माझे लग्न ठरल्यानंतर मी एक लहानसा फ्लॅट भाड्याने घेतला. तिथे स्थिरस्थावर व्हायच्या आधीच मला एक निरोप आला की अलकाचे म्हणजे माझ्या भावी वधूचे भाऊसाहेबकाका मला भेटायला (आणि माझे घर पाहायला) अमक्या दिवशी संध्याकाळी येणार आहेत. पण तोंवर मी फक्त झोपण्यासाठी एक पलंग आणि चहा करण्यापुरती दोन चार जुजबी भांडी घरात आणून ठेवली होती. त्यांच्या व्यतिरिक्त माझ्या घरात (पहायला असे) काहीच नव्हते. फक्त भेटायचे असते तर ते जिथे आले असतील तिथे जाऊन मीच त्यांना भेटून आलो असतो, पण त्यांना माझे घर पहायचे होते.
ठरल्या वेळी एका प्रचारकाला बरोबर घेऊन ते माझ्या घरी येऊन पोचले. त्यांची उंच आणि सुदृढ शरीरयष्टी, गोरापान आणि तेजःपुंज चेहेरा, त्यावर अत्यंत सात्विक भाव वगैरे पाहून मी क्षणभर त्यांचेकडे पहात राहिलो. भानावर येताक्षणी लगेच त्यांना वाकून नमस्कार केला तो फक्त औपचारिक नव्हता. माझ्याहून सर्वतोपरीने खूप मोठ्या अशा व्यक्तिमत्वाबद्दल मनात दाटून आलेला आदरभाव त्यात होता. माझे काडेपेटीएवढे आणि तेसुद्धा ओकेबोके असे घरकुल पाहून त्यांना काय वाटले असेल कोण जाणे, पण त्यांनी ते बोलून दाखवले नाही. अत्यंत आपुलकीने त्यांनी माझी थोडी विचारपूस केली आणि इकडच्या तिकडच्या काही गोष्टी झाल्या. माझे कौतुक करण्यासारखे माझ्याकडे काही नव्हतेच, माझ्याबद्दल त्यांचे कितपत अनुकूल मत झाले होते तेही मला कळले नाही. पण ठरल्याप्रमाणे आमचे लग्न झाले आणि भाऊसाहेबकाकांचा आम्हाला आशीर्वाद मिळाला यात सगळे आले.
लग्न झाल्यानंतर मी अनेक वेळा सासुरवाडीला गेलो. मध्यप्रदेशातल्या टिमरनी नावाच्या गावी भुस्कुट्यांची पुरातनकाळातली गढी आहे. पेशवाईच्या काळात शिंदे होळकर आदि मराठे सरदार उत्तरदिग्विजयासाठी निघाले तेंव्हा त्यांच्यासमवेत भुस्कुट्यांचे पूर्वज या भागात जाऊन स्थाइक झाले होते. आपल्या संरक्षणासाठी त्यांनी ही गढी बांधली असेल किंवा काबीज करून आपल्या ताब्यात घेतली असेल. तेंव्हापासून ती या कुटुंबाकडे आहे. त्या भागात लहानशा भुईकोट किल्ल्याला गढी म्हणतात. शनिवारवाड्याप्रमाणे त्याच्या सगळ्या बाजूंनी तटबंदी आहे, त्यात मध्ये मध्ये बुरुज आहेत आणि आत जाण्यासाठी एक अवाढव्य आकाराचा दरवाजा आहे.
गढीच्या आत एक जुन्या काळातला प्रचंड मोठा वाडा आहे तसेच आणखी काही वास्तू आहेत. माझे लग्न झाले त्या वेळी भाऊसाहेब, बाबासाहेब आणि अण्णासाहेब यांची अशी तीन कुटुंबे त्यात रहात असत. त्यांच्यात कागदोपत्री वाटण्या झाल्या होत्या आणि तीन ठिकाणी वेगळ्या चुली मांडल्या गेल्या होत्या असे असले तरी मनाने ते सगळे कुटुंबीय एकमेकांशी घट्ट बांधलेले होते. काही तरी विचारायला किंवा सांगायला, मागायला किंवा द्यायला, नाहीतर अशाच नुसत्या गप्पा मारायला म्हणून रोजच बहुतेक सगळ्यांचे आपसात एकमेकांकडे जाणेयेणे चाललेले असे. गढीतली लहान मुले कुठेही एकत्र खेळत, कुणाकडेही खातपीत आणि कधीकधी झोपून पण जात असत. त्यांच्या दृष्टीने सगळे मिळून एकच कुटुंब होते, त्यांच्यात सख्खा, चुलत वगैरे भेदभाव नसायचा.
आपले भाऊसाहेब अशा त्या अद्भुत कुटुंबाचे प्रमुख होते आणि त्या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारे सूत्रधार होते असेही कदाचित म्हणता येईल. त्यांच्या नावाचाच मोठा दरारा होता. निरनिराळ्या विषयांवरील आपापसातल्या बोलण्यातल्या संभाषणाची गाडी एका विशिष्ट वळणावर अनेक वेळा येत असे. "यावर भाऊसाहेब काय म्हणतील? त्यांना काय आवडेल? त्यांना हे पटेल किंवा चालेल का?" वगैरे वगैरे... . त्यापुढची चर्चा "त्या वेळी ते असे बोलले होते किंवा आणखी कधी त्यांनी तसे सांगितले होते किंवा तसे केले होते." अशा पद्धतीने चालत असे. आपली मते मांडतांना सुद्धा अशा प्रकारचा त्यांचा आधार घेतला जात असे.
माझ्या लहानपणी आमच्या वडिलांचासुद्धा घरातल्या सर्वांना प्रचंड धाक वाटत असे. त्यांच्या विरोधात ब्र उच्चारण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती, चुकून काही तरी विसंवादी शब्द तोंडातून निघतील या भीतीमुळे त्यांच्यासमोर असतांना सहसा कोणीही मोकळेपणे बोलत नसत, कधी कधी तर त्यांच्या समोर यायचेच टाळत असत. अशा प्रकारच्या वातावरणाचा मला अनुभव होता आणि त्यात माझी तिथे घुसमट होत होती, पण इथे मी त्रयस्थपणे पाहू शकत होतो. त्यावर विचार करू शकत होतो. माझे वडील शीघ्रकोपी असल्यामुळे त्यांचा राग अनावर होत असे याची सर्वांना धास्ती वाटायची. पण भाऊसाहेब मला तरी खूप शांत, प्रेमळ आणि सात्विक वृत्तीचे दिसत होते, त्यांच्या बोलण्यात मार्दव होते. तरीही सर्वांना त्यांची भीती का वाटावी हा प्रश्न मला पडत असे.
कदाचित असे असेल की त्यांची बुद्धीमत्ता आणि विद्वत्ता सर्वसामान्यांहून खूप उच्च दर्जाची होतीच, त्यांचा जनसंपर्क दांडगा होता आणि अनुभवविश्व अचाट होते. याचा सर्वांवर प्रभाव पडत असणार. "केल्याने देशाटन, पंडितमैत्री सभेत संचार। शास्त्रग्रंथविवेचन मनुजा चातुर्य येतसे फार।।" असे एक सुभाषित आहे. मूळच्याच कुशाग्र बुद्धीला या सर्वांची साथ मिळाली तर तिचा अफाट विकास होणार आणि भाऊसाहेबांच्या बाबतीत या चारही गोष्टी मुबलक प्रमाणात घडत असत. यामुळे सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी इतका आदरभाव निर्माण झाला होता की त्यांनी मार्गदर्शन करावे आणि आपण मुकाटपणे त्या रस्त्याने जावे असे इतराना नेहमीच वाटत असणार. त्यापेक्षा वेगळे काही केले तर त्यावर "भाऊसाहेब काय म्हणतील?" यापेक्षा सुद्धा "यात आपलीच काही चूक होत आहे का?" अशी शंका येत असेल किंवा "बाकीचे लोक असे समजतील का?" असा प्रश्नही पडत असेल. त्यापेक्षा कुठलेही काम भाऊसाहेबांना विचारून काहीही केलेले सर्वांना सुरक्षित वाटत असावे.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment