Tuesday, November 08, 2011

सात अब्ज

गेल्या महिन्याच्या अखेरीस जगाची लोकसंख्या सात अब्जावर पोचली अशी बातमी आली. ही संख्या अचूकपणे काढता येणे शक्यच नाही. कारण बरेच वर्षात कित्येक देशात खानेसुमारीच झालेली नाही आणि जेथे ती नियमितपणे होते तेथेसुध्दा ती कितपत बरोबर असते याबद्दल शंका कुशंका असतातच. जन्म आणि मृत्यू यांची नोंदणीसुध्दा सगळीकडे काटेकोरपणे केली जातेच असे नाही. ग्रामीण भागात याबद्दल अजूनही पूर्ण लोकजागृती झालेली नाही किंवा त्यांची सोयच नसते. या सगळ्या गोष्टीबद्दल काही अनुमाने काढून हिशोब मांडले जातात. जनगणनेतून उपलब्ध झालेले आकडे आणि जन्म मृत्यू यांच्या संख्या यावरून प्रत्येक देशाची लोकसंख्या किती दराने वाढत आहे याचा अंदाज बांधून त्यावर चालणारी मीटरे अनेक उत्साही मंडळींनी तयार केली आहेत. प्रत्येकाकडे उपलब्ध असलेली माहिती आणि त्यांची गृहीतकृत्ये यात थोडी फार तफावत असल्यामुळे त्यांच्यात मतैक्य नाही. पण एकाद्या टक्क्याच्या फरकाने ती जुळतात. सात अब्जाचे एक टक्कासुध्दा सत्तर कोटी म्हणजे लहान देशाच्या लोकसंख्येहून जास्त होतात ही गोष्ट वेगळी. या फरकामुळे लोकसंख्येच्या काही मीटर्समध्ये अजून सात अब्जाचा पल्ला गाठला गेलेला नाही. बीबीसी या विश्वसनीय अशा वृत्तसंस्थेचा समावेश त्यात होतो.


असे असले तरी अत्यंत मनोरंजक आणि उद्बोधक अशी माहिती क्षणार्धात मिळवून देण्याची सोय त्यांनी केली आहे. त्यावरून खालील माहिती मिळाली.

जगामध्ये दर तासाला १५३४७ अर्भके जन्माला येतात आणि ६४१८ व्यक्ती दिवंगत होतात त्यामुळे जगाची लोकसंख्या दर तासागणिक ८९२९ ने वाढत आहे.

त्यापैकी भारतात दर तासाला ३११३ अर्भके जन्माला येतात आणि १११४ व्यक्ती दिवंगत होतात, शिवाय ६८ व्यक्ती परदेशगमन करतात त्यामुळे भारताची लोकसंख्या दर तासागणिक १९३१ ने वाढत आहे.

चीनमध्ये हे प्रमाण दर तासाला १९०८ अर्भकांचा जन्म, १०९५ व्यक्तींचा मृत्यू आणि ४३ बहिर्गमन असल्यामुळे चीनची लोकसंख्या दर तासागणिक ७७० ने वाढत आहे.

जगाची लोकसंख्या सात कोटी आणि त्यातील वाढ होण्याचा दर दर वर्षी १.१६ टक्के इतका आहे. चीनची आजची लोकसंख्या सर्वात जास्त म्हणजे १ अब्ज ३४ कोटी इतकी असली तरी त्यातील वाढीचा दर फक्त अर्धा टक्का इतकाच आहे. दुस-या क्रमांकावरील भारताची आजची संख्या १ अब्ज २३ कोटी इतकी असली तरी त्यातील वाढीचा दर १.४ टक्के इतका असल्यामुळे काही वर्षानंतर नक्कीच या बाबतीत आपण अग्रगण्य होणार हे ठरलेले आहे. तिस-या क्रमांकावरील यूएसए आणि चौथ्या इंडोनेशियाची लोकसंख्या अजून अनुक्रमे ३१ व २४ कोटी एवढीच असल्यामुळे ते देश आपल्या बरेच मागे आहेत आणि त्यांचा वाढीचा दरसुध्दा अनुक्रमे ०.९ व १.१ टक्के एवढाच म्हणजे आपल्याहून कमी असल्यामुळे ते देश आपल्यापुढे जाण्याची शक्यता नाही. लोकसंख्येच्या बाबतीत बांगलादेशाला मागे सारून पाकिस्तानने आघाडी मारलेली आहे हे मला ठाऊक नव्हते. तसेच बांगलादेशातील वाढीचा दर भारतापेक्षा कमी आहे आणि त्या देशातून परदेशी जाणा-या लोकांची संख्या मात्र जवळ जवळ भारतीयांएवढीच आहे ही नवी माहिती मिळाली. कदाचित यातले बरेच लोक तिकडून इकडे येत असण्याची दाट शक्यता आहे. बेकायदेशीररीत्या येणा-यांचा समावेश यात होत नसावा. असे सगळे असले तरी बांगलादेशीयांच्या लोकसंख्येची घनता (दाटीवाटी) अपरंपार आहे.

कतार या देशाची लोकसंख्या सर्वाधिक झपाट्याने वाढत असली तरी तिचा परिणाम जगाची लोकसंख्या वाढण्यावर होत नाही. फक्त अठरा लक्ष एवढीच लोकसंख्या असलेल्या या देशात दर तासाला दोन मुले जन्माला येतात आणि एक माणूस हे जग सोडून जातो. पण दर तासाला वीस माणसे बाहेरून येत असल्याकारणाने त्या देशाच्या लोकसंख्यावाठीचा दर वर्षाला पंधरा टक्के एवढा फुगला आहे. रशिया या मोठ्या देशामधील मृत्यूंचे प्रमाण जन्मांपेक्षा जास्त असून शिवाय काही लोक बहिर्गमन करत आहेत. त्यामुळे त्या देशाची लोकसंख्या घटत चालली आहे. सोव्हिएट युनियनमधून बाहेर पडलेल्या मोलदोव्हा नावाच्या देशाची लोकसंख्या सर्वाधिक वेगाने कमी होत चालली आहे. फक्त ३५ लाख लोकसंख्या असलेल्या या देशात तासाला पाच बालके जन्माला येतात, सहा जण हे जग सोडून जातात आणि चार जण देश सोडून परागंदा होतात. लोकसंख्या कमी होत असतांनासुध्दा उरलेल्या लोकांना तिथून बाहेर जावे असे का वाटते हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

कोठल्याही सर्वसाधारण कुटुंबात चिमुकल्या नव्या पाहुण्याचे स्वागत खूप आनंदाने केले जाते. काही मुलांची गणना ७ अब्जाव्वा जीव म्हणून केली गेली आहे. त्यांचे जरा जास्तच कौतुक होत असेल. एकंदरीतच कोणत्याही क्षेत्रातल्या नव्या उच्चांकाचा जल्लोश साजरा केला जातो. पण या सात अब्जांच्या टप्प्यावर मात्र उत्साह आणि उल्हास यापेक्षा चिंताजनक प्रतिक्रियाच मोठ्या प्रमाणात व्यक्त केल्या जात आहेत. त्याची कारणे उघड आहेत. सात अब्ज तोंडांबरोबर चौदा अब्ज हातसुध्दा उपलब्ध झाले आहेत आणि ते काम करून त्या तोंडांना खाऊ घालू शकतील असे म्हणता येत असले तरी पृथ्वीतलावरील उपलब्ध जमीन, हवा, पाणी वगैरेंचा आजच जवळ जवळ पुरेपूर उपयोग केला जात असल्यामुळे त्यांच्यावील ताण वाढत चालला आहे. शिवाय आजच्या राहणीमानानुसार अन्नाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींची आवश्यकता निर्माण झाली आहे आणि बहुसंख्य लोकांकडे त्या अल्प प्रमाणात असल्यामुळे किंवा मुळीच नसल्यामुळे त्यांची मागणी लोकसंख्येमधील वाढीच्या काही पटीने वाढत जाणार आहे. त्या सर्वांची पूर्तता कशी करता येईल हा यक्षप्रश्न जगापुढे उभा आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेले प्रदूषण, जंगलांचा नाश वगैरेंमुळे पर्यावरणावर होत असलेले दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत.

व्यक्तीगत पातळीवर तुलना करायची झाली तर माझ्या जन्माच्या वेळी जगाची लोकसंख्या अडीच अब्जाहून थोडी कमी होती, ती माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी चार अब्जाच्या जवळ पोचली होती आणि नातवंडाच्या जन्मकाली सहा अब्जाच्या वर गेली होती. पृथ्वी मात्र जेवढी होती तेवढीच राहिली. नव्या खंडांचा शोध लागणे वगैरे संपून काही शतके उलटून गेली होती. उपलब्ध असलेल्या जमीनीवरच एकाऐवजी दोन, किंवा दोनाऐवजी तीन चार पिके घेऊन आणि रासायनिक खते वापरून अन्नधान्यांचे उत्पादन वाढवले गेले आहे. याहून जास्त ते कुठपर्यंत वाढवता येणे शक्य आहे हे सांगणे कठीण आहे.
या सर्वांची जाणीव मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे आणि या सर्वांवर उपाययोजना करण्यासाठीसुध्दा अनेक लोक प्रयत्नशील आहेत आणि त्यांना थोडे तरी यश मिळत असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे आशेचे किरण नाहीतच असे म्हणता येणार नाही. विज्ञानाच्या प्रगतीमधून काही नव्या वाटा सापडतात का याकडेही लक्ष दिले जात आहे. फक्त शंभरच वर्षांपूर्वी निसर्गावर पूर्णपणे विसंबून असलेला मानव अजूनही त्याच्या सहाय्यानेच जगू शकत असला तरी काही बाबतीत त्याच्याशी संघर्ष करू लागला आहे आणि हा संघर्ष दिवसेदिवस वाढत जाणार असल्याची लक्षणे दिसत आहेत.

No comments: