Saturday, September 12, 2020

लास व्हेगासची सहल

 


पूर्वीच्या काळी संपर्काची आणि दळणवळणाची साधने फारच कमी होती. त्यामुळे अत्यावश्यक काम असले तरच लोक नाइलाजाने प्रवास करायचे. परगावी राहणाऱ्या लोकांची हालहवाल बहुतकरून फक्त टपालामधूनच कळायची. माझ्या लहानपणी तर आमचे घर, आमची शाळा, माझे मित्र आणि आमचे गाव एवढेच माझे अगदी पिटुकले जग होते. मला तरी त्याच्या पलीकडच्या जगाची अतीशय पुसट अशी कल्पना होती.  

त्या काळात क्वचित कधी तरी शाळेतला एकादा मुलगा काही कारणाने मुंबईला जाऊन यायचा. तिथे तो एकाद्या चाळीत राहणाऱ्या नातेवाइकाकडेच जायचा, पण तिथले लोक त्याला थोडी मुंबई दाखवायचे, म्हणजे राणीची बाग, हँगिंग गार्डन, राजाबाई टॉवर, गेटवे ऑफ इंडिया वगैरे आणि जातायेतांना बोरीबंदर आणि फ्लोरा फाउंटन अशी ठिकाणे दाखवायचे, एकादे वेळा त्याला चौपाटीवरची भेळ आणि वीरकर किंवा तांबे अशांच्या हॉटेलातला बटाटा वडा, साबूदाणा वडा खायला घालायचे, एकादा सिनेमा दाखवून आइस्क्रीम नाहीतर शीतपेय घेऊन द्यायचे, लोकल ट्रेन, ट्रॅम आणि बेस्टच्या  बसमधून फिरवायचे. हे इतके सगळे करणे म्हणजे आमच्या दृष्टीने चैनीची अगदी पराकाष्ठा होती आणि त्याला 'जिवाची मुंबई करणे' असे म्हणत असत. तो मुलगा परत आल्यावर या सगळ्या गंमती रंगवून सांगत रहायचा, यातले काहीच न अनुभवलेली बाकीची सगळी मुले ते वर्णन कान टवकारून आणि डोळे विस्फारून ऐकत आणि त्या मुलाचा हेवा करत असत.

आता लहान गावांकडली परिस्थितीसुद्धा पार बदलली आहे, सर्वांच्या घरात टीव्ही आणि खिशात स्मार्टफोन आले आहेत त्यावर त्यांना सगळे जग दिसते, गावातच सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थही खायला मिळतात आणि तिथले लोकसुद्धा पर्यटन करण्यासाठी भरपूर इकडेतिकडे फिरायला लागले आहेत. त्यामुळे आता  'जिवाची मुंबई करणे'  हा मराठीतला वाक्प्रचारच नाहीसा झाला आहे.  

अमेरिका ही तर चंगळवादी राहणीमानाची जननी आहे. तिथे मौजमजा करण्यासाठी सगळ्या गावांमध्ये रेस्तराँ, पब्स, क्लब्स, पार्क्स,  रिसॉर्ट्स वगैरे तर असतातच, अनेक ठिकाणी खास प्रकारचे अॅम्यूजमेंट पार्क असतात. अमेरिकेतले लोक जरा मोकळा वेळ मिळाला की कुठे जाऊन कशी धमाल करायची याचा विचार करतात. त्यांनी तर फक्त मौजमजा करण्यासाठी 'लास व्हेगास' या नावाचे एक शहरच बांधले आणि गेल्या काही दशकांमध्ये त्या नगराची सर्वाधिक वेगाने वाढ झाली आहे. अमेरिकेतलेच नव्हे तर जगभरातले शौकीन लोक पैसे उधळून मजा करण्यासाठी त्या गावाला भेट देत असतात. या मौजमजेत जुगार, दारू आणि  निशाजीवन यांना प्राधान्य असल्यामुळे या गावाला 'सिनसिटी' असे टोपणनाव पडले आहे.

परमेश्वराने या जगाची अशी रचना केली आहे की 'ब्रह्म आणि माया' या द्वयीतल्या परब्रह्माची ओढ फक्त काही महान संतमहात्म्यांनाच लागते आणि बाकी सगळ्या सर्वसाधारण लोकांवर मायाच भुरळ  घालते. त्यामुळे लासव्हेगासची कीर्ती ऐकल्यावर मलाही आपण एकदा ते शहर पहायला हवे असे वाटायला लागले होते. माझ्याकडे उधळण्यासाठी जास्तीचे पैसे नसले तरी पैसेवाले इतर लोक तिथे जाऊन कशा प्रकारची वेगळी मौज करतात याचे मला मोठे कुतूहल होते. 


मागच्या वर्षी मी अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसजवळील टॉरेन्स या गावात मुलाकडे गेलो होतो. तिथून हे लास व्हेगास शहर कारने फक्त चार तासांच्या अंतरावर होते आणि तिथे राहणाऱ्या सगळ्या लोकांचे ते आवडते सहलीचे ठिकाण होते. माझा मुलगासुद्धा तिथे एकदा सहकुटुंब फिरून आला होता, पण त्यावेळी काही अडचण आल्यामुळे त्यांची ती ट्रिप मनाजोगती झाली नव्हती. मी तिथे असतांना ते शहर मलाही दाखवावे म्हणून त्यांनी पुन्हा लास व्हेगासला जाऊन यायचा बेत आखला. डिसेंबरच्या २६ आणि २७ तारखांच्या रात्री तिथल्या एका चांगल्या हॉटेलात रहायचे रिशर्वेशन मिळाले. आधी हूव्हर डॅम पाहून संध्याकाळपर्यंत लास व्हेगासला जाऊन पोचायचे, ती संध्याकाळ, रात्र आणि दुसरा पूर्ण दिवस 'जिवाचे लास व्हेगास' करून घ्यायचे असा विचार होता. 

पण त्या दिवशी घरातून निघता निघता दुपार होऊन गेली म्हणून हूव्हर डॅमला न जाता सरळ व्हेगासला जायले ठरवले. कारमधल्या जीपीसच्या सांगण्याप्रमाणे ते अंतर सुमारे साडेतीनशे मैल आणि लागणारा वेळ चार तास असे दिसत होते. त्यानुसार आम्ही संध्याकाळी पाचच्या सुमाराला तिथे पोचू अशी अपेक्षा होती. टॉरेन्सहून उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाला लागल्यावर थोड्याच वेळात दूर क्षितिजावर हिमाच्छादित शिखरे दिसायला लागली. टॉरेन्सला बर्फ पडण्यासारखी थंडी कधीच पडली नव्हती त्यामुळे आम्हाला ती दूरची शिखरे पाहूनच आधी छान वाटले. तासाभरानंतर आम्ही त्या डोंगराळ भागातूनच जायला लागलो आणि वरून हिमवर्षाव सुरू झाला. बर्फाचे ते कण भुरभुरत पडतांना पाहून आधी तर सगळ्यांना जास्तच मजा वाटायला लागली. 

 त्या महामार्गावरून तास दीड तास पुढे गेल्यानंतर  आमची गाडी  जीपीएसच्या आज्ञेनुसार एका लहान रस्त्याला लागली. तिथे अधून मधून दिसणाऱ्या दिशादर्शक पाट्यांवर कधी न ऐकलेल्या भलत्याच गावांची नावे दिसत होती. हा सगळा भाग पूर्वी स्पॅनिश लोकांनी भरलेला असल्यामळे त्या गावांची लॅटिन नावेही विचित्र वाटत होती. आपले काही चुकले आहे का ? अशी शंका आल्यामुळे मुलाने इंटरनेट, गुगल मॅप्स आणि जीपीएसवर तपासून पाहिले तेंव्हा असे लक्षात आले की अत्याधिक हिमवर्षावामुळे लास व्हेगासला जाणारा नेहमीचा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे आम्हाला शंभर दीडशे मैलांचा वळसा घालून तिथे पोचायचे होते आणि अर्थातच त्यासाठी दोनअडीच तासांचा जास्तीचा वेळ लागणार होता. व्हेगासला पोचायला तेवढा उशीर होणार असला तरी काही हरकत नाही असे म्हणत आम्ही पुढे जात राहिलो.

  त्या रस्त्याने पुढे जात असतांना आधी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिमकणांची चादर पसरलेली दिसायला लागली आणि नंतर तर रस्ताच त्यांनी भरून गेला. बर्फावरून गाडी चालवली तर ती घसरण्याची शक्यताच नव्हे तर खात्री होती, त्यामुळे पुढे गेलेल्या गाड्यांच्या चाकांनी जेवढा भाग स्वच्छ करून त्यावर दोन काळे पट्टे ओढले होते त्या चाकोरीमधूनच आमची कार चालवणे भाग होते. त्यामुळे तो रस्ता रुंद असला तरी आता फक्त एकाच लेनचा झाला होता आणि त्यावरून जपून गाडी चालवायची असल्यामुळे तिचा वेगही कमी झाला होता.

आपल्याकडल्या महामार्गांवरून जातांनासुद्धा रस्त्यापासून थोड्या अंतरावर घरे, इमारती वगैरे दिसत असतात आणि तासा तासांच्या अंतरामध्ये अनेक हॉटेले, फूडमॉल्स, ढाबे वगैरे मिळतात. कॅलिफोर्नियाचा हा भाग मात्र पूर्णपणे निर्मनुष्य होता. रस्त्यामध्ये समोर पुढे जाणारी वाहने आणि उलट दिशेने आपल्याकडे येणारी वाहने सोडून माणसांचा कुठेही मागमूस दिसत नव्हता. जिकडे पहावे तिकडे बर्फ किंवा काही ठिकाणी उघडे बोडके डोंगर आणि काही ठिकाणची झाडी हेच दिसत होते. वाटेत गावेच नाहीत तर हॉटेले तरी कुठून असणार? तिथे वाटेत खायलाप्यायला काही मिळणार नाही याची आधीच कल्पना असल्यामुळे आम्ही वीस पंचवीस खाद्यपदार्थांची पाकिटे आणि तितक्याच पाण्याच्या बाटल्या डिकीमध्ये भरून आणि काही हाताशी ठेऊन निघालो होतो आणि ते खातपीत पुढे चाललो होतो. 

चार तासांचा असा प्रवास झाल्यावर एक विसाव्यावे ठिकाण दिसले म्हणून आम्ही त्याच्या समोर गाडी उभी केली. बाहेर जोरात हिमवर्षाव होत होता. आम्ही सर्वांनी आपापले ओव्हरकोट घालून स्वतःला नखशिखांत झाकून घेतले, हळूच कारचे दरवाजे उघडून बाहेर पडलो आणि निसरड्या रस्त्यावरून शक्य तेवढ्या झपझप त्या हॉटेलचे दार गाठले.  तिथे आत एक उंचापुरा, धिप्पाड आणि राकट माणूस बसलेला होता. अशा निर्जन ठिकाणी एकट्याने रहायला अशाच लोकांची गरज असते किंवा तेच तेवढी हिम्मत करू शकतात असे मला वाटून गेले. कदाचित तो रस्ता नेहमीच्या वहिवाटीचा नसावा यामुळे तिथे खाण्यापिण्यासाठी फारसे काही ठेवलेले दिसले नाही, ज्या थोड्या वस्तू होत्या त्या गारठून बर्फ झालेल्या होत्या. त्यातलीच दोन चार पाकिटे त्याने मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम करून आम्हाला खायला दिली आणि वाफाळणाऱ्या गरम गरम कॉफीचे मग भरून दिले. 

त्याने अंगात थोडी ऊब आली. "तुम्ही लोक कुठे, व्हेगासला निघाला आहेत का?" त्या माणसाने चौकशी केली. आम्ही होकार दिल्यावर तो म्हणाला, "गुड लक !" ते ऐकून मला जरासे विचित्रच वाटले. तो असे का म्हणतोय् म्हणून आम्ही त्याला "तिथे सगळे ठीक आहे ना?" असे विचारले. त्याने मोबाईलवरच व्हेगासचे हवामान दाखवले. तिथेही हिमवर्षाव चालला होता आणि सगळे थोडेसे विस्कळित झाल्यासारखे दिसत असले तरी तसे ठीकठाकही वाटत होते. आम्ही आधीच चार तास बर्फातून प्रवास करत घरापासून इतके दूर आलो होतो आणि परत जाण्यापेक्षा पुढे जाऊन दोन अडीच तासात मुक्कामाला पोचायची अपेक्षा दिसत होती. "आलीया भोगाशी असावे सादर" असे म्हणत पुन्हा गाडीत जाऊन बसलो.  

आम्हाला हॉटेलमध्ये पोचायला उशीर होणार होता हे सांगण्यासाठी फोन लावायचा प्रयत्न केला. अमेरिकेतसुद्धा सिग्नलच्या रेंजचा प्रॉब्लेम असतोच. निरनिराळ्या मोबाइल फोनवरून अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर तो एकदाचा लागला. तिथल्या बाईंनी सांगितले की ते लोक आमचे रिझर्व्हेशन मध्यरात्रीपर्यंत आणखी कुणाला देणार नाहीत. ते ऐकून हायसे वाटले कारण आम्ही त्याच्या आधीच तिथे पोचणार याची आम्हाला खात्री वाटत होती.

