Monday, December 05, 2011

सुसंस्कृत

सुसंस्कृत' या शब्दाचा अर्थ 'ज्याच्यावर चांगले संस्कार झाले आहेत' असा मानला जातो. लहान मुलांची वाढ होत असतांना सर्व मार्गांनी अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न ती मुले करत असतातच, शिवाय त्यांचे पालक, शिक्षक आणि इतर वडीलधारी मंडळी त्यांना काही गोष्टी समजावून सांगतात, शिकवतात, त्यांच्याकडून करवून घेतात, त्यांना वळण लावतात. या सगळ्यांमधून त्यांच्यात जो चांगला फरक पडत असतो त्याला 'संस्कार' असे नाव दिले गेले आहे. पहायला गेल्यास जीवंत असेपर्यंत आपल्यावर संस्कार होतच असतात, पण लहान वयातले मूल संस्कारक्षम असल्यामुळे त्याच्या मनावर संस्कार होणे सोपे आणि अधिक टिकाऊ असते. माणसाच्या मनावर झालेल्या संस्कारातून त्याचा स्वभाव, त्याची वागणूक वगैरेवर प्रभाव पडतो. विशेषतः ज्या गोष्टी त्याच्या नकळत तो करत असतो त्यांच्या मुळाशी त्याच्या अंगातले उपजत गुण असतात, तसेच त्याच्या मनावर झालेले संस्कार असतात. लहानपणी मनावर झालेले संस्कार इतके खोलवर रुजलेले असतात की ते त्या माणसाच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनून जन्मभर त्याच्या सोबत राहतात. ते पुसायचे असल्यास त्यासाठी त्याला नंतर खूप प्रयत्न करावे लागतात.

'संस्कार' हा शब्द सर्वसाधारणपणे चांगल्या अर्थाने वापरला जातो. कोणतेही पालक किंवा शिक्षक सहसा मुद्दामहून मुलांना वाईट मार्गाला लावणार नाहीत. पण ती लागली तर बहुतेक वेळी त्यालासुध्दा वाईट संगतीमुळे झालेले चुकीचे संस्कार हे कारण दाखवले जाते. 'चांगले' आणि 'वाईट' या शब्दांचे अर्थ मात्र निरनिराळ्या परिस्थितींमध्ये वेगळे निघतात. खूप श्रीमंत कुटुंबांकडे स्वयंपाकपाणी करण्यासाठी नोकरचाकर असतात. घरातल्या प्रत्येक माणसाने त्याला आवडेल तो पदार्थ यथेच्छ खावा आणि कोणाला तो कमी पडता कामा नये असा हुकूम असल्यामुळे ढीगभर अन्न शिजवले जाते आणि घरातल्या माणसांची जेवणे झाल्यानंतर उरलेल्या अन्नाचे काय होत असेल याची फिकीर कोणीही करत नाही. अशा वातावरणात वाढलेल्या मुलांच्या मनावर तसेच वागण्याचे संस्कार होतात, त्यांना तशाच संवयी लागतात. याउलट दरिद्री माणसांच्या घरात अन्नाचा प्रत्येक कण मोलाचा समजला जातो आणि वाया जाऊ दिला जात नाही. मध्यमवर्गीयांची अन्नान्नदशा नसली तरी ती होऊ नये म्हणून "पानात वाढलेले अन्न संपवलेच पाहिजे", "शिजवलेले सारे अन्न खाल्ले गेले पाहिजे" वगैरे शिकवण दिली जाते. शरीराला आवश्यकता नसतांना खाल्ले गेलेले जास्तीचे अन्न अपायकारक असते आणि तेसुध्दा एक प्रकारे वायाच जाते हे अनेक लोकांना शरीरशास्त्राच्या अभ्यासातून कळले तरी वळत नाही. याला कारण लहानपणी मनावर झालेले संस्कार ! कोणते संस्कार चांगले आणि कोणते वाईट याबद्दल वेगवेगळी मते असू शकतात हे वरील उदाहरणावरून दिसून येते.

पूर्वीच्या काळी रूढ असलेल्या एकत्र कुटुंबांमध्ये आजोबापणजोबा आणि आज्यापणज्यांपासून नातवंडा पणतवंडांपर्यंत खूप माणसे एकत्र रहात असत. त्यांनी आपापसात कलह न करता सामंजस्याने रहावे यासाठी घराघरात एक प्रकारची शिस्त पाळली जात असे. घरातील प्रत्येक सदस्याने ती शिस्त लहानपणापासूनच अंगात भिनवावी या दृष्टीने मुलांच्या व मुलींच्या मनावर विशिष्ट प्रकारचे संस्कार प्रयत्नपूर्वक केले जात असत. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणकोणत्या वेळी काय काय करायचे आणि ते कसे करायचे याचे नियम ठरलेले असत. ते पाळण्याची सवय मुलांना जबरदस्ती करून लावली जात असे. त्यांच्याकडून परवचे आणि श्लोक वगैरेचे पाठांतर करून घेतले जात असे. प्रामाणिकपणा, विनम्रता, आज्ञाधारकपणा वगैरेंसारखे गुण शिकवले जात असत. त्यात आज्ञाधारकपणा हा सर्वात मोठा गुण समजला जात असे. मोठ्या माणसांनी सांगितलेले सर्व काही निमूटपणे ऐकून घ्यायचे, वर तोंड करून त्यांना उलट उत्तरे द्यायची नाहीत, त्यांची चूक काढायची नाहीच, त्यांच्या सांगण्याबद्दल शंकासुध्दा व्यक्त करायची नाही वगैरे बाबींचा त्या काळात थोडा अतिरेक होत असावा असे मला आता वाटते. सुमार वकूब असलेल्या मुलांसाठी हे पढवणे ठीक असेलही, पण स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आणि कल्पकता यांच्या वाढीमध्ये त्या प्रकारच्या संस्कारांचा अडथळा येत असे. संयुक्त कुटुंब पध्दतीच आता मोडीत निघाली आहे आणि टेलिव्हिजनच्या व इंटरनेट यांच्या प्रसारामुळे मुलांना लहानपणापासूनच बाहेरच्या जगात काय चालले आहे हे समजू लागले आहे. त्यामुळे कळत नकळत त्यांच्या मनावर होणारे संस्कार आता बदलले आहेत.

माणसाचा आचार, विचार आणि उच्चार या तीन्हीवर संस्काराचा प्रभाव पडतो. लहान मुलांना विचार करण्याएवढी समज नसते म्हणून विचारांवर जास्त भर न देता त्यांना चांगले वागणे आणि बोलणे यांचे वळण लावले जाते. ते सुधारले तर त्याच्या मागील विचार समजला नाही तरी त्या संस्कारांचा फायदाच होईल असे ही कदाचित वाटत असावे. पिढ्या न् पिढ्या असेच चालत राहिल्यास त्या उक्ती किंवा कृतींच्या मागे असलेले विचार हरवूनही जात असतील असे कधीकधी वाटते. अनेक रूढी, रीतीरिवाज वगैरे कधी आणि कशासाठी सुरू झाले ते आता नक्की सांगता येत नाही. त्याबद्दल तर्क करावे लागतात. शिस्त लावणे या उद्देशातून सहनशक्ती, संयम, चिकाटी यासारखे गुण वाढीला लागतात. स्वच्छता आणि नियमित व्यायाम व आहार यामुळे आरोग्य चांगले राहते. दुस-या व्यक्तीला विनाकारण त्रास देऊ नये, तिचा अपमान करू नये असे वागणे सगळ्यांनी ठेवले तर आपसात संघर्ष होत नाहीत, समाज सुसंघटित आणि बलवान होण्यास मदत होते. विनयशीलता बाळगल्यामुळेही चांगले संबंध राहतात, तसेच आत्मवंचना होत नाही. अशा अनेक प्रकारे संस्कारांचा लाभ व्यक्ती आणि समाजाला मिळतो.

काही विचित्र रूढी मात्र विशिष्ट स्थानिक किंवा तात्कालिक परिस्थितीतून केंव्हातरी सुरू झालेल्या असतात. ती परिस्थिती बदलल्यानंतरसुध्दा त्या तशाच पुढे चालत जातात किंवा अनिष्ट असे विकृत रूप धारण करतात. बहुतेक चालीरीती या विशिष्ट धर्म, पंथ, जात वगैरेंशी जोडल्या असतात आणि त्या समूहाला एकत्र ठेवण्यासाठी किंवा त्याची ओळख म्हणून त्या पाळल्या जातात. कोणालाही त्यांचा उपद्रव होत नसेल तर ठीक आहे, पण त्यांच्यामुळे कोणाला कष्ट होत असतील किंवा त्यातून वैमनस्य निर्माण होत असेल तर त्यांचा त्याग करणेच शहाणपणाचे ठरते.

संस्कार हा प्रकार वैश्विक आहे. स्थळकाळानुसार त्यांचा तपशील वेगळा असतो. चांगले संस्कार लाभलेला भारतीय मुलगा आल्यागेल्या मोठ्या माणसाला वाकून नमस्कार करेल, इंग्रज मुलगा हस्तांदोलन करून त्याची विचारपूस करेल किंवा "त्याची सकाळ, संध्याकाळ, किंवा रात्र चांगली जावो" अशी लांबण न लावता फक्त "गुड मॉर्निंग, गुड ईव्हनिंग, गुड नाईट" असे काही तरी उच्चारेल. जाता येता सारखे "थँक्यू, सॉरी" वगैरे म्हणणे हा देखील संस्कारांचाच भाग आहे. आधुनिक काळात हे संस्कारसुध्दा आपल्याकडील मुलांवर केले जात आहेत. कधी कधी ज्या स्वरांमध्ये ते शब्द म्हंटले जातात त्यात तो भाव मुळीसुध्दा दिसत नाही. कारण ते शब्द केवळ संवयीने उच्चारलेले असतात. त्यांचा अर्थ त्यात अपेक्षित नसतो आणि कोणी तो लावायचा प्रयत्नसुध्दा करत नाही.

माझ्या बालपणी आमच्या पिढीमधल्या मुख्यतः ग्रामीण भागातील मुलांवर जे संस्कार झाले होते, त्यातले काही रिवाज शहरामधील राहणीत चुकीचे, निरुपयोगी किंवा कालबाह्य वाटल्यामुळे आमच्या पिढीने ते आचरणात आणले नाहीत. जे चांगले वाटत राहिले ते आमच्या पिढीने पुढील पिढीमधील मुलांना दिले. शिवाय शेजारी व शाळांमध्ये वेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या आणि मुलांच्या संपर्कात आल्यामुळे आमच्या पिढीमधील लोकांच्या मुलांनी काही वेगळ्या चालीरीती पाहिल्या आणि उचलल्या. ती मुले मोठी झाल्यावर आता जगभर पसरली आहेत आणि त्यांच्या जीवनशैली आमच्यापेक्षा वेगळ्या झाल्या आहेत. त्यांच्या पुढील पिढीमधील मुलांवर वेगळे संस्कार होत आहेत हे उघड आहे. आमच्या आईवडिलांची पिढी आणि त्यांच्या पूर्वीच्या अनेक पिढ्या कदाचित एकाच प्रकारच्या चाकोतीत जगत आल्या असतील, त्यांच्यावरील संस्कारसुध्दा साधारणपणे तसेच राहिले असतील, पण त्यांची आणि आमची पिढी यात सर्वच बाबतीत खूप मोठा फरक होता. त्यामुळे मागील पिढीमधील लोकांना आमचे वागणे कधीकधी पसंत पडत नसे. त्या मानाने आमची पिढी व पुढील पिढी यांच्यातला फरक कमी झालेला असला तरी अजून तो जाणवण्याइतपत आहे. त्यामुळे आमच्या पिढीने पुढच्या पिढीवर केलेले संस्कार तसेच्या तसेच त्यांच्या पुढील पिढीला मिळण्याची शक्यता कमी आहे, निदान त्यांचे प्रमाण तर नक्कीच कमी होणार आहे.
आमच्या आधीच्या पिढीमधले खेड्यात राहणारे लोक शेणाने सारवलेल्या जमीनीवर फतकल मारून बसत असत, जेवायला बसण्यापूर्वी अंगातला सदरा काढून उघड्याने पाटावर बसत असत, टेबल मॅनर्स हा शब्द त्यांनी ऐकलेला नसे, ते लोक नैसर्गिक विधी उघड्यावर करत असत. परमुलुखात राहणार्‍या पुढच्या पिढीमधल्या काही लोकांना साधे श्लोक ठाऊक नसतात, त्यांच्या बायका चार चौघांसमक्ष नव-याला त्याच्या नावाने हाका मारतात, त्याच्याशी उरेतुरेमध्ये बोलतात, रोज अंघोळ करणे काहीजणांना आवश्यक वाटत नाही, सकाळीच ती करण्याची घाई नसते. आम्हाला सवय नसल्यामुळे अशा काही गोष्टी जराशा खटकतात. पण त्यामुळे त्यांच्या सुसंस्कृतपणाला बाधा येण्याचे कारण नाही. मी तर असे म्हणेन की आमच्या मागील पिढ्या, आमची पिढी आणि पुढील पिढ्या यातील लोकांच्या मनावर लहानपणी भिन्न प्रकारचे संस्कार झालेले दिसले तरी त्या सर्वांना सुसंस्कृतच म्हणायला पाहिजे. पूर्वीच्या पिढीप्रमाणे नवी पिढी वागली नाही तर तिला संस्कारहीन म्हणता येणार नाही.

स्वतःवर ताबा ठेवणे आणि दुस-यांचा विचार करणे अशा काही मूलभूत गोष्टी अंगी बाणवणे हे माझ्या मते एकाद्या माणसाला सुसंस्कृत होण्यासाठी पुरेशा असाव्यात. त्याने इतिहास, भूगोल, संस्कृत, गणित किंवा खगोलशास्त्राचा अभ्यास केला असणे वा नसणे हे गौण आहे.

2 comments:

mynac said...

घारे साहेब,
आपण नुसते सांगितले नि आम्ही प्रतिसाद दिला कारण आपला इतका सुंदर ब्लॉग नजरेतून सुटला होता याचे हि आश्चर्य वाटले.आपली पहिली पोस्ट प्रसिद्धी २००६ साली म्हणजे जवळपास ६ वर्षा पूर्वीची आहे हे बघून फार विशेष वाटले कारण त्या काळी आमच्या सारखे सर्वसामान्य वाचक इंटरनेट म्हणजे काय नि ते कशाशी खातात हे सुद्धा जाणत नव्हते.ब्लॉग वगैरे तर फार दूरच्या गोष्टी झाल्या.आता थोड्या सवडीने सविस्तर एक एक वर्ष उलगडेन... आपल्या दीर्घकालीन वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा.

Anand Ghare said...

धन्यवाद. इंटरनेटवर आपण काही चढवू शकतो हे मला जेंव्हा समजले, तेंव्हा आठवडाभरातच मी ब्लॉग सुरू करून दिला. आयुष्यभर इंग्रजी भाषेतच ऑफीसचे काम केले असल्यामुळे आता मराठीत लिहायचे असे ठरवले. लिहीत गेल्यानंतर विषय सुचत गेले.