Wednesday, January 28, 2015

बरॅक ओबामा आणि नरेन्द्र मोदी


२००८ साली अमेरिकेत झालेल्या निवडणूकीच्या काळात मी अमेरिकेत होतो. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीची चक्रे वर्षभर आधी फिरू लागतात. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक या दोन्ही मुख्य पक्षातर्फे ही निवडणूक कुणी लढवायची हे ठरवण्यासाठी प्राथमिक फे-या (प्रायमरीज) सुरू होतात. डेमॉक्रॅटिक पक्षामधल्या काही लोकांची नावे आधी समोर आली,  त्यतले एक नाव 'बरॅक ओबामा' यांचे होते. अमेरिकेचे बरेचसे प्रसिद्ध अध्यक्ष वॉशिंग्टन, जेफरसन, लिंकन, ट्रूमन, क्लिंटन यासारख्या नकारांती आडनावांचे होते, तर रूझवेल्ट आणि बुश यासारखी काही इतर नावेसुद्धा प्रॉपर इंग्रजी वाटत होती. ओबामा हे आडनाव मात्र लुमुंबा, मोबुटू, मोगॅम्बो अशासारखे वेगळे वाटत होते. बरॅक हे त्यांचे नाव तर झोपडी, ओसरी, पागा, गोठा असे कसलेसे वाटत होते. असल्या नावाच्या माणसाला अमेरिकेतले लोक आपला प्रेसिडेंट करतील का याबाबत मला शंकाच होती. नेत्याच्या निवडीचे हे नाटक दोन चार दिवस चालेल आणि संपेल असे मला वाटल्याने मी आधी तिकडे लक्षच दिले नव्हते. पण प्रत्यक्षात मात्र बाकीची सारी नावे वगळली जाऊन अखेर बरॅक ओबामा आणि हिलरी क्लिंटन ही दोन नावे शिल्लक राहिली. त्यातून एक निवडण्यासाठी प्रत्येक राज्यात पक्षांतर्गत डेलेगेट्समधून निवडणूकी घेण्यात आल्या. त्यातून अखेर ओबामांच्या नावाची निवड झाली. या घडामोडींबद्दल वाचतांना ओबामा यांच्याबद्दलचे माझ्या मनातले कुतूहल वाढत गेले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला अमेरिकेतल्या अंतर्गत राजकारणात इंटरेस्ट वाटायला लागला.

मी अमेरिकेत पोचलो तोपर्यंत तिथे निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. न्यूयॉर्क आणि शिकागोसारख्या महानगरांमध्ये काही ठिकाणी जाहीर सभा होत असत आणि त्याचे वृत्तांत टेलिव्हिजनवर दाखवत होते. त्याखेरीज टी.व्ही.वरील कांही चॅनेल्सवर निवडणुकीनिमित्य सतत कांही ना कार्यक्रम चाललेले असायचे. त्या निवडणुकीतल्या प्रचाराचा सर्वाधिक भर बहुधा टी.व्ही.वरच होता. रिपब्लिकन पक्षातर्फे जॉन मॅकेन यांची उमेदवारी जाहीर झाली होती. ओबामा आणि सिनेटर मॅकेन यांच्या वेगवेगळ्या तसेच अमोरासमोर बसून घेतलेल्या काही मुलाखतीसुध्दा मला पहायला मिळाल्या. जवळजवळ रोजच टेलिव्हिजनवर ओबामांचे दर्शन घडायचे. त्यांचे दिसणे आणि वागणे तर अत्यंत साधेपणाचे होते आणि त्यात किंचितही नाटकीपणा नसायचा. त्यांचे बोलणेही अगदी साध्या सोप्या भाषेत असल्यामुळे माझ्यासारख्या परदेशी माणसालासुद्धा नीट समजत आणि पटत असे. अमेरिकन सामान्य मतदारांना ते नक्की समजत असणार आणि त्यांच्या मनाला जाऊन भिडत असणार. आपल्या भाषणात ओबामा कसलाच आव आणत नसले तरी अमेरिकेच्या सर्व प्रश्नांचा आणि त्यावरील संभाव्य उपायांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला होता आणि विचारलेल्या सर्व प्रश्नाची समर्पक आणि मुद्देसूद उत्तरे ते अगदी सहजपणे देत असत. त्यांच्या नसानसात हजरजबाबीपणा भरलेला होता. त्यांच्या नम्रतेत स्वतःकडे कमीपणा घेणे नव्हते आणि आत्मविश्वासात अहंकार नसायचा. त्यांचे साधे व्यक्तीमत्वच अत्यंत प्रभावशाली होते.

प्रेसिडेंट बुश यांच्या कारकीर्दीत अमेरिका आर्थिक संकटात सापडली असा सर्वसामान्य जनतेचा समज झाला होता. पण त्याचे मोठे भांडवल करण्याचा आणि त्यासाठी बुश यांना दोष देण्याचा मोह ओबामा टाळायचे. "प्राप्त परिस्थितीतून बाहेर येऊन पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करण्याची अमेरिकन जनतेला गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ते काम करायचे आहे." असे सकारात्मक प्रतिपादन ते करायचे. त्यांच्या बोलण्यात "मी" नसायचे "आपण" असायचे. मॅकेन यांनी मात्र मुख्यतः ओबामांच्या भाषणावर आसूड ओढण्याचेच काम केले. त्यांच्या भाषणातही सारखे ओबामा यांचेच उल्लेख यायचे. ओबामा हे मिश्र वंशाचे आहेत याचा जेवढा गवगवा अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांनी त्या काळात केला तेवढाच त्याचा अनुल्लेख ओबामा यांनी स्वतःच्या भाषणात केला. "मी सर्व अमेरिकन जनतेचा प्रतिनिधी आहे." असेच ते नेहमी सांगत आले. त्यांनी विचारपूर्वक घेतलेल्या या धोरणाचा त्यांना चांगला फायदा झाला असणार. एकजात सर्व गौरेतरांचा भरघोस पाठिंबा त्यांना मिळालाच, पण सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे असंतुष्ट असलेले बहुसंख्य गौरवर्णीयही मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूला आल्यामुळे ते प्रचंड बहुमताने निवडून आले.

निवडणूक जिंकल्यानंतर लगेच केलेल्या भाषणाची सुरुवात श्री.ओबामा यांनी या शब्दात केली.
"If there is anyone out there who still doubts that America is a place where all things are possible; who still wonders if the dream of our founders is alive in our time; who still questions the power of our democracy, tonight is your answer."

"अमेरिका ही अशी जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे, याबद्दल जर अजूनही कोणाच्या मनात शंका असेल, आपल्या पूर्वजांची स्वप्ने आजही जीवंत आहेत कां असा विचार कोणाच्या मनात येत असेल, लोकशाहीच्या सामर्थ्याबद्दल कोणाला प्रश्न पडला असेल, तर आज त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत." या शब्दात सिनेटर बरॅक ओबामा यांनी आपल्या विजयाचा स्वीकार केला. खरोखरच ज्या गोष्टीची कल्पनाही दोन वर्षापूर्वी कोणी केली नसती ती शक्य झाली होती आणि त्याचे सर्व श्रेय ओबामा यांनी अमेरिकेच्या जनतेला दिले होते. यात विनयाचा भाग किती आणि कृतज्ञतेची प्रामाणिक भावना किती असा प्रश्न कोणाला पडेल. पण ज्या आत्मविश्वासाने ओबामा यांनी आपली कँपेन चालवली होती त्याबद्दल मला पहिल्या दिवसांपासून त्यांचे कौतुक वाटत होते.

२०१० साली मी काही दिवस गांधीनगरला जाऊन राहिलो होतो. गांधीनगर हे एक प्रेक्षणीय शहर आहे, ते मुख्य म्हणजे तिथल्या सुरेख रस्त्यांमुळे. नव्या मुंबईत पाम बीच रोड नांवाचा एक प्रशस्त आणि सरळ हमरस्ता आहे. तेवढा अपवाद सोडला तर मुंबईतल्या कोठल्याही रस्त्यावरून वाहन चालवणे मेटाकुटीला आणते. गांधीनगरला जिकडे पहावे तिकडे सरळ रेषेत दूरवर जाणारे रुंद रस्ते आहेत. हमरस्ते तर आठ पदरी आहेतच. त्यांच्या बाजूने जाणारे सर्व्हिस रोडदेखील दुपदरी आहेत. आधीपासून असलेल्या रस्त्यांची उत्तम निगा राखली जातेच, शिवाय ज्या भागात अजून वस्तीसुध्दा झालेली नाही अशा संभाव्य विस्ताराच्या प्रदेशात सुद्धा तेंव्हा मोठाले रस्ते बांधले जात होते. रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावलेली होती आणि त्यांचीही व्यवस्थित निगा ठेवलेली होती. आमचे गेस्ट हाऊस शहराच्या बाहेरच्या अंगाला वसवले जात असलेल्या इन्फोसिटी या भागात होते. तिथले रस्ते, नगररचना, इमारती वगैरे पाहता आपण नक्की कोठल्या देशात आहोत असा प्रश्न पडावा. तिथले लोक या सगळ्या विकासाचे श्रेय नरेन्द्र मोदी यांना देत होते.

गांधीनगर शहराच्या चौकाचौकांमध्ये लावलेले भले मोठे फ्लॅक्स तितकेच डोळ्यात भरत होते. नरेंद्र मोदी यांचे निरनिराळ्या मुद्रांमधले मोठमोठे फोटो प्रत्येक फलकावर ठळकपणे रंगवून उरलेल्या जागेत एकादा संदेश, एकादे बोधवाक्य लिहिलेले होते किंवा गुजरात.सरकारची एकादी उपलब्धी किंवा भावी योजना लिहिलेली होती. कुठल्याही मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे प्रोजेक्ट केले जात असलेले मी यापूर्वी कुठेही पाहिले नव्हते. त्या काळात ते गुजरात राज्याच्या प्रगतीत इतके गुंतलेले दिसत होते की चारच वर्षात ते संपूर्ण देशाचे नेतृत्व करणार असतील अशे मात्र त्या वेळी माझ्या ध्यानीमनीसुद्धा आले नाही.

अमेरिकेतल्या १९०८ मधल्या निवडणुकीत आणि २०१४ साली झालेल्या भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीत मला बरेच साम्य दिसले. अमेरिकेत जसा ओबामा यांना आधी त्यांच्या पक्षामधूनच तीव्र विरोध होत होता तसाच भारतात नरेन्द्र मोदी यांनासुद्धा झाला. ओबामांनी अत्यंत शांतपणे आणि मुत्सद्देगिरीने त्या विरोधावर मात केली आणि इतर प्रतिस्पर्ध्यांना बाजूला सारले तसेच मोदींनी केले. शिवाय भारताच्या भावी पंतप्रधानाचे नाव निवडणुकीच्या आधीपासून जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नसतांनासुद्धा या वेळेस भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकली तर नरेन्द्र मोदीच पंतप्रधान होतील असे त्यांनी सर्वांकडून वदवून घेतले. बुशच्या राजवटीवर बहुतेक अमेरिकन जनता असंतुष्ट होती, काही प्रमाणात ती चिडलेली होती, त्याचप्रमाणे भारतातली बरीचशी जनता मनमोहनसिंगांच्या सरकारच्या कारभारामुळे वैतागली होती. २०१४ साली भारतीय जनता पक्षाने केलेल्या प्रचारात त्या पक्षाऐवजी नरेंद्र मोदी यांच्या नावावरच अधिक भर दिला गेला. "अबकी बार मोदी सरकार" हा त्यातला मुख्य नारा होता. ओबामा यांच्याप्रमाणेच नरेन्द्र मोदीसुद्धा फर्डे वक्ते आणि अत्यंत संभाषणचतुर आहेत. ओबामांच्या मानाने मॅकेन फिके पडत होते, मोदींच्या विरोधात काँग्रेसचा चेहेरा म्हणून उभे केले गेलेले राहुल गांधी या बाबतीत फारच तोकडे पडत होते. ओबामांनी झंझावाती दौरे करून जास्तीत जास्त अमेरिकन मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर मोहनास्त्र टाकून त्यांना आपल्या बाजूला ओढून घेतले. नरेंद्र मोदींनी तर या अस्त्राचा यशस्वी वापर ओबामांपेक्षाही जास्त प्रभावीपणे केला.

दोन्ही वेळेस झालेल्या निवडणुकांचे निकाल पहाण्याची जबरदस्त उत्सुकता सर्वांच्या मनात होती. निकालाच्या दिवशी सर्वांना त्याबद्दल वाटणारी उत्सुकता अनावर होती. अमेरिकेतल्या निवडणुकींमध्ये ओबामा निवडून येतील असे भविष्य बहुतेक सगळ्या पंडितांनी वर्तवलेले असल्यामुळे त्याची अपेक्षा होतीच, पण त्यांना इतके मोठे मताधिक्य मिळेल असे वाटत नव्हते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही आघाडी सर्वाधिक जागा मिळवेल इतका अंदाज होता, एनडीएला त्याहून जास्त भरघोस यश मिळालेच, पण त्याचा घटक असलेल्या भाजपला स्वतःला बहुमत मिळाले हे त्यांचे यश अपेक्षेच्या पलीकडले होते. या दोन्ही जागी बहुतेक लोकांना हवे वाटणारे निकाल लागले होते. त्यामुळे जल्लोश केला जात होता.

नरेन्द्र मोदी यांना यापूर्वी अमेरिकेने व्हिसा द्यायला नकार दिलेला असल्यामुळे कदाचित त्यांच्या मनात अमेरिकेबद्दल आढी बसलेली असणार असे तर्क केले जात होते. पण आपल्या व्यक्तीगत मानापमानापेक्षा राष्ट्रहिताला जास्त महत्व देणे हे मोदींचे धोरण होते. त्यांनी अमेरिकेशी असलेले संबंध अधिकाधिक दृढ करण्यावर भर दिला. अमेरिकेत जाऊन तिथल्या जनतेशी थेट संवाद साधला आणि प्रेसिडेंट ओबामा यांच्याशी व्यक्तीगत मैत्रीसंबंध प्रस्थापित केले. याची परिणती होऊन हे दोन्ही देश पूर्वी कधीही नव्हते तितके आता जवळ आले आहेत. यंदाच्या २६ जानेवारीला झालेल्या समारंभाचे प्रमुख पाहुणे होण्याचे निमंत्रण ओबामा यांनी स्वीकारले, वेळात वेळ काढून ते आले आणि त्यांनी या छोट्या भेटीत आपली छाप पाडली.

ओबामा आणि मोदी यांच्या संयुक्त पत्रकारपरिशदेमध्ये ओबामांनी केलेले छोटेसे खुसखुशीत भाषणसुद्धा सर्वांना खूप आवडले. इतर मुद्यांशिवाय त्यांनी असे सांगितले की "अमेरिका ही अशी जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे" असे मी म्हणत होतो, आता मी म्हणेन की "भारत ही अशी आणखी एक जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे."  अर्थातच त्यांचा इशारा नरेंद्र मोदी यांच्या गरुडझेपेकडे होता. एका असामान्य राजकारण्याने दुस-याला दिलेली दाद होती.

1 comment:

asidwadkar said...

nice Blog ....
Submit your blog in our blog directory for more visitors
www.blogdhamal.com