Saturday, July 21, 2018

माझी संग्रहवृत्ती - भाग १


प्रस्तावना 

कोणतीही नदी उगमापासून निघून समुद्राकडे जात असतांना तिच्याबरोबर दगड, माती, झाडांच्या फांद्या, पाने वगैरेंना वाहून नेते तसेच त्यांना ठिकठिकाणच्या किनाऱ्यावर पसरतही जाते. कांही ठिकाणी त्यांचा गाळ साचून सुपीक जमीन तयार होते तर कांही ठिकाणी नदीकाठी एक लहानसे वाळवंट बनते. आपण गाळाच्या चिखलात तर सहजपणे जाऊ शकत नाही, पण नद्या किंवा समुद्र यांच्या किनाऱ्यावरच्या वाळवंटात रमत गमत फिरत रहायला सर्वांना आवडते. अशा वेळी आपल्या मनातले लहान मूल जागे होते आणि वाळूत पसरलेले गुळगुळीत, रंगीत किंवा चमकदार लहान लहान खडे, दगड, तसेच शंख, शिंपले वगैरे वेचायला लागते. एक एक गोष्ट खिशात टाकता टाकता खिसे भरून जातात, रुमालात गुंडाळून त्याची पोटली होते किंवा एकाद्या कागदात गुंडाळून त्याचा पुडा केला जातो. अधून मधून ते उघडून पाहिले तर त्यातल्या कांही वस्तू रस्त्यात पडून गेलेल्या असतात, तर कांही आपल्यालाच नको वाटतात म्हणून आपण टाकून देतो. उरलेल्या थोड्या वेचक वस्तू आपण घरी नेतो आणि कांही काळ ठेऊन देतो. असे जवळपास सगळ्यांच्या बाबतीत घडत असावे, पण मला त्याचा थोडा जास्तच सोस आहे.

आपल्या आयुष्यातसुद्धा अनेक घटना घडतात, अनेक माणसे भेटतात, आपण अनेक गोष्टी शिकत असतो, पुस्तके वाचतो, नाटकसिनेमे पाहतो, पर्यटन करतो. या सगळ्यांच्या कांही आठवणी मनात कुठेतरी साठत असतात तसेच विस्मरणात जात असतात. त्यातले चमकदार, रंगीबेरंगी, चित्रविचित्र आकारांचे कण उठून दिसतात. त्यांच्याबद्दल चार शब्द लिहिण्याचा प्रयत्न मी गेली दहा वर्षे या ब्लॉगमधून करत आलो आहे. या मनातल्या गोष्टींशिवाय किंवा कधी कधी त्यांच्याशी निगडित असलेल्या कांही वस्तूसुद्धा आपल्याकडे साठत जातात. आठवण म्हणून किंवा पुन्हा कधीतरी पहाव्याशा वाटल्या तर जवळ असाव्यात म्हणून आपण त्या ठेऊन घेतो, लगेच टाकून देत नाही. मी अशा असंख्य गोष्टींचा संग्रह करून ठेवला आहे.

मी माझा हा संग्रह कुणालाही दाखवत नाही. इतरांना ती अडगळ वाटण्याची दाट शक्यता असते. त्यातली कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी मी विशेष प्रयत्न केला नव्हता किंवा ती मुद्दाम तेवढ्यासाठी विकत घेतली नव्हती. त्यामुळे याला माझा आवडता छंद असे म्हणता येणार नाही. आपले नांव अमक्या तमक्या बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यावे अशी  इच्छा मला कधीच झाली नाही. मी तसे प्रयत्न करायचा विचारही मनात आणला नाही. नदीच्या किनाऱ्यावर वाळू, गारगोट्या आण शंखशिंपले जमावेत तितक्या सहजपणे त्या वस्तू , ती चित्रे किंवा ते कागद माझ्याकडे येत राहिले आणि बरीच वर्षे मला रहायला प्रशस्त घर मिळाले असल्यामुळे त्यातल्या कुठल्यातरी कान्याकोपऱ्यात त्यांना जागा मिळत गेली.

काँप्यूटर्सची स्मरणशक्ती फारच वेगाने वाढत गेली आणि त्यात असंख्य फाइली साठत गेल्या. आता तर क्लाऊड किंवा ढगांमध्येच त्या साठवायची सोय झाल्यामुळे त्याला कसलीच मर्यादा राहिली नाही. याच्या उलट गूगलमधून आपल्याला हवे ते क्षणात शोधून काढायची सोय झाल्यामुळे आपल्या स्वतःच्या संग्रहाचे कांहीच महत्व राहिलेले नाही. पण म्हणून त्या गोळा करण्यासाठी मी जन्मभर केलेली मेहनत वाया गेली असेच कांही म्हणता येणार नाही. कारण त्या जमा करण्याच्या कामातच माझे समाधान मला मिळून गेले होते. त्यांना पुन्हा पहाण्यातला आनंद म्हणजे बोनस आहे.

अनुभव, माणसे किंवा प्रसंग यांच्याविषयी लिहित असतांनाच माझ्या अशा संग्रहांबद्दलही चार शब्द लिहावे असे माझ्या मनात आले आणि ते लिहायला मी सुरुवात केली. आधी फेसबुकवर स्टेटस म्हणून टाकून पाहिले आणि त्यांचे संकलन करून आता हा ब्लॉग लिहीत आहे.

कलेक्टर 

जुन्या काळातली माझी आई चूल, मूल, नातेवाईक आणि देवधर्म यातच नेहमी गुंतून पडलेली असल्यामुळे बाहेरच्या जगाबद्दल तिला अंधुकशी माहिती होती. तिच्या दृष्टीने मामलेदार हीच खूप मोठी आणि कलेक्टर ही तर बहुधा सर्वात मोठी आणि पॉवरफुल पोस्ट होती. घरातला कोणी मुलगा आळशीपणा करून काम करणे टाळत असला तर त्याला "तू काय आपल्याला कलेक्टर समजतोस काय ?" असे विचारले जायचे. कलेक्टरच्या वर कदाचित थेट राजा आणि त्याच्यावर खुद्द परमेश्वरच होता. लोकशाही आल्यानंतर त्यातल्या राजाच्या जागी मंत्री आले, पण आईच्या दृष्टीने त्यामुळे फारसा फरक पडला नव्हता.  आपल्या मुलांनी चांगले शिकून कलेक्टर व्हावे अशी तिची इच्छा होती, पण त्यासाठी काय शिकावे लागते हे तिलाही माहीत नव्हते किंवा तिच्या मुलांनाही ते समजले नाही. ती आपली त्यांना मिळेल ते शिक्षण घेऊन मिळेल त्या नोकरीला लागली. त्यातलाच एक म्हणजे मी.

शाळेत इंग्रजी भाषा शिकत असतांना कलेक्ट म्हणजे गोळा करणे आणि कलेक्टर म्हणजे गोळा करणारा असे या शब्दांचे अर्थ समजले. कलेक्टर नावाचा ऑफीसर काय काय जमा करतो याचा मात्र मला कांहीच पत्ता नव्हता. त्याचा प्रचंड रुबाब असतो एवढेच मी लहानपणी ऐकले होते. रयतेकडून रेव्हेन्यू म्हणजे मुख्यतः शेतसारा जमा करून तो सरकारी तिजोरीत भरण्यासाठी इंग्रजांनी हे पद निर्माण केले होते. पण तो प्रत्यक्षात जिल्ह्याचा राज्यकारभार सांभाळणारा एक जबाबदार सरकारी अधिकारी असतो आणि काही कलेक्ट करण्याव्यतिरिक्त इतरच खूप कामे त्याला करायची असतात हे मला खूप उशीराने कळले.

लहानपणीचे कलेक्शन

 मला अगदी लहानपणापासूनच जे मिळेल ते गोळा करून ठेवायचा नाद होता, तो मला कोणी कलेक्टर बिलेक्टर व्हायचे होते म्हणून नव्हे. तशी बहुतेक सगळ्याच मुलांना ती आवड असते, पण मला थोडी जास्त होती. त्या काळातले वातावरण काटकसरीचे होते. वापरा आणि फेकून द्या (यूज अँड थ्रो) हा माजोरी प्रकार अजून सुरू झाला नव्हता. कपडे फाटले तरी ते शिवून आणि ठिगळे लावून वापरायचे आणि पुढे त्याच्या चिंध्यांचासुद्धा या ना त्या गोष्टी पुसण्याच्या कामासाठी उपयोग करून झाल्यावर अखेर त्या बंबात जळून पाणी तापवायचे काम करत. घरातली कुठलीही वस्तू शक्य तो टाकून दिली जात नसे. त्यामुळे माझ्याकडे आलेल्या वस्तूसुद्धा मी गोळा करून ठेवत असे.

 त्या लहान गावात मला मिळून मिळून असे काय काय मिळणार होते ? त्या काळात पॉकेट मनी हा शब्द ऐकूनही ठाऊक नव्हता आणि आमच्या गावात हॉबीच्या वस्तूंची दुकाने नव्हती.  मी आपले चिंचोके, कवड्या, सोंगट्या, गजगे (सागरगोटे), गोट्या, भोंवरे अशा आमच्या खेळायच्या वस्तू जमवून ठेवत असे, शिवाय विचित्र आकारांचे किंवा रंगीबेरंगी खडे, गारगोट्या, शंखशिंपले वगैरेही त्यांच्या सोबतीला असत. रिकाम्या काडेपेट्या आणि त्यांच्यावरची चित्रे, लहानसहान डब्या, बाटल्या, त्यांची झांकणे, खोके, पुठ्ठे वगैरेंनी माझा खजिना हळूहळू भरायला लागला. क्वचित कधी घरी पोस्टाने एकादे पाकीट आले तर मी हळूच त्याच्या लिफाफ्यावरचे तिकीट काढून घेत असे.

आमच्या लहानपणीच्या काळातले बहुतेक शिक्षण मौखिक घोकंपट्टीचेच असायचे.  शाळेतल्या अभ्यासासाठी अगदी थोडी लहानशी पुस्तके आणि वहीच्या नावाने फक्त एक रफबुक असायचे.  शाळेच्या इन्स्पेक्शनची वेळ आली की घाईघाईने त्यातला काही भाग चाळीस चाळीस पृष्ठांच्या फेअर वह्यांमध्ये लिहून काढत असू.  त्यामुळे आमच्यावर पुस्तकवह्यांचा जास्त भार नव्हता किंवा त्या फार जास्त जागा अडवून ठेवत नसत. शाळेतल्या अभ्यासासाठी पेन्सिली, खोडरबर, कंपास पेटी, दौत टाक, फाउंटन पेन वगैरेंचीही गरज असायची. चित्रकलेसाठी रंगीत पेन्सिली, रंग, ब्रश वगैरे गोष्टी लागायच्या. या सगळ्या वस्तूंच्या सोबतच मी गोष्टीची पुस्तके आणि गोळा केलेला माझा सगळा खजिना  मला मिळालेल्या एका लहानशा कोनाडेवजा कपाटात कोंबून ठेवत असे.

अधून मधून माझी आई माझे कपाट आवरायचे म्हणून हे सगळे सामान कपाटाबाहेर बाहेर काढत असे आणि उगाच पसारा नको म्हणत त्यातल्या बऱ्याचशा वस्तू फेकून देत असे. एक दोन दिवस चिडचिच करून झाल्यावर मी पुन्हा नव्या जोमाने माझे कलेक्शनचे काम सुरू करून देत असे.

................... (क्रमशः)


No comments: