Sunday, May 09, 2010

गांधीनगर (उत्तरार्ध)

मुंबईहून गांधीनगरपर्यंत थेट जाणा-या रेल्वेगाड्या कदाचित असतीलही, पण माझ्या ओळखीचे सगळे लोक अहमदाबादमार्गेच गांधीनगरला जातात. मुंबईहून अहमदाबादला जायची मात्र खूपच चांगली सोय आहे. रात्री एकापाठोपाठ एक तीन चार रेल्वेगाड्या इथून सुटतात आणि दिवस उजाडण्याच्या सुमाराला त्या अहमदाबादला पोचतात. परत येण्यासाठीसुध्दा अशाच सोयिस्कर गाड्या आहेत. यातल्याच एका सुपरफास्ट स्पेशल गाडीत माझे आरक्षण झाले होते. रात्रीचे जेवण घेऊन त्या गाडीत जाऊन पथारी पसरली. सकाळी सहाच्या सुमाराला जाग आली तेंव्हा आमची गाडी अहमदाबादेच्या परिसरात आली होती आणि फलाटावर जागा मिळण्याची वाट पाहात यार्डमध्ये थांबली होती. तिथून ती पुढे सरकली आणि खिशातला भ्रमणध्वनी खणाणला. मला घेऊन जाण्यासाठी आलेल्या गाडीच्या ड्रायव्हरने वाट पाहून फोन लावला होता. म्हणजे वाहनाची व्यवस्था झाली होती. सुरुवात तर अपेक्षेप्रमाणे चांगली झाली. सकाळच्या वेळी रस्ते मोकळे असल्याने आम्ही अर्ध्या तासातच गांधीनगरला येऊन पोचलोसुध्दा. संस्थेनेच सोय केलेली असल्यामुळे गेस्टहाऊसचा पत्ता शोधून काढण्याची गरज नव्हती. रेल्वे स्टेशनहून निघालो तो थेट अतिथीगृहासमोरच येऊन पोचलो.

त्या दिवशी विद्यापीठाला सुटी असल्यामुळे व्याख्यान देण्यासाठी जायचे नव्हते. दिवसभर गांधीनगर शहर पहात भटकण्यात घालवायचा असे मनात ठरवले होते. पण जसजसा दिवस वर येत गेला, तसतसा उन्हाचा पारा भराभर चढत गेला. सकाळची आन्हिके उरकून न्याहारी घेईपर्यंत बाहेर कमालीचे रणरणते ऊन पडले होते. आम्हाला गेस्ट हाऊसवर पोचवून संस्थेची मोटर कार अदृष्य झाली होती आणि आता शहरात फिरण्यासाठी पायपीट किंवा मिळाली तर ऑटोरिक्शा हेच पर्याय होते. चालत किंवा उघड्या रिक्शेत बसून उन्हाची ती रखरख अंगावर घेण्याची काडीएवढी इच्छा होत नव्हती. शिवाय या ठिकाणी पंचवीस दिवस रहायचे असतांना सुरुवातीलाच सनस्ट्रोक वगैरेचा धोका पत्करणे परवडले नसते. गेस्टहाऊसमध्ये आधीपासून आलेल्या पाहुण्यांकडून इथल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती जमवत बसलो.

गांधीनगरचे अक्षरधाम मंदीर हेच आजचे त्या जागेचे सर्वात मोठे पर्यटकांचे आकर्षण आहे यात शंका नाही. हे स्थान पाहण्यासाठी दीड दोन तासांपासून पांच सहा तासांपर्यंत वेळ लागेल असे अंदाज सांगितले गेले. मनात किती श्रध्दा असेल त्यानुसार हा आकडा कमी जास्त होणार हे उघड होते. यापूर्वी मी अॅटलांटाचे स्वामीनारायण मंदीर पाहिले होते तेंव्हा या संप्रदायाची ओळख झाली होती. त्याच्या गुरूशिष्यपरंपरेबद्दल विशेष आस्था वाटत नसली तरी जगभरात ठिकठिकाणी या पंथाची जी केंद्रे उभारली गेली आहेत आणि या काळात त्यांनी देशोदेशी जी भव्य मंदिरे बांधली आहेत ते पाहून अचंभा आणि आदर निश्चितपणे वाटतो. गांधीनगरच्या अक्षरधामबद्दल जे वृत्तपत्रात वाचले होते त्यावरूनच आवर्जून पहाण्याच्या स्थानांमध्ये त्याचा समावेश झालेला होता. कामानिमित्य नव्हे, तर पर्यटनासाठी म्हणूनही जेंव्हा गुजरातचा दौरा होईल तेंव्हा हे स्थान पहायचेच होते. रोज रात्री तिथे एक अप्रतिम असा दृक्श्राव्य कार्यक्रम होतो असे समजले. त्याचा विचार करता संध्याकाळी मंदिराचे दर्शन करून रात्रीचा कार्यक्रम पाहून परतायचे असा टू इन वन बेत केला. ही अक्षरधामची भेट अविस्मरणीय ठरलीच. त्यावर स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.

आमच्या अतिथीगृहापासून जवळच एक विस्तीर्ण उद्यान होते. त्याच्या गेटपर्यंत वाहनाने गेले तरी आंत गेल्यानंतर पायी फिरणे भागच होते. शिवाय तिथे खाण्यापिण्याची कांही व्यवस्था नाही असे कळले. त्यामुळे पहाटे उठून प्रभातफेरीसाठी तिकडे जाणे श्रेयस्कर असल्याचे मत पडले. गांधीनगरपासून दहा बारा किलोमीटर अंतरावर एक प्राचीन काळातली विहीर आहे. तिची रचना आणि वास्तूशिल्प पहाण्यासारखे आहे. राज्यसरकारची कार्यालये, विधानसभा वगैरे इमारतींबद्दल खास असे कांही ऐकले नव्हते. अतिरेक्यांच्या धोक्यामुळे जो कडेकोट बंदोबस्त अलीकडे असतो तो पाहता त्या इमारतींमध्ये प्रवेश मिळणे तर अशक्य होते. दुरूनच त्यांचे दर्शन घ्यावे लागले असते.

कोणतीही विशिष्ट वास्तू न पाहतासुध्दा गांधीनगर हे प्रेक्षणीय शहर आहे, ते मुख्य म्हणजे तिथल्या सुरेख रस्त्यांमुळे. नव्या मुंबईत पाम बीच रोड नांवाचा एक प्रशस्त आणि सरळ हमरस्ता आहे. तेवढा अपवाद सोडला तर मुंबईतल्या कोठल्याही रस्त्यावरून वाहन चालवणे मेटाकुटीला आणते. गांधीनगरला जिकडे पहावे तिकडे सरळ रेषेत दूरवर जाणारे रुंद रस्ते आहेत. हमरस्ते तर आठ पदरी आहेतच. त्यांच्या बाजूने जाणारे सर्व्हिस रोडदेखील दुपदरी आहेत. आधीपासून असलेल्या रस्त्यांची उत्तम निगा राखली जातेच, शिवाय ज्या भागात अजून वस्तीसुध्दा झालेली नाही अशा संभाव्य विस्ताराच्या प्रदेशात आजच मोठाले रस्ते बांधले जात आहेत. आमचे गेस्ट हाऊस शहराच्या बाहेरच्या अंगाला वसवले जात असलेल्या इन्फोसिटी या भागात होते. तिथले रस्ते, नगररचना, इमारती वगैरे पाहता आपण कोठल्या देशात आहोत असा प्रश्न पडावा. पण इतक्या सुंदर रस्त्यांच्या कडेला दिसणारे कच-याचे ढीग पाहून लगेच भान येते.

No comments: