Sunday, March 02, 2008

दक्षिण ध्रुवावर उडी


पुण्याच्या शीतल महाजन या साहसी युवतीने १७ डिसेंबर २००६ रोजी १२००० फूट उंचीवरून आधी फ्री फॉल व त्यानंतर पॅराशूटचे सहाय्य या पद्धतीने दक्षिण ध्रुवावर उडी मारून एक गौरवास्पद जागतिक विक्रम केला. अशा प्रकारची उडी मारणारी ती जगातील पहिली महिला ठरली. या पूर्वीही १८ एप्रिल २००४ रोजी तिने हॅलिकॉप्टरमधून उत्तर ध्रुवावर उडी मारली होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुलीने त्याआधी साधा विमानप्रवास केला नव्हता की आपल्या देशातलाच हिमालयातील बर्फाच्छादित प्रदेशसुद्धा पाहिला नव्हता. अशा तरुण वयात तिने थेट आभाळातून ध्रुवप्रदेशावर उडी मारण्याचे स्वप्न पाहिले आणि भगीरथ प्रयत्न करून ते यशस्वी रीत्या तडीस नेले, हे कर्तृत्व असामान्यच नव्हे तर अकल्पनीय आहे असे म्हणावे लागेल. अशा प्रकारचे धाडसी काम करण्यासाठी फारसे प्रशिक्षणसुद्धा तिला मिळाले नाही. पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश संपादन केले. हॅट्स ऑफ टु हर.
त्या वेळी मी पुण्याला होतो. तेथील मराठी वर्तमानपत्रात ही बातमी ठळक अक्षरात छापून आली. ती वाचून सर्व वाचकांची छाती किती अभिमानाने फुलून आली हे सांगायला नको. महाराष्ट्रातील तसेच देशभरातील वर्तमानपत्रात ती कुठल्या ना कुठल्या पानांवर आली असेल. (या ठिकाणी दिलेली छायाचित्रे लोकसत्ता व डेली टेलिग्राफवरून घेतली आहेत. त्यांचे मनःपूर्वक आभार) ती वाचून इतर भारतीयांनाही आनंद झाला असेल, तिचे कौतुक वाटले असेल यात शंका नाही. पण किती लोकांपर्यंत ती पोचली असेल ते मात्र सांगता येत नाही. तिने उत्तर ध्रुवावर गाजवलेल्या पराक्रमाचा मला त्या वेळी पत्ताच लागला नव्हता. आता सुद्धा भारताबाहेरील प्रसार माध्यमांनी या बातमीला किती महत्व दिले असेल?, किती अमेरिकन वा रशियन नागरिकांनी ती वाचली असेल? त्यामुळे भारताबद्दल त्यांच्या मनात किती आदरभाव निर्माण झाला असेल? त्यामुळे सर्व जगात भारताची शान वाढली, मान उंचावली वगैरे आपण म्हणतो ते कितपत योग्य असते?
ब्रिटीश साहसवीर रॉबर्ट स्कॉट याच्या दक्षिण ध्रुवावर (त्या काळात अर्थातच पायी) जाण्याच्या मोहिमेबद्दलचे एक पुस्तक लहानपणी मी वाचले होते, त्याची आठवण झाली. या मोहिमेवर असतांना त्याने लिहिलेल्या डायरीवरून त्याला किती प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले, त्यात त्याचे किती वाईट हाल झाले, शेवटी तिथेच त्याचा मृत्यू झाला वगैरे वर्णने वाचून अंगावर शहारे आले होते. अतिशय बिकट प्रसंगांना सामोरे जात अत्यंत दुर्दम्य जिद्दीने मार्गक्रमण करून तो दक्षिण ध्रुवावर पोचला तेंव्हा त्याअगोदरच अमुंडसन याने तिथे फडकवलेला नॉर्वे देशाचा राष्ट्रध्वज पाहून स्कॉटच्या हृदयाचे कसे पाणी पाणी झाले त्याचे वर्णन वाचून तेंव्हा माझ्या डोळ्यातून पाणी आले होते. पण आता असे वाटते की अमुंडसनसुद्धा त्याच दिव्यामधून गेला होता. शिवाय स्कॉटला शर्यतीत हरवून त्याने त्याच्यापेक्षा मोठा पराक्रम केला होता. पण एका वाक्यात आलेला ओझरता उल्लेख सोडला तर आपल्याला त्याच्याबद्दल कांहीच माहिती नसावी? स्कॉटने सोसलेल्या हालअपेष्टा वाचून गलबलायला झाले. अमुंडसन जीवंत परत आला हे महत्वाचे आहे पण त्याने केलेल्या कष्टांबद्दल आपल्याला कांहीच कसे वाटले नाही?
यावेळीसुद्धा कांहीसा तसाच प्रकार झालेला दिसतो. शीतल महाजन आपल्या कर्तृत्वाने एकदम कीर्तीच्या उंच शिखरावर पोचली ते योग्यच आहे. त्याबद्दल यत्किंचित शंका नसावी. पण पहायला गेले तर तिथे ती एकटी नव्हती. ले.क.राजेश व ले.क.बिराजदार या भारतीय नौदलाच्या अधिका-यांनी तिच्यासोबत उडी मारून शिवाय दोन्ही बाजूने तिला धरून हवेमध्येच दक्षिण ध्रुवावरील योग्य त्या जागी बरोबर नेण्याचे काम केले. तिच्या सुरक्षिततेची काळजी घेतली. छायाचित्रकार मुस्तफा यांनीही उडी घेऊन खाली उतरतांनाची छायाचित्रे काढली. शून्याखाली अडतीस अंश तपमानात १२००० फुटावरून खाली बर्फाच्छादित प्रदेशात उतरण्याचा भीमपराक्रम या तीघांनीही केलाच, त्याशिवाय नेमून दिलेली इतर कामगिरीही केली. त्याबद्दल त्यांना पगार, टी.ए.डी.ए. वगैरे मिळाला असणार, खर्चाच्या काळजीचा डोंगर त्यांच्या डोक्यावर नव्हता वगैरेचा विचार करून सुद्धा त्यांनी केलेल्या शारीरिक कष्टांचे, मानसिक ताणाचे, दाखवलेल्या धैर्याचे व पत्करलेल्या धोक्याचे मूल्य कमी होत नाही. पण त्यांचा मात्र एखाद्या वाक्यात ओझरता उल्लेख आला न आला तेवढाच. आपण याबद्दल काय करणार म्हणा? "तेथेही कर माझे जुळती" म्हणून घ्यावे इतकेच.
------------------------------------------------------------------------------
ही गोष्ट वर्षभर जुनी आहे. तेंव्हा जमले नव्हते म्हणून आता या ब्लॉगवर टाकली आहे.

No comments: