Wednesday, September 18, 2013

अनंतचतुर्दशी

'अनंत' या शब्दाने माझा लहानपणापासून पिच्छा पुरवला आहे. साठसत्तर वर्षांपूर्वी हे नाव खूपच प्रचलित असायचे. अनंतराव, अंतूशेठ, अनंता, अंत्या वगैरे नावांनी ओळखली जाणारी निदान शंभर तरी लहानमोठी मुलेमाणसे आमच्या गावात होती आणि त्यातली चारपाच तरी आमच्या अगदी जवळची आणि नेहमी आमच्या घरी येणारी होती. 'आनंद' हे नाव धारण करणारी मोठी माणसे नव्हतीच आणि मुलेसुध्दा त्या मानाने अगदी कमी होती. त्यामुळे कुठेही माझे नाव मी 'आनंद' असे सांगितले तरी ऐकणारा माणूस ते 'अनंत' असेच लिहून घेत असे आणि हे आजतागायत होत आले असल्याने मी केलेल्या खर्चासाठी मिळालेल्या शेकडो पावत्या 'अनंत' या नावाने फाडल्या गेल्या आहेत, या नावाने मला प्रवास करावा लागला आहे आणि या नावाने माझ्यासाठी उद्घोषणा (अनाउन्समेंट्स) झालेल्या ऐकून त्यांना प्रतिसाद दिला आहे. हळूहळू मलाही त्याचे काही वाटेनासे झाले आहे. पण सरकारदरबारी महत्व असलेल्या कागदपत्रांमध्ये मात्र माझे नाव चुकीचे लिहिले जाऊ नये यासाठी मला थोडी धडपड करावी लागली आणि ते तसे झाल्यानंतर त्या चुका दुरुस्त करून घेण्यासाठी हेलपाटे घालावे लागले आहेत.  मुंबईला आल्यानंतर मात्र 'अनंत' नावाची माणसे भेटणे कमी कमी होत गेले आणि मला भेटणा-या 'आनंदां'ची संख्या वाढत गेली, काही परमानंद, नित्यानंद आणि सदानंदही भेटले. नंतर त्यांची संख्याही कमी होत गेली आणि स्वानंद, आमोद वगैरे त्या नावाचे नवे अवतार येत गेले. सध्याच्या नव्या पिढीतले कोणतेच जोडपे त्यांच्या मुलाला 'अनंत' हे नाव आता ठेवत नसेल.

'अनंत' या नावाचा अर्थ खरे तर खूप मोठा आहे. 'ज्याला अंत नाही' असा तो होतो. अमित, अगणित, असंख्य, इन्फिनिटी यासारखी ही एक अचाट कल्पना आहे किंवा कल्पनातीत अशी संख्या आहे, त्याचा कालावधी कधीही न संपणारा इतका आहे. असे स्वरूप फक्त परमेश्वराचेच असू शकते. भगवान विष्णूच्या सहस्रनामांमधले हे एक प्रमुख नाव आहेच, पण नवनागस्तोत्राची सुरुवात अनंतं वासुकी शेषं अशी होते. केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम् (त्रिवेन्द्रम्) येथील पद्मनाभस्वामीचे मंदिर खूप मोठे आणि प्रसिध्द आहे. त्याला अनन्तपद्मनाभदॆवालयः असेही म्हणतात. त्यामधले अनंत हे नाव शेषाचे आहे की विष्णूचे आहे की त्या दोघांचे आहे असा संभ्रम पडतो. शेषशायी विष्णूची भव्य अशी आडवी मूर्ती या देवळात आहे. 

अनंतचतुर्दशी हा वर्षातला एक दिवसच अनंताच्या नावाने ओळखला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुध्द चतुर्थीला हे नाव दिलेले आहे. या दिवशी अनंतचतुर्दशीचे एक व्रत केले जात असे. त्या दिवशी शेषशायी विष्णूच्या प्रतिमेची आणि एका विशिष्ट दो-याची पूजा करून तो मंतरलेला दोरा मनगटावर गुंडाळायचा आणि पुढल्या वर्षी अनंतचतुर्दशीला पूजा करून तो बदलायचा असे चौदा वर्षे करायचे असे नियम होते. हे फार क़डक व्रत आहे आणि ते पाळले गेले नाही तर फार मोठे दुष्परिणाम होतात वगैरे भीतीपोटी सहसा कोणी ते व्रत करत नसत. असे मी लहानपणी ऐकले होते. आता तर या व्रताचा मागमूसही कुठे दिसत नाही.

पण दरवर्षी अनंतचतुर्दशी प्रचंड प्रमाणात गाजते ती मात्र गणपतीविसर्जनासाठी. त्याचा गाजावाजा, गोंगाट आणि धामधूम वाढतच आहे. गणेशचतुर्थीला प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीच्या मूर्तीची दहा अकरा दिवस भक्तीभावाने पूजा केल्यानंतर अनंतचतुर्दशीच्या दिवशी तिचे समारंभपूर्वक पाण्यात विसर्जन केले जाते. घरांमध्ये बसवलेल्या गणपतींच्या उत्सवांचे दीड, तीन, पाच, सात वगैरे दिवस कालावधी असतात. वंशपरंपरेमधून ते चालत आलेले असतात. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यापासून त्यांचा कालावधी अनंतचतुर्दशीपर्यंत ठरवला गेला आणि त्याचे पालन होत राहिले आहे. ज्या मंडळांना इतके दिवस उत्सव करणे शक्य नसते ते आपल्या गणपतींचे विसर्जन आधी करून घेतात, पण बहुतेक सगळे प्रमुख गट मात्र त्यांच्या उत्सवमूर्तीचे अनंतचतुर्दशीच्या दिवशीच विसर्जन करतात. हा कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यात सामील होणा-यांची संख्याही अगणित असते.

नोकरीसाठी मी मुंबईला आल्यानंतर पहिली अनेक वर्षे माझे ऑफिस दक्षिण मुंबईत होते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी बाहेर कुठेही मीटिंग किंवा व्हिजिटला जाण्याचा प्रश्नच नसायचा, आमच्या ऑफिसातली उपस्थितीही रोडावली असल्यामुळे त्या दिवशी महत्वाच्या बैठका ठेवल्या जात नसत. रस्त्यावरील तुडुंब वाहणारी गर्दी, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी वगैरेंचा विचार करून दोन तीन तास आधीच घरी जाण्याची परवानगी मिळत असे. त्यानंतर आम्ही तीनचार मित्र मिळून ठिकठिकाणच्या मिरवणुका पहात हिंडत असू आणि आमच्या ग्रुपमधल्या शेवटच्या मित्राला कंटाळा येईपर्यंत फिरून झाल्यानंतर आपापल्या निवासस्थानी परतत असू.  लहानमोठे असंख्य गणपती, त्यांचे देखावे वगैरेंमधून त्याची कोटीकोटी रूपे त्या काळात मला पहायला मिळाली. लग्न झाल्यानंतर  मात्र या तोबा गर्दीत सहकुटुंब जाणे आणि परतणे शक्य नसल्यामुळे आम्ही थोडा लहानसा फेरफटका मारून सुखरूप परतत होतो.

योजना प्रतिष्ठानशी आमचा संबंध आल्यानंतर दर वर्षी अनंतचतुर्दशीला एक वेगळा कार्यक्रम निश्चित झाला. परळच्या ऑव्हरब्रिजला लागूनच असलेल्या एका चाळीतल्या खोलीत या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी अनंतचतुर्दशीच्या दिवशी संगीत भजनाचा लहानसा घरगुती पण चांगल्या दर्जाचा कार्यक्रम केला जात असे आणि त्यात स्व.शिवानंद पाटील, योजनाताई आणि त्यांचे निवडक शिष्यगण भक्तीपूर्ण गायनसेवा सादर करीत असत. बाहेरील रस्त्यावरून जात असलेल्या मिरवणुकांमध्ये चाललेला ढोलताशांचा गजर आणि त्याच्यावर आवाज काढून बंदिस्त खोलीत केलेले ते गायन यात एक वेगळा रंग येत असे. संध्याकाळच्या सुमारास घरी परत येतांना आमची बस मुंगीच्या पावलाने चालत असे आणि उलट दिशेने समुद्राकडे जाणारे खूप गणपती पहायला मिळत असत.


आज अनंतचतुर्दशी आहे. मुंबई, पुणे, नागपूर, इन्दौर वगैरे सर्वच प्रमुख शहरांमध्ये या विसर्जनांच्या भव्य मिरवणुकी निघायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक मंडळामधील गणपतीसोबत त्या भागातले किंवा त्याच्याशी संबंधित असलेले सगळे लोक त्या मिरवणुकींमध्ये सामील होतातच, शिवाय या मिरवणुकी पहायला ज्याला ज्याला शक्य असलेल तो त्या पहायला जातो. मुंबईला मोठा समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळे गिरगाव, दादर, जुहू वगैरे अनेक ठिकाणी हे विसर्जन होते, पण त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत. लालबागपासून दादर जवळ असले तरी लालबागचा राजा आणि त्या भागातले मोठे गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरच वाजत गाजत नेले जातात. टेलिव्हिजनवर या मिरवणुकींचे वृत्तांत दाखवले जात असल्याने घरात राहिलेले सगळेजण आता टीव्हीसमोर बसलेले आहेत. तेंव्हा मीसुध्दा हा लेख इथे आटोपता घेऊन आता तिकडे चाललो आहे.
गणपतीबाप्पा मोरया । पुढच्या वर्षी लवकर या।।
-----------------------------------------

1 comment:

अक्षरयात्रा said...

छान लेख!आवडला!