याचे काम करून शिवाजी महाराजांचा त्यांच्यापासून बचाव करण्याचे महत्कार्य जो सह्याद्री करत असे असे आम्ही इतिहासात शिकलो तोच सह्याद्री नैऋत्येकडून येणाच्या पावसाळी ढगांना अडवून धरत किंवा रिकामे करून टाकत असल्यामुळे आम्हाला सृष्टीचे हे कवतिक पाहू देत नाही हे भूगोलात वाचून त्याचा राग येत असे. तसेच नजरेला न पडणारा हा पर्वत त्याची वर्षाछाया इतक्या दूरवर कसा टाकतो हे समजत नसे. अवचित येणा-या पावसाच्या आधीपासून उन्हाळा सुरू होत असे आणि नवरात्रानंतर येणा-या 'ऑक्टोबर हीट'पर्यंत तो चालत असे.
रखरखीत असा हा उन्हाळासुध्दा आम्हाला मात्र बराच प्रिय वाटत असे, त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या कालावधीत शाळांना लागणा-या लांबचलांब सुट्या. आमची शाळा तशी वाईट नव्हती, पण तरीही सुटी ही सुटीच! आमचा मामासुध्दा त्याच गावात रहात असल्यामुळे झुकझुक गाडीत बसून मामाच्या गावाला जाण्याचे अप्रूप आमच्या नशीबात नव्हते, पण सासरी गेलेल्या माझ्या मोठ्या बहिणींपैकी कोणी ना कोणी उन्हाळ्याच्या सुटीत त्यांच्या लहान मुलांसह आमच्या घरी माहेरपणासाठी यायच्याच. 'मामाच्या गावा'ला जाण्याची मौज त्या मुलांना मिळायची. कॉलेजशिक्षण किंवा नोकरीसाठी परगावी राहणारे मोठे भाऊही त्या सुमारास घरी येऊन बरेच दिवस रहायचे. त्यामुळे घर भरून जात असे. शाळेत जायची कटकट नसल्यामुळे मौजमस्ती दंगा वगैरे करण्यासाठी आम्हाला दिवसभर मोकळाच असे. पत्त्याचे अनेक प्रकारचे खेळ, सोंगट्या, बुध्दीबळ वगैरेंचे डाव रंगायचे, गाण्याच्याच नव्हे तर गावांच्या, नावांच्या वगैरे भेंड्या, कोडी घालणे आणि सोडवणे, नकला वगैरेंना ऊत येत असे. सर्वात मुख्य म्हणजे या ना त्या निमित्याने काहीतरी कुचाळकी काढून चिडवाचिडवी करणे!
पोहायला जाणे हा उन्हाळ्याच्या सुटीतला एक आवडता कार्यक्रम असायचा. त्या काळात जलतरणतलाव (स्विमिंग पूल) हा प्रकार आमच्या लहान गावात कोणी ऐकलासुध्दा नव्हता. गावातले एकमेव तळे उन्हाळ्यात आटून जात असे. शिवाय ते अगदी उथळ होते आणि काही लोक त्याचे पाणी प्यायला नेत असल्यामुळे तिथे डुंबायला बंदी होती. त्यामुळे गावाबाहेरील एकाद्या मळ्यातल्या विहिरीवरच पोहण्यासाठी जावे लागत असे. निदान चार पाच वेळा तरी हातपाय मारायला जागा मिळावी एवढी आकाराने मोठी तसेच बुडण्याइतपत पाणी असलेली आणि खोलवर उतरून जाण्यासाठी पाय-या असलेली अशी आसमंतातली विहीर शोधून काढणे आणि तिच्या मालकाची परवानगी मिळवणे हे जिकीरीचे काम कोणी उत्साही मोठी मंडळी करत असत. एकाद्या वर्षी कल्याणशेट्टी, दुस-या वर्षी परसप्पा, तिस-या वर्षी असाच आणखी कोणी उदार मनाचा जमीन मालक मिळाला की ती बातमी गावभर पसरत असे आणि सकाळ झाली की आम्ही मुले उत्साहाने एका पंचात चड्डी गुंडाळून घेऊन आपला मोर्चा तिकडे वळवत असू. 'स्विमिंग कॉस्च्यूम' असले अवघड आणि बोजड शब्द तेंव्हा अजून कानावर पडले नव्हते, भक्त प्रल्हाद, वीर हनुमान यासारखे जे सिनेमे पहायची संधी लहानपणी मिळाली त्यातली पात्रे घातल्यास नेहमीच तोकडे कपडे घालत, पोहण्यासाठी त्यांचे खास वेगळे कपडे नसत. त्या बाबतीत आमच्यापुढे कसले उदाहरण नव्हते आणि आम्हीही नेहमीच्या चड्डीतच पाण्यात उतरत असू. मैल दीड मैल पायपीट आणि तास दीडतास पोहणे करून घरी परत आल्यावर सडकून भूक लागलेली असायची आणि घरातील स्त्रीवर्गाला हे ठाऊक असल्याने त्यांनी आमच्या क्षुधाशांतीची जय्यत तयारी करून ठेवलेली असे. त्या वेळी खाल्लेल्या साध्या थालीपीठाची चंव कदाचित पंचतारांकित हॉटेलांमध्ये घेतलेल्या ग्रँड डिनर पार्टीतसुध्दा कधी आली नाही.

मला लहानपणी न मिळालेली झुकझुक झुकझुक आगीनगाडीत बसून मामाच्या गावाला जाण्याची संधी माझ्या मुलांना मात्र मिळाली आणि त्यांनी तिचा पुरेपूर उपभोग घेतला. त्यांना परत आणण्याचे निमित्य करून मीसुध्दा चार दिवस सासुरवाडीला जाऊन येत असे आणि 'जमाईराजा' म्हणून माझेही कोडकौतुक होत असे. कालांतराने मुले मोठी होऊन त्यांनी संसार थाटले आणि नातवंडे शाळेला जाऊ लागली. या वर्षी त्यांच्या शाळेला सुटी लागल्यावर त्यांचे 'समर कोचिंग क्लासेस' सुरू झाल्यामुळे ती कुठे जाऊ शकत नव्हती आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी आम्हीच मुलाकडे जाऊन राहिलो. सेवानिवृत्तीनंतर मला तशी सुटीचसुटी आहे, पण रिकामा वेळ चांगल्या रातीने घालवण्यासाठी काही नसते उद्योग लावून घेतले होते, हा ब्लॉग लिहिणे हा त्यातलाच भाग. पण परगावी गेल्यावर माझे इतर उद्योग बंद पडले तसेच ब्लॉगिंगचेही झाले. माझा मराठी जाणणारा संगणक सखा आणि आंतर्जालावर करत असलेली मनसोक्त मुशाफिरी या दोन्हींचा सहभाग असला तरच मी या बाबतीत काही करू शकत होतो आणि तेच जमत नसल्यामुळे या ब्लॉगलाही महिनाभर सक्तीची रजा द्यावी लागली.

आज एका कामासाठी मुंबईला येताच हात फुरफुरायला लागले आणि हा भाग लिहून टाकला.

No comments: