Thursday, July 28, 2011

स्मृती ठेउनी जाती - २ - नीलिमा करंदीकर

पंधरावीस वर्षांपूर्वी एका कसल्याशा समारंभाला किंवा कार्यक्रमाला गेलो असतांना तिथे त्या मला पहिल्यांदा भेटल्या, म्हणजे अलकानेच त्यांची माझ्याशी ओळख करून दिली. "ही माझी मैत्रिण, नीलिमा करंदीकर !"


"नमस्कार, कशा आहात? किंवा कुठून आलात?" वगैरे औपचारिक प्रश्न विचारून मी संभाषणाची सूत्रे त्या दोघींच्याकडे सुपूर्त केली. कुणाच्या तरी घरी झालेली गायनाची बैठक किंवा एकादा महिला समाज अशा ठिकाणी या दोघी भेटल्या होत्या आणि तशा प्रकारच्या निमित्याने वारंवार भेटत राहिल्यामुळे परिचयाचे रूपांतर त्यांच्या मैत्रीत होऊन ती वृध्दिंगत होत गेली. नीलिमा करंदीकर या नावावरून एका सुखवस्तू, सुशिक्षित आणि सुसंस्कृत मध्यमवर्गीय गृहिणीची जी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहील तिच्याशी मिळते जुळते असेच त्यांचे वागणे, बोलणे आणि दिसणे होते. त्यामुळे एका भेटीतून कदाचित ते लक्षात राहिलेही नसते. पण त्यानंतरही आमची गाठ पडत गेली आणि ओळख निर्माण झाली.

चेंबूर भागात होणा-या गायनाच्या बैठकी, उत्सव, महोत्सव वगैरे ठिकाणी आम्हाला त्या हमखास भेटायच्या आणि कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी किंवा मध्यंतरात आमचा थोडा वार्तालाप व्हायचा. नीलिमाताई स्वभावाने बोलक्या होत्या आणि मुख्य म्हणजे त्यांचे स्वतःचे रडगाणे किंवा आत्मप्रौढी त्यांच्या बोलण्यात येत नव्हती. यामुळे त्यांच्याशी सुसंवाद साधला जात असे. आजूबाजूच्या परिस्थितीचे आणि घटनांचे उत्तम आकलन, वाचनातून आलेली प्रगल्भता, मनमिळाऊ व खिलाडू वृत्ती आणि संवादाला नर्म विनोदाची झालर यामुळे त्यांच्याबरोबर बोलतांना मजा येत असे. पण काही काळानंतर अशा कार्यक्रमात त्या येईनाशा झाल्या. त्यांना आर्थराइटचा त्रास सुरू होऊन जिन्याच्या पाय-या चढणे, जमीनीवर खाली बसणे वगैरे करणे कठीण होऊ लागले होते असे समजले. अधून मधून अलकाचा त्यांच्याशी फोनवर संपर्क होत असे. त्या रहात असलेल्या बाजूला गेल्यास ती त्यांना भेटून येत असे. त्यातून त्यांची खुशाली कळत असे.

एके दिवशी आम्हाला असे कळले की नीलिमाताईंना कोणी धन्वंतरी भेटला आहे आणि त्या आता खडखडीत ब-या होण्याच्या मार्गावर आहेत. ते ऐकून खूप आनंद झाला, पण थोडे आश्चर्यही वाटले. आर्थराइटिस हा बरा न होणारा दुर्धर विकार असतो, तो फार फार तर लांबवता किंवा रोखता येतो, अशी माझी समजूत होती आणि हा विकार झालेला कोणी रुग्ण बरा झाल्याचे उदाहरण मी ऐकले नव्हते. पण नीलिमाताईंना प्रत्यक्ष अनुभव आल्याचे त्याच सांगत असल्यामुळे त्याबद्दल शंका वाटण्याचे कारण नव्हते. माझ्या एका मित्राला आर्थराइटिसची लक्षणे दिसू लागली असल्यामुळे त्यालाही याचा लाभ मिळवून द्यावा हा हेतू मनात धरून आम्ही नीलिमाताईंना भेटायला त्यांच्या घरी गेलो.

त्यांनी आमचे मनापासून स्वागत आणि आदरातिथ्य केले. मोठ्या उत्साहाने त्यांनी आपल्याला आलेला चांगला अनुभव सांगितला. त्यांच्या प्रकृतीमध्ये पडलेला चांगला फरक दिसतही होता. त्यांना भेटलेल्या वैद्याचे नाव, गाव, पत्ता, फोन नंबर वगैरे आम्ही घेऊन आलो आणि की माहिती माझ्या मित्राला दिली. तो एक वैज्ञानिक संशोधक आहे आणि प्रत्येक गोष्टीची चिकित्सक वृत्तीने खात्री करून घेण्याची त्याला सवय आहे. आर्थराइटिस हा विकार कशामुळे होतो हे त्याने समजून घेतलेले होतेच, तो बरा व्हायचा झाल्यास कशा रीतीने बरा होऊ शकतो हे समजून घेणे त्याला आवश्यक वाटले. त्याने नेमके काय संशोधन केले कोण जाणे पण त्यातून असा निष्कर्ष काढला की हे वैद्यबुवा आयुर्वेदिक आणि होमिओपाथिक औषधांसोबत उत्साहवर्धक स्टेरॉइड्स देत असावेत. त्यामुळे अंगात अधिक ऊर्जा खेळू लागते आणि बरे वाटत असल्याचा तात्पुरता आभास निर्माण होतो.

नीलिमाताईंना हे समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना सुरुवातीला वाटत असलेला त्यांच्या प्रकृतीमधला फरक पुढे वाटेनासा झाला आणि त्या कायमच्या अंथरुणाला खिळल्या. आमच्या मुलाच्या लग्नाचे बोलावणे करायला आम्ही त्यांच्या घरी गेलो तेंव्हा त्या अंथरुणातच होत्या, दुस-याच्या आधाराने उठून बसल्या आणि आमच्याशी उर्धा पाऊण तास बोलल्या. जुन्या आठवणी, ताज्या बातम्या आणि भविष्यातल्या योजना असे त्रिकाळात आम्ही फिरून आलो. त्यांची स्थिती उघडपणे दयनीय वाटत असली तरी त्याबद्दल त्यांची तक्रार नव्हती, त्यांनी तिचा खिलाडू वृत्तीने स्वीकार केला होता. कोणीही त्यांची कीव करावी हे त्यांना पसंत नव्हते. बोलतांना शक्यतोवर तो विषय टाळूनच त्या पुढे जात होत्या. आम्हा दोघांचा आपापल्या क्षेत्रामधील प्रगतीचा आलेख त्या काळात वर वर चढत होता. त्याबद्दल त्या आपुलकीने विचारपूस करून आमचे अभिनंदन आणि कोतुक करत होत्या. त्यांचे आयुष्य एका अर्थाने तिथेच थांबले होते असे वाटण्यासारखी परिस्थिती होती. कोठल्याही क्षेत्रात मिळवलेले स्थान ताब्यात ठेवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. संगीताच्या क्षेत्रात तर ते अत्यंत आवश्यक असते. नियमित रियाज चालू ठेवला तरच तालासुरावरची पकड कायम राहते. अशा अवस्थेत नीलिमाताईंना ते कितपत जमणार होते याची शाश्वती नव्हती.

पण एक खिडकी बंद झाली तर दुसरी उघडते असे म्हणतात. त्यांना वाचनाची आवड होतीच, तिकडे अधिक लक्ष वळवले आणि लिहायला सुरू केले. त्यांच्यातली सुप्त कवयित्री जागृत झाली. अंथरुणात पडल्या पडल्या त्या कविता रचू लागल्या. पुढे पुढे बोटात पेन धरून हवे तसे लिहिणेसुध्दा त्यांना कठीण झाल्यावर त्या रचलेले शब्द सांगत आणि घरातली मंडळी ते शब्द लिहून घेत असत. त्यांच्या निवडक रचनांचे मी या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशन करण्यात आले.

सह्याद्री वाहिनीवर 'हॅल्लो सखी' या नावाचा एक कार्यक्रम सादर होत असतो. हा कार्यक्रम मुख्यत्वे 'सखींनी सखींसाठी' प्रस्तुत केला असतो अशी समजूत झाल्यामुळे मी नियमितपणे पहात नाही. पण रिमोटशी चाळा करतांना एकादी गाण्याची लकेर, रोगावरील उपचाराची माहिती किंवा निसर्गरम्य सुंदर ठिकाणाचे दृष्य त्यावर दिसले तर तो चॅनेल बदलत नाही. अशा प्रकारे अचानकपणे जेंव्हा जेंव्हा मी हा कार्यक्रम पाहिला तेंव्हा योगायोगाने असे ऐकू आले, "आता चेंबूरहून नीलिमा करंदीकर यांचा फोन आला आहे." त्यानंतर नीलिमाताईंच्या परिचित आवाजातला प्रश्न ऐकायला येत असे. अत्यंत स्पष्ट शब्दोच्चार आणि नेमका मुद्द्याला हात घालणारा असा त्यांचा प्रश्न हा अशा कार्यक्रमात प्रश्न कसे विचारावेत याचाच वस्तुपाठ असे. अनेक वेळा प्रश्न विचारणारे गोंधळून जातांना दिसतात. तसे नीलिमाताईंच्या बाबतीत होतांना दिसले नाही. त्यांचा प्रश्न फक्त त्यांना पडलेला नसून सर्व श्रोत्यांना उपयुक्त माहिती मिळवून देणारा असे.

आठवडाभरापूर्वी एकदा अचानक हॅल्सो सखी हा कार्यक्रम पडद्यावर दिसला. त्यातला मध्यवर्ती विषय माझ्या दृष्टीने जिव्हाळ्याचा नव्हता, तरीसुध्दा नीलिमाताई यावर काय विचारणार आहेत ते पहावे म्हणून मी तो कार्यक्रम पहात राहिलो, पण अखेरपर्यंत त्यांचा आवाज कानावर पडलाच नाही. त्य़ामुळे मी थोडासा अस्वस्थ झालो होतो. त्याच संध्याकाळी अलकाला तिच्या एका मैत्रिणीने फोन करून नीलिमाताईंच्या निधनाची बॅड न्यूज सांगितली. त्यांच्या तब्येतीमधले चढउतार समजत राहण्याएवढे त्यांच्या कुटुंबियांशी आमचे घनिष्ठ संबंध राहिले नव्हते हे खरे असले तरी आम्हाला थोडी कल्पना मिळाली असती तर नक्कीच त्यांना जाऊन भेटून आलो असतो. पण आता हळहळ वाटण्यापलीकडे काही आमच्या हातात राहिले नव्हते.

नीलिमाताईंच्या लेखणीमधून उतरलेल्या त्यांच्या कवितेतून त्यांची विचारसरणी कशी स्पष्ट होते पाहू.

मी - एकाक्षरी, लहान शब्द
सा-या सृष्टीला वेढणारा, नाते सांगणारा
आत्मविश्वास, स्वाभिमान, अहं दाखवणारा ।।

मी - एक ताकदवान शब्द,
सारे जग इकडचे तिकडे करणारा
भल्याभल्यांना पाणी पाजणारा ।।

मी - एक बाणेदार शब्द,
संकटांशी झुंजत, विजेसारखा तळपणारा
आकाशाला गवसणी घालू पहाणारा ।।

मी - एक शांत आश्वासक शब्द,
धैर्य, शांती देणारा
परमात्म्याशी नाते जोडणारा ।।

मी - एक संबंधसूचक शब्द,
हा असेल तर जग असते
हाच नसेल तर जग शून्य ।।







No comments: