विद्यार्थीगृहातला काळ
आमच्या काळातल्या हॉस्टेलच्या खोल्यांमध्ये कपाटे किंवा कोनाडे नसायचे. मी आपले चांगले कपडे, महत्वाची कागदपत्रे, पैसे वगैरे गोष्टी एका पत्र्याच्या ट्रंकेत भरून तिला पलंगाखाली सरकवून ठेवत असे. माझे बाकीचे सामान उघड्यावरच पडलेले असायचे. अशा परिस्थितीत मी कसले कलेक्शन करणार आणि त्याचा संचय कुठे जपून ठेवणार ? नाही म्हणायला रेल्वे, बस किंवा सिनेमाची तिकीटे शर्टांच्या खिशांमध्ये काही काळ पडून राहिलेली असत. त्या काळातल्या रहस्यकथांमध्ये त्यांचे फार महत्व असायचे. एकादी विचित्र घटना घडली तर आपण तिचे साक्षीदार असण्याचा किंवा तिथे हजर नसण्याचा तो भक्कम पुरावा मानला जात असे. त्यामुळे कधी गरज पडली असती तर मला त्यांचा उपयोग करून घेता आला असता, पण तशी वेळ कधी आलीच नाही. ते शर्ट धुवायची वेळ आली की त्यांच्या खिशांमधले चिटोरे बाहेर काढून टाकून दिले जात, नाही तर शर्टांबरोबर त्यांचीही धुलाई होऊन जात असे.हॉस्टेलमध्ये रहात असतांना वस्तूंचा संग्रह करायची सोय नसल्यामुळे माझ्या मनातल्या कलेक्टरला अजीबात कामच नव्हते असे मात्र नाही. त्या काळात मला वस्तू जमवून ठेवणे कठीण होते म्हणून त्या मानसिक संग्राहकानेच दुसरे काम मनावर घेतले. मी लहान गावातले घर सोडून शहरांमधल्या हॉस्टेलमध्ये रहायला गेल्यावर माझ्या रोजच्या जीवनात खूप फरक पडला होता. तिथली व्यवस्था आणि ती ठेवणारी माणसे यांची माहिती करून घ्यायची होती. हॉस्टेलमधली कांही मुले मराठी भाषेच्या वेगळ्या बोली बोलत होती तर कांही वेगळ्या भाषा बोलत होती. मराठीभाषिक मुलांकडून नवे शब्द, वाक्प्रचार वगैरे ऐकायला मिळत. अमराठी मुलांशी संभाषण करण्यासाठी मला इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये बोलावे लागत होते. मी या भाषांचा पुस्तकी अभ्यास केला असला तरी आमच्या लहान गावात त्यांमधून चार शब्दसुद्धा कधी बोलायची गरज पडली नव्हती. त्यामुळे हॉस्टेलमधली इतर मुले कसे बोलतात ते लक्षपूर्वक ऐकून ते समजून घेऊन मनात साठवून ठेवत होतो. कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये रोज येत असलेले नव नवे अनुभव मी जाणीवपूर्वक गोळा करत राहिलो. या गोष्टी वस्तूंप्रमाणे डोळ्याला दिसत नसल्या तरी त्या मनामध्ये साचून रहात होत्या. या सगळ्यांशिवाय कॉलेजमधला प्रचंड अभ्यास तर होताच, शिकलेले धडे लक्षात ठेवले नाहीत तर मी परीक्षेत काय लिहिणार होतो ? शिवाय तिथे साठवलेली ज्ञानाची शिदोरीच मला पुढे जन्मभर उपयोगी पडणार होती.
जुनी भारतीय नाणी
मी शाळेत शिकत असतांनाच भारत सरकारने दशमान पद्धतीची अंमलबजावणी करायचे ठरवले आणि त्यानुसार नवी वजने आणि मापे आणलीच त्याप्रमाणे नवे चलनसुद्धा प्रसारात आणले. इंग्रजांच्या काळातल्या रुपये, आणे, पै या पद्धतीच्या जागी १०० नव्या पैशांचा रुपया झाला. ते करत असतांना सरकारने रुपयाचे मूल्य आधीच्याइतकेच ठेऊन नवा पैसा हे नवे नाणे काढले आणि सोयीसाठी २,३,५,१०,२०,२५ आणि ५० नव्या पैशांची नाणी आणली. मात्र हे डिमॉनेटायझेशन एका रात्रीत करणे शक्यच नव्हते. ते काम सावकाशपणे एक दोन वर्षे चालले होते.
पै या जुन्या काळातल्या नाण्याची किंमत कवडीपेक्षाही कमी झाल्यामुळे ही दोन्ही चलने बहुधा माझ्या जन्माच्याही आधी नाहीशी झाली होती. ढब्बू पैसा, भोकाचा पैसा, दोन पैसे, आणा, चवली, पावली, अधेली वगैरे नाणी माझ्या लहानपणी प्रचलित होती. "नवे पैसे येणार" अशी बातमी आल्यानंतर किती तरी दिवस आम्ही त्यांची आतुरतेने वाट पहात होतो. आमच्या गावातल्या बाजारात ते येऊन पोचल्यानंतर आधी तर ती नवी नाणी मिळवून जपून ठेवायची चढाओढ लागली आणि जुनी झिजलेली किंवा काळवंडलेली नाणी खर्च होत राहिली. "तुमच्याकडचे जुने पैसे इथे द्या आणि नवे पैसे घेऊन जा." अशी आम जनतेसाठी काढलेली कसली स्कीम आमच्या गावात पाहिल्याचे मला तरी आठवत नाही. ही नवी नाणी ट्रेझरीमधून बॅकांकडे आणि त्यांच्याकडून परस्पर व्यापाऱ्यांकडे जात असावीत आणि व्यापारी जमा झालेला जुन्या पैशांचा गल्ला त्यांच्याकडे नेऊन भरत असावेत. आमच्या घरातल्या पैशांच्या डब्यातली जुनी नाणी जसजशी कमी होत चालली तसे मला त्यांच्याबद्दल प्रेम वाटायला लागले होते, आपण ती खर्च करू नये असे मला वाटत होते पण कोणीच माझे ऐकून घेत नव्हते. अखेरीस हट्ट धरून मी थोडी नाणी मागून माझ्या ताब्यात घेतली.
त्या काळात कुणाकडे जेवायला गेल्यास वर पैसा दोन पैसे दक्षिणा मिळायची, तसेच आमच्याकडे येऊन गेलेले काही पाहुणे खाऊ आणायसाठी म्हणून किंवा त्यांची आठवण म्हणून चार आठ आणे हातावर ठेऊन जात असत. ती नाणी मात्र मी घरातल्या पैशांच्या डब्यात टाकायला देत नव्हतो. कधी कधी बाजारात न चालणारी काही भलतीच नाणी चुकून घरी आलेली असत. घरातल्या कुठल्यातरी कोनाड्याच्या किंवा कपाटाच्या कोपऱ्यात पडून राहिलेली पण आता बाद झालेली जुनी नाणी पुढल्या काळात अचानक सापडत तेंव्हा मला खूप आनंद होत असे. अशी कांही जुनी नाणी मी जमवून ठेवली होती. घरातल्या आणखी कोणाला सापडू नयेत म्हणून मी ती लपवून ठेवत होतो. कॉलेज शिक्षणासाठी घर सोडल्यानंतर सुद्धा मी त्यांची पुरचुंडी मात्र जिवापलीकडे सांभाळून ठेवली आणि ती नाणी आजपर्यंत माझ्याकडे आहेत.
नाण्यांची वैशिष्ट्ये
मी शाळेत असतांना जसे चित्रविचित्र आकारांचे दगड, गारगोट्या, शिंपले वगैरेंचे कलेक्शन करत होतो तेवढ्याच उत्साहाने निरनिराळी नाणी गोळा करत होतो. काडेपेट्यांचे छाप, सिगरेटची (रिकामी, उगीच संशय नको) पाकिटे, फुलबाज्यांचे डबे यासारख्या कागद किंवा पुठ्ठ्याच्या नाशिवंत पदार्थांना घरातच अनेक शत्रू होते, उदाहरणार्थ दंमट हवा, भिंतीतली ओल, मुंग्या, झुरळे, उंदीर आणि स्वच्छता व टापटीप. माझ्या खजिन्यातल्या इतर कांही वस्तूंचा समावेशसुद्धा पसारा या कॅटेगरीत होत असल्याच्या गुन्ह्यासाठी त्यांना हद्दपारीची शिक्षा मिळत असे. ज्या कोणा महाभागाने टापटीप आणि पसारा या दोन शब्दांचा शोध लावला तो माझा शत्रू नंबर एक होता. त्याच्या अंगावर शाई आणि राड टाकावी, त्यांच्या नाकातोंडात भुसा आणि राख कोंबावी असे मला त्या वेळी वाटायचे.माझ्या पसाऱ्यातल्या इतर वस्तूंपेक्षा नाण्यांमध्ये काही खास वैशिष्ट्ये होती. प्रत्येक नाण्यावर एकाद्या राजाचे वा राणीचे चित्र किंवा राजमुद्रा असायची, तसेच त्यांचे मूल्य आणि ते तयार केल्याच्या वर्षाची नोंद असायची. यातून प्रत्येकाची एक ओळख असायची. त्यामुळे ती मी अधिक काळजीपूर्वक सांभाळून ठेवली होती. अधून मधून त्यांना चिंच लावून रांगोळीने घासून पुसून चमकवत होतो. त्यांना मिळालेल्या या खास वरिष्ठ दर्जामुळे ती मात्र माझ्याकडे शिल्लक राहिली.
नाणी जमा करण्यामागे माझा हौसेपलीकडे कुठलाच विचार किंवा उद्देश नसायचा. मोठे झाल्यानंतर सुद्धा "तू न्यूमिस्टॅटिस्ट आहेस का?" असे मला कुणीतरी विचारले तेंव्हा मी तर सरळ "नाही रे बाबा." म्हणून टाकले. हा प्राणी कुठला स्पेशालिस्ट असतो की भ्रमिष्टाचा प्रकार असतो तेच मला ऐकूनही ठाऊक नव्हते. थोडी चौकशी केल्यानंतर समजले की न्यूमिस्टॅटिस्ट अशा भारदस्त नावाचे लोक नाणी जमवण्यासारखे प्रकार करतात म्हणे. शिवाय नाण्यांचेसुद्धा एक शास्त्र असते आणि हे लोक त्या शास्त्राचा सखोल अभ्यास करतात. मला असले काही करायचे नव्हते, माझ्याकडे तेवढा उत्साहही नव्हता आणि वेळही.
परदेशांमधली नाणी
त्यानंतर मला आठवडाभरासाठी परदेशी जाऊन यायची एक संधी मिळाली. मला त्या काळात दिवसाला मिळणाऱ्या वीस डॉलर्स एवढ्या घसघशीत प्रवासभत्त्यामध्ये जेवणखाण आणि इतर किरकोळ खर्च भागवायचा होता आणि ते करून उरलेल्या शिल्लकेमधून पत्नी आणि मुलांसाठी कांही तरी वस्तू न्यायच्या होत्या. तोंपर्यंत मॅकडोनाल्ड सुरू झाले नव्हते पण फिश अँड चिप्स आणि बर्गर किंवा वडापावसारखे दिसणारे युरोपातले पदार्थ पुरवणारी कोपऱ्यावरची दुकाने असल्यामुळे रात्रीच्या जेवणाऐवजी ते चाखून पाहिले. मी त्यापूर्वी कधीही न खाल्लेली अनेक प्रकारची बिस्किटे, क्रॉइसाँ, मुफिन्स, पफ्स वगैरेंची पाकिटे स्टोअर्समधून आणून ठेवली होती. ती भरीला असल्यामुळे व्यवस्थित उदरभरण होत होते. तिकडे जातांना नेलेले सगळे ट्रॅव्हलर्स चेक आणि नोटा दुकानदारांना देण्यात संपल्या, पण त्यांनी परत केलेली जर्मनी आणि इंग्लंडमधली चिल्लर नाणी तेवढी खिशात खुळखुळत शिल्लक राहिली. त्यामधून माझ्या नाणेनिधीत भर पडली आणि तो आंतरराष्ट्रीय झाला. आणखी कांही वर्षांनी कॅनडाची एक वारी झाली, त्यात अमेरिकेतली नाणी मिळाली.
माझी मुले मोठी होऊन नोकरीला लागल्यानंतर लवकरच त्यांचे परदेशभ्रमण सुरू झाले आणि परत आल्यावर त्यांनी आणलेली नाणी मला मिळत गेली. त्यातून थायलंड, सिंगापूर, सौदी अरेबिया यासारख्या आशियातल्या देशांची तसेच स्पेन, इटली, नेदरलँड यासारख्या देशांची स्वतंत्र नाणी माझ्याकडे आली. पुढे आम्ही युरोपच्या टूरवर गेलो तोंपर्यंत युरोपियन युनियन झाले होते आणि आम्ही सतरा देशांमधून फिरून आलो असलो तरी स्विट्झरलँड सोडून इतर सगळीकडे युरो हे एकच चलन होते. प्रवासाच्या दृष्टीने ते सोयीचे होते पण त्यात विविधता नसल्यामुळे उगीच भाराभर चिल्लर जमवून ठेवण्यात अर्थ नव्हता. मुलांना भेटायच्या निमित्याने इंग्लंड अमेरिकेतही जाणे येणे आणि राहणे झाल्यानंतर पौंड आणि डॉलरचे अप्रूप राहिले नाही.
माझ्या एका मित्राने विविध देशांची नाणी जमवली असल्याचे मला बोलण्यामधून समजले तेंव्हा एकमेकांकडे नसलेले एकादे नाणे एक्स्चेंज करायचे ठरले. मात्र मी त्याला एक चांगला बंदा डॉलर दिला आणि त्याने एका निराळ्याच देशातले एक क्षुल्लक नाणे दिले. म्हणजे आर्थिक दृष्ट्या पहायला गेले तर त्यात माझे नुकसान झाले, पण माझ्याकडे आणखीही डॉलर्स होते आणि ते नाणे मिळण्याची शक्यताही नसल्यामुळे ते अनमोल होते.
या दीर्घ कालावधीमध्ये भारतातल्या चलनामध्ये कांही घडामोडी झाल्या. १,२,३,५ आणि १० पैशांची नाणी निरर्थक किंवा अर्थशून्य होऊन एका पाठोपाठ एक करत व्यवहारातून अदृष्य झाली होती. कांही वर्षांनंतर २५ आणि ५० पैशांनाही कांही मोल उरले नाही. २, ५ आणि १० रुपयांची नाणी निघाली. अनेक संत, नेते, सण, सोहळे यांच्या स्मरणार्थ खास नाणी प्रसारित करण्यात आली. या सगळ्यांचे नमूने माझ्याकडे साठत गेले.
................ (क्रमशः)
No comments:
Post a Comment