Monday, July 18, 2011

पंढरपूरचा विठोबा - ३

पी. सावळाराम आणि वसंत प्रभू या गीतकार संगीतकार जोडीने मराठी रसिकांना अप्रतिम गाण्यांचा जो ठेवा देऊन ठेवला आहे त्याला जोड नाही. भावनांनी ओथंबलेली त्यांची अजरामर गाणी आहेतच, विठ्ठल या मराठी माणसाच्या अत्यंत प्रिय देवाची आळवणी करणारी गीतेसुद्धा त्यांनी दिली आहेत. लता मंगेशकरांचे खाली दिलेले अजरामर गीत संत जनाबाई विठ्ठलाला म्हणते आहे की मीराबाई तिच्या गिरधर गोपालाला असा संभ्रम आधी पडतो आणि तिची ही आर्तता मुक्तीसाठी आहे हे शेवटच्या ओळीत वाचल्यावर आपल्याला प्रेमभावनेतून थेट अध्यात्माकडे नेते.

विठ्ठला, समचरण तुझे धरिते ।
रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते ।।
नेत्रकमल तव नित फुललेले, प्रेममरंदे किती भरलेले ।
तव गुण-गुंजी घालीत रुंजी, मानस-भ्रमरी फिरते ।।१।।
अरुण चंद्र हे जिथे उगवती, प्रसन्न तव त्या अधरावरती ।
होऊन राधा माझी प्रीति, अमृतमंथन करिते ।।२।।
जनी लाडकी नामयाची, गुंफुन माला प्राणफुलांची ।
अर्पून कंठी मुक्तीसाठी, अविरत दासी झुरते ।।३।।

आशाताईंनी गायिलेल्या खालील लोकप्रिय गीतात पांडुरंगाचे वर्णन विणकराच्या रूपकात केलेले आहे. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे या गाण्यात हेच रूपक वापरले आहे. माझ्या आठवणीप्रमाणे खाली दिलेले गाणे जास्त जुने असावे. या गाण्यात त्या महान विणकराचे नामस्मरण करण्याचा संदेश दिलेला आहे तर त्या गाण्यात जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे हे सत्यकथन केले आहे.

धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया ।।
अक्षांशाचे रेखांशाचे, उभे आडवे गुंफुन धागे ।
विविध रंगी वसुंधरेचे, वस्त्र विणिले पांडुरंगे ।
विश्वंभर तो विणकर पहिला, कार्यारंभी नित्य स्मरुया ।।१।।
करचरणांच्या मागावरती, मनामनांचे तंतू टाका ।
फेकुन शेला अंगावरती, अर्धिउघडी लाज राखा ।
बंधुत्वाचा फिरवित चरखा, एकत्वाचे सूत्र धरूया ।।२।।

वरील गीताच्या शेवटल्या ओळीत बंधुत्वाचा पुरस्कार केला आहे. पी.सावळाराम यांच्या मनातल्या सामाजिक बांधिलकीला खालील गाण्यात बहर आला आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराला आलेले बाजारू रूप पाहून रखुमाई इतकी व्यथित झाली आहे की तिला क्षणभरही तिथे रहावेसे वाटत नाही. ख-या भक्तमंडळींना बाजूला सारून भोंदू लोकांनी देवाचा संपूर्ण ताबा घेतला हे तिला असह्य झाले आहे. आपण आता इथून निघूया, तुम्हाला नसेल यायचे तर मला तरी निरोप द्या असे ती विठोबाला काकुळतीने म्हणते.

पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला, विनविते रखुमाई विठ्ठला ।।
ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा ।
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा ।
भक्त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा ।
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला ।।१।।
धरणे धरुनी भेटीसाठी, पायरीला हरिजन मेळा ।
भाविक भोंदु पूजक म्हणती, केवळ आमुचा देव उरला ।
कलंक अपुल्या महानतेला, बघवेना हो रखुमाईला ।
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला ।।२।।

खालील गाण्यात पी.सावळाराम यांनी पंढरीतील परिस्थितीवर एका वेगळ्या प्रकारे भाष्य केले आहे. देव चराचरात भरलेला असतो, तो सगळीकडेच असतो असे आपण समजतो, तरीही त्याच्या दर्शनासाठी देवळात जातो. पण या गाण्यातली स्त्री असे सांगते की मी असे काही केले नाही, फक्त स्वतः चांगली वागले आणि काय चमत्कार पहा, तोच मला भेटायला माझ्याकडे आला. पुंडलीकाची मातापितासेवा पाहून तर तो स्वर्गातून त्याला भेटायला पंढरपूरला आला होता. त्याचप्रमाणे सद्वर्तनाची कदर करून तोच भक्ताकडे जातो असे या गाण्यात सुचवले आहे.

विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला ।
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला ।।
तुळसी-माळ घालुनि गळा कधी नाही कुटले टाळ ।
पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ ।
देव्हाऱ्यात माझे देव त्यांनी केला प्रतिपाळ ।
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला ।।१।।
सत्य वाचा माझी होती वाचली न गाथा पोथी ।
घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती ।
शिकवण जन्माची ती बंधुभाव सर्वांभूती ।
विसरून धर्म जाति देई घास भुकेल्याला ।।२।।

देवळात जाऊन देवाचे दर्शन घेण्यापेक्षा मानवतेचे वर्तन हे अधिक धार्मिकतेचे लक्षण असते या विचाराचा पी.सावळाराम यांनी पुरस्कार केला आहेच. आईबाप हे सर्वात मोठे दैवत माझ्याजवळ असतांना त्यांना सोडून पंढरपुराला जायची मुळी मला गरजच नाही. असे खालील गाण्यातली नायिका ठामपणे सांगते.

विठ्ठल रखुमाई परी ।
आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी ।
कशाला जाऊ मी पंढरपुरी ?
कैलासाहुनी थोर मन हे माझ्या बाबांचे ।
शंकराला विष न पचले प्रपंच दु:खाचे ।
पचवुन देती अमृत मजला संत वचनांचे ।
पुंडलिकापरी हात जोडुनी सदैव सामोरी ।।१।।
सात समिंदर भरूनी उरली माया आईची ।
प्रेमळतेला उपमा नाही वाणी ज्ञानेशाची ।
मंगल शोभा जिच्या ललाटी कोटी चंद्राची ।
वत्सलमूर्ति माय माउली मानस - देव्हारी ।।२।।
विटेवरचे जगजेठी हे आले माझ्यासाठी ।
संसाराचा थाट मांडुनी केली मजला मोठी ।
करपुष्पांची माला घालुन तुमच्या मी कंठी ।
चरणांचे हे तीर्थ घेत्ये चंद्रभागेपरी ।।३।।

No comments: