मी हा लेख तीन भागात लिहिला होता. वाचकांच्या सोयीसाठी आणि लेखांची संख्या मर्यादित ठेवायच्या दृष्टीने ते तीनही भाग एकत्र करून त्यांचे थोडे संपादन केले. दि.०८-०४-२०२१
**********
माझा मोठा भाऊ उपजतच प्रतिभावान आणि विचारवंत होता. आम्ही त्याला 'भाऊ' असेच म्हणत होतो. तो शाळेत शिकत असतांनाच त्याने आमच्या मोठ्या बहिणीसाठी एक अर्थपूर्ण असे हादग्याचे गाणे लिहिले होते. त्याची सुरुवात अशी होती.
एके दिवशी जिजाबाई म्हणाली शिवाजीला ।
कोंढाणा गड सर करून दे मजला । ......
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची वीररसपूर्ण गाथा त्या गाण्याच्या पुढच्या ओळींमध्ये सांगितली होती. ते गाणे मोठ्या बहिणीकडून तिच्या लहान आणि माझ्या मोठ्या भावंडांमार्फत माझ्यापर्यंत येऊन पोचले होते. 'सिंहगड' हे नाव मी बहुधा त्या गाण्यामध्येच पहिल्यांदा ऐकले असणार.
आमच्या लहानपणी टीव्ही तर नव्हताच, चित्रमय पुस्तकेसुद्धा फार कमी असायची. त्यामुळे आमचे विश्व पिटुकले होतेच, सामान्यज्ञानही अगदी तोटके असायचे. 'सिंह' आणि 'गड' हे फक्त दोन ऐकीव शब्द होते. सिंह हा एक हिंस्र रानटी प्राणी असतो आणि गड म्हणजे डोंगरावर बांधलेला किल्ला असतो एवढे ऐकीव सामान्यज्ञान होते. मी प्रत्यक्षात कधी कुठलाही किल्ला पाहिला नव्हता की ख-या सिंहाचे दर्शनही घडले नव्हते. तसे आम्ही दर वर्षी दिवाळीला मातीचे किल्ले बांधत होतो आणि त्यात वाघसिंहांसकट अनेक प्राण्यांची खेळणी किंवा चित्रे ठेवत होतो एवढेच. यामुळे ख-या सिंहगडाच्या आसपास बहुधा सिंहांची वसती असेल नाही तर त्या डोंगराचा आकार एकाद्या सिंहासारखा असेल म्हणून त्याला सिंहगड म्हणत असतील अशासारखे अंदाज लहानपणी मनात येत असत. एकदा कुणीतरी आम्हाला तानाजीची गोष्ट सांगितली तेंव्हा थोडा उलगडा झाला, पण भाषेमध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक वगैरे अलंकार असतात हे तोंपर्यंत अजून समजले नसल्याने "माणसाला सिंह का म्हंटलं असेल?" अशी शंका मनात राहिलीच.
मी वरच्या इयत्तांमध्ये गेल्यानंतर पुस्तके वाचायला लागलो तेंव्हा कै.हरी नारायण आपटे यांची "गड आला पण सिंह गेला" ही ऐतिहासिक कादंबरी हातात पडली आणि ती वाचता वाचता मी पुरता भारावून गेलो होतो. या कादंबरीच्या नावाशिवाय त्यातले काही संवादसुद्धा आता मराठीतले वाक्प्रचार झाले आहेत. उदाहरणार्थ "आधी लगीन कोंढाण्याचे", "मागे फिरायचे दोर कापलेले आहेत.", "थूः तुमच्या जिनगानीवर" वगैरे. नरवीर तानाजीशिवाय शेलारमामा, सूर्याजी, यशवंती घोरपड वगैरे कांही नावे माझ्या ओळखीची झाली होतीच. सिंहगडाचा त्या काळचा परिसर, त्या गडावरील बुरुज, तटबंदी, माच्या वगैरेंचीही काही पुसटशी कल्पनाचित्रे मनात चितारली गेली होती. पण आमच्या गावापासून तो किल्ला खूपच दूर असल्यामुळे तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची त्या काळात तरी काही शक्यताच नव्हती.
मी इंजिनियरिंगच्या शिक्षणासाठी पुण्याला आलो तेंव्हा आता सिंहगड पहायला मिळणार म्हणून खूष झालो होतो. तसे मी माझ्या हॉस्टेलमधल्या नव्या मित्रांना सांगितले आणि एका रविवारी त्यांनी सिंहगडावर जायचा कार्यक्रम ठरवलासुद्धा. पण त्यातले बहुतेकजण सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशासारख्या शहरांमधून आलेले होते आणि सायकली चालवण्यात पटाईत होते. मला तर त्या कसरतीची अजीबात संवय नव्हती. गंमत म्हणून जेमतेम अर्धापाऊण तास सायकल चालवली तरी माझ्या पायात गोळे यायचे आणि त्यानंतर ते आठवडाभराचे दुखणे होत असे. यामुळे माझ्या (दगाबाज) मित्रांनी सिंहगडाला सायकलींवरून जायचे ठरवल्यावर त्यांनी मला त्या बेतातून कटापच केले. त्या काळात म्हणजे एकोणीसशे साठच्या दशकात 'बाईक' हा प्रकार मुलांसाठी नव्हताच आणि माझ्या हॉस्टेलमधल्या कुठल्याही मित्राकडे स्कूटरसुद्धा नव्हती. शहरात राहणारी काही मुले कधी तरी घरातल्या कुणाबरोबर तरी स्कूटरवरून कॉलेजला येत असत. यामुळे मला सिंहगडापर्यंत जायला लिफ्ट मिळायचीही शक्यता नव्हती. त्या काळातसुद्धा बसची सोय असणारच, पण हॉस्टेलमध्ये त्याची कुणाला माहिती नव्हती आणि आमच्या रात्रंदिन चालत असलेल्या अभ्यासाच्या युद्धाच्या प्रसंगांमध्ये अशा गोष्टींसाठी कोणाला वेळही नव्हता. अशा कारणांमुळे पुण्यात राहूनसुद्धा सिंहगड न पाहण्याचा विक्रम मी त्या वेळी केला.
मी नोकरीसाठी मुंबईला स्थाईक झालो होतो. पण आम्हा उभयतांचे काही नातेवाईक पुण्याला रहात होते. निरनिराळ्या कारणांसाठी आम्ही पुण्याला त्यांच्याकडे येत जात होतो. पण सिंहगडाला जायचे म्हणजे त्या काळात तरी पूर्ण दिवसाचा कार्यक्रम असायचा. "सिंहगड पहायला जायचे म्हणजे तळापासून माथ्यापर्यंत पायी चढूनच जायला हवे." असे अस्सल पुणेकरांचे ठाम मत मी अनेक वेळा ऐकले होते. संवय नसतांना तेवढे श्रम केल्यानंतर पुढे एकादा दिवस तरी विश्रांती घ्यायला हवी. म्हणजे तेवढ्यासाठी दोन तीन दिवस मोकळा वेळ हवा. बहुतेक वेळी माझ्याकडे तेवढा वेळ नसायचाच, त्यातूनही कधी वेळ काढता आलाच तरी त्या वेळी माझ्यासोबत यायला कोणीच उत्साही मावळा भेटायचा नाही. यामुळे सिंहगडावर चढाई करण्याचा बेत आखला जात नसे. पुण्याला गेल्यावर तिथे गावातल्या गावात पर्वती, संभाजी पार्क किंवा शनिवारवाडा इथपर्यंतच आमचे फिरणे होत असे.
. . . . . . . . . . . . . . . . . . .
मी नोकरीत असतांना माझे देशांतर्गत तसेच परदेशातही बरेच भ्रमण झाले आणि जागोजागी असलेले नवे जुने किल्ले मी नेहमी आवर्जून पहात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधील महत्वाच्या घटनांचे साक्षीदार असलेले प्रतापगड आणि पन्हाळ्याचे किल्ले पाहिलेच, दक्षिणेकडील विजापूर, श्रीरंगपट्टण वगैरे ठिकाणची तटबंदी पाहिली, ग्वाल्हेरचा ऐतिहासिक किल्ला, राजस्थानमधील चित्तोडगढ व जयपूरचे अभेद्य किल्ले आणि दिल्ली, आग्रा, फत्तेपूर सीकरी इथले मुगल थाटाचे बादशाही किल्लेसुद्धा पहायला मिळाले. इग्लंडच्या राणीचे सध्याचे निवासस्थान असलेला बकिंगहॅम पॅलेस नुसता बाहेरून पाहिला तर लंडन आणि एडिंबरोचे प्रख्यात किल्ले, यॉर्कचा ऐतिहासिक किल्ला वगैरेंचे सविस्तर दर्शन घडले. रोमला तर इतिहासपूर्व काळापासून सध्याच्या व्हॅटिकनपर्यंत अनेक प्रेक्षणीय स्थळे आणि जुन्या किल्ल्यांचे अवशेष पहायला मिळतात. स्पॅनिश लोकांनी फ्लॉरिडामध्ये बांधलेला पुरातनकालीन किल्लासुद्धा पाहून घेतला. पण इतके सगळे किल्ले पाहून झाले असले तरी आपला सिहगड पहायचे मात्र राहूनच गेले.
मध्यंतरी अशीच अनेक वर्षे गेल्यानंतर माझ्या मुलाने पुण्यात नोकरी धरली आणि आमची तिथे मुक्काम ठोकून रहायची चांगली व्यवस्था झाली. आता मात्र मला सिंहगड पहायचा म्हणजे पहायचाच होता. पुण्यातल्या कोणीही जरी मला यापूर्वी सिंहगड दाखवायला नेलेले नसले तरी आमच्याकडे आलेल्या जवळच्या पाहुण्यांना घेऊन आम्ही सिंहगडावर स्वारी करायचे ठरवले. तोपर्यंत परिस्थितीत बराच बदल झाला होता आणि अनेक सुखसोयीही झाल्या होत्या. आता आम्हाला सार्वजनिक बसची व्यवस्था पहाण्याची गरज नव्हती. आम्ही पाचसहा जण एका मोठ्या मोटारगाडीत बसून मोहिमेवर निघालो. माझ्या तीन चार वर्षांच्या नाती, ईशा आणि इरासुद्धा आमच्याबरोबर होत्या. पुण्यात यायच्या आधी दोन अडीच वर्षे त्या इंग्लंडमध्ये रहात होत्या. तिथल्या टीव्हीवरची कार्टून्स आणि कॉमिक्स पाहून किल्ला म्हणजे कॅसलबद्दल त्यांच्या मनात एक वेगळेच चित्र तयार झालेले होते. आपल्याला आता चित्रातला कॅसल प्रत्यक्ष पहायला मिळणार या कल्पनेनेच त्या हरखून गेल्या.
सिंहगडाच्या डोंगराच्या पायथ्याशी गेल्यास आधी बराचसा चढ चढून जावा लागत असल्यामुळे पूर्वीच्या काळी ती एक कठीण मोहीम वाटत असे. तेवढे कष्ट वाचवण्यासाठी समोरच्या डोंगरावर वळणावळणाने चढत जाणारा रस्ता बांधून त्या मार्गे थेट पुणे दरवाजा गाठायची व्यवस्था करण्यात आलेली असल्यामुळे आम्ही तो सोपा मार्ग स्वीकारला. खाण्यापिण्याचे भरपूर पदार्थ बरोबर घेऊन आम्ही निघालो आणि पुणे दरवाजाखाली असलेल्या मोकळ्या जागेत मोटार उभी करून खाली उतरलो. लगेच आजूबाजूच्या खाद्यपेयांच्या दुकानदारांनी गराडा घातलाच. गडावरून परत येतांना त्यांच्या ठेल्यांना भेट देण्याचे आश्वासन देऊन आम्ही गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. किल्ल्यात गेल्यावर खूप काही पहाण्यासारख्या जागा असतील असे आमच्यातल्या इतर जणांना वाटत होते. दिवानेआम किंवा दिवानेखास यासारख्या शानदार नसल्या तरी राजवाडा म्हणून शोभून दिसतील इतपत चांगल्या इमारती किंवा त्यांचे अवशेष त्या किल्ल्यावर शिल्लक असतील, त्यात कलाकुसर केलेले खांब आणि सुंदर कमानी वगैरे असतील असी त्यांची कल्पना होती. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून मला वास्तवाची थोडी फार कल्पना होती, पण उगाच कोणाच्या उत्साहावर पाणी ओतू नये म्हणून मी त्यावर गप्प राहिलो.
महाराष्ट्रातले बहुतेक किल्ले चांगले मजबूत बांधले गेले होते, शत्रूला सहजासहजी चढून येता येऊ नये याचा विचार करून त्यासाठी केलेली जागांची निवड अचूक होती. असे असले तरी ते किल्ले स्थापत्य किंवा शिल्पसौंदर्यासाठी फारसे प्रसिध्द नव्हते. लढायांच्या धामधुमीत त्यासाठी कुणाला निवांत वेळही मिळाला नव्हता आणि त्या काळात तेवढी आर्थिक सुबत्ताही नव्हती. सिंहगड हा लष्करी दृष्ट्या महत्वाचा किल्ला असला तरी तिथे कुठल्याही राजाची राजधानी नव्हती. संरक्षण हाच मुख्य मुद्दा असल्यामुळे सगळे लक्ष बुरुज, माच्या, तटबंदी वगैरेवर केंद्रित केले गेले असावे. तिथल्या इमारती सैन्यांच्या गरजेनुसार एकाद्या बरॅकप्रमाणे साध्यासुध्या बनवलेल्या असणार आणि तीनशेहे वर्षांच्या काळाच्या ओघात त्या चांगल्या अवस्थेत शिल्लक राहिल्या असण्याची शक्यता कमीच होती. माझ्या दृष्टीने सिंहगडाला मोठे ऐतिहासिक महत्व होते आणि तिथून दिसणारे आसपासच्या परिसराचे विहंगम दृष्य मला पहायचे होते, शिवाय माझ्या लहानपणापासून मनात घर करून बसलेली इच्छा मला पूर्ण करायची होती..
थोड्या पायऱ्या चढून आणि पुणे दरवाजा पार करून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर आतमध्ये पुन्हा अनेक पायऱ्या चढत चढत वर जायचे असणार हे तर सिंहगडाकडे बाहेरून पहातांनाच समजले होते. गडावरच्या प्रदेशाचा विस्तार पहिला टप्पा चढून गेल्यानंतर दिसायला लागला. तिथल्या निरनिराळ्या स्थळांच्या जागा दाखवणारा नकाशाही होता. पण त्या जागा इतस्ततः विखुरलेल्या असल्यमुळे आम्ही नरवीर तानाजी महाराजांच्या समाधीपर्यंत जाणारा मुख्य मार्ग धरला आणि वाटेत दिसतील तेवढी स्थळे आधी पहायचे ठरवले. निरनिराळ्या ठिकाणी लावलेले फलक पहात पहात आणि त्यांचेवर दिलेली माहिती वाचत आम्ही हळूहळू वरवर आणि पुढेपुढे सरकू लागलो.
या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते. शिवाजी महाराजांच्याही दोन शतके आधीच्या काळापासून त्याचे अस्तित्व असल्याचे दाखले इतिहासात मिळतात. तुघलखांपासून निजामशाही, आदिलशाही वगैरे राजवटींनी त्यावर कब्जा केला होता. या काळात त्यांनी आपापल्या परीने त्याच्या बांधकामात भर टाकली असणारच. इसवी सन १६४७ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला आणि दोन वर्षांतच शहाजी महाराजांच्या सुटकेसाठी तो आदिलशहांना परत केला. आणखी काही वर्षांनंतर तो ताब्यात घेतल्यानंतरसुद्धा त्यांना पुरंदरच्या तहानुसार तो मोंगलांना द्यावा लागला होता. १६७२ साली नरवीर तानाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून तो पुन्हा जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. औरंगजेबाने दक्षिणेत येऊन महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्यानंतर या किल्ल्यावर मराठे आणि मोंगल यांची निशाणे आलटून पालटून फडकू लागली. १७०० साली राजाराम महाराजांनी या किल्ल्यावर असतांना प्राण सोडले. पेशवाईमध्ये या किल्ल्याची निगा व्यवस्थितपणे राखली जात होती. पण त्या काळात पुण्यावर कोणाचे आक्रमणच झाले नसल्याने लढाईची वेळही आली नाही. पेशवाईच्या अखेरीस इंग्रजांना मात्र तो जिंकून घेण्यासाठी तीन महिने वेढा घालून रहावे लागले.
पुणे दरवाजामधून प्रवेश केल्यानंतर लगेचच बाजूला असलेल्या भग्न इमारतीमध्ये एका काळी तोफेच्या दारूचे कोठार होते. किल्लावरील बुरुजांवर ठेवलेल्या तोफांमध्ये ती दारू ठासून भरून त्यांचेमधून शत्रूसैन्यावर तोफगोळ्यांचा मारा केला जात असे. आजूबाजूला कुठे घोड्यांचा पागा, कुठे गुरांचे गोठे किंवा आणखी काही पूर्वीच्या काळात असल्याची माहिती दिली होती. मधून मधून लहान लहान देवळे आणि पाण्याच्या टाक्या होत्या, त्यातल्या काही भरलेल्या तर काही रिकाम्या होत्या. देवटाकी ही गडावरली पाण्याची मुख्य टाकी होती आणि अजूनही तिथले पाणी पिण्यासाठी दिले जाते. एका बंगल्याला टिळक बंगला असे नाव आहे. अर्थातच हा बंगला मराठेशाहीमधला नसून नंतर बांधला गेला असणार. लोकमान्य टिळक सिंहगडावर येऊन तिथे रहात असत. याच ठिकाणी त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली असे सांगितले जाते. लोकमान्यांनी तर रोज दंडबैठका आदि व्यायाम करून त्यांची शरीरसंपदा चांगली कमावली होती म्हणतात. ते पुण्यापासून सिंहगडापर्यंत चालत येऊन वरपर्यंत जाऊन त्या बंगल्यात रहात असले तर काही नवल नाही. गांधीजींना मात्र त्यााठी प्रयास करावे लागले असतील.
सिंहगडाच्या जवळ जवळ माथ्यावर नरवीर तानाजी महाराजांचे स्मारक बांधलेले आहे. त्यांचे देहावसान होऊन सुमारे अडीचशे वर्षांनंतर १९३८ साली त्या स्मारकाचा चौथरा बांधला होता असे तिथे ठेवलेल्या शिलांवर कोरले आहे आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यावर सध्याचा पुतळा बसवला त्याची वेगळी नोंद आहे. या लहानशा स्मारकाच्या आजूबाजूला आणखी विस्तार करण्याचे कार्य बहुधा लवकरच होणार आहे असे दिसते. (असे मी पूर्वी लिहिले होते. ते काम नंतरच्या काळात पूर्ण झाले असेलच.) आठ वर्षांपूर्वी ती लहानशी पण सुबक अशी घुमटीच होती, पण माझ्या मते आकारापेक्षा मनातल्या भावनांना जास्त महत्व होते. नरवीर तानाजी मालुसऱ्यांच्या स्मारकशिलेवर डोके टेकवून, त्यांच्या प्रतिमेला प्रणाम करून आम्ही त्यांच्या स्मृतीला श्रध्दांजली वाहिली आणि सिंहगड चढून आल्याचे सार्थक झाले.
लहानग्या ईशा, इरा आणि साठी उलटलेला मी यांच्या संथ चालीने आम्ही सगळेचजण अगदी सुरुवातीपासूनच एक एक पायरी करत हळूहळू गडावर चढून जात होतो. घरून आणलेला शेवचिवडा आणि वाटेत मिळणारी बोरे, पेरू वगैरेंचे एकेक घास तोंडात टाकत आणि घोट घोट पाणी किंवा शीतपेय (कोल्ड्रिक) पीत आमचे सावकाश मार्गक्रमण चालले होते. वाटेत लागणारी झाडे, त्यावरची पाने, फुले, फुलपाखरे वगैरे पहात त्यांचे रसग्रहण करून एकमेकांना ती दाखवणे, कुणी तरी त्यांची माहिती किंवा त्यासंबंधीचा एकादा किस्सा सांगणे वगैरे चालले होते. आमच्या ग्रुपमधल्या ग्रामीण भागातून आलेल्यांना झाडांची माहिती सांगण्याचा त्यांचा निर्विवाद अधिकार बजावायचा होता, तर शहरी मंडळी टवाळी करण्यात तरबेज होती. मध्येच एकादा माकडांचा कळप रस्त्यातच आडवा येऊन त्याच्या माकडचेष्टांनी आमची करमणूक करून जात असे. त्यात एक दोन लेकुरवाळ्या वानरींच्या पिल्लांनी त्यांच्या आयांना करकचून मिठी मारलेली असे तर दोन तीन उनाड नर उगाचच इकडे तिकडे उड्या मारतांना दिसत असत. त्यातल्या एकाद्याने कुणा मुलाच्या हातातले किंवा पिशवीतले खाऊचे पॅकेट लंपास केले तर त्या मुलाचेच माकड व्हायला वेळ लागत नसे.
आम्ही सगळेजण असे चरत चरत वाट चालत असलो तरी सुध्दा गडाच्या माथ्यावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकापर्यंत पोचेस्तोवर सगळ्यांना चांगल्या भुका लागल्या होत्या आणि माथ्यावर ऊनही तापले होते. जवळच्या एका डेरेदार झाडाखाली जागा पाहून आम्ही चादरी अंथरल्या आणि त्यावर आपले हात पाय ऐसपैस पसरले. हळूहळू जेवणाचे डबे आणि शिदोऱ्या उघडून त्या फस्त केल्या. त्यानंतर अंगात थोडी सुस्ती आल्याने उठवत नव्हते. थोडा वेळ बसून गप्पाटप्पा, नकला, गाणी वगैरेचे कार्यक्रम झाले. मग निरनिराळ्या बाजूला पसरलेल्या इतर डोंगरांचे, त्यावरील एक दोन किल्ल्यांचे आणि खाली सगळीकडे पसरलेल्या विस्तीर्ण भूप्रदेशाचे निरीक्षण करता करता त्यात एकादी ओळखीची जागा दिसते का हे पाहून किंवा तसे ठोकून देणे झाले.
सिंहगडावर आणखीही काही पहाण्याजोगी ठिकाणे आहेत. जसा पुण्याच्या बाजूने येण्यासाठी एक दरवाजा आहे तसाच किंवा त्यापेक्षाही काकणभर देखणा असा दुसरा कल्याण दरवाजा आहे. आपल्या ओळखीचे मुंबईकडचे कल्याण स्टेशन इथे कुठे आले असा विचारही मनात आला, पण या दरवाज्याने खाली गेल्यावर तिथेही एक कल्याण नावाचे वेगळे गाव आहे असे समजले. तानाजी आणि त्याचे मावळे ज्या कड्यावरून रात्रीच्या अंधारात गड चढून आले होते तो सरळसोट कडा पाहूनसुध्दा आपल्याला भीती वाटते. कंबरेला दोर बांधून तो कडा चढून जाणारे गिर्यारोहक आताही तिथे येतात, फक्त त्यांना वर जाऊन जिवाच्या कराराने लढाई करून ती जिंकायची नसते. इतिहासातसुद्धा तो अद्वितीय पराक्रम फक्त एकदाच घडला. याशिवाय तिथे राजाराम महाराजांचे स्मारक आहे, प्रसिध्द झुंजार बुरुज आहे. मोंगल किल्लेदार उदेभान याने जिथे प्राण सोडले त्या जागेवर एक फरशी बसवलेली आहे. ती पाहता असे दिसते की तानाजी मालुसरे आणि उदेभान यांनी एकमेकांवर जबर वार करून दोघेही प्राणांतिक जखमांनी घायाळ झाल्यानंतर अनेक पावले चालत गेले होते. या दोघांचेच द्वंद्वयुध्द चाललेले असतांना इतर मावळे रजपूत सैनिकांशी झुंजत होते. सिंहगडावरचा इतका मोठा विस्तार आणि त्यावरील उंचसखल जमीन, झाडेझुडुपे वगैरे पाहता रात्रीच्या अंधारात ही लढाई कशी झाली असेल याची कल्पनाही करणे कठीण वाटते.
या सगळ्या जागा एका ओळीत नाहीत. अनेक ठिकाणी अनेक वाटांनी चढउतार करून तिथे पोचावे लागते. जेवणखाण करून झाल्यानंतर उन्हात असे आडवे तिडवे, इकडे तिकडे जाऊन सिंहगड किल्ल्यावरील इतर स्थाने पहाण्याचा कोणाचा उत्साह कमी झाला होता, कोणाला तेवढे जास्तीचे त्राण उरले नव्हते किंवा त्या गोष्टीचे फार महत्व वाटत नव्हते. कारणे काहीही असोत, अशा वेळी त्यातून किमान कार्यक्रमच ठरवला जातो. त्याप्रमाणे उरलेल्या इतर जागा पुढच्या ट्रिपमध्ये पहायचे ठरवून आम्ही परतीचा सगळ मार्ग धरला.
सिंहगडाची तटबंदी आणि मुख्य दरवाजा, तिथल्या ओबडधोबड दगडी पायऱ्या वगैरेंमुळे लहानग्या ईशाइरासुध्दा प्रभावित झाल्या होत्या आणि आपल्या चिमुकल्या पावलांनी त्या चढायला त्यांनी उत्साहाने सुरुवात केली होती. काटक इराने मोठ्या जिद्दीने आपले आरोहण चालू ठेवले आणि सर्वांच्या पुढे राहून शिखर गाठण्यात पहिला नंबर मिळवला, तसेच सर्वांच्याकडून खूप कौतुक करून घेतले. नाजुक ईशा मात्र लवकरच दमली आणि किल्ल्यावर गेल्यानंतर चारी बाजूला दिसत असलेले दृष्य पाहून ती बुचकळ्यात पडली. परीकथांमध्ये दाखवतात तसे सुंदर महाल असतील, त्यात सिन्ड्रेला किंवा स्नोव्हाइटसारख्या सुंदर राजकन्या, त्यांना भेटलेले देखणे राजकुमार, राजा, राणी वगैरे रहात असतील, कदाचित एकादी दिव्य परी किंवा दुष्ट चेटकीण किंवा अंधाराने भरलेली तळघरे वगैरे पहायला मिळतील असे तिचे स्वप्नरंजन होते. "ते सगळे कुठे आहे? अजून खूप दूर आहे का?" असे तिने विचारले सुध्दा. मग "अगं त्या सगळ्या खूप पूर्वीच्या काळातल्या गोष्टी आहेत, कुणीतरी जादूची कांडी फिरवली आणि त्यांना अदृष्य करून टाकले." असे सांगून तिची समजूत घातली. आता आपण इथे फक्त पिकनिक करायला आलो आहोत असे सांगितल्यावर तिचाही मूड बदलला आणि ती आमच्या मौजमजेत सामील झाली, पण तिचे पाय दुखायला लागले असल्यामुळे तिला अधून मधून उचलून कडेवर किंवा खांद्यावर घेणे आवश्यक होते आणि त्यासाठी सगळेजण आनंदाने तयार होते.
जिन्याच्या पायऱ्या चढण्यापेक्षा त्या उतरणे सोपे असते. त्यात दमछाक होत नाही, मांड्या आणि पोटऱ्यांवर जोर द्यावा लागत नाही असे वाटले तरी त्या क्रियेत आपला जास्त तोल सांभाळावा लागतो आणि दर पावलाला पायाला एक प्रकारचा दणका बसत असल्याने घोट्याचा भाग जास्त दुखू शकतो. यातल्या कशाचाच विचार न करता आम्ही रमत गमत गडाखाली उतरलो तोपर्यंत सर्वांच्या मनात पुन्हा खादाडीची इच्छा निर्माण झाली होती. तिथले एक क्षुधाशांतीगृह त्यातल्या त्यांत जरा चांगले वाटले तिथे जाऊन आम्ही निरनिराळ्या प्रकारची गरमागरम भजी मागवली. ती इतकी स्वादिष्ट वाटली की पुन्हा पुन्हा मागवून सगळ्यांनी पोटभर खाऊन घेतली. "भजी खावीत तर ती सिंहगडावरच !" असा एक वाक्प्रचारही आमच्यापुरता रूढ केला. निदान त्यासाठी तरी पुन्हा सिंहगडाला भेट देण्याचा संकल्प करून आम्ही सिंहगडाचा तात्पुरता निरोप घेतला आणि घराकडे परतीच्या मार्गाला लागलो.
काही वर्षांनंतर आम्ही पुन्हा सिंहगडावर जायचा संकल्प पुरा केला. यावेळी आमच्याबरोबर माझे दोन लहानगे नातू होते. त्यामुळे बराचसा कार्यक्रम तसाच झाला. फक्त यावेळी आम्ही वाकड्या वाटांनी जाऊन गडावरली आणखी काही ठिकाणे पाहिली आणि तिथल्या भज्यांबरोबर झुणकाभाकरीचाही आस्वाद घेतला.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)
No comments:
Post a Comment