Friday, July 01, 2011

स्मृती ठेउनी जाती - १- करुणाताई देव




आपल्याला रोजच्या जीवनात अनेक माणसे भेटतात, त्यातली काही माणसे काही काळ लक्षात राहतात, बाकीची लगेच विस्मरणात जातात. आपल्याला नेहमी भेटणारी माणसे अर्थातच चांगली लक्षात असतात. पण बराच काळ न भेटल्यास लक्षात राहिलेल्या लोकांच्या आठवणींवर धुळीची पुटे जमू लागतात आणि त्यासुद्धा हळूहळू पुसट होतच असतात. ती व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटली किंवा कुठे तरी तिचा संदर्भ निघाला तर तिची आठवण पुन्हा ताजी होते, तिच्यावर बसलेली धूळ झटकली जाऊन तिचे चित्र थोडे स्पष्ट होते. आपण एकाद्याला भेटतो म्हणजे आपले त्याच्याशी काही संभाषण होते, निदान 'शब्देविण संवादू' तरी साधला जातो. तो आपला किंवा आपण त्याचा आदर, कौतुक, तक्रार, निषेध असे काही तरी करतो, आपण हसतो, सुखावतो, रडतो, रुसतो, रागावतो असे काही तरी करतो. प्रेम, आस्था, जिव्हाळा किंवा द्वेष, वैताग, संताप अशा कोणत्या तरी भावना आपल्या मनात उठतात. एकाच शब्दात सांगायचे झाले तर त्या व्यक्तीचा 'प्रभाव' जर या भेटीमधून आपल्यावर पडला तर ती व्यक्ती आपल्या स्मरणात घर करून राहते. काँप्यूटरच्या भाषेत सांगायचे तर आपल्या मनात तिची 'फाइल' उघडली जाते आणि ती फाइल हळूहळू इतर फाइलींच्या ढिगा-यात लपून जाते, पण जुन्या आठवणी काही निमित्याने कधी कधी जाग्या होतात तेंव्हा ती फाइल पुन्हा उघडते.

जुने फोटो पाहतांना त्यातले काही चेहेरे पाहताच त्यांच्या ब-याचशा आठवणी निघतात. मनाच्या स्मृतीपटलावर कोरली गेलेली त्यांची चित्रे शब्दांमधून मांडून आपल्या परीने ती रंगवावीत असे मनाला वाटते. ''मनात आले ते लिहिले'' हेच या ब्लॉगचे ब्रीद वाक्य असल्यामुळे ही व्यक्तीचित्रे काढायला मी सुरुवात केली. ज्यांची आठवण येताच त्यांच्याविषयी असलेली आदराची भावना उचंबळून येते अशा व्यक्तींबद्दल मी 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेत लिहीत आहे. पण सगळेच जण या श्रेणीत बसत नाहीत. कदाचित त्यांच्या अंगी असलेले दिव्यत्व पाहण्याची संधी मला मिळाली नसेल किंवा मला ते ओळखता आले नसेल. तरीसुद्धा अशा काही व्यक्तींचा माझ्यावर प्रभाव पडला आणि त्या माझ्या स्मरणात कायमच्या राहिल्या. ठरवून त्यांची भेट घेण्यासाठी सबळ असे कारण माझ्याकडे नसायचे, पण अचानकपणे त्या पुन्हा भेटल्या तर फार आनंद होत असे. अशा एकाद्या व्यक्तीला योगायोगाने का होईना पण पुन्हा कुठे तरी भेटण्याची इच्छा मनात असली आणि अचानकपणे ती आपल्यातून कायमची निघून गेल्याचे समजले तर खूप यातना होतात. पहायला गेलो तर आपल्या रोजच्या जीवनात तिला स्थान नसते, तिची उणीव आपल्याला कुठेही जाणवत नसते, पण तरीही आता ती कधीच भेटणार नाही हा विचार मनाला व्याकुळ करतो.

अशा काही व्यक्तींची शब्दचित्रे 'स्मृती ठेउनी जाती' या नव्या मालिकेत काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे. माझा परिवार आणि माझे कार्यालय यातील माणसांचा माझ्याबरोबर फारच जवळचा संबंध असल्यामुळे त्यांच्यावर काय आणि किती लिहावे हे ठरवणे कठीण आहे. शिवाय त्यांच्याकडे मी वस्तुनिष्ठपणे पाहू शकणार नाही. त्यामुळे त्यामधील कोणाचा या मालिकेत सध्या तरी समावेश केलेला नाही. 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेत कोणावरही लिहितांना त्या व्यक्तीचे जीवनचरित्र, त्याची कामगिरी, त्याला मिळालेले बहुमान वगैरे तपशीलांना विशेष महत्व न देता आणि त्याची फारशी व्यक्तीगत माहिती न देता माझा त्या व्यक्तीशी कुठे, किती आणि कसा संबंध आला आणि त्या बद्दल मला काय वाटते यावर मी लिहिले होते. 'स्मृती ठेउनी जाती' या नव्या मालिकेतसुद्धा मी हेच धोरण ठेवणार आहे.

श्रेष्ठ गीतकार, संगीतकार आणि गायक यशवंत देव यांच्या बद्दल लिहीत असतांना करुणाताईंची आठवण आल्याशिवाय कशी राहील? देवांच्या छायाचित्रात त्यांच्यासोबत करुणाताई दिसत आहेतच. खरे तर त्यांच्यावर देखील 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेत लिहावे असा विचार मनात येत होता. त्यांना जास्त जवळून पहायला मला मिळाले असते तर बहुधा मी ते करू शकलो असतो. पण तसा योग आला नाही आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतल्याचे वृत्त नुकतेच आले. यशवंत देव यांच्याबरोबरच त्याच सुमारास करुणाताईंशीही माझी ओळख करून दिली गेली होती. त्यानंतर यशवंत देवांच्या जेवढ्या कार्यक्रमांना मी हजर राहिलो होतो त्यातील बहुतेक ठिकाणी करुणाताई आल्या होत्या आणि माझे त्यांच्याशी एक दोन शब्दांचे आदान प्रदान झाले होते. यातल्या काही कार्यक्रमांचे निवेदन करुणाताईंनी केले होते. इतर वेळी त्या सन्मान्य पाहुण्याच असायच्या, पण त्यांना यशवंत देवांची सावली म्हणता येणार नाही एवढा मान त्यांना स्वतंत्रपणे मिळतांना दिसत होता. .

मी पहिल्यांदा त्यांना पाहिले तेंव्हा त्या 'करुणा देव' झाल्या नव्हत्या. तेंव्हा त्या 'नीलम प्रभू' होत्या. दूरदर्शन येऊन त्याचे प्रक्षेपण दिवसभर सुरू होण्याच्या आधीच्या काळात रेडिओ खूपच लोकप्रिय होता. रेडिओ सिलोन आणि विविध भारतीच्या कार्यक्रमांना सर्वाधिक पसंती असली तरी 'मुंबई ब' केंद्राच्या मराठी कार्यक्रमाचे चाहतेही होते. त्यात 'प्रपंच' नावाचा एक खुमासदार कार्यक्रम होता. यातल्या मीनावहिनी आणि टेकाडेभावजी यांच्या खुसखुशीत संवादातून निरनिराळ्या घटनांवर मार्मिक टिप्पणी केली जात असे. ज्ञान आणि मनोरंजन या दोन्हींचा समतोल या श्रुतिकेत साधला जात असे. नीलम प्रभू या त्यातल्या 'मीनावहिनी' होत्या. आवाजातला गोडवा, बोलण्यातला सहजपणा, अस्खलित शब्दोच्चार, संवादाच्या गरजेनुसार त्यातील चढउतार वगैरे सगळे गुण त्यात असल्यामुळे त्या आपल्याच घरातल्या सदस्य आहेत असे शहरातल्या मराठी मध्यमवर्गीयांना वाटत असे. सोप्या आणि घरगुती बोलण्यातल्या भाषेत सादर केला जात असलेला हा मनोरंजक कार्यक्रम घरातल्या सर्वांना ऐकावाला वाटत असे. नीलम प्रभू यांचा गोड आवाज आकाशवाणीवरील इतर कार्यक्रमात किंवा जाहिरातीतसुद्धा कानावर पडताच ओळखता यावा इतका सर्वाच्या परिचयाचा झाला होता.

त्यांनी रंगभूमीवर अनेक नाटकात भूमिका केल्या असे ऐकले असले तरी मला त्यातली कोणती पाहिल्याचे आठवत नाही. आम्ही मुंबईच्या एका टोकाला रहात असल्यामुळे नाटक पहायला जाणे मला तसे कठीणच होते, त्यामुळे मी फारच कमी आणि अतीशय नावाजलेली नाटकेच पहात होतो. त्यामुळे असे झाले असेल. पु.ल.देशपांडे यांच्या 'वा-यावरची वरात' या बहुरंगी कार्यक्रमात 'रविवारची एक सकाळ' नावाची धमाल नाटुकली होती. त्यातली नीलम प्रभू यांची भूमिका खूप गाजली. 'बटाट्याची चाळ' हा एकपात्री प्रयोग तुफान यशस्वी झाल्यावर पुलंनी 'वा-यावरची वरात' आणली होती. तीसुद्धा 'सबकुछ पु.ल.' याच प्रकारची असली तरी त्यात इतर थोडी पात्रे होती. त्यांतल्या नीलमताईंनी स्वतःच्या सहज सुंदर अभिनयकौशल्याने त्या नाटिकेला बहार आणली होती.

टीव्हीच्या प्रसारानंतर रेडिओ ऐकणे संपले. घरातला रेडिओ दोन तीन वेळा दुरुस्ती झाल्यानंतर कायमचा अडगळीत गेला. वा-यावरची वरातचे प्रयोग बंद झाल्यावर तत्सम दुसरा कार्यक्रम आला नाही. त्यामुळे 'नीलम प्रभू' हे नाव नजरेआड गेले. त्यांचे पती बबन प्रभू कालवश झाले. त्यानंतर नीलमताईंनी यशवंत देव यांच्याशी विवाह केला. ही बातमी त्या काळात नक्कीच महत्वाची असणार. पण मी तेंव्हा मराठी वर्तमानपत्रे वाचत नव्हतो आणि टाइम्स ऑफ इंडियाने ती पहिल्या पानावर दिली नसावी. त्यामुळे मला ती माहीत नव्हती. अनेक वर्षानंतर ज्या वेळी मी त्यांना यशवंत देवांच्या बरोबर पाहिले तेंव्हाच त्यांना पूर्वी कुठे तरी मी पाहिले असल्यासारखे वाटले आणि त्यांचा आवाज ऐकून तो तर खूप ओळखीचा वाटला. "या बाई नीलम प्रभूंच्यासारखे बोलताहेत" असे मी शेजारच्या माणसाला सांगितल्यावर तो हसायला लागला. "अहो, करुणाताई म्हणजे नीलम प्रभूच आहेत." असा खुलासा त्याने केल्यावर माझे मलाच हसू आले.

कोणताही कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवर जाऊन भेटल्यावेळी त्या खूप आपुलकीने वागायच्या. त्या आम्हाला नेहमी सांगायच्या, "तुम्ही दोघे एकदा घरी या ना, जरा निवांतपणे बोलता येईल." हे रेडिओवरल्या 'मीनावहिनी' बोलत नसून करुणाताई मनापासून सांगत आहेत असेच वाटावे इतका सच्चेपणा त्यात असायचा. पण ''एवढ्या मोठ्या आणि कार्यमग्न लोकांच्या घरी आपण असेच कसे जायचे'' याचा संकोचही वाटायचा. त्यामुळे त्यांचे आमंत्रण स्वीकारून ते प्रत्यक्षात आणायचा धीर कधीच झाला नाही. आम्ही एक तरी चान्स घ्यायला हवा होता असे आता वाटते. पण आता असे वाटून त्याचा काय उपयोग? आपल्या स्मृती तेवढ्या मागे ठेऊन करुणाताई तर निजधामाला निघून गेल्या आहेत.

2 comments:

SHRIPAD GHARE said...

WE WERE NOT AWARE OF THE SAD DEMISE OF SHREEMATEE KARUNA DEVI(DEV) TILL THE TIME OF OPENING YOUR BLOG.WE WELCO YOUR NEW VENTURE UNDER FITTING NOMENCLATURE.

SHRIPAD GHARE said...

WE were not aware about the sad demice of Shrimati Sau. KARUNA DEVI (DEV).