मी २००८साली पहिल्यांदा अमेरिकेला म्हणजे यूएसएला गेलो होतो तेंव्हा नेवार्क इथल्या लिबर्टी इंटरनॅशनल विमानतळावर विमानातून उतरलो होतो. पण ते विमानतळ न्यूजर्सीमध्ये होते हे मला तेंव्हा माहीत नव्हते. किंबहुना न्यूजर्सी कशाला म्हणतात तेही मला ठाऊक नव्हते. त्या वेळी आम्ही नेवार्कला विमान बदलून मुलाकडे अॅटलांटाला गेलो होतो. नंतर न्यूयॉर्कदर्शनासाठी पुन्हा नेवार्कला आलो तेंव्हा पारसीपेनीला रहात असलेल्या आमच्या नातेवाइकाने आम्हाला कारने तिथून त्याच्या घरी नेले. न्यूजर्सी या नावाचे शहर नसून ते एक संस्थान किंवा राज्य(स्टेट)आहे आणि नेवार्क, पारसीपेनी यांच्यासारखी खूप गावे त्या संस्थानात आहेत एवढी माहिती त्याच्याशी बोलतांना समजली. पारसीपेनी हे टुमदार गाव न्यूयॉर्क किंवा अॅटलांटासारख्या महानगरांपेक्षा खूपच वेगळे दिसले आणि मला आवडले होते. न्यूजर्सीमधल्या दुसऱ्या कुठल्या भागात जाणे आमच्या त्या वेळच्या प्लॅनमध्ये नव्हते. मी न्यू जर्सीच्या म्हणजे मुख्यतः पारसीपेनीच्या भेटीवर तेंव्हा लिहिलेला लेख या पानावर आहे. https://anandghan.blogspot.com/2009/06/blog-post_20.html
मी पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१९मध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेत गेलो होतो तेंव्हा कॅलिफोर्नियामधल्या टॉरेन्स नावाच्या शहरात माझ्या मुलाकडे रहात होतो, हे नाव भारतात कुणाच्या ओळखीचे नव्हते म्हणून मी एले किंवा लॉस एंजेलिसला राहतो असे बाहेरच्या सगळ्यांना सांगत होतो. ते मोठे शहर टॉरेन्सहून जवळ होते आणि आम्ही बऱ्याच वेळा तिथे जाऊन येत होतो. त्यामुळे तसे सांगणे मला फारसे चुकीचे वाटत नव्हते.
त्यानंतर २०२३मध्ये मी तिसऱ्यांदा अमेरिकेला गेलो तेंव्हा चार महिने न्यूजर्सीमध्येच मुक्काम ठोकून राहिलो होतो. या वेळी मी न्यूजर्सीमध्ये जिथे रहात होतो, त्या इथल्या गावाचे नाव साउथ प्लेन फील्ड असे होते. हे गाव न्यूजर्सीमधल्या मिड्लसेक्स काउंटीमध्ये आहे. त्याला इकडे 'बरो' असे म्हणतात. हा खेडे आणि शहर यांच्या मधला प्रकार असावा. हे नाव तर अमेरिकेतल्या लोकांनासुद्धा अनोळखी वाटायचे. या गावाला लागूनच एडिसन नावाचे लहानसे शहर आहे ते न्यूजर्सीमधल्या लोकांना माहीत होते, पण भारतातून निघायच्या आधी हे नावसुद्धा मी कधी ऐकलेले नव्हते. जवळचे खरे मोठे शहर म्हणजे न्यूयॉर्कच, पण ते आमच्या घरापासून खूपच दूर होते आणि आमचे तिथे नेहमी जाणे येणे होत नसे. माझ्या चार महिन्याच्या राहण्यात फक्त एकदा आम्ही सगळे न्यूयॉर्क सिटीमध्ये जाऊन आलो. गंमत म्हणजे मी न्यूजर्सीला जाणार आहे एवढेच सांगणे भारतातल्या लोकांसाठी मात्र पुरेसे होते. खूप भारतीय लोक तिकडे जाऊन रहात असल्यामुळे न्यूजर्सी नावाचेच एक गाव असावे असेही तिथे कधी न गेलेल्या लोकांना वाटत असावे.
