Saturday, March 24, 2012

घई आणि घाई

थोडे दिवस पुण्याला राहून परत आल्यानंतर आपल्या घरातला मेलबॉक्स उघडून पाहिला. आप्तांनी किंवा मित्रांनी स्वतःच्या अक्षरात लिहिलेली पत्रे आजकाल येतच नाहीत. मी तरी यापूर्वी कधी आणि कोणाला व्यक्तीगत पत्र लिहिले होते हे आठवतसुध्दा नाही. हा रिवाजच आता नाहीसा होत चालला आहे. निरनिराळी बिले, वार्षिक अहवाल, नोटिसा, जाहिराती, कार्यक्रमांची किंवा समारंभांची आमंत्रणे वगैरे छापील पत्रकांनीच तो डबा भरला होता. त्यातच पोस्टकार्डाच्याही अर्ध्या आकाराचे एक चिटोरे होते. ते एका कूरियर कंपनीकडून आले होते. "तुमच्यासाठी आलेले पत्र आमच्या कंपनीच्या ऑफीसामधून ताबडतोब घेऊन जावे." अशा अर्थाच्या छापील मजकुरात पाठवणा-याचे नाव 'पी.एस.घई' आणि असिस्टंटचे नाव 'संतोष' एवढे दोनच शब्द गिचमिड अक्षरात हाताने लिहिले होते.
हा घई कोण असावा? यावर माझे विचारचक्र सुरू झाले. 'सुभाष घई' हे एकच सुप्रसिध्द नाव माझ्या परिचयाचे होते, म्हणजे फक्त ते नावच तेवढे मला माहीत आहे, तेसुध्दा हे गृहस्थ सिनेमे काढतात म्हणून! "आम्ही मायबाप प्रेक्षकांसाठी चित्रपट काढण्याचे उपद्व्याप करतो." वगैरे थापा हे सिनेमावाले मारत असले तरी त्यांचे सिनेमे पहायला कोण लोक येतात त्याची चौकशी ते कधीच करत नाहीत. सिनेमाचे तिकीट काढतांना कधीही मी आपले नावगाव सांगितल्याचे मला तरी आठवत नाही. तो पाहून झाल्यावर त्यातला कोणता भाग मला बरा वाटला आणि कोणता भाग भिकार याची चर्चा मी कोणाबरोबर केलीही असली तरी साक्षात सुभाष घईलाच पत्र लिहून ते कळवण्याची तसदी मी कधी घेतली नव्हती की त्यावर कोठल्याही माध्यमातून माझी जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यामुळे माझे नावसुध्दा त्याच्या कानावर जाण्याची मुळीच शक्यता नव्हती. अभिनय, गायन, गीतलेखन, संवादलेखन, छायाचित्रण, संकलन असल्या सिनेमाक्षेत्राशी संबंधित कुठल्याच क्षेत्राशी माझा दूरान्वयानेही संबंध नसल्यामुळे सुभाष घईने माझा पत्ता शोधून काढला नसणारच. थोडक्यात म्हणजे त्याच्या नावामागे कदाचित एकादा 'सायलंट पी' असला अशी कल्पना केली तरीही त्या (पीएस)घईने मला पत्र पाठवले असण्याचे एकही कारण दिसत नव्हते.

सुभाष घईचे नाव अशा प्रकारे रद्द करेपर्यंत घई या नावाची दुसरी एक व्यक्ती मला आठवली. माझ्या ऑफीसात घई नावाचे कोणी नवे फायनॅन्स डायरेक्टर असल्याचे मी कोणाकडून तरी ऐकले होते. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या पदावर रुजू झालेले असल्यामुळे मी त्यांना प्रत्यक्षात कधी भेटलेलो नव्हतो, पण त्या महत्वाच्या जागेवर ते आले असल्याची माहिती माझ्यापर्यंत पोचली होती. त्यामुळे हे कूरियर त्यांनीच पाठवले असावे असे मी ठरवून टाकले. त्यांना तरी ते पाठवायची काय गरज पडली असेल? या प्रश्नाची काही संभाव्य उत्तरेही मिळाली. सरकारी कर्मचा-यांचे वेतन ठरवण्यासाठी आयोग नेमले जातात. दीर्घकाळानंतर ते आपला अहवाल देतात. सरकार तसेच कर्मचा-यांची संघटना या दोघांनाही ते पसंत पडत नाहीत. त्यामुळे ते त्यावर थेट चर्चा आणि घासाघीस करून नव्या वेतनश्रेण्या ठरवतात. त्यासंबंधी काढलेल्या सरकारी फतव्यांमध्ये कधीकधी अनेक त्रुटी किंवा असंबध्दपणा आढळतो. त्यावर वादविवाद, कोर्टकचे-यातले तंटे, लवाद वगैरे चालत राहतात. त्यांच्या निकालानुसार नवी पत्रके निघतात. हे सगळे पुढील आयोग बसेपर्यंत चालतच असते. अशाच कुठल्याशा उपकलमात बदल युचवणा-या पत्रकानुसार मला काही फायदा होणार असल्याचे फायनॅन्स डिपार्टमेंमधल्या कोणाच्या लक्षात आले असेल आणि त्याने त्या लाभाच्या थकबाकीचा धनादेश माझ्याकडे पाठवला असेल असे मनातले मांडे मी खाऊन घेतले.

पण अशा प्रकारचा पत्रव्यवहार एकदम डायरेक्टरच्या पातळीवर करायची काय गरज होती? एरवी एकाद्या अकौंट्स ऑफीसर किंवा मॅनेजरनेच हे काम केले असते. कदाचित उच्च पदावरून निवृत्त झालेल्या लोकांचा मान राखण्यासाठी त्यांना स्वतः पत्र पाठवण्याचा नवा पायंडा या घईने सुरू केला की काय? असा विचित्र विचार मनात आला. कदाचित हे पत्र मला वाटत होते त्या संबंधात नसेलच. हे घई महाशय ऑफीसातल्या एकाद्या समीतीचे अध्यक्ष असतील आणि त्या भूमिकेतून त्यांनी मला व्याख्यान देण्यासाठी किंवा उद्घाटन करण्यासाठी, किंवा नुसतीच हजर राहून शोभा वाढवण्यासाठी पत्र पाठवून पाचारण केले असण्याचीही शक्यता होती. काही का असेना, या निमित्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी मी उत्सुकच होतो. त्यामुळे न मिळालेले हे पत्र वाचण्याची उत्कंठा मला अनावर झाली.

सकाळी कूरियरचे ऑफीस उघडायच्या वेळीच तिथे जाऊन धडकलो. पण तिथे निराशाच पदरी पडली. दोन दिवस माझी वाट पाहून ते पत्र परत पाठवले असल्याचे तिथल्या माणसाने सांगितले. म्हणजे त्याने ते नेमके कोणाकडे आणि कुठल्या पत्यावर परत पाठवले हे विचारायचे भानही मला निराशेच्या भरात त्यावेळी राहिले नाही. मी विचारणा केली असती तरी त्याचे उत्तर मिळण्याची शक्यता तशी कमीच होती, कारण ते एक लहानसे एक्स्टेंशन होते. कंपनीच्या मुख्य ऑफीसमधून तिथे आलेली पत्रे घरोघरी जाऊन वाटायची आणि ग्राहकांनी पाठवण्यासाठी आणून दिलेली पत्रे हेडऑफीसकडे पाठवून द्यायची एवढेच काम करणा-या त्या माणसाकडे सर्व पत्रांचे सविस्तर रेकॉर्ड असण्याची संभावना कमीच होती. पण ते पहाण्याचा प्रयत्न करणेही मला त्या क्षणी सुचले नाही.

मी तडक माझ्या जुन्या ऑफीसाकडे गेलो. सिक्यूरिटी ऑफीसमध्ये एक अनोळखी नवा चेहरा दिसला. त्याने मला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. माझे काय काम आहे हे मी सांगितल्यावर त्याने डिस्पॅच सेक्शनशी फोन जोडून दिला. तिथे एक जुन्या बाई अद्याप कामावर होत्या. माझे नाव ऐकताच त्यांना माझी ओळख पटली आणि तत्परतेने मला लागेल ती मदत करायला त्या सज्ज झाल्या. पण 'घई' हे नाव ऐकताच त्या उद्गारल्या, "घई साहेबांची तर सहा महिन्यांपूर्वीच बदली झाली." मग त्यांनी मला आठ दहा दिवसांपूर्वी पत्र पाठवणे कसे शक्य आहे? संतोष नावाचा कोणी सहाय्यक त्यांच्या ऑफीसात नव्हताच. गेल्या दोन चार दिवसात कुरीयरकडून परत आलेल्या पत्रांच्या लहानशा गठ्ठ्यात माझ्या नावाचे काही नव्हते, एवढेच नव्हे तर गेल्या महिनाभरात ऑफीसकडून माझ्या नावे कोठलेही पत्र पाठवले गेल्याचीच मुळी नोंद नव्हती. शिवाय ऑफीसकडून बाहेर जाणारी ऑफीशियल पत्रे ऑफीसचा पत्ता छापलेल्या पाकिटांमधूनच पाठवली जातात आणि त्यावर पाठवणा-या व्यक्तीचे नाव कधीच लिहिले जात नव्हते हे मला आठवले. ऑफीसच्या पाकिटावर आपले नाव लिहून त्यातून व्यक्तीगत पत्र डिस्पॅचतर्फे पाठवण्याचा मूर्खपणा कोणीही करणार नाही याचीही मला जाणीव होती. त्यामुळे मला पत्र पाठवणारा हा घई माझ्या पूर्वीच्या ऑफीसातला नव्हता हे नक्की झाले.

मग तो कोण असेल? ते कसे शोधायचे? विचार करायलाही दिशाच दिसत नव्हती. अखेर जो कोणी असेल त्याला गरज असेल तर तोच पुन्हा आपल्याशी संपर्क साधेल असा विचार करून मी आपल्या कामाला लागलो. माझ्या मोटारीचा विमा संपत आला होता. त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असल्याने विमा कंपनीचे ऑफीस गाठले. तिथे गेल्यावर पूर्वीच्या विम्याची पॉलिसी काढून तिथल्या माणसाला दाखवली. त्याला दाखवत असतांना मीही तिच्यावर एक नजर टाकली आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या पॉलिसीवर डेव्हलपमेंट ऑफीसर म्हणून पी एस घई यांच्या नावाचा रबरस्टँप मारलेला होता. माझ्या पॉलिसीची मुदत संपत आल्याकारणाने तिचे नूतनीकरण करण्यासाठी आठवण देणारे पत्र त्याच्या ऑफीसातून माझ्या नावे पाठवले गेले होते आणि पाकिटावर त्याच्या नावाचा शिक्का पडला असल्यामुळे कूरियरवाल्याने त्याचे नाव लिहिले असणार. संतोष हे त्या कूरियरच्या सहाय्यकाचेच नाव असणार.
या घईला शोधायची मी उगाचच घाई केली होती आणि त्याने पाठवलेल्या लिफाफ्यात काय असेल यावर इतके तर्क केले होते. मी घाई केली नसती तरी तो कोण आहे हे कळले असतेच. त्याचा लिफाफा मला मिळाला असता तरी त्यात मला काही लाभ नव्हता आणि नसला तरी त्याने माझे काहीच बिघडले नव्हते. घई या नवामुळेच मला घाई करायला उद्युक्त तर केले नसेल?

No comments: