Thursday, October 27, 2011

यंत्रे तयार करणारी यंत्रे



कापड, भांडी, कागद वगैरे साध्या गोष्टींपासून ते फ्रिज, टीव्ही, काँप्यूटर वगैरेपर्यंत घरात, ऑफिसात किंवा दुकानात आजकाल दिसणार्‍या बहुतांश वस्तू निरनिराळ्या यंत्रांद्वारे कारखान्यांमध्ये निर्माण केलेल्या असतात. त्या कारखान्यांमधली ही यंत्रे कशा प्रकारची असतात, ती कशी चालतात, वगैरेंबद्दल सर्वसामान्य माणसांना काही कल्पना नसते. त्याच्याही पलीकडे जाऊन ही यंत्रे कशी निर्माण केली जात असतील हा विचार सहसा कोणाच्याच मनात येत नसेल. पण मला मात्र लहानपणापासून अशा प्रकारचे खूप कुतूहल होते. साबण, बल्ब, चमचा असल्या रोजच्या वापरातल्या वस्तू कशापासून आणि कशा तयार करतात असले प्रश्न विचारून मी मोठ्यांना भंडावत असे. कारखान्यांमध्ये त्यांची मशिने असतात असे मोघम उत्तर मिळे. मशीन किंवा यंत्र म्हणजे काही तरी अगडबंब धूड असेल, खडखडाट करीत वेगाने फिरणारी अनेक चक्रे त्यात असतील, त्यातून धूर, वाफ, उग्र वास असे काही भयानक निघत असेल आणि त्याच्या जवळ गेल्यास आपल्याला कदाचित दुखापत होईल, चटका बसेल, कपडे तर नक्कीच घाण होतील असा सार्वत्रिक समज होता. त्यामुळे शहाण्या माणसाने कसल्याही प्रकारच्या यंत्राच्या जवळपास फिरकू नये असे लोकांना वाटत असे. त्या काळात घड्याळ, रेडिओ वगैरेंची गणना 'यंत्र' या सदरात केली जात नव्हती. त्यांच्याखेरीज आमच्या घरात आपल्या आप चालणारे कोणतेही यंत्र नव्हते. साधा विजेचा पंखासुध्दा नव्हता. मिक्सर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, वगैरेंतले काहीसुध्दा ठाऊक नव्हते. पिठाची गिरणी हे माझ्या पाहण्यातले एकमेव 'यंत्र' होते. त्या चक्कीतून भुरूभुरू निघणा-या पिठाप्रमाणेच साखरेचे दाणे, साबणाच्या वड्या, पेन्सिली, ताटे, वाट्या वगैरेसुध्दा त्यांच्या त्यांच्या यंत्रांमधून बदाबदा खाली पडत आहेत असे एक काल्पनिक दृष्य त्या वेळी माझ्या डोळ्यासमोर येत असे. ते तसे अगदीच चुकीचे नव्हते. लहानपणी कोठलेही यंत्र जवळून पाहिलेले नसतांनातासुध्दा कुतूहलापोटी माझ्या मनात यंत्रांच्याबद्दल ओढ निर्माण झाली होती. सुदैवाने मला पुढील आयुष्यात अनेक प्रकारची अद्ययावत यंत्रे पहायला मिळालीच, पण तशी खास यंत्रे तयार करवून घेणे हेच माझे मुख्य काम झाले. त्यामुळे यंत्रे तयार करणा-या यंत्रांची ओळख झाली आणि गट्टी जमत गेली.

यंत्रांचे विविध प्रकार आजकाल जन्माला येण्याच्या आधीपासून बालकाची सोनोग्राफीने तपासणी होणे सुरू होते. आरोग्याचे परीक्षण, विकाराचे निदान आणि त्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी आता यंत्रांची मदत घेतली जातेच, चांगले आरोग्य राखण्यासाठी व्यायामसुध्दा जिममधील यंत्रांच्या सहाय्याने केला जातो. आवश्यकता पडल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण आणि रक्ताचे शुध्दीकरण यांच्यासाठीसुध्दा यांत्रिक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आणि शिक्षण, प्रवास, कला, क्रीडा, मनोरंजन वगैरे सर्वच बाबतींतील असंख्य प्रकारच्या वस्तू आणि सेवा पुरवण्यासाठी आज यंत्रांचा उपयोग केला जातो. पाणी आणि हवा या नैसर्गिक गोष्टीसुध्दा आपल्याला हव्या तशा मिळवण्यासाठी आता यंत्रांची कास धरली जाते. मुठीत धरता येण्याजोग्या घड्याळापासून ते प्रचंड इमारतींच्या बांधकामाच्या जागी दिसणार्‍या अगडबंब जायंट क्रेन्सपर्यंत अनेक प्रकारची आणि विविध आकारांची यंत्रे आता आपल्याला जाता येता दिसत असतात.

साखरेच्या कारखान्यात उसापासून साखर तयार होईपर्यंत अनेक प्रक्रिया केल्या जातात. उसाचे मोठेमोठे तुकडे होतात, त्यांचे बारीक तुकडे करून त्यांना चेचून त्यातला रस बाहेर काढतात, रस आणि चोथा वेगळा करतात, उसाच्या रसात काही रसायने मिसळून त्यांना वेगाने घुसळल्यावर त्यातून मळी बाहेर निघते. स्वच्छ रस तापवून त्यातल्या पाण्याची वाफ करून तिला वेगळे करतात आणि अखेरच्या टप्प्यात त्या दाट झालेल्या द्रावापासून साखरेचे दाणे तयार होऊन घरंगळत बाहेर पडतात. या सगळ्या प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये केल्या जातात आणि त्यासाठी निरनिराळ्या प्रकारची यंत्रे लागतात. शिवाय मागील टप्प्यावरून पदार्थ पुढील टप्प्याकडे वाहून नेण्याचे कामसुध्दा खास यंत्रांकरवीच (कन्व्हेयर्सने) केले जाते. या सगळ्या प्रकारच्या यंत्रांची निर्मिती करण्याचा एक मोठा उद्योग उभा राहिला आहे. या उद्योगातील यंत्रांना मशीन टूल्स असे म्हणतात.
कोणतेही यंत्र आकाराने लहान असो किंवा मोठे असो, त्याची विशिष्ट रचना असते. एका दणकट सांगाड्याच्या आत इतर अनेक सुटे भाग बसवून एकमेकांमध्ये गुंतवलेले असतात. हे भाग मुख्यतः निरनिराळ्या आकाराची चक्रे किंवा तरफा असतात. चक्रे गोल फिरतात आणि तरफांचे दांडे खाली वर किंवा मागे पुढे सरकत असतात. त्यांच्या या सतत किंवा वारंवार होत असलेल्या हालचालीमधून ईप्सित कार्य साधले जाते. यातले बहुतेक भाग कोणत्या ना कोणत्या धातूपासून तयार केले जातात आणि त्यातही ते प्रामुख्याने लोखंडाच्या वा पोलादाच्या एकाद्या मिश्रधातूचे असतात. या कामासाठी खास प्रकारची प्लास्टिक्स, फायबर ग्लास, कार्बन काँपोझिट्स यासारख्या कृत्रिम पदार्थांचा उपयोग आता सुरू झाला असला तरी अजून तो काही विशिष्ट कामांपुरता मर्यादित आहे. त्यामुळे मशीन टूल्सची निर्मिती ही बहुतांशपणे लोहमिश्रित धातूंपासून होते. त्यामधील भागांना (पार्ट्सना) त्यांचा विशिष्ट आकार देणे हे त्या निर्मितीच्या क्रियेमधील मुख्य काम असते. आपल्याला ज्या प्रकारचे काम यंत्राकडून करवून घ्यायचे आहे त्यानुसार आधी त्याचा एक ढोबळ आराखडा केला जातो. त्या यंत्राकडून ते काम करवून घेण्याच्या दृष्टीने त्यात आवश्यक असणारे भाग आणि त्यांची रचना ठरवली गेल्यानंतर त्या सर्वांची तपशीलवार ड्रॉइंग्ज तयार होतात आणि त्यानुसार ते यंत्र तयार करण्याचे काम केले जाते.

यंत्रे तयार करणार्‍या कारखान्यांमध्ये अनेक विभाग असतात. फॅब्रिकेशन शॉप, मशीन शॉप, हीट ट्रीटमेंट फॅसिलिटी, असेंब्ली शॉप वगैरे त्यातले मुख्य विभाग आहेत. मोठ्या यंत्रांचे सांगाडे फॅब्रिकेशन शॉपमध्ये तयार होतात. पोलादाच्या जाड प्लेट्सना ऑक्सीऍसिटिलीनसारख्या प्रखर धगीच्या ज्वालेने कापून हव्या त्या आकाराचे तुकडे केले जातात. सरळ रेषेतील चौकोनी किंवा वर्तुळाकार आकाराचे तुकडे करण्याची सोय यात असतेच, पण एकादा वाकडा तिकडा भाग, हवा असेल तर अगदी भारताचा नकाशासुध्दा प्लेटमधून बरोबर कापण्याची सोय त्या यंत्रात असते. शिंपी ज्याप्रमाणे कपडे बेतून त्यासाठी कापडावर रेघा मारून कटिंग करतात तशाच स्वरूपाचे काम या विभागात लोखंडाच्या प्लेट्सवर केले जाते. कापलेले हे तुकडे वेल्डिंगने एकमेकांना जोडून सांगाडा तयार केला जातो. जे तुकडे एकमेकांना जोडायचे असतात त्यांच्या कडा वेल्डिंगच्या क्रियेत अत्यंत प्रखर अशा विजेच्या ठिणगीद्वारे (आर्कने) वितळवल्या जातात. वितळलेले धातू एकमेकांत मिसळून एकसंध होतात आणि थंड झाल्यावर सुध्दा एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. पूर्वीच्या काळी यंत्रांचे सांगाडे भट्टी(फाउंड्री)मध्ये ओतीव काम (कास्टिंग) करून तयार करण्यावर भर दिला जात होता, आजकाल त्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. पातळ पत्र्यांना वाकवून किंवा प्रेसमध्ये साच्यावर ठोकून हवा तसा आकार दिला जातो. मोटारीचा बाहेरचा आकार, दरवाजे वगैरे पत्र्याचे भाग अशा प्रकारे तयार करतात.

धातूच्या वस्तूंना निरनिराळे आकार देण्यासाठी मशीन शॉपमध्ये अनेक प्रकारांची यंत्रे असतात. त्यामधील लेथ या प्रकारात जॉब स्वतःभोवती फिरत असतो आणि त्याला तीक्ष्ण असे टूल लावून त्याची सोलपटे काढली जातात. काही अंशी कुंभाराच्या चाकाचाच लेथ हा अवतार असतो. कुंभाराच्या चाकावर फिरत असलेल्या मातीच्या गोळ्याला हाताच्या बोटांनी दाबून तो आकार देतो, लेथमध्ये ते काम धारदार हत्यार करते. पण काही अपवाद वगळता लेथमधील चाकाचा आंस आडवा असतो, तर कुंभाराचे चाकच नेहमी आडवे असते आणि उभ्या आंसाभोवती फिरते. मिलिंग मशीनमध्ये कार्यवस्तू (जॉब) स्थिर असते आणि सुदर्शन चक्रासारखे धारदार चक्र फिरता फिरता त्याची सोलपटे काढते. ड्रिलमध्ये सुध्दा जॉब स्थिर असतो आणि फिरणा-या चाकाच्या दांड्याच्या अग्रभागी असलेले ड्रिल त्यात भोक पाडते. हे यंत्र बहुतेकांनी घरातील भिंतीवर खिळे ठोकण्यासाठी वापरतांना पाहिले असेल. बोअरिंग मशीन मिलिंग मशीनसारखेच असते, पण यात सुदर्शन चक्र लावता येते त्याचप्रमाणे लेथसारखे सरळ हत्यार किंवा ड्रिलसारखे भोक पाडणारे अस्त्रसुध्दा बसवता येते. शेपिंग मशीनमधील हत्यार सरळ रेषेत मागे पुढे सरकून सोलपटे काढते. याचे काम सुताराच्या रंध्यासारखे असते. प्लेनिंग मशीनमध्येसुध्दा हेच काम अशाच प्रकारे होते, पण यात हत्यार स्थिर असते आणि जॉब पुढे मागे सरकत असतो. या मुख्य यंत्रांच्या आणि हत्यारांच्या संयोगातून त्यांचे अनंत प्रकार बनवले जातात. ज्या कामात अतीशय सफाई आणि गुळगुळीतपणा यांची आवश्यकता असते त्यात शेवटी ग्राइंडिंग केले जाते. विळी, चाकू, कात्री यांना धार लावण्याचे काम ग्राइंडिंगनेच होते. यातील हत्यार हे अत्यंत कठीण अशा दगडाचे चक्र असते आणि ते खूप वेगाने फिरून लोखंडाचा सूक्ष्म आकाराचा भुगा काढते. अशा प्रकारच्या यंत्रांद्वारे यंत्रांची चाके, दांडे वगैरे सर्व प्रकारचे भाग त्यांच्या आकारानुसार तयार केले जातात.
ऊष्णउपचार (हीट ट्रीटमेंट) विभागात लहान मोठ्या आकाराच्या भट्ट्या असतात. पोलादाच्या मिश्रधातूंना विशिष्ट तपमानापर्यंत तापवले आणि पाण्यात किंवा विशिष्ट प्रकारच्या तेलात बुडवून त्वरेने थंड केल्यास त्याचे काठिण्य (हार्डनेस) वाढते. इतिहासकाळात या तंत्राचा वापर करून तलवारींना पाणी दिले जात असे आणि त्यानंतर कानसाने व दगडावर घासून धार दिली तर ती लढाईत बोथट होत नसे. यंत्रांचे गीअरसारखे भाग घर्षणाने लवकर झिजू नयेत यासाठी त्यांचेवर ऊष्णोपचार करून त्यांना मजबूत केले जाते.

जोडणी खात्यात (असेंब्ली शॉपमध्ये) सर्व सुटे भाग एकमेकांना जोडले जातात आणि नट बोल्ट स्क्रू वगैरेनी घट्ट कसून त्यांची जोडणी केली जाते. त्यापूर्वी प्रत्येक भागाचे सूक्ष्म निरीक्षण परीक्षण (इन्पेक्शन टेस्टिंग) करून झालेले असते. जोडणी करतांना त्यांची अत्यंत काळजीपूर्वक तपासणी करून ते एकमेकांना साजेसे असल्याची खात्री करून घेतली जाते. यंत्रामधील फिरणारे किंवा मागे पुढे सरकणारे भाग घट्ट बसले तर अडकतील, आवश्यक त्या हालचाली करणार नाहीत आणि ते भाग जास्तच सैल असतील तर थरथरतील (व्हायब्रेट होतील), आपल्या जागा सोडून किंचित बाजूला सरकतील, त्यामुळे यंत्राचे काम अचूकपणे होणार नाही. या दोन्ही गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेतली जाते.

जो़डणी केलेले यंत्र परीक्षण विभागात चालवून पाहिले जाते. ते योग्य प्रकारे काम करते याची खात्री करून घेतली जाते. काही यंत्रांच्या बाबतीत त्यापूर्वी आणि काहींच्या बाबतीत सर्वात अखेरीस त्यांची साफसफाई आणि रंगकाम करून त्याला आकर्षक रूप दिले जाते. यंत्रांच्या आकारानुसार तयार करून ठेवलेल्या खोक्यांमध्ये ठेऊन सीलबंद केले जाते. काही महाकाय यंत्रे ट्रक किंवा ट्रेलरवर मावत नाहीत. अशा वेळी संपूर्ण यंत्र एकत्र न पाठवता त्याच्या भागांची ढोबळ विभागणी केली जाते आणि ज्या कारखान्यात ते यंत्र बसवायचे असेल त्या ठिकाणी ते भाग पुन्हा एकमेकांना जोडून ते यंत्र उभे केले जाते.

या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्याचा थोडासा परिचय करून देण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे.



Tuesday, October 25, 2011

गुणवत्ता, दर्जा, स्तर, प्रत ...... आणि क्वालिटी!

निरनिराळ्या सरकारी किंवा खाजगी संस्थांच्या 'गुणवत्ता नियंत्रण' प्रभागात कार्यरत असलेल्या लोकांशी माझा मराठी किंवा हिंदी भाषांमध्ये शेकडो वेळा वार्तालाप झाला असेल, पण त्यातल्या एकानेही एकही वेळा 'गुणवत्ता' या शब्दाचा उच्चार केला नाही. हा शब्द अजून कोणाच्या ओठावर बसलेला दिसत नाही. दर्जा, प्रत, स्तर वगैरे शब्द कधी कधी कानावर पडतात किंवा बोलण्यात येतात, पण त्या वेळी त्यांचा अर्थ काहीसा मर्यादित असतो. 'क्वालिटी' हा शब्द कानावर पडला नाही किंवा बोलण्यात आला नाही असा मात्र एकही दिवस जात नाही, इतका तो आपल्या ओळखीचा झाला आहे. बाजारातला माल, भोजनालयातले खाद्यपदार्थ किंवा ते पुरवण्याची सेवा, शाळांमधले शिक्षण, शिक्षक किंवा व्यवस्थापन, प्रवासाची वाहने, त्यामधील सोयी आणि त्यांची नियमितता, चित्रपटांमधील कथा, संवाद, अभिनय, संगीत, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण वगैरे वगैरे आपल्या रोजच्या जीवनात समोर आलेल्या सगळ्याच बाबींच्या बाबतीत बोलतांना आपण त्यांच्या गुणवत्तेवर भाष्य करत असतो. इतकेच काय 'स्टॅन्डर्ड ऑफ लिव्हिंग' बरोबरच 'क्वालिटी ऑफ लाइफ' हा सुद्धा आपल्या चर्चेचा विषय असतो. 'क्वालिटी' हा शब्द आता आपल्या मनात इतका मुरला आहे. या लेखात मी मुख्यतः 'गुणवत्ता' हा अप्रचलित मराठी शब्द वापरला असला तरी त्यातून 'क्वालिटी' या रोजच्या वापरातील शब्दाचा व्यापक अर्थच मला अभिप्रेत आहे.

कळायला लागल्यापासून आपण आजूबाजूच्या जगाचे अवलोकन करत असतांनाच त्याचे मूल्यमापनसुद्धा करतच असतो. 'चांगले-वाईट', 'सुंदर-कुरूप', 'उत्तम-अधम', 'मंजुळ-कर्कश', गोड-कडू, 'छान-टाकाऊ', 'मस्त-भिकार' वगैरे शेरे मारत असतो. जीवनाच्या सर्व क्षेत्रात हे चालत असले तरी 'गुणवत्ता नियमन', 'गुणवत्ता हमी', 'गुणवत्ता व्यवस्थापन' (क्वालिटी कंट्रोल, अ‍ॅशुरन्स, मॅनेजमेंट) वगैरेंच्या द्वारे त्याचा सविस्तर शास्त्रशुद्ध अभ्यास आणि व्यावहारिक उपयोग, अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आधी सुरू झाला. त्याच्या तत्त्वांची अंमलबजावणी आता इतर क्षेत्रांमध्ये व्हायला लागली आहे. त्यामुळे या विषयामधील तांत्रिक क्षेत्रांमधील मूळ संकल्पना रोजच्या जीवनातल्या उदाहरणांच्या द्वारे मांडण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

'गुणवत्ता' या शब्दाची अनंत प्रकाराने व्याख्या करण्यात आली आहे. गुणवत्ता ही मुख्यतः संवेदनात्मक, परावलंबी आणि सापेक्ष (पर्सेप्च्युअल, कंडीशनल आणि सब्जेक्टिव्ह) अशी संकल्पना आहे. एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीची गुणवत्ता बहुतेक प्रसंगी दुसरा कोणी ठरवत असतो त्यामुळे ती असण्यापेक्षा ठरवणार्‍याला ती भासणे जास्त महत्त्वाचे असते, त्याला फक्त चांगली बाजूच दिसली वा महत्त्वाची वाटली तर तो स्तुती करेल, सुमार बाजू दिसली किंवा जास्त महत्त्वाची वाटली तर त्याला ती वस्तू सुमार वाटेल. एखाद्या नवर्‍याने मन लावून पातळ चपात्या लाटल्या आणि त्यांना व्यवस्थित भाजल्या तर अन्न या दृष्टीने त्याने उत्तम उत्पादन केलेले असते, पण बायको मात्र त्यांचा आकार आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया खंडासारखा झाला आहे यावरच त्याची टिंगल करेल हा अनुभव अनेकांना असेल. गुणवत्ता ही स्वयंभू नसून दुसर्‍या कोणत्या तरी गुणांच्या आधारावर ठरवली जाते. एखादी वस्तू सुंदर, आकर्षक, मुलायम, चमत्कृतीपूर्ण, टिकाऊ, दुर्मिळ वगैरेपैकी काही गुणांनी युक्त असेल तर त्या गुणांच्या आधारावर त्या वस्तूची गुणवत्ता उच्च दर्जाची मानली जाते. तिला स्वतःचे असे अस्तित्व नसते. अखेर गुणवत्ता ही अर्थातच ठरवणार्‍याच्या आवडी निवडीवर व पूर्वानुभवावर अवलंबून असल्याने एकाच वस्तूबद्दल निरनिराळ्या लोकांची मते वेगवेगळी असू शकतात. यात सुसूत्रपणा आणण्यासाठी काही विद्वानांची मते सर्वानुमते ग्राह्य ठरवली गेली आहेत.
संवर्णनाशी सारूप्यता (Conformance to specifications) ही व्याख्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वसाधारणपणे मान्य केली जाते. एखादी इमारत असो किंवा यंत्राचा भाग असो, त्याची सविस्तर रेखाचित्रे (ड्रॉइंग्ज) काढून त्यात संपूर्ण तपशील दाखवतात. त्यातील प्रत्येक विभागाची लांबी, रुंदी, उंची, जाडी, खोली वगैरे एकूण एक मापे त्यात दाखवली जातात तसेच प्रत्येक मापाची मोजणी जास्तीत जास्त आणि कमीत कमी केवढी असायला हवी ते दिलेले असते. इमारतीच्या बाबतीत तसूभर फरकसुद्धा कधी कधी मान्य होण्यासारखा नसतो आणि काही यंत्रांच्या बाबतीत एका मिलिमीटरचा हजारावा भाग (एक मायक्रॉन) इतक्या सूक्ष्म परिमाणामध्ये ते माप (डायमेन्शन) दाखवले जाते. याशिवाय कोणकोणता कच्चा माल वापरायचे हे ठरवले जाते, त्यांचे रासायनिक पृथक्करण केल्यावर त्यात कोणकोणती मूलद्रव्ये (केमिकल काँपोजिशन) किती प्रमाणात हवीत, त्यांचे कोणते गुणधर्म किती मर्यादेत असायला हवेत, त्यासाठी कोणकोणत्या चाचण्या (टेस्टिंग) करून घेणे आवश्यक आहे वगैरे वगैरे, अनेक नियमांचा समावेश असलेला संवर्णनाचा दस्तऐवज (स्पेसिफिकेशन) तयार केलेला असतो. यांच्या बरहुकूम तयार केलेले उत्पादन गुणवत्तापूर्ण असते. उत्पादकांच्या दृष्टीने सुद्धा ही व्याख्या उपयुक्त आहे. कोणत्या वस्तूचे उत्पादन कसे करायचे हे ठरवले, त्यासाठी लागणारा कच्चा माल नीट तपासून घेतला, त्यावर केल्या जाणार्‍या प्रक्रिया काळजीपूर्वक रीतीने केल्यानंतर अपेक्षित असलेली गुणवत्ता मिळावी अशी अपेक्षा असते. तयार झालेल्या उत्पादनाची अखेरची तपासणी करतांना त्यात काही त्रुटी आढळल्यास त्या सुधारल्या जातात, तसेच त्या कोणत्या कारणांमुळे आल्या याचे विश्लेषण करून ती कारणे दूर केली तर पुढील उत्पादन अधिक चांगल्या दर्जाचे होऊ शकते. अशा कारणांमुळे गुणवत्तेची ही व्याख्या तंत्रज्ञांमध्ये मानली जाते. या व्याख्येनुसार निरीक्षण आणि परीक्षण (इन्पेक्शन आणि टेस्टिंग) या द्वारे गुणवत्ता निर्विवादपणे ठरवणे शक्य असल्यामुळे खरेदी विक्रीचे करार करण्यासाठी हीच व्याख्या सोयिस्कर असते.

माझ्या व्यावसायिक जीवनाच्या पहिल्या दिवसापासून आजतागायत निरनिराळ्या यंत्रांसाठी करण्यात येणारे आरेखन आणि संवर्णन यांच्याशी माझा घनिष्ठ संबंध आला असल्यामुळे गुणवत्तेची ही व्याख्या माझ्या चांगल्या परिचयाची आहे.पण वैयक्तिक जीवनातली गोष्ट मात्र नेहमीच वेगळी असायची. कोणतीही खरेदी करण्यासाठी बाजारात जातांना आपण त्याचे आरेखन, संवर्णन वगैरे दस्तऐवज आपल्या सोबत घेऊन जात नाही. आपल्याला काय विकत घ्यायचे आहे आणि ते कशासाठी घ्यायला हवे, त्याचा आपल्याला काय उपयोग आहे, त्या खरेदीमागे आपला कोणता उद्देश आहे, त्यासाठी किती किंमत मोजण्याची आपली तयारी किंवा क्षमता आहे एवढा विचार करून फक्त तेवढ्यानिशी आपण बाजारात जातो. उदाहरणार्थ आपल्या रोजच्या उपयोगासाठी पेन हवे असल्यास ते कसे चालते हे आपण कागदावर रेघोट्या मारून पाहतो, ते आपल्या खिशात मावेल, क्लिपने अडकवता येईल हे पाहतो आणि किंमत पाहून त्याची निवड करतो. कोणाला भेटवस्तू म्हणून पेन विकत घ्यायचे असल्यास या गोष्टींपेक्षा त्या पेनचे आणि ते ठेवण्याच्या डबीचे सौंदर्य पाहून निवड करतो. या गुणांसाठी जास्त किंमत मोजतो. कधी कधी तर बाजारात आलेली वस्तू पाहिल्यानंतर त्याबद्दल विचार करतो.

बाजारातील वस्तूची गुणवत्ता ठरवतांना ती वस्तू त्याच्या आरेखनानुरूप आणि संवर्णनानुसार बनलेली आहे की नाही हे समजण्याचा मार्गच आपल्याकडे सहसा उपलब्ध नसतो. त्यामुळे ती वस्तू विकत घेण्यामागे आपला कोणता उद्देश आहे आणि तो कितपत सफळ होण्याची शक्यता किंवा खात्री आहे यावरून आपण तिची गुणवत्ता ठरवतो. संभाव्य उपयोगासाठी लायकी (Fitness for intended use) अशी गुणवत्तेची व्याख्या या क्षेत्रामधील भीष्मपितामह डॉ.जुरान यांनी केली आहे. उपभोक्त्याच्या दृष्टीने हीच गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची असते. कोणतीही वस्तू विकत घेण्याआधी तो तिच्या उपयुक्ततेचा विचार करतो. अमक्या तमक्या हलवायाची मिठाई अतिशय उच्च दर्जाची म्हणून सुप्रसिद्ध असेल, त्यात ताजे शुद्ध तूप, निवडक बदाम, पिस्ते वगैरे घातले असतील, त्याची चव अवर्णनीय असेल पण मधुमेह, हृदयविकार वगैरेमुळे ग्राहकाला साखर आणि स्निग्ध पदार्थ खाणे वर्ज्य असेल तर त्या मिठाईचा त्याला काय उपयोग? ढाक्याची अतिशय तलम मलमल एका काळी सर्व जगात सर्वोत्कृष्ट मानली जात असे, कदाचित अजूनही असेल, पण स्वीडनच्या थंडगार वातावरणात ती कोण विकत घेईल? त्या प्रदेशात लोकरीचे जाडजूड कापडच उपयोगी पडते. त्यालाच चांगले मानले जाते.
उत्पादक आणि उपभोक्ता जर एकमेकांना भेटून उत्पादनासंबंधी ठरवत असतील तर उत्पादनाची गुणवत्ता वरील व्याख्येनुसार राखणे शक्य असते. उदाहरणार्थ आपण शिंप्याकडे कपडे शिवायला टाकतांना आपल्याला काय काय पाहिजे ते त्याला सांगतो. आपल्याला तंग कपडे पाहिजेत की ढगळे, पायघोळ की आखूड वगैरे आपल्या सांगण्याप्रमाणे तो आपल्या कपड्यांची मापे घेतो, कॉलर किंवा बेल्ट कशा प्रकारचे पाहिजेत, कोणत्या आकाराचे किती खिसे पाहिजेत वगैरे सारा तपशील तो लिहून घेतो. तंतोतंत, त्यानुसार त्याने आपले कपडे वेळेवर शिवून दिले तर आपण खूश होतो, त्याला शाबासकी देतो पण त्याने त्यात गफलत केली, त्याच्या हलगर्जीमुळे कपड्यांना डाग पडले किंवा त्याने कपडे नेण्यासाठी आपल्याला अनेक हेलपाटे घालायला लावले तर तो आपल्या नजरेतून उतरतो. काही वेळा असे होते की आपल्याला त्याचा एखादा गुण आवडतो आणि त्या बाबतीत आपण त्याला उच्च गुणवत्ता बहाल करतो. समजा माझ्या मुलाच्या लग्नात घालून मिरवण्यासाठी मला सूट शिवायचा असेल तर तो उत्कृष्ट प्रतीचा असणे आवश्यक आहे. त्यासाठी विकत घेतलेले महाग कापड वाया जाऊ नये अशी माझी इच्छा असते. अशा वेळी मी सुबक कारागिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुशल शिंप्याकडे दोन महिने आधीच जाईन. शिलाईच्या कामासाठी त्याला हवा तेवढा अवधी देईन, त्याला घाई करणार नाही. तेवढ्या काळात माझ्या देहाचा आकार बदलणार नाही इकडे जरा जास्त लक्ष देईन. कपडे मिळण्यासाठी दोन तीन खेटे घालावे लागले तरी ते चालवून घेईन. पण लग्नाला दोन दिवस असतांना माझ्या असे लक्षात आले की आपल्याकडल्या, झोपायच्या वेळी घालायच्या कपड्यांची अवस्था काही ठीक दिसत नाही. चार पाहुण्यांच्या समोर ते बरे दिसणार नाहीत. आता मला त्यासाठी नवे कपडे तातडीने हवे आहेत, पण माझ्याकडे मुळीच वेळ नाही. अशा प्रसंगी मी घराच्या शेजारील दुकानातल्या नवशिक्या शिंप्याला बोलावणे पाठवीन. तोच माझ्या घरी येऊन मापे घेऊन कपडे शिवून दुसरे दिवशी घरी आणून देईल. या कामासाठी तत्परता आणि विश्वासार्हता या बाबतीतली त्याची गुणवत्ता मला अधिक महत्त्वाची वाटेल.

यंत्रयुगाच्या काळात सर्व वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले आणि उत्पादक व उपभोक्ता यांचा थेट संबंध येणे कमी होत गेले. आज आपण बाजारातून ज्या वस्तू विकत घेतो त्या नक्की कोणत्या ठिकाणी असलेल्या कारखान्यात तयार झाल्या आहेत हे सहसा आपल्याला समजत नाही. एखाद्या मोठ्या उद्योगाच्या नावाचा बिल्ला (लेबल) त्यावर लावला असला तर निदान ते नाव आपल्या ऐकीवात असते, पण आपल्या नावाची कोणी व्यक्ती त्याची ग्राहक आहे हे त्या उत्पादकाला माहीत असण्याची सुतराम शक्यता नसते. त्यापुढे जाऊन आपल्याला कशाची गरज आहे किंवा आपण ती वस्तू कशासाठी विकत घेत आहोत ते त्याला कसे समजणार? आणि त्यानुसार तो आपल्या उत्पादनाची गुणवत्ता कशी राखणार?हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काही मार्ग काढले. सध्या कोणत्या वस्तूचे कोण ग्राहक आहेत, त्यांच्या कोणत्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा असतात, त्या किती प्रमाणात पूर्ण होतात, ते ग्राहक समाधानी आहेत का वगैरे प्रश्नावली घेऊन निरीक्षणे (सर्व्हे) केली जातात. जे लोक सध्या त्या उत्पादनाचे ग्राहक नाहीत त्यांना आकर्षित करण्यासाठी त्या वस्तूला आणखी कोणते गुण चिकटवायला हवेत अशा विचारांची सुद्धा पाहणी होते.

हे काम करणार्‍या खास संस्थाच उभ्या राहिल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीची नसतील पण समाजाची किंवा व्यक्तींच्या समूहांची मते, आवडी निवडी, पसंती, प्राधान्य वगैरे अनेक गोष्टी यातून समजतात. सर्वसामान्य ग्राहकाची फसवणूक किंवा अपेक्षाभंग होऊ नये यासाठी विशिष्ट उत्पादनांचे दर्जामानांकन (Standardization सर्वमान्यता, सर्वमतसिद्धता) केले जाते. हे काम करण्यासाठी आयएसए (इंडियन स्टॅंडर्डस्‌ असोशिएशन) सारख्या देशादेशांमधील राष्ट्रीय संस्था स्थापन झाल्या आहेत. आयएसओ (इंटरनॅशनल स्टॅंडर्डस् ऑर्गनायझेशन) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. गुणवत्ता व्यवस्थापन या विषयावरसुद्धा या संस्थेने मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार गुणवत्तेची व्याख्या अशी केली आहे...

"The totality of features and characteristics of a product or service that bears on its ability to satisfy stated or implied needs"
एखादे उत्पादन किंवा सेवा यांची व्यक्त किंवा अव्यक्त गरजांची पूर्तता करण्याची क्षमता ज्यामुळे प्रभावित होते असे सर्व गुणधर्म म्हणजे त्याची गुणवत्ता.
ही लांबलचक व्याख्या करण्यात नक्कीच एखाद्या कायदेपंडिताचा सहभाग असणार. न्यायालयातले विरुद्ध पक्षांचे वकील त्याच कायद्याचा आपापल्या अशिलाच्या दृष्टीने वेगळा अर्थ लावतात हे आपण पाहतोच. तसेच या बाबतीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सर्वसाधारण उपभोक्ता किंवा उत्पादक यांना आपले उद्योग व्यवसाय सोडून कज्जे खटले चालवण्यात स्वारस्य नसते. त्यामुळे दोघेही त्याचा ढोबळ अर्थ घेतात आणि त्याला सर्वसंमती असते. थोडक्यात म्हणजे कोणतेही उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी ते कशासाठी वापरावे आणि ते वापरतांना कोणती काळजी घ्यावी हे उत्पादक स्पष्ट करतो आणि तो उद्देश सफल होत आहे याची चाचणी करून खात्री करून घेतो. यासाठी कोणकोणती परीक्षणे करून त्यांचे निष्कर्ष काढावेत हे दर्जामानांकन करतांना ठरवलेले असते. त्यामुळे उपभोक्त्याला त्याची माहिती आणि मार्गदर्शन मिळते आणि त्याला आपल्या गरजा पुरवून घेता येतात, त्याचा अपेक्षाभंग होत नाही.

गुणवत्ता या शब्दाच्या याखेरीज काही मनोरंजक आणि उद्बोधक अशा व्याख्या करण्यात आल्या आहेत.

सुप्रसिद्ध जपानी तज्ज्ञ तागुची म्हणतात, "ध्येयाच्या निकट राहणे Uniformity around a target value." एखाद्या वस्तूच्या उत्पादनामधील गुणवत्तेच्या सातत्याचा विचार यात आहे.

पीटर ड्रकरचे म्हणणे आहे, "वस्तूचा किंवा सेवेचा पुरवठा करणारा त्यात गुणवत्ता घालत नाही, ग्राहक त्यातून जे प्राप्त करून घेतो आणि ज्यासाठी मूल्य चुकवतो ती गुणवत्ता Quality in a product or service is not what the supplier puts in. It is what the customer gets out and is willing to pay for."
वीनबर्गच्या मते गुणवत्ता म्हणजे मूल्य "Value (for money)"

डॉ.डेमिंगच्या मते ग्राहकाचे समाधान करणे पुरेसे नाही, त्याला आनंद मिळायला हवा "A step further in delighting the customer"
हेन्री फोर्ड यांनी सांगितले, "जेंव्हा कोणीही पाहत नसतांनासुध्दा योग्य तेच करणे म्हणजे गुणवत्ता (काम करणार्‍याच्या अंगात ती इतकी भिनली पाहिजे) Quality means doing it right when no one is looking"
गुणवत्तेची एक मार्मिक व्याख्या अशी सुद्धा आहे "जर ग्राहक परत येत असेल आणि उत्पादन परत येत  नसेल!"

आता या लेखाची गुणवत्ता किती आहे ते अखेर वाचकांनीच ठरवायचे आहे !

Tuesday, October 18, 2011

आंतर भारतीय खाद्यंती



ज्याला खादाडी आवडत नाही असा माणूस सापडणे कठीण ! त्याची गणना मनुष्यप्राण्यात करावी की नाही असा प्रश्न पडेल. त्यात दोन माणसांच्या आवडी तंतोतंत समान असल्या तरच आश्चर्य म्हणावे लागेल. पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना कुंडे कुंडे नवं पयः या संस्कृत सुभाषितानुसार प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी भिन्न असणारच. पण आपापल्या आवडीचे चविष्ट खाद्यपदार्थ खायला मिळाले की कोणाचीही कळी खुलते यात शंका नाही.

जगातील निरनिराळ्या प्रदेशांमध्ये स्थानिक हवामानानुसार वेगवेगळ्या वनस्पती उगवतात, निरनिराळे प्राणी जास्त संख्येने सापडतात. त्यानुसार तिकडील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलत जातात. काही धर्मांमध्ये मांसाहार वर्ज्य करून फक्त शाकाहारच करावा असे नियम केले आहेत. मुख्यतः भारतात हे अधिक प्रमाणात दिसते. पूर्वापारपासून आपला देश सुजलाम् सुफलाम् असल्यामुळे वर्षभर वनस्पतीजन्य अन्न पदार्थ मिळणे शक्य होते. ध्रुवप्रदेशात किंवा वाळवंटात जिथे कसलीच पिके, फळफळावळ उगवतच नाहीत त्यांना जीवंत राहण्यासाठी इतर पशू, पक्षी आणि मासे यांनाच मारून खावे लागते. समशीतोष्ण आणि शीत कटिबंधातील युरोपात वर्षातले काही महिने बर्फाचे साम्राज्य असते तर काही महिने पिके आणि फळाफुलांचा बहर असतो. त्यामुळे त्यांच्या भोजनात दोन्ही प्रकारचे पदार्थ असतात.

भारतातील बहुसंख्य धर्म, जाती जमातींमध्ये मांसाहार वर्ज्य नसला तरी तो कमी प्रमाणात केला जातो. दोन्ही वेळची पोटभर जेवणे आणि इतर वेळचा अल्पोपाहार यात प्रामुख्याने शाकाहारी पदार्थ आणि रुचिपालट म्हणून सामिष पदार्थ असतात. मत्स्यप्रेमी बंगाली लोक याला कदाचित अपवाद असले तरी ते शाकाहारी पदार्थ देखील आवडीने खातात, विशेषतः रोशोगुल्ला, सोंदेश, मिष्टी दोइ यासारख्या बंगाली मिठाया प्रसिध्द झाल्या आहेत. पंजाबी लोक घरात किती वेळा नॉनव्हेज खात असतील याबाबत मला शंका आहे, पण देशाच्या कोठल्याही भागातल्या पंजाबी हॉटेलात जाणारे इतर भाषिक लोक मात्र चिकन मसाला आणि तंदूरी चिकनवर ताव मारतांना दिसतात. गुजरात म्हंटले की फाफडा, गांठिया, ठेपला, पात्रा असले खमंग पदार्थ डोळ्यापुढे येतात. ते इतके लोकप्रिय झाले आहेत की जेवणाच्या गुजराथी थाळीमधील पंधरावीस पदार्थात तीन चार प्रकारचे फरसाण असते आणि दाळ किंवा शाकभाजीपेक्षा त्यांना जास्त मागणी असते. दक्षिण भारतीय पदार्थ म्हणजे इडली आणि दोसा एवढीच समजूत पूर्वी होती. त्यांनी, विशेषतः उडपी हॉटेलवाल्यांनी या प्रकारांना इतके पॉप्युलर केले की देशातील सगळ्या स्थानिक पदार्थांना मागे सारून सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये त्यांनी अव्वल स्थान मिळवले. भाताच्या प्रचंड मोठ्या ढिगा-यात तिखट जाळ सांबार ओतून त्यात तळहातापर्यंत भिजवून चांगला चिखल करायचा आणि त्याचे बोकाणे भसाभसा तोंडात कोंबायचे अशा प्रकारचे त्यांचे जेवण पाहूनच मला पूर्वी कसे तरी व्हायला लागत असे. पण दक्षिणेकडील मोठ्या शहरातील चांगल्या हॉटेलांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या भातांची चंव चाखून पाहिल्यानंतर त्यांच्या भोजनातली विविधता समजली. आता मुंबईतसुध्दा दहा पंधरा प्रकारचे दोसे, उत्तप्पे वगैरे मिळतात.

महाराष्ट्रातच कोकण, देश, मराठवाडा, विदर्भ या प्रदेशात खाद्यपदार्थांचे निरनिराळे अनंत प्रकार आहेत आणि जवळीक असल्यामुळे ते खायची संधी खूप वेळा मिळते. त्याबद्दल लिहायचे झाल्यास वेगळी लेखमालिका लिहावी लागेल. एका ढकलपत्रासोबत मला खाद्यमय भारताचा एक नकाशा मिळाला. तो पाहतांना त्या त्या भागात गेलो असतांना चाखलेल्या पदार्थांची आठवण ताजी झाली. काही लोक परप्रांतात किंवा परदेशात प्रवासाला गेल्यावर तिथे सुध्दा भारतीय (शक्य असल्यास महाराष्ट्रीय) जेवण कुठे मिळेल याचा तपास घेत राहतात. मी तसा प्रयत्न करत नाही. आपल्या ओळखीचे भोजन सहजच मिळाले तर ठीक आहे, पण शक्य तोंवर स्थानिक पदार्थ निदान चाखून तरी पाहण्यात मला रस असतो. त्यातले काही आवडतात, तर काही गिळवत नाहीत. या प्रयोगांमधून माझी खाद्यसंस्कृती समृध्द होत गेली.

दिवाळी म्हणजे लाडू, करंज्या, चिवडा, शेव, चकल्या, कडबोळी, अनारसे, चिरोटे वगैरे वगैरे फराळाचे पदार्थ हे समीकरण लहानपणी मनात पक्के बसले होते. दिवाळीच्या तीन चार दिवस आधीच घरोघरी त्यांचे कारखाने सुरू होत असत. आताच्या पिढीला कदाचित त्यात फारसे स्वारस्य वाटत नसावे. ओव्हनमधून निघालेल्या गरम गरम पिझ्झा बर्गर वगैरेंपुढे डब्यातून काढलेले हे फराळाचे टिकाऊ पदार्थ तितकेसे आकर्षक वाटत नाहीत. शिवाय चितळे बंधू, गोडबोले ब्रदर्स वगैरे मंडळी ते पदार्थ छान पॅकबंद करून पुरवत असल्यामुळे रेडीमेड खरेदी करण्याकडेच बहुतेक सर्वांचा कल दिसतो. काही मंडळींनी दिवाळीच्या सुटीत बाहेर गावी भ्रमंती करून यायचे बेत रचलेले असतील. त्यांना भ्रमंतीबरोबरच खाद्यंतीचाही अनुभव घेण्यास मदत मिळावी म्हणून मी तो नकाळा वर दिला आहे. त्यांनी परत आल्यावर सांगण्यासाठी तरी ते चाखून पहायला हरकत नसावी.

Saturday, October 01, 2011

संध्या छाया

सन १९७५ - आम्ही माझ्या एका ज्येष्ठ आप्तांकडे आग्र्याला गेलो होतो, त्यांचे नाव डॉ.कुंटे. पूर्वी राजाकी मंडी या भागात त्यांचा दवाखाना होता आणि त्याच भागात ते रहात असत. एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होतीच, शिवाय समाजकार्य आणि देशसेवा यातही त्यांचा महत्वाचा सहभाग असल्यामुळे त्या भागातील आबालवृध्द त्यांना ओळखत होते. पुढे त्यांचा मुलगा राजा डॉक्टर बनला आणि हळूहळू त्याचा जम बसत गेला. त्यांच्या दवाखान्याखेरीज इतर काही नर्सिंग होम्स, हॉस्पिटल्स वगैरेंमध्ये तो जात असे. राजाकीमंडीमधील जुने घर सोडून ते कुटुंब आग्रा शहराच्या बाहेर दयालबाग रोडवरील नव्या बंगल्यात रहायला आले. सीनीयर डॉक्टरसाहेबांना तिथून रोज त्यांच्या जुन्या दवाखान्यात जाणेयेणे कठीण होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो तोपर्यंत त्यांनी प्रॅक्टिस करणे थांबवले होते. सकाळच्या वेळी त्यांच्या बंगल्यासमोरील अंगणात कोवळे ऊन खात आम्ही गप्पा मारत बसलो होतो. बंगल्याच्या गेटमधूनच एका माणसाने आरोळी ठोकली, "डॉक्टरसाब".
डॉ.कुंटे लगबगीने धावतच पुढे गेले. त्या माणसाला विचारले, "क्या हो गया? किसे तकलीफ है?"
त्याने विचारले, "डॉक्टरसाब घरमे है? उनसे अर्जंट काम है।"
डॉ.कुंटे त्याच्याकडे पहातच उभे राहिले. दोन तीन सेकंदांनंतर त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि त्यांनी मुलाला हाक मारली, "राजा, बाहेर तुझ्याकडे कोण आले आहे बघ रे !"
माझ्याकडे पहात पण विषण्णपणे स्वतःशीच पुटपुटले, "ढळला रे ढळला दिन सखया". संध्याछायांची होणारी ही जाणीव नक्कीच हेलावणारी होती.

सन १९९० चा सुमार - माझे दुसरे एक जवळचे आप्त वयाच्या सत्तरीकडे झुकले होते. वयोमानानुसार काही दुखणी मागे लागली असली तरी ते तसे टुणटुणीत होते. त्यांच्याहून वयाने दोन चार वर्षांनी मोठी किंवा लहान असलेली गावातली ज्येष्ठ मंडळी एक एक करून हळू हळू कमी होत होती. त्या सर्वांनी त्या लहान गावात उभा जन्म घालवलेला असल्यामुळे अर्थातच ती सगळी मंडळी जवळ जवळ रोज भेटत असत, करण्यासारखा दुसरा कोणता उद्योगच नसल्यामुळे रिकामा वेळ घालवण्यासाठी ते नेहमी एकमेकांकडे जात येत असत. त्यामुळे अचानक त्यातल्या एकाद्याला वरून बोलावणे आले तर बाकीच्यांना असह्य धक्का बसत असे. आम्ही त्यांच्या घरी गेलेलो असतांना गावात अशीच एक घटना घडली होती. समाचाराला आलेली मंडळी बोलत होती, "अप्पांचं तसं सगळं झालं होतं, मुलं मार्गाला लागली होती, मुली सासरी नांदत होत्या, नातवंडांचं सुखही त्यांनी पाहिलं होतं, आता कुठली जबाबदारी त्यांच्यावर नव्हती .... वगैरे वगैरे". घरात आणि शेजारीपाजारी होत असलेल्या चर्चांमध्ये याचेच प्रतिध्वनी कानावर येत होते.

ते ऐकतांना माझ्या आप्ताच्या चेह-यावरले भाव मी पाहिले आणि मनात एकदम चर्र झाले. त्यांची पत्नी पूर्वीच अकाली स्वर्गवासी झाली असल्यामुळे ते एकटे झाले होते. त्यांच्याही मुलींची लग्ने होऊन त्या आपापल्या सासरी गेल्या होत्या, मुलाचे लग्ने होऊन सून घरी आली होती. आता घरातला आणि व्यवसायातला सर्व कारभार त्यांनी हातात घेतला होता. सर्व मुलामुलींनी 'हम दो हमारे दो' चा कोटा पूर्ण केलेला होता आणि ते आपापल्या चौकोनात सुखात होते, तसेच आपापल्या वाटांनी प्रगतीच्या मार्गावर चालत होते. त्यामुळे माझ्या या ज्येष्ठ आप्तांना आता आपली जगाचा निरोप घ्यायची वेळ आली आहे की काय असे मनातून वाटले असावे. त्यांनी तसे बोलून दाखवले नसले तरी मला त्यांच्या चेहे-यावर ते दिसले असे निदान मनातून वाटले. पण माझ्याहून वयाने वीस वर्षांहून मोठ्या असलेल्याला मी कसले काउन्सलिंग करणार असा विचार करून मी काही बोललो नाही. पण त्यांची इच्छाशक्ती नक्कीच कमकुवत झालेली असावी. त्यानंतर काही महिन्यांमध्येच त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.

जयवंत दळवी यांच्या संध्याछाया या नाटकाने अमाप लोकप्रियता मिळवली होती, तसेच अनेकांना अंतर्मुख केले असेल. ते नाटक आले त्या काळात मी वयाच्या माध्यान्हावरून किंचित पुढे सरकत होतो. आपल्या भविष्यकाळाची चाहूल लावणारे आणि त्याबद्दल अनिश्चिततेची शंका मनात उठवणारे हे नाटक होते. कदाचित त्यामुळे ते जास्तच प्रभावशाली वाटले, आतपर्यंत चटके लावत गेले. त्यानंतर 'तू तिथे मी', 'अवतार', 'बागबान' वगैरेसारख्या चित्रपटांची लाट येऊन गेली. "आमची मुले तशातली नाहीत हो" असे सांगायला ठीक असले तरी आत कुठे तरी थोडा हादरा बसल्याशिवाय रहात नव्हता.

ते सहन करत करत आणखी वर्षे गेली. लहान गावातल्या काळ्या मातीत रुजलेली मुळे आम्ही आपल्या हाताने कधीच नष्ट करून टाकली होती. मुंबईच्या सिमेंट काँक्रीटच्या घरातल्या चिनी मातीच्या बरणीत लावलेल्या मनीप्लँटसारखे आमचे जीवन होते. वरवर कितीही वाढतांना दिसली तरी ती सगळी वाढ दुस-यांच्या आधारावर ! त्या झाडांच्या जेमतेम बोटभर आकाराच्या मुळांमध्ये झाडाला आधार देण्याची शक्ती कुठे होती? नोकरीत असतांनासुध्दा परगावी बदली होण्याची टांगती तलवार डोक्यावर होतीच. बढती होऊन वरचा दर्जा मिळाला की पहिले निवासस्थान सोडून तिकडे जात होतो. म्हणजे पुन्हा नवी मुळे फुटावी लागत होती. अखेर सेवानिवृत्तीनंतर चंबूगबाळे आवरून तो परिसरच सोडावा लागणार हे माहीतच होते. ते ही करावे लागलेच. नव्या जागेत नवे आधार शोधले.

पण म्हणून काय झाले? आता संध्या छाया दिसायला लागल्या असल्या तरी त्यांना भ्यायचे काय कारण आहे? उन्हाची रणरण संपली आहे. या लांबत जाणा-या सावल्यांचा मजेदार खेळ निवांतपणे पहावा. आपल्याकडले ज्ञान आणि अनुभवांचे मधुघट कोणाला देऊन रिकामे होणारे नाहीत, उलट त्यात दिवसे दिवस आणखी काही थेंब जमा होत राहणार आहेत. मागचा आठवडा देण्याचे सुख (जॉय ऑफ गिव्हंग) चा होता म्हणे. तेच तर आता चालले आहे. आज ज्येष्ठ नागरिक दिवस आहे असे ऐकले. म्हणजे काय ते काही समजले नाही. पण या दिवशी माझ्या सहवयस्कांना मला एवढेच सांगावेसे वाटते की संध्याछायांना भिऊ नये. त्यांना धीटपणे सामोरे जावे, त्यांच्या बदलत जाणा-या आकारांची मजा लुटावी आणि देण्याचा आनंद घ्यावा.