न्यूयॉर्क शहर आणि आमचे साउथप्लेन फील्ड यातसुद्धा काहीच साम्य नाही. अगदी माझ्या लहानपणापासून मी असे ऐकत आलो होतो की न्यूयॉर्कमध्ये सगळ्या अवाढव्य गगनचुंबी इमारती आहेत. तिथली एंपायर स्टेट बिल्डिंग अनेक वर्षे जगातली सर्वात उंच इमारत म्हणून प्रसिद्ध होती. आता इतर काही शहरांमध्ये तिच्याहून उंच इमारती बांधल्या गेल्या आहेत आणि आणखी काही बांधल्या जात आहेत. आम्ही न्यूयॉर्कच्या ज्या भागात फिरून आलो तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रचंड उंच इमारतींचे भव्य ठोकळे आणि रस्त्यांमध्ये वाहनांची तुफान गर्दी असे त्या महानगराचे टिपिकल दृष्य होते.
पण आम्ही न्यूजर्सीच्या ज्या भागात रहात होतो, तिथे फक्त अनेक लहान लहान दुमजली इमारती होत्या आणि त्यांच्या आजूबाजूला भरपूर मोकळी जागा आणि झाडी होती. त्या झाडांमागे या इमारती दडून जात होत्या. तिथे शांतता तर इतकी होती की नेहमीच चिमण्यांची चिवचिव सहज कानावर पडत असे. तिथल्या मुख्य रस्त्यांवरून बरीच वाहने फिरत होती, पण गावामध्ये आम्हाला क्वचितच कुठे ट्रॅफिक जॅम पहायला मिळाला. गावाबाहेर गेल्यावर तिथल्या अगदी ग्रामीण भागातल्यासुद्धा सगळ्या मुख्य रस्त्यांवर जिकडे तिकडे उड्डाणपूल बांधलेले असल्यामुळे मैलोंगणती प्रवासात सहसा कुठे ट्रॅफिक सिग्नल लागत नसे. तरीही तिथल्या हमरस्त्यांवरच अधून मधून ट्रॅफिक जॅम लागत असे आणि जीपीएस तुलनेने कमी गर्दी असलेले पर्यायी मार्ग दाखवत असे. अशा रस्त्यांवरून जातांना केवळ जीपीएसच्या सहाय्याने किंवा त्याच्या भरोशावरच आपल्या गंतव्य ठिकाणी जाऊन पोचणे शक्य असे. छापील नकाशा पाहून रस्त्यावरून जातांना चौकाचौकात थांबून चौकशी करून योग्य त्या दिशेला जाणे ही गोष्ट आता अमेरिकेत तरी इतिहासजमा झाली आहे.
तिथे ओक ट्री अॅव्हेन्यू आणि साउथ प्लेनफील्ड अॅव्हेन्यू नावांचे दोन मुख्य रस्ते आहेत. ओक ट्री अॅव्हेन्यू हा साउथ प्लेनफील्डमधला मुख्य मोठा रस्ता आमच्या घरातून पाहिल्यास मागच्या बाजूला थोड्याच अंतरावर दिसतो, पण घराच्या पुढच्या बाजूला असलेल्या दाराने घराबाहेर पडून तिथे जाऊन पोचायला थोडा वेळ लागतो. ओक ट्री अॅव्हेन्यूला डॉर्सेट ड्राइव्ह नावाचा एक फाटा फुटतो. त्याच्या सुरुवातीलाच "नो एक्झिट" असे ठळक अक्षरात लिहिलेला मोठा फलक आहे. याचा अर्थ तुम्ही आपली मोटार या रस्त्यावरून आत नेली तर तुम्हाला पुन्हा तिथूनच बाहेर पडायला पाहिजे. आतल्या भागाला बाहेरच्या जगाशी जोडणारा दुसरा रस्ताच नाही. त्या आतल्या भागाला कुठले वेगळे नावही नाही. त्यात काही लहान लहान रस्ते आहेत आणि त्यांच्या बाजूला बंगले आहेत. त्यातल्या एका बंगल्यात माझे वास्तव्य होते. तिथेच एक कॉटन स्ट्रीट पार्क आहे, तिथे जाणारी एक लहानशी कॉटन स्ट्रीट आहे, पण पार्क म्हणून तिथे मोठ्या लोकांना बसायला बाकडीही नाहीत की लहान मुलांना खेळायचीही काही सोय नाही, फक्त शंभर दीडशे उंच उंच झाडांचे एक दाट रान आहे.
मी दोन तीनदा चालत चालत तिथे फिरायला गेलो तेंव्हा मला दुसरा कोणी माणूस तिथे आलेला दिसला नाही. त्यामुळे मी रोज संध्याकाळी आमच्या वसाहतीतल्या आयताकृति चौकोनातच तीन चार चकरा मारून येत होतो. इथे मात्र सगळ्याच बंगलेवाल्यांनी आपापल्या अंगणांमध्ये एकाहून एक सुंदर फुलांची झाडे लावली आहेत आणि मी समर सीझनमध्ये गेलो होतो त्या काळात सगळी झाडे छान फुललेली होती. संध्याकाळच्या वेळी काही लोक अंगणात लॉन मोविंग करतांना दिसत, काही लोक किंवा महिला कुत्र्यांना घेऊन फिरायला पडलेल्या दिसत आणि काही लहान मुले रस्त्यांच्या कडेला खेळतांना दिसत. अशा प्रकारे रोज निदान दहापंधरा लोकांशी "हॅलो हाय" होत असे. अमेरिकेतले लोक जास्त संबंध ठेवत नसले तरी अनोळखी माणूस समोर आला तरी नजरानजर होताच स्मितहास्य करतात. ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे दोघांनाही बरे वाटते.
ओक ट्री अॅव्हेन्यू या मुख्य रस्त्याने पूर्वेकडे गेल्यावर एक चौक लागतो त्या चौकापासून पुढे याच रस्त्याचे नाव ओक ट्री रोड असे ठेवले आहे. तसेच पुढे गेल्यावर एक अगदी लहानसा पूल लागतो आणि त्याच्या पलीकडे एडीसन शहर सुरू होते. ओक ट्री रोड त्या शहराच्या आरपार जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वस्ती तशी थोडी विरळच आहे, पण ती पूर्णपणे एकमेकींमध्ये मिसळून गेली असल्यामुळे आपण एका गावातून निघून दुसऱ्या गावात शिरत आहोत असे मात्र जाणवत नाही.
ओक ट्री रोडवरून पुलाच्या पलीकडे मैल दीड मैल पुढे गेल्यावर तिथला मुख्य बाजार आहे त्यातली अनेक दुकाने आणि हॉटेलेसुद्धा भारतीय लोकांनी चालवलेली आहेत. पटेल ब्रदर्स नावाच्या किराणा मालाच्या दुकानाच्याच दोन मोठ्या शाखा आहेत, त्याशिवाय इंडियन ग्रोसरी नावाचे वेगळे मोठे दुकान आहे. भारतीय म्हणजे मराठी, गुजराथी, कानडी, तेलुगू वगैरे सगळ्या लोकांच्या स्वयंपाकघरात ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या इथे सहज मिळतात. कधीकधी सकाळचा नाश्ता करण्यासाठीसुद्धा आम्ही सरावणा भवन, अम्माज किचन किंवा सुखाडिया स्वीट्स सारख्या ठिकाणी जाऊन इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा, फाफडा, जलेबी वगैरे खाऊन येत होतो. एडिसनमधल्या पटेल स्टोअर्समध्ये ढोकळा, समोसा, कचोरी, खाखरा, भाकरी वगैरेंचा ताजा मालही मिळत असे. आम्ही अनेक वेळा तो आणून मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खात होतो. या सगळ्या गोष्टी घरी तयार करण्याची सोयही होतीच. त्यासाठी आवश्यक ती मिश्रणे, पिठे, बॅटर वगैरेही बाजारात सहज मिळत होती. त्यामुळे माझ्या इथल्या वास्तव्यात माझे सगळे खाणेपिणे अगदी भारतातल्यासारखेच होत होते.
मी तिकडे गेल्यावर पहिल्याच रविवारी सकाळी माझा मुलगा मला नाश्ता करण्यासाठी जवळच्या एडिसन शहरात घेऊन गेला. तिथे सरावणाभवन नावाचे दक्षिण भारतीय हॉटेल होते. ते बहुधा उडप्यांचे नसावे. आत गेल्यावर पाहिले की ते बऱ्यापैकी भरले होते. बहुतेक सगळ्या टेबलांवर कोणी कोणी बसले होते ते एकूण एक सगळे लोक भारतीय दिसत होतेच, त्यातही दक्षिण भारतीय जास्त होते. एक दोन तर चक्क लुंगी गुंडाळून आले होते. कानावर तामीळ तेलुगू शब्द पडत होते, तसे आमच्यासारखे मराठमोळेही होते. इडली, वडा, दोसा, उत्तप्पा वगैरे ओळखीच्या पदार्थांच्या निरनिराळ्या व्हरायटीज होत्या त्यांची चव आपल्या इकडल्यासारखीच होती. जोडीला चविष्ट सांभार आणि चटणी होतीच. तीसुद्धा मला मानवण्याइतपतच तिखट होती. इतर कुणाला सपकच वाटत असेल. तिथे बसलो असतांना आपण सातासमुद्रापलीकडल्या अमेरिकेत आलो आहोत असे अजीबात वाटत नव्हते. दोन तीन आठवड्यांनंतर आम्ही तिथल्या जवळच्या अम्मा किचनमध्ये नाश्ता करायला गेलो. तिथल्या एका भिंतीवर जयललिताचा खूप मोठा पोस्टर लावला होता. त्यावरून ही कोणती अम्मा आहे हे लक्षात आले. त्या हॉटेलात फक्त पाच डॉलरमध्ये एक काँबो मेन्यू होता तोसुद्धा मला पुरेसा वाटला.
दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा नाश्त्यासाठी बाहेर पडल्यावर मी म्हंटले या वेळी वेगळे काही तरी खाऊ. मग त्याच भागातल्या सुखाडिया स्वीट्समध्ये शिरलो. हे मुख्यतः मिठाईचे दुकान आहे. पुण्यातल्या काका हलवाई किंवा चितळे बंधू यांच्याकडे जितक्या मिठाया मिळतात तशीच विविधता तिथेही होतीच. त्या मिठाया घेऊन जाण्यासाठी बरीच गिऱ्हाइके येत होती आणि आपापल्या आवडीची पॅकेट्स घेऊन जात होती. पण एका बाजूला आठदहा टेबले लावून तिथे बसून खायची व्यवस्थाही होती. त्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी इथे मात्र फारसे कोणी आले नव्हते. तिथे संध्याकाळी भेळ, पाणीपुरी खाणाऱ्यांची गर्दी होते आणि त्यांच्यासाठी बाहेर अंगणात खुर्च्या मांडाव्या लागतात असे ऐकले. आम्ही गुजराथी स्टाइलमध्ये 'फाफडा अने जलेबी' घेतली. ती बरी होती, पण आमच्या वाशीच्या फरसाणवाल्याच्या ताज्या गरमागरम वस्तू जास्त मजेदार असायच्या.
पुणेमुंबई महामार्गावर टोलनाक्यांजवळ फूडमॉल आहेत आणि तिथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. बहुतेक प्रवासी तिथे दहापंधरा मिनिटे थांबून आपापल्या रुचीप्रमाणे थोडी खाद्यंति करतातच. अमेरिकेतल्या महामार्गांवर थोड्या थोड्या अंतराने असे विसावे असतात आणि तिथे केएफसी, सबवे, मॅकडोनाल्ड, बर्गरकिंग, डंकिन डोनट्स वगैरे फास्टफूडचे स्टॉल्स असतात. पण या कंपन्यांना भारतात जितकी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे तशी अमेरिकेत नाही. ते दरिद्री लोकांचे 'जंकफूड' असते असे म्हणून तिथले काही शिष्ट लोक नाके मुरडतात. मी मात्र त्यांच्यावर तसा अन्याय केला नाही. जिथे जे मिळाले ते चाखून पाहिले.
आम्ही थॉमस एडिसनच्या प्रयोगशाळेला भेट देऊन परत येतांना आम्हाला तसा थोडा उशीरच झाला होता. आजूबाजूच्या भागात कोणकोणती भोजनालये आहेत याची गूगलवर चौकशी केली. काही अंतरावर एक थाइ रेस्तराँ दिसत होते, पण ते त्या वेळी लंचब्रेकसाठी बंद होते. इकडेतिकडे शोध घेता एक पंजाबी ढाबा दिसला पण तो प्रत्यक्ष बघून कुणालाही आवडला नाही. पुन्हा थाइ रेस्तराँला फोन लावला तर त्याने आम्हाला यायला हरकत नाही असे सांगितले. मग नकाशावर ते शोधून काढले आणी तिथे शिरलो. ती धड दुपारच्या जेवणाची वेळ नव्हती आणि रात्र पडायला तर खूपच वेळ होता. तरीही तिथे बऱ्यापैकी जेवण मिळाले.
माझी भारतात परत यायची वेळ झाली असतांनाच आम्हाला समजले की न्यूजर्सीमध्येच एक अतिभव्य असे अक्षरधाम मंदिर बांधले गेले आहे. म्हणून आम्ही ते पहायला गेलो. यापूर्वीचा आमचा असा अनुभव होता की या स्वामीनारायण मंदिरांमध्ये उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था असते. तशी तिथेही असणार अशी आमची अपेक्षा होती. पण आम्हाला त्या देवळाच्या आवारातही प्रवेशच मिळाला नाही. शिखर दर्शन घेऊन परत फिरावे लागले. मग वाटेत एक बावर्ची बिर्याणी पॉइंट मिळाले.
मी न्यू जर्सीमध्ये गेलो असतांना एकदा आम्ही तिथल्या एका ठिकाणी रात्रीच्या जेवणासाठी गेलो होतो. त्या जागेचे नाव होते रेनफॉरेस्ट कॅफे. वेलींच्या कमानीमधून आत शिरतांनाच एका अजस्र अजगराचा फणा फुस्सकन अंगावर आला. दचकून पाहिले तर तो एका झाडाच्या फांदीवरून खाली लटकत होता. तो खरा नव्हता पण हुबेहूब जीवंत वाटत होता. त्या हॉटेलाच्या मोकळ्या जागेत दाटीवाटीने खूप झाडे लावलेली होती, त्या झाडांना अनेक वेलींनी विळखे घातलेले होते, त्या झाडांमधली कुठली खरी होती आणि कुठली कृत्रिम होती तेही समजत नव्हते, पण एकंदरीत तिथे घनदाट अरण्याचा आभास निर्माण केला होता. मुख्य म्हणजे त्या झाडांच्या फांद्याफांद्यांवर असंख्य लहानमोठे वन्य पशु आणि रंगीबेरंगी पक्षी बसलेले होते किंवा काही झुडुपांच्या आडून डोकावत होते. सगळीकडे मंद धूसर प्रकाश होता आणि त्या जंगलातच चाळीस पन्नास टेबले विखरून ठेवली होती. त्यातली बहुतेक टेबले भरलेली होती म्हणजे तितकी माणसेही होती पण त्यांची गर्दी जाणवत नव्हती. त्या वातावरणाला पोषक असे गूढरम्य पाश्चात्य संगीताचे स्वर घुमत होते. आम्हाला जे टेबल मिळाले होते त्याच्या जवळच एक कृत्रिम धबधबा होता आणि त्याच्या पार्श्वभूमीवर एका दांडगोबाचा पुतळा होता. अँबियन्स इतका छान होता आणि खाद्यपदार्थही त्याला साजेसे होते. एकंदरीत एक लक्षात राहण्यासारखा अनुभव घेऊन आम्ही खुषीत परत आलो.
पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहेच आणि म्हणून आपण दिवसभर पाणी पीत असतो. आपल्या डोळ्यांनासुद्धा जलाशय नुसते पहायलाही आवडतात. समुद्र किंवा मोठ्या नद्यांच्या किनारी असलेल्या गावांमधले लोक वेळ मिळाला की किनाऱ्यावर जाऊन मंद वाऱ्याची मजा घेत इकडे तिकडे फिरतात किंवा पाण्याच्या लाटा पहात आणि त्यांचे संगीत ऐकत एकाद्या ठिकाणी बसून राहतात. भोपाळ, हैदराबाद आणि बंगलोर या शहरांमध्ये मोठ्या नद्या नसल्या तरी सुंदर विस्तीर्ण तलाव आहेत. पर्यटक ते पहायला जातात. कोल्हापूरचे रंकाळा, सोलापूरचा सिद्धेश्वर तलाव आणि पुण्याच्या खडकवासला धरणाच्या काठावरसुद्धा संध्याकाळी चांगलीच गर्दी असते, कारण लोकांना पाण्याचे असे सान्निध्य आवडते.
मी न्यूजर्सीमधल्या साउथ प्लेनफील्ड नावाच्या लहानशा गावात रहात होतो. अशा लहानशा गावाला लागून एक स्प्रिंग लेक पार्क आहे. त्यात एक बऱ्यापैकी मोठे तळे आहे. त्या तळ्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी कडेकडेने रस्ता बांधला आहे. तळ्याच्या एका भागात पाण्यातच सुंदर कारंजी बांधली आहेत बसून आराम करायला एक छान चबूतरा आहे, तिथे बसायला बाकडी ठेवली आहेत. आजकाल अमेरिकेतले लोक रस्त्यांवरून पायी चालतांना सहसा दिसत नाहीत, पण ते मोटारीत बसून या पार्कमध्ये येतात आणि तिथे तलावाभोवती पायी चालतात किंवा जॉगिंग करतात. इथे लहान खेडेगावातसुद्धा आपल्याला रस्त्याच्या कडेला हवी तिथे गाडी उभी करून ठेवता येत नाही. त्यामुळे आम्ही आधी गाडी पार्क करण्यासाठी योग्य अशी जागा शोधली आणि तिथून पार्कमध्ये तळ्याकाठी चालत जाऊन त्याला प्रदक्षिणा घातली.
आपण निसर्ग म्हणजे झाडे,झुडुपे,गवत,पाने,फुले वगैरे एवढेच समजतो. खेड्यांमध्ये रहाणाऱ्यांच्या आजूबाजूला सगळीकडे असा निसर्ग पसरलेलाच असतो. तो पावसाळ्यात हिरवा गार दिसतो, उन्हाळ्यात कोमेजून जातो, पावसाचे थेंब पडले की पुन्हा टवटवीत होतो, निरनिराळ्या फुलांच्या मोसमांमध्ये फुलांनी बहरून जातो, असे पानाफुलांमधून आपले अनेक रंग दाखवत असतो. शहरात जाऊन निर्जीव दगडाविटांच्या घरांमध्ये रहायला लागलेल्या लोकांना निसर्गापासून दूर वाटायला लागले तेंव्हा त्यांनी बागा, उद्याने वगैरे करून दोन घटका निसर्गाजवळ रहाण्याची सोय करून घेतली. मग त्यातच लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, घसरगुंड्या वगैरेंनी युक्त असे पार्क झाले. प्रेमी युगुलांची आडोशाला भेटायची सोय झाली, तसेच वयस्क लोकांना सावकाशपणे पायी फिरण्यासाठी सोयिस्कर वाटा, बसून विश्रांती घेण्यासाठी बाकडी वगैरेंनी सुसज्ज असे नानानानी पार्कही झाले.
अमेरिकेत आमच्या घरापासून मैलभर अंतरावर खास कुत्र्यांसाठी तयार केलेले एक डॉगपार्क आहे. या भागातले श्वानप्रेमी लोक आपापल्या पाळीव कुत्र्यांना घेऊन इथे येतात. २५ पाउंडपेक्षा कमी वजन असलेल्या आणि २५ पाउंडांहून जास्त वजन असलेल्या कुत्र्यांसाठी असे त्यात दोन वेगवेगळे भाग केलेले आहेत, पण ते मार्गदर्शनासाठी. इथे कुणीच प्रत्यक्ष वजन मोजून ते ठरवणारा सेवक असत नाही. कुत्र्याच्या मालकाने (किंवा मालकिणीने) आपल्या कुत्र्याच्या हितासाठी त्याला योग्य त्या विभागात न्यावे. तिथे ते कुत्रे इतर मित्रांबरोबर मनसोक्त बागडतात. इथे कुंपणाच्या आत कुत्र्यांना मोकळे सोडले असले तरी त्याच्या मालकाने हजर राहून त्याच्यावर नजर ठेवणे आवश्यक असते. इथे यायला कुत्र्यांना तर खूपच मजा वाटते, पण मालकमालकिणींच्याही ओळखी वाढतात आणि त्यांचे सोशल ग्रुप्स तयार होतात. मग ते इतर ठिकाणी कुत्र्यांशिवायही एकत्र जमून काही धमाल करतात.
आमच्या मायलोला या डॉग पार्कचे विलक्षण आकर्षण आहे. आम्ही त्याला रोजच त्याच्या उद्यानात घेऊन जात होतो आणि अर्धापाऊण तास तिथे ठेवत होतो. तिथे रोज येणारे त्याचे काही मित्रमैत्रिणी भेटले की ते सगळे आपापसात छान खेळत रहायचे. कसे कुणास ठाऊक पण त्याला संध्याकाळ झाली हे कळायचे आणि तो मागच्या दोन पायावर उभा राहून नाचत नाचत पुढच्या दोन पायांनी आम्हाला हलवायचा. "फिरायला जायचं" , "डॉग पार्क" हे शब्द कानावर पडले की त्याच्या अंगात उत्साह संचारायचा आणि मग तो आम्हाला जागेवर बसू द्यायचा नाही.
पॅटरसन ग्रेट फॉल्स
नायगरा धबधब्याला इतकी प्रचंड जागतिक प्रसिद्धी मिळाली आहे की न्यूजर्सीमध्ये पॅसाइक नावाची एक नदी आहे आणि तिच्यावरही एक धबधबा आहे हे सहसा कुणाला ऐकूनही ठाऊक नसते. या धबधब्याला चक्क 'ग्रेट फॉल्स' असे नाव दिले आहे म्हणून आम्ही तो पहायला गेलो. हा धबधबा ७७ फूट उंचीचा आहे. तसा भेडाघाटचा धबधबाही यापेक्षा फार उंच नसेल, पण नर्मदा नदीचे विशाल पात्र कित्येक पटीने मोठे आहे आणि पाण्याला वेगही आहे त्यामुळे तो धुवाँधार दिसतो. इथली पॅसाइक नदीही लहानशी आणि उंचीही जास्त नाही त्यामुळे या धबधब्यात ग्रेट वाटण्यासारखे काही नव्हते. हा धबधबा जवळून पाहण्यासाठी त्याच्या समोरच एक पूल बांधला आहे, पण तो जुना होऊन असुरक्षित झाला असल्यामुळे त्या पुलावर जायला प्रतिबंध केला आहे. म्हणून आम्हाला जरा दुरूनच त्या धबधब्याचे दर्शन घ्यावे लागले.
या धबधब्याच्या स्थळाचा इतिहास मात्र महान आहे. इथे सन १७९१ मध्ये Society for Establishing Useful Manufactures या नावाची एक कंपनी सुरू झाली आणि तिने या धबधब्याच्या पाण्याच्या ऊर्जेचा उपयोग करून त्यावर चालणारी यंत्रे बसवली. एडिसन आणि टेसला यांच्याही खूप वर्षे आधीच्या त्या काळात वीजनिर्मिती माहीत नव्हती अशा काळात या जागी पाणचक्कीवर चालणारी पिठाची गिरणी, कापडाची गिरणी, लोखंडाचे सामान किंवा यंत्रे तयार करणारे कारखाने असे उद्योग सुरू झाले होते. त्यांनी एका प्रकारे अमेरिकेच्या औद्योगीकरणाचा पाया घातला असे म्हणता येईल. आता तिथे काहीच तयार होत नाही, पण स्मारक म्हणून ती जुनी इमारत जपून ठेवली आहे. याच्या बाजूला वसवलेले पॅटरसन हे गावसुद्धा ऐतिहासिक वाटते. तिथेही शंभर दोनशे वर्षे किंवा त्याहूनही जास्त जुन्यापुराण्या कित्येक वास्तू दिसल्या.
मी अमेरिकेत असतांना आषाढी एकादशी आली होती. आमच्या न्यूजर्सीमधल्या घरापासून पन्नाससाठ किलोमीटर्सवर राहणारे श्री.भाऊसाहेब कुलकर्णी यांनी त्याच्या बंगल्याच्या आवारातच एका शेडमध्ये विठोबारखुमाईच्या मूर्तींची स्थापना करून एक लहानसे पूजा आणि प्रार्थनास्थळ बनवले आहे, त्याचा लोकार्पणसमारंभ आयोजित केला होता आणि ओळखीच्या मराठी मंडळींना आमंत्रण दिले होते. संध्याकाळी आम्ही सगळे त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे सुमारे दीडशे लोक आले होते. आधी त्यांनी एका पालखीत पादुका ठेऊन त्याची अर्धा तास दिंडी काढली, ती परत आल्यानंतर महिलांनी फुगड्या घालून तिचे स्वागत केले. त्यानंतर आरत्या, विष्णूसहस्त्रनाम आणि हौशी गायकांची भक्तिगीते झाली. सर्व उपस्थित भाविकांसाठी उपवासाचा भरपूर फराळ दिला. अशा प्रकारे माझी आषाढी एकादशी सुफळ संपूर्ण झाली, तीही परदेशात!
आषाढी एकादशीला पंढरीच्या कानडा राजाच्या भक्तिरसात न्हाऊन निघाल्यानंतर दुसरे दिवशी संध्याकाळी मला एका कॅराओकेवरील गीतांच्या मेहफिलीला हजर राहण्याची संधी मिळाली. याच भागात राहणाऱ्या या उत्साही भारतीय वंशाच्या मंडळींना हिंदी सिनेमातल्या गाण्यांची मनापासून आवड आहे. ते दर महिन्यात आळीपाळीने कुणाच्या घरी जमून संगीतसंध्या साजरी करतात. या महिन्यातल्या कार्यक्रमाची थीम होती डिस्कोम्यूजिक. दोनअडीच तास उडत्या चालीवरची गाणी आणि त्याबरोबर जोरजोरात वाजणाऱ्या वाद्यांचा गलबलाट यावर सगळ्यांनी यथेच्छ गाऊन आणि नाचून घेतले. नंतर मस्त शाही खाणेही होतेच.
माझा जन्म आणि सगळे लहानपण लहान गावातल्या बैठ्या घरात गेले. पुढे आयुष्यभर मी मुंबईपुण्यातल्या उंच इमारतींमध्ये हवेतच असलेल्या फ्लॅटमधल्या बंद दरवाजांच्या संस्कृतीत राहिलो. मी अमेरिकेत गेलो तेंव्हा साठ वर्षांनंतर पुन्हा एकदा तळमजल्यावर रहायला गेलो. पण तिथले शेजारी जरा अलिप्त रहातात आणि त्यांचे सहजासहजी एकमेकांकडे जाणे येणे नसते. मात्र आमच्या घराच्या आजूबाजूला वनस्पती आणि प्राणी, पक्षी वगैरे इतर जीव खूप मोठ्या संख्येने पहायला मिळतात. काही मोठे वृक्ष तर इथे मनुष्यवस्ती होण्याच्या आधीपासून इथे उभे आहेत तर काही झाडे पूर्वी राहून गेलेल्या रहिवाशांनी लावलेली आहेत, त्यात आम्ही थोडीशी भर घातली आहे. पडवीत येऊन बसलो तरी आजूबाजूच्या झाडांवरून पक्ष्यांची किलबिल सतत ऐकू येते, मधूनच एकादा पक्षी उडत उडत समोर येऊन नाचतो किंवा भुर्रकन उडून विजेच्या तारेवर जाऊन बसतो. चिमुकल्या खारोट्या झाडांवर सूरपारंब्यांचा खेळ खेळत असतात. भारतात असतांना मी जास्वंदीची मुख्यतः लालचुटुक फुले पाहिली होती. इथे हिबिस्कस नावाने ती अनेक छटांमध्ये आणि मोठ्या संख्येने पहायला मिळत आहेत. अमेरिकेतल्या निसर्गाच्या सहवासात मी रमून गेलो होतो. त्याच्या आठवणी स्वतंत्र लेखामध्ये देणार आहे.
मी अमेरिकेत असतांना १५ ऑगस्ट होऊन गेला. त्या निमित्याने अमेरिकेतल्या भारतीयांनी भव्य शोभायात्रा काढल्या होत्या. मी त्या पहायला गेलो होतो. एडिसनची कार्यशाळा आणि प्रिन्सटन युनिव्हर्सिटीला भेटी दिल्या. त्या विषयांवरही स्वतंत्र लेख लिहिणार आहे. एकंदरीत पाहता माझा चार महिन्यांचा न्यूजर्सीमधला मुक्काम मजेत गेला.
No comments:
Post a Comment