Sunday, August 31, 2014

गणेशोत्सवानिमित्य


तुझ्या कांतिसम रक्‍तपताका पूर्वदिशी फडकती।
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती ।।

सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा ।
शुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा ।
छेडुनि वीणा जागविते तुज सरस्वती भगवती ।।

आवडती तुज म्हणुनि आणिली रक्‍तवर्ण कमळे ।
पांचमण्याच्या किरणांसम ही हिरवी दुर्वादळे ।
उभ्या ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती ।।

शुर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा ।
तिन्ही जगांचा तुच नियंता, विश्वासी आसरा ।
तुझ्या दर्शना अधीर देवा हर, ब्रम्हा, श्रीपती ।।

                    स्व. ग. दि. माडगूळकर

दर वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी  एकादा मुद्दा (थीम) घेऊन त्यावर लिहायचे ठरवले होते. या वर्षी तीन दिवस उलटून गेले तरी या ब्लॉगवर यायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे या सुंदर भूपाळीने सुरुवात करून हे पान उघडले आहे. आता जसे सुचेल, जमेल तसे या पानावरच रोज लिहायचे असे ठरवले आहे.

दर वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी  एकादा मुद्दा (थीम) घेऊन त्यावर लिहायचे ठरवले होते. या वर्षी तीन दिवस उलटून गेले तरी या ब्लॉगवर यायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे या सुंदर भूपाळीने सुरुवात करून हे पान उघडले आहे. आता जसे सुचेल, जमेल तसे या पानावरच रोज लिहायचे असे ठरवले आहे.

मी शाळेत शिकत असतांना दरवर्षी गणेशचतुर्थी हा एकमेव सण आमच्या हायस्कूलमध्ये धूमधडाक्यात साजरा होत असे. इतर सणवारांसाठी फक्त सुटी असे. त्या दिवशी ते सण घरीच साजरे केले जात असत. गणेशचतुर्थीच्या दिवशी मात्र आपापल्या घरातले गणपती बसवून झाले की सगळी मुले शाळेकडे धाव ठोकत असत. घरून निघायला उशीर झाला तर गावात जिथे कुठे आमच्या शाळेची मिरवणूक चालत असेल तिथे येऊन त्यात सामील होत असत. ढोल ताशा, झांजा वगैरेंच्या आवाजावर "गणपती बाप्पा मोरया"चा घोष करत आमची वानरसेना गणपतीच्या मूर्तीसह गावात फिरून शाळेत येत असे. तिथल्या सेंट्रल असेंब्ली हॉलमध्ये त्या मूर्तीची स्थापना केली जात असे. त्या काळात ज्या वस्तू आजूबाजूच्या निसर्गात किंवा स्थानिक बाजारात उपलब्ध असायच्या त्यामधून सजावट केलेली असायची. शाळेचा हॉल तर मुलांनी गच्च भरलेला असायचा त्याच्या पुढच्या बाजूचा कॉरीडॉर मुलांनी आणि मागच्या बाजूचा मुलींनी भरलेला असायचा. पूजा, आरती वगैरे करून चिमूटभर प्रसाद खाऊन घरी गेल्यावर संध्याकाळी पुन्हा सगळे शाळेत येत. त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा वाजत गाजत आणि फटाके उडवत गणपतीची मिरवणूक निघे पण ती फक्त शाळेच्या आवारातच असलेल्या विहिरीपर्यंतच जात असे. तिथे पोचल्यावर पट्टीचे पोहणारी चार पाच मुले गणपतीच्या मूर्तीला हातात धरून पाय-यांवरून खाली उतरत आणि पाण्यात बुडी घेऊन विहिरीच्या पार तळापर्यंत पोचत आणि तिला अलगदपणे तळाशी ठेऊन वर येत असत. बाकीची काही मुले पाय-यावर तर काही काठावर उभी राहून ते दृष्य पहात असत. शिक्षकवर्ग फक्त मार्गदर्शन करण्यापुरते काम करत असत, मुख्य हौस मुलांचीच असे. शाळेतल्या गणपतीचे विसर्जन करून झाल्यावर सगळेजण आपापल्या घरातल्या गणपतीच्या संध्याकाळच्या आरतीच्या तयारीला लागत.

असा अर्ध्याच दिवसाचा गणपती मी फक्त आमच्या शाळेतच पाहिला. आमच्या गावात काही लोकांकडे दीड दिवसांचा, कुणाकडे तीन, पाच किंवा सात दिवसांचा असायचा. काही लोकांकडे बाप्पाचा मुक्काम अनंतचतुर्दशीपर्यंत असायचा तर काही लोकांचे गणपती गौरीसोबत जायचे. ते सहा किंवा सात दिवस रहात असत. गणेशोत्सवाच्या बाबतीतले हे वैविध्य मुंबईतसुद्धा दिसते. दीड दिवसांचा गणपती उत्सव साजरा करणा-या एकाला त्याच्या मित्राने विचारले, "तुम्ही लोक इतके कसे रे चिक्कू? गणपती आला ना आला तेवढ्यात त्याला निरोप देऊन मोकळे होता. आम्ही बघा कसे बाप्पाला चांगले दहा दिवस आमच्याकडे ठेवून घेतो."
त्यावर पहिला मित्र म्हणाला, "बरं तू साग, गणपती हा काय देणारा देव आहे?"
"बुद्धी देणारा."
"मग त्यासाठी आम्हाला दीड दिवस पुरेसे आहेत, तुम्हाला लागत असतील बाबा दहा बारा दिवस."

ज्या गणपतींचे विसर्जन दुस-या दिवशी केले जाते त्यांना दीड दिवसाचा असे कदाचित खिजवण्यासाठी म्हणत असतील, पण तिस-या दिवशी विसर्जन होत असलेल्या गणपतींना मात्र अडीच दिवसाचे न म्हणता तीन दिवसाचे असे का म्हणायचे हे गणित मला कधी समजले नाही. दीड, अडीच असे करत हाच क्रम पुढे वाढवत नेला तर मग साडे चार, साडेसहा, साडे नऊ असे आडमोडी आकडे येतील म्हणून कदाचित अडीच दिवसांना राउंड ऑफ करून तीन दिवस म्हंटले जात असेल. आमच्या घरातला गणपती मात्र मोजून पाच दिवसांचाच असायचा. ही प्रथा माझ्या वडिलांनी सुरू केली की आजोबांनी की पणजोबांनी ते माहीत नाही. आमच्या लहानपणी असले प्रश्न मनात उठले तरी ते विचारायची कोणाची प्राज्ञा नसायची. मी मात्र माझ्या मुलांना सांगण्यासाठी एक एक्स्प्लेनेशन तयार केले.

गणपतीची आरास आणि इतर तयारी करण्यात बराच वेळ खर्च केला जातो, सजावट करण्यात हौसेने कलाकुसरत केली जाते, नवनवीन कल्पनांना आकार दिला जातो. आपले कलाकौशल्याचे काम चार लोकांनी येऊन पहावे असे वाटते. गावातली मित्र मंडळी, नातेवाईक वगैरे लोक या निमित्याने भेटायला येतात. त्यांना सवडीने येऊन जायला थोडी फुरसत द्यायला पाहिजे. घरातल्या सर्वांनी मिळून एकत्र जमून गजाननाची पूजा, आरती वगैरे करण्यात थोडी मजा येऊ लागलेली असते. ती गोडी दीड दोन दिवसात संपवून टाकावी असे वाटत नाही. असे असले तरी या उत्सवाच्या दिवसात रोजच्या भरगच्च कामांमध्ये या कार्यक्रमांची भर पडलेली असते. शाळा, ऑफीस वगैरेंची व्यवधाने सांभाळून ते सगळे कार्यक्रम अगदी साग्रसंगीत रीतीने रोज नियमितपणे करणे जास्त दिवस अशक्य नसले तरी कठीण असते. शिवाय घरात गणपती बसलेला असतांना शक्य तोवर कोणी ना कोणी नेहमी घरात हजर राहण्याची गरज असते. त्या काळात मला अनेक वेळा फिरतीवर परगावी जावे लागत असे, ते जास्त दिवस पुढे ढकलता येत नसे. या सगळ्याचा विचार करता घरातल्या गणेशोत्सवासाठी पाच दिवस हा चांगला आणि ऑप्टिमम पीरियड वाटतो. बाप्पासाठी काही करत असल्याचे समाधानही मिळते आणि त्याचा ताणही पडत नाही. हे लॉजिक मुलांना बहुधा पटले असावे.   

Monday, August 18, 2014

ब्रह्मकुमारींचे रक्षाबंधन



पूर्वीच्या काळात दक्षिण महाराष्ट्र किंवा उत्तर कर्नाटकाच्या आमच्या प्रदेशात रक्षाबंधनाचा प्रघात नव्हता. माझ्या लहानपणी श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणत असत. आमच्या गावापासून समुद्रकिनाराही शेकडो मैल दूर असल्यामुळे त्या दिवशी समुद्रावर जाण्याचा प्रश्नच नव्हता. कदाचित दहा पिढ्यांपूर्वी कोकणात राहणारे आमचे पूर्वज समुद्राला नारळ अर्पण करतही असतील, आम्ही फक्त नारळीभात खात असू. समुद्रकिनारा खूप दूर आणि पावसाचे प्रमाणही कमी असल्यामुळे त्या भागात नारळाचे उत्पादन होत नसे. ओले खोबरे हा आमच्या घरातल्या रोजच्या जेवणातला भाग नव्हता, कधी तरी ते खाणे हा थोडासा चैनीचा भाग होता. सणावारी केलेल्या मोदक, करंज्या वगैरेतून थोडेसे खोबरे खायला मिळत असे आणि एकाद्या पूजेसाठी किंवा देवदर्शनाच्या वेळी नारळ फोडला गेला तर चटणी, भाजी, आमटीमध्ये खोबरे घालून त्यांची चंव वाढवली जात असे. त्यामुळे पोटभर नारळीभात म्हणजे एक मेजवानी होती आणि हा योग वर्षातून एकदाच येत असल्याने त्याचे मोठे अप्रूप वाटायचे.

त्या काळात संघात जाणारे माझे शाळेतले मित्र श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी शाखेत जाऊन त्यांच्या झेंड्याला राखी बांधायचे. राष्ट्रध्वज नसल्यामुळे तो कशाचे प्रतीक होता आणि माझे मित्र त्याचे रक्षण करणार म्हणजे ते काय करणार आहेत हे काही त्यातल्या कोणाला सांगता येत नसे. शिवाय झेंडा हा शब्द पुल्लिंगी असल्यामुळे त्याला राखी बांधणारे माझे मित्र त्याच्या बहिणी ठरणार म्हणजे कुणी कुणाचे रक्षण करायचे असा घोळ होत असे. मी त्या मार्गाने गेलो नसल्यामुळे त्याबद्दल जास्त विचार केला नाही. जुन्या काळातली लोकप्रिय नटी बेबी नंदा हिची प्रमुख भूमिका असलेला छोटी बहन हा सिनेमा तुफान लोकप्रिय झाल्यानंतर "भैया मेरे राखीबंधनको निभाना" हे त्या सिनेमातले गाणे लोकांच्या ओठावर आले आणि उत्तर भारतातल्या या सणाचा अखिल भारतात प्रसार झाला. त्यापूर्वी दक्षिणेत हा सण फारसा कोणी पाळत नव्हते. माझ्या लहानपणी आमच्या गावातल्या बाजारात राख्या मिळतही नसत. विणकाम, भरतकाम वगैरे करण्यासाठी घरात आणलेल्या रेशमाच्या धाग्यांपासून मुलींनी घरच्या घरीच राख्या तयार करून घरातल्या आपल्या भावांच्या मनगटावर त्या बांधायला तेंव्हा नुकतीच सुरुवात झाली होती. त्याची व्याप्ती फार तर गावातल्या अगदी जवळच्या नातेवाईकांपर्यंत होत असे. लग्न करून सासरी गेलेल्या बहिणी माहेरपणासाठी श्रावणात माहेरी आल्या असल्या तरच त्यांचा भावाला राखी बांधायचा कार्यक्रम होत असे.

नोकरीला लागल्यानंतरसुद्धा माझ्या बहिणींबरोबर भाऊबीज हा सण मी दरवर्षी नियमितपणे साजरा करत होतो, पण रक्षाबंधन मात्र अगदी क्वचित प्रसंगीच करून घेतले असेल. आमच्या घरी तशी प्रथाच नव्हती. माझी मुले मात्र त्यांच्या चुलत, मावस, आत्ते, मामे बहिणींकडून दरवर्षी राखी बांधून घ्यायला लागली. ती जन्माला आलेल्या वर्षापासूनच त्यांच्या या बहिणींच्या राख्या पोस्टाने यायला सुरुवात झाली आणि त्यांची संख्या वाढत गेली. हा सण अखिल भारतात साजरा व्हायला सुरुवात झाली असली तरी आमच्या ऑफिसला त्या दिवशी सुटी नसायची. माझे उत्तर भारतीय सहकारी कपाळाला कुंकवाचे उभे पट्टे ओढून आणि मनगटापासून कोपरापर्यंत मोठमोठ्या राख्यांची माळ बांधून ऑफिसात यायचे, काही जण मिठाईचे बॉक्सही आणायचे आणि त्यातल्या मोतीचुराच्या लाडवांचे किंवा बर्फीचे तुकडे आम्हाला वाटायचे. त्या दिवशी मला आपले मनगट ओकेबोके वाटायचे, पण कुणाला तरी बळेबळेच बहीण मानून तिच्याकडून राखी बांधून घ्यावी असे मात्र कधी वाटले नाही.

अशी अनेक वर्षे गेल्यानंतर या वर्षी एका वेगळ्या प्रकारच्या रक्षाबंधन सोहळ्याला हजर राहण्याचा योग आला. आमच्या घरापासून जवळच असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अशे भारदस्त नाव असलेल्या संस्थेकडून आम्हाला एक आमंत्रण मिळाले. मलाही या संस्थेबद्दल आदरमिश्रित उत्सुकता होतीच, तिच्याबद्दल जेवढे कानावर आले होते ते चांगलेच होते, पण प्रत्यक्षात तिथे जाणे झाले नव्हते. त्यामुळे तिथला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आकर्षित करत होता. आम्ही दोघेही लवकर स्नान वगैरे करून पावन होऊन जायला निघालो. जिन्याच्या पाय-या उतरून खाली उतरलो तेवढ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. एरवी आम्ही पुन्हा घरी परत जाऊन गरम गरम चहा पीत बसलो असतो, पण या वेळी आमचा निर्धार पक्का होता. दोन तीन मिनिटांत एक रिक्शा मिळाली आणि आम्ही त्यांच्या आश्रमात जाऊन पोचलो.

हा आश्रम म्हणजे एक सिमेंट काँक्रीटची लहानशी पक्की इमारत आहे. तिथल्या पहिल्या मजल्यावरच्या हॉलमध्ये शंभर दीडशे खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या, त्या अर्ध्याअधिक भरल्या होत्या. स्टेजवर एका महापुरुषाची तसबीर ठेऊन त्याला पुष्पमाला घातल्या होत्या. तीन चार खुर्च्याही मांडून ठेवल्या होत्या. लाउडस्पीकरवर रक्षाबंधनासंबंधी सुमधुर आणि अर्थपूर्ण अशा गाण्यांच्या रेकॉर्ड्स वाजत होत्या. तिथली एकंदर स्वच्छता आणि टापटीप वाखाणण्यासारखी होती. तिथे आलेली सगळी माणसेही डिसेंट दिसत होती आणि गलका न करता शांतपणे बसून ती गाणी ऐकत होती. कार्यक्रमाची सुरुवात होण्याची वेळ येताच पांढरा शुभ्र गणवेष असल्यासारख्या साड्या नेसलेल्या चार महिला आल्या आणि व्यासपीठावर स्थानापन्न झाल्या. त्यांना सगळे दीदी असे म्हणत होते. सर्वांनी त्यांना आणि त्यांनी सर्वांना अभिवादनाची देवाणघेवाण करून झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रजापिता ब्रह्मकुमारी ही संस्था किंवा संप्रदाय जगातल्या किती देशांमध्ये पसरला आहे आणि त्याची किती ठिकाणी केंद्रे आहेत, त्यांचे विचार, ध्येयधोरणे वगैरेंबद्दल संक्षिप्त माहिती देण्यात आली.

त्यानंतर सर्वात ज्येष्ठ दीदींचे सुरस व्याख्यान झाले. त्यांनी अगदी सोप्या भाषेत धर्माचरण, व्यसनमुक्ती वगैरेंवर भर दिला. या दिवशी संस्थेच्या प्रमुखांच्या वतीने त्या दीदी सर्वांना म्हणजे सर्व उपस्थित स्त्रीपुरुषांना राखी बांधणार होत्या पण त्याच्या आधी सर्वांनी एक फॉर्म भरून द्यायचा होता. त्या दिवसापासून आपण अमूक एक व्यसन सोडणार आहोत असे वचन त्या फॉर्मद्वारे द्यायचे होते. माझ्यासारख्या ज्याला कसलेच व्यसन नव्हते त्यांनी एक दुर्गुण सोडायचा निर्धार करायचा होता. हे काम अधिक कठीण होते की कमी कठीण होते कोण जाणे. सर्वांनी फ़ॉर्म भरून तिथे ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकला आणि रांगेने पुढे जाऊन दीदींकडून पांढरी शुभ्र राखी बांधून घेतली. निरनिराळा संदेश असलेले एक एक कार्डही त्यांनी प्रत्येकाला दिले, हा परमेश्वराने दिलेला आदेश आहे असे मानून त्याचे पालन करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करावा असे त्यांनी त्यांच्या प्रवचनात आधीच सांगितले होते. सर्वांनी ते कार्ड शिरोधार्य मानले. माला मिळालेले कार्ड हा आदेश नसून एक अभिप्राय होता. तो कितपत योग्य होता हे मला ओळखणारेच सांगू शकतील. सर्वांना प्रसाद म्हणून अल्पसा फराळ वाटला गेला. तो प्रसाद भक्षण करून आणि एक वेगळा अनुभव घेऊन आम्ही घरी परतलो.        

Tuesday, August 05, 2014

बेडूक, कोकिळा, गाढव आणि उंट



या चार पशुपक्ष्यांमध्ये काही तरी समान धागा असेल का? बेडूक हा डबक्यांमधल्या चिखलात राहणारा प्राणी आहे तर उंट म्हणजे रुक्ष वाळवंटातले जहाज. रानावनातल्या झाडांच्या फांद्यांमध्ये लपून कोकिळा कुहूकुहू करत असते तर गाढवे गावातल्या उकिरड्यांवर सर्रास लोळत पडलेली दिसतात. त्यांच्यात विरोधाभास असला तरी वैर असायचेही काहीच कारण नाही. त्यासाठी ते एकमेकांच्या संपर्कात येण्याची शक्यताही कमीच असते. मग मी यांना एकत्र का आणले आहे? संस्कृत भाषेतल्या सुभाषितांचा अभ्यास करतांना मला त्यांच्यातले दुवे मिळाले. या सुभाषितांमध्ये अनेक वेळा प्राणीमात्रांचे दाखले दिले असले तरी त्यांचा उद्देश माणसांनी त्यावरून बोध घ्यावा असा असतो. या आणि इतरही सगळ्याच प्राण्यांचे काही गुण आपल्यामध्ये असतात. त्याचे परिणाम कसे होतात किंवा होऊ नयेत याविषयी या सुभाषितांमध्ये सुचवलेले असते.

बेडूक म्हंटले की लगेच लहानपणी शिकलेली कविता आठवते. "लगीन करतो बेडूकराव। डराँव डराँव डराँव डराँव।।" पावसाळा सोडून इतर ऋतूंमध्ये हे प्राणी कुठल्या खबदाडात लपून बसले असतात कोण जाणे, पण पाऊस पडून डबकी साचायला लागली की जिकडे तिकडे त्यांच्या फौजा दिसायला लागतात आणि डराँव डराँव डराँव डराँव च्या गोंगाटाने आसमंताला भरून टाकतात. वसंत ऋतूमध्ये आपल्या कूजनाने सर्वांना मोहवून टाकणा-या कोकिळाने मात्र या काळात आपली कुहूकुहू पार थांबवून टाकलेली असते. या दोन घटनांचा संदर्भ सुभाषितकारांनी असा जोडला आहे.  

भद्रम् कृतम् कृतम् मौनम् कोकिलैः जलदागमे ।
दर्दुराः यत्र गायन्ति तत्र मौनं हि शोभनम् ।।
आभाळात काळे ढग जमायला लागताच (पावसाळा येताच) कोकिळांनी मौन धारण केले हे बरेच झाले. बेडकांची डराँवडराँव सुरू झाल्यानंतर तिथे (कोकिळांनी) गप्प राहण्यातच शोभा आहे. बेसूर गायकांच्या आरडाओरडीमध्ये चांगल्या गायनातली सुरेल तान कोणाला ऐकू येणार आहे किंवा मूर्खांच्या कर्कश कलकलाटात उपदेशाचे सौम्य शब्द कोण ऐकणार आहे? त्यांनी अशा वेळी गप्प बसून राहणेच उचित ठरेल.

वरील सुभाषितात कोकिळेच्या गुणांबद्दल तिची स्तुती केलेली असली तरी तिला इतके डोक्यावर घेण्यासारखे तिने कुणासाठी काय केले आहे? आणि गाढवाचे ओरडणे मधुर नसले म्हणून त्यात त्याने काय पाप केले आहे? गाढव निदान माणसांचे भार तरी वाहतो, कोकिळ पक्ष्याचा कुणाला काय उपयोग होतो? केवळ गोड बोलणारे महत्वाचे नसतात, दुस-यासाठी काही करण्याला अधिक महत्व दिले पाहिजे, पण जगात तसे घडत नाही. सगळीकडे बोलघेवड्यांचेच कौतुक होते, तेच सगळ्यांना आवडतात, परखड शब्द बोलणारे अगदी निरुपद्रवी असले तरीसुद्धा ते कोणाला आवडत नाहीत. अशी जगरहाटी आहे असे खालील सुभाषितात सांगितले आहे.  

वाङ्माधुर्यात् सर्वलोकप्रियत्वम् । वाक्पारुष्यात् सर्वलोकाप्रियत्वम् ।
किंवा लोके कोकिलेनोपकारः । किंवा लोके गर्दभेणाप्रकारः।।
मधुर बोलणारे सर्वांनाच प्रिय होतात, कठोर वचनाने ते लोक सर्वांनाच अप्रिय होतात. कोकिळ पक्ष्याने जगावर असे कोणते उपकार केले आहेत? (तरीही तो सर्वांना आवडतो) आणि गाढवाने कुणाचे काय वाईट केले आहे? (म्हणून ते कोणालाही आवडत नाही.)

गाढवाचा आवाज जसा कोणाला आवडत नाही त्याचप्रमाणे उंटाला कोणी सुरेख म्हणत नाही. त्याचे तोंड, मान, पाठ, पाय वगैरे सगळेच अवयव इतर प्राण्यांशी तुलना करत आउट ऑफ प्रपोर्शन वाटतात. अष्टावक्र किंवा आठ जागी वाकडा अशीही उंटाची भलामण केली जाते. गाढव आणि उंट या समदुःखी प्राण्यांनी आपसात मैत्री केली. "समानशीलव्यसनेषु सख्यम्" असेही एक सुभाषित आहेच. उंटांच्या घरी साज-या होत असलेल्या लग्नसमारंभात गाढवांना भाट म्हणून पाचारण केले गेले. त्यांनी आपल्या आवाजात खूप रेकून घेतले, त्यात उंटांच्या सौंदर्याची तोंड फाटेपर्यंत तारीफ केली. उंटांनीही गर्दभउस्तादांच्या गायनाची स्तुती करून याची परतफेड केली. असे खाली दिलेल्या सुप्रसिद्ध सुभाषितात सांगितले आहे.

ऊष्ट्राणाम् च गृहे लग्नम् गर्दभाः स्तुतिपाठकाः ।
परस्परम् प्रशंसन्ति अहो रूपम् अहो ध्वनिः ।।

दोन अयोग्य व्यक्ती एकमेकांची वाहवा कशी करतात हे या उदाहरणात दिसून येते. हे ऐकणारा जाणकार असेल तर समजायचे ते समजून घेतो, पण अजाण लोक त्या स्तुतिप्रदर्शनात वाहवून जातात असेही काही वेळा दिसते. आपले असे होऊ नये, तसेच आपले हंसेही होऊ नये याची काळजी घ्यावी हे उत्तम.