Wednesday, January 20, 2016

स्मृती ठेवुनी जाती - भाग १४ फडके डॉक्टर आणि माई फडके (पूर्वार्ध)

माझ्या लहानपणी म्हणजे पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळातली परिस्थिती खूप वेगळी होती. त्या काळात आमच्या कुटुंबाची गणना 'खाऊन पिऊन सुखी' या वर्गामध्ये होत होती. आमचे फॅमिली डॉक्टर फडकेकाका अगदी घरच्यासारखे होते. तरीही घरातले कोणीसुद्धा ऊठसूट आमच्या डॉक्टरांकडे जात नसत. घरातल्या कोणाला सर्दीखोकला, ताप, अपचन, पोटदुखी यासारखे लहान सहान विकार झाले तर सुंठ, लवंग, दालचिनी, ओवा, मिरे, बडीशोप असले स्वयंपाकघरातले पदार्थ आणि कुंड्यांमध्ये लावलेली तुळस, गवती चहा, कोरफड वगैरे वनस्पतींची पाने यांच्यापासून माझी आई एकादे चाटण किंवा काढा करून देत असे.  त्रिभुवनकीर्ती, सूतशेखराची मात्रा, अमृतांजन, सीतोपलादि चूर्ण, च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण यासारखी काही आयुर्वेदिक औषधे, व्हिक्स, अॅस्प्रो, सारिडॉन, टिंक्चर आयोडिन वगैरेसारखी काही कॉमन इंग्रजी औषधे आणि मध, एरंडेल तेल, जुने तूप अशासारख्या गोष्टी आमच्या घरातल्या औषधांच्या कपाटात ठेवलेल्या असत. गरज वाटली तर त्यातले काही तरी दिले जात असे. बहुतेक वेळा या उपचाराने आजारी माणसाला लगेच गुणही येत असे.

दोन तीन दिवस उपचार करूनही दुखणे वाढतांना दिसले किंवा एकाएकी खूप त्रास सुरू झाला तर मग फडके डॉक्टरांना बोलावले जाई. त्या काळात टेलीफोन नव्हते आणि आमच्या घरापासून डॉक्टरांचा दवाखाना किंवा घर फक्त पाच दहा मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे जाण्यायेण्यात जास्त वेळ जात नसे. कोणी तरी फडके डॉक्टरांच्या दवाखान्यात किंवा घरी जाऊन त्यांना बोलावून आणत असे. ते देखील लगबगीने आमच्याकडे येऊन जात. घरातला माझ्यासारखा एकदा मुलगा दरवाजात थांबून डॉक्टर येण्याची वाट पहात असे. आमच्या घराकडे येणा-या बोळाच्या टोकाला डॉक्टरसाहेबांची मूर्ती दिसली की लगेच "डॉक्टर आले" अशी आरोळी ठोकून तो धावत पुढे जाऊन त्यांच्या हातातली बॅग घेऊन त्यांना सन्मानाने घरी आणत असे. दरवाजामधून आत शिरल्यानंतर अंगणातच पाण्याने भरलेली एक बादली, तांब्या, अंगाला लावायचा साबण आणि हात पुसण्यासाठी टॉवेल हे तयार ठेवलेले असायचे. एकजण डॉक्टरांच्या हातावर पाणी घालत असे आणि हात धुवून होताच त्यांना हात पुसायला टॉवेल देत असे.  

घरात शिरल्यानंतर हातपाय धूत असतांनाच डॉक्टरांकडून आजारी व्यक्तीची चवकशी सुरू होत असे. ते आमच्या घरातल्या प्रत्येकाला नावाने ओळखत होते. आजारी माणसाकडे गेल्या गेल्या "काय रे" किंवा "कायगं, बघू तुला काय झालंय्", "आ कर, जीभ बाहेर काढ" "जरा दीर्घ श्वास घे", तो धरून ठेव" असे म्हणत तपासणी करता करता धीरही देत. पोट दाबून आणि कपाळ चेपून पहात, थर्मॉमीटरने ताप मोजणे आणि स्टेथोस्कोपने छातीतली धडधड पाहून नाडीही तपासत. गरज असल्यास एक इंजेक्शन टोचत. "तुला काही फारसं झालेलं नाही, दोन दिवसात उड्या मारत माझ्याकडे येऊन बरं वाटत असल्याचं सांगशील बघ." असे आजारी माणसाला सांगून बाहेर येत. त्यांचे पुन्हा एकदा साबण लावून हात धुवून आणि पुसून होईपर्यंत त्यांच्यासाठी चहाचा कप तयार झालेला असे. आमच्या त्या घरात सोफासेट नव्हता, एक प्रशस्त असा झोपाळा होता. त्यावर बसून हलके झोके घेत चहाचे घोट घेता घेता फडके डॉक्टर घरातल्या सर्वांची चौकशी करत, शिक्षण किंवा नोकरीसाठी परगावी गेलेली मुले आणि सासरी गेलेल्या मुलींचे क्षेमकल्याण विचारत आणि सगळा अपडेट करून घेत. ते म्हणजे अगदी आमच्या घरचेच झालेले होते.  

आमचे फडके डॉक्टर गोरे पान, मध्यम बांध्याचे, किंचित स्थूल म्हणावे असे होते. त्यांचा तेजःपुंज हंसरा चेहरा आणि एकंदरीतच उमदे व्यक्तीमत्व पाहूनच रुग्णाला एक प्रकारची ऊर्जा मिळत असावी. या डॉक्टरांनी आपल्याला पाहिले आहे म्हणजे आता आपण बरे होणारच अशी त्यांना  खात्री वाटत असे. त्यांच्या दवाखान्यात येत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता त्यांची प्रॅक्टिस चांगली चालत होती. यामुळे ते आमच्या गावातले एक नंबरचे डॉक्टर असणार असे मला वाटायचे. आमच्या घरी येऊन आजारी व्यक्तीला पाहून गेल्यानंतर त्यांनी कधी व्हिजिट फी मागितली किंवा त्यांनी न विचारता त्यांना कोणी आणून दिली असे मी कधी पाहिल्याचे मला आठवत नाही. कदाचित सगळ्या उपचारांचा एकत्र हिशोब केला जात असेल, पण त्याने आमच्या महिन्याच्या बजेटला कधीच भार पडला नाही इतपतच तो असायचा.

डॉक्टरांनी घरी येऊन किंवा दवाखान्यात आलेल्या रोग्याला पाहिल्यानंतर ते त्यांच्या कंपांउंडरला बोलावून त्याला औषधांबद्दल सांगायचे. त्या काळात आतासारख्या औषधी गोळ्यांच्या स्ट्रिप्स नसायच्या. कंपांउंडरच्या कपाटात ठेवलेल्या अनेक बाटल्यांमध्ये निरनिराळ्या गोळ्या किंवा पॉवडरी भरून ठेवलेल्या असत. ते त्यातल्या काही गोळ्या आणि पॉवडरी मोजून काढून त्यांना खलबत्त्यात घालून कुटायचे. त्यांच्या कपाटातल्या आणखी काही कपाटांमधल्या बाटल्या किंवा शिशांमध्ये निरनिराळ्या रंगाचे द्रवपदार्थ भरलेले असायचे. कंपांउंडर काका  त्यातले काही द्रव पदार्थ मोजून एका बाउलमध्ये घालायचे. त्यात गोळ्यांची झालेली पूड आणि थोडे पाणी मिसळून ते सगळे मिश्रण एका चपट्या उभ्या बाटलीत भरायचे आणि त्यात आणखी थोडे पाणी मिसळून तो द्राव ते एका विशिष्ट पातळीपर्यंत भरायचे. त्या काळात औषधांसाठी अशा खास बाटल्या मिळत असत. एका कागदाच्या पट्टीवर कात्रीने खाचे पाडून ती पट्टी त्या बाटलीवर चिकटवायचे.  त्या खाचांवरून एका वेळी किती डोस घ्यायचा हे समजत असे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आजारी माणसाला दिवसातून दोन तीन वेळा ते डोस दिले की झाले, इतके सोपे काम असायचे.  डॉक्टर घरी येऊन गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ कोणी तरी दवाखान्यात जाऊन कंपांउंडरकडून औषध घेऊन येत असे. त्यानंतर दररोज किंवा एक दिवसाआड दवाखान्यात जाऊन पुन्ही ती बाटली भरून आणायची असे.

त्या काळातले कंपांउंडर खरोखरच औषधांचे कंपांउंडिंग करत असत. आता ते काम राहिले नसल्यामुळे त्याच्या ऐवजी फार्मासिस्ट्स असतात. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर काय लिहिले आहे हे वाचून  त्याप्रमाणे ते लोक त्यांच्या दुकानांमधल्या कपाटातल्या औषधांच्या स्ट्रिप्स आणि बॉटल्स काढून देतात. पूर्वीच्या काळातल्या डॉक्टरांची फी त्यांच्या कंपांउंडरांनी मुद्दाम तयार करून  दिलेल्या औषधांसकट फक्त एक दोन रुपये एवढीच असायची, आता डॉक्टर आणि फार्मासिस्ट या दोघांनाही शंभराच्या किंवा पाचशेच्या अनेक नोटा काढून द्याव्या लागतात. ही औषधोपचाराची व्यवस्था आता इतकी महाग झाली आहे. भारतातल्या कायद्यांप्रमाणे औषधांच्या प्रत्येक दुकानात एक तरी फार्मसिस्ट असणे आवश्यक असले तरी त्यांचे असणे किंवा नसणे आपल्याला सहसा जाणवत नाही, पण अमेरिकेत मात्र आता फार्मसिस्ट हा अत्यंत महत्वाचा घटक झाला आहे.

गावाच्या एका टोकाला असलेल्या मामलेदार कचेरीच्या समोरच फडके गल्ली होती. त्यात ओळीने रहात असलेल्या इतर फडके मंडळींच्या घरांमध्ये डॉक्टरांचे सुबक घर बाहेरूनच उठून देत असे. दरवाजातून आत जाताच असलेल्या अंगणात अगदी सपाट अशी फरशी बसवलेली होती, त्यात उजव्या हाताला माडीवर जाण्यासाठी जिना होता. त्या काळात घरांचा 'बीएचके' प्रकार कोणी ऐकलादेखील नव्हता. पारंपरिक पद्धतीनुसार अंगणातून आत गेल्यावर हातभर उंचावर केलेली पडवी किंवा ओसरी, त्याच्या आत माजघऱ, स्वैपाकघर आणि इतर खोल्या होत्या. माडीवर गेल्यावर प्रशस्त दिवाणखाना आणि इतर खोल्या होत्या. पण त्यातल्या ओसरीच्या पुढे आतल्या भागात जाण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. एक दोन वेळा मी डॉक्टरांना भेटण्यासाठी जरासा भीतभीतच माडीवरच्या त्यांच्या  दिवाणखान्यात गेलो असेन. तिथली सजावटसुद्धा मला थक्क करणारीच होती. डॉक्टरसाहेबांची मेडिकल प्रॅक्टिस उत्तम चालली असली तरी त्या लहान गावात त्यातून अशी कितीशी प्राप्ती होत असेल? मला वाटते की बहुधा ते पिढीजातच श्रीमंत असावेत. त्यांच्या घरातल्या सफाईदार जमीनी आणि भिंती, त्यावरचे देखणे रंग, तिथे मांडलेले उच्च दर्जाचे फर्निचर हे सगळे मला जरा वेगळेच दिसायचे.

फडके डॉक्टरांच्या एका मुलीला सांगली की बुधगांवच्या राजघराण्यात त्या काळातल्या पटवर्धन सरकारांच्याकडे दिली होती याचे सगळ्या गावालाच कौतुक वाटत असे. त्यांचा एक मुलगा त्या काळात शाळेत शिकत होता, पण माझी त्याच्याशी ही कधी गट्टी होऊ शकली नाही.  डॉक्टरीणबाई तशा स्वभावाने चांगल्या होत्या, पण त्यांचे शहरी पद्धतीचे चांगले वागणेच आम्हा गांवढळांना कृत्रिम वाटत असावे. माझ्या आईचीही त्यांच्याशी विशेष जवळीक जुळली नव्हती.  त्यांच्यातले बोलणेही बहुधा कामापुरतेच होत असावे.  आमचे फडके डॉक्टर आम्हाला घरच्यासारखे वाटत असले तरी त्यांची ही आपुलकी एकतर्फी किंवा त्यांच्यापुरतीच राहिली. मी कधीच त्यांच्या कुटुंबाचा भाग झालो नाही.

सगळे सुरळित चाललेले असतांना अचानक एक दिवस फडके डॉक्टरांच्या निधनाची दुःखद बातमी आली तेंव्हा त्याचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.


. . . .  . . . . . . . . . . .. . .  .. (क्रमशः)

2 comments:

रवींद्र आपटे said...

Hi Anand,
Dr. Phadke was our family physician as well. In fact he was spouse of my cousin. You have described the Phadke house and its surrounding with great details. I could visualise the old settings of Jamkhandi. I had no interactions with Mai Phadke. Dr. Phadke, we called him Appa, was a gentle soul and a gentleman to the core. He had a prolonged sickness but never it affected his buoyant spirits.

Anand Ghare said...

प्रिय रवींद्र, धन्यवाद. मी हे सगळे साठ वर्षांपूर्वीच्या आठवणींमधून लिहिले आहे. त्यात थोडीशी कल्पकतेची मिसळ झाली असण्याची शक्यता आहेच.मला सुद्धा इतक्या वर्षांनंतर कै.फडके डॉक्टरांचा गुण आठवतो तो त्यांचा उमदेपणा आणि दिलखुलास हास्य. त्यांच्या स्मृतीला प्रणाम.