आपल्या ओळखीतले काही लोक केंव्हा ना केंव्हा उत्तर भारतात राहिले असतात किंवा अधून मधून तिकडे जात येत असतात, तर काही लोक इथेच रहात असले तरी काही ना काही कारणाने उत्तर भारतीय लोकांच्या संपर्कात आलेले असतात. त्यांच्याशी होत असलेल्या संभाषणामध्ये 'जुगाड' या शब्दाचा उपयोग इतक्या वेळा होत असतो की हा शब्द या सगळ्यांच्या चांगल्या ओळखीचा वाटतो. या सर्वसमावेशक शब्दाला चपखल असा प्रतिशब्द मला तरी मराठीत किंवा इंग्रजीत सापडत नाही. माझ्याशी नेहमी मराठी किंवा इंग्रजी भाषेत बोलणा-या कित्येक लोकांच्या बोलण्यातसुद्धा जुगाड या शब्दाचा एवढ्या वेळा उल्लेख येतो की कधी कधी मला हा शब्द त्या त्या भाषांमधलाच वाटतो. तसा तो सध्या कदाचित नसला तरी माझ्या मते या भाषांमध्ये त्या शब्दाचा समावेश करायला हरकत नसावी. त्यामुळे या भाषा समृद्धच होतील. या जुगाडांची व्याप्ती एकादे साधेसुधे औजार किंवा पैशाची तात्पुरती व्यवस्था इतक्या क्षुल्लक बाबींपासून ते थेट केंद्रातल्या मंत्रीमंडळाच्या जोडणीपर्यंत झालेली दिसते. ज्यांनी हा शब्द अजून ऐकला नसेल अशा लोकांना मात्र "हे जुगाड म्हणजे असते तरी काय?" असा प्रश्न कदाचित पडेल.
'जुगाड' या शब्दाचा अनेक प्रकारे उपयोग केला जात असतो. त्याचा अगदी सर्वसामान्य अर्थ म्हणजे 'कामचलाऊ उपाय किंवा उपाययोजना'. पण तो उपाय किंवा ती योजना त्यांच्या सर्वसामान्य रूढ उपयोगापेक्षा वेगळ्या असायला मात्र हव्यात. जुगाडाला एक पर्यायी व्यवस्था म्हंटले तर ती 'व्यवस्थित' असण्यापेक्षा तशी नसण्याचीच जास्त शक्यता असते. त्याच्या वैधतेत आणि विश्वासार्हतेत संदिग्धपणाची छटा असते. सुव्यवस्थित चाकोरीबद्ध पद्धतीने काम करण्याऐवजी त्यासाठी एकादे 'जुगाड' वापरणे काही लोकांना कमीपणाचे किंवा काही वेळा धोकादायक वाटते. ही जुगाडाची एक बाजू झाली. तिच्यातसुद्धा जुगाडाच्या नावाने नाकाने कांदे सोलत नुसतेच स्वस्थ बसून राहण्यापेक्षा कसे का होईना पण त्याने आपले काम पुढे सरकत आहे का हे पाहणे काही वेळा अधिक श्रेयस्कर किंवा महत्वाचे असते. काही वेळा तर 'जुगाड' या शब्दाचा उपयोग अशा जागीही होतो जिथे दुसरा उपायच अस्तित्वात नसतो. सहजपणे उपलब्ध साधनसामुग्रीचा उपयोग करून निर्माण केलेल्या औजारांना अनेक वेळा 'जुगाड' म्हणतात. त्याच प्रमाणे कोणालाही सहजपणे करता येईल अशा सोप्या कृतींमधून एकादी गोष्ट करण्याच्या विधीलाही 'जुगाड करना' असे म्हणतात. बहुतेक वेळा जुगाडांच्या या प्रकारांमध्ये त्या वस्तूच्या किंवा विधीच्या गुणवत्तेत काही फरक येत नाही. काही वेळा तर आपल्याला हवी असलेली चांगली क्वालिटी मिळवण्यासाठी खास 'जुगाड' तयार करून वापरावे लागते.
'जुगाड' हा शब्द मुख्यतः कामचलाऊ गोष्टींबाबत वापरला जात असला तरी तो आणखी काही प्रकारांनीसुद्धा कानावर येतो. एटीएम, एसटीडी, तत्काल रिझर्वेशन वगैरे सोयी होण्याच्या पूर्वीच्या काळात कधीकधी असे घडत असे की एकाद्या उत्तर भारतीय सहका-याला दुपारच्या वेळी त्याच्या घरातून एक तार यायची, त्यात त्याला तातडीने गावी बोलावलेले असायचे. चिंताक्रांत मुद्रेने तो ती बातमी त्याच्या सहका-यांना सांगायचा.
"अब तुम क्या करोगे? कैसे घर जाओगे?"
"देखते हैं, कुछ जुगाड कर लेंगे।" म्हणजे हमालाला किंवा टीसीला पैसे चारून वगैरे.
"जानेके वास्ते तुम्हारे पास पैसे तो हैं?"
"कहाँ भाई? उसकाभी कुछ जुगाड करनाही पडेगा।" म्हणजे उधार, उसनवार वगैरे, वगैरे...
आता तांत्रिक जुगाडाची काही उदाहरणे पाहू. एकदा मला प्रेशर कूकरमध्ये डाळ आणि तांदूळ शिजवायचे होते, त्यांची भांडी कूकरमध्ये ठेवून झाकण लावतांना मला असे दिसले की त्याच्या बॅकेलाइटच्या मुठीच्या दोन भागांना जोडणारे स्क्र्यू खूप ढिले झाले आहेत. ते जर गळून पडले तर कुकरची मूठ जागेवर राहणार नाही आणि गरम झालेल्या कूकरचे झाकण मला उघडता येणार नाही. मी अशा वेळी त्या स्क्र्यूच्या मापाचा स्क्र्यूड्रायव्हर शोधत बसलो नाही, कारण माझ्या घरात तो असलाच तरी त्या वेळी तो नेमका कुठे ठेवला गेला होता याची मला सुतराम कल्पना नव्हती. अशा वेळी मी स्वयंपाकघरातल्या सेल्फमधले दोन तीन चमचे काढले आणि ज्या चमच्याच्या मागच्या बाजूचे टोक त्या स्क्र्यूच्या खाचेमध्ये फिट्ट बसले त्याने त्या स्क्र्यूंना पिरगाळले. खरे तर स्क्र्यूला फिरवणे हा काही त्या चमच्याचा अधिकृत उपयोग नाही, पण आयत्या वेळी सुचलेल्या या 'जुगाडा'ने माझे काम तर पटकन झाले. जुगाड या संकल्पनेचे हे एक सोपे उदाहरण झाले.
आता एकादे कठीण उदाहरण पाहू. अणुविद्युत केंद्रांसाठी लागणा-या विशिष्ट यंत्रसामुग्रीची निर्मिती करणे किंवा करवून घेणे हे सर्व संबंधितांसाठी एक मोठे आव्हान असते. त्यातल्या एका अवाढव्य यंत्रासाठी सुमारे पंधरा मीटर लांब एवढ्या अगडबंब आकाराचे पण सगळ्या बाजूंनी अर्धा मिलिमीटरमध्ये सरळ व सपाट अशा आकाराचे कॉलम तयार करून हवे होते. पोलादाच्या जाड प्लेट्सचे तुकडे कापून, त्यांना वेल्डिंगने जोडून आणि मोठमोठ्या मशीन्सवर त्या स्ट्रक्चर्सचे मशीनिंग करून ते खांब तयार करायचे असतात. इतकी मोठी मशीनरी सहसा कुणाकडेच नसते आणि तिला परदेशातून मुद्दाम तयार करवून घेऊन मागवणे कोणालाही परवडणारे नसते. शिवाय प्रत्येक मशीनची रेंज आणि अॅक्युरसी ठरलेली असते. त्यांच्या आवाक्याबाहेरचे काम करायचे असले तर शंभरातले नव्याण्णऊ कामगार आणि दहापैकी नऊ इंजिनियरसुद्धा ते अशक्य आहे असेच सांगतात, पण एकादा कल्पक, धाडशी आणि उत्साही (जुगाडू) माणूस ते आव्हान स्वीकारतो. ते काम उपलब्ध साधनसामुग्रीमधूनच कसे करता येईल यावर सकारात्मक दृष्टीकोनातून स्वतः विचार करतो आणि इतरांशी विचारविनमय करतो, त्यासाठी अनेक प्रकारची निरनिराळी फिक्स्चर्स तयार करतो, त्यावर वारंवार छोटे छोटे प्रयोग करून त्यात सुधारणा करत राहतो आणि अखेरीस हे अशक्य वाटणारे काम तो यशस्वी रीत्या करून दाखवतो. दुस-या एकाद्या यंत्राचा एकादा विशिष्ट भाग मुठीत धरण्याइतका छोटा पण खूप कॉम्प्लिकेटेड आकाराचा असतो, आणि त्याची अॅक्युरसी एक दोन मायक्रॉन्स म्हणजे एक दोन हजारांश मिलिमीटरमध्ये इतकी सूक्ष्म असावी लागते. कुठल्या मशीनने ती मिळवायची आणि ती कशी मोजून खात्री करून घ्यायची हे सर्वसामान्य पद्धतींमधून समजत नाही. यासाठी वेगळ्या प्रकारची खास फिक्स्चर्स बनवावी लागतात.
या दोन्ही प्रकारची फिक्स्चर्स तयार करता करता आणि त्यांचा उपयोग करता करता त्यात वेळोवेळी बदल करावे लागत असतात, त्यामुळे त्यांची व्यवस्थित ड्रॉइंग्ज, स्पेसिफिकेशन्स, इन्स्पेक्शन रिपोर्ट्स वगैरे डॉक्युमेंटेशन करायला वेळच नसतो आणि त्या फिक्स्चर्सचे काम संपल्यानंतर त्यांची काही गरजही नसते. यामुळे आयएसओच्या नियमानुसार त्याचे डॉक्युमेंटेशन किंवा रेकॉर्ड्स बनत नाहीत किंवा ठेवले जात नाहीत. तशाच प्रकारची मूळ यंत्रसामुग्री पुन्हा पुन्हा बनवून घ्यायची असली तर तेच फिक्स्चर उपयोगी पडते आणि तशी गरजच नसली तर तो एक तात्पुरता कामचलाऊ उपाय असतो. या अर्थाने ही फिक्स्चर्स म्हणजे उच्च दर्जाची असली तरी जुगाडेच असतात. अशा कित्येक जुगाडांच्या डेव्हलपमेंटमध्ये मी सहभागी झालो होतो. त्यांचा उपयोग करून आपले काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर होणारा आनंद अनुपमेय असायचा. यामुळे मला तरी जुगाड या शब्दाबद्दल प्रेम किंवा आदर वाटत आला आहे.
जुगाड हा शब्द माझ्या कानावरसुद्धा पडला नव्हता त्या काळापासून म्हणजे माझ्या लहानपणापासून मी काही नसते उद्योग करत होतो. आमच्या घराच्या अर्ध्या भागावर माडी होती. मी बहुतेक वेळ तिथे बसून अभ्यास करत असे किंवा पुस्तके वाचणे, चित्रे काढणे वगैरेंमध्ये वेळ घालवत असे. माडीला लागूनच उरलेल्या भागात गच्ची होती आणि तिच्या भिंतींवर तीन चार ठिकाणी दहा बारा सेंटीमीटर लांब मोळे (मोठे खिळे) ठोकून ठेवले होते. कधी उन्हात कपडे वाळवायचे असले तर या मोळ्यांना जाड दो-या बांधून ते त्यावर वाळत टाकायचे आणि संध्याकाळी कपडे काढल्यानंतर पुन्हा त्या दो-या सोडवून ठेवून द्यायचा असा क्रम असायचा. एकदा हे काम करत असतांना माझे लक्ष त्या मोळ्याच्या सावलीकडे गेले. सकाळी पश्चिमेकडे पसरलेली सावली हळूहळू संध्याकाळी पूर्वेकडे सरकली होती. या गोष्टीचे दोन तीन दिवस निरीक्षण केल्यावर मी त्या भिंतीवर जागोजागी शिसपेन्सिलीने खुणा केल्या आणि मोळ्याच्या सावलीकडे पाहून त्या खुणांच्या आधाराने मला वेळ समजायला लागली. सकाळी अकरा किंवा बारा वाजता नाही तर दुपारी चार किंवा पाच वाजता जेंव्हा केंव्हा खाली यायला मला माझ्या आईने सांगितलेले असेल बरोबर त्या वेळी तिने हाक मारायच्या आधीच मी तिच्या समोर जाऊन उभा राहिलो तर तिला नवल वाटायचे. त्या काळात माझ्याकडे स्वतःचे घड्याळ असण्याचा प्रश्नच नव्हता आणि सोप्यातल्या घड्याळातली वेळ मला माडीवर बसून कशी कळते हे तिने विचारलेच. पण मलाही माझे सीक्रेट उघड करायचे नव्हते. माझ्याकडे एक जादू आहे असे म्हणून टोलवाटोलवी केली. पुढे नात्यातल्या एका लग्नाच्या निमित्याने मुंबई पहायला मिळाली तेंव्हा मलबार हिलवरच्या कमला नेहरू पार्कमध्येही गेलो. तिथली प्रचंड आकाराची सनडायल पाहून मला कळले की हा शोध तर पूर्वीच कुणीतरी लावून ठेवला होता. तो माणूससुद्धा एक प्रकारचा जुगाडूच असणार!
. . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment