Monday, September 09, 2013

गणपतीची आरती - सुखकर्ता दुखहर्ता


माझ्या लहानपणी आमच्या गावातले सगळे रस्ते मातीचे होते, रस्त्यांच्या दोन्ही कडांना उघडी गटारे असायची, त्यांच्या बाजूला इतरही घाण केलेली किंवा टाकलेली असायची आणि काही गलिच्छ प्राणी त्यातून स्वैर हिंडत असायचे. रस्त्यातल्या विजेच्या खांबांवरचे दिवे कधी पेटलेच तरी अगदी मिणमिणता उजेड देत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात त्या तसल्या रस्त्यांवरून फिरायला नकोसे वाटत असे. दिवेलागणी होईपर्यंत आम्ही सगळेजण आपण होऊनच घरी परतत होतो. त्यावेळी घरातला महिला वर्ग रात्रीच्या जेवणासाठी स्वयंपाकात गुंतलेला असायचा आणि आम्ही मुले घरी आल्यानंतर शुभंकरोती आणि परवचा म्हणून झाल्यावर श्लोक, गाणी वगैरे म्हणत बोलावण्याची वाट पहात असू. स्वैपाक पुरा होत आला की "दुपार्तीला या रे" अशी हाक यायची आणि घरातले सगळे जण देवासमोर येऊन उपस्थित होत असत. "या वेळच्या आरतीला 'दुपारती' असे का म्हणतात?" असे मी एकदा मोठ्या भावाला विचारले, तेंव्हा त्याने उत्तर दिले "अरे आपण दुपारी शाळेत असतो ना? म्हणून ती संध्याकाळी करतात." त्याचे खरे नाव 'धूप आरती' असे असते हे ज्ञान खूप उशीराने झाले. पण त्याने काही फरक पडला नाही, कारण आमच्या घरातल्या 'दुपारती'मध्ये सहसा धूप नसायचाच, ती निरांजन ओवाळूनच केली जात असे. दररोज करण्याच्या या आरतीत फक्त दोनच आरत्या म्हंटल्या जात. गणपतीची आरती दररोज म्हणायची आणि सोमवारी शंकराची, मंगळवार व शुक्रवारी देवीची, बुधवारी विठोबाची, गुरुवारी दत्ताची व शनिवारी मारुतीची आरती म्हणायची हा कार्यक्रम खंड न पाडता कित्येक वर्षे चालत आला होता.

संध्याकाळच्या वेळेला भुते, पिशाच्चे, दुष्टआत्मे वगैरे मोकळे हिंडत असतात आणि आरत्यांचे आवाज ऐकून ते घाबरून दूर पळून जातात असे सांगितले जात असे. त्यांना जास्तच घाबरवण्यासाठी आम्ही जोरजोरात झांजा वाजवून आणि तारस्वरात आरत्या म्हणत असू. आजकाल नावापुरते सायन्स शिकलेले काही लोक निगेटिव्ह व्हायब्रेशन्स, निगेटिव्ह एनर्जी वगैरे शब्द वापरतात, त्यांनाही कसली तरी अनामिक भीती वाटत असते. आरत्यांचा ध्वनीच प्रभावी समजला जात असल्यामुळे त्यातल्या शब्दांकडे कोणी लक्ष देत नसत. योग्य तो ध्वनि उत्पन्न करण्यासाठी फक्त त्यांचा उच्चार बरोबर यायला हवा, अर्थ समजून घेण्याचे काही कारण नसायचे. पण माझा स्वभाव थोडा चिकित्सक असल्यामुळे मला तो समजून घ्यावा असे वाटत असे. त्यातल्या कुठल्या शब्दांमुळे किंवा वाक्यांमुळे भुतांना घाबरायला होते याचे कुतूहलही वाटत होते. गणपतीची आरती रोजच कानावर पडत असल्यामुळे मला बोलायला लागण्याबरोबर ती आरती आपोआप पाठ झाली होती. या आरतीतले सगळे शब्द अगदी सोपे आहेत. तरीही आज गणेशचतुर्थीच्या दिवशी त्याचा अर्थ समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करू.

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।।
या पहिल्या ओळीतल्या पहिल्या दोन शब्दांचे अर्थ सुख करणारा (देणारा) आणि दुःखाचा नाश करणारा असे होतात, पण पुढे विघ्नाची वार्ता कशाला? त्याचे उत्तर पुढील ओळीत आहे.
नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।
म्हणजे विघ्नाची वार्ता नुरवी, तिला शिल्लक ठेवत नाही, शिवाय प्रेमाचा पुरवठा करते अशी ज्याची कृपा आहे. अशा त्या गणपतीचे वर्णन पुढील ओळींमध्ये आहे.
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।।
कंठी झळके माळ मुक्ता फळाची।।
त्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि चमकदार मोत्याची माळ गळ्यात परिधान केली आहे. अशा त्या मंगलमूर्ती गणेशाचा जयजयकार ध्रुवपदात केला आहे.
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।।
दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। १ ।।
त्याचे फक्त दर्शन घेतल्यानेच मनातल्या कामना, इच्छा वगैरे पूर्ण होऊन जातात असे संत रामदासांनी म्हंटले आहे. 'दर्शनमात्रे'च्या जोडीला काही भक्त तर 'स्मरणमात्रे'च मनोकामना पूर्ण होतात असेही म्हणतात. पण ही जरा अतीशयोक्ती झाली कारण संपूर्ण समाधान मिळणे हे माणसाच्या स्वभावातच नाही. तो नेहमीच 'ये दिल माँगे मोअर' म्हणत राहतो. शिवाय दोन शत्रूपक्षातल्या किंवा स्पर्धक भक्तांनी एकाच वेळी परस्परविरोधी कामना मनात बाळगल्या तर त्या दोन्ही कशा पूर्ण होणार ?

या आरतीच्या दुस-या कडव्यात राजसी थाटाच्या गजाननाच्या ऐश्वर्याचे साग्रसंगीत वर्णन केले आहे. गणपतीचे पिताश्री शंकर महादेव अंगाला भस्म लावून अगदी साधेपणे रहात असतांना दाखवले जातात, तसेच त्याची आई पार्वतीसुध्दा माहेरच्या ऐश्वर्याचा त्याग करून कसलेही अलंकार न घालता वावरतांना पुराणात दिसते, पण त्यांचा पुत्र गणेश मात्र नेहमी राजसी थाटात असतो.
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा ।।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
हिरे जडीत मुकुट शोभतो बरा ।।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ।।
पार्वतीच्या या पुत्राने रत्नखचित अलंकार परिधान केला आहे, त्याने सर्वांगाला लावलेल्या शेंदुराच्या उटीचा उल्लेख पहिल्या चरणात आलेला आहे, आता त्याच्या जोडीला सुगंधी चंदन आणि लालचुटुक कुंकुमाची भर पडली आहे. त्याच्या पायात रुणुझुणू वाजणा-या नूपुरांच्या (पैंजणांच्या) छोट्या छोट्या घाग-यांपासून ते मस्तकावर धारण केलेल्या हिरेजडित मुकुटापर्यंत हा गणपती सुंदर सजलेला आहे.

लंबोदर पितांबर फणिवर वंधना ।।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
तिस-या कडव्याच्या पहिल्या दोन ओळींमध्ये गणपतीचे वर्णन असे केले आहे, त्याचे उदर (पोट) मोठे आहे, त्यावर नागाला (पट्ट्यासारखे) बांधले आहे, पिवळ्या रंगाचे धोतर तो नेसला आहे, त्याची सोंड सरळ पण तोंड वाकडे आहे, त्याला तीन डोळे आहेत असे वर्णन या आरतीमध्ये केले आहे, पण गणपतीच्या कुठल्याच चित्रात मी त्याच्या कपाळावर तिसरा डोळा काढलेला पाहिला नाही.  
दास रामाचा वाट पाहे सदना ।।
संकटी पावावे सुरवर वंदना ।।
अशा वर दिलेल्या स्वरूपाच्या गजाननाची वाट रामाचा दास (रामदास) घरी बसून पहात आहे, या देवांनाही वंदनीय अशा देवाने संकटकाळात प्रसन्न व्हावे अशी प्रार्थना संत रामदासांनी केली आहे. (आणि निर्वाणी रक्षावे, या निर्वाणीच्या क्षणी आपले रक्षण करावे, अशी पुस्ती भक्तांनी त्याला जोडून ही विनंती अधित स्पष्ट केली आहे).  काही लोक शेवटची ओळ ''संकष्टी पावावे'' असे म्हणून सगळा अर्थच बदलून टाकतात.

सुखकर्ता दुखहर्ता या आरतीची शब्दरचना अशी अगदी सोपी आहे, त्यात खूप गहन अर्थ भरला असेल असे मला तरी कधी जाणवले नाही. सर्वसाधारण जनतेला ती कळावी, पटावी म्हणजे ते या आरतीचा स्वीकार करतील असाच विचार त्यामागे असावा आणि तसा असल्यास तो कल्पनातीत प्रमाणात साध्य झाला आहे. तीनशेहे वर्षांनंतरही आज अक्षरशः कोट्यावधी लोक गणपतीची ही आरती म्हणतात आणि आज ती देशोदेशी पसरलेल्या मराठी माणसांच्या घरी म्हंटली जात आहे. या आरतीचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की गणपती, गणेश, गजानन, विनायक यासारख्या कुठल्याच प्रसिध्द नावाचा समावेश या आरतीच्या कुठल्याही कडव्यात नाही, तरीसुध्दा यातल्या एकंदर वर्णनावरून ही त्याच देवाची आरती आहे यात कोणाला शंका येत नाही.
--------------------------------------------------

या वर्षी परवाच्या शुक्रवार सकाळपर्यंत अलका हॉस्पिटलमधल्या अतिदक्षता विभागात (आय़सीयूमध्ये) झोपून होती. तिची प्रकृती काळजी करण्यासारखी नसली तरी नाजुकच होती. आता या वर्षी गणपती उत्सव कसा साजरा करायचा याची तिला चिंता वाटत होती. पण दोन दिवसात तिच्यात सुधारणा होऊन रविवारी डिस्चार्जही मिळाला. आणि आज गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापनाही करता आली. त्याचीच कृपा.

गणपती बाप्पा मोरया ।

1 comment:

Anonymous said...

संकट आणि संकष्ट हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. मोल्सवर्ष शब्दकोषात संकष्ट हा शब्द शोधल्यास उत्तर मिळेल. त्यामुळे संकटी/संकष्टी पावावे हे दोन्ही शब्दप्रयोग योग्य आहेत.


http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F&display=utf8&table=molesworth