Thursday, February 27, 2014

रुद्रास आवाहन - डमडमत डमरु ये - स्व.भा.रा. तांबे

आज महाशिवरात्र आहे तसेच मराठी भाषादिवससुद्धा आहे. कवीवर्य कुसुमाग्रज उर्फ स्व.वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिवस पाळला जातो. मराठी भाषेतल्या काव्याला अनेक शतकांची परंपरा आहे.  ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, रामदास आदि संतश्रेष्ठ आणि वामनपंडित, मोरोपंत यांच्यासारख्या संतकवींनी अभंग, ओव्या, श्लोक, भारुडे, गौळणी, जोगवा वगैरे अनेक पद्धतीच्या उत्कृष्ट रचना करून ठेवलेल्या आहेत. या बहुतेक सर्व काव्याचा धार्मिकतेशी संबंध असायचा, काहीमध्ये देवाची स्तुती, विनवणी आणि प्रार्थना असते, काही रचनांमध्ये पौराणिक कथांचा भाग किंवा संदर्भ असतो, निदान चांगले वर्तन ठेवण्याचा उपदेश तरी असतोच.

प्रेम, मीलन, विरह, निसर्ग किंवा सामाजिक परिस्थिती यासारख्या विषयांवर मराठी भाषेत काव्य रचणे गेल्या शंभर दीडशे वर्षांमध्ये सुरू झाले असावे. कदाचित उर्दू आणि इंग्रजी भाषांमधील साहित्याचा प्रभाव पडल्यानंतर त्याची सुरुवात झाली असावी. स्व.भास्कर रामचंद्र तांबे (भा. रा. तांबे) हे या अर्वाचीन मराठी कवितेच्या जनकांमधील एक मोठे नाव आहे. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत अप्रतिम काव्यरचना केली. 'डोळे हे जुल्मि गडे', 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या' यासारखी प्रेमगीते,  'कळा ज्या लागल्या जीवा' यासारखे सामाजिक भान असलेले गीत, 'जन पळभर म्हणतील हाय हाय', 'मावळत्या दिनकरा' यासारखी तत्वज्ञान मांडणारी गाणी, तसेच पण आशा दायक असे 'घन तमीं शुक्र बघ राज्य करी' हे गीत, 'नववधू प्रिया मी बावरतें', 'निजल्या तान्ह्यावरी माउली' यासारखी कौटुंबिक जीवनावरली गीते, 'पिवळे तांबुस ऊन कोवळे' यासारखे निसर्गगीत अशी एकाहून एक वरचढ गीते त्यांनी लिहिली. 'मधु मागशी माझ्या सख्यापरी' हे त्यांचे एक प्रकारचे निरोप घेणारे लाजवाब गाणे चटका लावणारे आहे.

स्व.भा.रा. तांबे यांनी काही भक्तीगीतेसुद्धा लिहिली आहेत. उदाहरणार्थ 'चरणी तुझिया मज देई वास हरी'. त्यांनी रुद्राला केलेले आवाहन या गीताला भक्तीगीत म्हणावे की क्रांतीकारक म्हणावे हे सांगता येणार नाही. शंभर वर्षांपूर्वीच्या काळातल्या परिस्थितीने ते इतके क्षुब्ध झाले होते की हे सगळे तोडून, मोडून, जाळून टाकणारे प्रलयंकारी तांडव शंकराने पुन्हा एकदा करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. तरीसुद्धा 'पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं, ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती' असे ते लिहितात. या गाण्यातले कडक शब्द आणि त्यांना उठाव देऊन गाता येईल असा छंद या गाण्यासाठी त्यांनी निवडला. हे गीत नुसते मनातल्या मनात वाचायचे नाही, त्याचा उच्चार केल्यावर आपोआप स्फुरण चढावे अशा प्रकारचे हे गीत त्यांनी लिहिले आहे. अगदी संहार केला नाही तरी चालेल पण क्रांतीकारक (चांगला) बदल करण्यासाठी महादेवाने अवतरावे असे हे गीत वाचून कुणालाही वाटेल. शब्द आणि नाद या दोन्हीचा एकत्र परिणाम या गीतात दिसून येतो. स्व.भा.रा. तांबे यांचे या दोन्हीवरील प्रभुत्व अद्वितीय होते.

 रुद्रास आवाहन
  
डमडमत डमरु ये, खण्‌खणत शूल ये,
शंख फुंकीत ये, येइ रुद्रा ।
प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ।। ध्रु०।।

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां ।। १ ।।

पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती,
झाड खट्‌खट् तुझें खड्‌ग क्षुद्रां ।। २ ।।

जळ तडागी सडे, बुडबुडे, तडतडे
'शांति ही !' बापुडे बडबडति जन-किडे !
धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा ।। ३ ।।

पूर्विं नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा ।। ४ ।।

--------------------------------
मूळ लेखात दिलेल्या कवितेत दोन दुरुस्त्या केल्या आहेत.
"शंख फुंकत ये" ऐवजी "शंख फुंकीत ये "  
आणि  "जळ तडाग सडे"च्या ऐवजी "जळ तडागी सडे" असे लिहिले आहे.
५ जून २०१७. 

4 comments:

Kamlesh said...

या गीतावर बेतलेली पु.ल. देशपांडे यांची "बटाट्याची चाळ" यातील "संगीतिका" या प्रकरणातील अतिशय सुंदर अशी कविता आहे - "दणदणत चरण ये, खणखणत वदन ये, ये नळाला". अवश्य वाचावी.

चैतन्य said...

जळ तडाग सड़े...हे छंदात वाचता येईना.
जळ तडागी सड़े असे असावे का ते?

Anand Ghare said...

ही कविता मी शाळेत असतांना पाठ केली होती. लेख लिहायच्या वेळी आंतर्जालावरून घेतली होती. कवीवर्य स्व.भा. रा. तांबे यांची मूळ रचना कुठे उपलब्ध असेल ते मलाही माहीत नाही. आपण सुचवल्याप्रमाणे "जल तडागी सडे" हेच वृत्त आणि अर्थाच्या दृष्टीनेही अधिक समर्पक वाटते.
माझ्या स्मरणानुसार कवितेची दुसरी ओळ "शंख फुंकीत ये" अशी हवी.
धन्यवाद.

Unknown said...

बालपणी ची आठवण झाली