तोपर्यंत दिवसही मावळून गेला होता आणि रस्त्यावरील गाड्यांच्या दिव्यांशिवाय कुठलाही उजेड दिसत नव्हता. सगळे डोंगर आणि झाडे अंधारात गुडुप झाले होते. त्या लहान रस्त्याने पुढे गेल्यावर एक मोठा रस्ता लागला, पण त्यावरून थोडेच पुढे गेल्यावर आम्ही दुसऱ्या एका लहान रस्त्याला लागलो. या रस्त्यावरून खूप गाड्या जात होत्या हे पाहून आधी थोडे बरे वाटले, पण पुढे गेल्यावर नजर पोचेल तिथपर्यंत गाड्यांच्या दिव्याची रांग दिसायला लागली आणि त्या गाड्यांची गति मंद मंद होत होत ती अगदी गोगलगायीसारखी झाली. तासाभरामध्ये आम्ही पाच मैलसुद्धा पुढे सरकत नव्हतो. हा ट्रॅफिक जॅम संपायची काही लक्षणेच दिसत नव्हती आणि त्या आडरानात काही माहिती सांगणारेही कोणी नव्हते. काही गाड्या उलट दिशेने जातांना दिसत होत्या. त्यामुळे हा रस्ता सुरू तर आहे असे वाटत होते, पण नंतर असे लक्षात आले की आमच्या दिशेने जात असलेल्या काही गाड्याच परत फिरून जात होत्या आणि त्यांनी व्यापलेली जागा रिकामी होत असल्यामुळे आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो.

उलट दिशेने जात असलेल्या एका गाडीमधल्या सज्जनाने वेग कमी करून आणि ओरडून सांगितले की आमचा तो रस्ता पुढे बंद केला आहे आणि व्हेगासला जाणाऱ्यांनी परत फिरून अमक्या तमक्या मार्गाने जावे. त्यामुळे आम्हीही परत फिरायचे ठरवले, पण रस्त्यातल्या डिव्हायडर्समुळे मागे फिरणेही अशक्यच होते. हळूहळू पुढे सरकत एका ठिकाणी काही गाड्या वळून परत फिरतांना दिसल्या, त्यांच्या मागोमाग आम्हीही यू टर्न घेतला आणि जीपीएसला वेगळ्या मार्गाने जाण्याची सूचना दिली.  खरे तर आम्ही व्हेगासहून ऐंशी मैलावर पोचलो होतो, पण या तिसऱ्या रस्त्याने त्यात आणखी दीडशे मैलांची भर पडली.

आता आम्हाला दुसरी चिंता वाटायला लागली. आम्ही निघतांना गाडीच्या तेलाची टाकी फुल्ल भरून घेतली होती आणि ती व्हेगासपर्यंत सहज पुरेल असे वाटले होते, पण आता ती रिकामी होण्याच्या मार्गावर होती आणि पुन्हा भरून घेणे आवश्यक झाले होते. अमेरिकेतल्या जीपीएसमध्ये अशी सोय आहे की त्यात जवळची गॅस स्टेशन्स कुठे आहेत ते दाखवतात. आम्ही आता ती शोधायला सुरुवात केली. सुदैवाने पंचवीस तीस मैलांवर एक गाव लागले. त्या रस्त्यावरल्या सगळ्या प्रवाशांची आमच्यासारखीच परिस्थिती असल्यामुळे तिथल्या गॅस स्टेशनवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. पण ते गाव सोडून दुसरीकडे जायचे झाले तर आणखी कुठे डिझेल मिळाले असते कुणास ठाऊक ? त्यामुळे वाट पाहण्याशिवाय आमच्याकडे काही गत्यंतरच नव्हते. अर्धापाऊण तासानंतर आमचा नंबर लागला आणि सुदैवाने त्या पंपवाल्याकडे भरपूर साठा असल्यामुळे आम्हाला गाडीत इंधन भरायला मिळाले. तोपर्यंत मध्यरात्रही होऊन गेली होती. आम्ही आपापल्या पोटाच्या टाक्याही भरून घेतल्या आणि गरज पडली तर रस्त्यातल्याच एकाद्या मोटेलमध्ये रात्र काढावी का अशी चर्चा करत पुढे जात राहिलो.     

तासाभरानंतर आम्हाला लास व्हेगासकडे जात असलेला एक महामार्ग लागला आणि लास व्हेगास अमूक इतके मैल असे दाखवणाऱ्या पाट्याही दिसायला लागला. आता या रस्त्यावर गाड्याही वेगात जात होत्या. आम्ही अखेर एकदाचे ट्रॅफिक जॅममधून बाहेर पडलो होतो. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुलाला आणि सुनेला बारा तासाहून अधिक वेळ ड्राइव्ह करत राहण्याचा ताण झालेला असला तरी आता अंगात थोडा उत्साह आला. लास व्हेगास शहरात शिरल्यानंतर तिथल्या चित्रविचित्र पण आकर्षक अशा भव्य इमारती दिसायला लागल्या. त्यांच्यावर केलेल्या नेत्रदीपक रोशणाईने त्या झळाळत होत्या. त्यांना पाहून सगळ्यांना हुरुप वाटायला लागला. अखेर रात्री दोनच्या सुमाराला आम्ही आमच्या गंतव्य स्थानी जाऊन पोचलो.    

आम्ही ज्या लक्झर हॉटेलचे बुकिंग केले होते त्याचा आकार एका अवाढव्य पिरॅमिडसारखा आहे. तो दुरून दिसायला लागला होता. काही मिनिटांमध्येच आम्ही तिथे पोचलो आणि गाडी पार्क करण्यासाठी भूमीगत (अंडरग्राउंड) पार्किंग लॉटमध्ये शिरलो. त्या अवाढव्य जागेत हजारो गाड्या शिस्तीत लावलेल्या होत्या, पण सगळीकडे फिरूनही एकही रिकामा गाळा दिसला नाही. कंटाळून रिसेप्शनला फोन लावला. त्यावर आम्हाला जमीनीवरील उघड्या (ओपन एअर) पार्किंग लॉटमध्ये जाण्याची सूचना मिळाली. तिकडे जाण्याचा मार्ग शोधत बाहेर पडलो. तिथेही हजारो गाड्या उभ्या केलेल्या होत्याच. पण त्या मैदानात जायच्या आधी हॉटेलच्या इमारतीत शिरण्याचा एक मागचा दरवाजा दिसला. बाहेरील कडाक्याची थंडी पाहता आम्ही आपले सामान घेऊन कारच्या बाहेर पडलो आणि त्या दरवाजातून आत शिरलो आणि फक्त मुलगा एकटाच गाडी पार्किंग करायला पुढे घेऊन गेला. 


आम्ही त्या दारातून आत शिरून पाहिले तर समोर एक मोठा कॉरीडॉर होता. आधी तिथले प्रसाधनगृह (वॉशरूम) शोधून काढले. फ्रेश झाल्यावर तिथेच मुलाची वाट पहात उभे राहिलो. तो आल्यावर आता कुठे जायचे हा प्रश्न होताच. तिथे कुणाला विचारायला कुणी माणूस तर दिसायला हवा ना ! सामान घेऊन त्या कॉरीडॉरमधून इकडे तिकडे पहात हळू हळू पुढे जात जात अखेर एकदाचे चेक इन काउंटर सापडले. रात्री अडीच वाजतासुद्धा त्याच्यासमोर प्रवाशांची भली मोठी रांग होती. तसे पाहता त्या काउंटरवर फक्त एक नंबर दाखवला की पुढची सगळी क्रिया काँप्यूटरवरून होत होती, तरीही त्या कामाला एकादे मिनिट तरी लागणारच.  अर्धा पाऊण तासांनी आम्हाला आमच्या खोल्यांचे नंबर आणि किल्ल्या मिळाल्या.  साडेचाार हजार खोल्या असलेल्या त्या टोलेजंग हॉटेलमधली आपली खोली शोधून काढणे हे सुद्धा एक दिव्यच होते, पण त्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या पाट्या आणि दिशा दाखवणारे बाण सगळीकडे लावलेले होते. ते पहात पहात आम्ही आमच्या खोल्यांपर्यंत पोचलो.

आत छान प्रशस्त पलंगांवर पसरलेल्या मऊ मऊ गाद्या आमची वाटच पहात होत्या. अंगावरचे ओले ओव्हरकोट काढले, भिजलेले कपडे बदलले आणि त्या गाद्यांवर अंग झोकून दिले. तोपर्यंत पहाटेचे साडेतीन वाजून गेले होते. आदले दिवशी प्रवासात दमून गेले असल्यामुळे सगळेजण सकाळी आरामात उठलो आणि सकाळची कामे आटोपली. त्या हॉटेलमध्ये रूमसर्व्हिसची व्यवस्था दिसली नाही आणि ती असली तरी त्यात वेळ आणि पैसे खर्च होतील म्हणून आम्हीसुद्धा तिचा विचार केला नाही. तयार झाल्यावर आमच्या शिदोरीमधूनच चार घास खाऊन घेतले आणि खाली उतरलो.


लास व्हेगासचे हे लक्झर हॉटेल इजिप्शियन संस्कृतीच्या थीमवर बांधले आहे. इथे एका प्रचंड आकाराच्या पिरॅमिडमध्ये अनंत गेमिंग मशीन्स, कॉसिनोज, बार्स, दुकाने, कॉफीशॉप्स वगैरे मांडले आहेत. बाहेरच्या बाजूला एका पुरातन इजिप्शियन बाईचा  प्रचंड आकाराचा पुतळाही आहे. आत ठिकठिकाणी जुन्या काळातल्या इजिप्शियन राजाराण्यांचे आणि त्यांच्या दासदासींचे पुतळे ठेवले आहेत आणि त्याला साजेशीच विशिष्ट प्रकारची सुरेख सजावट सगळीकडे केली आहे. त्यांची माहिती देणारे फलकही जागोजागी ठेवले आहेत. या हॉटेलचा तळमजला म्हणजे एक प्रकारचे प्रदर्शनच आहे.  ते पहात पहात आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो.

लास व्हेगासच्या गजबजलेल्या भागाला 'स्ट्रिप' असे नाव आहे.  आमचे हॉटेल या स्ट्रिपवरच होते. त्यामुळे बाहेरच्या रस्त्यावर येताच पर्यटकांचे थवे तिथे हिंडतांना दिसायला लागले. त्या दिवशी मात्र आमचे दैव चांगले होते. आदल्या दिवशी आमचा पिच्छा पुरवणारा हिमवर्षाव थांबला होता आणि थोडे ऊन पडले होते. त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. त्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना एकाहून एक सुंदर अशा भव्य इमारती होत्या. त्या बहुतेक टोलेजंग हॉटेलांच्या होत्या. शिवाय कुठे मॅनहॅटनमधल्या इमारती आणि स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा यांच्या प्रतिकृति असलेला न्यूयॉर्कचा देखावा तर कुठे आयफेल टॉवरसकट पॅरिस नगरीचा देखावा उभा केला होता. सगळीकडे ख्रिसमससाठी भरपूर सजावट केलेली होतीच.  तिथे सगळ्या खंडांमधले निरनिराळ्या वंशाचे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक निरनिराळ्या चित्रविचित्र पोषाखांमध्ये दिसत होते. त्यात कोणी लालबुंद गोरे, कोणी काळे कुळकुळित, कोणी पीतवर्णीय, कोणी ताडमाड उंच तर कोणी अतीशय बुटके, कोणी गलेलठ्ठ, कोणी काटकुळे, कोणी म्हातारे, कोणी तरुण, कुणाबरोबर लहान लहान मुले अशा सगळ्यांचा त्यात समावेश होता, पण सगळ्यांच्या अंगातून पुरेपूर उत्साह आणि उत्सुकता ओसंडून वाहतांना दिसत होती. 


या बहुतेक सगळ्या इमारतींमध्ये खालच्या एक दोन मजल्यांवर तरी असंख्य प्रकारची दुकाने होती. आपल्या वस्तू अत्यंत आकर्षकपणे मांडून पहाणाऱ्याला त्या घ्यायच्या मोहात पाडण्यामध्ये तर अमेरिकन लोक वाकबगार आहेतच. म्हणजे हा सगळा भाग एक अवाढव्य असे प्रदर्शन आणि गजबजलेला बाजारच होता. त्यात इकडेतिकडे पहात पहात फिरणाऱ्यांची अर्थातच खूप गर्दी होती.  आम्हीसुद्धा कधी दुकाने आणि कधी माणसे यांच्याकडे पहात पहात आणि त्यांच्यावर कॉमेंट्स करत पुढे पुढे जात होतो. काही रस्त्यांवर म्हणजे फुटपाथवर ऐसपैस मोकळी जागा होती. तिथे गाणी म्हणणारे, वाद्ये वाजवणारे, नाच करणारे, जादूचा खेळ करणारे, हसवणारे विदूषक असे नाना प्रकारे मनोरंजन करणारे कलाकार आपापले खेळ दाखवत होते. त्यात काही तर उघडपणे सवंग देहप्रदर्शन करणाऱ्या बायासुद्धा होत्या.


यातल्या काही काही पॅव्हेलियन्सना खास थीम्स होत्या. त्यातल्या माझ्या विशेष लक्षात राहिलेल्या एका इमारतीत रोमच्या वेगवेगळ्या सीजर्सचे पुतळे निरनिराळ्या दालनांमध्ये उभे करून ठेवले होते आणि त्यांची माहिती दिली होती, तसेच रोमन प्रकारचे नक्षीकाम आणि साजेशी सजावट केली होती.  त्यातल्या प्रत्येक दालनाला त्या सम्राटाचे नाव दिले होते. बहुतेक ठिकाणी ख्रिसमस ट्री आणि रेनडीयर्सची गाडी वगैरेसारख्या गोष्टी होत्याच. एका ठिकाणी ख्रिसमससाठी एक खास देखावा उभा केला होता. त्यात पाश्चात्य लोकांच्या पुराणातले काही प्रसंग होते. तो हॉल मात्र अप्रतिम होता आणि तो पहाणाऱ्यांची गर्दीसुद्धा खूप होती. एका भागातल्या गोल छतावर संपूर्ण कृत्रिम आभाळ तयार केले होते. त्यात फिरणारे ढगसुद्धा हुबेहूब दाखवले होते. त्यामुळे बाहेर दिवस आहे की रात्र हेसुद्धा समजत नव्हते.

लास व्हेगास म्हणजे जुगाऱ्यांची पंढरी आहे. केवळ जुगाराच्या धुंदीचा अनुभव घेण्यासाठीच खूप लोक तिथे जातात. तिथे त्यांच्यासाठी जिकडेतिकडे जुगाराची यंत्रे म्हणजे स्लॉट मशीन्स, गेमिंग मशीन्स, रौलेट व्हील्स वगैरे पसरून ठेवलेली दिसतात. कल्पक लोकांनी असंख्य प्रकारची असली यंत्रे तयार केली आहेत. त्यातली काही एकेकट्याने स्वतंत्रपणे चालवायची असतात तर काहींमध्ये पाचदहा लोक सामूहिकपणे जुगार खेळतात. आपल्याकडे काही मॉल्समध्ये अलीकडे अशी यंत्रे ठेवतात. त्यात टोकन टाकून काही बटने दाबायची किंवा खुंट्या फिरवायच्या आणि आपला आकडा लागला तर लहान मोठे बक्षिस मिळते. पण ते क्वचितच होते, बहुतेक वेळा नंबर लागतच नाही आणि आपले पैसे वाया जातात. कधी कधी एकादे बक्षिस लागले की खेळणाऱ्याला हाव सुटते आणि तो जास्त जास्त पैसे टाकत जातो.  जुगार ही एक नशा असते आणि बहुतेक जुगारी लोक आपले पैसे त्यात गमावून बसतात. काही हुषार लोक त्यातही कमाई करतात, पण असे नशीबवान आणि योग्य वेळ येताच थांबणारे धोरणी लोक विरळाच दिसतात. 

माझ्या आधीच्या अमेरिकावारीत आम्ही ख्रिसमसला फ्लॉरिडामधील सेंट ऑगस्टीन नावाच्या गावी गेलो होतो. तिथेही थोडी मौजमस्ती धमाल होती, पण ती एकाद्या खेड्यातल्या जत्रेसारखी होती. तिथे छोट्या छोट्या किरकोळ वस्तू विकणाऱ्या लहान लहान दुकानांची, खाद्यपेयांच्या ढाब्यांची आणि त्यामधून फिरणाऱ्या सर्वसामान्य लोकांची गर्दी होती. त्याच्या तुलनेत लास व्हेगास म्हणजे एक मोठा जागतिक कुंभमेळा होता. इथला सगळा पसारा अवाढव्य आणि नेत्रदीपक होताच आणि ते पहायला जगभरातली पैसेवाली माणसे आली होती. त्यांना पहायला काही मध्यमवर्गीय लोक आलेले दिसत होते.  

हे सगळे पहात पहात आम्ही हॉटेलपासून चांगले चारपाच मैल तरी दूर गेलो होतो आणि दिवस मावळून रात्र पडली होती. आता मात्र पाय दुखायला लागले होते आणि मला दमल्यासारखे वाटत होते.  हॉटेलवर परत कसे जायचे याचीही काही कल्पना नव्हती. आमची कार तर आम्ही पार्किंगमध्येच उभी करून ठेवली होती आणि आम्ही पायी चालत निघालो होतो. अमेरिकेत रस्त्यावर उभी केलेली टॅक्सी, रिक्शा असली काही वाहने कुठे नसतातच. लास व्हेगासच्या या भाऊगर्दीत तर उबरसुद्धा मिळण्याची काही शक्यताही दिसत नव्हती. त्यामुळे मी आता आणखी पुढे न जाता परत कसे जायचे याचा विचार करायला सांगितले. 

स्ट्रिपवरून जाणारी एक इलेक्ट्रिक लोकल रेल्वे आहे असे ऐकले होते. गूगलवर त्याची माहिती काढली आणि आम्ही जिथे होतो तिथून जवळचे स्टेशन शोधून काढले.  ही लोकल डोक्यावरून जाणारी (ओव्हरहेड) होती. त्यामुळे ते स्टेशनही आकाशातच होते. तिथपर्यंत पोचल्यावर समजले की काही सुधारणा करण्यासाठी ते स्थानक तात्पुरते बंद ठेवले होते. मग तिथून चालत चालत पुढल्या स्टेशनपाशी गेलो आणि लिफ्टने वर जाऊन ते स्टेशन गाठले. तिथे एकच रेल्वेमार्ग होता. त्यामुळे जी पहिली गाडी आली तिच्यात चढलो. गाडी सुरू झाल्यानंतर समजले की ती विरुद्ध दिशेने जात होती. उंचावरून जात असल्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूला लास व्हेगासमधली झगमगणारी रोशणाई दिसत होतीच. ती पहात पहात दोन स्टेशने पुढे गेल्यावर ती गाडी मागे फिरली आणि चारपाच स्टेशने ओलांडल्यावर आमचे स्टेशन आले.

ते स्टेशन तिथल्या प्रसिद्ध एमजीएम हॉटेलच्या जवळ होते. आम्ही फिरतांना ते हॉटेल पाहिले होते आणि त्याच्या समोर असलेल्या भव्य सिंहाच्या पुतळ्यामुळे ते लक्षातही राहिले होते. रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यावर समोरच्या बोगद्याकडे जाणाऱ्या वाटेवर 'एमजीएम हॉटेलकडे' असे लिहिले होते आणि दुसरीकडे जाणाऱ्या वाटेकडे आणखी काही तरी अनोळखी शब्द लिहिले होते. म्हणून आम्ही एमजीएम हॉटेलकडे चालायला लागलो. बरेच पुढे जाऊन लिफ्टने खाली आल्यावर पाहिले की तिथे एका महाप्रचंड अशा एका मैदानासारख्या पण बंदिस्त जागेत हजारो गेमिंग मशीने मांडून ठेवली होती आणि हजारो जुगारी त्यांच्या समोर बसून आपापले नशीब आजमावत होते. अख्ख्या जगात कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणावर जुगार चालत असेल असे मला कधी वाटले नव्हते. तिथून बाहेर पडायचा मार्गही सापडत नव्हता. मग थोडी चौकशी करत करत आम्ही बाहेर आलो. पहातो तो बहुधा आम्ही जिथून आत शिरलो होतो त्याच जागी फिरून परत आलो होतो.  

दुसऱ्या बोगद्यातून पुढे गेल्यावर लिफ्टने खाली आलो तेंव्हा त्या सिंहांच्या बाजूलाच रस्ता होता. तिथून आमचे हॉटेल आणखी मैलभर लांब होते, पण तिथून जाण्यासाठी एक ट्रॅमची सोय होती आणि ती हॉटेलनेच केली असल्यामुळे मोफत होती. तिचा लाभ घेऊन आम्ही हॉटेलमध्ये परत आलो आणि मी तरी रूममध्ये जाऊन विश्रांती घेतली. बाकीची मंडळी आणखी थोडे फिरून आणि खेळून आली.

दुसरे दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत लास व्हेगासहून पंधरा वीस मैलांवर लागलेल्या एका हॉटेलात जेवण घेतले. ते माझ्या या वेळच्या अमेरिकेच्या प्रवासातले सर्वात मस्त आणि रुचकर जेवण होते. परतीच्या प्रवासात त्या मानाने बराचसा सरळ रस्ता मिळाला. वाटेत कुठे कुठे हिमवर्षाव होत होता, बर्फ पडून रस्ता बंद झाल्यामुळे वळसा घ्यावा लागणे वगैरे प्रकार झालेच, पण या वेळी आम्हाला ते अपेक्षित झाले होते. अशाच एका वळशावर बर्फाचे मोठमोठे ढीग साठले होते आणि काही मुले तिथे मजेत खेळत होती. ती येतांनाच त्यासाठी सगळी तयारी करून आली होती. आमच्या लोकांनी पण थोडा वेळ बर्फात खेळून लास व्हेगासच्या ट्रिपमध्ये मिळालेल्या या बोनसचा आनंद घेतला. 'ऑल इज वेल् दॅट एंड्स वेल्' या उक्तीनुसार आम्ही छान मूडमध्ये आनंदात घरी परतलो.   



2 comments:

Vaijayanti Patwardhan said...

Yr. Detailed n simple style is really attractive. I too travelled east n most of west coast but never tried to capture it in words. This seems to be written in sep 20. If it is travelog its better if one knows the date travelled pl.

Anand Ghare said...

नमस्कार आणि धन्यवाद. मी २०१९ मध्ये अमेरिकेत कॅलिफोर्नियाला गेलो असतांना ख्रिसमसच्या सुमाराला लास व्हेगासला गेलो होतो. आता मी पुन्हा अमेरिकेत आलो आहे. या वेळी आलेले अनुभव भारतात परतल्यानंतर सावकाशपणे लिहायचा विचार आहे.