माझ्या लहानपणी दिवाळी म्हणजे अपरंपार महत्वाचा सण असायचा. त्या चारपाच दिवसांमधली खाद्यंति, नवे कपडे, दिवे, रांगोळ्या, फटाके, पाहुण्यांची गर्दी वगैरे सगळे काही जन्मभर लक्षात राहिले आहे. याचे कारण म्हणजे ते नेहमीपेक्षा खूपच वेगळे असायचे. त्या रेशनिंगच्या काळात रोजच्या आहारातली धान्येसुद्धा खुल्या बाजारात मिळायची नाहीत. रेशनच्या दुकानात जे आणि जेवढे धान्यधुन्य मिळेल तेच शिजवायचे आणि एकाद्या कालवणाबरोबर पोटात ढकलून भूक भागवायची अशी परिस्थिती होती. फक्त सणावाराच्या दिवशीच थोडे गोडधोड खायला मिळायचे. त्यामुळे दिवाळीतले चार दिवस रोज निरनिराळी पक्वान्ने आणि शिवाय इतर वेळी फराळाचे चविष्ट पदार्थ खाणे म्हणजे प्रचंड चंगळ होती. त्या काळात एरवी रोज जुनेच कपडे धुवून वापरायचे, उसवले तर शिवण मारून आणि फाटले तर ठिगळ लावून त्यांचे आयुष्यमान वाढवत रहायचे आणि मोठ्या भावाचे कपडे त्याला लहान व्हायला लागल्यावर ते लहान भावाने घालायचे अशीच रीत होती. दर वर्षी दिवाळीत मात्र नवे कपडे मिळत असल्यामुळे त्यांचे मोठेच अप्रूप वाटायचे.
आजकाल आपण सगळ्या प्रकारच्या मराठी पदार्थांशिवाय काश्मीरी राजमा ते दाक्षिणात्य डोसे, गुजराथी उंधियो ते बंगाली रोशगुल्ले, एवढेच नव्हे तर चिनी मांचूरिया ते इटालियन पिझ्झापर्यंत असंख्य खाद्यपदार्थ नेहमीच हॉटेलात जाऊन खातो किंवा ते घरबसल्या खायला मिळतात, कुठलेसे बंधू किंवा राम यांच्या नावांच्या खाद्यपदार्थांची पुडकी कपाटांमध्ये आणि डबे फ्रिजमध्ये पडलेले असतात. आपल्याला इच्छा होईल त्या क्षणी आपण गोड किंवा तिखटमिठाचा एकादा पदार्थ चाखू शकतो. त्यांच्या या वाढलेल्या उपलब्धतेमुळे आता दिवाळीतल्या खाण्याचे विशेष महत्वच वाटेनासे झाले आहे. त्याचप्रमाणे आपण नेहमीच भरमसाट कपडे खरेदी करत असतो आणि कृत्रिम धाग्यांचे आजकालचे कापड आटत नाही, विटत नाही की फाटत नाही आणि ते वर्षानुवर्षे नवे कोरेच दिसते. तरीसुद्धा दिवाळीला नेमाने नवे कपडे घेतो पण त्यापासून लहानपणी वाटायचा तेवढा आनंद मात्र आता मिळत नाही.
शिक्षण आणि नोकरीसाठी परगावी रहात असलेली आमच्या एकत्र कुटुंबातली झाडून सगळी मंडळी माझ्या लहानपणी दिवाळीला सहकुटुंब घरी जमायचीच. त्यांच्या आगमनाने आमचा वाडा एकदम गजबजून जात असे. त्यात लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातले लोक असायचे. मग गप्पागोष्टी, थट्टामस्करी, हास्यविनोद, गाणी, नकला, पत्ते आणि सोंगट्यांचे डाव वगैरेंमध्ये सगळा दिवस तर धमाल यायचीच, रात्रीसुद्धा गच्चीवर अंथरुणे पसरून त्यात दाटीवाटीने पडल्यापडल्या गप्पांचे फड खूप रंगायचे. लहानपणाबरोबरच हा अद्भुत अनुभव मात्र संपून गेला. पुढील काळात सारी भावंडे एक दोन खोल्यांच्या लहान लहान घरांमध्ये देशभर विखुरली आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी दिवाळीचे आकर्षण पुरेसे सशक्त राहिले नाही. मी मुंबईत असतांना दिवाळीमध्ये तिथल्या भावाकडे किंवा बहिणीकडे आवर्जून जात असे आणि एकादा दिवस ते माझ्याकडे येत असत. पुण्यामधली आप्त मंडळीसुद्धा दिवाळीतल्या एका दिवशी एकत्र जमत असत, पण हळूहळू हे भेटणेसुद्धा कमी होत गेले.
गेल्या काही वर्षांपासून आंतर्जाल (इंटरनेट) आणि दूरध्वनि (टेलीफोन) यांच्या माध्यमामधून मात्र जगभर पसरलेली आपली माणसे एकमेकांना जोडली गेली आहेत. पाहिजे तेंव्हा आपण त्यांच्याशी बोलू शकतो आणि त्यांना पिटुकल्या पडद्यावर डोळ्यांनी पाहू शकतो किंवा त्यांना समोर पाहता पाहता त्यांच्याशी बोलूही शकतो. वॉट्सअॅपवर सतत काही ना काही संदेशांची देवाणघेवाण चाललेली असते. त्यामुळे ते लोक इतके दुरावल्यासारखे वाटत नाहीत. या डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे काही जुने आणि आधी दुरावलेले मित्र किंवा आप्तसुद्धा आता आपल्या संपर्कक्षेत्रात आले आहेत.
या वर्षी दिवाळीला माझी नातवंडे त्यांच्या आईबरोबर 'मामाच्या गावाला' गेली होती. मुलाला ऑफिसमध्ये अत्यंत आवश्यक असे काम असल्यामुळे तो इथेच थांबला होता, पण घरी असतांनासुद्धा बहुतेक वेळ तो त्याच्या कँप्यूटरमध्ये डोके खुपसून आणि फोनवर कुणा सहकाऱ्याशी किंवा क्लायंटशी बोलत बसलेला असे. त्यामुळे 'मै और मेरी तनहाई' तेवढे एकमेकांना सोबत करत होतो पण इंटरनेटमधून अख्खी डिजिटल दुनिया मला भेटत होती आणि माझ्याशी बोलत होती. त्यातली काही माणसे खरीखुरी आणि आमच्या जवळची होती, तर काही मला या आभासी दुनियेत भेटलेली होती, त्यांनी आपला जो मुखवटा ठरवून दाखवला होता तेवढाच मला माहीत होता.
या दुनियेमध्येसुद्धा मोठ्या धूमधडाक्याने दिवाळी साजरी होत होती. अगदी वसुबारसेपासून ते भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवसाची व्यवस्थित सविस्तर सचित्र माहिती एका पाठोपाठ एक पहायला आणि वाचायला मिळत होती. वसुबारसेला कुठल्याही गोठ्यात न जाता मला सवत्स धेनूंचे दर्शन घडले. गाईच्या पोटात ३३ कोटी देव असतात म्हणे. एका शिल्पाच्या छायाचित्रात प्रतीकात्मक रीतीने गायीच्या पोटातले अनेक देव दाखवले आहेत. धनत्रयोदशीला समुद्रमंथनामधून धन्वंतरी प्रकट झाले म्हणून त्या दिवशी त्याचीही पूजा करतात हे मला माहीत नव्हते. तसेच दिवाळीत देवांचा खजिनदार कुबेर याचीही पूजा करतात म्हणे. देवादिकांनासुद्धा आजार होत असतील का? ते झाले तर धन्वंतरी आणि अश्विनीकुमार त्यांच्यावर कसले उपचार करत असतील? कुबेराकडे देवांचा कुठला खजिना असायचा? त्यात कुठले धन ठेवले असायचे? ते धन तो कुठे ठेवत असेल आणि त्याचा विनियोग कोण, केंव्हा आणि कसा करत असेल? असले प्रश्न मात्र कुणालाच पडत नाहीत. नरकचतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराला मारले असे मी लहानपणापासून ऐकत होतो, पण त्या दिवशी कालीमातेनेसुद्धा एकाद्या असुराला मारले असावे. मला आलेल्या एका शुभेच्छापत्रावर दिलेल्या चित्रात तसे दाखवले आहे तर दुसऱ्या चित्रात साक्षात शंकरालाच कालीच्या पायाशी दाखवले आहे. त्याचा उलगडा होत नाही. श्रीकृष्णाचे नरकासुराला मारतांनाचे चित्र मात्र कुठे दिसले नाही.
अमावास्येच्या रात्री सगळीकडेच भक्तीभावाने लक्ष्मीपूजन आणि दिव्यांची जास्तीत जास्त आरास करतात, त्याच्यापाठोपाठ फटाक्यांचा धुमाकूळ सुरू होतो आणि बराच वेळ चालतो. आजकाल वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणाचा विचार करून यावर अंकुश लावण्यासाठी बराच प्रचार होत असतो. या वर्षी निदान पुण्यात तरी त्याचा थोडा परिणाम झाला असावा असे वाटले. आमच्या भागात या वर्षी मी पहिल्यांदाच रहात होतो, पण आतापर्यंत इतर ठिकाणी जो कानठळ्या बसवणारा आवाज कानावर यायचा तसा या वर्षी इथे आला नाही. पाडव्याच्या दिवशी बालश्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला होता आणि त्याच्या छताखाली सर्व गोकुळाचे पावसापासून रक्षण केले होते. त्या घटनेनिमित्य या दिवशी उत्तर भारतात गोवर्धनपूजा करतात ही एक नवी माहिती समजली. कार्तिक शुद्ध द्वितियेला म्हणजे आपल्याकडल्या भाऊबीजेच्या दिवशी उत्तर भारतातले काही लोक चित्रगुप्त महाराजांची पूजा करतात हे आणखी एक नवे ज्ञान मला या वर्षी मिळाले.
दिवाळीच्या दिवसांमध्ये माझ्या डिजिटल विश्वातल्या मित्रांनी (यात नातेवाईकांचाही समावेश होतो) असंख्य शुभकामनासंदेश (ग्रीटिंग्ज) तर पाठवलेच, त्यानिमित्य अनेक अफलातून विशेष लेख आणि कविताही फेसबुक आणि वॉट्सअॅपवर पाठवून दिल्या. काही लोकांनी शास्त्रीय संगीताचे आणि एका मित्राने खास दिवाळीवरील अनेक मराठी गाण्यांचे रेकॉर्डिंग पाठवले. शिवाय टेलिव्हिजनवर रोज सकाळी दिवाळीपहाटेचे विशेष कार्यक्रम दाखवले जात होतेच, इतरही काही ना काही खास कार्यक्रम असायचे. रोजच्या डेली सोप म्हणजे नेहमीच्या मालिकांमधल्या कुटुंबांमध्येसुद्धा दिवाळीमधला प्रत्येक दिवस अगदी साग्रसंगीत साजरा होतांना दिसत होता. अंगाला तेल लावून मालिश करणे, तबकात निरांजन आणि सुपारी ठेऊन आणि ओवाळून औक्षण करणे, सर्वांनी मिळून हास्यविनोद करत फराळ करणे वगैरे तपशीलासह दिवाळीतले घरगुती प्रसंग इतके हुबेहूब चित्रित केले होते की ते माझ्या आजूबाजूलाच घडत असल्याचे वातावरण निर्माण करत होते. गंमत म्हणजे खरी दिवाळी संपून गेली तरी यांची दिवाळी आणखी २-३ दिवस हळूहळू चाललेलीच होती.
माझ्या काही आप्तांनीसुद्धा आपल्या पोस्टमध्ये तो सण कुणीकुणी कसा साजरा केला यांची अनेक छायाचित्रे (फोटो) आणि चलतचित्रे (व्हीडिओ) पाठवली होती. त्यात फराळाचे पदार्थ, किल्ले, फुलबाज्या, ओवाळण्याचे कार्यक्रम वगैरे सगळे काही छान दाखवले होते. ती चित्रे पाहतांना मीसुद्धा मनाने त्यांच्या उत्साहात सहभागी होत होतो. त्याशिवाय रोज सकाळसंध्याकाळी टेलीफोन आणि व्हीडिओ कॉल्स होत होतेच.
मी कॉलेजशिक्षणासाठी आणि नोकरीसाठी घरापासून दूर रहात असतांनासुद्धा दरवर्षी दिवाळीला मात्र नेमाने घरी जात असे. दिवाळीच्या दिवशी एकट्याने घरात बसून राहण्याचा हा माझ्या आयुष्यातला पहिलाच अनुभव होता. पण मी एकटा कुठे होतो? "लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी। भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी॥" असे म्हणत प्रत्यक्ष माणिक वर्मांनी माझ्या दिवाळीची सुरुवात करून दिली होती. साक्षात बिस्मिल्लाखानांच्या सुस्वर अशा शहनाईवादनाने माझी मंगलप्रभात सुरू होत होती. त्यानंतर पं.भीमसेनअण्णा आणि कुमारजी वगैरे थोर दिवंगत मंडळींपासून ते राहुल आणि कौशिकीपर्यंत आताची तरुण गायक मंडळी यांची शास्त्रीय संगीताची मेजवानी मिळत होती. शिवाय लतादीदी, आशाताई, रफी, मुकेश, किशोर वगैरेंची तर विविध प्रकारची हजारो सुरेल गीते साथीला होतीच. संगीत ऐकून झाले असेल तर वाचण्यासाठी अनेक विनोदी किंवा माहितीपूर्ण पोस्टांचा प्रवाह या सोशल मीडियावर अखंड वहात होता. त्यांच्याहीपेक्षा मजेदार अशी चित्रे, चलचित्रे आणि व्यंगचित्रे छान मनोरंजन करत होती. लिहायचा मूड आला तर माझे स्वतःचे ब्लॉग होतेच, फेसबुकवरही लिहिण्याची सोय होती. फेसबुक आणि वॉट्सअॅपवरील मित्र त्यावर 'आवडले' (लाईक)चे शिक्के मारून उत्साह वाढवत होते किंवा काही वेळा आपले शेरे मारत होते, तसेच मी इतरांच्या लेखनावर करत होतो. त्यावर मग उत्तरप्रत्युत्तरांच्या फैरी झडत होत्या आणि या विषयावर आपली मते भिन्न असल्यामुळे "वुई अॅग्री टु डिसअॅग्री"वर जाऊन त्या थांबत होत्या. हे सगळे एरवीसुद्धा चालतच असते. दिवाळीमुळे त्यात खंड पडला नव्हता. या सर्वांच्या साथीमुळे मला केंव्हाच एकटा पडल्यासारखे वाटलेच नाही.
तेंव्हा अशा रीतीने साजरी झालेली ही माझी पहिली डिजिटल दिवाळीसुद्धा मला आनंदाचे दोनचार क्षण देऊनच गेली. या वर्षी मला आलेल्या आणि आवडलेल्या खास संदेशांचा एक संग्रह करून मी तो या ठिकाणी जपून ठेवला आहे.
https://anandghare.wordpress.com/2018/11/13/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE/
No comments:
Post a Comment