Tuesday, October 18, 2011

आंतर भारतीय खाद्यंतीज्याला खादाडी आवडत नाही असा माणूस सापडणे कठीण ! त्याची गणना मनुष्यप्राण्यात करावी की नाही असा प्रश्न पडेल. त्यात दोन माणसांच्या आवडी तंतोतंत समान असल्या तरच आश्चर्य म्हणावे लागेल. पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना कुंडे कुंडे नवं पयः या संस्कृत सुभाषितानुसार प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी भिन्न असणारच. पण आपापल्या आवडीचे चविष्ट खाद्यपदार्थ खायला मिळाले की कोणाचीही कळी खुलते यात शंका नाही.

जगातील निरनिराळ्या प्रदेशांमध्ये स्थानिक हवामानानुसार वेगवेगळ्या वनस्पती उगवतात, निरनिराळे प्राणी जास्त संख्येने सापडतात. त्यानुसार तिकडील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलत जातात. काही धर्मांमध्ये मांसाहार वर्ज्य करून फक्त शाकाहारच करावा असे नियम केले आहेत. मुख्यतः भारतात हे अधिक प्रमाणात दिसते. पूर्वापारपासून आपला देश सुजलाम् सुफलाम् असल्यामुळे वर्षभर वनस्पतीजन्य अन्न पदार्थ मिळणे शक्य होते. ध्रुवप्रदेशात किंवा वाळवंटात जिथे कसलीच पिके, फळफळावळ उगवतच नाहीत त्यांना जीवंत राहण्यासाठी इतर पशू, पक्षी आणि मासे यांनाच मारून खावे लागते. समशीतोष्ण आणि शीत कटिबंधातील युरोपात वर्षातले काही महिने बर्फाचे साम्राज्य असते तर काही महिने पिके आणि फळाफुलांचा बहर असतो. त्यामुळे त्यांच्या भोजनात दोन्ही प्रकारचे पदार्थ असतात.

भारतातील बहुसंख्य धर्म, जाती जमातींमध्ये मांसाहार वर्ज्य नसला तरी तो कमी प्रमाणात केला जातो. दोन्ही वेळची पोटभर जेवणे आणि इतर वेळचा अल्पोपाहार यात प्रामुख्याने शाकाहारी पदार्थ आणि रुचिपालट म्हणून सामिष पदार्थ असतात. मत्स्यप्रेमी बंगाली लोक याला कदाचित अपवाद असले तरी ते शाकाहारी पदार्थ देखील आवडीने खातात, विशेषतः रोशोगुल्ला, सोंदेश, मिष्टी दोइ यासारख्या बंगाली मिठाया प्रसिध्द झाल्या आहेत. पंजाबी लोक घरात किती वेळा नॉनव्हेज खात असतील याबाबत मला शंका आहे, पण देशाच्या कोठल्याही भागातल्या पंजाबी हॉटेलात जाणारे इतर भाषिक लोक मात्र चिकन मसाला आणि तंदूरी चिकनवर ताव मारतांना दिसतात. गुजरात म्हंटले की फाफडा, गांठिया, ठेपला, पात्रा असले खमंग पदार्थ डोळ्यापुढे येतात. ते इतके लोकप्रिय झाले आहेत की जेवणाच्या गुजराथी थाळीमधील पंधरावीस पदार्थात तीन चार प्रकारचे फरसाण असते आणि दाळ किंवा शाकभाजीपेक्षा त्यांना जास्त मागणी असते. दक्षिण भारतीय पदार्थ म्हणजे इडली आणि दोसा एवढीच समजूत पूर्वी होती. त्यांनी, विशेषतः उडपी हॉटेलवाल्यांनी या प्रकारांना इतके पॉप्युलर केले की देशातील सगळ्या स्थानिक पदार्थांना मागे सारून सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये त्यांनी अव्वल स्थान मिळवले. भाताच्या प्रचंड मोठ्या ढिगा-यात तिखट जाळ सांबार ओतून त्यात तळहातापर्यंत भिजवून चांगला चिखल करायचा आणि त्याचे बोकाणे भसाभसा तोंडात कोंबायचे अशा प्रकारचे त्यांचे जेवण पाहूनच मला पूर्वी कसे तरी व्हायला लागत असे. पण दक्षिणेकडील मोठ्या शहरातील चांगल्या हॉटेलांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या भातांची चंव चाखून पाहिल्यानंतर त्यांच्या भोजनातली विविधता समजली. आता मुंबईतसुध्दा दहा पंधरा प्रकारचे दोसे, उत्तप्पे वगैरे मिळतात.

महाराष्ट्रातच कोकण, देश, मराठवाडा, विदर्भ या प्रदेशात खाद्यपदार्थांचे निरनिराळे अनंत प्रकार आहेत आणि जवळीक असल्यामुळे ते खायची संधी खूप वेळा मिळते. त्याबद्दल लिहायचे झाल्यास वेगळी लेखमालिका लिहावी लागेल. एका ढकलपत्रासोबत मला खाद्यमय भारताचा एक नकाशा मिळाला. तो पाहतांना त्या त्या भागात गेलो असतांना चाखलेल्या पदार्थांची आठवण ताजी झाली. काही लोक परप्रांतात किंवा परदेशात प्रवासाला गेल्यावर तिथे सुध्दा भारतीय (शक्य असल्यास महाराष्ट्रीय) जेवण कुठे मिळेल याचा तपास घेत राहतात. मी तसा प्रयत्न करत नाही. आपल्या ओळखीचे भोजन सहजच मिळाले तर ठीक आहे, पण शक्य तोंवर स्थानिक पदार्थ निदान चाखून तरी पाहण्यात मला रस असतो. त्यातले काही आवडतात, तर काही गिळवत नाहीत. या प्रयोगांमधून माझी खाद्यसंस्कृती समृध्द होत गेली.

दिवाळी म्हणजे लाडू, करंज्या, चिवडा, शेव, चकल्या, कडबोळी, अनारसे, चिरोटे वगैरे वगैरे फराळाचे पदार्थ हे समीकरण लहानपणी मनात पक्के बसले होते. दिवाळीच्या तीन चार दिवस आधीच घरोघरी त्यांचे कारखाने सुरू होत असत. आताच्या पिढीला कदाचित त्यात फारसे स्वारस्य वाटत नसावे. ओव्हनमधून निघालेल्या गरम गरम पिझ्झा बर्गर वगैरेंपुढे डब्यातून काढलेले हे फराळाचे टिकाऊ पदार्थ तितकेसे आकर्षक वाटत नाहीत. शिवाय चितळे बंधू, गोडबोले ब्रदर्स वगैरे मंडळी ते पदार्थ छान पॅकबंद करून पुरवत असल्यामुळे रेडीमेड खरेदी करण्याकडेच बहुतेक सर्वांचा कल दिसतो. काही मंडळींनी दिवाळीच्या सुटीत बाहेर गावी भ्रमंती करून यायचे बेत रचलेले असतील. त्यांना भ्रमंतीबरोबरच खाद्यंतीचाही अनुभव घेण्यास मदत मिळावी म्हणून मी तो नकाळा वर दिला आहे. त्यांनी परत आल्यावर सांगण्यासाठी तरी ते चाखून पहायला हरकत नसावी.

No comments: