Monday, December 19, 2011

श्रीनिवास खळे रजनी

मला भेटलेल्या ज्या लोकांचा माझ्या मनावर खोल ठसा उमटला अशा व्यक्तींची शब्दचित्रे 'तेथे कर माझे जुळती' या लेखमालिकांमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यातल्या काही व्यक्ती खूप प्रसिध्द आहेत. त्यांच्या कारकीर्दीविषयी आधीच उदंड लेखन झालेले आहे, त्यात भर टाकण्यासाठी आणखी काही माझ्याकडे नाही आणि त्यांच्या कार्यक्षेत्रासंबंधी लिहिण्याचा मला अधिकार नाही या दोन कारणांमुळे मी त्याबद्दल विशेष लिहिले नव्हते. पण नंतर असा विचार माझ्या मनात आला की मी जे काही या ब्लॉगवर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे त्यातल्या इतर विषयांना सुध्दा हेच निकष लावले तर ते सगळे लेख बहुधा रद्दबातल होतील. कारण या ठिकाणी लिहिलेल्या प्रत्येक लेखाच्या विषयावर असंख्य तज्ज्ञानी अगणित ग्रंथसंपदा आधीच निर्माण करून ठेवलेली आहे. त्यातली दोन चार पाने वाचूनच तर मला त्याचे थोडे ज्ञान प्राप्त झाले. त्यातल्या कोठल्याच विषयावर माझे प्रभुत्व आहे असेही मी म्हणू शकत नाही. मग मला त्यावर तरी लिहिण्याचा काय अधिकार आहे? असे म्हंटले की मग काहीही लिहायचे प्रयोजनच उरत नाही. पण हा प्रश्न मी सहा वर्षांपूर्वी निकालात काढला होता. कोणत्याही विषयावर याआधी खंडीभर लिहिले गेले असले तरी माझ्या लेखांच्या वाचकांनी ते सगळे वाचलेले असले पाहिजेच असे नाही. मी जे काही लिहिणार आहे ते कदाचित त्यांनी वाचले नसेल, किंवा आधी वाचले असले तरी त्यांना ते पुन्हा माझ्या शब्दात वाचावेसे वाटेल. माझ्या स्वतःच्या पाटीवर काय आणि किती लिहिण्याचा मला अधिकार आहे हे अखेर मीच ठरवायचे आहे. मला जे लिहावे असे माझ्या मनात आले ते इथे लिहायला काय हरकत आहे? इतर कोणी त्यातली चूक दाखवून दिली तर ती मान्य करायची तयारी ठेवली म्हणजे झाले.
स्व.श्रीनिवास खळे यांच्यावरील लेखात त्यांनी दिलेल्या दिव्य संगीतावर मी काही लिहिले नव्हते. पण काल श्रीनिवास खळे रजनीचा एक सुश्राव्य कार्यक्रम पाहिला आणि त्यावर लिहावेसे वाटले या कार्यक्रमाची सुरुवात 'जयजयमहाराष्ट्रमाझा' या समूह गीताने झाली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सोहळ्यासाठी कवी राजा बढे यांनी लिहिलेले हे गीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द करून घेतले होते. त्याची सुवर्णजयंतीसुध्दा होऊन गेली असली तरी या गीताची जादू पहिल्याइतकीच टिकून राहिली आहे. इतके आवेशपूर्ण दुसरे महाराष्ट्रगीत गेल्या पन्नास वर्षांच्या काळात मी तरी ऐकले नाही. 'सह्याद्रीचा सिंह गर्जतो' ऐकतांना त्याचा दरीदरीतून गुंजलेला नाद आपल्या काळजापर्यंत जाऊन भिडतो. शाहीर साबळे यांच्याइतका तडफदार आवाज इतर कोणापासून अपेक्षित नसला तरी मंदार आपटे आणि अजित परब यांनी प्रयत्नांची शर्थ केली.

१९७३ साली श्रीनिवास खळे यांनी तयार केलेल्या अभंग तुकयाचे या गीत संग्रहामध्ये संत तुकारामांचे वीस अभंग अजरामर करून ठेवले आहेत. संत तुकारामाच्या गाथेतील शेकडो अभंगांपैकी हे वीस अभंग निवडण्याचेच काम किती कठीण आहे ? खळे काकांनी यासाठी खूप मेहनत करून त्यांचा अभ्यास केला. या कार्यक्रमाचे निवेदक भाऊ मराठे यांच्या शब्दात त्यांनी या अभंगांमागची हिस्टरीच पाहिली नाही तर त्यामधील मिस्टरीचासुध्दा वेध घेतला. त्यांनी आधी काही अभंग निवडले, त्यांवर इतर तज्ज्ञांबरोबर चर्चा करून अखेर त्यातले वीस ठरवले, केवळ वीसच दिवसात त्यांना अप्रतिम चाली लावल्या आणि लता मंगेशकरांनी गाऊन त्यांना अमरत्व प्राप्त करून दिले. त्यातील 'सुंदर ते ध्यान' या अभंगाने श्रीनिवास खळे रजनीच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि मध्यंतराच्या आधी 'भेटीलागी जीवा' हा अभंग वाद्यसंगीतात सादर केला गेला. हे अभंग वारकरी सांप्रदायामध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. पारंपरिक भजनाची सुरुवात 'सुंदर ते ध्यान' पासून करून त्याचा शेवट 'हेची दान देगा देवा' ने करण्याची प्रथा काही देवळांमध्ये करण्यात येणा-या भजनात आहे हे मी लहानपणी पाहिले आहे. पण श्रीनिवास खळे यांनी लावलेल्या चाली मात्र परंपरागत पध्दतींपेक्षा आगळ्या वेगळ्या आहेत. 'सुंदर ते ध्यान' मधील वर्णनाने विठ्ठलाचे देखणे रूप डोळ्यासमोर उभे राहते आणि ते पाहणे हेची सर्व सुख आहे असे तुकारामांनी का म्हंटले आहे ते समजते. 'भेटीलागी जीवा' या गाण्यात लतादीदींनी जी आर्तता व्यक्त केली आहे, तिने लागलीसे आस या शब्दांचा अर्थ लक्षात येतो. 'हेची दान देगा देवा' मध्ये तुकारामांनी देवापाशी केलेले मागणे किती मनापासून केले आहे हा भाव खळे यांच्या स्वररचनेतून व्यक्त होतो. पण या कार्यक्रमाची सांगता खळ्यांनीच स्वरबध्द केलेल्या 'आनंदाचे डोही आनंद तरंग' या वेगळ्या भैरवीने झाली. लतादीदींची 'अगा करुणाकरा', 'कन्या सासुराशीं जाये', 'कमोदिनी काय जाणे तो परिमळ', 'वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें', 'खेळ मांडीयेला वाळवंटी घाई' यासारखी गाणी आणि पं.भीमसेन जोशींच्या आवाजातले 'सावळे सुंदर रूप मनोहर', 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा', 'जे का रंजले गांजले', सुरेश वाडकरांचा 'काळ देहासी आला खाऊ' यासारखे खळ्यांनी स्वरबद्ध केलेले अप्रतिम अभंग तरीही गायचे राहिलेच.

'भावभोळ्या भक्तिची', 'रामप्रहरी राम-गाथा', 'मीरेचे कंकण', 'जय जय विठ्ठल रखुमाई' यासारखी मधुर भक्तीगीते खळ्यांनी दिली आहेतच, शिवाय 'लाज राख नंदलाला', 'रुसला मजवरती कान्हा', 'निळासावळा नाथ' यासारखी पौराणिक काळामधील गोष्टींवरील गाणीसुध्दा कधीकधी भक्तीसंगीतात खपून जात असत. टेलिव्हिजन येण्यापूर्वीच्या काळात मराठी माणसांची सकाळ आकाशवाणीवरील मंगल प्रभात या कार्यक्रमात रंगलेली असे. श्रीनिवास खळ्यांनी स्वरबध्द केलेला एकतरी अभंग किंवा भक्तीगीत एकल्याशिवाय ती प्रभात पुरेशी मंगलमय होत नसे.

'श्रावणात घननीळा' या गाण्याची निर्मिती कशी झाली याची चित्तरकथा भाऊ मराठ्यांनी सांगितली. त्यांची बोलण्याची शैली अशी आहे की खळे, पाडगावकर, यशवंत देव, शिरीष पै वगैरे सगळी दिग्गज मंडळी त्यांच्या रोजच्या उठण्याबसण्यातली वाटावीत. पूर्वी प्राध्यापक असतांना मंगेश पाडगावकर मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनने रोज प्रवास करत असत. हे मात्र खरे आहे कारण सत्तरीच्या सुरुवातीला मीसुध्दा मानखुर्द ते बोरीबंदर (आताचे सीएसटी आणि पूर्वीचे व्हीटी) पर्यंत हा प्रवास लोकलमधून करत होतो. त्यावेळी कधीकधी पाडगावकर मला पहिल्या दर्जाच्या डब्यात दिसत असत. त्यांच्या जाड भिंगांच्या चश्म्यामुळे ते दुरूनही सहज ओळखू येत असत. तर एकदा म्हणे या प्रवासातच त्यांना या गाण्याचा मुखडा सुचला.

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा।
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा ।।

पाडगावकर पूर्वीच्या कोळीवाडा (आताच्या जीटीबीनगर) स्टेशनवर उतरले. मागच्या गाडीने श्रीनिवास खळे आले आणि दोघेही एकत्र पुढील मार्गाला लागले. त्या काळात मी श्रीनिवास खळ्यांच्या नावाशी परिचित होतो, पण त्यांनाच काय, त्यांचा फोटोसुध्दा पाहिला नव्हता, त्यामुळे मी पाहिले असले तरी त्यांना ओळखले नसेल. व्हीटी स्टेशनपर्यंत काही बोलायचे नाही असे खळ्यांनी पाडगावकरांना बजावले आणि तोपर्यंत त्या मुखड्याला चाल लावून ती त्यांना ऐकवली. अशाच प्रकारे पुढील चार दिवसात चार कडवी तयार झाली. यातील प्रत्येक अंतरा त्यातील अर्थानुरूप निरनिराळ्या सुरावटींमध्ये बांधला असला तरी त्यांच्यात मुखड्याशी सलगता आहे. लताबाईंच्या आवाजातले हे गाणे अनेकांच्या टॉपटेनमध्ये असणार यात शंका नाही.
त्यानंतर एकापाठोपाठ एकाहून एक सरस अशा भावगीतांची मालिका सुरू झाली. श्रीनिवास खळे हे तर भावसंगीताचे बादशहाच होते. पं.हृदयनाथ मंगोशकरांच्या आवाजातली 'लाजून हासणे अन्‌' आणि 'वेगवेगळी फुले उमलली' ही गीते झाली, सुरेश वाडकरांचे 'जेंव्हा तुझ्या बटांना', अरुण दाते आणि आशा भोसले यांचे युगलगीत 'सर्व सर्व विसरु दे', सुमन कल्याणपूर व अरुण दाते यांचे द्वंद्वगीत 'पहिलीच भेट झाली' इत्यादि छान छान गाणी सादर केली गेली. पं. वसंतराव देशपांडे यांनी गायिलेले कवी वा. रा. कांत यांचे 'बगळ्यांची माळ फुले' हे गीत भावसंगीतातला एक मैलाचा दगड आहे म्हणता येईल, एरवी भावगीते मोजून मापून बसवली जातात, पण वसंतरावांसारख्या पट्टीच्या गायकाला या गाण्यात पहाडी राग खुलवायला मोकळीक दिली आहे. आता त्यांचा नातू राहुल देशपांडे सुध्दा हे गाणे मस्त रंगवून सादर करतो. टीव्हीवरील एका कार्यक्रमात शंकर महादेवन याने या गाण्याची एकच ओळ बहारदार गाऊन दाखवली होती. 'पाणिग्रहण' या एका नाटकाचे संगीत दिग्दर्शन श्रीनिवास खळे यांनी केले होते. त्यातली 'उगवला चंद्र पुनवेचा', 'प्रीती सुरी दुधारी' आणि 'प्रेम हे वंचिता' ही या नाटकातली शास्त्रीय संगीतावर आधारलेली नाट्यगीते आजही गायली जातात आणि कानावर पडतात.

श्रीनिवास खळे यांना मराठी चित्रपटश्रृष्टीने विशेष जवळ केले नाही, इतक्या मोठ्या आणि गुणवान संगीतकाराला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच चित्रपट मिळाले. पण त्यातील चित्रगीते सुध्दा अमर झाली आहेत. 'सोबती' या चित्रपटामधील लता मंगेशकर यांचे 'साऊलीस का कळे उन्हामधील यातना' आणि आशाबाईंचे 'पाण्यातले पहाता प्रतिबिंब' तसेच लतादीदींचे 'जिव्हाळा' सिनेमातले 'या चिमण्यांनो परत फिरा रे' ही गाणी या कार्यक्रमात सादर करून त्याची चुणुक दाखवली गेली. खळे यांनी चित्रपटसंगीत फारसे दिले नाही आणि ज्या चित्रपटांना दिले ते सोज्ज्वळ स्वरूपाचे होते. त्यामुळे त्यात लावणीसाठी जागा नसेल. पण 'कळीदार कपूरी पान' या एका लावणीने त्यांनी आपले या क्षेत्रातले प्रभुत्व दाखवून दिले. माधुरी करमरकरने ही लावणी इतकी फक्कड गायली आणि निलेश परब याने ढोलकीची इतकी अफलातून साथ दिली की प्रेक्षकांनी वन्समोअरच्या गजराने सभागृह दणाणून टाकले.

श्रीनिवास खळे यांनी बडोद्याला असतांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते आणि रागदारीचे उत्तम ज्ञान त्यांना होते. पण मुख्यतः भावगीतांना स्वरसाज चढवतांना त्यांनी त्यात फार लांबलचक पल्लेदार ताना गुंफल्या नाहीत. शब्दांचा अर्थ खुलवण्याइतपतच त्यांचा वापर केला. काही गाण्यांमध्ये मात्र त्यांनी बहारदार शास्त्रीय संगीत दिले आहे, याचे उदाहरणार्थ 'धरिला वृथा छंद' या सुरेश वाडकरांच्या गाण्यात ऐकायला मिळाले. 'गुरुकृपावंत पायो मेरे भाई' आणि 'एरी माई मोरी गगरिया छीनी' ही पूर्णपणे शास्त्रीय धाटणीची त्यांनी स्वर बध्द केलेली दोन गाणी भरत बळवल्ली या चांगल्या तयारीच्या गायकाने सादर केली आणि लता मंगेशकर व पं.भीमसेन जोशी या दोन भारतरत्नांना एकत्र आणून त्यांच्याकडून 'रामश्यामगुणगान' गाऊन घेण्याचा जो चमत्कार श्रीनिवास खळे यांनी घडवून आणला त्याची झलक बाजे 'मुरलिया बाजे' या गीतात मिळाली. या गाण्यामध्ये बांसरीवरील सूर अप्रतिम पध्दतीने आळवून त्या गाण्यातील मुरलीच्या वर्णनाचे सार्थ रूप वादकाने दाखवून दिले, अमर ओक हे या संचाबरोबर येतील अशी अपेक्षा होती. पण जो कलाकार आला होता, त्याने अमरची उणीव भासू दिली नाही. व्हायलिनवादकाने तर कमालच केली. 'भेटीलागी जीवा लागलीसे आस' आणि 'गोरी गोरी पान' हे अजरामर बालगीत त्याने सोलोमध्ये अप्रतिम वाजवले. 'आ.......स' मधील लता मंगेशकरांनी आळवलेला व्याकुळ भाव आणि 'गोरी गोरी' मधले 'तुल्ला दोन थाप्पा तिल्ला साख्खरेच्चा पाप्पा' या ओळींमध्ये आशा भोसले यांनी दाखवलेल्या खटकेदार जागा व्हायलिनवर ऐकवल्यामुळे त्यातील स्वरांसोबत व्यंजनेसुध्दा ऐकू आली.

'गोरी गोरी पान' आणि 'एका तळ्यात होती' या दोन गाण्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून ठेवले आहे. श्रीनिवास खळे यांची ही दोन गाणी आणि पु ल देशपांडे यांचे 'नाचरे मोरा' या गाण्यामुळे बालगीत म्हणजे आशा भोसले असे समीकरणच झाले होते आणि राणी वर्मा, सुषमा श्रेष्ठ, रेखा डावजेकर वगैरे गायिका येईपर्यंत ते टिकून होते. 'एका तळ्यात होती' हे खूप जुने आणि तरीही लोकप्रिय असे एकच बालगीत या कार्यक्रमात घेतले होते, पण 'किलबिल किलबिल पक्षि बोलती', 'मैना राणी चतुर-शहाणी', 'टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंय् चल पाहू', 'चंदाराणी चंदाराणी' यारखी कित्येक मजेदार बालगीते खळे काकांनी त्यांच्या लाडक्या बालगोपालांना दिली आहेत.

कवीवर्य मंगेश पाडगावकर कधीही ऑर्डरनुसार माल पुरवून देत नाहीत. त्यांच्या खूप कविता गेय आहेत, अर्थातच वृत्त, छंद वगैरेंची बंधने पाळूनच त्या लिहिलेल्या आहेत. त्यांना ठेक्याची आणि सुरांची चांगली जाण असल्याशिवाय ते करता येणार नाही. पण संगीतकाराने दिलेल्या स्वररचनेमध्ये शब्द गुंफून त्याचे गीत करणे त्यांना मान्य नाही. त्याचप्रमाणे अशी स्वररचना करून देणे श्रीनिवास खळे यांना मान्य नाही. आधी शब्द समोर असले तर त्याच्या अर्थानुसार चाल लावून तो अर्थ श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचवणे किंवा त्याच्या काळजाला भिडवणे हे संगीतकाराचे काम आहे असे ते सांगत असत. यामुळे या दोघांची जोडी चांगली जमली. कदाचित तथाकथित हार्बर लाइनच्या एकत्र प्रवासाचासुध्दा त्यात काही भाग असेल. या दोघांनी मिळून मराठी रसिक श्रोत्यांना दिलेल्या गाण्यांची संख्या खूप मोठी आहे.

भावगीते हे खळे यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची गणना करणे शक्य नाही आणि त्यातली सारी लोकप्रिय गीतेसुध्दा एका कार्यक्रमात सामील करणे वेळेच्या बंधनामुळे शक्य नसते. त्यातली काही गाणी या कार्यक्रमात घेतली आणि बरीचशी राहून गेली. 'नीज माझ्या नंदलाला' सारखी गोड लोरी हिंदीमध्येसुध्दा मी ऐकली नाही. आकाशवाणीवर भावसरगम नावाचा कार्यक्रम तुफान लोकप्रिय झाला होता. थोडा गाजावाजा करून सुरू केलेल्या या मालिकेचा पहिला भाग मी आवर्जून पाहिला होता. त्या भागात अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायिलेले 'शुक्रतारा मंद वारा' हे गाणे देऊन पहिल्याच बॉलला सिक्सर मारला होता. 'हात तुझा हातातुन' यासारखी छान छान गाणी पुढील भागात येत गेली. श्रीनिवास खळे यांच्या गीतांचा कार्यक्रम शुक्रतारा शिवाय पुरा होऊच शकत नाही असे सांगून निवेदक भाऊ मराठे यांनी याबाबतचे दोन मजेदार किस्से ऐकवले. एका कार्यक्रमात 'अंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवा' ही ओळ '.... अंथरारे अशी ऐकू येत होती. समोर बसलेल्या खळेकाकांनी कपाळाला हात लावला. दुसरा एक गायक 'शूक्रतारा' असे म्हणत होता. समोर बसलेल्या पाडगावकरांना कोणीतरी "गाणे कसे वाटले?" असे विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले, "बाकी ठीक होते, पण गायक जरा जास्तच शू करत होता." असे काही सवंग किंवा पाचकळ विनोद सोडले तर भाऊ मराठे आपल्या निवेदनातून कार्यक्रमाला रंगत आणण्याचे काम चोख करत होते. विशेषतः त्यांचे कित्येक साहित्यिकांच्या रचनांमधील समयोचित ओळीच्या ओळी अस्खलित म्हणून दाखवणे थक्क करणारे होते.


टेलिव्हिजनवरील सारेगमप या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमामुळे प्रसिध्दी पावलेल्या सत्यजित प्रभू, निलेश परब यासारख्या गुणी वादकांचा समावेश वादकांच्या संचात होता. संगीत नियोजन सुध्दा टीव्हीस्टार कमलेश भडकमकर याने केले होते. श्रीनिवास खळे यांनी आधीच लावून दिलेल्या चालींवर गाणी म्हणवून घेण्यात त्याचा असा काय मोठा वाटा आहे? असे एकाद्या अनभिज्ञ माणसाला कदाचित वाटणे शक्य आहे. पण यात दोन महत्वाच्या गोष्टी येतात. सुमारे सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात खळे यांनी गाण्यांना संगीतबध्द करतांना त्या त्या काळातल्या उत्तमोत्तम वादकांचा उपयोग करून घेतला होता. ते सगळे वादकच नव्हे तर ती सारी वाद्येसुध्दा आज उपलब्ध असणे शक्य नाही. निवडक वाद्ये आणि वादक यांच्याकडून हुबेहूब किंवा तत्सम सुरांची निर्मिती करून घेणे अवघड असते. त्याचप्रमाणे निरनिराळ्या गायक आणि गायिकांनी निरनिराळ्या पट्ट्यांमधील आपापल्या स्वरांमध्ये गायिलेली ही गाणी नव्या कलाकारांकडून गाऊन घेतांना त्यांचे आवाज आणि आवाका (रेंज) लक्षात घेऊनच ती बसवावी लागतात. तसेच या सर्वांनी एकत्र तालीम करून ती गाणी चांगली घटवून घ्यावी लागतात. मोठ्या नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमाचासुध्दा असा तयारीच्या अभावी विचका झालेला मी पाहिला आहे. हा कार्यक्रम मात्र व्यवस्थित झाला याचे श्रेय कमलेशलाच जाते. अजित परब, मंदार आपटे आणि माधुरी करमरकर यांनी या क्षेत्रात नाव मिळवले आहे, मधुरा कुंभार सारेगमपमधून पुढे आली आहे. या कार्यक्रमातील सर्वच गाणी रेडिओ, टेलीव्हिजन आणि रेकॉर्डरवर अनंत वेळा ऐकलेली असल्यामुळे मूळ गायकगायिकांचे स्वर स्मरणात ठसलेले आहेत, लता मंगेशकरांचा अपवाद सोडला तर इतरांची बहुतेक गाणी मी त्यांच्या कार्यक्रमांमधून प्रत्यक्ष सुध्दा ऐकली आहेत. त्या आठवणी पुसून टाकण्याइतके उच्च दर्जाचे गायन नवोदितांकडून अपेक्षित नव्हतेच. त्यांच्या आठवणी ताज्या करता येण्याइतपत चांगला प्रयत्न मात्र सर्वांनीच केला. त्यामुळे हा कार्यक्रम पैसे वसूल करणारा झाला यात शंका नाही.

No comments: