Friday, April 24, 2009

ग्रँड युरोप - भाग ७ : पिसा येथील कलता मनोरा


दि.१८-०४-२००७ तिसरा दिवस : पिसा येथील कलता मनोरा

दोन दिवस रोमचे रोमहर्षक दर्शन घेतल्यानंतर तिस-या दिवशी आमचे युरोपमधील खरे भ्रमण सुरू झाले. त्यासाठी सगळेच जण उत्साहाने लवकर उठून तयार झाले. पुढील चार दिवस रोज थोडा प्रवास व थोडे पहाणे होते. त्यातील तीन दिवस रोज प्रवास केल्यानंतर मुक्कामाला एका वेगळ्या हॉटेलात जायचे होते. त्यासाठी सगळ्या सामानाची उचलाउचली आणि हलवाहलवी टाळायची असेल तर चार दिवसापुरते कपडे व आवश्यक वस्तू एका लहान बॅगेत वेगळ्या ठेऊन इतर सामान, विशेषतः न लागणारे जाडजूड लोकरीचे कपडे वगैरे मोठ्या बॅगेत ठेवावेत आणि ती बॅग बसमध्येच राहू द्यावी अशी कल्पना निघाली. त्यानुसार सामानाची जमवाजमव करून ते बसच्या वेगवेगळ्या कप्प्यात ठेवण्यात आले.

रोम ते पिसा हा चांगला चार पांच तासांचा प्रवास होता. या वेळाचा उपयोग करून घेण्यासाठी कांही कार्यक्रम पाहिजे. सदस्यांच्या औपचारिक ओळखींच्या कार्यक्रमाने सुरुवात केली. तशा पहिल्या दोन दिवसात आमच्या सर्वांशी अनौपचारिक ओळखी झाल्याच होत्या, पण आता आसन क्रमांकाप्रमाणे एकेकाने समोर येऊन आपली थोडक्यात ओळख करून द्यायची, त्यात नांव, गांव, व्यवसाय, आवडी निवडी, गुणविशेष वगैरे सांगायचे होते. त्याप्रमाणे सर्वांनी आपापली माहिती सांगितली.

आमच्या बत्तीस जणांच्या समूहात तेरा पतिपत्नींची जोडपी होती. गंमत म्हणजे त्यातील एकानेही आपल्या मुलांना सोबत आणलेले नव्हते. कांही जणांची मुले मोठी होऊन त्यांनी आपापले संसार थाटलेले होते तर कांही जणांनी आपल्या शाळा कॉलेजात जाणा-या मुलांना घरी किंवा कोणा आप्तांकडे ठेवले होते. उरलेल्या सहा जणापैकी एक पितापुत्रांची जोडी होती व दोन वयस्कर मैत्रिणींची एक जोडी होती आणि फक्त दोन सद्गृहस्थ एकेकटे आलेले होते. केसरीने या सहलीपुरती त्या दोघांची एक जोडी बनवून दिली.

पुरुष वर्गातील पाच सहा लोक नोकरी करून सेवानिवृत्त झालेले होते व बाकीचे सर्वजण व्यावसाय़िक होते. त्यात कोणी चार्टर्ड अकौंटंट, कॉंट्रॅक्टर, लघु उद्योजक, व्यापारी वगैरे होते. एक डॉक्टर पतिपत्नी व एक दंतवैद्य होते. डॉक्टरीणबाई सोडल्यास महिलावर्गातील इतर बहुतेकजणी मुख्यतः गृहकाम करणा-या होत्या, पण त्यातल्या बरेच जणी पतीच्या व्यवसायात त्याला हातभारसुद्धा लावीत होत्या तर कोणी संगीत, कला वगैरेची साधना करणे व शिकवणे यांत मग्न होत्या. अद्वैत हा एकटाच अजून विद्यार्थीदशेत होता आणि ठराविक चाकोरीबद्ध नोकरी करणारे असे बहुधा कोणी नव्हतेच. अर्थातच याला प्रातिनिधिक समूह म्हणता येणार नाही कारण त्याच सहलीमध्ये सगळीकडे आमच्या बरोबरच येत असलेल्या केसरीच्या दुस-या ग्रुपमध्ये कांही निराळ्या प्रकारचे लोक व अगदी कडेवरच्या बाळापासून ते शालेय शिक्षण घेणारी वेगवेगळ्या वयातली मुले होती. आमच्या ग्रुपमधील लोकांच्या वैशिष्ट्यांबद्दलची माहिती हळूहळू पुढे येईल.

दुपार होईपर्यंत आमची बस पिसाला पोचली. पिसा या आधुनिक काळातील शहरापासून थोडेसे दूर प्राचीन काळातील 'स्क्वेअर ऑफ मिरॅकल' आहे. या ठिकाणी बॅप्टिस्ट्री, कॅथेड्रल व लीनिंग टॉवर या तीन प्रमुख इमारती आहेत. बॅप्टिस्ट्रीमध्ये ख्रिस्ती धर्माची संथा दिली जाते, कॅथेड्रलमध्ये नेहमीच्या प्रार्थनाविधी होतात आणि टॉवर हा मुख्यतः घंटाघर म्हणून बांधला गेला. सर्वसामान्यपणे चर्चमध्येच उंचावर किंवा शिखरावर घंटा बांधलेली असते, पण आपल्या समृध्दीचे प्रदर्शन करण्यासाठी म्हणा किंवा दूरवरचे निरीक्षण करता यावे यासाठी स्वतंत्र घंटामीनार (बेलटॉवर) बनवायचे पिसावासियांनी ठरवले व इसवीसन ११७३ साली या बांधकामाला सुरुवात झाली. लढाया व अशांत परिस्थिती यामुळे सुरुवातीपासूनच हे काम रेंगाळत चालत होते. सुमारे दहा वर्षांमध्ये पहिले तीन मजले बांधून झाले. पण एका बाजूचा पाया कच्चा राहिल्यामुळे ते त्या बाजूस खचत चालले असल्याचे त्या वेळेसच लक्षात आले व काम थांबवण्यात आले. ते कधी कोसळेल याचा नेम नाही असे वाटत असल्यामुळे जवळ जवळ शंभर वर्षे तसेच पडून राहिले होते. तिसरा मजलासुद्धा तोंवर पूर्ण बांधला गेला नव्हता.

इसवी सन १२७५ साली एका नव्या वास्तुशिल्पशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली बांधकामाला पुनश्च सुरुवात झाली. खचलेला पाया दुरुस्त करणे त्याला शक्य नव्हते, पण गेल्या शंभर वर्षात तो फारसा अधिकाधिक खचत गेला नव्हता की ती इमारत कोसळली नव्हती हे महत्वाचे होते. या आधारावर पुढील बांधकाम हातात घेण्यात आले. तिरप्या झालेल्या इमारतीच्या मजल्यावरील जमीन शक्य तेवढी समतल रहावी या दृष्टीने नवीन मजले बांधतांना मुद्दामच प्रत्येक मजल्याची एक बाजू दुसरीपेक्षा थोडी अधिक उंचीची बांधण्यात आली. यामुळे हा टॉवर नुसता कललेलाच नव्हे तर थोडासा वक्राकारसुद्धा झाला आहे. सहावा मजला बांधल्यावर हे काम पुन्हा बंद पडले. त्यामुळे सातवा मजला सन १३१९ मध्ये पुरा झाला आणि त्याच्या मस्तकावरील घंटागृह तर सन १३५० मध्ये. अशा रीतीने या इमारतीचे बांधकाम तब्बल पावणे दोनशेहे वर्षे चालले होते. त्यानंतरही वेळोवेळी त्यावर किंवा त्याच्या पायाखाली कधी शिसे तर कधी कॉंक्रीट लादून त्याचा कलणारा तोल सांवरण्याचे प्रयत्न होतच राहिले.

अलीकडच्या काळात पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षिततेचा पूर्ण अभ्यास करून कांही भूमीगत सुधारणा तसेच त्याची संपूर्ण साफसफाई व डागडुजी करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाने कदाचित त्याला सरळसुद्धा करता येईल, पण मग तो पहायला कोण येणार व त्या निमित्ताने येणा-या पर्यटकांवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेचे काय होईल? सुमारे छप्पन मीटर उंचीच्या या मनो-याचा बाहेरील व्यास तळापाशी साडेपंधरा मीटर एवढा आहे तसेच भिंतीची जाडी सुमारे अडीच मीटर इतकी आहे. जसजसे आपण वर जाऊ तसतसा त्याचा व्यास तसेच भिंतीची जाडी कमी होत जाते. सध्या तो सरळ उभ्या रेषेशी साडेपांच अंशाचा कोन करून उभा आहे व त्याचे शिखर पायापासून साडेचार मीटर एका बाजूला ढळलेले आहे. पण हा आंकडा गेल्या आठशेहे वर्षात वेळोवेळी मोजला गेला व वेगवेगळा मिळाला. वरपर्यंत चढण्यासाठी आंतून जिना आहे, त्याला २९४ पाय-या आहेत. इतक्या पाय-या चढण्या व उतरण्याइतका वेळ आमच्याकडे नव्हता.

या टॉवरवरून लहान व मोठ्या आकाराचे गोळे खाली टाकून ते एकाच वेगाने जमीनीवर पोचतात असे गॅलीलिओने दाखवून दिले होते असे म्हणतात, पण या गोष्टीला कांही पुरावा नाही असेही मत मांडले जाते. कांही असले तरी गॅलीलिओच्या या निरीक्षणाचा चांगला उपयोग त्याच्या नंतर आलेल्या आयझॅक न्यूटनने करून घेतला व त्याचे पर्यवसान अखेरीस गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतात होऊन विज्ञानाच्या अभ्यासालाच त्यातून एक नवीन दिशा मिळाली एवढे खरे.

या कलत्या टॉवरच्या शेजारी असलेल्या दोन्ही इमारतीसुद्धा तत्कालिन वास्तुशिल्पकलेचे उत्तम नमूने म्हणून पाहण्याजोग्या आहेत आणि हा प्रशस्त असा परिसरच पर्यटकांचे नंदनवन म्हणता येईल इतका विकसित केला गेलेला आहे. जगभरातील सर्व खंडातले वेगवेगळ्या वंशाचे, रंगाचे आणि भाषा बोलणारे पर्यटक इथे हिंडतांना दिसत होते.
पिसाच्या मनो-याला इतकी प्रसिद्धी मिळाली की वेळोवेळी त्याचा उल्लेख वाङ्मयामध्येही होत गेला तसेच त्याच्यावर आधारलेले विनोद रचले गेले. असाच एक नमूना इथे देत आहे.
प्रश्न: बिग बेन पिसाच्या मनो-याला काय म्हणाला असेल?

उत्तर: तुझा कल असेल तर माझ्याकडे वेळ आहे.(If you have the inclination, I have got Time.)

No comments: