१९६० साली द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन गुजरात राज्य अस्तित्वात आले तेंव्हा त्या राज्यासाठी गांधीनगर नांवाची नवी राजधानी उभारावी असे ठरले आणि एका नव्या नगराची रचना सुरू झाली. राज्य सरकारचे मंत्री, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कार्यालये आणि निवासस्थाने बांधली गेली आणि हे नगर नांवारूपाला येत गेले. पण या ठिकाणचे सर्वसामान्य जीवन सुरळीतपणे चालत असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी मिळावी अशा घटना त्या जागी क्वचितच घडत असतील आणि या जागेचे नाव वर्तमानपत्रात फारसे वाचनात येत नसे. गुजरातमध्ये घडलेल्या बहुतेक घटनांचे वृत्तांत अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, सूरत अशा त्या राज्यातील प्रमुख शहरांतूनच येत असत. त्यामुळे गांधीनगर हे नांव कांही फारसे डोळ्यासमोर येत नसे किंवा कानावरही पडत नसे. कामाच्या निमित्याने मी अहमदाबादला अनेक वेळा जाऊन आलो, पण तेथून जवळच असलेल्या गांधीनगरलाही भेट देऊन हे नवे नगर पाहून यावे असे मनात आले नाही किंवा कोणी कधी तसे सुचवले नाही.
गुजरातमध्ये जेंव्हा निवडणुका होत असत त्या काळात अर्थातच गांधीनगरचे नांव प्रकाशात येत असे. एका राष्ट्रीय नेत्याने गांधीनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवल्यामुळेही त्या गांवाला प्रसिध्दीचे थोडे वलय प्राप्त झाले होते. येथील अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला करून रक्तपात केल्यामुळे बरीच खळबळ माजली होती. या गांधीनगरला जाऊन मला कांही दिवस तिथे रहायचे आहे असे वाटायचे मात्र कांहीच कारण दिसत नव्हते. माझ्या ध्यानीमनी नसतांना अशी एक संधी मागच्या महिन्यात आली.
गेल्या पन्नास वर्षात गुजरात राज्याने सर्वच क्षेत्रात चांगली प्रगती केली. त्यांच्या सुदैवाने किना-यालगतच्या भागात पेट्रोलियमचा मोठा नैसर्गिक साठा लाभला आणि तांत्रिक प्रगतीसाठी आणखी एक मार्ग खुला झाला. या क्षेत्रातले तंत्रज्ञान आत्मसात करून वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने गांधीनगरला एका खास पेट्रोलियम युनिव्हर्सिटीची स्थापना झाली आहे. इतर ऊर्जास्रोतांचाही अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या शाखा या विद्यापीठात सुरू केल्या आहेत. या नवनव्या क्षेत्रात अध्यापन करण्यासाठी त्यासंबंधी जाणकारी असलेले तज्ज्ञ प्राध्यापक लगेच मिळणे कठीण आहे. त्यामुळे अशा क्षेत्रात काम करून सेवानिवृत्त झालेल्या अनुभवी लोकांचे सहाय्य सुरुवातीला घ्यावे असा विचार करून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. कोणीतरी माझे नांव या संदर्भात सुचवले आणि आधी थोडे आढे वेढे घेत अखेर मी या कामात मदत करायला तयार झालो.
एकादे काम एकदा अंगावर घेतले की ते शक्य तितक्या चांगल्या प्रकारे करणे क्रमप्राप्तच होते. त्यामुळे मी जो विषय शिकवायला घेतला होता त्यातील माझ्याकडे असलेल्या ज्ञानाची उजळणी करून घेणे, त्यात नव्याने पडलेली भर समजावून घेणे, त्याची वीस भागात व्यवस्थितपणे विभागणी करून मांडणी करणे वगैरे करण्यात बराच वेळ जात असे. यामुळे या वर्षाच्या सुरुवातीपासून या ब्लॉगसाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता. या दोन कामांचा एकमेकांना उपयोग व्हावा या दृष्टीने मी चक्क पंपपुराणच सुरू करून त्याचे अनेक भाग लिहून काढले.
अखेर गांधीनगरला जाऊन प्रत्यक्ष व्याख्याने देण्याचे वेळापत्रक ठरले. अनेक व्हिजिटिंग फॅकल्टी असल्यामुळे त्यांचे येणेजाणे, राहणे वगैरेंच्या सोयीच्या दृष्टीने त्यांनी आपापल्या विषयावरील व्याख्याने सलगपणे देणे गरजेचे होते, पण एकाच दिवशी एकाच विषयाचे दोन तीस तास घेणेही योग्य नव्हते. या दोन्ही गोष्टींचा विचार करून मला तब्बल पंचवीस दिवसांचा कालावधी दिला गेला होता. तेवढ्या काळात मुंबईहून गांधीनगरला पुन्हा पुन्हा जाणे येणे शक्य नसल्यामुळे मी गांधीनगरच्या दोन खेपा करून यायचे ठरवले. तारखेनुसार वेळापत्रक आंखून पहिल्या सत्रासाठी चौदा एप्रिलला गांधीनगरला जाऊन दाखल झालो.
. . . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment