त्या दिवशी दुपारी मस्त जेवण करून मी वामकुक्षीच्या नावाने ताणून दिली होती. कसलीशी चाहूल लागून झोप चाळवली तेंव्हा अलका तयार होऊन बाहेर जायला निघाली असल्याचे दिसले. वाशीमध्येच राहणा-या एका मैत्रिणीला सोबत घेऊन ती मुंबईतल्या मैत्रिणीकडे जायला निघाली होती. त्यांच्या आठदहा मैत्रिणी तिथे जमणार होत्या. मला आता तीन चार तास निवांतपणा मिळणार होता. अलकाला बायबाय करून मी संगणक सुरू केला आणि आंतर्जालावर उड्डाण केले. त्या महासागराच्या लाटांवर सिंदबादप्रमाणे मुशाफिरी करता करता अलीबाबाच्या गुहा शोधत असतांना अमूल्य रत्नांनी भरलेला एक खजिना सापडला. 'तिळा दार उघड'चा मंत्र लिहून त्यावर टिचकी मारणार एवढ्यात फोनची घंटा खणाणली. या अवेळी कोणालाही माझी आठवण आली असण्याची शक्यता मला दिसत नव्हती. अलकाच्याच एकाद्या मैत्रिणीने "निघालीस का? केंव्हा पोचणार आहेस?" अशा चौकशा करण्यासाठी फोन लावला असणार असे वाटले. चार पाच वेळा वाजू दिल्यानंतरसुध्दा घंटा वाजायची थांबली नाही तेंव्हा "काय कटकट आहे?" असे चरफडत उठलो आणि रिसीव्हर उचलला.
अलका स्वतःच फोनवर होती. तिला घरातून निघून दहा मिनिटे सुध्दा झाली नव्हती, म्हणजे ती अजून वाटेतच असणार. तिला अचानक काय झाले असेल या शंकेच्या अनेक पाली मनात चुकचुकल्या. "अहो मी ठीक आहे, पण आपली गाडी .." ती सांगत होती. "वाशीच्या पुलावर बंद पडली. आता मी काय करू?"
त्यावर मी तिला काय सांगणार? गेली दहा वर्षे ती सराईतपणे गाडी चालवत असली तरी कधीही तिने कारचे बॉनेट उघडून त्यात डोकावून पाहिल्याचे मला आठवत नाही. त्यात दिसणा-या कशाला इंजिन म्हणतात हे तिला ठाऊक असेलच याची मला शाश्वती वाटत नव्हती. आतल्या काळ्याकुट्ट यंत्राच्या कुठल्याही भागाला बोट जरी लावले तरी ते काळे होईल आणि त्याला कसलासा घाणेरडा वास येईल या धास्तीने तिने कधीही त्यातल्या कशालाही स्पर्श केलेला मला दिसला नव्हता. त्यामुळे या वेळी ती स्वतः काही करू शकेल याची फारशी शक्यता नव्हती.
मी सांगितले, "घाबरू नकोस, तिथेच थांब, मी येतोय्."
तिला एवढे सांगून मी उघडलेल्या सर्व गुहांचे दरवाजे थडाथड बंद केले, संगणकाला निपचित पाडले आणि कपडे बदलले. पण ते करत असतांना माझ्या मनात विचार आला की मी तरी तिथे जाऊन काय करणार आहे? इंजिन कशाला म्हणतात एवढे मला ठाऊक असले आणि फक्त बोटच काय पण शर्टाची बाहीसुध्दा ग्रीसने माखून घेण्याची माझ्या मनाची तयारी असली तरी त्याचा काय उपयोग होता? बंद पडलेले इंजिन सुरू करण्याचे काडीएवढे ज्ञान किंवा पूर्वानुभव माझ्या गाठी नव्हतेच. त्यामुळे सर्व्हिस सेंटरचा फोन नंबर शोधून काढला आणि मेकॅनिकला बोलावून घेतले. तो तयार झाला हे पाहून झाल्यावर त्याला अलकाच्या मोबाईलचा नंबर आणि अलकाला त्याचा नंबर दिला आणि टॅक्सीने घटनास्थळावर जाऊन पोचलो.
तोपर्यंत मेकॅनिक जसबीर तिथे आला होता आणि त्याने गाडीचे बॉनेट उघडून ते पुन्हा बंद सुध्दा केले होते. बहुधा त्याच्या दिव्य स्पर्शानेच इंजिनाचा घरघराट पुन्हा सुरू झाला असावा.
"आता गाडी चालू झाली आहे, आणखी दहा बारा किलोमीटरपर्यंत तरी ती चालायला हरकत नाही. मुंबईत पोचल्यानंतर तिकडच्या मेकॅनिककडून तपासून घ्या. मी त्याला म्हणजे महेशला फोन करून कळवले आहे. तुम्ही जाणार आहात त्या जागी तो येऊन आणखी दुरुस्ती करून देईल. बहुधा फ्यूएल पंपचा प्रॉब्लेम असावा. तुम्ही गाडी घेऊन चला, मी मागेमागे येतोच आहे." जसबीरने सांगितले. इतके सहकार्य माझ्या अपेक्षेच्या बाहेर होते.
त्याचे आभार मानून (आणि अर्थातच त्याची व्हिजिट फी देऊन) आम्ही पुढे निघालो. मुंबईच्या हद्दीत जेमतेम येऊन पोचतो तेवढ्यात अलकाच्या मोबाईलवर एक फोन आला. तिच्या शेजारी बसलेल्या तिच्या मैत्रिणीने उचलला. "आमची गाडी आता चालू झाली आहे आणि शिवाय एक मेकॅनिक मागे मागे येतो आहे." असे सांगून तिने बंद करून टाकला. तो कॉल कुणाचा होता याची चौकशी करावी असे तिला वाटले नाही की त्या माणसाकडे हा नंबर कसा आला असा प्रश्न तिला पडला नाही. "कुणाचा का असेना, आपल्याला काय करायचे आहे?" अशा गुर्मीत ती होती. मी मागे वळून पाहिले तर जसबीर अदृष्य झाला होता. दुपदरी रस्ता असल्यामुळे आमच्या मागे पुलाच्या दुस-या टोकापर्यंत येणे त्याला भागच होते. तिथपर्यंत आल्यानंतर आमची गाडी ठीक चालली आहे हे पाहून तो परत गेला होता. "तो तर पुढे गेला, मी पाहिले.." असे उत्तर आले. आम्हाला कोठे जायचे आहे हे अंतर्ज्ञानाने ओळखून तो आमच्या आधीच तिथे जाऊन पोचला असता तर मी त्याला भररस्त्यात साष्टांग नमस्कार घातला असता. पण तसे काही झाले नाही. आम्ही गाडी चालवत चालवत मैत्रिणीच्या घरापर्यंत आलो. वाटेत काही त्रास झाला नाही. जसबीर तिथे येईल अशी माझी अपेक्षा नव्हतीच, आता महेश केंव्हा येणार हे पहायचे होते. त्याचा मोबाइल फोन नंबर अलकाच्या मोबाईलमध्ये नमूद केला होता तो लावला.
"पाच मिनिटांपूर्वी सांगितलेत की तुम्हाला दुसरा मेकॅनिक मिळाला आहे आणि तुमची गाडी ठीक झाली आहे. आता मी कशाला येऊ?" महेशने घुश्श्यातच फोन बंद करून टाकला. पुन्हा जसबीरशी बोलून झालेला गोंधळ त्याला सांगितल्यावर त्याने महेशशी बोलून त्याला राजी केले. गाडी आणि मोबाईल माझ्याकडे सोपवून अलका तिच्या मैत्रिणीसह बिल्डिंगमध्ये चालली गेली, रस्त्यावर उभा राहून महेशाची वाट पहात होतो. दहा पंधरा मिनिटे झाली तरी त्याची येण्याची लक्षणे दिसत नव्हती. त्याला फोन करून चौकशी करावी असा विचार केला. अलकाच्या फोनमधले केलेले आणि आलेले (कॉल्ड आणि रिसीव्ह्ड नंबर्स) कॉल्स यांच्या याद्या पाहतांना महेशचे नाव दिसले आणि मी कॉलचे बटन दाबले. त्यात नेमका काय गोंधळ झाला होता ते मला अजून समजलेले नाही.
हॅलो, हॅलो करून झाल्यावर मी म्हंटले "महेश, तू कुठे आहेस, केंव्हा येणार आहेस?"
पलीकडून "अं.. अं.. कोण महेश?" वगैरे भांबावलेले उद्गार ऐकल्यानंतर "सॉरी, राँग नंबर" असे म्हणून मी फोन बंद केला. सेव्ह केलेल्या लिस्टमधून महेशचा नंबर शोधून काढला. या वेळी त्यात काही चूक नाही याची खात्री करून घेतल्यावर मी कॉलचे बटन दाबणार एवढ्यात फोनची रिंग वाजली. अजयचा फोन होता. त्याच्या संवयीप्रमाणे आता तासभर तरी तो चालू ठेवणार याची गॅरंटी होती. त्याच्या घरातल्या सर्वांबरोबर आमच्या घरातल्या सर्वांनी बोलायचे आणि चुलत, मावस, आते, मामे भावंडांपासून ते वर्ल्डकप आणि सुनामीपर्यंत जगातल्या सगळ्या घटनांवर खुलासेवार चर्चा करायची तर एवढा वेळ लागणारच. एरवी असे तासतासभर बोलायला आम्हालासुध्दा आवडते, पण या वेळी माझ्यापाशी त्यासाठी वेळही नव्हता आणि गप्पा मारायचा मूडही नव्हता. लवकरात लवकर केंव्हा हा महेश प्रसन्न होऊन दर्शन देईल आणि मला उन्हात उभे राहण्याच्या तपश्चर्येपासून मुक्ती देईल असे मला झाले होते. त्यामुळे मी "अरे, आत्ता मी खूप बिझी आहे. थोड्या वेळाने फोन कर" एवढे सांगून त्याचा फोन कट केला आणि महेशाच्या आराधनेला लागलो.
थोड्या वेळाने तो आला आणि मी त्याला आमच्या गाडीची हकीकत सांगत होतो तेवढ्यात मोबाईल वाजला. यावेळी शिल्पा लाईनवर होती. महेशशी चाललेले बोलणे अर्धे सोडून तिच्याशी बोलणे त्या क्षणी मला शक्य नसल्यामुळे "आत्ता मी खूप बिझी आहे. थोड्या वेळाने फोन कर" असेच तिलाही सांगितले. गाडी रिपेअर झाल्यानंतरही महिलामंडळाची सभा संपायला वेळ होता. त्यांच्यामध्ये जाऊन मला 'बायकात पुरुष लांबोडा' व्हायचे नव्हते, म्हणून जवळ रहात असलेल्या रश्मीच्या घरी गेलो. मला असा अचानक आलेला पाहून तिला आनंद झाला, आश्चर्य वाटले की रिलीफ वाटला अशा संमिश्र भावना आणि अनेक प्रश्न तिच्या चेहे-यावर दिसत होते.
"काका, तुम्ही कसे आहात आणि मावशी कशी आहे, ती कुठे आहे?" तिने आल्या आल्या माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला. असे काय झाले होते ते मलाच समजेना.
"अहो आम्ही सगळे केवढ्या काळजीत होतो?" रश्मी म्हणाली
"आम्ही दोघेही मजेत आहोत" मी सांगितले, "पण तुम्हाला आमची काळजी करायला काय झालं?"
आमची गाडी बंद पडल्याची बातमी सुध्दा यांच्यापर्यंत पोचण्याचे काहीच कारण मला दिसत नव्हते. ती पुलावर उभी असल्याचे कोणी जाणा-या येणा-या ओळखीच्या माणसाने पाहिले असले तरी मग तो मदतीला का आला नाही? आणि ती गोष्ट यांना सांगायची काय गरज होती?
"आत्ता मला माझ्या आईचा फोन आला होता, ती तुमची चौकशी करत होती"
"का?"
"कारण तिला शिल्पाचा फोन आला होता आणि ती सांगत होती की तुम्ही तिच्याशी आणि अजयशीसुध्दा नीट बोलला नाहीत म्हणून!"
"बाप रे!"
"त्या सगळ्यांना असे वाटले की तुम्ही दोघे कसल्या तरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहात."
"तसे असते तर मग आम्ही तुम्हालाच सांगितले नसते का? तुमच्याशी बोलणे टाळले कशाला असते? या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? आधी अजयने मला कशासाठी फोन केला होता?"
माझ्या मनात प्रश्नच प्रश्न उठत होते.
हळूहळू त्याचा उलगडा झाला. मेकॅनिक महेशला मी केलेला फोन उदयला लागला होता. पण ते यंत्र महेश नावाच्या त्याच्या मित्राने त्याला थोड्या दिवसासाठी दिले होते. "महेश " एवढे नाव उदयने ऐकल्यावर महेशला निरोप देण्यासाठी उदयने फोन नंबर पाहिला तो ओळखीचा म्हणजे अलकाचाच होता. ही गोष्ट त्याने बाजूलाच बसलेल्या अजयला सांगितल्यावर चौकशी करून घेण्यासाठी त्याने अलकाला फोन लावला, तो तिने न उचलता मी उचलला आणि लगेच बंद केला. हे सगळे त्यांना अपेक्षित नसल्यामुळे इतरांना सांगितले आणि त्यांना काही माहिती आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अशा प्रकारे एका मोबाईलमुळे आम्ही सगळे एप्रिल फूल झालो!
2 comments:
dongar pokhrun undir...
एप्रिल फूलच्या डोंगरातून वाघ सिंह निघणार आहेत का?
Post a Comment