Wednesday, November 30, 2011

आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हंटले असते

आत्याबाईला मिशा असत्या तर ... तिला 'काका' म्हंटले असते. ही म्हण माझ्या लहानपणी खूप प्रचलित होती. कदाचित मी जरा जास्तच चौकस (किंवा आगाऊ) असल्यामुळे नाही नाही ते प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडत असेन आणि त्यामुळे वैतागून ते लोक मला ही म्हण वरचे वर ऐकवत असतील. 'आत्या' म्हणजे पित्याची बहीण म्हणजे ती बाईच असणार आणि 'काका' हा पित्याचा भाऊ असल्याने बुवाच असणार हे या शब्दांच्या व्याख्यांवरून स्पष्ट होते. हिंदी भाषेत आत्याला 'बुवा' म्हणतात हे मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा माझी हंसून हंसून पुरेवाट झाली होती. पण 'बुवा' असा ऐकू येणारा हा शब्द 'बुआ' असा आहे आणि तो स्त्रीलिंगी आहे ही माहिती राष्ट्रभाषेचा अभ्यास करतांना मिळाली. ज्या प्रमाणे मला बुवा(आ) हा शब्द ऐकून गंमत वाटली होती तशीच मजा हिंदी भाषिक लोकांना 'जगन्नाथबुवा' किंवा 'यशवंतबुवा' ही मराठी नावे ऐकतांना वाटत असेल. 'काका' हा शब्द मात्र सगळ्या भाषांमध्ये पुल्लिंगीच असावा. त्या बाबतीत काही गोंधळ नाही. पण पंजाबीमध्ये लहान मुलाला 'काका' किंवा 'काके' असे संबोधतात तेंव्हा त्यांना मिसरूड फुटलेले नसते. त्यामुळे पंजाबी 'काका'ला बहुधा मिशा नसतात. राजेश खन्ना मात्र जन्मभर 'काका'च राहिला. एका चित्रपटात त्याने "ये मर्दोंकी खेती है।" असे म्हणून ओठांवर थोडेसे रान माजवले होते आणि त्याच्या 'मर्दानगी'ची खात्री नायिकेला पटली हे पाहून झाल्यावर त्याला साफ करून टाकले होते.
पुरुषांना मिशा असतात तशा स्त्रियांना त्या नसतात हे सर्वसामान्य निरीक्षण असते. त्यामुळे आत्याबाईला मिशा नसतात हे उघड आहे. पूर्वीच्या काळी बहुतेक काका लोक मिशा ठेवत असत. पण गेल्या दोन तीन पिढ्यांपासून बहुसंख्य पुरुषांनी मिशांना चाट दिली असल्यामुळे आत्या आणि काका यांच्यातला एक महत्वाचा दृष्य फरक नाहीसा झाला (दोघेही पँट चढवू लागले असल्यामुळे आणखी एक फरक कमी झाला) आणि ही म्हण किंचित मागे पडली असावी. खूप दिवसांपासून माझ्या कानावर ती पडली नाही. पण लेखनामध्ये आणि भाषणांमध्ये ती अजूनही सर्रास वापरली जातेच. 'जर असे झाले असते तर' असे तर्ककुतर्क असलेले प्रश्न कोणी विचारले आणि त्याला उत्तर देणे अडचणीचे असले तर ही म्हण त्या प्रश्नकर्त्याच्या तोंडावर फेकली जाते. उदाहरणार्थ तुमचा अमका उमेदवार निवडणूकीत पडला असता, तमक्याला भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन बनवले असते, व्यापाराचे जागतिकीकरण झाले नसते, न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडण्याऐवजी त्याचे झाडच पडले असते वगैरे वगैरे. ज्या गोष्टीची मुळीच शक्यता नसते अशी एकादी गोष्ट झाली तर (तू काय करशील?) किंवा जी गोष्ट घडलेली नाही ती घडली असती तर काय झाले असते? असे विचारणे हा या म्हणीचा अर्थ आहे. तसेच एकादी गोष्ट करण्यासाठी अशक्य अशा अटी घालणे असाही होऊ शकतो. "आत्याबाईला मिशा असत्या तर ..." असे विचारणे मूर्खपणाचे आहे असे म्हणू शकतो किंवा तसे न म्हणता "तर तिला 'काका' म्हंटले असते." असे चतुराईचे उत्तर देता येते. न होणा-या गोष्टींबद्दल चिकित्सा करत बसू नये असा बोध त्यावरून मिळतो.

"तुला दोन शिंगे फुटली तर .." असे एकाद्याला म्हंटले तर तो माणूस प्रश्न विचारणा-याला मूर्खात काढेल किंवा "आधी मी ती तुझ्या पोटात खुपसेन" असे उत्तर देईल. 'आत्याबाईला मिशा असत्या तर' ही म्हण या ठिकाणी लागू पडते कारण तसे घडण्याची शक्यता नसते. या उलट "तुला खूप भूक लागली तर ..." असा प्रश्न विचारला तर त्यात काहीच अशक्य नाही. प्रत्येक माणसाला भूक तर लागतेच. पण तिचे शमन अन्न खाऊन करतात हे उत्तरसुध्दा सर्वांना माहीत असते. त्यामुळे हा प्रश्न "काकाला मिशा असल्या तर... " असा (निर्बुध्दपणाचा) होऊ शकेल आणि वैतागून "तुलाच खाईन." असे उत्तर त्यावर मिळण्याची शक्यता आहे. पण जर तो माणूस अंटार्क्टिका किंवा सहारा वाळवंटात मोहिमेवर निघाला असेल तर मात्र आपण भूक भागवण्याची कशी जय्यत तयारी केली आहे हे फुशारकीने सांगेल.

चित्रपट आणि मालिकांमध्ये न्यायालयाची जी दृष्ये दाखवतात त्यांमध्ये साक्षीदाराला एका बाजूच्या वकीलाने 'जर तर' असलेला काही प्रश्न विचारला की लगेच विरुध्द बाजूचा वकील "ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हा प्रश्न हायपॉथिटीकल आहे" असे म्हणत उभा राहतो. त्या वेळी प्रेक्षकांमध्ये पिकलेल्या हंशावरून कदाचित हा प्रश्न 'आत्याबाईला मिशा असत्या तर' अशा प्रकारचा असावा असे आपल्यालाही वाटते. मग त्या प्रश्नाचा न्यायालयासमोर असलेल्या खटल्याशी कसा संबंध आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न पहिला वकील करतो. ते ऐकून घेतल्यानंतर "ऑब्जेक्शन सस्टेन्ड किंवा ओव्हररूल्ड" असा निर्णय न्यायमूर्ती देतात. याबद्दल थोडी फार संदिग्धता असते हेच यावरून दिसते.

काही दिवसांपूर्वी परगावी गेलो असतांना परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्टेशनावर आलो असतांना अचानक माझी प्रकृती खूप बिघडली होती. त्या वेळी आलेल्या अनुभवावर मी एक लेख लिहून तो एका संकेतस्थळावर प्रसिध्द केला होता. त्यावर आलेल्या प्रतिक्रियांपैकी एका प्रतिसादात "जे घडलेच नाही त्यावर जर तर चर्चा करून उगाच त्रास कशाला करून घ्यायचा ?" असे विचारले होते. त्यामुळे त्या लेखात केलेले माझे विवेचन 'आत्याबाईला मिशा असत्या तर' अशा प्रकारचे होते का असे मला क्षणभर वाटले. पण ते तसे नव्हते. कोठल्याही माणसाची प्रकृती अचानक बिघडण्याची शक्यता तरुणपणी अगदी कमी म्हणजे शून्याच्या जवळपास इतकीच असते. त्यामुळे नको ते विचार मनात आणून स्वतःला ताप करून घेण्यात अर्थ नसतो हे खरे आहे. पण माझी तब्येत बिघडण्यासाठी माझ्या शरीरात जे काही (मला माहीत नसतांना) चालले होते त्याचा परिपाक मी रेल्वे स्टेशनवर असतांना ती व्याधी एकदम विकोपाला जाण्यात झाला. जी गोष्ट प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर अर्ध्या तासात झाली ती नंतरच्या सोळा तासात होण्याची शक्यता बत्तीसपट जास्त होती. त्यामुळे प्रवासात असतांना ती झाली असती तर काय झाले असते हा प्रश्न गैरलागू ठरत नाही.

हृदयविकार, एड्स किंवा कँसर या व्याधी कोणालाही जडण्याची शक्यता संख्याशास्त्रानुसार नगण्यच असते, पण कोणत्याही दिवसाचे वर्तमानपत्र वाचतांना त्यासंबंधी निदान एक तरी बातमी, लेख किंवा जाहिरात त्यात दिसतेच. जेंव्हा एकादा प्रसिध्द माणूस त्यांना बळी पडलेला असतो तेंव्हा त्याच्य़ासमवेत त्याला जडलेल्या विकारालासुध्दा प्रसिध्दी मिळते. रोगाचे निदान आणि त्यावरील उपाययोजना यात झालेल्या प्रगतीमुळे बहुतेक इतर व्याधी पहिल्यासारख्या दुर्धर राहिलेल्या नाहीत. त्यांची गणना आता बातमी या सदरात होत नाही. त्यामुळे प्रसिध्द व्यक्तींना दुर्धर व्याधी जडण्याची शक्यता अजूनही तशी कमीच असली तरी त्याची बातमी होण्याची शक्यता मात्र प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्या बातमीमुळे सर्वसामान्य लोकांनासुध्दा त्याची माहिती मिळते तसेच त्याची भीती वाटते. ते विकार होऊ नयेत यासाठी घेण्याची सावधगिरी किंवा त्यांचे नियंत्रण व निवारण करण्याठी करण्याचे उपाय, ते जडल्यानंतर काय करावे यावर सल्ले अशा अनेक प्रकारचे लेख रोज वर्तमानपत्रात येत असतात किंवा त्याची चर्चा टीव्हीवर होत असते. त्यावरील प्रतिबंधक व निवारक औषधे आणि त्यांचे निदान व त्यावर उपचार करण्याची व्यवस्था असलेल्या संस्था त्यांची जाहिरात मोठ्या प्रमाणावर करत असतात. कांही लोकांना याचा उपयोग होत असतो. त्यामुळे आपल्याला असे काही होईल का हा विचार आत्याबाईंना मिशा असण्याच्या जवळपास असला तरी तो करणे योग्य ठरते. फक्त त्याविषयी भलभलत्या शंकाकुशंका मनात आणून त्यावर चिंता करून फार मनस्ताप करून घेतला, नको तेवढ्या अनावश्यक चाचण्या करून घेतल्या आणि अखेरीस ते 'गुंड्याभाऊचे दुखणे' ठरले तर मात्र कपाळाला हात लावायची पाळी येते.
'आत्याबाईला मिशा असत्या तर ...' हा वाक्यप्रयोग त्याची किती टक्के शक्यता आहे एवढ्यावरच अवलंबून नसते, शक्यतेपेक्षाही त्याचे संभाव्य परिणाम किती विदारक असू शकतात यांचा परिणाम जास्त प्रभावी ठरतो.

No comments: