Tuesday, March 29, 2011

फुकुशिमा येथील दुर्घटनेच्या निमित्याने (पूर्वार्ध)

दोन आठवड्यांपूर्वी जपानमध्ये येऊन गेलेल्या महाविनाशक भूकंप आणि सुनामी या नैसर्गिक प्रकोपानंतर तिथल्या फुकुशिमा येथील अणुशक्तीवीजकेंद्राबद्दलच्या बातम्या टीव्हीवर सतत दाखवल्या जात होत्या. सामान्य वाचकाला तेथील वस्तुस्थितीचे योग्य प्रकारे वस्तुनिष्ठ आकलन व्हावे यासाठी मी एक लेख लिहून उपक्रमावर दिला होता. त्या लेखाला खूप प्रतिसाद मिळाले. समयोचित माहिती दिल्याबद्दल मला अनेकांची शाबासकी मिळाली, पण मी गंभीर परिस्थितीला सामान्य ठरवण्याचा प्रयत्न करीत आहे असेही काही वाचकांना वाटले.

अपघात, आत्महत्या, खून, भूकबळी वगैरे घटनांमध्ये ज्यांची जीवनज्योत मालवली जाते त्यांच्यावर अवलंबून असलेल्या अनेक निरपराध व्यक्तींचे आयुष्य पार उध्वस्त होते. त्यांच्या दृष्टीने ती त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक भयानक घटना असते, पण इतरेजन थोडी हळहळ व्यक्त करतात, पळभर 'हाय हाय' म्हणतात आणि आपापल्या कामाला लागतात. काही सुजाण लोक "आजकाल माणसाला संवेदनाच राहिल्या नाहीत, त्यांची मने मुर्दाड झाली आहेत" वगैरे आक्रोश करणारे लेख लिहितात, भाषणे करतात आणि त्यांचे 'मनोगत' व्यक्त करून झाल्यानंतर चटकदार 'मिसळपावा'वर ताव मारण्याच्या 'उपक्रमा'ला लागतात. अशी घटना आपल्या आयुष्य़ात घडू शकते अशी कुशंका मनात आल्यामुळे मात्र त्या व्यक्तीशी अपरिचित असलेले अनेक लोकसुध्दा भयभीत होतात. भीतीची भावना दुःखापेक्षा अधिक संसर्गजन्य आणि सर्वव्यापी असल्यामुळे संपर्कसाधने जेथपर्यंत पोचतील तेथपर्यंत ती सुध्दा सहजपणे जाऊन पोचते. ठळक मथळ्याखाली दिलेल्या धक्कादायक बातम्या, त्यावर केली गेलेली बेफाम वक्तव्ये, मग त्या वक्तव्यांचे रसभरीत वृत्तांत, त्यावरील अग्रलेख, वाचकांची पत्रे वगैरेंमधून भीतीची ही लाट अधिकाधिक दूरवर पसरत जाते. संभाव्य धोक्याची जाणीव सर्वसामान्य माणसाला होणे चांगले असले तरी त्यात तरतमभावाचे भान ठेवले तर ते जास्त चांगले होईल. पण अनेक बाबतीत असे होत नाही. 'मॅडकाऊ डिसीज' आणि 'बर्डफ्ल्यू'च्या भयाने जगभर केवढा धुमाकूळ घातला होता याबद्दल आपण वाचले किंवा ऐकले आहे, 'स्वाईनफ्ल्यू'ची भयंकर दहशत प्रत्यक्ष अनुभवली आहे. जगातील एकंदर मृत्यूंच्या कारणांची आकडेवारी पाहिली तर या तीन्ही प्रकारच्या आजारांनी दगावलेल्या माणसांची संख्या नगण्य आहे असे दिसेल. पण एकेका कालखंडात त्यांनी जगभरातील तमाम जनतेची झोप उडवलेली होती. फुकुशिमा कांडाची गणना त्याच श्रेणीमध्ये करता येईल.

भूकंप आणि सुनामी येऊन दोन आठवडे उलटले आहेत. त्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि बेपत्ता झालेल्या माणसांची संख्या हजारोंमध्ये आणि बेघर झालेल्यांची गणना लाखोंमध्ये रोज वाढत होती. पण त्याच्या बातम्यांचा आकार दिवसेदिवस लहान लहान होत त्या येणे थांबून गेले. फुकुशिमामध्ये आजपर्यंत एकसुध्दा बळी गेला नसला आणि त्या केंद्राच्या बातम्यांचा ठळकपणा जरासा कमी झाला असला तरी अद्याप त्या येतच आहेत. तेथील परिस्थिती पूर्वपदावर येण्याची लक्षणे अजूनही दिसत नसल्यामुळे त्या येत राहणारही आहेत. तेथील बिघडलेली यंत्रसामुग्री दुरुस्त करून तेथील संसंत्रे पुन्हा सुरू करण्याची आशा जवळजवळ मावळलेली असल्याचेच अधिकाधिक स्पष्ट होत आहे. त्यापेक्षा त्या केंद्राचे थडगे, समाधी किंवा स्तूप बांधणेच श्रेयस्कर आहे असा निष्कर्ष तज्ज्ञ मंडळी काढतील असेच सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे पुढे काय होऊ शकेल, त्यात जास्तीत जास्त किती वाईट घडू शकेल याचा विचार करून त्यासाठी तयार राहण्याचे आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्याचे प्रयत्न चालले आहेत. सर्वसामान्य माणसाला तरतमभाव बाळगून याचे व्यवस्थित आकलन होण्याच्या दृष्टीने हा लेख लिहिला आहे.

त्यासाठी अणुशक्तीसंबंधी आणखी थोडे जाणून घेणे आवश्यक आहे. कोळशावर चालणा-या थर्मल पॉवर स्टेशनच्या आणि अणुविद्युतकेंद्राच्या ऊष्णता तयार करण्याच्या प्रक्रियांमध्ये काही मूलभूत फरक आहेत. कोळशाला जळण्यासाठी भट्टीतच घालावे लागत नाही. उघड्यावर पडलेल्या कोळशाच्या ढिगाच्या एका टोकाला आग लागली तरी आधी त्या भागातले कोळसे पेटतात आणि ती आग शेजारी असलेल्या कोळशांना पेटवत पुढे सरकत जाते. अणुशक्तीकेंद्रातील इंधनातले परमाणुभंजन असे जिथे तिथे घडत नाही. खास आकारणी असलेल्या रिअॅक्टरमध्येच ते घडू शकते. फुकुशिमासारख्या वीजकेंद्रात घालण्यासाठी तयार करून गोडाउनमध्ये ठेवलेल्या फ्यूएल रॉड्सच्या गठ्ठ्यामध्ये योगायोगाने एकादा न्यूट्रॉन्सचा झोत घुसला तर त्यामधील युरेनियम २३५ या मूलद्रव्याच्या अणूंचे सुध्दा भंजन होईलच. सुरुवातीला असे १०० अणूंचे भंजन झाले तर त्यातून सुमारे २५० न्यूट्रॉन्स बाहेर पडतील आणि जवळ जवळ प्रकाशकिरणांच्या इतक्या अफाट वेगाने ते दाही दिशांना फेकले जातील. त्याले २४० बाहेर गेले तर फ्यूएल रॉड्समधील फक्त १० अणूंचे भंजन दुस-या सत्रात आणि एका अणूचे भंजन तिस-या सत्रात झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्णपणे थांबेल. न्यूक्लियर पॉवर स्टेशनसाठी तयार केलेल्या फ्यूएल रॉडचे रूपांतर अॅटम बाँबमध्ये होणे निव्वळ अशक्य आहे.

कोळशाच्या निखा-यावर पाणी ओतले तर ते विझून जातील आणि त्याला लागलेली आग शांत होईल. पण फुकुशिमासारख्या वीजकेंद्रामधील इंधन मात्र सतत पाण्यात बुडवूनच ठेवलेले असते. याचे कारण आता पाहू. रिअॅक्टरमधील सर्व इंधन एकत्र न ठेवता ते एकमेकांपासून थोड्या थोड्या अंतरावर पसरून ठेवले जाते. त्यामुळे भंजनांच्या पहिल्या सत्रामध्ये बाहेर पडलेले न्यूट्रॉन्स पुन्हा युरेनियमच्या वेगळ्या रॉड्समधील अणूंना भेटण्याची आणि त्यातून दुस-या सत्रामध्ये फिशन रिअॅक्शन होण्याची शक्यता वाढते. फुकुशिमाच्या रिकाम्या रिअॅक्टर व्हेसलमध्ये अशा प्रकारे सर्व इंधन ठरलेल्या जागी पसरून ठेवले आणि तिथे न्यूट्रॉन्सचा झोत आला तर काय होईल? पहिल्या सत्रातून निघालेल्या २५० न्यूट्रॉन्सपैकी २४० बाहेर जाण्याऐवजी २०० च निसटतील आणि ५० अणूंचे भंजन होईल. त्यापुढे ही संख्या २५, १२, ६, ३, २, १ करत थांबून जाईल. ते होण्यासाठी एक सहस्रांश सेकंदाऐवजी दोन किंवा तीन सहस्रांश सेकंद लागतील, पण ती नक्कीच पुढे चालत राहणार नाही. ते पात्र पाण्याने भरले तर इंधनातून बाहेर पडलेले न्यूट्रॉन्स पाण्यामधील हैड्रोजनच्या परमाणूंना धडकल्यामुळे त्यांची गती मंदावेल, पात्राच्या बाहेर जाऊ पाहणारे अनेक न्यूट्रॉन्स दिशा बदलून आतल्या आतच भटकतील आणि त्यांचा युरेनियम२३५ च्या अणूंचे बरोबर संयोग होण्याची शक्यता वाढून तिची संख्या १०० वर गेली की भंजनांची साखळी आपल्या आप चालत राहील. पाण्यामधील अणूंच्या या क्रियेला मॉडरेशन असे म्हणतात. रिअॅक्टरमधील फिशन रिअॅक्शन चालत राहण्यासाठी ते आवश्यक असल्यामुळे त्यातील इंधन सतत पाण्यात बुडलेले असणे आवश्यक असते.

कोळशाच्या ढिगाला लागलेली आग किती वेगाने पुढे जाईल हे वाहत्या वा-याचा जोर आणि दिशा, तसेच कोळशामधील आर्द्रता यावर ठरते. अणुभट्टीमधील भंजनक्रियेसाठी पुरेसे द्रव्य त्या भट्टीमध्ये असेल तर त्याच्या सर्व भागात ती एकदम सुरू होते आणि ते कमी झाले की सगळीकडे एकदमच थांबते, पहिल्या भंजनापासून ती लाट रिअॅक्टरच्या सर्व टोकांपर्यंत पसरायला एकादा सहस्रांश सेकंद एवढासुध्दा वेळ लागत नाही. कोळशाची भट्टी तापल्यानंतर त्यात फक्त एक किलो कोळसा घाला किंवा एक टन घाला, त्याला जाळण्यासाठी लागणारी हवा मिळाली तर तो जळेलच. अणुभट्टीमध्ये तसे होत नाही. गरजेपेक्षा एकादा ग्रॅमएवढे इंधन कमी पडले तरी फिशनचेनरिअॅक्शन चालत नाही. ते सारे इंधन थंडच राहते.

कोळसा जळल्यानंतर त्याचे रूपांतर धूर आणि राख यात होते. ज्वलन झाल्यानंतर कोळसा या रूपात तो शिल्लक रहात नाही. पेट्रोलमधून तर फक्त धूर निघतो आणि वातावरणात अदृष्य होतो. त्यामुळे पेट्रोलला आग लागली तर ते पूर्णपणे नाहीसे होते. अणुइंधन असे संपून जात नाही. फ्यूएल आणि मॉडरेटरचा प्रकार आणि रिअॅक्टरची रचना यांचेनुसार एक क्रिटिकल मास ठरतो. याहून जास्त फ्यूएल त्या रिअॅक्टरमध्ये जोवर आहे तोवर भंजनाची श्रृंखला चालत राहते आणि कमी कमी होत ते क्रिटिकल मासपेक्षा कमी झाले की ती थांबते. त्यावेळीसुध्दा जवळ जवळ पहिल्याइतकेच इंधन त्या जागी शिल्लकच असते.

उदाहरणादाखल एक रिअॅक्टर क्रिटिकल होण्यासाठी अडीच टक्के युरेनियम २३५ची दहा टन एवढी गरज आहे असे समजू. त्याऐवजी दहा टन एवढे सरासरी पावणेतीन टक्के यू२३५ फ्यूएल सुरुवातीला त्यात घालतात. त्यामधून निर्माण होत असलेले जास्तीचे न्यूट्रॉन्स कंट्रोल रॉडमधून शोषून घेऊन भंजनक्रियेचा समतोल राखला जातो. सतत होत असलेल्या फिशनमुळे जसजशी युरेनियमची सरासरी टक्केवारी कमी होत जाईल तसतसे हे कंट्रोल रॉड बाहेर पडत जातात. ते पूर्णपणे बाहेर निघाले आणि युरेनियमची टक्केवारी २.५ च्या खाली आली तर तो रिअॅक्टर अचानकपणे आपोआप थांबून जाईल. पण तोपर्यंत वाट न पाहता कंट्रोलरॉड बरेचसे आत असेपर्यंतच (युरेनियमची सरासरी टक्केवारी सुमारे २.५५-२.६ च्या आसपास असतांनाच) रिफ्यूएलिंगसाठी सुटी घेतात. ज्या फ्यूएल रॉड्समधील टक्केवारी सर्वात कमी (सुमारे दोन सव्वादोनच्या आसपास) झाली असेल असे थोडे रॉड रिअॅक्टरमधून बाहेर काढून त्यांच्या जागी तीनसव्वातीन टक्के यू२३५ असलेले नवे रॉड्स ठेवले की सरासरी टक्केवारी पुन्हा पावणेतीनवर आणता येते. (सहजपणे समजण्यासाठी या लेखामधील सारीच आकडेवारी शालेय पुस्तकातल्याप्रमाणे सोपी करून दिली आहे. प्रत्यक्षात तिचे खूप क्लिष्ट गणित असते. कृपया यातल्या चुका काढू नयेत)

मूळच्या दहा टन इंधनातले फक्त एक टन या वेळी बाहेर काढले असे समजू. या दहा टन म्हणजे दहा हजार किलोग्रॅम युरेनियममध्ये भंजनक्षम यू२३५ सुरुवातीला त्याच्या फक्त पावणेतीन ते सव्वा तीन टक्के होते त्यावरून ते दोन सव्वादोन टक्क्यावर आले. म्हणजे अर्धापाऊण टक्क्याने आणि साठसत्तर किलो एवढ्यानेच ते कमी झाले. यू२३५ चे भंजन होते तेंव्हा त्यातून जे २-३ न्यूट्रॉन्स बाहेर पडतात त्यातले एक दोन त्यातच पुन्हा शोषले जातात आणि एकादा दुसराच बाहेर जातो. त्यामुळे २३५ एवढे वस्तुमान असलेल्या यू२३५ मधून जी नवी द्व्ये तयार होतात त्यांचे एकंदर वस्तुमान २३३-२३४ एवढे असते. त्यात होणारी घट देखील अर्धा पाऊण टक्के एवढीच असते. ६०-७० किलोमध्ये ती फक्त तीनशेचारशे ग्रॅम होईल. याचा अर्थ दहा हजार किलोग्रॅम इंधनाचे वजन एक वर्षभर विजेचे उत्पादन केल्यानंतरसुध्दा फक्त अर्धा किलोने कमी झाले असा होतो. रिअॅक्टरमध्ये नव्याने भरण्यासाठी तयार ठेवलेले इंधन आणि आपले कर्तव्य पार पाडल्यानंतर बाहेर काढलेले इंधन यांचे आकारमान किंवा वजन यात जाणवण्याजोगा फरक असत नाही.

मात्र त्यात दडलेले फिशन फ्रॅग्मेंट्स अतिशय किरणोत्सर्गी तर असतातच, त्यातून सतत ऊष्णतासुध्दा बाहेर पडत असते. तिचे प्रमाण सारखे कमी कमी होत असले तरी ती क्रिया दीर्घ काळ चालत राहते. रिअॅक्टरमध्ये भंजनक्रियेमुळे युरेनियममधून बाहेर पडणारी ऊर्जा त्या क्रियेलाच बंद पाडून थांबवता येते. पण फिशनफ्रॅर्मेंट्सच्या, किंबहुना जगातील कोणत्याच पदार्थाच्या किरणोत्सारी विघटनाला (रेडिओअॅक्टिव्ह डिके)ला थांबवण्याचा कोणताही उपाय नाही. त्यामुळे तापलेल्या वस्तूंना थंड करत राहणे एवढेच करता येते आणि केले जाते. फुकुशिमा येथे घडत असलेल्या घटनांमध्ये निघत असलेली ऊष्णता तेथील इंधनाच्या भंजनामधून निघत नसून त्यातील राखेमधील धगीतून बाहेर पडते आहे आणि तिला वाहून नेणारी यंत्रणा कोलमडल्यामुळे त्यातून वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत आहेत.

ऱिअॅक्टरमधून बाहेर काढलेल्या स्पेंट फ्यूएलमध्ये सुध्दा भरपूर प्रमाणात भंजनक्षम द्रव्य शिल्लक असल्यामुळे त्याचा उपयोग भविष्यात कधी तरी होईल या आशेने ते सांभाळून ठेवले जात आहे. याशिवाय हे स्पेंटफ्यूएल अत्यधिक रेडिओअॅक्टिव्ह असल्यामुळे ते कच-यात टाकून देता येत नाही. चुकूनसुध्दा ते कोणाच्याही संपर्कात येऊ नये अशा सुरक्षित जागी ते ठेवले जाते. बहुतेक ठिकाणी त्यासाठी रिअॅक्टरच्या आवारातच वेगळी सुरक्षित अशी जागा करून ठेवतात. फुकुशिमा येथे तेथील स्पेंट फ्यूएल प्रत्यक्ष रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये रिअॅक्टरच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये साठवून ठेवलेले आहे. असा प्रकारे तेथील रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये एका भागात रिअॅक्टर आणि त्यातले प्रक्षुब्ध इंधन भरलेले आहे तर दुस-या भागात तुलनेने सौम्य असे वापरले गेले जुने इंधन एका पाण्याच्या टाकीत भरून ठेवलेले आहे. या दोघांनाही थंड करण्यासाठी पाण्याच्या अभिसरणाची वेगवेगळी व्यवस्था केलेली होती. पण तिच्यात झालेल्या बिघाडामुळे आजचे संकट ओढवले आहे.

......... उरलेला भाग पुढील लेखात

Friday, March 18, 2011

होळीचा फराळ

होळीचा हा फराळ हास्यगारवा २०११ च्या अंकातसुध्दा प्रकाशित झाला आहे.

होळी खेळून झाल्यावर सडकून भूक लागणारच, त्यासाठी लावलेल्य़ा स्टॉल्सवर ऐकवण्यासाठी आजच्या तुफान लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर जाहिराती.

१. चटकदार भडंग

भड भड भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग
लई चंवदार, लज्जतदार, याची नको तुलना
भड भड भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग
माझे सरकार, व्हा तय्यार, काढला ताजा घाणा
भड भड भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग

कुरकुरीत चुरमुरे रे
तळलेले दाणे खारे
मस्त मसाला त्यात घालुनी
केली भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग

एकदाच तू खाशील रे
चटक तुला बघ लागेल रे
पुन्हा पुन्हा मग येशील रे,
खाण्या भडंग भडंग भडंग भडंग, भड भड भडंग भडंग भडंग भडंग
-------------------------------------------------------------------------------------

२. मिठ्ठास बुंदीचे लाडू

बुंदी फर्मास केली, तुझ्यासाठीच रे
बुंदीची चंव खास, ही झक्कास, फर्मास रे
मुद्दाम आज केली, तुझ्यासाठीच रे
बुंदी फर्मास केली, तुझ्यासाठीच रे

बुंदीचा दाणा मोत्यासारखा, मोत्यासारखा
चुरडून घातला मी मेवा सुका, रे मेवा सुका
तुपात तळूनिया, पाकात घोळली ही, तुझ्यासाठी रे
बुंदी फर्मास केली, तुझ्यासाठीच रे
-----------------------------------------------------------------------------------

३. मजेदार भेळ

घेरे मस्त मस्त ही भेळ, घेरे मस्त मस्त ही भेळ
अशी तुला कुठे ना मिळेल, घेरे मस्त मस्त ही भेळ

भेळ फॉर्म्यूला हा माझा, एकदम खासा
तिची चंव वर्णायाला, अपु-या भाषा
घेरे मस्त मस्त ही भेळ, खा रे मस्त मस्त ही भेळ

बनवेन स्पेशल तुझ्या मनासारखी, मनासारखी
झणझणीत रस्सा घालू की ठेवू सुकी, रे ठेवू सुकी
घेरे मस्त मस्त ही भेळ, खा रे मस्त मस्त ही भेळ
अशी तुला कुठे ना मिळेल, घेरे मस्त मस्त ही भेळ
-------------------------------------------------------------------------------------------

४. गोड पेढे

पेढे घे ना, पेढे घे ना, पेढे घे ना रे

पेढ्यांचा गोडवा, वाटतो ना हवा,
चाखून तर पहा, एकदाच
कंदी पेढा हवा, केशरी की नवा,
सर्वांमध्ये खवा, ताजा ताजा
अप्रतीम आणून खास
त्याला भाजला खरपूस
वेलचीचा स्वादसुध्दा, आहे दिला रे
पेढे घे ना पेढे घे ना, पेढे घे ना रे
पेढे घे ना पेढे घे ना, पेढे घे ना रे
------------------------------------------------------------------------
५. पिझ्झा

I know you want me
And you'll always get me
हॉटेलात वा घरी
फोनवरूनच, दिलीस ऑर्डर,
होईल होम डिलिव्हरी
आत्ता वाटतोय् ना हवा हा खायला ?
साइडडिश नाही लागत त्याला,
एक प्लेट पुरेल रे तुजला,
तुझी भूक पुरी भागवायला
असा मी कोण ?
What's my name?
what's my name?
My name is Pizza, पिझ्झा मेजवानी
I am very tasty, तोंडाला सुटले ना पाणी?

Monday, March 14, 2011

अणुशक्ती वीजकेंद्र आणि अणुबाँब

मूळ लेखाची किंचित सुधारित आवृत्ती
दि।१७-३-२०११



फुकुशिमा अणुशक्ती वीजकेंद्र

जपानमध्ये येऊन गेलेल्या महाविनाशक भूकंप आणि सुनामी या नैसर्गिक प्रकोपानंतर आता फुकुशिमा येथील अणुशक्तीवर चालणा-या वीजकेंद्राची सर्व जगाला भयंकर काळजी लागली आहे. हिरोशिमा आणि नागासाकी यानंतर आता फुकुशिमाचा आसमंत (कदाचित सारा जपान देश) त्यामध्ये संपूर्णपणे उध्वस्त होणार असे भयंकर अतिरंजित भाकित दर्शवणा-या बातम्या टीव्हीवर सर्रास दाखवल्या जात आहेत. त्यासंबंधी वृत्तपत्रांमध्ये येणारे वृत्तांत आणि काही वर्तमानपत्रांमधील अग्रलेखातसुध्दा सामान्य वाचकांची अशा प्रकारची दिशाभूल केली जात आहे. अमेरिका आणि युरोपमधील अनेक देश त्यापासून भयभीत झाले आहेत असे सांगितले जात आहे. त्याचा परिणाम भारतापर्यंत किती प्रमाणात येऊन पोचणार आहे यावरसुध्दा चर्चा चालली आहे. फुकुशिमा येथील परिस्थिती निश्चितपणे अत्यंत गंभीर असली तरी अणुबाँबच्या स्फोटापेक्षा ती बरीच वेगळी आहे. या वस्तुस्थितीचे आकलन होण्यासाठी या दोन्हींमधील फरक समजून घ्यायला हवा.

युरोनियम व प्ल्यूटोनियम ही मूलद्रव्ये 'फिसाईल' म्हणजे 'भंजनक्षम' आहेत. याचा अर्थ त्यांच्या परमाणूचा 'न्यूट्रॉन' या मूलभूत कणांशी संयोग झाल्यास त्याचे 'फिशन' म्हणजे 'भंजन' होऊ शकते. भंजनाच्या क्रियेमध्ये त्या एका परमाणूचे विभाजन होऊन त्याचे दोन तुकडे पडतात आणि त्यातून दोन नवे लहान परमाणू निघतात, त्याशिवाय प्रचंड प्रमाणात ऊष्णता बाहेर पडते. हिलाच 'परमाणुऊर्जा' किंवा 'अणुशक्ती' असे म्हणतात. प्रत्येक भंजनक्रियेमध्ये परमाणूच्या दोन तुकड्यांच्या (नव्या परमाणूंच्या) सोबत दोन किंवा तीन सुटे न्यूट्रॉनसुध्दा बाहेर पडतात आणि प्रचंड ते वेगाने दूर फेकले जातात. त्यातल्या एका न्यूट्रॉनचा संयोग दुस-या फिसाईल अॅटमशी झाल्यास त्याचे पुन्हा भंजन होते. अशा रीतीने विभाजनांची साखळी पुढे चालत जाते. ती चालत राहण्यासाठी एका जागी पुरेसे भंजनक्षम मूलद्रव्य उपलब्ध असल्यास ती क्रिया अत्यंत वेगाने वाढत जाते आणि पहिल्या एका भंजनापासून तीन, नऊ, सत्तावीस, एक्याऐंशी अशा क्रमाने वाढत गेल्यास भंजनांची संख्या एकाद्या सेकंदात अनेक परार्धांवर जाऊ शकते आणि त्यातून निघालेल्या अपरिमित ऊष्णतेमुळे महाभयानक असा विस्फोट होतो. हा विस्फोट अधिकाधिक तीव्र व्हावा अशा प्रकारची रचना अॅटमबाँबमध्ये केलेली असते. पण त्यासाठी आवश्यक तितके संपृक्त असे (काँसेंट्रेटेड) भंजनक्षम मूलद्रव्य त्या जागी उपलब्ध नसल्यास ही प्रक्रिया सुरू झाली तरी तितक्याच वेगाने ती मंदावत जाऊन क्षणार्धातच ती पूर्णपणे बंद पडते. निसर्गतः मिळणा-या युरेनियममधील भंजनक्षम भाग १ टक्क्याहूनसुध्दा कमी असल्यामुळे नैसर्गिक रीतीने भंजनाची साखळी चालू राहू शकत नाही. युरेनियमच्या खाणीत कधी आण्विक स्फोट झाल्याची घटना घडलेले ऐकिवात नाही.

ही भंजनप्रक्रिया नियंत्रित प्रमाणावर करून त्यातले संतुलन काटेकोरपणे सांभाळल्यास त्यातून ठराविक प्रमाणात सतत मिळत रहाणा-या ऊर्जेचा शांततामय कामासाठी उपयोग करून घेता येतो. या तत्वावर आधारलेल्या न्यूक्लीयर पॉवर स्टेशन्समध्ये गेली अनेक वर्षे वीज निर्माण केली जात आहे. अशा प्रकारच्या रिअॅक्टरवर चालणारी चारशेहून जास्त परमाणू वीज केंद्रे आज जगभरात कार्यरत आहेत आणि जगातील विजेच्या एकंदर निर्मितीच्या १६ टक्के वीज त्या केंद्रामध्ये निर्माण होत आहे. खुद्द जपानमध्येच अशी ५५ केंद्रे असून जपानला लागणारी ३०-३२ टक्के वीज त्यांच्यापासून मिळते. निसर्गाच्या कोपामुळे, दुर्दैवी अपघातामुळे, कोणाच्याही चुकीमुळे, निष्काळजीपणामुळे किंवा हेतूपुरस्सर केलेल्या घातपातामुळे अशासुध्दा या 'परमाणूभट्टी'चे रूपांतर 'अॅटमबाँब'मध्ये होऊ शकणार नाही याची तरतूद या अणूभट्ट्यांच्या रचनेमध्येच केलेली असते.

बहुतेक सर्व अणुविद्युतकेंद्रात ज्या प्रकारचे इंधन वापरले जाते त्यातील भंजनक्षम भाग फक्त ०.७ ते ४ टक्क्यापर्यंत असतो. बोरॉन, कॅड्मियम यासारखे न्यूट्रॉन्सना पटकन शोषून घेणारे 'न्यूट्रॉन्सचे विष' त्यांच्या भंजनावर सतत नियंत्रण ठेवण्यासाठी बसवलेल्या 'कंट्रोल रॉड्स'मध्ये वापरले जाते. शिवाय या न्यूट्रॉन्सच्या जालिम विषांचा मोठा वेगळा साठा रिअॅक्टरच्या एका भागात 'शटऑफ'साठी जय्यत तयार ठेवलेला असतो आणि वेळ येताक्षणी तो आपोआप रिअॅक्टरच्या मुख्य गाभ्यामध्ये शिरून क्षणार्धात त्याचे कार्य पूर्णपणे बंद पाडतो. याला 'शटडाऊन' असे म्हणतात. जपानमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळीसुध्दा या प्रक्रियांनी त्यांचे काम चोख प्रकारे केले आणि भूकंपाचा इशारा मिळताच त्या भागातील सर्व अणुशक्तीकेंद्रे आपोआप ताबडतोब 'शटडाउन' झाली म्हणजे बंद पडली. त्यांमध्ये होत असलेल्या अणूंच्या विभाजनाच्या प्रक्रिया क्षणार्धात पूर्णपणे बंद झाल्या. त्यामधून आता अणूबाँबसारखा विस्फोट घडण्याची काळजी करण्याचे कारण नाही.

मग ही 'आणीबाणीची परिस्थिती' कशामुळे उद्भवली आहे? युरेनियमच्या अणूचे विभाजन झाल्यानंतर त्याचे जे दोन तुकडे होतात त्यात क्रिप्टॉन, झेनॉन, आयोडिन, सीजीयम यासारखे किरणोत्सर्गी पदार्थांचे परमाणू असतात. रिअॅक्टरमधील भंजनक्रिया बंद झाल्यानंतरसुध्दा त्यांच्यापासून रेडिओअॅक्टिव्हिटीचे उत्सर्जन चालत राहते आणि त्या क्रियेमधूनसुध्दा बरीचशी ऊर्जा बाहेर पडत असते. लोहाराच्या भट्टीमधील आग विझल्यानंतरसुध्दा बराच काळ त्याची धग शिल्लक असते त्याप्रमाणे पण फार मोठ्या प्रमाणावर अणूभट्टीसुध्दा दीर्घकाळपर्यंत धगधगत राहते. या ऊष्णतेमुळे रिअॅक्टरच्या अंतर्भागातले तापमान वाढत राहते. तसे होऊ नये यासाठी 'बंद' असलेल्या रिअॅक्टरलासुध्दा थंड करत राहणे आवश्यक असते. मोटारीचे इंजिन थंड ठेवण्यासाठी त्याचा बाजूचा भाग (जॅकेट) पाण्याने वेढलेला असतो आणि इंजिनामधील ऊष्णतेमुळे तापलेले पाणी रेडिएटरमध्ये फिरवून थंड केले जाते. साधारणपणे अशाच व्यवस्थेने बंद असलेल्या रिअॅक्टरला थंड ठेवले जाते.

अणुविद्युतकेंद्र व्यवस्थितपणे काम करत असतांना रिअॅक्टरमधील इंधनाच्या आजूबाजूने प्रवाहित असलेल्या पाण्यापासून वाफ तयार केली जाते आणि त्या वाफेवर टर्बाइन्स चालवून विजेची निर्मिती होते. केंद्र बंद केल्यावर टर्बाइन्स थांबतात, तरीसुध्दा रिअॅक्टरमधील इंधनामधून सतत काही ऊर्जा बाहेर पडतच असते. हे प्रमाण नंतर हळूहळू कमी होत जाते. ही ऊर्जा 'रिअॅक्टर व्हेसल'च्या बाहेर काढून तेथील तपमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी अणुइंधनाच्या सभोवती खेळणारे पाणी रिअॅक्टरव्हेसलच्या बाहेर ठेवलेल्या 'हीट एक्स्चेंजर'मध्ये नेऊन थंड केले जाते आणि थंड केलेले पाणी पुन्हा रिअॅक्टर व्हेसलमध्ये सोडले जाते. पाण्याचे हे अभिसरण सतत चालू ठेवण्यासाठी पंपांचा उपयोग केला जातो. पॉवरस्टेशनमधील विजेचे उत्पादन बंद झाले तरी बाहेरून मिळत असलेल्या विजेवर हे पंप चालतात. बाहेरील वीजपुरवठा ठप्प झाला तरी हे पंप चालवण्यासाठी खास डिझेल जनरेटर्स सज्ज ठेवलेले असतात. जगातील सर्वच न्यूक्लिअर पॉवर स्टेशन्समध्ये या सगळ्यांची चोख व्यवस्था केलेली असते आणि त्यांच्याकडून हे काम एरवी अगदी सुरळीतपणे चालत राहते. यापूर्वी या बाबतीत कोठेही आणि कधीच कसला त्रास झालेला नाही.

जपानमधील भूकंप आणि सुनामीमुळे या वेळी नक्की काय आणि किती बिनसले याचा नीटसा उलगडा अजून झालेला नाही. फुकुशिमा येथे एकंदर सहा रिअॅक्टर्स आहेत. त्यापैकी तीन रिअॅक्टर्स या घटनेच्या वेळी काम करत होते. इतर रिअॅक्टर्स मेंटेनन्ससाठी बंद ठेवलेले असल्यामुळे त्यांना विशेष धोका नव्हता. भूकंप येताक्षणीच त्या वेळी चालत असलेले तीन रिअॅक्टर्स ताबडतोब बंद केले गेले आणि पहिला तासभर त्यांना थंड करण्याचे कामसुध्दा व्यवस्थितपणे चाललेले होते. त्यानंतर सुनामी आला आणि त्या भागाला वीजपुरवठा करणा-या सर्व ट्रान्स्मिशन टॉवर्सना त्याने धराशायी केल्यामुळे विजेचा पुरवठा संपूर्णपणे बंद पडला. डिझेल इंजिनांचेसुध्दा नुकसान झाल्यामुळे अथवा त्यांच्या तेलाचा साठा वाहून गेल्यामुळे ती सुरू झाली नाहीत. त्यानंतर तेथील तंत्रज्ञ ती इंजिने किंवा वेगळे जनरेटर्स सुरू करून त्यावर हे पंप चालवण्याचे प्रयत्न करत राहिले. पण बंद झालेल्या तीन रिअॅक्टर्समध्ये पाण्याचे अभिसरण अपेक्षेप्रमाणे होत नव्हते एवढे नक्की आणि त्या रिअॅक्टरांना थंड करण्यासाठी आवश्यक असलेला पाण्याचा पुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांच्यापुढे सध्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.

या रिअॅक्टरमधील इंधन उभ्या कांड्यांच्या (फ्यूएल रॉड्स) स्वरूपात असते. रिअॅक्टर व्हेसलमधून होत असलेला पाण्याचा प्रवाह थांबला किंवा तो फार कमी झाला की आधीपासून त्या उभ्या कांड्यांच्या आजूबाजूला असलेल्या पाण्याची वाफ होऊन ती वरील भागात जाते आणि रिअॅक्टरच्या पात्रामधील पाण्याची पातळी कमी होत जाते. त्यामुळे इंधनाचे तपमान जास्तच वाढत जाते. वाढत वाढत ते एका मर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर त्याचा पाण्याशी संयोग होताच पाण्याचे पृथक्करण होऊन हैड्रोजन वायू तयार होतो आणि त्याचा दाब वाढत जातो. त्यामुळे बाहेरून आत पाठवल्या जाणा-या पाण्याला विरोध होऊन त्याचा प्रवाह आणखी कमी होतो किंवा बंदच होतो. दाब कमी करण्यासाठी हा हैड्रोजन वायू पात्राच्या बाहेर सोडावा लागतो किंवा एकाद्या फटीतून तो बाहेर निसटतो. बाहेर पडलेल्या गरमारगम हैड्रोजन वायूचा बाहेरील हवेशी संपर्क येताच त्याचा स्फोट होतो. फुकुशिमा येथील रिअॅक्टरबिल्डिंग्जमध्ये असे स्फोट झाल्याची बातमी आहे. घरातील गॅस सिलिंडरचे फुटणे किंवा रस्त्यावरील अपघातात पेट्रोल टँकरचा उडालेला भडका यांच्याप्रमाणे हे सुध्दा 'रासायनिक स्फोट' आहेत. रिअॅक्टरबिल्डिंगमध्ये झालेले हैड्रोजन वायूचे स्फोट म्हणजे 'अॅटम बाँब' नाहीत किंवा 'हैड्रोजन बाँब' नव्हेत. 'आण्विक' स्फोटाची तीव्रता रासायनिक स्फोटांच्या कोट्यवधी पटीने जास्त असते. त्यामुळे आजूबाजूचा सारा प्रदेश पार नष्ट होऊन जातो. या दोन प्रकारच्या विस्फोटांमध्ये गल्लत करू नये.

हैड्रोजनवायूच्या या स्फोटांमुळे रिअॅक्टरबिल्डिंगचे छप्पर उडाले असले, बाह्य भिंती पडल्या असल्या तरी आतल्या बिल्डिंग शाबूत आहेत. मुख्य म्हणजे ज्या रिअॅक्टर व्हेसल्समध्ये सर्व किरणोत्सर्गी द्रव्ये बंद असतात, त्यांना अजून गंभीर धोका पोचलेला नाही. तसेच त्याच्या सभोवार असलेले मजबूत कंटेनमेंटसुध्दा जवळजवळ अभंग राहिले आहे. पण कोणत्याही क्षणी त्यामधून भरपूर विकीरण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून वीस किलोमीटर्स परीघामधील सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षित जागी नेण्यात आले आहे. त्याच्या पलीकडे राहणा-या लोकांना सावध केले गेले आहे. येनकेन प्रकारेण रिअॅक्टर व्हेसल्समध्ये पाणी पाठवत राहण्याचे खटाटोप चाललेले आहेत. त्यात यश मिळेल अशी आशा आहे. पण तरी सुध्दा जास्तीत जास्त काय वाईट होऊ शकेल याचा विचार करून त्या दृष्टीने पाउले उचलण्याचे कामसुध्दा चालले आहे.

जर रिअॅक्टरमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी जाऊन ते त्याला थंड करू शकले नाहीच तर इंधनाच्या छड्या अधिकाधिक गरम होत जातील. त्यांचा 'मेल्टिंग पॉइंट' गाठला गेल्यास त्या वितळून खाली पडतील. याला 'कोअर मेल्ट़डाऊन' असे म्हणतात. फुकुशिमा येथील तीनही रिअॅक्टर्समध्ये काही प्रमाणात मेल्टडाऊन झाले असावे अशी शंका आहे. रिअॅक्टरच्या आत नक्की काय चालले आहे ते आज कळण्याचा मार्ग नाही. आपण फक्त त्याचे बाह्य दुष्परिणाम पाहू शकतो आणि त्यांचे मोजमाप घेऊ शकतो. अशा वितळलेल्या धातूंच्या रसामुळे रिअॅक्टर व्हेसलचे सहासात इंच जाडीचे पात्रसुध्दा वितळू लागले तर कदाचित ते फुटेल किंवा त्याच्या तळाला भोक पडून त्यामधून आतले बरेचसे रेडिओअॅक्टिव्ह पदार्थ बाहेर पडतील. त्यातले बरेचसे पदार्थ कंटेनमेंटमध्येच बंदिस्त राहतील अशी अपेक्षा आहे. रिअॅक्टर बिल्डिंगचेच छप्पर उडालेले असल्यामुळे कंटेनमेंटमधून बाहेर पडलेले वायुरूप पदार्थ हवेत मिसळून जगभर पसरतील आणि द्रवरूप पदार्थ जमीनीत शिरून भूगर्भात पसरतील. घनरूप पदार्थ तेवढे तिथेच राहतील. तिथे अॅटमबाँबचा स्फोट मात्र होणार नाही.

यापूर्वी अमेरिकेतील 'थ्री माइल आयलंड' या न्यूक्लियर पॉवर स्टेशनमध्ये 'कोअर मेल्टडाऊन' झाले होते, पण त्या वेळी सर्व किरणोत्सर्गी पदार्थ रिअॅक्टरच्या कंटेनमेंटच्या आतच राहिले. त्यांच्यापासून बाहेर कोणालाही कसलाही उपसर्ग झाला नाही. त्या अपघातात सुध्दा पॉवर स्टेशनचे भरपूर नुकसान झाले. ते युनिट कायमचे बंद झाले. म्हणजे त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. पण कोणाच्या आरोग्याला धक्का लागला नाही. रशियामधील चेर्नोबिल येथे झालेल्या अपघातात मात्र भरपूर मोठ्या प्रमाणात रेडिओअॅक्टिव्ह द्रव्ये रिअॅक्टर बिल्डिंगच्या बाहेर पडून वातावरणात पसरली. याचे कारण त्या जागी चांगले कंटेनमेंट नव्हते. चेर्नोबिल दुर्घटनेमुळे जे लोक प्रत्यक्ष घटनास्थळी मृत्यूमुखी पडले त्यातले बहुतेक सर्वजण रशीयातल्या अग्निशामक दलाचे वीर जवान होते. किरणोत्सर्गामुळे बाहेरच्या जगातील खूप लोकांना बाधा झाली होती. त्यातले अनेक लोक त्यांना झालेल्या दुर्धर आजारामुळे वारले किंवा अपंग झाले. त्यांचा नेमका आकडा सांगता येणार नाही, कारण त्या विषयावर बराच वाद आहे. चेर्नोबिलचा परिसर उध्वस्त झालेला नाही. त्या जागी असलेले इतर रिअॅक्टर एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरसुध्दा काम करत राहिले होते. चेर्नोबिलला घडलेली ही घटना अत्यंत भयानक होती यात शंका नाही. तिची पुनरावृत्ती होता कामा नये यासाठी त्यानंतर जगभरातील सर्व ठिकाणच्या रिअॅक्टर्सवर जास्तीचे अनेक निर्बंध घालण्यात आले आणि ते अंमलातही आणले जात आहेत. पण या दुर्घटनेला हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर झालेल्या बाँबहल्ल्यांच्या मालिकेत बसवता येणार नाही. त्या दोन्ही हल्ल्यांमध्ये झालेली हानी अनेकपटीने मोठी होती.

चेर्नोबिलमधील अतीतीव्र विकीरणकारी द्रव्ये तो रिअॅक्टर चालत असतांना झालेल्या अपघातात बाहेर पडली होती. ती विषारी द्रव्ये एकाद्या सुनामीसारखी इतक्या अचानकपणे वातावरणात मिसळली की त्या भागातील लोकांना त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करून घेण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. त्यांना तशी संधीच मिळाली नाही. फुकुशिमाचे रिअॅक्टर बंद होऊन आता पाचसहा दिवस उलटले आहेत. त्यामुळे त्यातून बाहेर पडू पाहणा-या द्रव्यांची तीव्रता कमी झाली असणार. ती आता कदाचित फार मोठ्या प्रमाणात बाहेर पडणार नाहीत आणि पडली तरी त्यांची तीव्रता चेर्नोबिलच्या मानाने कमी राहील असा अंदाज जपानच्या अधिकृत गोटातून व्यक्त गेला जात आहे. त्या भागातील दोन लाख लोकांचे केलेले स्थलांतर आणि त्या पलीकडच्या लोकांना दिलेल्या सूचना, वाटली गेलेली औषधे यासारख्या सावधगिरीच्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत. फुकुशिमा येथील रिअॅक्टर्समध्ये होत असलेल्या घटना अमेरिकेतील थ्री माइल आयलंडपेक्षा नक्कीच अधिक भीषण आणि धोकादायक आहेत. पण त्या चेर्नोबिलएवढ्या होऊ नयेत यासाठी शर्थीचे प्रत्न चालले आहेत. त्यांमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी यांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही.

आज अण्वस्त्रधारी देशांची संख्या वाढली आहे, त्य़ांच्यातले काही देश परस्परांचे हाडवैरी आहेत. त्यांचेमध्ये महायुध्द भडकण्याचा धोका आहे. अतिरेकी कृत्ये करणा-या दहशतवादी शक्तींची संख्या आणि सामर्थ्य वाढतच चालले आहे. त्यांच्या हातात जर अण्वस्त्रे पडली तर ते त्याचा कसा उपयोग करतील याचा नेम नाही. अशातून अण्वस्त्रांचे स्फोट घडण्याची टांगती तलवार मात्र आपल्या डोक्यावर टांगलेली आहे.

Wednesday, March 09, 2011

महिला दिवस जिंदाबाद, थँक यू गूगल !

जागतिक महिला दिवस आणि गूगल सर्च या दोन गोष्टींचा आपसात काय संबंध असेल? बुचकळ्यात पडलात ना? माझ्या बाबतीत त्यांचा एकमेकांशी संबंध येणार आहे असे मलासुध्दा कधी स्वप्नातही वाटले नव्हते. पण अचानक तो आलेला दिसला, तेंव्हा त्याबद्दल लिहायला एक आयता विषय मिळाला.

कोणी एकादे चिटोरे लिहिले तरी दुस-या कोणीतरी ते वाचावे हा उद्देश ते चिटोरे लिहिणा-याच्या मनात असतो. ते चिटोरे त्या संभाव्य वाचकापर्यंत पोचवण्याची तजवीज तो करतो. एवढे दिवस या ब्लॉगवर मी फक्त स्वांतसुखाय, म्हणजे आपल्या मनाच्या समाधानासाठी (त्याची लिहिण्याची हौस भागवण्यासाठी) लिहितो आहे असे जरी मी इतरांना सांगितले तरी आपल्या मनाचे काय? दुस-या कोणी ना कोणी आपले लेखन वाचावे असे त्या मनालासुध्दा वाटत राहते त्याचे काय करणार? ते वाचले जात असल्याचे जोपर्यंत मनाला समजत नव्हते तोपर्यंत ते अस्वस्थ रहायचे. हा अट्टाहास कशासाठी करायचा असा प्रश्न स्वतःलाच विचारून त्याचे समर्पक उत्तर न मिळाल्याने ते बेचैन होत असे. इंटरनेटवरील स्थळांना भेट देणा-या लोकांची गणना करण्याचे तंत्र विकसित झाले आणि आपल्या स्थळाला भेट देणा-यांचा आकडा समजण्याची सोय झाली तेंव्हा त्यातून मनाला दिलासा मिळावा म्हणून मीही त्या यंत्रणेचा उपयोग करून घेतला. जालावर भटकतांना इथपर्यंत आलेल्या लोकांपैकी काहीजण तरी या पानावर लिहिलेला मजकूर वाचून पहात असतील या कल्पनेने मनाला बरे वाटायला लागले.

दरवेळी नवा भाग लिहिण्यासाठी या ब्लॉगचे पान उघडले की इथे येऊन गेलेल्या पाहुण्यांचा आकडा ठळकपणे दिसतो. दिवसाला शंभर दीडशेने तो वाढतांना पाहून मनाचे समाधान होत होते. पण काल मी हे पान उघडले तेंव्हा त्या आकड्यात एकदम सातआठशेची घसघशीत वाढ झालेली पाहून थोडा धक्का बसला. गेले काही दिवस मी संस्कृत, संस्कृती यासारख्या रुक्ष विषयावर लिहीत असल्यामुळे ते आवर्जून वाचावे असे खूप लोकांना वाटेल अशी आशा नव्हती. माझ्या ब्लॉगचा टीआरपी किंचित कमीच होत चालला आहे असे वाटत होते. मग त्याने एकदम अशी उसळी कशी मारली हे एक गूढ होते.

आजचे वर्तमानपत्र ही उद्याची रद्दी असते असे एक सुवचन आहे. ब्लॉगच्या बाबतीतसुध्दा ते लागू पडते अशी सर्वसाधारण समजूत आहे. रोजच्या रोज त्या दिवसाच्या तात्कालिक विषयावर लिहिल्या जाणा-या ब्लॉगला भेट देणारे रोज नवे लिखाण वाचण्यासाठीच येत असतात. नेदर्लंडबरोबर काल झालेल्या मॅचमध्ये आपल्या क्रिकेटवीरांनी काय कर्तृत्व गाजवले हे उद्यापरवा कोणीसुध्दा वाचणार नाही. याच कसोटीवर पाहता माझ्या ब्लॉगला भेट देणा-यांची संख्या अचानक कशी वाढली याचे मलासुध्दा आश्चर्य वाटले.

ब्लॉगरने आता स्वतःचे स्टॅटिस्टिक्स द्यायला सुरुवात केली आहे. त्यावर नजर टाकल्यावर या गूढाचा उलगडा झाला. आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्य यंदा मी काहीच लिहिले नव्हते. पण मागील दोन वर्षांमध्ये लिहिलेल्या लिखाणाला सहाशेहून जास्त लोकांनी गेल्या दोन दिवसात भेटी दिल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी मी काही लिहिले होते त्याची मला आता आठवण नसली तरी गूगलसर्चने ते शोधून काढून त्याचे धागे दिले आणि ते पकडून वाचकांनी त्यावर टिचकी मारली हे पाहून मी थक्क तर झालोच तसेच मला खूप आनंदसुध्दा झाला. गूगलमध्ये शोध घेतांना असंख्य नोंदी सापडतात, पण त्यातल्या फक्त पहिल्या काही नोंदींचे धागे येतात. त्यानंतर पुढे पुढे जाऊन शोध घ्यावा लागतो. हा क्रम कोठल्या निकषावर लागतो हे मला माहीत नाही. पण या वेळी मला त्यातून नक्कीच अनपेक्षित लाभ झाला यात शंका नाही.
यासाठी गूगलचे धन्यवाद

Tuesday, March 08, 2011

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ७ (अंतिम)

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ७ (अंतिम)

संस्कृतीची एक अत्यंत सोपी व्याख्या मला कॉलेजात असतांना मिळाली होती आणि ती अजून माझ्या लक्षात राहिली आहे. निसर्गनिर्मिति म्हणजे 'प्रकृति', त्यातली सुधारणा ही 'संस्कृति' आणि बिघाड म्हणजे 'विकृति' अशा त्या व्याख्या होत्या. संस्कृति या संस्कृत भाषेमधील शब्दाचा मूळ अर्थ कदाचित तसा असावा. माणसांच्या बाबतीत पाहिल्यास बालकात असलेला निरागस मनमौजीपणा ही त्याची प्रकृती, मोठे होतांना अंगात बाणवलेली संयमी आणि परोपकारी वृत्ती वगैरे संस्कृती आणि मनात भिनलेला दुष्टपणा, क्रौर्य ही विकृती असे मी समजत आलो आहे. संस्कृति हा शब्द मराठी भाषेत बोलला जातांना मला तरी 'संस्कृती' असाच ऐकू येतो. यामुळे मी तो तसा लिहिला आहे. आज त्याला इतर काही अर्थ चिकटले आहेत.

वन्य पशूंप्रमाणे अन्नाच्या शोधात रानोमाळ भटकत फिरणारे आदिमानव एका जागी राहून शेती, पशुपालन, उद्योगधंदे वगैरे करू लागले, रानटी टोळ्यांचे रूपांतर सभ्य समाजात झाले हा सिव्हिलायझेशनचा भाग होता. मिळालेल्या स्थैर्याचा फायदा घेऊन त्यांनी साहित्य, संगीत, कला आदिमध्ये प्रगती करून आपल्या जीवनाचा स्तर उंचावला हे कल्चरमध्ये येते. भाकरी व फूल याविषयीच्या एका सुप्रसिध्द जुन्या चिनी उक्तीचा आधार घेतला तर सिव्हिलायझेशनचा संबंध मुख्यतः भाकरीशी आणि कल्चरचा फुलाशी होता. धर्म, न्याय, विज्ञान, तंत्रज्ञान आदि गोष्टींची गरज आणि उपयुक्तता दोन्ही बाबतीत होती. संस्कृतीच्या आजच्या कक्षा इतक्या रुंदावल्या आहेत की या सगळ्यांचा समावेश त्यात केला जातो.

देश, वंश, भाषा, धर्म वगैरेंबरोबर चालीरीती, रूढी वगैरे बदलत असतात. जाती, पोटजातींमध्ये सुध्दा काही बाबतीत त्या वेगळ्या असतात. कधीकधी त्यावरून 'त्यां'ची संस्कृती वेगळी आहे असे म्हंटले जाते तर कधीकधी "थोडा फरक असला तरी तेसुध्दा मराठीच किंवा भारतीयच आहेत" असेही सांगतात. आपल्यातलाच एकादा माणूस जेंव्हा धक्कादायक पध्दतीने वागतो तेंव्हा "त्यांच्या घरातले सगळे असलेच आहेत." असे म्हणून त्यांच्या घरापुरती एक वेगळी संस्कृती असल्याचे दाखवले जाते. दोन समाजांमधला फरक किती सेंटीमीटर किंवा अंशांपेक्षा अधिक असल्यास त्यांच्या संस्कृती वेगळ्या आहेत असे समजावे असे त्याचे मोजमाप नाही. प्रत्येकजण वेळोवेळी निरनिराळ्या फूटपट्ट्या वापरतांना दिसतो.

संस्कृति या विषयावर आंतरजालावर उत्खनन करतांना एक धागा सापडला. विशेषतः वैदिक संस्कृतीचा मला काहीच गंध नव्हता. तिच्याबद्दल कुतूहल असल्यामुळे वाचून पाहिला. त्यात असे लिहिले आहे.
"वैदिक संस्कृति ही आजच्या भारतीय संस्कृतीहून मी निराळी समजतो. आज एकंदर सव्वाशे संस्कृति जगतीतलावर प्रतिष्ठित आहेत असे तज्ज्ञ मानतात. वैदिक संस्कृति ही त्या ‘अनेकातली एक’ संस्कृति नव्हे. सर्व संस्कृतींना अधिष्ठानभूत असणारी जी एक संस्कृति तिचे नाव वैदिक संस्कृति असे आहे. एखाद्या कालखंडापुरती, स्थल-विशेष-निष्ठ अशी ही संस्कृति नव्हे. डॉ.स्पेंग्लर या सुप्रसिद्ध जर्मन पंडिताने सुचविलेले संस्कृतीचे नियम व अनु्क्रम वैदिक संस्कृतीला लागू होत नाहीत. जणू काय, जायते, अस्ति, वधते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यति हे षड्‍-विकार प्रत्येक संस्कृतिला अनिवार्य आहेत, असे स्पेंग्लर म्हणतो. प्रत्येक संस्कृति ही एक सजीव प्रकृति (Organism) आहे व वरील अवस्थांमधून जाणे तिला अपरिहार्य आहे. भारतीय संस्कृति ही विनाशोन्मुख झाली आहे, असेही त्याचे एक विधान आहे. ते अल्प अर्थाने खरेही असेल. पण वैदिक संस्कृति ही अमर आहे, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.
वैदिक संस्कृति ही आदर्श संस्कृति होय. प्रज्ञान, समता, विश्वाचे ईशावास्यत्व हे वैदिक संस्कृतिचे व्यावर्तक त्रैगुण्य आहे. ज्या संस्कृतीत ही वैशिष्ट्ये आहेत ती संस्कृति वैदिक संस्कृतीची प्रतिनिधी आहे. मानवकुल एक आहे. मानवी संस्कृति एकच आहे. आचारविचारांच्या गौण वैशिष्ट्यांमुळे निष्पन्न होणारी सांस्कृतिक विविधता ही मूलभूत एकात्मतेला संपन्नता आणणारी आहे, नष्ट करणारी नव्हे."
- धुं. गो. विनोद
वैदिक संस्कृति किती महान होती हे वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोतच. तिलाच प्राचीन भारतीय संस्कृती म्हणतात असे वाटले होते. तिच्या स्वरूपाबद्दल किंवा वैशिष्ट्यांबद्दल मला तरी यातून काहीही बोध झाला नाही. ती आपण स्वतःच अजरामर असल्यामुळे कोणीही तिची काळजी करण्याचे कारण नाही इतके समजले.

संस्कारांमुळे चांगला बदल होतो. या अर्थानेच 'संस्करण' हा शब्द शोधून काढला असावा किंवा निर्माण केला गेला असावा. पुस्तकाच्या 'एडिशन' साठी 'आवृत्ती' हा शब्द प्रचलित आहे. पण आवृत्ती म्हणजे ती जशीच्या तशी 'पुनरावृत्ती' असावी असे वाटते. पूर्वीच्या आवृत्तीमधल्या चुका दुरुस्त कराव्या, पुस्तकाचे रूप अधिक आकर्षक आणि वाचनीय करावे वगैरे उद्देशाने नव्या आवृत्तीमध्ये बदल केले जात असतात. त्यामुळे 'सुधारलेली आवृत्ती' असेही लिहिले जाते. हिंदी भाषेतील पुस्तकांच्या नव्या एडीशनला 'संस्करण' म्हणतात. मला हा शब्द जास्त समर्पक वाटतो. ज्या काळात संस्कृत भाषा बोलली जात असे त्या काळात छापखाने नव्हते आणि ग्रंथांच्या प्रती हातानेच काढाव्या लागत असत. त्या काळात या दृष्टीने संस्करण या शब्दाला अर्थ नव्हता. त्यामुळे तो शब्द प्रचारात तरी होता की नाही कुणास ठाऊक. असलाच तर त्याचा त्या काळातल्या संदर्भात निराळा अर्थ असण्याची शक्यता आहे.

संस्कृत, संस्कृति किंवा संस्कृती, संस्कार आणि संस्करण या शब्दांशी माझा जेवढा अल्पसा संबंध आला त्यावरून एवढे लिहून ही लांबलेली मालिका संपवत आहे.

. . . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)

Monday, March 07, 2011

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ६

'संस्कृती' हा शब्द निदान एकदा तरी वाचनात आला नाही किंवा कानावर पडला नाही असा एक दिवससुध्दा जात नसेल. तो शब्द आता आपल्या अगदी अंगवळणी पडला आहे, किंवा घासून गुळगुळीत झाला आहे. 'भारतीय संस्कृती'चे संरक्षक उदंड झाले आहेत. ती महान प्राचीन संस्कृती आता कशी पार लयाला चालली आहे याचे रडगाणे ते निरनिराळ्या मंचांवरून सारखे ऐकवत असतात. शिवाय 'ऑफिसातली संस्कृती', 'घरातली संस्कृती', त्यात पुन्हा 'माहेरची संस्कृती' आणि 'सासरची संस्कृती', 'कट्ट्यावरची संस्कृती', 'गुत्त्यावरली संस्कृती', 'रक्षकदलाची संस्कृती', 'रिक्षावाल्यांची संस्कृती' असल्या अगणित प्रकारच्या संस्कृतींनी आपल्याला वेढून ठेवले आहे.

मी लहान असतांना 'संस्कृती' या शब्दाचे इतके मुबलक प्रचलन झालेले नव्हते. प्राचीन काळातल्या इतिहासात 'मेसापोटेमिया' नावाच्या अनोख्या देशातल्या 'युफ्रेटिस आणि टायग्रिस' नावांच्या नद्यांच्या काठी 'बाबिलोनियन' नावाची संस्कृती होऊन गेली म्हणे. यातल्या एका अक्षरालाही आमच्या दृष्टीने कणभर महत्व वाटायचे कारण नव्हते. पूर्वीच्या आपल्याच देशातल्या पण आता पाकिस्तानात गेलेल्या 'मोहेंजोदारो आणि हडप्पा' गावांजवळ केलेल्या उत्खननात मातीच्या ढिगा-यांच्या खाली जुनी घरे मिळाली आणि त्यात खूप पूर्वीच्या काळचे खापरांचे तुकडे आणि दगडाच्या ओबडधोबड आकृत्या सापडल्या. ती 'सिंधू नदी संस्कृती' होती. पुस्तकात छापलेली त्यांची चित्रे पाहून मला तरी त्यांचे जरासुध्दा कौतुक वाटले नाही. पाच मार्कांचे वर्णन आणि जोड्या जुळवा, गाळलेल्या जागा भरा यासारखे दोन तीन मार्कांचे इतर प्रश्न परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेत असतील यापलीकडे आमच्या लेखी त्या संस्कृतींना महत्व नव्हते.

इतिहासाच्या मध्ययुगीन काळात भारतावर आक्रमण करून आलेले मुसलमान बादशहा आपल्या संस्कृतीला सोबत घेऊन आले. त्यांच्यात पुन्हा अरब, फारशी, पठाण, तुर्की वगैरे भेद होते. त्यांची भाषा, धर्म, आचार विचार, अन्न, कपडे, कलाकौशल्य वगैरे अनेक गोष्टींचा समावेश त्यांच्या संस्कृतींमध्ये होता. त्यांच्या आधी आलेले हूण, कुषाण वगैरे लोक आपापल्या संस्कृती विसरून गेले होते तसे मुसलमानांनी केले नाही. पुढील काळात इंग्रज लोक एक वेगळीच संस्कृती इकडे घेऊन आले. त्यांनी तिचा प्रसार चालवला. शिवाय हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत पसरलेल्या भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये निरनिराळ्या भाषा, चालीरीती, अन्नपदार्थ वगैरे प्रचलित होत होतेच. यातील वैविध्याची हळूहळू ओळख होत गेली. वेळोवेळी शाळेत होत असलेल्या 'सांस्कृतिक' कार्यक्रमांमध्ये नाचगाणी, नाटुकल्या, नकला वगैरे होत असत. वाचनाची आवड निर्माण झाल्यानंतर होत असलेल्या अवांतर वाचनामध्ये 'भारतीय संस्कृती', 'मराठमोळा संस्कृती' वगैरे शब्द यायला लागले. आणखी पुढे गेल्यावर 'अनेकतामें एकता' हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट आहे असेही वाचले. त्याबद्दलचा मनातला गोंधळ वाढतच गेला. "संस्कृती संस्कृती म्हणतात ते काय असते रे भाऊ?" असे विचारावे असे वाटत राहिले होते. पण याचे समर्पक उत्तर कोण देणार हे त्यावेळी समजत नव्हते.

'दिसामाजी कांहीतरी' या ब्लॉगवर एक लेख वाचला होता. तो या विषयावरला पहिलाच लेख होता. त्यातले विचार मला बरेचसे माझ्या विचारांशी जुळण्यासारखे दिसले म्हणून लेखकाच्याच शब्दात थोडक्यात देतो. पुढे त्याने काय लिहिले आहे हे मुळात वाचायला हवे.
"काळानुसार जसा जसा माणसाचा दृष्टीकोन व्यापक होत गेला तशी तशी संस्कृतीची व्याख्या पण बदलत गेली. कोणत्याही गोष्टीच व्याख्या करायची म्हटले कि त्यासाठी काही मेझरेबल क्वाण्टीटीज लागतात पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मेझरेबल नसतात. त्यातलीच एक म्हणजे संस्कृती. ..... सर्वसाधारणपणे आजच्या घडीला ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्यातले सर्वमान्य घटक म्हणजे – मानवता, कला, ज्ञान, श्रद्धा, सामाजिक अनुसरण, वृत्ती आणि मूल्य…
जेव्हा एखादी संस्कृती लयाला जाते म्हणजे नेमके काय होते? तर वर उल्लेखिलेल्या गोष्टी अस्तास जातात. बऱ्याचदा ती नष्ट होत नाही तर बदलत जाते. बाह्यतः आणि आत्मतः पण. पूर्वीची मुल्ये बदलतात, लोकांचा विचार बदलतो… आता असे म्हणू का कि म्हणून संस्कृती बदलली? संस्कृती ही काही थोड्या-फार बदलाने कुठे जात नसते. असे म्हणायचे कोण धाडस करेल कि संस्कृती बदललीच नाही? बदलली ना…पण असे कोण म्हणेल कि संस्कृती नष्ट झाली??? कोणीही नाही. भाषा, कपडे, समज, नीती, मुल्ये, आचार-विचार यांची उत्क्रांती होत गेली. त्यामुळे ही गोष्ट प्रवाही आहे."

मला असे वाटते की सध्या वापरात असलेला 'संस्कृती' हा शब्दच मुळात परका असावा. 'सिव्हिलायझेशन' आणि 'कल्चर' या दोन वेगवेगळ्या आंग्ल शब्दांना मराठी प्रतिशब्द म्हणून कोणा पंडिताने 'संस्कृती' हा एकच शब्द निवडला आणि त्या इंग्रजी शब्दांचे अर्थ त्याला चिकटले.

. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Thursday, March 03, 2011

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ५

प्रत्येक जीव त्याच्या आधीच्या अनेक जन्मांमध्ये केलेल्या कृत्यांपासून मिळवलेल्या पापपुण्याचे 'पूर्वसंचित' बरोबर घेऊन येतो आणि त्याचा प्रभाव त्याच्या सध्याच्या जीवनावर पडतो असे म्हणतात. काही अगम्य, अनाकलनीय अशा गोष्टींचे स्पष्टीकरण त्यावरून दिले जाते. एकाद्या माणसाला अमूक एक गोष्ट का मिळाली किंवा दुस-या एकाद्याचे कशामुळे नुकसान झाले याचे नक्की कारण कधी कधी समजत नाही. अशा वेळी "पहिल्याने पूर्वजन्मात काहीतरी चांगले करून ठेवले असावे" किंवा "दुस-याने काहीतरी वाईट कृत्य केले असेल" असे कधी गंभीरपणे किंवा कधी विनोदाने सांगितले जात असते. याला हिंदूधर्मशास्त्राची मान्यता असेल, पण वैज्ञानिक दृष्ट्या पूर्वसंचिताच्या संकल्पनेला कसलाही शास्त्रीय आधार नाही.

आईवडिलांचे काही गुण त्यांच्या अपत्यांमध्ये येतात असे दिसते. यावरून "खाण तशी माती" अशी म्हणसुध्दा पडली आहे. जनुकांच्या माध्यमातून हे गुणदोष पुढील पिढीला दिले जातात हे शास्त्रीय संशोधनातूनसुध्दा सिध्द झाले आहे. पण आई किंवा बापाकडून कोणती आणि किती गुणसूत्रे, जनुके वगैरे त्यांच्या अपत्यांकडे जावीत आणि त्यांचे नेमके कोणते गुण किंवा दोष त्यांच्या मुलांनी किती प्रमाणात उचलावे वगैरे गोष्टी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. हे सगळे कसे आणि कशामुळे ठरते ते समजलेले नाही. शास्त्रज्ञांना या बाबतीत अजून फारसे सविस्तर ज्ञान प्राप्त झालेले नाही.

वरील दोन गोष्टी वगळता जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाच्या मनाची पाटी पूर्णपणे कोरी असते. आजूबाजूला दिसत असणारे आकार, त्यांच्या हालचाली ते पहात असते, ध्वनी ऐकत असते आणि त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते. जसजशी त्याची आकलनशक्ती वाढत जाते, तसतसा त्याला त्या गोष्टींचा बोध होत जातो. ते त्यातून भराभरा शिकत जाते, चालायला, बोलायला लागते, प्रश्न विचारू लागते. लिहायला, वाचायला शिकल्यानंतर ते पुस्तकातले ज्ञान मिळवायला लागते. लहान मुलांची वाढ होत असतांना अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न ती मुले करत असतातच, शिवाय त्यांचे पालक, शिक्षक आणि इतर वडीलधारी मंडळी त्यांना काही गोष्टी समजावून सांगतात, शिकवतात, त्यांच्याकडून करवून घेतात. या सगळ्यांमधून त्यांच्यात जो फरक पडत असतो त्याला 'संस्कार' असे नाव दिले गेले आहे.

'निसर्गनिर्मित गोष्टींचे मूळ स्वरूप कायम ठेवून त्यात माणसाने केलेले बदल' म्हणजे त्यावर केले गेलेले 'संस्कार' असे समजले जाते. उदाहरणार्थ शेंगदाणे भाजले किंवा तळले तर ते संस्कार झाले. त्याची कुटून तिखट चटणी किंवा गोड वड्या केल्या तर ते संस्कारामध्ये येत नाही, त्याच्या पलीकडे जाते अशी माझी समजूत आहे. माणसाच्या बाबतीत त्याच्या मनावर संस्कार केले जातात. त्यातून त्याचा स्वभाव, त्याची वागणूक वगैरेवर प्रभाव पडतो. हुषार माणूस गरज पडेल तेंव्हा ठरवून कृत्रिम रीतीने वेगळे वागू शकतो किंबहुना तो तसे करतच असतो, पण ज्या गोष्टी त्याच्या नकळत तो करत असतो त्यांच्या मुळाशी त्याच्या अंगातले उपजत गुण असतात, तसेच त्याच्या मनावर झालेले संस्कार असतात. लहानपणी मनावर झालेले संस्कार इतके खोलवर रुजलेले असतात की ते त्या माणसाच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनून जन्मभर त्याच्या सोबत राहतात. ते पुसण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागतात.

संस्कार हा शब्द सर्वसाधारणपणे चांगल्या अर्थाने वापरला जातो. कोणतेही पालक किंवा शिक्षक सहसा मुद्दामहून मुलांना वाईट मार्गाला लावणार नाहीत. पण ती लागली तर बहुतेक वेळी त्यालासुध्दा वाईट संगत हे कारण दाखवले जाते. 'चांगले' आणि 'वाईट' या शब्दांचे अर्थ निरनिराळ्या परिस्थितींमध्ये वेगळे निघतात. खूप श्रीमंत कुटुंबांकडे स्वयंपाकपाणी करण्यासाठी नोकरचाकर असतात. घरातल्या प्रत्येक माणसाने त्याला आवडेल तो पदार्थ यथेच्छ खावा आणि त्याला तो कमी पडता कामा नये असा हुकूम असल्यामुळे ढीगभर अन्न शिजवले जाते आणि घरातल्या माणसांची जेवणे झाल्यानंतर उरलेल्या अन्नाचे काय होत असेल याची फिकीर कोणीही करत नाही. अशा वातावरणात वाढलेल्या मुलांच्या मनावर तसेच संस्कार होतात, त्यांना तशाच संवयी लागतात. याउलट दरिद्री माणसांच्या घरात अन्नाचा प्रत्येक कण मोलाचा समजला जातो आणि वाया जाऊ दिला जात नाही. मध्यमवर्गीयांची अन्नान्नदशा नसली तरी ती होऊ नये म्हणून "पानात वाढलेले अन्न संपवलेच पाहिजे", "शिजवलेले सारे अन्न खाल्ले गेले पाहिजे" वगैरे शिकवण दिली जाते. शरीराला आवश्यकता नसतांना खाल्ले गेलेले जास्तीचे अन्न अपायकारक असते आणि तेसुध्दा एक प्रकारे वायाच जाते हे अनेक लोकांना कळले तरी वळत नाही. याला कारण लहानपणी मनावर झालेले संस्कार ! यातले कोणते संस्कार चांगले आणि कोणते वाईट याबद्दल वेगवेगळी मते असू शकतात.

पूर्वीच्या काळी रूढ असलेल्या एकत्र कुटुंबांमध्ये आजोबापणजोबा आणि आज्यापणज्यांपासून नातवंडे पणतवंडांपर्यंत खूप माणसे एकत्र रहात असत. त्यांनी आपसात भांडणतंटा न करता सामंजस्याने रहावे यासाठी घराघरात एक प्रकारची शिस्त पाळली जात असे. लहानपणापासूनच प्रत्येकाने ती अंगात भिनवावी या दृष्टीने मुलांच्या व मुलींच्या मनावर विशिष्ट प्रकारचे संस्कार प्रयत्नपूर्वक केले जात असत. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करायचे आणि ते कसे करायचे याचे नियम असत. परवचे आणि श्लोक वगैरेचे पाठांतर करून घेतले जात असे. प्रामाणिकपणा, विनम्रता, आज्ञाधारकपणा वगैरेंसारखे गुण शिकवले जात असत. त्यात आज्ञाधारकपणा हा सर्वात मोठा गुण समजला जात असे. मोठ्या माणसांनी सांगितलेले सर्व काही निमूटपणे ऐकून घ्यायचे, वर तोंड करून त्यांना उलट उत्तरे द्यायची नाहीत, त्यांची चूक काढायची नाहीच, त्यांच्या सांगण्याबद्दल शंकासुध्दा व्यक्त करायची नाही वगैरे बाबींचा थोडा अतिरेक होत असावा असे मला आता वाटते. सुमार वकूब असलेल्या मुलांसाठी ते ठीक असेलही, पण स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आणि कल्पकता यांच्या वाढीमध्ये त्या प्रकारच्या संस्कारांचा अडथळा येत असे. संयुक्त कुटुंब पध्दतीच आता मोडीत निघाली आहे आणि टेलिव्हिजनच्या प्रसारामुळे मुलांना लहानपणापासूनच बाहेरच्या जगात काय चालले आहे हे समजू लागले आहे. त्यामुळे कळत नकळत त्यांच्या मनावर होणारे संस्कार आता बदलले आहेत.

माणसाच्या जन्माच्याही आधीपासून ते मृत्यू होऊन गेल्यानंतरसुध्दा त्याच्यासाठी काही धार्मिक विधी केले जात असत. गर्भसंस्कारांपासून ते अंत्यसंस्कारापर्यंत करण्यासाठी अनेक संस्कार सांगितले गेले आहेत. जीवनाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर परमेश्वराचे स्मरण करून त्याचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुढील गोष्टी सुरळीतपणे पार पडोत अशी प्रार्थना त्या संस्कारांच्या प्रसंगी उच्चारण्यात येणा-या मंत्रांमध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्याबरोबर विशिष्ट विधी करण्याची रूढी पडली होती. ते संस्कार केल्यामुळे काही प्रमाणात त्या व्यक्तीच्या ऐहिक किंवा पारलौकिक जीवनात चांगला फरक पडतो असे समजले जात असे. पण बदललेल्या परिस्थितींमध्ये त्यांना अर्थ उरला नाही आणि श्रध्देची जागा ब-याच प्रमाणात तर्कसंगत विचाराने घेतली गेली असल्याने या परंपरा आता मागे पडत चालल्या आहेत.

संस्कार हा प्रकार वैश्विक आहे. स्थळकाळानुसार त्यांचा तपशील वेगळा असतो. चांगले संस्कार लाभलेला भारतीय मुलगा आल्यागेल्या मोठ्या माणसाच्या पाया पडून त्याला नमस्कार करेल, इंग्रज मुलगा हस्तांदोलन करून त्याची विचारपूस करेल किंवा "त्याची सकाळ, संध्याकाळ, किंवा रात्र चांगली जावो" अशी लांबण न लावता फक्त "गुड मॉर्निंग, गुड ईव्हनिंग, गुड नाईट" असे काही तरी उच्चारेल. जाता येता सारखे "थँक्यू, सॉरी" वगैरे म्हणणे हा देखील संस्कारांचाच भाग आहे. आधुनिक काळात हे संस्कारसुध्दा आपल्याकडील मुलांवर केले जात आहेत. कधी कधी ज्या स्वरांमध्ये ते शब्द म्हंटले जातात त्यात तो भाव मुळीसुध्दा दिसत नाही. कारण ते शब्द केवळ संवयीने उच्चारलेले असतात. त्यांचा अर्थ त्यात अपेक्षित नसतो आणि कोणी तो लावायचा प्रयत्नसुध्दा करत नाही.

. . . . . . . . . . . . . (क्रमशः)