
प्रेशर कूकरमधून वाफ बाहेर निघू नये यासाठी तो हवाबंद ठेवावाच लागतो, पण त्यात भांडी ठेवण्याची आणि ती बाहेर काढण्याची व्यवस्थाही करायची असते. त्यासाठी कुकरचे पात्र आणि झाकण असे वेगवेगळे भाग बनवून पाहिजे तेंव्हा त्यांना सुलभपणे जोडण्याची किंवा विलग करण्याची सोय केली जाते. पंपाच्या इंपेलरला त्याच्या केसिंगमध्ये ठेवण्यासाठी केसिंग दोन भागात केले जाते. इंपेलरशी जुळणी करतांना ते एकमेकांना जोडले जातात. त्यांचा जोड उघडण्याची गरज प्रेशर कूकर प्रमाणे रोज पडत नाही, पण रखरखाव आणि दुरुस्तीसाठी कधीतरी ती पडण्याची शक्यता असल्यामुळे ते वेल्डिंग करून कायमचे जोडत नाहीत.
पंपांच्या केसिंग्जना दोन प्रकाराने छेद दिले जातात. अॅक्शियल स्प्लिट या प्रकारात शाफ्टच्या मध्यरेषेच्या पातळीत केसिंगचे दोन भाग करतात. या प्रकारच्या पंपांचा वरील भाग उचलून बाजूला ठेवता येतो. त्यानंतर इंपेलर व इतर भागांचे निरीक्षण करणे सोपे जाते. हे काम करतांना पंपाच्या शाप्टला जो़डलेल्या बेअरिंग्जना धक्का लागत नाही.
रेडियल स्प्लिट या प्रकारात केसिंगला शाफ्टला काटकोनात उभा छेद देतात. अशा प्रकारच्या पंपांचे व्हॉल्यूट चेंबर अखंड असल्यामुळे ते मजबूत असते. या प्रकारात शाफ्टच्या एका बाजूच्या टोकाला पाणी आत शिरण्याचा मार्ग असतो. त्या भागात बेअरिंग्ज नसतातच. दोन्ही बेअरिंग्ज मोटारच्या बाजूलाच असतात.
या दोन्ही प्रकारांचे मिश्रण करून दुहेरी केसिंग बनवतात. या प्रकारात एक लांबुळके बॅरल शाफ्टच्या दिशेने बसवतात आणि त्यावर स्प्लिट केसिंगचा वरील भाग ठेवतात.
3 comments:
माफ करा पण बोलल्या (लिहिल्या) शिवाय रहावत नाही म्हणून...
हे आपले पंपपुराण आणि असे अनेक इतर काही जमेल तितके आपण संकलित करून नंतर छापले तर पुढील पिढीत तरी काही मराठी जाणकार पंपतंत्रज्ञ तयार होतील... अशी गोष्टी आय टी आय आणिक आय आय टी मध्ये सुद्धा नाहित असे वाटते...
शिरीष, अहो माफी कसली मागताय्? तुमची दादच मला महत्वाची आहे. तांत्रिक विषयांवरील लेखांचे संकलन करून छापण्याची कल्पना छानच आहे, पण ते काम कोण करणार? ब्लॉग आपल्या हातात आहे. घरी बसल्या इथे पाहिजे ते लिहू शकतो म्हणून सध्या लिहून ठेवतो आहे.
सूचनेबद्दल धन्यवाद.
आम्ही प्रयत्न करू..
काम चालू राहू दे... मी काढतो माणसे शोधून की जी ते छापायला आपल्याला सहाय्य करतील अशी...
Post a Comment