पिकल्या पानांनी गळून पडणे हा निसर्गाचा नियम आहे. यातली काही पाने सोनेरीच नव्हे तर ती बावनकशी सोन्याचीच असतात असे म्हणता येईल. अशा अनमोल पानांचा २०११ मध्ये नुसता पाऊस पडला. निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी सर्वोच्च स्थान संपादन केले किंवा सर्वोच्च पातळी गाठली अशा इतक्या व्यक्ती एका वर्षात जगाला सोडून गेल्याचे यापूर्वी कधी झाले नसेल. पूर्वी पंचावन्न वर्षे पूर्ण होताच सरकारी नोकरीमधून सेवानिवृत्त केले जात असे. त्याची मुदत आता वाढवून ५८ ते ६० वर्षांपर्यंत झाली आहे. सत्तरीला पोचेपर्यंत बहुतेक लोकांची क्रियाशक्ती क्षीण झालेली असे. चिकित्सा आणि औषधोपचार यात झालेल्या प्रगतीमुळे आता सत्तरीपार गेल्यानंतरसुध्दा गोळ्या इंजेक्शने घेऊन लोक टुणटुणीत राहतात आणि सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग करून तुकतुकीत दिसतात. पिकल्या पानांचा देठच नव्हे तर ते पानच हिरवे दिसण्याची सोय झाली आहे. रोजच्या जीवनात करावे लागणारे श्रम कमी झाल्यामुळे ते सहजपणे सहन करता येतात. या सगळ्या गोष्टींमुळे आता सत्तरी आणि ऐंशीच्या पार गेल्यानंतरसुध्दा लोक क्रियाशील असतांना दिसतात. अशी पाने गळून पडायच्या वेळी त्यांचे पिकलेपण लक्षात येते.
संगीत जगतावर तर या काळात एकामागोमाग एक आघात होत गेले. भारतरत्न स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांच्यासारखा गायक पुन्हा दिसणार नाही. त्यांचे पट्टशिष्य माधव गुडी आणि श्रीकांत देशपांडे हे सुध्दा स्वर्गलोकांत त्यांची साथ करायला निघून गेले. पंडितजींच्या गडद सावलीत हे सुध्दा कधी पिकली पाने झाले होते हे समजलेच नाही.
स्व. सुधीर फडके, स्व.वसंत प्रभू, पं.हृदयनाथ मंगेशकर आणि श्री.यशवंत देव प्रभृतींबरोबरच श्रीनिवास खळे यांनी एकाहून एक सुरेल गाणी मराठी रसिक श्रोत्यांना दिली. या सर्व समकालीन संगीतकारांमध्ये खळे काकांनी सर्वाधिक काळ मराठी सुगमसंगीतावर अधिराज्य गाजवले असे त्यांच्याबद्दल सांगता येईल.
गजल म्हणजे जगजीतसिंग असे समीकरणच आजकाल बनले होते. गजल या प्रकारालाच त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती आणि गजलसम्राट असे मानाभिधान मिळवले होते.
आसाम या राज्यातील मधुर संगीत सर्व जगासमोर आणण्याचे काम पं.भूपेन हजारिका यांनी केले. त्यांच्याएवढा नावलौकिक आसाममधल्या दुस-या कोणीच कुठल्याही क्षेत्रात कमावला नसेल.
संगीताप्रमाणेच नाट्यक्षेत्रानेही दोन अनमोल हिरे गमावले. प्रभाकर पणशीकर हे काही दशके मराठी रंगभूमीचे निर्विवाद सम्राट होते. त्यांच्या हयातीतच त्यांच्या नावाने श्रेष्ठ रंगकर्म्यांना पुरस्कार देण्यात येत होते. सत्यदेव दुबे म्हणजे हिंदीच नव्हे तर जागतिक प्रायोगिक रंगभूमी म्हणता येईल. नाट्यक्षेत्रामधील कलाकारांच्या काही पिढ्या या थोर माणसाने निर्माण केल्या आणि प्रेक्षकांना दिल्या.
नाटकांपेक्षा आकाशवाणीवर ज्यांचा आवाज घरोघरी पोचला आणि सर्वांच्या ओळखीचा झाला असे करुणा देव यांच्याबद्दल म्हणता येईल.
नाटक आणि चित्रपट (नाटकसिनेमे) ही मनोरंजनाची जोडगोळी आहे. एका कालखंडातल्या तमाम तरुणींचा लाडका देव आनंद आणि सर्व तरुणांचा हीरो शम्मीकपूर या दोघांना सिनेमासृष्टीत त्यांच्या विशिष्ट स्पेशलायझेशनमध्ये या दोघांनाही तोड नव्हती.
पतौडीचे नवाब क्रिकेट जगतातसुध्दा नबाबाच्या रुबाबातच राहिले होते. वयाने जवळ जवळ सर्वात लहान असतांनासुध्दा त्यांना संघाचे कप्तानपद मिळाले आणि त्यांनी ते शानदार कामगिरी करून राखले. एकाक्ष असूनही धावांचे डोंगर रचले. शर्मिला टागोरसारख्या स्वरूपसुंदरीशी विवाह केला.
चित्रकलेच्या क्षेत्रात मकबूल फिदा हुसेन यांनी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. त्यांच्या चित्रांना लिलावांमध्ये कोट्यावधी डॉलर्स इतकी किंमत मिळाली, कधी अनवाणी फिरण्यामुळे, तर कधी लोकप्रिय नट्यांच्या चित्रांची मालिका आणि त्यांना घेऊन विचित्र प्रकारचे चित्रपट काढल्यामुळे किंवा वादग्रस्त विधाने करून ते सतत प्रसिध्दीच्या झोतात राहिले. तसेच ते अनेकांच्या तीव्र रोषालाही पात्र झाले. सर्वच बाबतीत त्यांच्यासारखे तेच होते.
व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांनी स्वतःची इतकी खास अशी शैली निर्माण केली की जिचे अनुकरणसुध्दा कोणी करू शकला नाही. मारिओने काढलेले चित्र पाहताच त्यानेच ते चित्र काढले आहे हे ओळखू येत असे.
डॉ.पी.के अय्यंगार यांनी भारताच्या अणुशक्ती विभागाचे प्रमुखपद सांभाळले होतेच, पण डॉ.भाभांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचा पाया घालणा-या शास्त्रज्ञांमधले ते एक होते. वैज्ञानिकांच्या निवडीपासून त्यांचे प्रशिक्षण आणि प्रगती या सर्वांमध्ये ते जातीने लक्ष देत असत.
इंदिरा गोस्वामी ज्ञानपीठविजेत्या महान साहित्यिक होत्या.
सत्यसाईबाबांच्या एवढा अनुयायीवर्ग कोणालाही मिळाला नसेल. या काळामध्ये त्यांचे इतके असंख्य भक्तगण तयार झाले हाच त्यांनी दाखवलेला सर्वात मोठा चमत्कार म्हणता येईल. दुसरा कोणताही बाबा किंवा स्वामी या बाबतीत त्यांच्या जवळपाससुध्दा येणार नाही.
स्व.पं.अशोक रानडे हे भारतीय संगीताचे ज्ञानकोश होते. संगीतशास्त्रावर त्यांनी केलेले संशोधन आणि लेखन, अध्यापन, व्याख्यान वगैरे माध्यमातून केलेले प्रबोधन अतुलनीय असेच होते.
उस्ताद सुलतानखान यांनी सारंगी या भारतीय वाद्याची प्रतिष्ठा राखून ठेवली होती. परदेशातून आलेल्या व्हायोलिनपुढे सारंगी आता मागे पडत चालली असून दुर्मिळ होण्याच्या मार्गावर चालली आहे. सारंगीवादनाच्या कलेवर प्रभुत्व गाजवणार्या कलाकारांमध्ये उस्तादजींचे नाव प्रमुख होते.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाची पदं भूषवलेल्या पी. सी. अलेक्झांडर यांनी एकेकाळी देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ते खास विश्वासातले होते. त्यांचे प्रधान सचिव म्हणून ही ते काम पहात होते . पी.सी. अलेक्झांडर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अत्यंत विश्वासू वर्तुळातील होते अन गांधी यांच्या महत्वाच्या निर्णयांवर पि.सी अलेक्झांडर यांचा प्रभाव होता. त्यांनी लिहीलेले 'My Years With Indira Gandhi' हे पुस्तक वाचण्यायोग्य आहे.
जहांगीर सबावाला : महान चित्रकार ! जे स्वतःबध्दल फार कमी बोलत पण त्यांची चित्रे हि बोलकी होती.
श्रीलाल शुक्ला : 'रंगदरबारी' चे लेखक ज्याचे अनुवाद १५ विविध भाषेत झाले ते हिंदी साहित्यातील महान लेखक यांचे ही निधन २०११ मध्येच झाले
मणी कौल : ज्यांनी बॉलीवूड मध्ये पैरलल सिनेमाचे पायाभरणी केली. त्यांची नाटक / चित्रपट ' दुविधा', 'उसकी रोटी' , 'आषाढ़ का एक दिन' यांनी कलेचे अतिउच्च शिखर गाठले होते
डॉ हरगोबिंद खुराना : भारतीय मूळ चे अमेरिकी वैज्ञानिक डॉ . हरगोबिंद खुराना यांनी नोबेल पारितोषिक मिळविले होते ज्यांनी जीव रसायन (बायोकेमेस्ट्री) मध्ये क्रांती आणली .
वर्ष सरता सरता अखेरच्या दिवशी ख्यातनाम कवियत्री वंदना विटणकर यांनी देखिल जगाचा कायमचा निरोप घेतला.
अशा इतक्या सगळ्या लोकांना २०११ या एकाच वर्षाने काळाच्या पडद्याआड नेले.
1 comment:
कोवळे तांबूस रूप लेवूनी, उगवती इवली शाखांवरूनी
हिरव्या रंगच्छटांनी खुलुनी, तेजे मिरवती जी यौवनी
जीवनरसनिष्पत्ती करती, डौले दिपवती, समीरे झुलती
विकसती, थकती, पिकती, पाने गळून समर्पण करती
त्या पानांचे समयोचित कौतुक आपण "सोनेरी पाने" मधे केलेले आहेत. आवडले!
Post a Comment