Friday, November 09, 2018

माझा चित्रांचा संग्रह - १ - दीपांचा इतिहास

मी नोकरीत असतांना शेवटी शेवटी माझ्यावर इतकी जबाबदारीची कामे पडली होती की त्यातून माझ्या वैयक्तिक कामासाठीच वेळ मिळत नव्हता, मग फावल्या वेळातले छंद कसे जोपासणार? पण त्याच काळात माझा जनसंपर्क अपार वाढल्यामुळे मला मिळणारी आमंत्रणपत्रे आणि ग्रीटिंग कार्ड्स यांची संख्या शिगेला पोचली होती. सेवानिवृत्त झाल्यानंतर ती शांतपणे पहावीत असा विचार करून मी ती टाकून न देता मी ढिगारा करून बाजूला ठेऊन दिली होती.  पण प्रत्यक्षात सेवेमधून मुक्त झाल्यानंतर आणखी अनेक अडचणी येत गेल्या आणि तो अव्यवस्थित ढिगारा वाढत गेला.

अशा प्रकारे माझ्याकडे गोळा होत असलेल्या असंख्य चित्रांना व्यवस्थित मांडून ठेवण्यासाठी त्यांची कशा रीतीने वाटणी करायची याचा मी विचार करत होतो. त्यात एकदा मला 'दिव्यांचा इतिहास' या विषयावरचा लेख मिळाला. तो वाचल्यावर मला एक कल्पना सुचली आणि माझ्याकडे असलेल्या दिव्याच्या सगळ्या चित्रांना एका डायरीत चिकटवून ठेवले. माझ्या संग्रहांबद्दल लिहितांना दीपावलीची वेळ साधून या संग्रहापासून सुरुवात करायची होती, पण त्यातही नकटीच्या लग्नासारखी सतराशे तांत्रिक विघ्ने आली. अखेरीस हे प्रेझेंटेशन ज्या स्थितीत होते तसेच आधी दाखवून टाकले. आणि नंतर फुरसतीने त्याचे थोडे थोडे संपादन केले.

एक चित्र म्हणजे हजार शब्दांच्या तोडीचे असते असे म्हणतात. आता मी इतके शब्द कुठून आणणार? त्यापेक्षा चित्रेच दाखवलेली बरी. माझ्या संग्रहातील बऱ्याचशा चित्रांचे फोटो काढून ते सहा चौकटींमध्ये चिकटवले आणि या लेखात खाली दिले आहेत. साध्या मातीच्या पणतीपासून नक्षीदार टांगलेल्या दिव्यांपर्यंत प्रगत होत गेलेल्या दिव्यांची अनेक रूपे माझ्या या संग्रहामध्ये पहायला मिळतील.

आदिमानवाने अग्नीचा शोध लावल्यानंतर त्याचेपासून ऊष्णता आणि प्रकाश या दोन्ही गोष्टी मिळवणे सुरू केले. शेकोटी, चूल, शेगडी, भट्टी अशा साधनांमधून उष्णता प्राप्त केली तर पणती, निरांजन, समई वगैरे दिव्यांमधून उजेड मिळवला. त्यामध्ये होत गेलेल्या सुधारणा  कवि वि.म.कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि मी शाळेत शिकलेल्या एका कवितेत इतक्या छान दाखवल्या होत्या!

आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती । 
झाले इवली मग पणती,घराघरांतून मिणमिणती। 
समई केले मला कुणी, देवापुढती नेवोनी । 
निघुनी आले बाहेर, सोडीत काळासा धूर।
काचेचा मग महाल तो, कुणी बांधुनी मज देतो । 
कंदील त्याला जन म्हणती, मीच तयांतिल परि ज्योती। 
बत्तीचे ते रूप नवे, पुढे मिळाले मज बरवे। 
वरात मजवाचून अडे, झगमगाट तो कसा पडे। 
आता झाले मी बिजली, घरे, मंदिरे लखलखली । 
देवा ठाऊक काय पुढे, नवा बदल माझ्यात घडे। 
एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांला । 
कसलेही मज रूप मिळो, देह जळो अन्‌ जग उजळो।

बिजली या एका शब्दात सांगितलेल्या दिव्यांची पुढे ट्यूबलाइट, निऑन, सोडियम व्हेपर आणि आता एलीडी पर्यंत अनेक रूपे येत गेली आहेत. पण केरोसीन, पेट्रोल किंवा वीज यांनी उजळणाऱ्या दिव्यांचा समावेश या संग्रहात केलेला नाही.


प्राचीन काळातल्या माणसाने दिव्यांसाठी खोलगट दगड, शिंप, नारळाची करवंटी यांचा उपयोग केला असावा, असे अश्मयुगामधील अवशेषांमधून दिसते, पण त्याने त्यात घालण्यासाठी तेल आणि वात कुठून आणली याचा पूर्ण उलगडा होत नाही. मातीची भांडी घडवताना त्यानं पणती घडवली. धातूंचे शोध लागल्यानंतर तांब्यापितळेचे दिवे तयार झाले. श्रीमंत लोकांनी चांदीचे आणि अतीश्रीमंत लोकांनी सोन्यापासूनही दिवे बनवून घेतले. मातीची पणती आणि धातूंचे दिवे या दोन्ही प्रकारांमध्ये कला आणि कौशल्य या दोन्हींचा विकास होऊन त्यांचे निरनिराळे आकार तयार केले गेले. त्यात निसर्गामधील पाने, फुले, पक्षी, प्राणी वगैरे होते तसेच कलाकाराच्या कल्पनेमधून तयार झालेले आकारही होते. "इतिहास भारतीय दीपोंका" या लेखाबरोबर दिलेल्या चित्रांमध्ये हे दाखवले आहेत.


भारतीय संस्कृतीमध्ये दीपकाला फार महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम दीपप्रज्ज्वलनापासून सुरू होतो आणि पूजेच्या अखेरीला आरती असतेच. नवरात्रासारख्या उत्सवात देवीसमोर रात्रंदिवस तेवत राहणारा नंदादीप ठेवला जातोच, रोजच संध्याकाळी देवापुढे एक दिवा लावण्याची प्रथा होती. संधिकाळाच्या वेळेलाच दिवेलागणी असे नाव होते. दिव्याची अंवस आणि दीपावली हे तर खास दिव्यांचेच उत्सव असतात. देवळांच्या गाभाऱ्यामध्ये मोठमोठ्या समया असतातच, कांही ठिकाणी देवळांच्या समोर दगडांच्या उंचच उंच दीपमाळाही असतात.


दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेले सर्व दिवे देवघरात किंवा देवळांमध्ये ठेवण्यासाठी तयार केलेले आहेत. त्यामध्ये विविध घाट, सुंदर कलाकुसर आणि प्रतीकात्मकता आढळते. कांहींमध्ये देवतांची सुरेख चित्रे कोरलेली आहेत तर कांहीमध्ये पशुपक्षी. एका दिव्यात तर हत्तीवरील अंबारी आणि त्यातला माहूतसुध्दा दाखवला ओहे. कांहीं दिव्यांमध्ये एकच ज्योत आहे तर कांहींमध्ये अनेक वाती लावून अनेक ज्योतींसाठी सोय केलेली आहे.



भारतामध्ये देवाधर्मासाठी फक्त तेलातुपावर जळणाऱ्या दिव्यांचाच उपयोग केला जात असे, तर पश्चिमेकडील थंड प्रदेशात उजेडासाठी मेणबत्त्या लावल्या जात असत. पेट्रोलियमचा उपयोग सुरू झाल्यानंतर केरोसीन जाळून उजेड देणारे काचेचे कव्हर असणारे चिमणे दिवे आणि कंदील आले. तिसऱ्या चित्रामधील शैलीपूर्ण रोशनदानीमध्ये मेणबत्ती लावलेली आहे आणि तिच्यासंबंधीचे एक काव्य लिहिले आहे. ॐ आकाराच्या आणि पक्षीदीपांची खास वैशिष्टे दिली आहेत. बाकीचे दिवे चित्रकारांच्या कल्पनेतले आहेत.


जगामधील सर्वात उंच समई, कोरियामधील एक अजस्त्र दिवा, मेणबत्तीत दडून बसलेली कमनीय सुंदरी, काही जाळीदार सुंदर दिवे आदींची वैषिष्ट्यपूर्ण चित्रे चौथ्या चित्रात आहेत.




पुढील दोन चित्रांमध्ये मुख्यतः चित्रकारांची कल्पकता दाखवली आहे आणि शेवटच्या चित्रामध्ये शुभ दीपावलीचे सुबक असे संदेश आहेत.







No comments: