'संस्कृती' हा शब्द निदान एकदा तरी वाचनात आला नाही किंवा कानावर पडला नाही असा एक दिवससुध्दा जात नसेल. तो शब्द आता आपल्या अगदी अंगवळणी पडला आहे, किंवा घासून गुळगुळीत झाला आहे. 'भारतीय संस्कृती'चे संरक्षक उदंड झाले आहेत. ती महान प्राचीन संस्कृती आता कशी पार लयाला चालली आहे याचे रडगाणे ते निरनिराळ्या मंचांवरून सारखे ऐकवत असतात. शिवाय 'ऑफिसातली संस्कृती', 'घरातली संस्कृती', त्यात पुन्हा 'माहेरची संस्कृती' आणि 'सासरची संस्कृती', 'कट्ट्यावरची संस्कृती', 'गुत्त्यावरली संस्कृती', 'रक्षकदलाची संस्कृती', 'रिक्षावाल्यांची संस्कृती' असल्या अगणित प्रकारच्या संस्कृतींनी आपल्याला वेढून ठेवले आहे.
मी लहान असतांना 'संस्कृती' या शब्दाचे इतके मुबलक प्रचलन झालेले नव्हते. प्राचीन काळातल्या इतिहासात 'मेसापोटेमिया' नावाच्या अनोख्या देशातल्या 'युफ्रेटिस आणि टायग्रिस' नावांच्या नद्यांच्या काठी 'बाबिलोनियन' नावाची संस्कृती होऊन गेली म्हणे. यातल्या एका अक्षरालाही आमच्या दृष्टीने कणभर महत्व वाटायचे कारण नव्हते. पूर्वीच्या आपल्याच देशातल्या पण आता पाकिस्तानात गेलेल्या 'मोहेंजोदारो आणि हडप्पा' गावांजवळ केलेल्या उत्खननात मातीच्या ढिगा-यांच्या खाली जुनी घरे मिळाली आणि त्यात खूप पूर्वीच्या काळचे खापरांचे तुकडे आणि दगडाच्या ओबडधोबड आकृत्या सापडल्या. ती 'सिंधू नदी संस्कृती' होती. पुस्तकात छापलेली त्यांची चित्रे पाहून मला तरी त्यांचे जरासुध्दा कौतुक वाटले नाही. पाच मार्कांचे वर्णन आणि जोड्या जुळवा, गाळलेल्या जागा भरा यासारखे दोन तीन मार्कांचे इतर प्रश्न परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेत असतील यापलीकडे आमच्या लेखी त्या संस्कृतींना महत्व नव्हते.
इतिहासाच्या मध्ययुगीन काळात भारतावर आक्रमण करून आलेले मुसलमान बादशहा आपल्या संस्कृतीला सोबत घेऊन आले. त्यांच्यात पुन्हा अरब, फारशी, पठाण, तुर्की वगैरे भेद होते. त्यांची भाषा, धर्म, आचार विचार, अन्न, कपडे, कलाकौशल्य वगैरे अनेक गोष्टींचा समावेश त्यांच्या संस्कृतींमध्ये होता. त्यांच्या आधी आलेले हूण, कुषाण वगैरे लोक आपापल्या संस्कृती विसरून गेले होते तसे मुसलमानांनी केले नाही. पुढील काळात इंग्रज लोक एक वेगळीच संस्कृती इकडे घेऊन आले. त्यांनी तिचा प्रसार चालवला. शिवाय हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत पसरलेल्या भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये निरनिराळ्या भाषा, चालीरीती, अन्नपदार्थ वगैरे प्रचलित होत होतेच. यातील वैविध्याची हळूहळू ओळख होत गेली. वेळोवेळी शाळेत होत असलेल्या 'सांस्कृतिक' कार्यक्रमांमध्ये नाचगाणी, नाटुकल्या, नकला वगैरे होत असत. वाचनाची आवड निर्माण झाल्यानंतर होत असलेल्या अवांतर वाचनामध्ये 'भारतीय संस्कृती', 'मराठमोळा संस्कृती' वगैरे शब्द यायला लागले. आणखी पुढे गेल्यावर 'अनेकतामें एकता' हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट आहे असेही वाचले. त्याबद्दलचा मनातला गोंधळ वाढतच गेला. "संस्कृती संस्कृती म्हणतात ते काय असते रे भाऊ?" असे विचारावे असे वाटत राहिले होते. पण याचे समर्पक उत्तर कोण देणार हे त्यावेळी समजत नव्हते.
'दिसामाजी कांहीतरी' या ब्लॉगवर एक लेख वाचला होता. तो या विषयावरला पहिलाच लेख होता. त्यातले विचार मला बरेचसे माझ्या विचारांशी जुळण्यासारखे दिसले म्हणून लेखकाच्याच शब्दात थोडक्यात देतो. पुढे त्याने काय लिहिले आहे हे मुळात वाचायला हवे.
"काळानुसार जसा जसा माणसाचा दृष्टीकोन व्यापक होत गेला तशी तशी संस्कृतीची व्याख्या पण बदलत गेली. कोणत्याही गोष्टीच व्याख्या करायची म्हटले कि त्यासाठी काही मेझरेबल क्वाण्टीटीज लागतात पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मेझरेबल नसतात. त्यातलीच एक म्हणजे संस्कृती. ..... सर्वसाधारणपणे आजच्या घडीला ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्यातले सर्वमान्य घटक म्हणजे – मानवता, कला, ज्ञान, श्रद्धा, सामाजिक अनुसरण, वृत्ती आणि मूल्य…
जेव्हा एखादी संस्कृती लयाला जाते म्हणजे नेमके काय होते? तर वर उल्लेखिलेल्या गोष्टी अस्तास जातात. बऱ्याचदा ती नष्ट होत नाही तर बदलत जाते. बाह्यतः आणि आत्मतः पण. पूर्वीची मुल्ये बदलतात, लोकांचा विचार बदलतो… आता असे म्हणू का कि म्हणून संस्कृती बदलली? संस्कृती ही काही थोड्या-फार बदलाने कुठे जात नसते. असे म्हणायचे कोण धाडस करेल कि संस्कृती बदललीच नाही? बदलली ना…पण असे कोण म्हणेल कि संस्कृती नष्ट झाली??? कोणीही नाही. भाषा, कपडे, समज, नीती, मुल्ये, आचार-विचार यांची उत्क्रांती होत गेली. त्यामुळे ही गोष्ट प्रवाही आहे."
मला असे वाटते की सध्या वापरात असलेला 'संस्कृती' हा शब्दच मुळात परका असावा. 'सिव्हिलायझेशन' आणि 'कल्चर' या दोन वेगवेगळ्या आंग्ल शब्दांना मराठी प्रतिशब्द म्हणून कोणा पंडिताने 'संस्कृती' हा एकच शब्द निवडला आणि त्या इंग्रजी शब्दांचे अर्थ त्याला चिकटले.
. . . . . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment