Thursday, April 28, 2011

तेथे कर माझे जुळती - ७ (उत्तरार्ध) - पं.शिवानंद पाटीलहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले कलाकार आपले उस्ताद, गुरू किंवा एकाद्या बुजुर्ग व्यक्तीच्या नावाचा उच्चार करतांना एका हाताने आपला एक कान पकडतात. त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणे हा या परंपरागत प्रथेमागील उद्देश असतो. "माझ्या गाण्यात जेवढे चांगले दिसेल ते सारे माझ्या गुरूने मला शिकवले आहे आणि चुकीचे किंवा खराब असे सगळे माझे स्वतःचे आहे." असे बरेचसे कलाकार मंचावरून म्हणतात, पण त्यांच्या एरवीच्या बोलण्यातल्या आत्मप्रौढीवरून त्यांचा मानभावीपणा दिसून येतो. शिवानंद पाटील मात्र जेवढ्या उत्कट भावनेने त्यांच्या गुरूंबद्दल स्टेजवरून बोलत असत, तेवढाच आदरभाव त्यांच्या खाजगीतल्या बोलण्यातसुध्दा प्रकट होत असे.

त्यांचे पूर्वीचे गुरू इचलकरंजीचे पं. दत्तात्रेय विष्णू काणे (काणेबुवा) यांच्या वयाची ७५ वर्षे झाल्याचा महोत्सव त्यानिमित्य एक मोठा संगीताचा कार्यक्रम आयोजित करून शिवानंदांनी दादरला घडवून आणला. सांगली कोल्हापूरकडे रहात असलेल्या काणेबुवांच्या शिष्यपरिवाराचा मेळावा त्या ठिकाणी भरवला आणि त्यांचे गायन मुंबईकरांना ऐकवले. पं.काणेबुवांबद्दल आपल्या मनातला आदर शिवानंदांनी या शब्दात सांगितला, "अधिकार माझा काही न पाहता पायी ठेवले । पायी ठेविले गुरूने मज धन्य केले ।।"

पं.डॉ.बसवराज राजगुरू यांचा स्मृतीदिन शिवराज आणि योजना पाटील १९९२-९३ पासून दरवर्षी साजरा करत आले आहेत. त्या निमित्याने दरवर्षी कर्नाटकातील एकाद्या मोठ्या गायक कलाकाराच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला जात आला आहे. शिवानंद स्वतःसुध्दा आपल्या गुरूला तन्मयतेने आदरांजली वाहत. तनमनधन समर्पण करण्याचा भाव त्यात दिसून येत असे. स्व.गंगूबाई हनगल यांच्या वयाचा विचार करून त्यांना प्रवासाची दगदग होऊ नये या विचाराने एकदा हा कार्यक्रम बेळगावात ठेवला गेला. आपली कन्या कृष्णाबाई यांच्याबरोबर गंगूबाई त्या समारंभाला आल्या आणि गायल्यादेखील. जवळच्या नातेवाइकाच्या आगमनाने जो आनंद वाटेल तसा आनंद आणि आपुलकी या लोकांच्या भेटण्यामध्ये मला दिसली. बाहेरगावाहून बेळगावला गेलेल्या प्रत्यकाची ते स्वतः खूप आपुलकीने विचारपूस करत होते आणि त्यांची कसलीही गैरसोय होणार नाही याची खातरजमा करून घेत होते.

शिवानंदांची आणि माझी ओळख झाली त्या वेळी ते रेल्वेमध्ये नोकरी करत होते. नोकरी सांभाळून संगीताची सेवा करीत त्यांनी त्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले होते. संगीतासाठी जास्त वेळ मिळावा म्हणून पुढे त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या क्षेत्रात त्यांची प्रगती होत गेली. संगीताच्या क्षेत्रात सर्वाधिक मानाचे स्थान लाभलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासह इतरही अनेक मोठ्या संमेलनांमध्ये त्यांचे गायन झाले. संगीत रंगभूमीवरही त्यांनी काही नाटकातून भूमिका केल्या. शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत या दोन्ही क्षेत्रांमधील बक्षिसे आणि मानसन्मान त्यांना मिळाले. त्यांच्या गायनाच्या कॅसेट्स, सीडी निघाल्या. पं.दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाला.

हे सगळे असले तरी त्यांना अपेक्षित होते किंवा व्हायला हवे होते तेवढे त्यांचे कार्यक्रम प्रत्यक्षात होत नव्हते. महागाईबरोबर वाढत जाणारे सर्वच खर्च आणि पैसे खर्च करून शास्त्रीय संगीत ऐकायला येणा-या श्रोत्यांमध्ये होत असलेली घट यांचे गणित जुळत नव्हते. कमी मानधन घेणे परवडत नाही आणि जास्त उत्पन्न देणारे कार्यक्रम होतच नाहीत असे होऊ लागले. संगीताच्या शिकवण्या करून त्यातून कमाई करायचा त्यांनी प्रयत्न केला, पण कलाकार आणि शिक्षक या दोन गोष्टींसाठी वेगळे गुण लागतात. उत्कृष्ट कलाकार आपली कला तितक्याच चांगल्या शिष्यालाच शिकवू शकतो, सामान्य दर्जाच्या विद्यार्थ्याकडून त्याच त्या प्राथमिक स्वरूपाच्या गोष्टी घटवून घेणे त्याला आवडत नाही. त्याच प्रमाणे उत्कृष्ट शिक्षकाला स्वतः मैफिल गाजवता येतेच असे नाही, त्यासाठी प्रतिभेचे देणे अंगात असावे लागते. काही अद्वितीय कलाकारांमध्ये दोन्ही प्रकारचे कौशल्य असते, त्यांचा मोठा शिष्यपरिवार तयार होते. शिवानंदांच्या बाबतीत ते झाले नाही. कदाचित त्यांना होतकरू आणि कष्टाळू असा शिष्य लाभला नसावा. हेसुध्दा एक प्रकारचे नशीबच असते.

मराठी रंगभूमीवर एका काळी संगीत नाटकांनी राज्य गाजवले असले तरी आता त्याचे दिवस राहिले नाहीत. काही चांगल्या नाटकात शिवानंदांनी भूमिका केल्या, पण त्याचे जास्त प्रयोग झाले नाहीत. पं.जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबध्द करून अजरामर केलेली बहुतेक नाट्यगीते मी मूळच्या नाट्यकलावंतांकडून ऐकली आहेत, त्यातील काही गीते अभिषेकीबुवांच्या तोंडूनसुध्दा एकली आहेत. त्यातली काही गाणी, विशेषतः कट्यार कालजात घुसली या नाटकातील गाणी शिवानंद गात असे तेंव्हा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळत असे. काही वर्षांपूर्वी साक्षात लता मंगेशकर आणि पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली शतजन्म शोधतांना हे नवे संगीत नाटक रंगभूमीवर आले होते. शिवानंदांनी त्यात प्रमुख भूमिका केली होती. ते नाटक चांगले असूनसुध्दा दुर्दैवाने व्यावसायिक दृष्ट्या अयशस्वी ठरले.

संगीतक्षेत्रातील कलाकारांमध्ये अनुकरणक्षमता आणि नवनिर्मितीक्षमता असे दोन निरनिराळे गुण आढळतात. शिवानंदांकडे दोन्ही होते, पण पहिला जरा जास्त प्रभावी असावा. गुरूंकडून शिकलेली गीते आणि बंदिशी ते स्वतःच्या गानकौशल्याने बहारदार फुलवून त्याना खूप उंच पातळीवर नेत असत. अनेक अभंगांना त्यांनी स्वतः चाली लावल्या. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्य ते अभंगवाणी किंवा भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर करत असत. त्या वेळी ऐकतांना त्यांनी लावलेल्या चालीसुध्दा गोड वाटत असत. पण अजित कडकडे किंवा सुरेश वाडकर यांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका जशा घरोघरी दिसतात तशा शिवानंदांच्या दिसत नाहीत.

अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली नसली तरी त्यांच्या संवेदनशील मनाला ती लागली असणार. दोन वर्षांपूर्वी गंगूबाई निवर्तल्या त्या वेळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शिवानंद हुबळीला गेले असतांना त्यांना एक अपघात झाला आणि त्यात अंतर्गत इजा झाल्या. कदाचित त्या वेळी त्यांचे गंभीर स्वरूप लक्षात आले नसावे, पण कालांतराने त्यापासून त्रास होऊ लागला. तो जास्त वाढला की त्यावर उपचार आणि विश्रांती घ्यायची आणि कमी झाला की पुन्हा जोमाने कामाला लागायचे असे चालले होते. गेल्या वर्षी बसवराज राजगुरू स्मृतीदिन त्यांनी पुण्याला साजरा केला त्यावेळी त्यात गायनसुध्दा केले. त्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो, पण त्यांना झालेल्या अपघाताची आणि त्यातून उद्भवलेल्या आजाराची आम्हाला त्यावेळी माहितीसुध्दा मिळाली नव्हती. पण वर्षअखेर तो आजार बळावला आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवले होते. तिथून ते बरे होऊन परत आले असे ऐकले होते.
एप्रिलमध्ये चेंबूरला होणार असलेल्या अल्लादियाखाँ संगीत महोत्सवात यावर्षी त्यांचे गायनसुध्दा ठेवले होते. पण २१ तारखेला झालेल्या उद्घाटनाच्या दिवशीच ते रहीत झाल्याचे समजले. त्याबद्दल जास्त तपशील कळण्याच्या आधीच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतल्याची दुःखद बातमी येऊन थडकली. ते मरोळला रहायला गेल्यापासून नेहमी आम्हाला त्यांच्या नव्या घरी येऊन जाण्याचे आमंत्रण देत होते आणि आम्हीसुध्दा जरूर येऊ असे म्हणत आलो होतो, पण ते काही जमले नाही आणि प्रत्यक्षात गेलो तेंव्हा साश्रु नयनांनी त्यांच्या तसबिरीपुढे हात जोडावे लागले.

No comments: