Sunday, May 23, 2010

मराठी ब्लॉगर्सचा मेळावा

Saturday, May 22, 2010
मराठी ब्लॉगर्सचा मेळावा (पूर्वार्ध)

९ मे रोजी दादरला झालेल्या या मेळाव्याला मी उपस्थित राहिलो होतो. कदाचित मी लगेच त्याचा सविस्तर वृत्तांत लिहिलाही असता. इतर अनेक ब्लॉगर मित्रांनी तो लिहिला आहेच. पण त्या मेळाव्याहून परततांना बसमध्ये एक अजब व्यक्ती भेटली आणि आधी त्याच्याबद्दल लिहावे असे वाटले. त्यानंतर मी आठवडाभर पुण्याला गेलो होतो. आता दोन आठवडे झाल्यानंतर या विषयावर लिहिणे हे वरातीमागून घोडे आणण्यासारखे असले तरी किरकोळ गोष्टी विस्मृतीच्या आड गेल्यानंतर जे शिल्लक राहते तेवढेच आपल्या दृष्टीने महत्वाचे असते हे ही तितकेच खरे आहे.

''एकाच पिसांचे पक्षी एकत्र येऊन त्यांचा थवा बनतो'' अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. इतर तत्सम म्हणींप्रमाणेच हीसुध्दा बहुतेक वेळा मानवी जीवनाला उद्देशूनच उपयोगात आणली जाते. शाळेच्या गणवेषापासून ते सैनिक, टॅक्सीड्रायव्हर आणि बँडवाले वगैरेपर्यंत अनेक माणसे युनिफॉर्ममध्ये दिसतात आणि घोळक्यात वावरत असतात. आम्ही केसरीच्या टूरवर गेलो होतो तेंव्हा त्यांनी दिलेली कॅप घालून एकत्र फिरत होतो. ही बाह्य पिसे झाली. याखेरीज अनेक वेगवेगळ्या रंगांची अदृष्य पिसे धारण करून आपण त्या त्या पक्ष्यांच्या मेळाव्यामध्ये रमत असतो. गेल्या वर्षभराचाच आढावा घ्यायचा झाला तर अशा विविध प्रकारांच्या मेळाव्यांचे निरनिराळे अनुभव घेतले.

जवळच्या आप्तांच्याकडल्या किंवा घरच्याच कार्यात अंगावर पडेल त्या कामाचा आणि जबाबदारीचा वाटा उचलला, तर दूरच्या नातेवाइकांकडे जमलेल्या 'इतरेजनां'मध्ये सामील होऊन मिष्टान्नांचा मनसोक्त आस्वाद घेतला. कार्यालयीन किंवा व्यावसायिक जीवनात ज्यांच्या ओळखी झाल्या होत्या अशा लोकांकडल्या समारंभांमध्ये आजी माजी सहकारी आणि समव्यवसायी लोकांबरोबर बोलण्यात रमलो. या सगळ्या भेटीगांठींमध्ये एक समान सूत्र असते. जुन्या आणि मजेदार आठवणींना उजाळा देत पूर्वीचे संबंध पक्के करणे, सद्यस्थितीचा अंदाज घेणे आणि भविष्यकाळातल्या योजनांची स्वप्ने रंगवणे हे त्यात यायचेच, शिवाय दोघांनाही परिचित असलेल्या इतरांचा ठावठिकाणा अशा गप्पांमधून मिळतो. आधीपासून ओळख असलेल्या लोकांचे छंद माहीत असतात, त्यांनी कशात प्राविण्य मिळवले आहे हे ठाऊक असते, त्याबद्दल बोलता येते. कांहीच समानसूत्र नसले तरी आणि असले तरी हवापाणी, राजकारण, सिनेमा, नाटके, खेळ, महागाई, ट्रॅफिक जॅम वगैरे विषयांवर तर कोणाशीही बोलावे.

विजेची निर्मिती करण्याशी संबंधित अभियंत्यांची कार्यशाळा, श्रीमती कमलाताई काकोडकर यांनी लिहिलेल्या 'एक धागा सुताचा' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ, अखिल भारतीय गांधर्व महामंडळाचा वर्धापन दिन आणि परांजप्यांनी केलेले सोळा सोमवारव्रताचे उद्यापन अशा चार टोकाच्या चार प्रातिनिधिक समारंभांना मी गेल्या वर्षभरात हजेरी लावली होती. एकाद दुसरा अपवाद वगळतां या चार ठिकाणी जमलेली माणसे वेगळी होती. असे असले आणि समारंभाचे मुख्य प्रयोजन आणि त्याच्या संबंधाने केले गेलेले कार्यक्रम सर्वथा भिन्न प्रकारचे असले तरी त्या मेळाव्यात जमलेल्या लोकांबरोबर केलेले व्यक्तीगत संभाषण मात्र वर दिलेल्या प्रकारांत मोडणारे होते.

आंतर्जालावरील विश्व अगदी समांतर म्हणण्याइतके विस्तारलेले नसले तरी त्याने आपल्या जीवनात एक महत्वपूर्ण जागा तयार केली आहे. जेंव्हा जेंव्हा वेळ आणि संधी मिळेल तेंव्हा त्या विश्वात जावेसे वाटते आणि जाणे होते. तिथे कांही माणसांची अधून मधून तर कांहीजणांची वारंवार गांठ पडते, त्यातल्या कांहींबरोबर पटते कांहींबरोबर पटत नाही. त्यामुळे कोणाशी संवाद तर कोणाशी वाद होतो. यातून एक प्रकारची आपुलकी निर्माण होते, त्या लोकांना प्रत्यक्ष भेटायची इच्छा होते. ही उत्कंठा मलाच वाटते असे नाही, इतरांनाही तशी वाटत असते असे दिसते. मागे एकदा अमेरिकेतल्या एका अप्रसिध्द गांवी कांही दिवस माझा मुक्काम होता. त्याचा सुगावा लागताच जवळच राहणा-या मीनलताईंनी माझ्याशी संपर्क साधला आणि प्रत्यक्ष येऊन अगत्याने मला आपल्या घरी घेऊन गेल्या. केवळ आंतर्जालावर झालेल्या ओळखीतून इतके अपूर्व आदरातिथ्य मला मिळाले. मनोगत या संकेतस्थळाच्या ठाणेकट्ट्याला जायची संधी मला मिळाली होती. त्या जागी जमलेल्या मनोगतींची गट्टी पहाण्यासारखी होती.

मराठी ब्लॉग लिहिणा-यांची संख्या आता हजारावर गेली असून वेगाने ती वाढते आहे. ते लोक जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक देशांत आणि भारताच्या अनेक राज्यांत विखुरले असले तरी पुण्यामुंबईमध्ये त्यांची संख्या मोठी असणार हे साहजीक आहे. प्रत्येकजण स्वांतसुखाय लिहीत असला तरी आधी आपल्या ओळखीच्या लोकांनी आणि नंतर इतरांनी काय लिहिले आहे हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना असते. मुळात ब्लॉग लिहिणे हाच अजून तरी अवांतर उद्योग असल्यामुळे ज्यांना लष्करच्या भाकरी भाजायला आवडतात असे लोकच या फंदात पडतात. त्याशिवाय सुरुवातीला फक्त वाचन करणारेही असतात. ते कधीकधी अभिप्राय देण्यापुरते लिहितात. अशा लेखक वाचकांना एकत्र येण्याची इच्छा असते, पण त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन प्रयत्न करणे आवश्यक असते. इंग्रजीमध्ये ब्लॉग लिहिणा-यांची संख्या अफाट असली तरी पुण्यामुंबईला त्यांचे असे संमेलन भरल्याचे माझ्या ऐकीवात तरी नाही. कांही उत्साही पुणेकर मंडळींनी प्रयत्न करून मराठी ब्लॉगर्सचे पहिले संमेलन पुण्यात भरवले.

------------------------------------------------
मराठी ब्लॉगर्सचा मेळावा (उत्तरार्ध)

पुण्याच्या मराठी ब्लॉगधारकसंमेलनाला मिळालेले यश पाहता मुंबईतसुध्दा असे संमेलन भरवलेच पाहिजे असे अनेकांच्या मनात आले असणार, पण मुंबईतल्या जीवनात रोजच करावी लागणारी धडपड आणि त्यासाठी घालवावा लागणारा वेळ यांचा विचार करता हे जास्तीचे काम करणे जास्तच कठीण आहे. पण योजकस्तत्र दुर्लभः असे असले तरी कांचन, महेंद्र आणि रोहन यांनी मिळून चंग बांधला आणि असा मेळावा भरवायचे ठरवले. एकादा घरगुती कार्यक्रम करायचे ठरवतांनासुध्दा त्यासाठी कोणाकोणाला बोलवायचे यावर भरपूर विचार केला जातो. त्या कार्यक्रमात कोणाकोणाची उपस्थिती अत्यावश्यक आहे यापासून कोणाला बोलवायला हरकत नाही इथपर्यंत निरनिराळी वर्तुळे काढून त्यात येणा-या व्यक्तींची गणना केली जाते. त्यातले कोण कोण येण्याची शक्यता आहे हे अजमावून पाहून त्या प्रत्येक वर्तुळातली किती माणसे या कार्यक्रमाला येऊ शकतील याचा अंदाज घेतला जातो. हा कार्यक्रम घरातल्या किंवा शेजा-याच्या दिवाणखान्यात करायचा की अंगणात अथवा गच्चीवर मांडव घालायचा की कॉलनीमधला हॉल भाड्याने घ्यायचा आणि त्यासाठी काय करावे लागेल, किती खर्च येईल वगैरे पाहून अखेर त्याची रूपरेषा आणि आमंत्रणाची यादी वगैरे बाबत सारे ठरवले जाते.

या ब्लॉगर्सच्या मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी सगळीच सुरुवात शून्यापासून करावी लागणार होती, कारण मुंबईच्या परिसरात किती मराठी ब्लॉगधारक रहात असतील याची निश्चित गणना उपलब्ध नाही. त्यातल्या किती लोकांना मेळाव्यात येण्यासाठी उत्साह असेल, त्यातल्या किती लोकांशी संपर्क साधणे शक्य होईल आणि त्यातल्या किती जणांना येणे जमेल हे सगळेच अनिश्चित होते. पुण्याच्या मेळाव्यातून एक अंधुकसा अंदाज आला होता. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होईल अशी अपेक्षा होती. पण संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी करावी लागते तसे करायचे होते. या कार्यक्रमाच्या संयोजकांनी अत्यंत सुनियोजितपणे कामाची आखणी केली. मेळावा भरवायचे ठरल्यानंतर त्याची घोषणा आपापल्या ब्लॉग्जवर केलीच, आंतर्जालावरील मराठी भाषिकांच्या पंढरीवर म्हणजेच मिसळपाववरही त्याला प्रसिध्दी दिली. या कार्यक्रमासाठी एक बोधचिन्ह तयार केले आणि विजेटद्वारे ते कोणालाही आपल्या ब्लॉगवर लावण्याची सुविधा प्रदान केली. आंतर्जालावर भ्रमण करणा-या जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती या सर्वांमधून पोचवली गेली आणि लगेच त्यासाठी आपले नांव नोंदवण्याची व्यवस्थासुध्दा केलेली असल्यामुळे त्यांच्या आवाहनाला कल्पनेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. याशिवाय प्रत्यक्ष बोलून आणि टेलीफोनवरून अनेक लोकांशी संपर्क साधला असणारच आणि त्यातून अधिक नोंदणी झाली असणार.

हल्लीच्या काळातले कांही लोक लहान मुलाच्या वाढदिवसाचे काँट्रॅक्टसुध्दा एखाद्या इव्हेंट मॅनेजरला देतात आणि स्वतः पाहुण्यांसारखे कोचावर हाःशहुःश करत बसलेले दिसतात. या मेळाव्याचे संयोजक म्हणजे कांचन, महेंद्र आणि रोहन मात्र तो सुरू होण्याच्या आधीपासून तो संपेपर्यंत सतत हे त्यांच्या घरचे कार्य असल्याप्रमाणे वावरतांना दिसत होते. आलेल्या लोकांचे सस्मित स्वागत करणे, त्यांच्या बसण्याची तसेच खाण्यापिण्याची चोख व्यवस्था करणे आणि ती झालेली आहे याकडे लक्ष देणे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वगैरे सगळे कांही काम हे लोक मनःपूर्वक करत होते. अर्थातच कार्य सुसूत्रपणे पार पडल्याचे समाधानही निरोप घेतांना त्यांच्या चेह-यावर दिसले.

या मेळाव्याला येणा-या पाहुण्यांची नीट व्यवस्था करणे ही त्याच्या यशाची गुरुकिल्ली होती. त्यांच्या आंकड्याचा अंदाज आल्यानंतर तेवढ्या लोकांसाठी पुरेशा आकाराचा, आवश्यक अशा सुखसोयी असलेला आणि अफाट पसरलेल्या मुंबईतल्या सर्वांनाच येण्यासाठी सोयीस्कर अशा जागी असलेला हॉल निवडणे खूप महत्वाचे होते. त्यासाठी पहाणी करून त्यांनी केलेली निवड अचूक अशी होती. मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेमार्गांनी जोडलेली आणि नव्या मुंबईहून येण्यासाठी उत्तम बससेवा उपलब्ध असणारी दादर हीच सर्वात सोयीस्कर अशी जागा होती याबद्दल दुमत नव्हते. कार्यक्रमाचे स्थान सांगतांना तो हॉल सुप्रसिध्द श्रीकृष्ण बटाटेवडावाल्याच्या जवळ असल्याचे त्या संदेशात लिहिले होते. म्हणजे तिथे लवकर जाऊन पोचलो तर कार्यक्रमाला जाण्यापूर्वी आणि उशीर झाला तर तो संपल्यावर गरमागरम बटाटेवडे खायचे असे मनोमनी ठरवले. पण कार्यक्रमाच्या संयोजकांनी सर्व पाहुण्यांना जागेवरच मस्त बटाटेवडे तर पुरवलेच, त्याबरोबर चविष्ट पॅटीसचा बोनसही दिला.

या कार्यक्रमाची एक रूपरेषा (अजेंडा) ठरवण्यात आलेला होता. त्याचा मात्र अंमल करता आला नाही. नेमक्या त्याच दिवशी रेल्वेने मेगाब्लॉक घेतल्यामुळे बरेचसे ब्लॉगर वेळेवर हजर होऊ शकले नाहीत आणि त्यांची पुरेशी संख्या होण्यासाठी अर्धा तास तरी थांबावे लागले. सर्वांनी आपापली ओळख करून देण्यासाठी दीड तासांचा वेळ दिला होता. शंभर लोकांसाठी हा वेळ पुरेसा नव्हताच, शिवाय कांही लोकांना हातात माइक आल्यानंतर वेळेचे भान रहात नाही. चर्चेसाठी खास वेगळा वेळ दिलेला असतांना त्यातले मुद्दे ओळख करतांनाच मांडले गेले. सगळेच सन्मान्य अतिथी असल्यामुळे कोणालाही बोलतांना अडवणे संयोजकांना प्रशस्त वाटले नाही. या सगळ्या कारणांमुळे सगळा वेळ ओळखपरेड करण्यातच संपून गेला आणि त्यानंतर फारशी चर्चा होऊ शकली नाही.

संगणकावर देवनागरी लिपीत कसे लिहावे आणि आपले शुध्दलेखन कसे सुधारावे याबद्दलच थोडीशी चर्चा झाली. अनुभवी आणि तज्ज्ञ लोकांनी केले मार्गदर्शन नवख्यांना चांगले उपयुक्त वाटले असेल. मी हा प्रश्न चार वर्षांपूर्वीच माझ्यापुरता सोडवला असल्यामुळे माझ्या दृष्टीने त्यातून कांही लाभ झाला नाही. आंतर्जालावरून घेतल्या जाणा-या चित्रांबद्दल, म्हणजे त्यांच्या कॉपीराइट्सबद्दल थोडी चर्चा झाली, पण त्यातून मार्ग कसा काढायचा हे कांही समजले नाही. अशी उचलेगिरी न करणे हेच श्रेयस्कर आहे असे दिसले. आपले लेखन कसे सुरक्षित ठेवावे हे ही समजले नाही. गूगल सर्चवर माझे नांव टाकले तर माझाच ब्लॉग, माझ्याच नांवाने पण भलत्याच संकेतस्थळावर दिसतो. त्याला कांही जाहिरातीही जोडलेल्या असतात. त्याचा आर्थिक फायदा मला मिळत नाही, पण या ठिकाणी कोणीतरी तो वाचत असेल असे दिसते. त्यामुळे हा प्रकार चांगला आहे की वाईट यावर माझाच निर्णय झालेला नाही. वेळे अभावी मला हा प्रश्न तज्ज्ञापुढे ठेवता आला नाही.

ब्लॉगर्सच्या ओळखीच्या कार्यक्रमातूनही बरीच नवी माहिती मिळाली. शासनसंस्थेमध्ये ज्येष्ठ पदावर कार्यरत असलेल्या चतुरस्र लेखिका लीनाताई मेहेंदळे तब्बल बत्तीस ब्लॉग्ज चालवतात. वेगवेगळ्या विषयांसाठी वेगळा ब्लॉगच सुरू करायचा आणि त्यात भर टाकत रहायचे असे त्यांचे धोरण आहे. आपणच पूर्वी लिहिलेले लिखाण सापडणे सोपे जावे यासाठी त्यांनी ही युक्ती योजली आहे. पुढेमागे ते लेखन पुस्तकरूपाने प्रसिध्द करण्यातही त्याचा फायदा मिळेल. बरहा किंवा गूगलने दिलेली देवनागरीत लिहिण्याची सुविधा वापरतांना मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग करून लिहिले जाते. पण याची संवय झाल्यानंतर मुळाक्षरे, काना मात्रा वगैरे गोष्टी पुढील पिढी विसरून जाईल अशी भीती त्यांना वाटते. त्याऐवजी अआइई, कखगघङ वगैरे अक्षरे ओळीवार लिहिलेला कीबोर्ड तयार करावा असा मार्ग त्यांनी सुचवला आहे. त्यावर त्यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. रशियन किंवा जपानी भाषेत असे करणे शक्य असेल तर मराठीत कां नको हा त्यांचा प्रश्न वाजवी आहे. पण खुद्द इंग्रजी भाषेतली अक्षरे एबीसीडीई या क्रमाने न येता क्यूडब्ल्यूईआरटी येतात याला कोणाचा विरोध नाही. मराठी लिपी फोनेटिक असल्यामुळे तिची मुळाक्षरे ओळीने आली तर ती शोधणे सोपे जाईल खरे, पण हे कसे होणार हे मला तरी समजत नाही.

ब्लॉगिंगशी थेट संबंध नसलेली पण मराठी माणसाच्या जिव्हाळ्याची कांही माहिती मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक महासंकेतस्थळ उभारण्यात येत आहे. आजवर कोणत्याही महापुरुषावर कोणत्याही भाषेत तयार केल्या गेलेल्या साईटपेक्षा हे स्थळ मोठे असणार आहे. गेली कित्येक वर्षे त्यावर काम चालले असून ते आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोचले आहे. ते प्रसिध्द झाल्यानंतर सर्व ब्लॉगर्सनी त्या स्थळाला वारंवार भेट देऊन त्यावरील संदर्भपूर्ण माहितीचा कसून अभ्यास करावा असे कांहीतरी सांगितले जाईल असे मला वाटले होते. पण त्या संकेतस्थळावर वाचकांकडून प्रश्नांचा प्रचंड वर्षाव होणार आहे आणि सखोल अभ्यास करून त्यांची समर्पक उत्तरे देण्याचे मोठे काम आगामी काळात निर्माण होणार आहे वगैरे समजले, पण ब्लॉगलेखकांकडून त्याला कशी मदत होणे शक्य आहे ते कांही समजले नाही. कदाचित ब्लॉगलेखकांना गरज असल्यास लेखनिकाचे काम मिळेल असे त्यांना सुचवायचे असावे.

मराठी भाषा आणि लिपी याबद्दल चर्चा चाललेली असतांनाच वेळ संपत आल्याचे पाहून स्टार माझाच्या प्रसन्न जोशीने माइक हातात घेतला आणि चर्चेचे सांधे बदलून मराठी ब्लॉग्जचे सध्याचे स्वरूप कसे आहे आणि ते कसे असायला हवे यावर आपले सुविचार मांडले. बटाटावडा, गुढीपाडवा, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक एवढ्यातच मराठीपण संकुचित नसावे, त्याला वैश्विक रूप यायला हवे, जगातल्या इतर भाषांमधले उत्कृष्ट साहित्य मराठीत यावे आणि मराठीतले वाङ्मय जागतिक पातळीवर सगळ्या भाषांमधून वाचले जावे वगैरे बरेचसे स्वप्नरंजन त्यात होते. वेळे अभावी त्यावर फारसे प्रतिसाद येऊ शकले नाहीत. आजमितीला तरी मराठीतला कोणताच प्रतिष्ठित साहित्यिक ब्लॉगवर लिहीत नाही. कोणी ते लिहिले तर त्याला त्याचे मानधन कसे मिळणार हा कळीचा मुद्दा असल्यामुळे व्यावसायिक दृष्टीने ते नजरेच्या टप्प्यात दिसत नाही. हौस म्हणून, मनात येईल तसे, वाट्टेल ते वगैरे लिहिण्याची ऊर्मी शमवण्यासाठी बहुतेक लोक ब्लॉगचा आसरा घेचाच. या प्रकारातून सकस साहित्य निर्माण होण्याची कितपत अपेक्षा बाळगावी याला मर्यादा येणारच. प्रसन्नने उपस्थित केलेले सगळे मुद्दे पटण्यासारखे होते, पण प्रॅक्टिकल वाटले नाहीत.

पहिल्या भागात लिहिल्याप्रमाणे या मेळाव्यात चार लोकांच्या भेटी होतील एवढीच माझी माफक अपेक्षा होती ती मात्र पूर्ण झाली. प्रमोद देव यांची अत्यानंद या नांवाने मनोगतावर पहिली ओळख झाली होती. त्यावेळी माझ्याच अज्ञानामुळे आनंदघन या माझ्या ब्लॉगच्या नांवाने मी स्वतः ओळखला जात होतो. नंतर मिसळपाववर आल्यानंतर दोघांनीही आपापली खरी नांवे धारण केली. आंतरजालावरले हे आद्य काका संयोजकत्रयींच्या पाठीशी उभे राहून त्यांना मार्गदर्शन करत होते. विलेपार्ल्याहून आलेला एक आजोबांचा ( खरे तर पणजोबांचा) ग्रुप होता. एक लहानसे मूल जगाकडे कसे पहात असेल याचा विचार करून ते त्याच्या नांवाने ब्लॉगवर लिहिणारी आईमुलाची जोडी आली होती. कांचन, महेंद्र, हरेकृष्णजी वगैरेंनी मला (ब्लॉगमधल्या फोटोवरून) ओळखून अभिवादन केले. शंतनू आणि आल्हाद यापूर्वी मनोगताच्या कट्ट्यावर भेटले होते. नीरजा आणि सलिल यांची स्टार माझाच्या कार्यक्रमात ओळख झाली होती. याखेरीज केवळ नांवाने किंवा टोपणनांवाने माहीत असलेले अनेक ब्लॉगर प्रत्यक्षात पहायला मिळाले. त्यांचे विचार ऐकायला मिळाले. त्यातून कळत नकळत कांही ना कांही ग्रहण केले गेले असेलच आणि कदाचित ते माझ्या लेखणीतून बाहेर पडेलसुध्दा.

Tuesday, May 11, 2010

'तो' आणि मी

दादरला झालेल्या मराठी ब्लॉगर्सच्या मेळाव्याला हजर राहून मी वाशीला घरी परतत होतो. शिवाजी पार्कहूनच निघणारी बस पकडली आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेल्या राखीव जागेवर स्थानापन्न झालो. शेजारी माझ्याच वयाचे एक गृहस्थ येऊन बसले. बेस्टच्या बसमध्ये शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाबरोबर बोलायची पध्दत नाही. एकाद्या सीटवर आजूबाजूला बसलेल्या दोन व्यक्ती बोलतांना ऐकू आलेच तर त्या बहुधा आपापल्या सेलफोनवरून निरनिराळ्या लोकांशी बोलत आहेत असे दिसते. माझे तिकीट काढून झाल्यावर मी सुध्दा खिशातला मोबाईल काढला आणि त्यावरची बटने दाबायला सुरुवात केली. त्या वेळी माझ्या आप्तांपैकी कोणीतरी पुण्याहून वाशीला आणि वाशीहून ठाण्याला जाणार होते. तसे पाहता त्यांना माझ्या अनुमतीची किंवा मदतीची गरज नव्हती, त्यांचे ते बघायला समर्थ होते. पण संपर्काची सोय उपलब्ध असल्यामुळे त्यांची विचारपूस करणे हे माझे कर्तव्य असल्याचे मीच ठरवले होते. "इस रूटकी सभी लाइने व्यस्त हैं।, ये नंबर मौजूद नही है।, आप कतारमें हैं।" वगैरे निरर्थक वाक्ये ऐकत चार पाच प्रयत्न केले आणि ज्यांच्याशी संवाद साधला गेला त्यांना "निघालात कां? पोचलात कां?" वगैरे विचारून त्यांच्या 'मूव्हमेंट्स ट्रॅक' केल्या. (हा नेमका आशय मराठीत सांगणे मला तरी जमत नाही.)

मी आपल्या 'सांगाती'ला त्याच्या म्यानात ठाणबंद करून ठेवले तेवढ्यात शेजारून शब्द ऐकू आले, "काँग्रॅच्युलेशन्स!" आता शेजा-याचा भ्रमणध्वनी सुरू झाला असावा असे आधी मला वाटले. पण "हॅलो, कोण बोलतंय्? पाटील आहेत कां? मी आप्पा!" असले कोणतेही इंजिन नसतांना ही संवादाची गाडी कशी सुरू झाली अशा विचाराने चमकून बाजूला पाहिले. तिथे बसलेला 'तो' माझ्याकडेच पहात होता. माझ्या डोक्यावर एकादा मुकुट, गळ्यात फुलांचा (नोटांचा असेल तर फारच छान) हार किंवा छातीवर एकादे बिरुदाचे पदक वगैरे अचानक येऊन पडलेले नाही याची खात्री करून घेतली. माझे हे अभिनंदन कशाबद्दल याचा पत्ता कांही लागत नव्हता. तेवढ्यात 'तो'च पुढे म्हणाला. "इस उमरमेंभी आपके सभी दाँत साबूत हैं ने।"
मी मनात विचार केला, मला 'इस उमरमें' म्हणणारा हा कोण? योगायोगाने त्याच दिवशी मी एक किस्सा वाचला होता. साठीला आलेल्या एका माणसाला कोणी तरी विचारले, "कुणाला वृध्द म्हणायचे?" त्याने आपल्या बापाचा सल्ला घेतला. ऐंशीच्या घरातल्या त्याच्या पिताश्रींनी सांगितले, "हे बघ, माझ्याहून पंधरा वीस वर्षांनी मोठा असेल तो म्हातारा असे समज."
म्हणजे वृध्दावस्था ही समजण्याची गोष्ट आहे तर! आणि माझ्याच वयाचा हा माणूस माझे वय काढतोय्! तो नक्कीच स्वतःला तरणाबांड समजत असावा. पण असे असेल तर तो या ज्येष्ठ नागरिकांच्या आसनावर कां बसला आहे? त्याला उठून उभे रहायला सांगावे म्हंटले तर आजूबाजूला कोणी वयस्क माणूस उभा नव्हता. असा प्रवासी येईपर्यंत वाट पहायचे ठरवले.
'तो' पुढे बोलत होता, "अभी आप फोनपर वात करते थे ने, तभी मैने देखा।" मी बोलण्यासाठी उचकटलेला माझा जबडा इतक्या जवळून कोणी पहात असेल या विचारानेच मला इतका मोठा धक्का बसला की आ वासण्यासाठी तो पुन्हा उघडला गेला. पटकन मी त्याचे रूपांतर बत्तीशीमध्ये करून घेतले. (ही ही करतांना समोरचे दहा बाराच दांत दिसत असले तरी त्यालाही मराठीत बत्तीशी असेच म्हणतात.) मी सांगितले, "अहो, हे समोरचे दाखवायचे दांत तेवढे आता जागेवर आहेत. (चांवून) खायचे मागचे दांत (दाढा) गायब झाल्या आहेत. काल परवापर्यंत त्यासुध्दा होत्या, पण फुटाणे आणि शेंगदाणे खातांना त्यांचेच तुकडे पडायला लागले म्हणून मी आता ते खाणे सोडून दिले आहे."
"अरेरे .."
मी लगेच म्हंटले, "अहो, तोंडात दातही आहेत आणि घरात चणेसुध्दा आहेत हे सुख मी निदान पन्नास वर्षे तरी उपभोगले आहे. त्या काळात मी चण्यांना भिजवून, भाजून, तळून किंवा शिजवून अगदी पोट भरेपर्यंत (किंवा बिघडेपर्यंत) त्यांचा आस्वाद घेतला आहे. आतासुध्दा मी शिजवलेल्या चण्यांना बोटांनी आणि इतर प्रकारांना यंत्राने चिरडून चण्यांना पोटात घालतो आहेच."
पूर्वी एकदा मी 'पावाचे पाचशे पंचावन्न पौष्टिक पदार्थ' या नांवाचा लेख 'मिसळपाव'वर लिहिला होता. आता 'चण्याचे चारशे चव्वेचाळीस चविष्ट पदार्थ' त्याला सांगावे असा विचार मनात आला. पण 'तो' गुज्जूभाई असल्याचे एव्हाना माझ्या लक्षात आले होते आणि जन्मापासून फाफडा, गांठिया आणि फरसाणात रममाण होणा-याला चण्याच्या गुणांबद्दल मी बापडा काय सांगणार? त्याच्या आकारमानावरून 'तो' खाण्यापिणायाची चांगली आवड असणारा दिसत होता, पण त्यालासुध्दा या वेळी खाद्यसंस्कृती या विषयावर वायफळ बोलाचे चर्वितचर्वण नको असावे.
त्याने एकदम थेट विषयाला हात घातला, "आप अभीभी वर्किंग हैं?"
मी उत्तर दिले, "नाही. मी रिटायर झालो आहे. पण निष्क्रिय नाही. जोंवर हांतपाय चालत आहेत, तोंवर ते चालवत राहिले म्हणजे ठीक असतात. त्यामुळे मी काम करतो, पण ते पोट भरण्यासाठी नव्हे."
आता मी कसले डोंबलाचे काम करतो ते सांगणे तसे कठीणच होते, पण त्यालासुध्दा त्यात रस नव्हता.
'तो' सांगत राहिला, ( यापुढील संभाषणाचा मराठीत अनुवाद) "मला मात्र अजूनही रोज बारा बारा तास काम करावे लागते. मला दोन मुले आहेत, पण ती कमावत तर नाहीतच, उलट माझ्याकडून दर महिन्याला पांच पांच हजार रुपये घेतात, पॉकेटमनी म्हणून."
"अजून ती लहान आहेत का?"
"नाही हो, एक चाळिशीला आला आहे आणि दुसरा पस्तीशीच्या वर आहे. ते म्हणतात जोंपर्यंत मी कमावतो आहे तोंपर्यंत त्यांना कमावायची काय गरज आहे?"
मला नीटसा बोध होत नव्हता. ही मध्यमवयापर्यंत पोचलेली त्याची मुले, खरे तर बाप्पे, खरेच इतके कुचकामाचे असतील? आणि या महागाईच्या जमान्यात याने दिलेल्या महिन्याला पांच हजार रुपयात त्यांचे भागत असेल?
'तो' पुढे सांगतच राहिला, "अहो, घरात 'अनुशासन' म्हणून नाही."
वेगवेगळ्या लोकांना भिजवायला माझा खांदा कां आवडतो हे मला न सुटलेले कोडे आहे. 'तो' एकादा लहान मुलगा असता तर मी त्याच्या पाठीवरून हांत फिरवून त्याला उगी उगी म्हणून नक्कीच शांत केले असते, युवक असला तरी त्याचा प्रॉब्लेम समजून घेऊन योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला असता, पण या माणसाचे काय करायचे ते मलाच कळेना. त्याची समजूत घालायची, त्याच्या मुलांचीही जी कांही बाजू असेलच ती समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, त्याच्या सांगण्याची री ओढत त्याच्या त्या अज्ञात मुलांना दोष द्यायचा की त्यांनी अनुशासनहीन होण्यासाठी 'त्या'लाच जबाबदार धरायचे?
मी थोडेसे अडखळत म्हंटले, "तुमची केस जरा वेगळीच दिसते आहे. अहो आपली मुले लहानाची मोठी होत असतांना त्यांच्याबरोबरची त्यांची मित्रमंडळी, शेजारची आणि नात्यातली मुलेसुध्दा प्रगती करत असतात. आपण केलेल्या उपदेशापेक्षा सुध्दा एकमेकांचे पाहूनच मुले जास्त हिरीरीने पुढे यायला धडपडत असतात. असे सर्वसाधारणपणे दिसते."
'तो' लगेच म्हणाला, "माझी मुले चांगली आहेत हो, पण त्यांच्या बायड्यांनी त्यांना बिघडवले, आळशी बनवले."
आता तर हद्द झाली होती. कमावण्याची सुरुवात होण्यापूर्वीच याने त्यांची लग्ने सुध्दा लावून दिली? की तो पराक्रम त्यांनी स्वतःच केला होता? असेल तर कशाच्या बळावर? त्यांना कुचकामी बनवण्यात त्यांच्या बायड्यांचा कसला हेतू असू शकेल? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात. इथे स्त्रिया आपल्या पुरुषांच्या समोर उभ्या राहून त्यांना अडवत होत्या कां? दिवसाला बारा बारा तास कष्टवून 'त्या'चा देह झिजल्यासारखा दिसत नव्हता की काळजीने काळवंडल्याची कोणतीही खूण त्याच्या चेह-यावर दिसत नव्हती. पण मला असे गोंधळात टाकून त्याला काय मिळणार होते? असली रडगाणी ऐकून लगेच मी कांही उदार होऊन मदतीचा हांत पुढे करणार नव्हतो आणि ते त्यालाही ठाऊक असावे. खरे सांगायचे तर 'तो' माझ्याकडून कोणत्याही प्रतिक्रियेची अपेक्षाच करत नसावा. मलाही त्याच्या समस्यांच्या जंजालात स्वतःला गुरफटून घ्यावेसे वाटत नव्हते. पण हे सगळे कुतूहलजनक होतेच.

एवढ्यात त्याचा उतरण्याचा बसस्टॉप आला. तो शांतपणे उठला, मागच्या लेडीजसीटवर बसलेल्या आपल्या बायडीला सोबत घेऊन उतरून गेला. मी त्याचाच विचार करत राहिलो. त्याने सांगितले ते खरे होते की टाइम पास करण्याचा त्याचा हा एक आगळा मार्ग असेल?

Sunday, May 09, 2010

गांधीनगर (उत्तरार्ध)

मुंबईहून गांधीनगरपर्यंत थेट जाणा-या रेल्वेगाड्या कदाचित असतीलही, पण माझ्या ओळखीचे सगळे लोक अहमदाबादमार्गेच गांधीनगरला जातात. मुंबईहून अहमदाबादला जायची मात्र खूपच चांगली सोय आहे. रात्री एकापाठोपाठ एक तीन चार रेल्वेगाड्या इथून सुटतात आणि दिवस उजाडण्याच्या सुमाराला त्या अहमदाबादला पोचतात. परत येण्यासाठीसुध्दा अशाच सोयिस्कर गाड्या आहेत. यातल्याच एका सुपरफास्ट स्पेशल गाडीत माझे आरक्षण झाले होते. रात्रीचे जेवण घेऊन त्या गाडीत जाऊन पथारी पसरली. सकाळी सहाच्या सुमाराला जाग आली तेंव्हा आमची गाडी अहमदाबादेच्या परिसरात आली होती आणि फलाटावर जागा मिळण्याची वाट पाहात यार्डमध्ये थांबली होती. तिथून ती पुढे सरकली आणि खिशातला भ्रमणध्वनी खणाणला. मला घेऊन जाण्यासाठी आलेल्या गाडीच्या ड्रायव्हरने वाट पाहून फोन लावला होता. म्हणजे वाहनाची व्यवस्था झाली होती. सुरुवात तर अपेक्षेप्रमाणे चांगली झाली. सकाळच्या वेळी रस्ते मोकळे असल्याने आम्ही अर्ध्या तासातच गांधीनगरला येऊन पोचलोसुध्दा. संस्थेनेच सोय केलेली असल्यामुळे गेस्टहाऊसचा पत्ता शोधून काढण्याची गरज नव्हती. रेल्वे स्टेशनहून निघालो तो थेट अतिथीगृहासमोरच येऊन पोचलो.

त्या दिवशी विद्यापीठाला सुटी असल्यामुळे व्याख्यान देण्यासाठी जायचे नव्हते. दिवसभर गांधीनगर शहर पहात भटकण्यात घालवायचा असे मनात ठरवले होते. पण जसजसा दिवस वर येत गेला, तसतसा उन्हाचा पारा भराभर चढत गेला. सकाळची आन्हिके उरकून न्याहारी घेईपर्यंत बाहेर कमालीचे रणरणते ऊन पडले होते. आम्हाला गेस्ट हाऊसवर पोचवून संस्थेची मोटर कार अदृष्य झाली होती आणि आता शहरात फिरण्यासाठी पायपीट किंवा मिळाली तर ऑटोरिक्शा हेच पर्याय होते. चालत किंवा उघड्या रिक्शेत बसून उन्हाची ती रखरख अंगावर घेण्याची काडीएवढी इच्छा होत नव्हती. शिवाय या ठिकाणी पंचवीस दिवस रहायचे असतांना सुरुवातीलाच सनस्ट्रोक वगैरेचा धोका पत्करणे परवडले नसते. गेस्टहाऊसमध्ये आधीपासून आलेल्या पाहुण्यांकडून इथल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती जमवत बसलो.

गांधीनगरचे अक्षरधाम मंदीर हेच आजचे त्या जागेचे सर्वात मोठे पर्यटकांचे आकर्षण आहे यात शंका नाही. हे स्थान पाहण्यासाठी दीड दोन तासांपासून पांच सहा तासांपर्यंत वेळ लागेल असे अंदाज सांगितले गेले. मनात किती श्रध्दा असेल त्यानुसार हा आकडा कमी जास्त होणार हे उघड होते. यापूर्वी मी अॅटलांटाचे स्वामीनारायण मंदीर पाहिले होते तेंव्हा या संप्रदायाची ओळख झाली होती. त्याच्या गुरूशिष्यपरंपरेबद्दल विशेष आस्था वाटत नसली तरी जगभरात ठिकठिकाणी या पंथाची जी केंद्रे उभारली गेली आहेत आणि या काळात त्यांनी देशोदेशी जी भव्य मंदिरे बांधली आहेत ते पाहून अचंभा आणि आदर निश्चितपणे वाटतो. गांधीनगरच्या अक्षरधामबद्दल जे वृत्तपत्रात वाचले होते त्यावरूनच आवर्जून पहाण्याच्या स्थानांमध्ये त्याचा समावेश झालेला होता. कामानिमित्य नव्हे, तर पर्यटनासाठी म्हणूनही जेंव्हा गुजरातचा दौरा होईल तेंव्हा हे स्थान पहायचेच होते. रोज रात्री तिथे एक अप्रतिम असा दृक्श्राव्य कार्यक्रम होतो असे समजले. त्याचा विचार करता संध्याकाळी मंदिराचे दर्शन करून रात्रीचा कार्यक्रम पाहून परतायचे असा टू इन वन बेत केला. ही अक्षरधामची भेट अविस्मरणीय ठरलीच. त्यावर स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.

आमच्या अतिथीगृहापासून जवळच एक विस्तीर्ण उद्यान होते. त्याच्या गेटपर्यंत वाहनाने गेले तरी आंत गेल्यानंतर पायी फिरणे भागच होते. शिवाय तिथे खाण्यापिण्याची कांही व्यवस्था नाही असे कळले. त्यामुळे पहाटे उठून प्रभातफेरीसाठी तिकडे जाणे श्रेयस्कर असल्याचे मत पडले. गांधीनगरपासून दहा बारा किलोमीटर अंतरावर एक प्राचीन काळातली विहीर आहे. तिची रचना आणि वास्तूशिल्प पहाण्यासारखे आहे. राज्यसरकारची कार्यालये, विधानसभा वगैरे इमारतींबद्दल खास असे कांही ऐकले नव्हते. अतिरेक्यांच्या धोक्यामुळे जो कडेकोट बंदोबस्त अलीकडे असतो तो पाहता त्या इमारतींमध्ये प्रवेश मिळणे तर अशक्य होते. दुरूनच त्यांचे दर्शन घ्यावे लागले असते.

कोणतीही विशिष्ट वास्तू न पाहतासुध्दा गांधीनगर हे प्रेक्षणीय शहर आहे, ते मुख्य म्हणजे तिथल्या सुरेख रस्त्यांमुळे. नव्या मुंबईत पाम बीच रोड नांवाचा एक प्रशस्त आणि सरळ हमरस्ता आहे. तेवढा अपवाद सोडला तर मुंबईतल्या कोठल्याही रस्त्यावरून वाहन चालवणे मेटाकुटीला आणते. गांधीनगरला जिकडे पहावे तिकडे सरळ रेषेत दूरवर जाणारे रुंद रस्ते आहेत. हमरस्ते तर आठ पदरी आहेतच. त्यांच्या बाजूने जाणारे सर्व्हिस रोडदेखील दुपदरी आहेत. आधीपासून असलेल्या रस्त्यांची उत्तम निगा राखली जातेच, शिवाय ज्या भागात अजून वस्तीसुध्दा झालेली नाही अशा संभाव्य विस्ताराच्या प्रदेशात आजच मोठाले रस्ते बांधले जात आहेत. आमचे गेस्ट हाऊस शहराच्या बाहेरच्या अंगाला वसवले जात असलेल्या इन्फोसिटी या भागात होते. तिथले रस्ते, नगररचना, इमारती वगैरे पाहता आपण कोठल्या देशात आहोत असा प्रश्न पडावा. पण इतक्या सुंदर रस्त्यांच्या कडेला दिसणारे कच-याचे ढीग पाहून लगेच भान येते.

Thursday, May 06, 2010

गांधीनगर (पूर्वार्ध)

१९६० साली द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन गुजरात राज्य अस्तित्वात आले तेंव्हा त्या राज्यासाठी गांधीनगर नांवाची नवी राजधानी उभारावी असे ठरले आणि एका नव्या नगराची रचना सुरू झाली. राज्य सरकारचे मंत्री, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कार्यालये आणि निवासस्थाने बांधली गेली आणि हे नगर नांवारूपाला येत गेले. पण या ठिकाणचे सर्वसामान्य जीवन सुरळीतपणे चालत असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी मिळावी अशा घटना त्या जागी क्वचितच घडत असतील आणि या जागेचे नाव वर्तमानपत्रात फारसे वाचनात येत नसे. गुजरातमध्ये घडलेल्या बहुतेक घटनांचे वृत्तांत अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, सूरत अशा त्या राज्यातील प्रमुख शहरांतूनच येत असत. त्यामुळे गांधीनगर हे नांव कांही फारसे डोळ्यासमोर येत नसे किंवा कानावरही पडत नसे. कामाच्या निमित्याने मी अहमदाबादला अनेक वेळा जाऊन आलो, पण तेथून जवळच असलेल्या गांधीनगरलाही भेट देऊन हे नवे नगर पाहून यावे असे मनात आले नाही किंवा कोणी कधी तसे सुचवले नाही.

गुजरातमध्ये जेंव्हा निवडणुका होत असत त्या काळात अर्थातच गांधीनगरचे नांव प्रकाशात येत असे. एका राष्ट्रीय नेत्याने गांधीनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवल्यामुळेही त्या गांवाला प्रसिध्दीचे थोडे वलय प्राप्त झाले होते. येथील अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला करून रक्तपात केल्यामुळे बरीच खळबळ माजली होती. या गांधीनगरला जाऊन मला कांही दिवस तिथे रहायचे आहे असे वाटायचे मात्र कांहीच कारण दिसत नव्हते. माझ्या ध्यानीमनी नसतांना अशी एक संधी मागच्या महिन्यात आली.

गेल्या पन्नास वर्षात गुजरात राज्याने सर्वच क्षेत्रात चांगली प्रगती केली. त्यांच्या सुदैवाने किना-यालगतच्या भागात पेट्रोलियमचा मोठा नैसर्गिक साठा लाभला आणि तांत्रिक प्रगतीसाठी आणखी एक मार्ग खुला झाला. या क्षेत्रातले तंत्रज्ञान आत्मसात करून वृध्दिंगत करण्याच्या दृष्टीने गांधीनगरला एका खास पेट्रोलियम युनिव्हर्सिटीची स्थापना झाली आहे. इतर ऊर्जास्रोतांचाही अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या शाखा या विद्यापीठात सुरू केल्या आहेत. या नवनव्या क्षेत्रात अध्यापन करण्यासाठी त्यासंबंधी जाणकारी असलेले तज्ज्ञ प्राध्यापक लगेच मिळणे कठीण आहे. त्यामुळे अशा क्षेत्रात काम करून सेवानिवृत्त झालेल्या अनुभवी लोकांचे सहाय्य सुरुवातीला घ्यावे असा विचार करून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. कोणीतरी माझे नांव या संदर्भात सुचवले आणि आधी थोडे आढे वेढे घेत अखेर मी या कामात मदत करायला तयार झालो.

एकादे काम एकदा अंगावर घेतले की ते शक्य तितक्या चांगल्या प्रकारे करणे क्रमप्राप्तच होते. त्यामुळे मी जो विषय शिकवायला घेतला होता त्यातील माझ्याकडे असलेल्या ज्ञानाची उजळणी करून घेणे, त्यात नव्याने पडलेली भर समजावून घेणे, त्याची वीस भागात व्यवस्थितपणे विभागणी करून मांडणी करणे वगैरे करण्यात बराच वेळ जात असे. यामुळे या वर्षाच्या सुरुवातीपासून या ब्लॉगसाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता. या दोन कामांचा एकमेकांना उपयोग व्हावा या दृष्टीने मी चक्क पंपपुराणच सुरू करून त्याचे अनेक भाग लिहून काढले.

अखेर गांधीनगरला जाऊन प्रत्यक्ष व्याख्याने देण्याचे वेळापत्रक ठरले. अनेक व्हिजिटिंग फॅकल्टी असल्यामुळे त्यांचे येणेजाणे, राहणे वगैरेंच्या सोयीच्या दृष्टीने त्यांनी आपापल्या विषयावरील व्याख्याने सलगपणे देणे गरजेचे होते, पण एकाच दिवशी एकाच विषयाचे दोन तीस तास घेणेही योग्य नव्हते. या दोन्ही गोष्टींचा विचार करून मला तब्बल पंचवीस दिवसांचा कालावधी दिला गेला होता. तेवढ्या काळात मुंबईहून गांधीनगरला पुन्हा पुन्हा जाणे येणे शक्य नसल्यामुळे मी गांधीनगरच्या दोन खेपा करून यायचे ठरवले. तारखेनुसार वेळापत्रक आंखून पहिल्या सत्रासाठी चौदा एप्रिलला गांधीनगरला जाऊन दाखल झालो.

. . . . . . . . . . . (क्रमशः)