Thursday, April 24, 2014

अशी ही टोलवाटोलवी

सायबरनगरीतल्या काही मैदानांवर टोलवाटोलवीचा एक अद्भुत खेळ खेळला जात असतो. हा खेळ 'डे अँड नाइट मॅच'प्रमाणे एका दिवसातले काही तास आणि रात्रीतले काही तास एवढाच वेळ चालत नाही. मैदानाची साफसफाई आणि डागडुजीसाठी एकाद दुसरा दिवस सोडल्यास तो बारा महिने चोवीस तास सतत चालत असतो. यात भाग घेणा-यात मुलामुलींपेक्षा बाप्ये, बाया आणि म्हातारे-कोतारे यांचीच संख्या जास्त असली तरी त्यांचे निरनिराळे गट नसतात, सगळेजण एकत्रच खेळतात. हा खेळ पहायला येणा-यांची संख्या अर्थातच खेळणा-यांच्या काही पटीने तरी जास्त असते.

रात्रंदिवस चालत असलेल्या या खेळात भाग घेणारे सगळेजण आपापल्या सोयीनुसार जमेल तेंव्हा किंवा इच्छा होईल तेंव्हा मैदानावर येऊन, खेळात भाग घेऊन त्यांना हवे तेंव्हा परतही जाऊ शकतात. दिवसा कामावर जाणारे लोक रात्री तिथे येत असतील आणि रात्रपाळीवर काम करणारे दिवसा येत असतील असेच काही नसते. चेंडूफळीचा एकादा मोठा सामना चाललेला असतांना एका कानाने त्याचा वृत्तांत ऐकत नेहमीचे काम करत राहण्याची जुनी आणि थोर परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे काही लोक कामाच्या वेळेतही इथला खेळ पहायला किंवा त्यात भाग घ्यायला आले तर त्यात नवल किंवा काही चुकीचे वाटायला नको. या मैदानांकडे जाण्यात कुंपण, भिंत यासारखा कसलाही अडथळा नसल्यामुळे कोणीही आणि केंव्हाही तिथे जाऊन तिथे चाललेला खेळ अगदी चकटफू पाहू शकतो. खेळ पाहतांना त्याला त्यात आपणही भाग घ्यावा असे वाटले तर तो सरळ मैदानात उतरूही शकतो. पण पहिल्या वेळेला ते करण्याआधी त्याला त्या मैदानाच्या वहीत एक नाव आणि पत्ता लिहून ठेवावा लागतो एवढेच. 

नाकासमोर सरळ चालणा-या लोकांना आईवडिलांनी ठेवलेले एकच नाव माहीत असते. त्यांच्या जन्मपत्रिकेपासून ते शाळा, कॉलेज, ऑफीस, सोसायटी वगैरे सगळीकडे त्यांचे तेच नाव असते, रेल्वे किंवा विमानाची तिकीटे काढतांना आणि हॉटेलमध्ये खोली घेतांनासुद्धा ते लोक नेहमी तेच नाव देत असतात. पण काही लोकांना मात्र निरनिराळ्या विश्वांमध्ये निरनिराळी नावे धारण करण्याची हौस असते. एकादे आकर्षक असे टोपणनाव घेणे कवि, लेखक, नट, दिग्दर्शक वगैरे कलाकारांमध्ये पूर्वीपासून प्रचलित आहे. सायबरनगरीतल्या खेळात भाग घेणा-या काही मुलांनासुद्धा या मैदानातल्या विश्वातली त्यांची ओळख वेगळी ठेवायची असते. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तशी सोयही करून ठेवलेली आहे. तिथे नाव नोंदवतांना कोणतेही ओळखपत्र (आयडी प्रूफ) द्यायची गरज नसते. फक्त ते नाव आधीच आणखी कोणी घेतलेले नसावे एवढीच साधी अट असते. 'गौतम बुद्ध', 'येशू ख्रिस्त' किंवा 'सम्राट अशोक' यासारख्यांची सुप्रसिद्ध नावे कदाचित तिथे मान्य केली जात नसतील.

या बाबतीतली काही लोकांची कल्पकता अचाट असते. एकादा डेढफुट्या नानू आपले नाव 'ब्रह्मांडाम्लेटभक्षक' असे ठेवतो तर कोणी आपले नाव 'डेव्हिडेशुद्दौलासिंगताथा' असे सर्वधर्मसमभावसूचक ठेवतो. कोणाला फक्त 'भै', 'ठो' असे एक अक्षर पुरेसे वाटते, आपले नाव प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, टिंब वगैरेंमध्ये ठेवावे असे कोणाला वाटते. काही लोकांना त्यांच्या कल्पनाशक्तीला जास्त ताण द्यायचा नसतो. आधी दिलेली नावे ते वाचतात आणि त्यावरून त्यांना 'काळ्या खवीस' किंवा 'म्यूमूढमिता' अशी नवीन नावे स्फुरतात. "उगाच किती नावे लक्षात ठेवायची?" आणि "कुठल्या जागी आपले कोणते नाव आहे हे आयत्या वेळी आठवले नाही तर घोटाळा व्हायचा!" असा सूज्ञ विचार साधेसुधे बापडे करतात आणि आपले नेहमीच्या वापरातले नाव लिहून मोकळे होतात. त्या वहीत पत्ता तिहितांना 'अॅड्रेस प्रूफ' देण्याची गरज नसली तरी दिलेल्या पत्त्यावर एक संदेश पाठवला जातो आणि त्यामधून कळीचा शब्द (पासवर्ड) दिला जातो. यामुळे तिथे जो कोणता पत्ता द्यायचा असेल तो सायबरनगरीतल्या पोस्टमनला सापडायला हवा आणि त्याने तिथे टाकलेले पत्र हातात पडायला हवे एवढीशी काळजी मात्र घ्यावी लागते.

कोणत्याही मैदानाचा बिल्ला एवढे काम करून झाल्यावर एकदा मिळाला की त्या नावाचा मुखवटा चेहे-यावर चढवून केंव्हाही तिथे जाऊन खेळायला मिळते. बहुतेक लोक एकाच किंवा निरनिराळ्या नावांनी सगळीकडचे बिल्ले घेऊन ठेवतात आणि आपल्या मर्जीनुसार त्या मैदानावर चाललेला खेळ पहायला किंवा खेळायला जातात. या खेळाची मुख्य गंमत अशी आहे की यात कितीही खेळाडू भाग घेऊ शकतात. पहायला गेल्यास पत्यांमधल्या 'पेशन्स'प्रमाणे तो खेळ सुद्धा एकट्यानेही खेळता येतो, पण दोन चार भिडू मिळाले तर ते बरे असते, खेळ पहायला येणा-यांना त्याशिवाय त्यात फारशी मजा वाटत नाही. बहुतेक वेळा त्या मैदानावर इतर काही खेळाडू खेळत असतात आणि एकादा नवा डाव सुरू झाला की त्यातले काहीजण त्या डावात भाग घ्यायला आपणहून येतात. या खेळात जास्तीत जास्त किती खेळाडूंनी खेळावे यावर कसलेच बंधन नसते. क्रॉस मैदान किंवा आझाद मैदानांसारख्या ठिकाणी एकाच वेळी अनेक ठिकाणी स्टंप्स रोवून खेळाडूंचे निरनिराळे गट आपापसात चेंडूफळीचा खेळ खेळतांना दिसतात. त्याचप्रमाणे सायबरनगरीतल्या या टोलवाटोलवीच्या खेळाचेसुद्धा अनेक डाव प्रत्येक मैदानात एकाच वेळी चाललेले असतात. पण यातली दुसरी गंमत अशी आहे की त्यातला कोणताही खेळाडू त्या मैदानांवर अनेक ठिकाणी चालत असलेल्या निरनिराळ्या डावांमध्येसुद्धा एकाच वेळी खेळू शकतो. एक टोला इकडे तर दुसरा टोला तिकडे, तिसरा तिसरीकडे असे मारू शकतो. इतकेच नव्हे तर यातले काही नामवंत खेळाडू रोजच निरनिराळ्या मैदानांमध्ये जाऊन तिथे चाललेल्या वेगवेगळ्या डावांमध्ये थोडा थोडा वेळ खेळतात. काही खेळाडू विशिष्ट मैदानांवर नेहमी येत असतात. सायबरनगरीतल्या भाषेत सांगायचे झाल्यास ती मंडळी त्या मैदानांमध्ये 'पडिक' असतात.

हा खेळ कशा स्वरूपाचा असतो हे आधी थोडक्यात समजून घेऊ. नवा डाव सुरू करण्यासाठी प्रत्येक खेळाडू एकादा रंगबिरंगी झेंडा, बावटा, चवरी किंवा गुढी यासारखी त्याला जमेल तेवढी सुबक आणि कलात्मक अशी एक वस्तू सोबत घेऊन येतो. ती वस्तू जरा बरी दिसावी यासाठी तिला रंगरंगोटी करून, किनार, गोंडे वगैरे लावून, सजवून धजवून आणलेली असते. पण नेहमी असे होतेच असे नाही. कधीकधी एकादी धुणे वाळत घालायची साधी काठीही आणली जाते. आणलेल्या वस्तूचे वर्गीकरण करता येण्यासाठी तिचे एक दोन शब्दांमध्ये वर्णन करावे लागते. नवा खेळ सुरू करण्यासाठी एक छोटासा अर्ज भरून मैदानाच्या कार्यालयात द्यायचा असतो. त्या अर्जात दिलेल्या काही ठराविक शब्दांमधूनच वर्णनाची निवड करायची असते. त्यातल्या त्यात ज्या शब्दाचा त्या वस्तूशी काही संबंध जोडता येईल असे त्याला वाटले की तो त्यावर टिचकी मारून देतो. हा खेळ कुठे मांडायचा हे त्या शब्दानुसार ठरते. मग मैदानाच्या त्या भागात ती कलाकृती रोवून ठेऊन तो खेळाडू तिच्या शेजारी उभा राहतो.

इतर खेळाडू तिथे येऊन नव्या खेळाडूने ठेवलेल्या वस्तूचे थोडे फार निरीक्षण करतात आणि त्यांना ती आकर्षक वाटली तर तिला बारकाईने पाहतात. कोणाला तिचे कौतुक वाटते, कोणाला आदर वाटतो, कोणाला प्रश्न पडतात, तर कोणाला कींव येते. कोणाला हंसू येते, कोणाला रडू येते आणि कोणाला राग येतो किंवा कोणाला त्याचे काहीच वाटत नाही. पाहणा-याच्या मनात अशा नाना प्रकारच्या भावना येतात. त्यानुसार कोणाला त्या खेळाडूची पाठ थोपटावी असे वाटते, कोणाला त्याच्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते, कोणाला साधे तर कोणाला खोचक प्रश्न विचारासे वाटते किंवा त्याला एक ठेऊन द्यावी असेही कोणाला वाटते. इतर खेळाडूंच्या मनात आलेले हे विचार किंवा भावना प्रकट करण्यामधून हा टोलवाटोलवीचा खेळ सुरू होतो आणि चालत राहतो. 

ज्यांना जे वाटते त्यानुसार ते खेळाडू निरनिराळ्या आकारांचे आणि प्रकारचे चेंडू त्या नव्या खेळाडूकडे टोलवतात. एकाद्याला ती वस्तू खूप आवडली तर तो फुलाफुलांची चित्रे काढलेला सुंदर चेंडू अलगदपणे त्याच्याकडे सरकवतो. दुसरा कोणी एकादा मऊ चेंडू मंद वेगाने त्याच्या दिशेने ढकलतो, आणखी कोणी फटकारलेला चेंडू गिरक्या घेत येतो आणि साफ चकवतो, तर कोणाचा एकादा वेगवान आणि कडक चेंडू त्याच्या अंगावर उसळून येतो. कोणी टाकलेल्या क्रेझी बॉलचे काहीच सांगता येत नाही आणि काही मुलांनी त्याच्या दिशेने टोलवलेले चेंडू तर त्याच्या पार डोक्यावरून जातात. तो मुलगाही त्याच्याकडे येणा-या चेंडूंची वाट पहात तयार उभा असतो. तो यातल्या काही चेंडूंना त्याच्या हातातल्या फळीने जमेल तसे टोलवतो. या खेळात सराईत झालेला खेळाडू त्याला वाटल्यास जोरकस टोले हाणून काही प्रतिहल्लेही चढवतो. त्या मुलाच्या दिशेने टोलवलेल्या काही चेंडूंना इतर मुले परस्पर इतरांकडे टोलवतात. यातल्या प्रत्येक कृतीची नोंद ठेवली जाते आणि तितके टोल्यांक त्या खेळाडूच्या नावावर जमा होतात. इतर खेळाडूंनी त्याच्याकडे धाडलेल्या चेंडूचे गुण त्याला मिळतात आणि त्याने मारलेल्या टोल्याचेही मिळतात, तसेच इतरांनी परस्पर टोलवलेल्या चेंडूचे टोल्यांकही त्यालाच मिळतात. कधीकधी असेही घडते की हा खेळ मूळात कुठून सुरू झाला किंवा तो कुणी सुरू केला याला नंतर फारसे महत्व उरत नाही. इतर काही खेळाडू त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उभे राहतात आणि त्यांचे एकमेकांमध्ये जुंपते. त्या वेळी त्यांच्यात चाललेली टोलवाटोलवी खूप प्रेक्षणीय असते. त्याचाही फायदा त्या मूळ खेळाडूला जास्त अंक मिळण्यात होतो.

या खेळात प्राविण्य संपादन केलेल्या मुलांची टोलवाटोलवी पाहण्यासारखी असते. त्यातल्या एकेकाचे हस्तलाघव, पदलालित्य, मुखावरला आविर्भाव वगैरे नमूनेदार असतात. झपाट्याने चाललेली त्यांची 'अशी ही टोलवाटोलवी' पाहतांना प्रेक्षकांना खूप मजा येते. कोणत्याही मैदानात एकाच वेळी आजूबाजूला इतर अनेक डाव चाललेले असतात, त्यातले काही चांगले रंगलेले असतात. इतर मुलांनी त्या मजेदार डावांना सोडून नव्याने आलेल्या मुलाकडे आणि त्याच्या झेंड्याकडे लक्ष देणे हेच बहुतेक वेळा कौतुकाचे असते. त्यामुळे त्याच्या टोलवाटोलवीला दहावीस अंक प्राप्त झाले तरी तो खुष होतो. आपला खेळ खेळत असतांनाच इतर मुलांनी सुरू केलेल्या डावात थोडी टोलवाटोलवी करायची मजाही त्याला घेता येते. हा खेळ पहायला येणा-यांची संख्या मोजली जात असते. त्यात कोणता डाव कितीजणांनी पाहिला याची नोंद होत असते. जास्त टोलवाटोलवी न करतासुद्धा आपण ठेवलेली सुंदर वस्तू किंवा आपला थोडासा खेळ चार लोकांना पहावासा वाटला हे पाहिल्यावर त्याचे एक वेगळे समाधान मिळते.

या अद्भुत खेळातला गडी त्याच्या डावामधून कधीच 'बाद' होत नाही. यात कोणाचा त्रिफळा उडत नाही की झेल टिपला जात नाही. क्वचित कधी तो खेळाडू 'जखमी म्हणून निवृत्त' (रिटायर्ड हर्ट) होतो, पण बहुतेक वेळी दुस-या कोणी तरी टोलवलेल्या चेंडूमुळे जखमी (हर्ट) झालेल्या मुलाला जास्तच चेव चढतो आणि तो त्वेषाने चौफेर फटकेबाजी करू लागतो. त्याच्या टोल्यांना प्रत्युत्तर मिळत जाते. त्यातून त्याची गुणसंख्या वाढतच जाते. काही वेळाने इतर सगळी मुले कंटाळून दुसरीकडे खेळायला गेल्यावर मात्र त्यालाही तिथे थांबायचे कारण उरत नाही. त्या डावामधून तोही निवृत्त (रिटायर) होतो आणि इतरांच्या डावात टोलवाटोलवी करायला जातो किंवा नवा डाव मांडायच्या तयारीला लागतो.

या खेळात संघ नसले तरी काही अनुभवी मुलांचे गट झालेले असतात, काही वात्रट लोक त्यांना 'कंपू' म्हणतात. खरे तर त्यांना सुद्धा अशा गटात सामील होण्याची इच्छा असते, पण ते नाही जमले तर मग ते त्यांच्याबद्दल खंवचटपणे बोलतात. अशा गटातली काही मित्रमंडळी मैदानावर जमल्यावर कोंडाळे करून उभी राहतात. त्यातल्या एकाने एखादी कुठलीही वस्तू आणून ठेवली तरी लगेच दुसरा त्याच्याकडे एक चेंडू टोलवतो, पहिल्याने त्या चेंडूला तिस-याकडे टोलवले तर चौथा त्याला मध्येच अडवून पाचव्याकडे पाठवतो. तेवढ्यात तिस-याने टोलवलेल्या चेंडूला दुस-याने 'कट्' (हलकासा स्पर्श) करून चौथ्याकडे धाडलेले असते. अशा प्रकारची अनेक आवर्तने भराभर होत राहतात आणि त्या खेळाडूचे गुण बघता बघता वाढत जाऊन तो शतकवीर होतो. यातली टोलवाटोलवीही सामान्य प्रकारची नसून ती प्रेक्षणीय असते. झपाट्याने चाललेली त्यांची 'अशी ही टोलवाटोलवी' पाहतांना प्रेक्षकांना खूप मजा येते. कधीकधी या गटातली मुले दुस-या एकाद्या नवख्या मुलाच्या डावात सामील होतात आणि त्याला बाजूला सारून त्या मुलांची आपापसातली टोलवाटोलवी सुरू होते. हे चालले असतांनाही त्या मुलाची टोलेगुणसंख्या वाढायला लागते आणि आता आपलेही अर्धशतक किंवा शतक झळकणार अशी आशा त्याला वाटायला लागते. पण ती जशी अचानक सुरू होते तशीच जागच्या जागी थांबूनही जाते. 

टोलवाटोलवीच्या या अद्भुत खेळाचे काही समान नियम असले तरी प्रत्येक मैदानाचे काही पोटनियम आणि परंपरा असतात. पण त्या खेळावर नियंत्रण ठेवणारे पंच, अंपायर, रेफरी वगैरे कोणी या मैदानावर सदोदित उपस्थित नसतात. जे कोणी असतात ते काही वेळा व्यवस्थापकांच्या कक्षांमध्ये डुलक्या घेत बसलेले असतात. एकाद्या मुलाने कोणताही नियम मोडला असे इतर खेळाडूंना वाटले तर ते आपले मत काळ्या रंगाचा चेंडू फटकारून त्यांच्या टोल्यामधूनच व्यक्त करतात. प्रत्येक मैदानातले काही खेळाडू या विषयातले तज्ज्ञ असतात आणि त्यांचे खेळाकडे बारीक लक्ष असते. ते खेळाडू लाल चेंडू टोलवून इशारा देतात किंवा काळा चेंडू टोलवून निषेध व्यक्त करतात. जरा जास्तच गोंगाट, गलबला वगैरे झाला तर पंच लोकही त्यात लक्ष घालतात. अपवादास्पद परिस्थितीत त्या मुलाला मैदान सोडून जाण्याचा आदेश दिला जाऊ शकतो किंवा त्याने ठेवलेली वस्तू जप्त केली जाऊ शकते. या खेळात कुठल्याही प्रकारचा आणि आकाराचा चेंडू आणला तरी चालत असले तरी कधी कधी एकादा मुलगा सडलेला टोमॅटो किंवा अंडेच चेंडू म्हणून घेऊन आला तर त्यामुळे मैदानाचे वातावरण खराब होते. अशा खेळाडूवर कारवाई केली जाते. पण असे सहसा घडत नाही. कोणाच्या बाबतीत घडलेच तर ते खेळाडू त्या मैदानावर पुन्हा येत नाहीत. पण इतर मैदानांवरचे नियम वेगळे असू शकतात. ते तिथे जाऊन रमतात.

सायबरनगरीतल्या काही मैदानांवर अशी ही टोलवाटोलवी दिवसरात्र चाललेली असते. यात खेळणा-यांना एक वेगळी मजा मिळते तशीच हा खेळ पाहणा-यांनाही. 

Thursday, April 03, 2014

गेले विमान कोणीकडे? - भाग १ -३

हा लेख ३ भागात लिहिला होता. तीन्ही भाग एकत्र केले दि. १४-०६-२०२४

भाग १

एकादा माणूस नेहमीप्रमाणेच कालही ऑफिसला आला होता, त्याने दिवसभर मन लावून काम केले होते, तो सर्वांशी हंसतमुखाने भरपूर बोलला होता, त्यात काहीच वेगळेपणा दिसला नव्हता, पण त्यानंतर तो अचानक निधन पावला असल्याचे आज सकाळी ऑफिसात गेल्या गेल्या समजले तर सर्वांना केवढा जबरदस्त धक्का बसतो? मग ऑफिसातले सगळे लोक दिवसभर याचीच चर्चा करत राहतात. त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला असला तर त्याची कारणे शोधली जातात, त्याने त्याची वैद्यकीय तपासणी कधी केली होती? त्यात काय निघाले होते? तो नियमितपणे औषधे घेत होता का? पथ्यपाणी सांभाळत होता का? त्याला कोणती व्यसने होती का? तो, त्याचे आईवडील, काका, मामा वगैरेंना कोणकोणत्या व्याधी होत्या? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधून त्यातून त्या माणसाच्या अपमृत्यूचे कारण ठरवण्याचे प्रयत्न होत राहतात. त्याचे मरण जर अनैसर्गिक असले तर बहुधा अपघात, आत्महत्या किंवा खून यापैकी काहीतरी झाले असणार. काही वेळा त्यात संदिग्धता असते. त्या घटनेत नेमके काय झाले? ते कुणी पाहिले किंवा कुणाला किती आणि काय काय समजले? यावर चर्चा आणि त्यावरून उलटसुलट तर्ककुतर्क होत राहतात. अपघात तर नेहमी अवचितच घडत असतो, पण त्याला कोण किंवा कोणती परिस्थिती जबाबदार असेल? हा प्रश्न निघतो. आत्महत्या किंवा खून असल्यास ती कृती ठरवून आणि पूर्वयोजना करून केली गेली होती की काही तात्कालिक कारणामुळे ती तत्क्षणी घडली? वगैरे मुद्द्यांवर चर्चा होत राहते.

जर तो माणूस ऑफिसला आला नाही किंवा त्याच्यासंबंधी कोणाचा काही निरोपही आला नाही एवढेच झाले असले तर ते ऑफिसमधल्या त्य़ाच्या निकटच्या थोड्याच लोकांच्या लक्षात येते. इतरांना ते जाणवले तरी तो माणूस कदाचित कामासाठी दुसरीकडे गेला असेल किंवा त्याने सुटी घेतली असेल असेच त्यांना वाटते. थोडा वेळ त्याची वाट पाहून त्याच्या जवळच्या सहका-यांनी त्याच्या घरी चौकशी केली किंवा घरच्या लोकांनीच त्याची ऑफिसात चौकशी केली आणि या दोन्ही जागी तो नसल्याचे ध्यानात आले तर मात्र सगळ्यांचे धाबे दणाणते. घर आणि ऑफिस याव्यतिरिक्त त्याची कोणती ठिकाणे असू शकतील याची चर्चा आणि त्या दिशेने त्याचा तपास सुरू होतो. यातून त्याच्याबद्दल कुजबूज सुरू होते आणि ती वाढत जाऊन ऑफिसभर पसरते.

या परिस्थितीत तो फक्त परागंदाच झाला आहे की त्याचे काही बरेवाईट तर झाले नाही ना? अशा दोन शक्यता असल्या तरी कोणीही लगेच दुसरी शक्यता सहसा विचारात घेत नाही. पहिल्या शक्यतेचाच विचार करून तो आपल्या इच्छेने गायब झाला की तसे करणे त्याला प्राप्त परिस्थितीमुळे भाग पडले? तो चुकून कुठे हरवला असेल का? कोणी त्याला फसवून किंवा जोरजबरदस्ती करून पळवून नेले असेल का? अशा अनेक शक्यता त्यात असल्यामुळे त्या माणसाचे गेल्या काही दिवसांमधले वर्तन, त्याचे संभाव्य प्रेमसंबंध, कोणाशी असलेले वैर, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक स्थिती, साथसंगत वगैरेंवर चर्चा करून कुठून कसला सुगावा लागतो का हे पाहिले जाते. हे करत असतांना त्यातून काहीच समजले नाही किंवा त्याच्या मरणाच्या शक्यतेचा काही धागादोरा मिळाला तर त्यासंबंधीचे वर दिलेले सगळे प्रश्न उपस्थित होतात. अर्थातच या बाबतीतले रहस्य उलगडण्यात खूप दिवस जातात, तरीही ते नक्की उलगडले जाईलच असे सांगता येत नाही. पण बरेच दिवस त्यावर चर्चा मात्र होत राहते. अशा प्रकारची घटना घडून गेल्यानंतर पहिले काही दिवस तरी रोज वेगवेगळ्या स्त्रोतांकडून ख-या किंवा खोट्या माहितीचे निरनिराळे तुकडे मिळत जातात, त्यात अनेक विसंगती असतात, पण ते तुकडे एकमेकांना जोडून त्यातून काही सुसंगत अर्थ शोधण्याचे प्रयत्न होत राहतात. अर्थातच त्यात एकवाक्यता असत नाही. पोलिसयंत्रणा त्यांच्या पद्धतीने त्यावर तपास करून शोध घेते ते वेगळे, पण त्याला बराच वेळ लागतो आणि त्यांचे निष्कर्ष सर्वांना समजतीलच असे सांगता येत नाही.

सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनात अशा प्रकारचे प्रसंग अगदी क्वचितच घडत असले तरी त्यांचे नातेनाईक, मित्रपरिवार, सहकारी, शेजारीपाजारी वगैरेंपैकी कोणाच्या तरी बाबतीत असे काही घडल्याचे अनुभव बहुतेक लोकांना कधी ना कधी येत असतात. त्यांची झळ जवळच्या लोकांनाच लागते आणि माहितीही मर्यादित वर्तुळांमध्येच पसरते. पण जर त्या व्यक्तीचे नाव स्थानिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुपरिचित असेल तर तिच्या संबंधातल्या बातमीलाही विविध माध्यमांमधून त्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते. ती कथा रहस्यमय़ असल्यास तिच्या संबंधीचे लेखन किंवा वक्तव्य पुढील काही दिवस प्रसिद्ध होत राहते. अशा प्रकारच्या घटना बहुतेक लोकांच्या माहितीत असल्यामुळे त्या काळात होणा-या वेदना, काळजी, आशानिराशा, उत्कंठा, थरार, क्यूरियॉसिटी वगैरेंचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतलेला असतो. या कारणाने मी हे उदाहरण दिले आहे.

जे माणसाच्या बाबतीत घडते तेच थोड्याफार फरकाने विमानाच्या बाबतीतही घडते. एकाद्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानाला काही विपरीत झाले तर ती बातमी जगभरातल्या प्रसारमाध्यमांद्वारे लगेच जगभर पसरते. ग्वाटेमाला किंवा झिम्ब्वाब्वे अशा देशात ती घटना घडली तर आपल्याकडल्या वर्तमानपत्रात कुठेतरी एक लहानशी बातमी दिलेली असते. असे काही भारतात किंवा भारतीय विमान कंपनीच्या विमानाच्या बाबतीत घडले तर पहिल्या पानावरच मोठ्या अक्षरांच्या ठळक मथळ्यासह ती बातमी छापली जाते, शिवाय तिच्यासंबंधी अधिक वृत्तांत, मुलाखती, अग्रलेख वगैरे मजकूर इतर पानांवरही पसरलेला असतो. ते विमान कोसळले असल्यास ते तांत्रिक बिघाडामुळे घडते किंवा खराब हवामानामुळे. याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली जाते इथपर्यंत वाचनात येते. पुढे त्या समीतीने दिलेल्या अहवालात काय लिहिले असते हे मात्र कधीही माझ्या वाचनात आलेले मला आठवत नाही.

एकादे विमान रहस्यमय रीतीने गायबच झाल्याची घटना फारच क्वचित घडते. एअरोडायनॅमिक्सच्या नियमांनुसार पाहिल्यास कोणत्याही विमानाचे दीर्घकाल आकाशातच भटकत राहणे केवळ अशक्य आहे. निदान त्यातले इंधन संपल्यानंतर तरी ते पृथ्वीच्या पाठीवर कुठे ना कुठे उतरले असणार किंवा कोसळले असणार एवढ्या दोनच शक्यता असतात, पण पृथ्वीच्या पाठीवरील निरीक्षणकेंद्रांमधून आणि उपग्रहांमार्फत सतत इतकी पाहणी चाललेली असते की यातल्या कोणत्याही घटनांची कोणालाही खबरबातच लागू नये असे क्वचितच घडू शकते. निदान असा समज आहे. पण कधीकधी कल्पनेपेक्षा प्रत्यक्ष भीषण असते असे म्हणतात. तशीच एक रहस्यमय घटना मागील महिन्यात घडली. या घटनेत नेमके काय घडले आणि ते कोणत्या क्रमाने घ़डले हे अजूनही निर्विवादपणे समोर आलेले नाही. यासंबंधी मला प्रसारमाध्यमांमधून घरबसल्या जेवढी माहिती ज्या क्रमाने मिळत गेली, त्यामधून कोणती कोडी पडत आणि उलगडत गेली हे या लेखात लिहिणार आहे.

दिनांक ७ मार्चच्या मध्यरात्रीनंतर ४१ मिनिटांनी म्हणजे ८ मार्च सुरू झाल्या झाल्या मलेशियन एअरलाइन्सच्या एका जम्बोजेट विमानाने मलेशियातल्या कौलालंपूर विमानतळावरून उड्डाण केले. या बोइंग ७७७ विमानात २२७ प्रवासी आणि पायलट, एअरहॉस्टेसेस वगैरे १२ कर्मचारी अशी २३९ माणसे होती. त्यांना घेऊन ते सकाळी साडेसहा वाजताच्या सुमाराला चीनमधल्या बैजिंगला पोचणार होते. या विमानाने अगदी व्यवस्थितपणे उड्डाण केले आणि ठरलेल्या दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात केली. त्याच्या प्रवासातल्या प्रगतीच्या सूचनाही मिळत गेल्या. पण सुमारे चाळीस मिनिटांनी काय झाले कोण जाणे? त्या विमानाचा जमीनीवरील यंत्रणांशी असलेला संपर्क तुटला तो कायमचाच!

एकादी व्यक्ती कारने पुण्याहून मुंबईकडे यायला निघाली असली आणि चारपाच तास होऊन गेल्यानंतरही ती इकडे येऊन पोचली नाही तर त्यामुळे कोणीही फारसा गडबडून जात नाही. ती व्यक्ती वाटेतल्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकली असेल किंवा वाटेत कुठेशी थांबली असेल असा विचार केला जातो. तिच्या सेलफोनचा नंबर फिरवून पाहिला आणि. फोन लागला नाही तरी कदाचित तो घरीच विसरून राहिला गेला असेल, स्विचऑफ केलेला असेल किंवा डिस्चार्ज झाला असेल असे वाटते. अशा प्रकारचे अनुभव आपल्याला नेहमी येत असतात. त्यामुळे तसे घडले असण्याची भरपूर शक्यता असते. काही वेळानंतर ती व्यक्ती किंवा तिचा निरोप येईल अशी अपेक्षा असते आणि बहुतेक वेळा ती पूर्ण होते. पण एकादी व्यक्ती दिल्लीहून विमानाने यायला निघाली असली आणि चारपाच तासात ते विमानच इकडे येऊन पोचले नाही असे कळले तर मात्र काळजाचा ठोका चुकतो आणि भयंकर काळजी वाटायला लागते, कारण आपल्याला कधीच असा अनुभव आलेला नसतो. शिवाय विमानाचा अपघात प्राणघातक असण्याची मोठी शक्यता असते. विमानामधील चालकांचा जमीनीवरील नियंत्रणकक्षाशी सतत संपर्क चाललेला असतो. त्यासाठी अत्यंत कार्यक्षम आणि भरोसेमंद अशी यंत्रणा ठेवलेली असते. विमान उडवण्याच्या आधी ती सगळी उपकरणे व्यवस्थितपणे काम करत आहेत याची खात्री करून घेतली जाते. यामुळे सेलफोनमध्ये येतात तसले बॅटरी संपली, रेंज नाही यासारखे प्रॉब्लेम्स विमानाच्या बाबतीत येऊ नयेत अशी साधार अपेक्षा असते. उडालेले विमान आकाशात नेमके कुठे आहे याचा वेध घेतला जात असतो.


यामुळेच जेंव्हा मलेशियाचे विमान बेपत्ता झाल्याचे कळले तेंव्हा त्या बातमीने जगभर हलकल्लोळ माजला. त्या विमानवरून शेवटचा संदेश आला तेंव्हा ते विमान मलेशियाचा किनारा सोडून समुद्रावर उडत होते आणि अजून व्हिएटनामपर्यंत पोचले नव्हते. त्यानंतरसुद्धा ते तसेच पुढे जात जात वाटेत कुठे तरी, बहुधा समुद्रातच कोसळले असावे असा प्राथमिक अंदाज केला जाणे साहजीकच होते. यामुळे त्या भागातल्या समुद्राची पाहणी सुरू झाली. देशोदेशींच्या ज्या कोणत्या नौका त्या भागात होत्या त्यांनी समुद्राचा तो भाग पिंजून काढला, तसेच आकाशामधून विमानांनी पण शोध घेतला. "कसलासा मोठा आवाज ऐकू आला." किंवा "कुठेतरी आग दिसली." अशा प्रकारची भोंगळ माहिती कुणी कुणी दिली असे म्हणतात, पण त्यात काही तथ्य आढळले नाही. त्या विमानाचा किंवा त्याच्या अवशेषांचा शोध चालतच राहिला.

 . . . . . . . . . . . . . . . .  . (क्रमशः) 


भाग २

विमानाने हवेत उडतांना तरंगत रहावे यासाठी त्याला वजनाने अत्यंत हलके केलेले असते. त्याला अलगदपणे पाण्यावर उतरवले गेले आणि बाहेरचे पाणी त्या विमानात शिरले नाही तर ते विमान पाण्यावर तरंगत रहायला हवे. अशा प्रकारे समुद्रावर उतरवल्या गेलेल्या विमानातल्या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलेले मी एका जुन्या इंग्रजी सिनेमात पाहिले आहे. त्या सिनेमाच्या शेवटी असे नमूद केले होते की जरी यातली गोष्ट पूर्णपणे काल्पनिक असली तरी अशा प्रकारे प्रवाशांना वाचवण्याची क्षमता आणि कौशल्य खरोखरच सैन्यदलाकडे आहे. त्यानंतरच्या १०-१२ वर्षांमध्ये त्यात वाढच झाली असणार. मलेशियाचे विमानसुद्धा त्याच्या वैमानिकाने असेच अलगदपणे समुद्राच्या पाण्यावर उतरवले असले तर त्यातल्या प्रवाशांची सुटका करणे शक्य असावे अशी आशा वाटत होती.

प्रवासी विमानातल्या सीट्सच्या खाली एक लाइफ जॅकेट ठेवलेले असते असे नेहमी सुरक्षा सूचनांमध्ये सांगितले जात असे. देशांतर्गत प्रवास करतांना ही सूचना मला विनोदी वाटत असे आणि आपल्या खुर्चीच्या खाली खरोखरच हे जॅकेट ठेवले आहे का ते पहाण्याची इच्छाही कधी कधी होत असे. पण आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये ते नक्कीच ठेवले जात असणार. मलेशियाच्या विमानातल्या प्रवाशांनासुद्धा आणीबाणीच्या वेळी ते जॅकेट मिळाले असले आणि त्याचा वापर करून त्यांनी आपला जीव वाचवला असला तर ते समुद्रात तरंगतांना दिसतील आणि पाहणी करणाऱ्या नौकांकडून वाचवले जातील अशी आशाही थोडी अंधुक असली तरी वाटत होती.

समजा त्या प्रवाशांचे नशीब एवढे चांगले नसले आणि त्यांचे विमान समुद्रात अत्यंत वेगाने धाडकन कोसळून तत्क्षणी तुटून फुटून गेले असले तर त्याच्या टाकीत नुकतेच भरलेले हजारो लीटर इंधन पाण्यावर सांडले असते. त्याचा भडका उडाला असला तर तो महाप्रचंड जाळ दुरूनही दिसला असता आणि भडका उडाला नसला तर त्या तेलाचे तवंग दूर दूर पर्यंत पसरले असते. शिवाय हे जंबो जेट विमानसुद्धा आकाराने महाकाय असते. पाण्याला धडकल्यामुळे त्याचे लहान लहान तुकडे होणार नाहीत. वाकडे तिकडे झालेले विमानाचे मोठे भाग शिल्लक राहिलेच असते. पण पहिल्या दिवशी केलेल्या टेहेळणीमध्ये यातले काहीच दिसले नाही. या शिवाय आणखी काही महत्वाचे मुद्दे होते. सुमारे तीस चाळीस हजार फूट उंचीवरून वेगाने चालणारे विमान एकादा दगड पडल्यासारखे क्षणार्धात सरळ खाली पडू शकत नाही. ते कुठल्याही कारणाने आकस्मिकपणे खाली खाली येऊ लागले तर वैमानिकाला कळणारच. अशा वेळी "अरे देवा!, हे काय होतंय्? कोणीतरी वाचवा हो." असा प्रकारचे उद्गार तो काढेल, जोरात किंचाळेल, तातडीने एसओएस (सेव्ह अवर सोल्स) मेसेजेस पाठवेल. पण त्याने यातले काहीच का केले नाही? त्याचा अखेरचा जो आवाज ऐकला गेला तो होता "गुड नाईट". या सर्वांवरून एकच निष्कर्ष निघत होता तो म्हणजे हे विमान ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाले त्या जागेच्या आसपास आणि ज्या वेळी हरवले त्यानंतर लगेचच ते कोसळलेले नाही. पहिल्या दिवसभरातल्या विविध प्रकारच्या शोधाशोधीनंतर एवढे अनुमान जवळ जवळ निश्चित झाले होते. पण मग ते विमान कुठे गेले? आणि त्याचे काय झाले असावे? हे यक्षप्रश्न अनुत्तरितच होते.

या विमानातल्या २३९ प्रवाशांपैकी १५२ चीनचे आणि ५० मलेशियाचे नागरिक होते. उललेले ३७ उतारू निरनिराळ्या देशांचे रहिवासी होते. यातले पाच भारतीय होते, त्यातले चार मराठी भाषी आणि त्यातले तीन मुंबईचे होते. यामुळे या घटनेला इथल्या वृत्तपत्रांमध्ये ठळक अक्षरांत प्रसिद्धी मिळाली होती, त्या उतारूंची नावे आणि त्यांच्या नातलगांची माहिती छापून आली होती आणि त्यांच्याविषयी आत्मीयता वाटायला लागली होती. त्या विमानाच्या तपासासंबंधीच्या उलट सुलट बातम्या रोज छापून येत होत्या आणि त्यांच्याबरोबर वाचकांची मने आशानिराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेऊ लागली होती.  

या विमानाचा अपघात झाला नसला तरी त्याचे अपहरण होऊ शकले असते. अपहरण हे एक दुर्दैवी सत्य गेल्या काही वर्षांपासून जगासमोर आले आहे. ते टाळण्यासाठी अत्यंत किचकट अशी सुरक्षा व्यवस्थाही अंमलात आणली गेली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली जाते. काही ठिकाणी तर डोक्यावरचे पागोटे, अंगावरचे डगले, कंबरेचा पट्टा आणि पायातले बूटसुद्धा काढून दाखवावे लागतात, पिण्याच्या पाण्याची बाटलीसुद्धा प्रवासात आपल्यासोबत नेता येत नाही. विमानप्रवासात आवश्यक असतील तेवढीच औषधे बरोबर नेता येतात आणि त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन दाखवावे लागते. या सगळ्या दिव्यामधून कोणत्याही प्रकारचे घातक शस्त्र किंवा जालिम विष विमानात नेता येणे जवळजवळ अशक्य असते. यामुळे अपहरणाचे प्रमाण आता खूपच कमी झाले आहे. तरीसुद्धा या सगळ्यांवर मात करून ते करण्याचे प्रयत्नही चाललेले असतातच. कदाचित या वेळच्या अपहरणकर्त्यांनी एकादी नवीन शक्कल लढवली असण्याची शक्यता कमी असली तरी तिचा विचार करणे आवश्यक होते.

या विमानाच्या अपहरणाच्या शक्यतेसंबंधी आणखी काही माहिती मिळाली होती. त्यावरून एवढे सिद्ध झाले होते की ते विमान ज्या ठिकाणी असतांना त्याच्याशी असलेला संपर्क तुटला होता तिथून ते चीनच्या दिशेने नाकासमोर उत्तरेला न जाता झर्रकन डावीकडे वळून पश्चिमेच्या दिशेने पुन्हा मलेशियाच्या भूमीवरून उडत होते. उपग्रहांमार्फत मिळालेल्या काही माहितीच्या आधारावरून असे वर्तवले गेले की तिथून ते पुढे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका वगैरे देशांच्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता होतीच. त्यातल्या त्यात दोन मार्गांवरून ते गेले असण्याची अधिक शक्यता वर्तवली गेली होती. हे मार्ग नकाशात दाखवले आहेत.



या विमानाचे अपहरण झाले असले तर ते कुणी आणि कशासाठी केले असेल? या प्रश्नावर विचार चाललेला होता. एकाद्या माथेफिरूंच्या लहान टोळक्याने ते केले असले तर त्यांनी विमानातल्या संदेशयंत्रणेचाच उपयोग करून आपल्या मागण्या मांडल्या असत्या आणि त्यांची पूर्ती न केल्यास सर्व प्रवाशांसह ते विमान उडवून देण्याची धमकी दिली असती. हे काम एकाद्या अतिरेक्यांच्या संघटनेचे असते तर त्यातल्या विमानाबाहेरच्या  सदस्याने किंवा प्रवक्त्याने या अपहरणाची जबाबदारी स्वीकारून मागण्या आणि धमक्या दिल्या असत्या. पण पहिल्या दिवसभरात असे काहीच घडले नाही. या विमानाचा संपर्क पहिल्या तासाच्या आतच तुटला होता आणि त्यामुळे ते आपल्या नियोजित मार्गाने जात नसावे याबद्दल दाट शंका निर्माण झाली होती. तरीसुद्धा पाच सहा तास कोणीही याची वाच्यता केली नाही. या विमानाची बैजिंगला पोचण्याची वेळ टळून गेल्यानंतर ते हरवले असल्याचे जाहीर केले गेले. कदाचित अपहरणकर्त्यांच्या निरोपाची वाट पाहून हे केले असण्याची शक्यता आहे.

११ सप्टेंबरला अमेरिकेत घडलेल्या अतिरेक्यांच्या कारवाईत विमानांचे अपहरण करून त्यांनी वर्ल्डट्रेडसेंटर, पेंटॅगॉन वगैरे प्रमुख इमारतींना आत्मघातकी धडका दिल्या होत्या. या वेळीसुद्धा मलेशियन विमानाने अशाच एकाद्या मोठ्या लक्ष्यावर धडक मारण्याचा बेत आखला असावा अशीही शंका आली होती. हा निश्चितपणे भारतातल्या एकाद्या महानगरावर किंवा सैनिकी स्थळावर हल्ला करण्याचाच प्रयत्न होता असे काही कांगावखोर भारतीयांनी तर छातीठोकपणे सांगून टाकले. सध्याच्या परिस्थितीत ते अशक्य वाटत नाही. कांही का असेना, पण कोणाचा असा बेत असला तरी विमानाने आकाशात उडत राहण्याची जास्तीत जास्त जी काही मुदत होती तेवढ्या काळात तो सफळ झाला नाही.

या विमानाचे अपहरण करण्याचा कट शिजला असावा या शंकेला पुष्टी मिळावी अशा काही गोष्टी समोर येत गेल्या. विमानातल्या सर्व प्रवाशांची यादी आणि पासपोर्टचे क्रमांक प्रसिद्ध केले गेले. त्यातला एक ऑस्ट्रेलियन आणि एक इटालियन गृहस्थ आपापल्या घरीच होते असे समजले. ते लोक क्वालालंपूरलाच गेले नव्हते. तिथून बैजिंगला जाण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. या दोघांचे पासपोर्ट मागच्या किंवा त्याच्या मागल्या वर्षी चोरीला गेले होते. त्यांनी तशी व्यवस्थित नोंदही कागदोपत्री केलेली होती. मग त्यांच्या नावांनी विमानाची तिकीटे कशी निघाली, ती कोणी काढली वगैरे दिशेने तपास केल्यानंतर ते तोतये इराणी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले, इतकेच नव्हे तर त्यांची नावांसकट माहितीसुद्धा प्रसिद्ध झाली. हे सगळे फक्त एका दिवसात घडले यावरून तपास करणाऱ्यांची कार्यक्षमता किती कौतुकास्पद आहे असे वाटते किंवा या सगळ्या गोष्टींची तपशीलवार खबरबात कोणी ठेवत असावा का अशी शंकाही येते. या इराण्यांच्याबद्दल जेवढी माहिती सांगितली गेली त्यावरून हे कृत्य त्यांचे नसावे असा निर्वाळा दिला गेला. हा निष्कर्ष म्हणजे एकादा भुरट्या चोऱ्या करणारा चोर बँकेवर दरोडा घालून तिला लुटू  शकणार नाही अशा प्रकारचा होता. युरोपातल्या एकाद्या प्रगत देशात शिरकाव करून घेऊन तिथे आरामात रहायचे एवढाच त्यांचा उद्देश होता असे सांगितले गेले. पण त्यासाठी त्यांना चीनमध्ये जाण्याची काय गरज होती? त्या देशात अशा प्रकारे राहणे शक्यच नसतांना ते तिथे का जाणार होते? या प्रश्नांचा काही तर्कसंगत खुलासा होत नव्हता. विमानाचे अपहरण करण्यासाठी लागणारे धैर्य, निष्ठुरपणा, कौशल्य वगैरे गुण त्यांच्यात नव्हते एवढे वाटल्यास पटण्यासारखे वाटत होते. पण सगळ्या तज्ज्ञांनी हे मान्य केले त्या अर्थी या दोघांवरून संशयाची सुई बाजूला सरकवली गेली.

या विमानाचे अपहरण होण्याच्या शक्यतेबाबत मूलभूत शंका उत्पन्न करणाऱ्या आणखी काही गोष्टी होत्या. अपहरण केलेले विमान मार्ग बदलून भलत्याच ठिकाणी नेले जात असले तरी ते अचानकपणे संपूर्णपणे अदृष्य होत नाही. त्याचा बदललेला मार्ग निरीक्षकांना समजत राहतो. अखेरीस त्या विमानाला अतिरेक्यांच्या मित्रपक्षाच्या एकाद्या विमानतळावर उतरण्यासाठी संपर्क साधावा लागतोच. आणि सध्याच्या जगात हे संदेश लपून रहात नाहीत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मायनामार, थायलंड वगैरे ज्या कोणत्या देशांवरून त्या विमानाने उड्डाण करण्याची शक्यता होती त्या सर्वांनी तसे काहीही घडलेले नाही असे अगदी निक्षून सांगितले. यात कोणी खोटेपणा केला असला तर तो उद्या त्यांच्या अंगलट येणारच याची कल्पनाही त्यांना नक्कीच असणार. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवता येईल.

हे विमान कुठेही सुखरूपपणे उतरल्याचे समजले नाही, कोसळल्याच्या खुणा दिसल्या नाहीत तर त्याचे हवेतच काही बरेवाईट झाले की काय अशीही एक शक्यता वर्तवली गेली. त्या विमानात ठेवल्या गेलेल्या शक्तीशाली बाँबच्या स्फोटाने त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडून त्यांचे रूपांतर अगदी बारीक धुळीसारख्या कणांमध्ये झाले असेल किंवा त्यांची वाफ होऊन गेली असेल, एकाद्या क्षेपणास्त्राने त्याचा अचूक वेध घेऊन त्याला हवेतच जाळून खाक केले असेल अशा कल्पना मनात येणे साहजीक असले तरी असे घडण्याची शक्यता दिसत नाही. अशा प्रकारचा रासायनिक बाँब अस्तित्वात नाही. अणूबाँबचा उपयोग केला असता तर त्यातून निघणाऱ्या विकिरणांनी आभाळ व्यापून टाकले असते आणि जगातल्या सगळ्या प्रयोगशाळांनी त्याची दखल घेतली असती. तसे काहीच घडले नाही. यामुळे ही शक्यताही फेटाळली गेली.

पण मग त्या विमानाचे काय झाले?
 . . . . . . . . . . . . . . . .  . (क्रमशः)  


भाग ३

मलेशियन एअरलाइन्सच्या ज्या हरवलेल्या विमानाचे रहस्य गहन होत चालले होते, ते चालवणाऱ्या वैमानिकांबद्दलही विचार केला गेला जाणे आवश्यक आणि साहजीक होते. त्या विमानाचा मुख्य वैमानिक (पायलट) कॅप्टन झहारी अहमद शाह आणि त्याचा सहाय्यक फरीक अब हमीद यांच्या घरांची झडती घेतली गेली. त्यात आक्षेपार्ह असे काही सापडले नाही असे सांगितले गेले. त्यांचा कोणत्याही दहशतवाद्यांशी थेट संबंध जोडता आला नसला तरी त्यामधून एवढे समजले की हा पायलट एक असामान्य माणूस होता. तो एक निष्णात आणि अनुभवी वैमानिक होताच, त्याने त्याच्या घरातच बोइंग विमानाचे एक सिम्यूलेटर तयार करून ठेवले होते.

विमानकंपन्यांकडे जे फ्लाइट ट्रेनिंग सिम्युलेटर्स असतात त्यात त्या विमानाच्या कॉकपिटची संपूर्ण प्रतिकृती असते. तिथली पॅनेल्स, बटने, जॉयस्टिक्स, लीव्हर्स, इंडिकेटर्स, डिस्प्लेज, रेकॉर्डर्स वगैरे सगळ्या गोष्टी, अगदी वैमानिकांच्या खुर्च्या सुद्धा जशा खऱ्या विमानात असतात तशाच्या तशा तिथे ठेवलेल्या असतात. विमानाचे इंजिन सुरू करणे, त्याचा वेग वाढवणे किंवा कमी करणे, विमानाला आभाळात उंचीवर नेणे किंवा खाली आणणे, त्याला डावीउजवीकडे वळवणे, जमीनीवरून हवेत उड्डाण करणे (टेक ऑफ) आणि आकाशातून खाली धावपट्टीवर उतरवणे (लँडिंग) वगैरे फ्लाइटसंबंधातल्या सगळ्या क्रिया त्या खुर्चीवर बसून करून पाहण्याची सोय असते. आणि प्रत्यक्षातल्या विमानात त्या क्रिया घडत असतांना त्यातल्या पॅनेलवर जे जे काही दिसावे ते सगळे अगदी तसेच आणि त्याच वेगाने, त्याच क्रमाने रियल टाइममध्ये सिम्युलेटरमधल्या पॅनेलवर दिसते. यासाठी खूप काँप्लेक्स इलेक्ट्रॉनिक सर्किट्स तयार करून ठेवलेली असतात. काँप्यूटर प्रोग्रॅम केलेले असतात, विमानाच्या उड्डाणाशी संबंधित असलेली काळ, काम आणि वेगाची सगळी गुंतागुंतीची समीकरणे इलेक्ट्रॉनिकली सोडवली जाऊन त्यानुसार या पॅनेलवर योग्य ती इंडिकेशन्स अचूकपणे मिळत जातात. खऱ्या विमानाच्या वैमानिकाला जी माहिती त्यांच्यामधून मिळत असते ती सगळी या सिम्युलेटरवर बसलेल्याला माणसालाही अगदी तशीच्या तशीच दिसते. ऊन, वारा, वादळ, पाऊस, ढग, धुके वगैरे नैसर्गिक बदल आणि त्यांच्यामुळे होत असलेला हवेच्या दाबातला फरक वगैरेंचे आभास या सिम्युलेटरमध्ये कृत्रिमरीत्या निर्माण करता येतात. त्यांच्यामुळे विमानाच्या हवेमधून उडण्यावर जे परिणाम होतात तेही त्या चालकाला समजतात आणि त्यानुसार योग्य त्या क्रिया करून त्याचे काल्पनिक विमान तो चालक चालवत राहतो. थोडक्यात म्हणजे प्रत्यक्ष विमान न चालवता ते चालवण्याचा सराव सिम्युलेटरवर करता येतो. प्रतिकूल परिस्थितीत किंवा आणीबाणीच्या प्रसंगी काय करायचे आणि त्यामुळे काय होते हे सगळे त्याला ट्रेनिंग सिम्युलेटरवर शिकायला मिळते. त्याने केलेल्या कृतीत काही गफलत झाली, त्याचे काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले तरी त्यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका यात नसतो, पण काय होऊ शकते हे दाखवले जाते आणि त्याची जाणीव मात्र होते.

अशा प्रकारचे फुल स्केल सिम्युलेटर तयार करण्यासाठी त्या विमानाचे भाग मिळायला हवेत, त्यामुळे ते घरी बनवता येणे मला तरी शक्य वाटत नाही. पण काँप्यूटरच्या स्क्रीनवर कॉ़कपिट किंवा विमानाचे चित्र किंवा आराखडा काढून त्याला काँप्यूटर प्रोग्रॅमनुसार गतीमान करता येणे शक्य असते. आजकालच्या काँप्यूटर गेम्समध्ये अनेक प्रकारच्या काल्पनिक मोटारगाड्या, विमाने किंवा रॉकेट्ससुद्धा उडवता येतात. नव्या वैमानिकांचे प्रशिक्षण हा सुद्धा कॅप्टन शाहच्या कामाचा भाग असल्यामुळे त्याला विमानाच्या सिम्युलेटर्सची खडा न खडा माहिती असणारच. त्या हुषार गृहस्थाने काँप्यूटर गेम्समधल्या विमानांचा उपयोग करून हा खास सिम्युलेटर तयार केला होता आणि हा त्याचा एक छंद होता म्हणे. पण त्यासाठी खऱ्या विमानाच्या भागांची मॅथेमेटिकल मॉडेल्स लागतील, खेळातल्या विमानांना चालवण्यासाठी तयार केलेले सॉफ्टवेअर मिळायला हवे, त्यात बदल करण्यासाठी लागणारे ज्ञान आणि कौशल्य हवे. हे सगळे त्याने एकट्याने जमवले की यात त्याचे काही साथीदार होते वगैरेंबद्दल कसलीही माहिती बाहेर आली नाही. आपल्या विमानाकडून नेहमीपेक्षा निराळी अशी कोणकोणती कामे करून घेता येतील हे त्याने या सिम्युलेटरचा उपयोग करून ठरवले असणे आणि त्याची प्रॅक्टिसही करून घेतली असणे शक्य आहे. पण हे सगळे नुसते तर्क आहेत. त्याने असा कसलाच रेकॉर्ड त्याच्या काँप्यूटरमध्ये शिल्लक ठेवलेला नव्हता.



त्या विमानाचा बाह्य जगाशी असलेला संपर्क तुटल्यानंतरसुद्धा ते विमान उडत राहिले होते आणि सुमारे तासाभरानंतर मलेशियाच्या पश्चिम किनाऱ्यापाशी रडारवर दिसले होते. जर विमानात झालेल्या एकाद्या अपघाताने तो संपर्क थांबला असता, पायलट आणि प्रवासी गतप्राण झाले असते किंवा बेशुद्ध पडले असते तर ते विमान अशा प्रकारे वळणे घेत उडत राहिले नसते. त्या दरम्यानच्या काळात कोणीतरी व्यक्ती नक्कीच ते चालवत असणार आणि ती व्यक्ती म्हणजे पायलटच असण्याची जास्त शक्यता होती. त्यानंतरसुद्धा सहा सात तास उपग्रहाकडून येणाऱ्या पिंग नावाच्या संदेशाला या विमानाकडून उत्तर मिळत होते, या अर्थी ते बुडालेले किंवा नष्ट झालेले नव्हते. या सगळ्या निरीक्षणांचे सार काढून असे ठरवण्यात आले की मलेशिया सोडल्यानंतर ते विमान दक्षिणेकडे हिंद महासागरावर उडत राहिले असावे आणि अखेरीस (त्यातले इंधन संपल्यानंतर) ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला कुठेतरी समुद्रात कोसळून बुडले असावे. मलेशियाच्या सरकारने अशी अधिकृत घोषणा करून नुकसान भरपाई, विम्याची रक्कम, वारसाहक्काची अंमलबजावणी वगैरेंची सोय केली आहे.

असे असले तरी मुळात त्या विमानाने चीनला जाण्याचा मार्ग सोडून दक्षिणेचा रस्ता का धरला? हा प्रश्न शिल्लक राहतोच. जोपर्यंत त्या विमानाचे अवशेष मिळत नाहीत, मुख्य म्हणजे त्यातला ब्लॅक बॉक्स सापडत नाही तोपर्यंत ते नष्ट झाल्याचा कसलाच प्रत्यक्ष पुरावा हाती लागला असे म्हणता येणार नाही. यामुळे प्रवाशांचे नातलग त्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. अजूनसुद्धा ते कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी सुखरूप असतील अशी एक वेडी आशा त्यांना वाटत होती, पण जसजसे दिवस गेले आणि कोणताच नवा सुगावा लागला नाही तसतशी ती शक्यता संपुष्टात येत गेली.

हे विमान हरवल्यानंतर अनेक प्रकारच्या अफवा उठल्या होत्या. अमेरिकेचा (यूएसचा) दक्षिण किनारा आणि वेस्ट इंडीजची बेटे यांच्या दरम्यानच्या समुद्रातल्या एका त्रिकोणी भागाला बर्म्यूडा ट्रँगल असे म्हणतात. त्या भागात जबरदस्त ताकत असलेल्या भुताखेतांची वस्ती होती. तिथे गेलेली जहाजे बेपत्ता होतातच, त्यांना शोधायला गेलेलेही परत येत नाहीत. अशा प्रकारच्या अफवा एका काळी पसरल्या होत्या. ती भुते काही काळ शांत राहिल्यानंतर आता आशिया खंडात हिंदी महासागराच्या या भागात रहायला आली असावीत आणि हे त्यांचेच काम असावे असे विधान कुणीसे केले असे म्हणतात. ते काम करणारी कोणी भुतेखेते नसून परग्रहावरून आलेली आणि समुद्राखाली असलेल्या पाताळात रहिवास करणारी मंडळी असावीत अशा कल्पना सायन्सफिक्शनची डूब देऊन वक्तवल्या जात होत्या. कदाचित त्यांनीही आपला मुक्काम आशियामध्ये हलवला असेल असे म्हणायला हरकत नाही.

काही परग्रहवासी पाताळात दडून बसलेले असल्याची परीकथा आता जुनी झाली आहे. ते लोक प्लाइंग सॉसर्समध्ये बसून अवचित पृथ्वीवर येऊन धडकतात आणि तसेच भुर्रकन उडून जाऊन पुन्हा अदृष्य होतात ही कथा त्यापेक्षासुद्धा जास्त सुरस आणि जास्त प्रमाणात प्रचलित आहे. अशाच एकाद्या अतिविशालकाय फ्लाइंग सॉसरने मलेशियाच्या अख्ख्या विमानाला आभाळात वरच्या वर गिळंकृत केले असेल आणि आपल्यासोबत त्यालाही ते लोक आपल्या ग्रहावर घेऊन गेले असतील अशी आणखी एक फँटसी पसरवली गेली होती.

विमानात अचानक यांत्रिक बिघाड झाला असावा हा एक सर्वसाधारण तर्क झाला. पण त्यात नेमके काय झाले असेल?  विमानाच्या चाकाला कदाचित रनवेवरून धावतांनाच झालेल्या घर्षणामुळे आग लागली असेल आणि त्या चाकांना पोटात घेतल्यानंतर ती विमानात पसरली असेल, त्यातून निघालेल्या धुरामुळे वैमानिकासकट सगळी माणसे बेशुद्ध पडली असतील किंवा घुसमटून मरून गेली असतील. असा एक अंदाज केला जात होता. पण हे सगळे क्षणार्धात होऊ शकत नाही. त्या दरम्यान वैमानिकाने एसओएस किंवा कसलाच संदेश का पाठवला नाही? साधे गुड नाइट का म्हंटले? धुरामुळे सर्वात आधी संदेशयंत्रणा कशी खराब होईल? असे काही प्रश्न निघतात. 

हा अपघात नसून घातपात असला तर तो कोणी घडवून आणला असेल? त्यामागे त्याचा काय उद्देश असेल? याचा काही पत्ता लागत नाही. पुन्हा एकदा वैमानिकाचा विचार केला तर त्याला संदेशयंत्रणा निकामी करणे शक्य आहे, त्यानंतर विमानाची दिशा वळवून त्याला दक्षिणेकडे नेणेही शक्य आहे. पण त्याचे सहाय्यक, हवाई सुंदरी वगैरेंच्या ते लगेच लक्षात यायला हवे. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे बहुतेक प्रवासी झोपले असले तरी त्यातले काही जण तरी नक्कीच जागे असतील. रात्रीच्या अंधारात बाहेर काही दिसत नसले तरी आपले विमान कुठे आहे हे समोर लावलेल्या स्क्रीनवर दाखवत असतात. त्यांना फसवून चीनच्याच दिशेने जात असल्याचे दाखवले गेले होते का? यातल्या कुणालाही शंका आली तर तो स्वस्थ कशाला बसेल? त्यांना न जुमानता विमानाला भलतीकडे नेणे वैमानिकाला किंवा ज्या कोणी त्याची जागा घेतली असेल त्याला शक्य असेल का?

त्याला हे सगळे शक्य झाले असे जरी समजले तरी मुळात त्या वैमानिकाने असले भलते सलते करण्याची आवश्यकताच काय होती? त्याला आत्महत्याच करायची असली तर त्यासाठी २३८ इतर माणसांची हत्या करण्याची काहीच गरज नव्हती. यापेक्षा सोपे अनेक मार्ग त्याला दिसले असते. त्यातूनही त्याला विमानअपघातातच मरायचे असले तर त्याला ते टेक ऑफनंतर लगेच करता आले असते. त्याने आत्महत्या केली असे न दाखवता तो एक अपघातच होता असे त्याला दाखवायचे असले तर त्यापासून त्याला काय फायदा होता? तो मरून गेल्यानंतर लोक काही का म्हणेनात? त्याने त्याला काय फरक पडणार होता? एका लेखकाने असे सुचवले आहे की त्या विमानाने पार अंटार्क्टिकापर्यंत पोचून तिथे कोसळावे. आता तिथला हिवाळा सुरू झाला असल्याने त्या विमानावर बर्फांचे ढीग जमत जातील आणि ते कायमचे अदृष्य होऊन जाईल. असा विचार केला गेला असावा. पण ते कशासाठी? वैमानिकाच्या ऐवजी त्याचा सहाय्यक किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने हे घडवून आणले असले तर तिच्याबद्दलसुद्धा हेच प्रश्न उपस्थित होतात. या शिवाय त्या व्यक्तीकडे हे करण्याइतके कौशल्य असेल का? हा आणखी एक प्रश्न उठतो.

अशी एक शक्यता दिसते की सुरुवातीला वैमानिकाने त्याच्या स्वतःच्या योजनेनुसार किंवा कोणाच्या दबावाखाली विमानाची दिशा बदलली, कदाचित त्या दुसऱ्या व्यक्तीनेच हे काम केले असेल. पण  त्या वेळी त्यांची जी काही योजना होती ती सफळ होऊ न शकल्याने ते विमान दक्षिणेकडे भरकटत गेले असेल. 

काही लोकांना तर यापेक्षा वेगळ्या शंका आल्या. या विमानातल्या प्रवाशांपैकी कोणी गुप्तहेर असतील, त्यांना काही खतरनाक माहिती मिळाली असेल, त्यांच्यावर लक्ष ठेवणारे विरुद्ध देशाचे गुप्तहेरसुद्धा त्या विमानात बसलेले असतील. ती माहिती कोणाच्याच हाती लागू नये म्हणून ते विमानच गायब केले गेले असेल. वगैरे वगैरे अनेक अफवांचे पीक या काळात आले होते. ही आंतरराष्ट्रीय महत्वाची घटना असल्यामुळे जगातल्या सगळ्या मुख्य राष्ट्रांनी त्यात घालणे साहजीकच होते. विमान बोइंग या अमेरिकन कंपनीने बनवलेले होते, त्यातले बहुसंख्य प्रवासी चिनी नागरिक होते यामुळे या दोन महासत्तांचा थेट संबंध होता. भारतापासून ही घटना जवळच घडली होती, त्यामुळे विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय विमाने आणि आगबोटी धावून गेल्या. शोध घेण्याच्या जागेचा विस्तार होत गेला त्याप्रमाणे इतर अनेक राष्ट्रांनी त्यात भाग घेतला.

या सगळ्यांच्या प्रयत्नात सुसूत्रता आणणे आवश्यक असते आणि त्यासाठी प्रत्येकाने त्याला मिळालेली किंवा त्याच्याकडे असलेली सर्व माहिती जशीच्या तशी इतरांना देणे अपेक्षित असते. पण तसे केले तर मग त्या देशाची या बाबतीतली क्षमता सर्वांना समजेल तसेच त्यातल्या त्रुटीही समजतील आणि या बाबतीत गोपनीयता राखणे राष्ट्राच्या हिताचे असते. अशा प्रकारच्या मुद्द्यांमुळे सगळ्यांनी खुल्या दिलाने अगदी हातात हात घालूनच काम केले असे सांगता येणार नाही.  पण एकंदरीत पाहता गेल्या कित्येक वर्षांतली ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पातळीवरची शोध मोहीम आहे असे म्हणता येईल, तरीही तिला अजून म्हणावे तेवढे यश मिळालेले नाही.
. . . . . . 

नवी भर दि.१४-०६-२०२४ : आता या घटनेला दहा वर्षे होऊन गेली आहेत आणि ही घटना विस्मरणात गेली आहे. पण ती घडल्यानंतर ३-४ वर्षे आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप शोधाशोध केली गेली. आफ्रिकेच्या कुठल्या तरी किनाऱ्यावर काही अवशेष मिळाले असे म्हणतात, पण नक्की काहीच समजलेले नाही. याचे गूढ तसेच राहिले आहे.

.  . . . . . . .  . . . . . . (समाप्त)