Saturday, April 04, 2009

पेरूचा पापा ते मोलाचा कावा

मुंबईत राहिलेल्या माझ्या पिढीतल्या बहुतेक मध्यमवर्गीय मराठी माणसांना 'पेरूचा पापा' नक्की माहीत असेल, कदाचित ते सुध्दा माझ्याप्रमाणे रोज सकाळी तो घेऊनच ऑफीससाठी प्रस्थान करत आले असणार. प्रख्यात कथालेखक व.पु.काळे किंवा वि.आ.बुवा यांनी आधी 'पेरूचा पापा' शोधून काढला आणि नंतर तो घरोघरी पोचला असे मला परवाच समजले. तीस पस्तीस वर्षांपूर्वी मी या दोन्ही लेखकांच्या कथा शोधून शोधून वाचत असे, त्यामुळे हा शोध ज्या कथेतून जगासमोर आला ती सुध्दा मी वाचली असणारच, पण या दोन शब्दांचा पुढे मराठी भाषेतला वाक्प्रचार होणार आहे एवढे ओळखण्याचा द्रष्टेपणा कांही माझ्या अंगात नव्हता, त्यामुळे 'पेरूचा पापा' घेऊन घराबाहेर पडलेल्या त्या कथानायकाचे पुढे काय झाले ते कांही मला आता आठवत नाही. हा शब्दप्रयोग कुठून निघून माझ्या तोंडी येऊन बसला यापेक्षा तो कित्येक वर्षे तिथे मुक्काम करून होता हे जास्त महत्वाचे आहे.
त्या काळातील इतर मध्यमवर्गीयांप्रमाणे मी सुध्दा एका दूरच्या उपनगरात रहात होतो आणि रोज सकाळी सात त्रेपन की सत्तावन अशी कोणतीशी एक ठराविक लोकल पकडून दक्षिण मुंबईत असलेल्या ऑफीसला जात होतो. ती गाडी चुकू नये यासाठी घरापासून धांवाधांव करावी लागत असे. त्या गडबडीत एकादी महत्वाची वस्तू विसरून घरी राहिली तर सगळा गोंधळ व्हायचा. तो टाळण्यासाठी त्या सर्व वस्तूंना एकत्र बांधणारे 'पेरूचा पापा' हे दिव्य सूत्र बहुधा व.पुंनी, बुवांनी, कदाचित तिस-या कोणा लेखकाने, मराठी माणसाला दिले होते. त्या अत्यावश्यक वस्तू होत्या पेन, रुमाल, चावी, पास आणि पाकिट.
मी नोकरीला लागलो त्या सुमारास बॉल पॉइंट पेने बाजारात आली होती, पण ती सुमार दर्जाची असायची. ज्या वेगाने आपल्याला लिहावे असे वाटेल त्या वेगाने त्यातली शाई खाली उतरत नसे आणि ते खिशात ठेवले असतांना व कसलीही गरज नसतांना ती खाली उतरून शर्टाला जो डाग पाडत असे तो कोणत्याही साबणाने निघत नसे. शिवाय 'वापर करा आणि फेकून द्या' असे सुचवणारी आजकालची संस्कृती त्या काळात अजून प्रचलित झाली नव्हती. त्यामुळे 'टाकाऊ' गोष्टी विकत घेण्यापेक्षा 'टिकाऊ' वस्तू आणण्याकडे सर्वांचा जास्त कल असे. त्या मानाने पाहता एक चांगले फाउंटन पेन एकदा घेतले की शंभर दीडशे वेळा त्यात शाई भरून आणि दोन तीन वेळा त्याचे निब बदलून ते सहज दोन तीन वर्षे जात असे. कांही कांही लोकांनी तर त्यांच्या बाबांची आठवण म्हणून त्यांचे जुने परदेशी बनावटीचे पार्कर किंवा शेफर पेन वीस वीस वर्षे जपून ते वापरात ठेवलेले मी पाहिले आहे. फाउंटन पेनचे एक वैशिष्ट्य असे होते की रोजच्या वापरात असले तरच ते सुरळीतपणे चालत असे. न वापरता दोन तीन दिवस जरी पडून राहिले तर त्याची शाई निबात सुकून ते बंद पडण्याची भीती असायची. यामुळे घरात आणि ऑफीसात वेगवेगळी पेने ठेवण्यापेक्षा एकच आवडते पेन नेहमी सोबत ठेवले जाई. तर सांगायचे तात्पर्य असे की त्या काळात ऑफीसमध्ये काम करणा-या लोकांसाठी पेन ही घरातून निघतांना आठवणीने घेऊन जाण्याची एक अत्यावश्यक गोष्ट होती.
मुंबईच्या लोकांना रुमालाचे उपयोग सांगायची गरजच नाही. तो डोळ्यांना लावण्याचे किंवा त्याच्या आड आपले हंसू लपवण्याचे प्रसंग पुरुषांवर सहसा येत नाहीत, पण बारा महिने सदोदित येत राहणारा घाम टिपण्यासाठी त्याची गरज पडतेच. शिवाय हात किंवा तोंड धुतल्यानंतर तिथे नॅपकिन वा टॉवेल नसेल तर हाताशी असलेला हातरुमाल उपयोगी पडतो. जेंव्हा प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा शोध लागलेला नव्हता त्या काळात ऑफीसात जातां जातां किंवा घरी परततांना अचानक वाटेत कांही किरकोळ वस्तू विकत घ्यायची बुध्दी झाली तर तिच्या कागदात गुंडाळलेल्या पुड्याला रुमालाचा आधार द्यावा लागत असे. शिवाय फार कडक ऊन असले तर डोक्यावर ठेवायला आणि जमीनीवर किंवा कट्ट्यावर फतकल मारून बसायचे असेल तर खाली पसरायला अशा अनेक प्रकाराने रुमालाचा उपयोग होत असे. त्यामुळे असा बहुगुणी रुमाल खिशात ठेवणे आवश्यकच असायचे.
मी मुंबईला आल्यापासून पुलंच्या शब्दात 'बंद दरवाज्याच्या संस्कृतीत' म्हणजे फ्लॅटमध्येच रहात आलो आहे. त्यामुळे दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी त्याची लॅच की खिशात ठेवणे किती आवश्यक असायचे ते मुद्दाम सांगायची गरज नाही. ऑफीसमधल्या गोपनीय बाबींची चिटोरी कुलुपात बंद ठेवावी लागत. त्यांची चावी घरी राहून गेली तर ऑफीसातले काम अडत असे आणि ती गोष्ट चार जाहीर होत असे. त्यामुळे त्यांच्या किल्ल्या खिशात हव्यातच. लोकल रेल्वेने रोज प्रवास करण्यासाठी पास हवाच आणि पैशाच्या पाकिटाशिवाय दिवसभर बाहेर रहायचे म्हणजे जरा कठीणच. 'पेरूचा पापा'हा सोपा मंत्र या पांचही गोष्टी आठवणीने खिशात ठेवायला चांगला होता.
पुढे त-हेत-हेच्या बॉलपेन आणि फायबर टिप पेनांचा महापूर आला आणि फाउंटन पेन कालबाह्य झाले. माझे ऑफीस घरापासून पांच मिनिटे पायी चालत जाण्याच्या अंतरावर आले आणि त्या वाटेवर एकही दुकान नव्हते. त्यामुळे पास नाहीसा झाला आणि पाकिटाची गरज कमी झाली. रुमाल व चावी एवढ्या दोनच गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी सूत्राची गरज राहिली नाही आणि त्यातून त्यातली एकादी विसरून राहून गेली तरी वाटेतून केंव्हाही परत फिरून त्या घेऊन जाणे शक्य होते. त्यामुळे 'पेरूचा पापा' मागे पडला.

ऑफीसच्या कामासाठी मला वरचेवर परगांवी जावे लागत असे. मोबाईलचा प्रसार झाल्यानंतर आपल्या जगाबरोबर 'कनेक्टेड' राहण्यासाठी मोबाईल फोन खिशात बाळगणे आवश्यक झाले. बाहेरगांवी हॉटेलची बिले वगैरे देण्यासाठी क्रेडिट कार्ड सोयीचे होते आणि आपली ओळख दाखवण्यासाठी आयडेंटिटी कार्ड जवळ असणे अत्यावश्यक असायचे त्यामुळे 'पेरूचा पापा' या सूत्रात थोडा बदल करून मी माझ्या उपयोगासाठी त्याला 'मोरूचा काका' असे रूप दिले. पण मी प्रख्यात लेखक वगैरे नसल्यामुळे त्याचा वाक्प्रचार कांही झाला नाही.
मागच्या वर्षी मी कांही काळ अमेरिकेत गेलो होतो. तिकडची राहणी आपल्यापेक्षा थोडी वेगळी आहे. पेपरलेस ऑफीसे झाल्यापासून पेनला भाव राहिला नाही. मोबाईल मात्र आवश्यक असतो. लोकलचा पास फक्त मोठ्या महानगरातल्या थोड्या लोकांना लागत असेल. बहुतेक लोक आपल्या कारने ऑफीसला जातात. त्यासाठी ड्रायव्हिंग लायसेन्स सोबत ठेवणे अनिवार्य असते. शनीशिंगणापूर सोडल्यास जगभर 'दार तिथे कुलुप' हे असते, त्यामुळे त्याच्या किल्लीचे आकार किंवा स्वरूप बदलले तरी तिची गरज पडतेच. आंगठ्यावरील रेषा वाचून किंवा "खुल जा सिमसिम" यासारखा सांकेतिक शब्द ऐकून उघडणारे दरवाजे अस्तित्वात आले असले तरी ते घरोघरी किंवा ऑफीसोऑफीसी अजून पोचायचे आहेत. रोख पैशातले व्यवहार जवळ जवळ संपुष्टात येऊन क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने सारे व्यवहार व्हायला लागले आहेत. रुमालाचा वापर कमी होऊन त्याच्या जागी वाइप्स आल्या आहेत. या गोष्टींची आद्याक्षरे घेऊन 'मोलाचा कावा' असा नवा मंत्र तयार करावा की Cellphone, Licence, I card, Credit card आणि Key यांची इंग्रजी मुळाक्षरे घेऊन त्याचे क्लिक (CLICK) बनवावे असा विचार मी सध्या करतो आहे.

5 comments:

HAREKRISHNAJI said...

सुरेख लिहिले आहेत.

mannab said...

As per my knowledge, Perucha Papa is created by Va.Pu. Kale, not Vi.Aa. Buwa. You may kindly correect it.
Mangesh Nabar

abhishekp said...

अप्रतिम...
पेरुचा पापाची परत आठवण करुन दिल्याबद्दल आणी मोलाचा कावाची ओळख करुन दिल्याबद्दल...

चांग भल,
अभिषेक

(तुम्ही Twitter वर आहात का? www.twitter.com/abhshk )

Anand Ghare said...

'पेरूचा पापा' चे जनक व.पु.काळे की वि.आ.बुवा हा गोंधळ माझ्या मनातही होता. कोणी व.पुं.चे नांव सांगतात तर कोणी बुवांचे. यामुळे मी माझ्या लेखाची सुरुवात थोडी बदलली आहे.
सर्व प्रतिसादांबद्दल मी आभारी आहे.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

’मोलाचा कावा’ छान आहे.